आजोळ (भाग २)

Submitted by क्रांति on 25 July, 2010 - 10:14

http://www.maayboli.com/node/18116
[पुढे]

दोन वर्षांखाली रेल्वे अपघातात निरंजनचे आई-बाबा गेले, गेल्या वर्षी केतकीची आई गेली, बाबा त्यांच्या गुरूंसोबत तीर्थयात्रेला गेले तेव्हापासून लहानग्या ओंकारला सांभाळण्यासाठी केतकीनं आपली पीएचडी अर्धवटच ठेवली, निरंजनला मदत म्हणून त्याच्या फॅक्टरीत जाणं सोडलं. त्यात भर म्हणून की काय, स्वैपाकाच्या सखूबाईंनी काम सोडणार असल्याचं सांगितलं. निरंजनच्या बालपणापासून त्यांच्याकडे कामाला असलेल्या सखूबाई अगदी विश्वासाच्या, जशा काही घरच्याच होत्या. त्या काम सोडणार म्हणजे त्याचं कारणही तसंच काही महत्त्वाचं असणार!
"पोरी, अग माज्या लेकाला तिकडं मुंबैला नोकरी लागली फ्याक्टरीत. र्‍हायला जागा बी मिलनार हाय. मग त्याचं लगीन हुईपरेंत तरी त्याला करून खाऊ घालायला पायजेल का न्हाई कुनी? आन मी तर हितं काय करीन यकटा जीव! लेक म्हने, तू बी चल तकडंच. लई इचार करून निगाले बग. आग, त्याचा बी अर्दा जीव इतं न् अर्दा तितं र्‍हायचा. त्यापरास जाते आपली त्याच्यासंग. तसं इतं तरी काय हाय आपलं! ना घर, ना जमीनजजुमला. त्यो द्येव ठरीवनारा कुनी कुटं र्‍हायचं ते!" सखूबाईंनी काम सोडायचं कारण सांगितलं, त्याला विरोध करणंच शक्य नव्हतं.
"पण मग मला आता तुमच्यासारखी विश्वासाची बाई कुठं मिळणार? इतके दिवस मीच काय, पण हे घरच पूर्णपणे तुमच्यावर विसंबून आहे. अगदी घरच्याच एक होऊन तुम्ही या घरासाठी कष्ट केलेत. असं इतकं आपलेपण असणारं आता कोण मिळणार मला?" केतकी बोलली.
"अग पोरी, त्याची काळजी आपन कोन करनार? त्यो बसलाय न्हवं वर त्याची फिकर करनारा. आग, तुला सांगते, येक माउली हाय. भल्या घरची, चांगली बाई हाय माज्याच शेजारी र्‍हातीय. बिचारीच्या जल्माची चित्तरकता आइकशीला तर थक व्हशील. आशी येळ त्या इट्टलानं का आनली तिच्यावर, त्यालाच ठावं. तिला मी तुज्याकडं घिऊन येते कामाला. माज्यापरीस झ्याक काम करतीया. हाताची गोडी तर आशी हाय तिच्या की मी बी हक्कानं तिला कालवन मागून घेते जेवताना. तू बग येक डाव तिला." सखूबाईंनी दुसर्‍या बाईची सोय तर केली होती खरी, पण ती कोण, कुठली याची माहिती हवीच होती ना!
"कोण, कुठली आहे पण ती?" केतकीनं विचारलं.
"द्येवाघरची हाय, त्यानं धर्माची बहिन म्हून तिला वारकरी बुवाच्या ताब्यात दिली, आन वारकरी बुवानं माज्या हाती सोपवली."
सखूबाईंचा नवरा वारकरी होता. दरवर्षी पायी वारी करायचा तो पंढरीची. विठ्ठलावर त्या कुटुंबाची प्रचंड भक्ती होती.
"मला नीट सांगा बरं काय ते."
"आग, दोन वर्सापल्याड वारीला गेलते बुवा, तवाची गोस्ट हाय. येक पोरगा आन त्याची माय बुवाच्या मागं लायनीत थांबलं व्हतं दर्सनासाटी. मदीच त्यो पोरगा बुवाला बोलला, "बाबाजी, जरा माज्या आईसाटी पानी आन खायला कायतरी घिऊन येतो, तवर तिला बगा." आन त्यो जो गेला, दर्सन झालं, भजन झालं, फराल झाला तरी त्येचा पत्त्याच न्हाई! रात झाली तसं वारकरी बुवानं तिला तिचा ठावठिकाना इचारला. दोन दिवस आजून मुक्काम व्हता त्येंचा पंडरीत. तवर तिला आपल्या मंडळीतल्या बायांच्या सोबत दिऊन बुवा तिच्या गावाकडं जाऊन आले, तवा तेला समजलं की पोरानं मायला वारीत नेऊन वार्‍यावर सोडलं आन तिकडं तिच्या घराचा सौदा करून पैशे घिऊनशान त्यो गायब झाला! सांग आता काय म्हनावं या कर्माला!"
"बाप रे! किती विचित्र! मग पुढे काय झालं?" केतकी चक्रावूनच गेली ते ऐकून!
'पुडं काय व्हनार? बुवानं त्या माउलीला समदी हाकीकत सांगितली, आन म्हनाले, बग माय, तू मला इट्टलाच्या सोडीन तर द्येव मला कवाच मापी देनार न्हाई. तवा तू माज्यासंगट गावाकडं चल, माज्या लक्षिमीच्या झोळीत घालतो तुला. तुमी दोगी ठरवा काय कराचं ते."
सगळंच विलक्षण होतं ऐकलेलं!
सखूबाईंनी पुढं सांगायला सुरुवात केली. "बुवा तिला घिऊन आले. मला तिची समदी हाकीकत सांगितली. मला बी भरून आलं माय. चांगल्या घरची माउली ती, आन तिला आसे दिवस दावले त्या इटूनं! आसल काई गेल्या जल्माचं! म्या तिला घरातच र्‍हा म्हनलं. तिनं म्हटलं, मला दोन-चार कामं मिळवून दे, आसं बसून रहानं बर न्हाई. मग तिला कामं मिळवून दिली, जवळच येक खोली किरायानं घिऊन दिली. गेल्या साली बुवा वरती गेले, तवा माज्याकडून वचन घेतलं त्येनं की त्या माउलीला मरस्तोवर आंतर दिऊ नकोस. आता या पोराला नोकरी मिळाली, तर त्याला तर कसं वार्‍यावर सोडू? तिला तिकडं चल म्हनलं तर ती नको म्हनतीय. म्हनून तिला तुज्या वटीत घालते, तूच आता तिला संबाळ." सखूबाईंनी केतकीला विनवलं.
