पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल

Submitted by sabha on 3 July, 2010 - 08:58

पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल

आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो. ठाणे - पनवेल - चौक - कर्जत - कशेळे - खांड्स असा साधारण ८० कि.मी.चा प्रवास करुन ७.३० ला खांड्स गावात पोहोचलो. कशेळे - खांड्स रस्ता मस्त हिरवा झाला होता. लगेच क्लिकुन टाकलं.

मुंबईचे काही ट्रेकर्स आलेले होते तर काही ट्मट्म्यातनं धडकत होते. खांड्स गावातल्या हॉटेलमध्ये पोहे आणि चहा घेतला आणि गाडी काढली ती थेट गणेशघाटात. तेवढच ३-४ कि.मी. अंतर वाचल हो चालायचं. चालायचंच. गाडी पार्क केली, कोरडे कपडे गाडीतच ठेवले आणि ८.१० ला निघालो. पावसाळ्यातला ट्रेक आणि आकाशात ढगांचा मागमुस नाही. गाडीच्या काचेत दिसणा-या निरभ्र आकाशावरुन कल्पना येईलच म्हणा.

जुन एन्ड म्हणजे काही भरपुर पाऊस झालेला न्हवता पण तरीही गणेशघाटाच्या बाजुचे डोंगर हिरवाईने नटायला लागले होते. ऐन श्रावणामध्ये ईथलं रान मस्त ओल गच्च असत.

रमत गमत चालायला सुरुवात केली, एका दगडावर एक मस्त रंगीबेरंगी किडा दिसला. क्लिक !!

बाजुच्या पाना-झुड्पांवरसुध्दा काही ठिकाणी पाणी जमा झालेले होतं. क्लिक !!

क्लिकत क्लिकत मजल दरमजल करत १५-२० मिनीटातच गणेशघाटातल्या गणपतीच्या देवळात पोहोचलो.

देवळात थोडीशी विश्रांती घेऊन ८.४५ ला निघालो वाटेत एके ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारची अळंबी दिसली. झुम मोडमध्ये ती आईसक्रिम चोकोबार सारखी वाट्त होती (मश्रुमाईस्क्रीम).

१५-२० मिनीट चाललो असु आणि एकदम पदरगडाचं प्रथम दर्शन झाल पण काही सेकंदापुरतच कारण आता पदरगडाला ढग वेढा घालायला लागले होते. मध्येच ढग यायचे पदरगड दिसेनासा व्हायचा पुन्हा दोन मिनीटात ढग भिमाशंकरच्या दिशेने निघुन जायचे. आकाश निरभ्र. या ऊन सावलीच्या खेळात भिमाशंकर मात्र मस्त चमकत होता.

पदरगडाचं प्रथम दर्शन

ढगांच्या वेढ्यात पदरगड

ऊन सावलीच्या खेळात चमकणारा भिमाशंकरच

क्षणभर विश्रांती

साधारण ९.३० च्या सुमारास आम्ही एका खुणेच्या विहीरीपाशी आलो. या विहीरीच्या मागुनच पदरला वाट जाते अशी माहिती होती. आम्ही विहीरीला प्रदक्षीणा घालुन बघीतली वाट काही मिळेना. सगळीकडेच रान माजल्यासारखं झालेले. आता मात्र वाट लागली होती (आमची). तेवढ्यात पदरवाडीतुन काही गुर आली आणि त्यांच्या मागे एक गुराखीसुध्दा. मामाला हाक मारली, ऒ मामा पदरला जायची वाट कुटं हाय ? हिकडुनच हाय बोलला असावा कारण तो काय बोलतोय हे आमच्यातल्या एकाला सुध्दा समजत न्हवतं. पदरला घेऊन जाता का विचारल तर गुर न्यायची आहेत चरायला त्याचे काय करु बोलला. ओप हाय का विचारल ते थोढ्यावेळानं कळलं की तो रोप आहे का विचारत होता. म्हटल रोप आहे आमच्याकडे. पैसे किती घेणार तर ५०० म्हणाला हे मात्र आम्हाला लगेच कळलं. पैश्याची भाषा सगळीकडे सारखीच असते असं म्हणतात. आम्ही १०० पासुन सुरुवात केली आणि २५० ला डिल फ़िक्स.

१०.०० ला मामा बरोबर निघालो. दाट झाडीतुन जाणारी वाट, आधी कधीही या बाजुला आलो नसल्याने आम्हाला मिळणे म्हणजे अशक्यच होतं बर झालं मामाला घेतलं ते. वाटेत एके ठिकाणी वाघाचे ठसे दिसले. ते सुध्दा मामानेच दाखवले. ३ वर्षाच्या वाघाचे ठ्से आहेत ही माहिती देखील दिली मामाने.

