Submitted by संदीप चित्रे on 16 April, 2008 - 14:03
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
समुद्री गाज, पोफळी बाग
कलती उन्हं सोनेरी झाक
सोनेरी वाळूत हिरवा पडाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
कौलारू घर, दारी झुलाव
पाण्यात दूर डोलतेय नाव
ताजी म्हावरं पैशाला पाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
लाकडी घर, टेकडीवर गाव
उतरतं छत .. काचेचा ताव
गुलाबी थंडी धवल वर्षाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
न्हाली दव, ऊबदार सकाळ
नेसूनि रंग ये….संध्याकाळ
चंदेरी उधळण चांदण्या वाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
जगती कोण, चुकला धाव?
मनी आपलं.. एक जपावं गाव
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
गुलमोहर:
शेअर करा
झकास तालै
झकास तालै राव...
कविता छान जमलीये, संदीप.
ते -संध्याकाळ थोडं अडखळल्यासारखं वाटतय.
शेवटच्या कडव्यात -
'जगती कोण, चुकला धाव?' - काय अर्थ पल्ले पडला नाय.
अजून एक भोचकपणा - मी संपूर्ण कविता शेवटची ओळ 'स्वप्नातला गाव, ज्याचा त्याला ठाव' अशी वाचली...