डी.एन.ए. की मुलांवरचे संस्कार?

Submitted by सावली on 6 July, 2010 - 22:45

निंबुडाची "चिऊताई चिऊताई दार उघड" गोष्ट वाचली आणि बरेच महिने माझ्या मनात असलेले काही प्रश्न परत टोचायला लागले. इतके दिवस नवऱ्याबरोबर बोलायचेच पण इथे माबोवर कदाचीत अजूनही काही वेगळी मत ऐकायला मिळतील, नवीन दृष्टी मिळेल अस वाटल्याने लिहितेय.

आपण लहान मुलांना कितीतरी गोष्टी सांगतो. बऱ्याचदा लहानपणी ऐकलेल्या , कधी आपण बनवलेल्या, रामायणातल्या, महाभारतातल्या, गणपतीच्या, कृष्णाच्या. अगणित गोष्टी आहेत आपल्याकडे. मी अगदी भारतातून येताना पुस्तक , सीडी सगळ घेऊनही आले होते.

मग जसजस मुलीला गोष्टी सांगायला सुरुवात केली तस तस मलाच त्रास व्हायला लागला. यातल्या जवळ्पास सगळ्या गोष्टी कोणत्यातरि राक्षसाच्या मरणाने संपतात.

२/३ वर्षाच्या मुलांना कळत का हे? त्यांना साध मारण (धपाटा वैगेरे) आणी ठार मारण यातला फरक कळतो? मग या गोष्टी ऐकुन कधि ते बाळ म्हणाले की मारल्यावर मरुन जाणार कीवा मी राक्षसाला मारते, मग तो मरुन गेला गेला. अस ऐकून की कसतरिच वाटायला लागलं.
राक्षस वाईट आहेत म्हणून त्यांना मारून टाकायचं हे आपल्याला पटतं. राक्षस म्हणजे वाईट प्रवृत्ती हेहि आपल्याला जाणवत, पण ते समजावून सांगणे मला फार कठीण वाटत. मी तरी सध्या सगळ्या राक्षसांना पळुन लावतेय. पण हे कितवर करणार?

एकीकडे आपणच म्हणायचं जगातली युद्ध बंद झाली पाहिजेत सगळीकडे शांतता राहिली पाहिजे आणि दुसरीकडे आपणच या मारून टाकायच्या गोष्टी सांगायच्या याला काय म्हणायचं?
एकीकडे व्हिडियो गेम्स मध्ये मारून टाकायचे खेळ खेळण्याने मुलांवर वाईट परिणाम होतो म्हणायचं आणि दुसरीकडे आपणच गोष्टीमाधला वाईट कोणीतरी मेला म्हणून छान म्हणायचं?
बर आपण ज्याला वाईट म्हणतो तोच खरा वाईट हे हि कशावरून नाही का? आपण म्हणतो म्हणून?

साधी गणपतीची गोष्ट घ्या. शंकर देव असूनही त्याने एका लहान मुलाचे डोके उडवले? यात हा मुलगा लहान होता, काय वाईट केल होत त्याने? त्याने त्याच्या आईची आज्ञाच पाळली होती ना?
मग आईला वाईट वाटल म्हणून दुसऱ्या कोणाचे तरी डोकं कापून लावायचा पण क्रूरपणाच नाही का? आपल्या लहानपणी आपण हि गोष्ट नुसती ऐकली. आता पुस्तकात रंगीत चित्र असतात. सीडी लावली तर अगदी समोर बघता येत हे. काय परिणाम होत असेल हि दृश्य बघून मुलांवर? माझी मुलगी सीडीवर हि गोष्ट लागली कि या भागात माझा हात घट्ट धरून ठेवते आणि मला सांगते तू पण बघू नकोस. हे जवळपास सर्व राक्षस कथांमध्ये होतं.
मग शंकर चांगला कि वाईट?

कार्तिकेयाच आपल्या आईवर रागावून निघून जाणं पण नक्की कुठल्या प्रकारात बसत आणि त्या पासून उदबोध काय घ्यायचा? त्याच्या आई बाबांनी पक्षी शंकर पार्वतीने त्याची समजूत घालायचा प्रयत्न केलाच नाही? तो एवढासा मुलगा आई असताना आईशिवाय राहिला?