वाघाचे ठसे (ठसे पुसट झाल्यासारखे वाटतात ना ? शिवसेनेचा वाघ असेल. असो.)

अर्धा पाऊण तास चढुन एका खिंडीपाशी आलो. लहान मोठ्या दगड धोंड्यांची खिंड होती ती.

चिमणी

या खिंडीच्या शेवटी चिमणी आहे तिथे रोप लावावा लागतो. खिंडीच्या टोकाला डोंगर अत्यंत निमुळता होत गेलेला आहे. त्या जागेतुन सरळ चालणे अशक्य. तिरके होऊनच जायचे आणि चिमणी मारायची, म्हणजे आपले पाय समोरच्या डोंगराला तर पाठ मागच्या डोंगराला चिकटवायची आणि पाय आणि पाठ यांचा आधार घेऊन शरीर वरती ढकलायचं म्हणजे चिमणी मारायची.

मामाने टपाटप चिमणी मारली आणि रोप फ़िक्स केला. नंतर थोड्या फ़ार प्रयत्नानंतर आम्हीसुद्धा चिमणी मारुन प्रसंगी रोपचा आधार घेऊन खिंड पार करुन वरती आलो.

खिंडीतुन दिसणारे द्रुश्य विहंगम होते, समोरच्या बाजुला शिडीघाटाची वाट आणि सिध्दगड पर्यंतचा प्रदेश दिसत होता तर मागच्या बाजुला पेठचा किला ऊर्फ़ कोथळीगड खुणावत होता.

शिडीघाटाची वाट आणि सिध्दगड पर्यंतचा प्रदेश

पेठचा किला ऊर्फ़ कोथळीगड

पेठचा किला ऊर्फ़ कोथळीगड

खिंडीत येऊन थोडावेळ विसावलो, आणि मागच्या बाजुला असलेल्या १०-१५ फ़ुटी रॉक पैच वर चढायला सुरुवात केली. रॉक पैच मारुन वरती आलो तर समोर एक छोटीशी गुहा होती

गुहेच्या बाजुने दगडात खोदलेल्या पाय-या आम्हाला पदरच्या टॉप वर घेऊन गेल्या.

पदरचा माथा

पदरचा माथा विशेष मोठा न्हवता, सहावारीच असावा. पदरच्या माथ्यावरचे दोन सुळके मात्र लक्शवेधी होते. सुळके चढायचे म्हणजे पुर्णपणे टेक्नीकल क्लायंम्बीग होतं आणि आम्हाला अर्थातच तिथे जायचं ही न्हवतं.

पदरच्या ऊजव्या कड्यावरील टाके लांबुनही स्पष्ट दिसत होतं.

टाक्याच्या बाजुलाच काही देवाचे दगड होते ते भैरोबा आणि शनी देव आहेत असे मामाने सांगितले.

मुख्य गुहेत जाणारी वाट

सुळक्याच्या ऊजव्या बाजुने तसेच पुढे गेलो की आपण पदरच्या मुख्य गुहेत पोहोचतो. गुहा ब-यापैकी मोठी आहे. (कलावंतीणीची असावी) २०-२५ माणसं आरामात राहु शकतील. गुहेत बसुन आराम केला थोड्सं खाऊन घेतलं, टाक्याचं पाणी प्यायलो आणि निघालो.

मुख्य गुहा

एव्हाना मी बामण आहे आणि गुरुजीगिरी करतो हे मामाला कळ्लं होतं, पुन्हा देवांपाशी येताच मामाने आमच्या देवाना अभिशेक करा म्हणुन आग्रह केला, त्याचा आग्रह मोडवेना, म्हणुन पुन्हा टाक्यातलं पाणी घेतलं आणि शनी महाराज आणि भैरोबा यांना महिम्नाचा अभिशेक करुन टाकला. मामादेखील खुश झाला. श्रध्दाळु असतात हो हे लोक. असो.

अर्ध्या तासात पुन्हा खिंडीत आलो तर तिथे खालुन काही लोकांचे (ट्रेकर्स) आवाज येत होते. ईथे तात्याची हालत पहाण्यासारखी झाली होती.

