बिलंदर : भाग ६

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 June, 2010 - 06:37

समस्त मायबाप वाचकहो, हा भाग टाकण्यात झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल माफी तरी कशी मागु? काही अपरिहार्य कारणांमुळे हा भाग टाकायला खुपच उशीर झाला. पण कदाचीत त्यामुळेच मला कळाले की मायबोलीकरांचे माझ्यावर , माझ्या लेखनावर किती प्रेम आहे, किती जीव आहे ते. या पुढे अशी चुक होणार नाही याची ग्वाही देत हा भाग टाकतोय. खरेतर या भागात संपवण्याचा विचार होता. पण काही नवीन गोष्टी अ‍ॅड होत गेल्याने पुढच्या भागापर्यंत तुम्हाला अजुन प्रतीक्षा करावी लागेल. क्षमस्व.

विशाल कुलकर्णी

************************************************************************************************************

बिलंदर : भाग १ ते ५

मागील भागावरून पुढे....

दारावर टक टक झाली, तशी शिर्‍याने उठून दार उघडले.

"अवधूत कामत" आहेत का?

समोर एक तिशी-पस्तिशीतला माणुस उभा होता.

"नाही अवधूत अजुन आला नाही कामावरुन. काही काम होते का? मला सांगा, मी देइन त्याला निरोप."

"मी..मी अविनाश वाळूंजकर. अवधुतबरोबर त्याच्या कुरियर कंपनीत कामाला होतो कुरियर बॉय म्हणुन. नुकताच सोडलाय जॉब मी. पण तुम्ही कोण? इथे कधी बघितलं नाही तुम्हाला?" त्या माणसाने विचारले...

त्याची शेवटची वाक्ये ऐकली तसा शिर्‍या सावध झाला.

"नाही मी इथे नसतो. सायनला राहतो, मित्र आहे अवधुतचा. अधुन मधुन राहायला येतो इथे अवधुतकडे."

शिर्‍या समोरच्या माणसाच्या नजरेला नजर भिडवून बोलत होता, तशी त्या माणसाने नजर हटवली.

समोरचा माणुस सपशेल खोटे बोलत होता. त्याचे बोलणे, चालणे कुठल्याही अँगलने कुरियर बॉयचे वाटत नव्हते. त्याची उभे राहण्याची पद्धत, आवाजातली जरब स्पष्टपणे सांगत होती की हा माणूस डिपार्टमेंटचा आहे...

पण याचे औध्याकडे काय काम असावे...

कदाचित हा माणुस? हा तोच तर नसेल... सत्याचा पडद्यामागचा मित्र?

शिर्‍याने अपेक्षेने त्याच्याकडे बघत मनाशी काहीतरी निर्णय घेतला...........

"भाऊ, तुमचा नंबर देवून ठेवा, मी अवधूत आला की त्याला तुम्हाला कॉल करायला सांगतो."

"त्याला फक्त माझे नाव सांगा, तो ओळखेल मला. त्याच्याकडे आहे माझा नंबर"

तो माणूस निघून गेला.

तसा शिर्‍याही त्याच्या मागे घराबाहेर पडला.

तो माणुस लगबगीने निघाला होता, शिर्‍याही साधारण पाच - सहा फुटाचे अंतर ठेवून त्याच्या मागे लागला. थोडे अंतर गेल्यावर त्या माणसाने खिशातून मोबाईल काढला.

"गावडे साहेब, मी ३२४०.... वाळूंजकर बोलतोय. तो पोरगा काही नाही भेटला. पण त्याच्या घरी दुसराच एक पोरगा होता. २५-३० चा असेल. मित्र आहे म्हणाला सायनला असतो म्हणाला.... अं...बरं ठिक आहे. मी त्याच्यावर नजर ठेवीन आत्ताच परत जातो आणि घरावर नजर ठेवतो. तो अवधूत आला की त्याला भेटूनच येतो. त्या नव्या पोराचीही काही माहिती मिळते का ते पाहतो."