कुठल्या कुठल्या देवांचे काही ठराविक गोष्टी केल्या नाहीत म्हणून रागावणे आणि शाप देणे कसे काय चांगले आणि समर्थनकारक? आपण मुलांना यातून काय शिकवतो? आपण चुकलो कि देव रागावतो म्हणून आपण चुकीच वागायचं नाही? आयुष्यभर मग तो हे ओझे वागवणार का? आणि ज्या क्षणी त्या मुलाची देवाची भीती जाईल तेव्हा तो नक्की कसा वागेल? मी तरी मुलीला सांगते कि वाईट वागल्याने देवाला, आई बाबांना वाईट वाटते, बाकीच्यांना त्रास होतो म्हणून वाईट वागायचं नाही. ममं फेकून दिल कि देवबाप्पाला खूप वाईट वाटत कारण कितीतरी लोकांना ममं मिळतच नाही मग ते लोक उपाशी असतात आणि तू ममं फेकतेस. म्हणून ते चुकीच आहे अस सांगते. आपण मुलांवर या कसलाश्या भित्या (भीतीचे अनेकवचन) घालून त्या भीतीपोटी चांगल वागायला का शिकवायच? मग मोठ झाल्यावर जेव्हा जेव्हा कायद्याची भीती नसते , तो तोडून शिक्षा न होता राहता येईल अस वाटत तेव्हा ते तसच वागतात. शिक्षा नाही मग कसेही मनमानी करा. मनाची भीड नाहीच कारण आपणच ती कधी शिकवली नाही.

पंचतंत्रामधल्या बर्‍याच गोष्टिपण लबाडि, खोटे बोलणे शिकवतात अस नाहि का वाटत तुम्हाला? म्हणजे त्यात चलाखी कशि करायची, जगात कसा टिकाव धरायचा हे सांगितल असते पण शेवटि चलाखी आणि लबाडि मधे कीती सुक्ष्म फरक आहे. तो कसा देणार समजावुन? गोष्टीमधला ससा मरण वाचवण्यासाठी खोट बोलतो ते चालत पण घरात आईशी मार वाचवण्यासाठी खोट बोललेलं चालत नाही. यातला फरक कसा आणि कधी समजावून द्यायचा?
बगळा आणि कोल्हाच्या खिरीच्या गोष्टीमध्ये बगळापण नंतर कोल्ह्याला जेवता येणार नाही अशी खीर वाढतो. जशास तसे वागलच पाहिजे का? त्याशिवाय जगात खरच टिकाव लागणार नाही का?
त्या कोल्हा आणि बकऱ्याच्या गोष्टीमध्ये विहिरीत पडलेला कोल्हा बकऱ्याला फसवून विहिरीत पाडतो आणि त्याच्या अंगावर पाय ठेऊन बाहेर पडून निघून जातो. मग तो पडलेला बकरा काय करतो? यातून काय शिकवायच? दुसऱ्याचा गैरफायदा घ्या आणि स्वतला सुखात ठेवा?

कोणी लहान मूल उंबरठ्याला अडकून पडले कि त्याची आज्जी, आई उंबरठ्याला एक चापटी मारतात.का तर म्हणे त्याने पाडलं बाळाला म्हणून त्या उंबरठ्याला आपण मारायचं. मग बाळाला आनंद होतो. म्हणजे तो दुसऱ्याला त्रास देऊन त्यातून आनंद घ्यायला शिकवत नाही का आपण? आणि आपली चुक शोधायला कशी लावायची बाळाला मग? का पडला हे सांगितलच नाही तर तो पुन्हा नाही का तसाच पडणार? आपल्या चुकांवर, दुख्खावर हसायलाहि कस येणार मग? आपल्याला त्रास झाला कि दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडायच, धडा न शिकता तेच जून पुराण उगाळत राहून, त्या दुसऱ्याला कसा त्रास द्यायचा हेच बघत राहायचं. जशास तसे !
यावर आम्ही काढलेला उपाय म्हणजे पडलं कि सरळ हसायचं. अशीकशीना धुप्प्कन पडली म्हणायचं. मग उंबरठा दाखवायचा आणि सांगायचं अरेच्या हा तुला दिसला नाही ना म्हणून पडलीस बर तू. पुढच्या वेळेला बघ हा नीट. पुढच्या वेळेलाही ती तेच करते आणि हसते. केव्हातरी कळणारच आहे तिला काय केल कि पडायला होत नाही ते.