मला वाटलं होत आज पदराला हात लावणारे आपणच असु पण मुंबई-ठाण्याच्या अजुन एक ग्रुप पदराला (पदरगडाला) हात लावण्यासाठी सरसरत होता. आता ऎन चिमणीपाशी गर्दी झाली असती आणि वेळही मोड्ला असता त्यामुळे आलो त्या वाटेने न ऊतरता दुस-य़ा बाजुने ऊतरायचं ठरवलं. खिंडीतनच ऊजव्या बाजुने खाली जाणारी वाट पदरला मागच्या बाजुने वळसा घालुन पुन्हा गणपती घाटात येते. ही वाट भरपुर घसा-याची आहे पण पाऊस झाल्यामुळे माती बसली होती आणि घसारा विशेष वाटत न्हवता. ह्य़ा घसा-याच्या वाटेने साधारण अर्धा तास ऊतरल्यावर (घसरल्यावर) आम्ही पदरच्या विरुध्द बाजुला आलो तिथुन भिमाशंकरचा डोंगर दिसत न्हवता.

पदर मागच्या बाजुने

आता पुन्हा एकदा आभाळ भरुन आलं आणि आम्ही ज्याच्या प्रतिक्षेत होतो त्या पावसाला जोरदार सुरवात झाली. तिथुन पुन्हा १५-२० मिनीटं सपाटीवर चालुन, पावसाचा मार खात, पदरला वळ्सा घालुन येत होतो. वाटेत एके ठिकाणी चांगल बांधलेल पाण्याचं टाक दिसलं त्याच्या बाजुलाच एक कातळात कोरलेली शंकराची पिंडी होती.

कातळात कोरलेली शंकराची पिंडी

पुन्हा गणपती घाटाच्या वाटेवर आलो. विशेष म्हणजे तुकाराम मामाची गुरं देखील त्याच परिसरात चरायला आली होती. तुकाराम मामाला आम्ही तिथेच निरोप दिला, मामाने देखील श्रावणात मुक्कामाला या आमच्याकडे पदरवाडीला असा आग्रह केला. १५-२० मिनीटात पुन्हा गणपतीच्या देवळात आलो. वाटेत भिमाशंकरी लोक्स भेटत होतेच. आता मात्र भुका लागल्या होत्या कारण दुपारचे तीन वाजत आले होते आणि सकाळ्पासुन विशेष काही खाणं देखील झालेलं न्हवतं. पाऊस जरा कमी झाला होता.

देवळात आल्यावर लगेच सँडवीचची तयारी केली, सँडवीचं हादड्ली आणि निघालो.

१० मिनीटात गाडीपाशी आलो. कोरड्या कपड्यांचा सेट गाडीतच ठेवला होता म्हणुन बरं. कपडे बदलले, खांडस गावातच चहा प्यायला आणि साधारण ४.१५ च्या सुमारास निघालो ते ६.४५ ला ठाण्याला परत आलो.

अशारितीने बरेच दिवसांपासुन मनात असलेल्या पदराला हात लावुन झाला, पण एखादी कलावंतीण दिसेल असे वाटलं होतं ती काही दिसली नाही. असो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, काय थरारक प्रवास आहे ? परदेशी घरबसल्या, हे सगळे अनुभवायला मिळतेय, ते मायबोली(करां)च्या कृपेमूळेच !!

छानच!!!!
आणखी एक सॉलीड दुर्गभ्रमण वृतांत.. with fine photographs.>>>> किरणला मोदक Happy

मी आत्तापर्यंत "कलावंतीणीचा महाल" आणि पनवेलजवळ (प्रबळगडाजवळचा) असलेला "कलावंतीण दुर्ग" एकच समजत होतो. Sad

पेठच्या (कोथळीगड) वारीत दिसलेला पदरगड, पण नक्की माहित नव्हते. सभा धन्यवाद फोटो आणि वृत्तांतबद्दल.

<<<<< वाघाचे ठसे (ठसे पुसट झाल्यासारखे वाटतात ना ? शिवसेनेचा वाघ असेल. असो.) >>>>>>>.....

मस्तच.... Rofl Rofl Rofl Rofl

केव्हढं जिवंत वर्णन आणी फोटो.. कसले सुळके आहेत.. खरच आम्हीपण फिरून आलो वर्चुली ..आणी इतक्या दगडधोंड्याच्या खडबडीत, कठीण रस्त्यावर तो एक कोण अनवाणी चाललेला होता?? टू मच Happy

छान फोटो आणि वर्णन.
ती दगडात कोरलेली शंकराची पिंडी - बहुतेककरून तिचं निमुळतं होत जाणारं टोक उत्तर दिशा दाखवत असणार. पूर्वीच्या काळचं होकायंत्र होतं ते. प्रत्येक गडावर कुठे ना कुठेतरी अशी उत्तर दिशा दर्शवणारी शंकराची पिंड असतेच असते. Happy

खूप छान फोटो आणि वर्णन..
<<२५० ला डिल फ़िक्स >>
त्या मामाला पैसे दिल्याचे कुठे लिहीले नाही तुम्ही ... Happy

गुरुजी मजा आली.............
लै झाक...........................अभिशेक करुन टाकला.....
स्मित