आणि वाळूंजकर परत फिरला. शिर्‍या त्याच्या मागेच होता. त्याने अवधुतला फोन लावला.

"औध्या, वाळूंजकर म्हणून कुणाला ओळखतोस का तू?"

"हा आहे एक जण, मागे माझ्याकडे आला होता एकदा, आमच्या कंपनीत काम लावून दे म्हणुन. पण त्याला पार्टटाईम जॉब हवा होता. आमच्याकडे संधी नव्हती म्हणून मग मी त्याला सांगितले होते की टच मध्ये राहा, काही असेल तर सांगेन. का रे.. तो परत आला होता का?"

"आला होता, इन फॅक्ट तो घराबाहेर तुझी वाट बघत थांबलाय. आता मी काय सांगतो ते नीट ऐक औध्या, तुझा हा वाळूंजकर पोलीसांचा माणुस आहे. बहुदा काँन्स्टेबल वगैरे असावा. तू आलास की तो घरी येइल. माझ्याबद्दल विचारेल. काहीही सांग, फक्त माझा आणि सत्याचा काही संबंध होता हे त्याला कळता कामा नये. मी तुझा मित्र आहे, सायनला राहतो आणि छोटी-मोठी कामे करून पैसे मिळवतो. ओक्के?"

आणि हो मी आता घरी येत नाहीये. मी त्या माणसाच्या मागावर राहतो. तो जर पोलीसांचा माणूस असेल तर हा तोच, सत्याला मदत करणारा पोलीसवाला, किंवा त्याचा सहकारी असू शकतो. सांभाळुन घेशील ना औध्या? त्याला अजिबात संशय येता कामा नये.

"डोंट वरी, शिर्‍या. मी बरोबर हँडल करेन त्याला. तू बघ काय माहिती मिळते ते?"

शिर्‍या तिथेच आडोश्याला उभा राहून वाळूंजकरवर नजर ठेवत अवधूतची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने औध्या घरी परतताना दिसला आणि वाळूम्जकरने त्याला रस्त्यातच अडवले. शिर्‍या सुरक्षीत अंतरावर उभा राहून त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. शिर्‍याच्या अंदाजानुसार वाळूंजकरला त्याच्याबद्दलची उत्सुकता दडवता आली नाही. पण औध्याने त्याला पद्धतशीरपणे वाटाण्याच्या अक्षता लावल्या. वाळूंजकर परत फिरला तसा शिर्‍या त्याच्या पाठीला चिकटला.

**********************************************************************************************************

"ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... टेबलावरचा फोन खणखणला तसा रावराणे साहेबांनी बापाच्या मायेने फोनकडे पाहीले. हा जुन्या जमान्यातला अ‍ॅंटिक पीस त्यांच्या बहिणीने त्यांना दिला होता. आपल्या घरातील कॉर्नर टेबलवर त्यांनी खुप प्रेमाने तो अजुनही मेनटेन ठेवला होता.

पुढे होवून त्यांनी फोन उचलला....

"नमस्कार, इन्स्पे. सतीश रावराणे बोलतोय."

" नमस्कार, ............" पलिकडून कोणीतरी बोलत होते..

"काय, पण गावडे तर सांगत होता......" इति रावराणे

"................................................"

"ठिक आहे, पण तूम्ही त्याला कसे काय ओळखता?"

"......................................................"

"ओ माय गॉड, तुम्हाला या प्रकरणातली बरीच माहिती दिसते आहे."

"......................................................"

"हो हो नक्की भेटू आपण. मला या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी मिळेल त्या प्रकारची मदत हवी आहे."

"......................................................."

"मी पहिल्यापासुन या प्रकरणाच्या मागे आहे. खरेतर सतीशला मीच या सगळ्याच्या मागे लावले होते. पण आता दुर्दैवाने सतीश या जगातच नाही. त्याच्या खुन्यांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी कुठल्याही स्तराला उतरायची माझी तयारी आहे. वेळप्रसंगी कायदाही............"

"........................................................"