मग कधितरि वाटत यामधेच तर आपल्या प्राप्त स्थितीची मूळ नाहीत ना?
फक्त स्वतःची तुंबडी भरणे. कायद्यातून पळवाटा काढणे. घरात कचरा काढून मागल्या खिडकीने फेकून देणे, मग तो दुसऱ्याच्या दारात पडला तर त्याच तो बघून घेईल असे वाटणे. देवळातल्या , बसच्या रांगेत उभ न रहाता रांग तोडून धक्के मारून पुढे घुसणे. रस्ता साफ करायची जबाबदारी तर राहूच द्या पण त्यावर कचरा "न" टाकायची जबाबदारी सुद्धा आपली नाही असे वाटणे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचे दुसऱ्यावर खापर फोडणे आणि सतत फोडत राहणे. दुसऱ्याच्या घरात(देशात) काहीका होईना , माझ्या घरात(देशात) जोपर्यंत मला त्रास होत नाही तो पर्यंत मी अजिबात बघणार नाही. हे सगळे वागणे जन्मजात असते?? आपल्या डी.एन.ए.मध्ये हे लिहिलेले असते?? कि आपल्यावर झालेल्या संस्कारांचा हा परिपाक आहे?
तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतेय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील चर्चा वाचली नाही पण मी चक्क अशा गोष्टी बदलते, मुलीला सांगताना. त्याने त्याला ठार केले पेक्षा त्याने त्या वाईट माणसाला मोठी शिक्षा दिली असेच सांगते. अजुन मोठी होईल तेव्हा पाहु. डोके कापाकापी सारख्या गोष्टी सांगितल्या नाहीत अजुन कारण त्या प्रश्नावर उत्तर देण्याची माझी कुवत नाही. Happy .. आणि अर्थात ज्या गोष्टीत मरामरी नसेल अशा सांगते.
आत्ताकुठे मुलीला 'मरण' ही संकल्पना असते ते कळलय पण ते नक्की काय असते ते कळले नाहिये. मी पण फार शंकानिरसन करत नाहिये, जरा अजुन मोठी होउदे असे वाटते.
पण बालसाहित्य वाचताना वा टीव्हीवर पहाताना जे दाखवले जाईल ते आपल्या हातात नाही.

सुनिधी, सेम हिअर. लेकाने एक स्पायडर मॅनचे पुस्तक हट्टाने घ्यायला लावले. त्यात चोरी, तुरुंग असे उल्लेख आहेत. त्याला अजून वाचता येत नाही त्यामुळे आम्ही सांगताना वेगळीच गोष्ट सांगतो. तरी त्यात चोराला दोराने बांधून ठेवल्याचे, स्पायडर मॅनने चोराला ठोसा मारल्याची चित्र आहेत. त्यावर काही तरी फनी स्पष्टीकरण दिले, ते त्याला आवडले.

सुनिधी, गोष्ट सांगताना सिलेक्टिवली सांगता येईल.पण वी.सी.डी.त पाहतो तेव्हा हे प्रश्न येतात.
सिंडरेला,अगं मीपण अशीच वेळ मारून नेत असते.पण किती दिवस करणार असं ?

वेळ मारुन नेण्यापेक्षा त्याला ती गोष्ट समजण्याची कुवत आहे की नाही हे महत्वाचं. माझा मुलगा साडे तीन वर्षाचा आहे. आत्ताच त्याला चोरी वगैरे गोष्टी सांगू नये असं मला वाटतं.

सिंडरेला अनुमोदन.

मुलांच्या व्हॅल्यू सिस्टिम आश्च्रर्य कारक रीत्या बरोबर असतात. स्वतःच्याबुद्धी ने ते खूप चांगले निर्णय घेतात.
खोटे बोलायचे नाही, कॉपी करायची नाही, मैत्रीणींच्यात चीटिन्ग करायचे नाही.