"उद्या रविवार आहे. उद्या निरंजनही घरीच आहे. तिला घेऊन या तुम्ही." केतकी म्हणाली. रात्री जेवतानाच केतकीनं सखूबाईच्या धर्माच्या नणंदेची चित्तरकथा निरंजनला सांगितली होती, त्यावर त्यांची दोघांची बरीच चर्चाही झाली होती. आईबाबावेड्या निरंजनला हे सगळं ऐकून अगदी गहिवरून आलं होतं आणि आपल्याकडून जितकं करता येईल तितकं करू असं त्यानं ठरवलं होतं.
...............
दुपार सरत आली होती. रविवारची सगळी जास्तीची कामं नुकतीच हातावेगळी करून झाली होती. ओंकार आणि निरंजनचं बागकाम, केतकीची साफसफाई सगळं संपवून संध्याकाळच्या कामांची तयारी सुरू होती.
"केतकीबाय" सखूबाईची हाक आली, तशी केतकी धावलीच. एक क्षण फक्त सखूबाईच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तिनं पाहिलं आणि "रत्नामावशी............." अशी हाक घालून तिच्या गळ्यातच पडली! निरंजन, ओंकार आणि सखूबाई यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही!
रत्नामावशीसाठी सतत झुरणार्‍या केतकीला रत्नामावशीचा अखेरीस शोध लागला होता तो असा!
दोघी दारातच गळ्यात गळे घालून भावनांना वाट करून देत होत्या. त्यांच्या भावनांचा भर ओसरल्यावर त्या भानावर आल्या. घरात येत केतकी म्हणाली, "आता मी तुला मुळीच सोडणार नाही रत्नामावशी. तू माझ्याच घरी रहायचं!"
"अग पोरी, कष्टावर वाढलेला जीव हा. याला निवांत रहाणं कसं जमायचं आता?" रत्नामावशी बोलली.
"रत्नामावशी, तुला कामच करायचं आहे ना?" या निरंजनची कमाल आहे हं! केतकीला त्याचं अगदी कौतुक वाटलं. समोरच्या माणसाला कसं वश करावं याची विद्या त्याला चांगलीच अवगत आहे! अगदी नकळत त्यानं संवादाची सूत्रं आपल्या हातात घेतली होती.
"हो, आणि मी तुला अहो सासूबाई वगैरे म्हणणार नाही. तू माझ्यासाठीही रत्नामावशीच रहाशील. हं, तर तुला आवडतं काम जर मी दिलं, तर तुझी काही तक्रार नाही ना? हं, पण ते काम इथं या घरात राहूनच करावं लागेल. आहे का तयारी तुझी?"
"आग माय, या वयात येकली र्‍हान्यापरास तुजी आपली मानसं मिळाली तर त्येंच्यासोबर र्‍हा न. तुला सांगते माय, आग दोगबी लई ग्वाड सोबावाची हायेत ग लेकरं. मला बी आगदी घरच्यावानी वागवलंया इतके दिस त्येंनी. तू तर त्येंना आईसारकी. इचार नग करूस." सखूबाईंनी जसं काही निरंजनला अनुमोदनच दिलं!
"हे बघ मावशी, तुला मुलं खूप आवडतात ना? हो, केतकीकडून खूप खूप ऐकलंय तुझ्याबद्दल. तुला बागकाम आवडतं, तुला लहान मुलांशी खेळायला, त्यांना गोष्टी सांगायला खूप आवडतं. हो ना? चल तर मग. आता ठरलं. आपल्या मागच्या आउट हाउसमध्ये आपण पाळणाघर काढू या. अगदी ओंकारसह आणखी कितीतरी मुलं अशी आहेत, ज्यांना आजीची गरज आहे. अशी मुलं मी तुला मिळवून देतो, आपल्या वरकामाच्या सगुणाबाईंची मनिषा नुकतीच मॉंटेसरीचा कोर्स करून आलीय तिला देतो तुझ्या मदतीला आणि आम्हीही आहोतच."
"लेकरा, काय म्हणू रे तुला? बोलायला काही शिल्लकच ठेवलं नाहीस मला म्हातारीला." रत्नामावशीचा कंठ दाटून आला होता.
"अग मावशी, आई-बाबा गेल्यापासून आम्ही अगदी एकाकी झालो होतो ग! आम्हालाही तर कुणीतरी आपलं, हक्काचं मोठं माणूस हवंच होतं. तू आलीस आणि आम्ही निवांत झालो. आता केतकीला तिची पीएचडी पूर्ण करता येईल, मला मदत करता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ओंकारला आजी मिळेल."
केतकीनं सगळ्यांसाठी कॉफी आणली. सखूबाई जायला निघाल्या, तशी केतकी त्यांच्या पायाला बिलगली आणि भरल्या गळ्यानं बोलली, "आज माझं हरवलेलं बालपण मला दिलंत तुम्ही सखूबाई! आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन मी!"
"तिला नीट संबाळ पोरी. लई लई कष्ट भोगले ग त्या माउलीनं. आता तरी तिला सुकात र्‍हाऊ दे!" सखूबाई पण भावनाविवश होऊन बोलली.
.....................
जवळजवळ पन्नास मुलं यायला लागली होती पाळणाघरात. पाळणाघर कसलं, ते तर आजोळच झालं होतं मुलांचं. सुटीदिवशी पण त्यांना घरात बसवत नव्हतं, इतका रत्नाआजीचा लळा लागला होता. संध्याकाळी जाण्याआधी शुभंकरोती, पाढे, कधी बागकाम तर कधी कागदकाम, वेगवेगळे खेळ अगदी मजेत रहायची मुलं तिथं. रत्नामावशीच्या आग्रहास्तव निरंजनच्या घराण्यातली जवळजवळ बंद पडलेली वारकर्‍यांना जेवण द्यायची परंपराही पुन्हा सुरू झाली होती. रत्नामावशीच्या येण्यानं भरभराट झाली होती. पहाता पहाता वर्ष झालं होतं त्या घटनेला. आज त्याच आजोळाचा पहिला वाढदिवस होता. फुगे फुगवून झाले होते, फुलांचे गुच्छ बनवून झाले होते, रांगोळ्या काढून झाल्या होत्या. मुंबईहून खास पाहुणे सखूबाई आणि त्यांचा मुलगा येणार होते सोहळ्याला.