त्यांना असे चोरी, काळा पैसा वगैरे एका वया पर्यंत माहित नसले तरी चालते. १४- १५ च्या वयात त्या बाबी सांगून मग त्यातील दुष्परिणाम समजावून सांगता येतात. त्यांच्या निरागस पणा मुळे आपल्यालाही एक प्रकारचा आधार मिळतो.

बाफ जुना आहे. व चर्चाही चांगली झालेली आहे.

चर्चेत न मांडला गेलेला एक मुद्दा :

गोष्टी वगैरे सांगून 'आपण' मुलांवर संस्कार 'करतो' हे कितपत खरे वाटते तुम्हाला?

मुले तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीवर जास्त लक्ष अन विश्वास ठेवतात. त्यातून जास्त शिकतात. तुमचे वागणे हज्जारदा जास्त संस्कार करून जाते. हॉटेलात गेल्यावर बाबा वेटरला तुच्छतेने वागवतात का? रस्त्यावर समोरून येणार्‍या मूर्ख(?) वाहन चालकाला तुमचा रिस्पॉन्स कसा असतो? हमरी तुमरीचा? समजूतीचा? आणिक कसा? - हजारो लहान मोठ्या गोष्टी पाहून मूल शिकते. तुम्ही सांगितलेल्या / वाचून दा़खविलेल्या गोष्टी हा फार छोटा भाग आहे संस्कारात. एकाच घरातील २ मुले वेगळी वागण्याचे उदाहरण आले मघाशी. दारूड्या बापाची मुले. यात परत मुलाने कुणाला रोल मॉडेल म्हणून निवडलंय यावर फार काही अवलंबून असते.

अन शिवाय, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायाचा राहत नाही. आज ना उद्या तुम्ही सांगणे टाळलेल्या गोष्टी मुले वाचणार / पहाणार आहेतच. अन मग त्यांना जो शॉक बसेल त्याचं काय? की अरे, इथे तर वेगळं लिहिलेलं आहे, माझ्याशी खोटं का बोलले असतील?

रूनी, पुन्हा प्रयत्न करणार? मी आत्ता टिचकी मारली तर चालला.
किंवा TED (ted.com) वर raghava करता सर्च कर. (raghav नाही)
त्याचे 'शेक अप युअर स्टोरी' (दूसरेही एक आहे)
हे ५ मिनिटांचेच आहे.

प्राप्त परिस्थितीत वागावे कसे?

उपलब्ध पर्यायांपैकी कुठला बरा, कुठला चांगला आणि कुठला उत्तम ह्याची जाण विकसित करणे हा संस्कारांचा उद्देश असावा.

मुळात कुठल्याही जीवास अशी जाण उपजतच असते.

तरतम ज्ञानाचा उपयोग स्वार्थाकरताच करायचा की सर्वजनसुखाय करायचा की सर्व प्राणीमात्रांच्या सुखार्थ करायचा की जैव विश्व चिरंतन टिकून राहण्याकरता करायचा ह्या उद्दिष्टांपाठोपाठ प्रवास करतांना निर्माण झालेले हे स्वाभाविक प्रश्न आहेत.

त्यांची उत्तरेही तशाच स्वाभाविकपणे शोधायला हवीत!

पुराणातल्या गोष्टींमधे पूर्ण अनुमोदन. जमलं तर नाही सांगितल्या लहानपणी तरी चालेत. पंचतंत्राच्या गोष्टींबद्दल मात्र असं नाही वाटत. आता कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट मला वाटतं आहे जरुरी. मी ३ वर्षाची शाळेत जायला लागले तेव्हा एक मुलगी मला रोज मारायची. रोज घरी येऊन मी रडायचे. बाईंना खूप सांगून पाहिलं पण ती वर्गातून बाहेर आल्यावर मारायला लागली. बाई तरी एवढ्या मुलात किती लक्ष ठेवणार. आईने एकदाच सांगितलं आपण गोष्टीत वाचतो की नाही सारखं कुणी त्रास दिला तर जशास तसं वागायचं. दुसर्‍या दिवशी मी तिला मारलं मग ती रडल्यावर हेही सांगितलं तुला जसं दुखतं तसं मला रोज दुखतं आता मला मारु नकोस. त्यामुळे या गोष्टी प्रॅक्टीकल जगात लागतात असं मला वाटतं.
दुसरं विहिरीत टाकून कोल्हा निघून गेल्याची गोष्टं असं आपल्याला लोक करतात म्हणून दुसरं कुणी काही देतय म्हणून भुलून नाही जायचं. लोक फायदा घेऊ शकतात हे शिकवायचं आणि खरंच शाळेत असं वागणारी मुलं/मोठी माणसं त्यांना आज ना उद्या भेटू शकतातच की.