"अग ए, पाहुणे आले ना बाई, कुठं आहे तुझं लक्ष?" खूप खूप मागे गेलेल्या केतकीला निरंजनच्या शब्दांनी भानावर आणलं. सगळी मुलं, त्यांचे पालक अगदी घरचं कार्य असावं तसे झटत होते. दृष्ट लागेल असा मस्त सोहळा झाला वाढदिवसाचा. सखूबाई अगदी खूश होत्या सगळं पाहून. रात्रभर दोघी जिवाभावाच्या नणंदभावजया [की मैत्रिणी?] गप्पा मारत बसल्या होत्या. सकाळी निघताना केतकीनं सखूबाईला भरगच्च आहेर केला. भारावलेली सखूबाई आभाळाकडं पहात इतकंच बोलली, "वारकरी बुवा, तुमच्या धर्माच्या बहिनीला सुकात बगताय न्हवं? आज मी तुमाला दिलेल्या वचनातुन मोकळी झाले बगा!"

गुलमोहर: 

आवडली.
नाव लिहिताना आजोळ (भाग १) आजोळ (भाग २) अस लिहिणार का?
म्हणजे नविन भाग कळायला सोप जाईल. मला आधि एकच गोष्ट दोन वेळा पोस्ट झालिये अस वाटत होत.

नाव लिहिताना आजोळ (भाग १) आजोळ (भाग २) अस लिहिणार का?
म्हणजे नविन भाग कळायला सोप जाईल. मला आधि एकच गोष्ट दोन वेळा पोस्ट झालिये अस वाटत होत.>> हो माझंही असंच झालं होतं... तीच गोष्ट असेल म्हणून खोलून बघायचा कंटाळा केला. Happy

धन्स गं कवे, लिंक दिल्याबद्दल!

क्रांति, अप्रतिम गोष्ट!

धन्स मंडळी.
सायली, ड्रीमगर्ल, अग खरं तर फार मोठी गोष्ट नसल्यानं एकाच भागात टंकायचा विचार होता, पण काल पावसामुळे नेट कधी गंडेल याची शाश्वती नव्हती. म्हणून पहिला भाग पटकन प्रकाशित करून टाकला. त्यात संपादन करायला वेळच नाही झाला. आता केलंय संपादन शीर्षकातच. Happy