पंचतंत्राच्या गोष्टी मला वाटते किशोर वयातील मुलांसाठी आहेत.
लहानपणी आम्हाला गणेशजन्माची गोष्ट वेगळीच सांगितली जायची.

फार पुर्वी गजासुर नावाचा राक्षस होता, याने शंकराची पुजा केली आणि शंकराला प्राप्त करायच्या मिषाने वर मागितला की तु माझ्या उदरात स्वतःची स्थापना कर. शंकर गजासुराच्या शरिरात प्रवेश करुन रहायला लागले तेंव्हा कैलासावर गोंधळ उडाला. पार्वतीने विष्णुला मदतीसाठी आवाहन केले.
दरम्यान कैलासाचे रक्षण करण्यासाठी तिने मातीत अंगाची मळी मिसळुन पुतळा केला आणि त्यात प्राण ओतले तो गौरीतनय.
इथे विष्णु नंदी व इतर देवांसह गजासुराच्या महालात दाखल झाले. अनेक खेळ करुन त्याने गजासुराचे मन जिंकले. जेंव्हा गजासुराने त्यांच्याजवळ "काय बक्षीस देउ?" म्हणुन पृच्छा केली, तेंव्हा
विष्णुने शंकर परत मागितला. गजासुराने बदल्यात मला अमर कर असे वरदान मागितले.
आता हे भागच पडले म्हणुन विष्णुने मान्य केले. मग पोट फाडुन शंकर बाहेर आलेत आणि कैलासाकडे निघाले.
गौरीतनयाने शंकराला कैलासाच्या पायथ्याशी आत येणयास मज्जाव केला. शंकर आणि गौरीतनयाचे तुम्बळ युद्ध झाले आणि त्यात त्याचे शिर धडावेगळे झाले. शंकर आत येताच पार्वतीला आनंद झाला. बोलताना शंकरांनी हे सर्व पार्वतीला सांगितले तेंव्हा पार्वतीने चिडुन शंकरांजवळ आपल्या मुलाला परत जिवंत करण्याची मागणी केली. शिवाने यावर विचार करुन एका दगडात २ पक्षी मारले.
१) त्यांनी गजासुराचे जिवंत मस्तक गौरीतनयाला लावले. यावर त्याला गजानन नाम प्राप्त झाले.
याप्रकारे त्यांनी गजासुराला अमर केले.
२) या गजाननाला त्यांनी जिवंत करुन गणांचे अधिपत्य (त्याचा पराक्रम पाहुनच) दिले. त्यामुळे त्याचे गणपती असे नामकरण झाले आणि पार्वतीला आनंद झाला.

शंकर ही देवता भारतात वैदिक काळाच्या पण पुर्वीपासुन आहे (लिंग पुजा भारतात वैदिक पुर्व कालात होती) या काळात हिंसा ही दैनंदिन बाब होती. त्याकाळचे निकष आपल्याला आता जसे तसेच लावता येत नाहीत.
गणेशाची CD पाहताना हे जाणवते की बनविणार्यांनी याचे भान ठेवले पाहिजे की ती लहान मुलांसाठी आहे. त्यांनी गौरीतनय या युद्धात मारला गेला एवढेच म्रुतदेह दाखवुन स्पष्ट करता आले असते. . पण सीडी मध्ये खुप भडक द्रुश्य व भाव आहेत.

आमच्या लहानपणी CD नव्हत्या यामुळे या गोष्टीचे आम्हाला कधीच भय वाटले नाही.
शेवटी काय पुराणातील वांगी पुराणात!
आपल्याला योग्य वाटेल त्याप्रकारे योग्य त्याच गोष्टी सांगाव्यात.

दुसर्या धर्मातले उदा देते
ओल्ड टेस्टामेंट मध्ये लिहिली की "डेविडने फिलेस्टाइन लोकांआ हरवुन त्यांच्या २०० लोकान्च्या फोरस्कीन्स आणल्या"
म्हणजे लहान मुलांच्या पुस्तकात फक्त डेविडने फिलेस्टाइन लोकांना हरवले एवढेच लिहिण्यात येते.

उद्या शिबी राजाने स्वतःचे पायाचे मास दिले हे सांगताना आपण सीडी आणुन मांडी चिरुन मास काढताना पाहिले तर किळस येणारच. दाखविणार्याने माध्यमाचा आणि ऑडियन्सचा नीट अभ्यास करुन चित्रण करणे आवश्यक आहे.

कोणी लहान मूल उंबरठ्याला अडकून पडले कि त्याची आज्जी, आई उंबरठ्याला एक चापटी मारतात.का तर म्हणे त्याने पाडलं बाळाला म्हणून त्या उंबरठ्याला आपण मारायचं. मग बाळाला आनंद होतो. म्हणजे तो दुसऱ्याला त्रास देऊन त्यातून आनंद घ्यायला शिकवत नाही का आपण?
आणि आपली चुक शोधायला कशी लावायची बाळाला मग? का पडला हे सांगितलच नाही तर तो पुन्हा नाही का तसाच पडणार? आपल्या चुकांवर, दुख्खावर हसायलाहि कस येणार मग? आपल्याला त्रास झाला कि दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडायच, धडा न शिकता तेच जून पुराण उगाळत राहून, त्या दुसऱ्याला कसा त्रास द्यायचा हेच बघत राहायचं. जशास तसे !
यावर आम्ही काढलेला उपाय म्हणजे पडलं कि सरळ हसायचं. अशीकशीना धुप्प्कन पडली म्हणायचं. मग उंबरठा दाखवायचा आणि सांगायचं अरेच्या हा तुला दिसला नाही ना म्हणून पडलीस बर तू. पुढच्या वेळेला बघ हा नीट. पुढच्या वेळेलाही ती तेच करते आणि हसते. केव्हातरी कळणारच आहे तिला काय केल कि पडायला होत नाही ते.

नाही, सावली तु विचार करते तसा विचार मी ही केलेला, पण स्वतःकडे पाहुन विचार कर असे तुला आजीने शिकवले त्यामुळे तुझ्यावर वाईट संस्कार झाले का? लहान मुलांना हाSSत म्हणुन उंबर्याला मारायची अ‍ॅक्शन केली की ते डीस्ट्रॅक्शन होउन रडायची थांबतात. हसायची आयडिया ही तशीच डीस्ट्रॅक्शन म्हणुन युरोप/ अमेरिकेत वापरली जाते (आम्ही देखिल वापारली) यामुळे त्यांनी विचार केला की कोण पडले तर आपण लहान मुलांना हसायला तर शिकवत नाही ना? तर किती चुकीचे होइल.
एकाच वेळी तुम्ही मुलांना सर्व काही शिकवु शकत नाही पण एकदम गोंधळुन जाउ नका.

मला वाटत की पंचतंत्रातल्या गोष्टीचे जर तात्पर्य सांगता आल तर कदाचित जास्त योग्य ठरेल. जस कि कोल्हा आणि करकोचा या गोष्टीचे तात्पर्य जशास तसे अस आहे तर मुलाना अस सांगण जास्त बरोबर होइल कि आपण नेहमी चांगले वागवे म्हणजे सगळे आपल्याशी चांगले वागतिल...' जशास तसे'.....

कोल्हा आणि बकर्‍याच्या गोष्टीत पण कोल्ह्यासरख वागायच नाही असही सांगता येउ शकेल.

मला अजुन तरी गोष्टी सांगायचा अनुभव नहिए... पण एक विचार मनात आला म्हणुन लिहिल.

> आपण नेहमी चांगले वागवे म्हणजे सगळे आपल्याशी चांगले वागतिल...' जशास तसे'.....

पण जगात असे नसते. तुमच्या चांगुलपणाचा फायदा ही घेतल्या जाऊ शकतो. पण म्हणुन चांगले वागायचे नाही का?
असे मुळीच नाही. चांगले वागणे हे आतुन यायला हवे, कारण चांगले असणे "चांगले" असते.

Pages