"ओक्के, डन ! मग आज संध्याकाळी आपण दादरच्या कबुतरखान्यापाशी भेटू. पण मी तुम्हाला ओळखणार कसा?"

"........................................................"

"दॅट्स गुड ! मग आज संध्याकाळी नक्की."

रावराणेसाहेबांनी समाधानाने फोन खाली ठेवला. त्यांचा अंदाज खरा ठरण्याची लक्षणे दिसत होती. पहिला धागा सापडला होता. आणि सुतावरून स्वर्ग गाठणे ही इन्स्पे. सतीश रावराणेंची खासियत होती.

**********************************************************************************************************

"साहेब्....साहेब...

दरवाजा ढकलून गावडे एखाद्या वादळासारखे रावराणे साहेबांच्या केबीनमध्ये शिरले.

"अरे गावडे, एवढे वाघ मागे लागल्यासारखे काय पळत सुटला आहात. शांत व्हा, हे पाणी प्या आणि मग बोला."

टेबलावरचा पाण्याचा ग्लास त्यांच्याकडे सरकवत रावराणेंनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

"साहेब वाघ नाही लागला मागे, पण त्याहीपेक्षा भयंकर असे काहीतरी घडले आहे. इरफानच्या मृत्युची दुसरी कडी आहे ही. त्या रोहीतची सेक्रेटरी कामिनी गायब आहे दोन दिवसापासून. विशेष म्हणजे त्या रोहीतने अजुनही कुठेच तक्रार नोंदवलेली नाही. मला तर या सगळ्यात त्या भ.....चाच हात दिसतो आहे. उचलायचा का त्याला?"

रावराणे शांतपणे हसले.

"बसा गावडे, तुमच्या वाळूंजकरला अजुन काही नवीन माहिती मिळाली की नाही."

गावडे त्यांच्याकडे पाहातच राहीले.

"च्यायला मी एवढी विस्फोटक बातमी घेवून आलोय आणि साहेब काही दुसरेच विचारतोय. याला आधीच तर मिळाली नाही ना ही बातमी?" गावडेंच्या मनाला पडलेली शंका.

"बसा गावडे, अजुनही खुप काही घडलेय. तुम्हाला ही बातमी खुप उशीरा कळलीय इतकेच. फॉर युवर काईंड इनफॉर्मेशन "काल संध्याकाळपासुन मोमीनभाई देखील गायब झालाय. त्याची माणसे वेड्यासारखी सगळ्या मुंबईत त्याला शोधताहेत. आपण खुप मागे आहोत गावडे. हा जो कोणी आहे, तो रोहीत नाही एवढे निश्चित. पण जो कोणी आहे तो खुप हुशार, चलाख आणि महत्त्वाचे म्हणजे फास्ट आहे."

गावडे वेड्यासारखे त्यांच्याकडे बघत त्यांचे बोलणे ऐकत होते.

"आपल्याला कसला विचारही करण्याची संधी न देता तो एका मागुन एक हालचाली करतोय आणि तेही आपल्याला पत्ताही न लागता. हा एकच माणुस आहे गावडे आणि आपल्याला भारी पडतोय. तुम्ही त्या अवधूतवर कडक नजर ठेवा. तिथूनच लागला तर काही सुगावा लागू शकेल. मला का कुणास ठाऊक पण पक्की खात्री होत चाललीय की हा जो कोणी बिलंदर सदगृहस्थ आहे त्याचा सतीषशी किंवा अवधूतशी काहीतरी संबंध नक्कीच आहे. त्या अवधुतवर पक्की पाळत ठेवा. काहीतरी माहिती नक्की मिळेल. मला खात्री आहे की कामिनीदेखील त्याच्याच ताब्यात आहे. खरेतर ती जिवंत असण्याची शक्यता फारच कमी आहे, तुम्ही तपास चालू ठेवा आणि हो, कामिनीबद्दल अजुन आपल्याकडे तक्रार आलेली नाहीये तेव्हा त्यावर तितकेसे लक्ष देण्याची गरज नाही. ती जिवंत नसेलच तर तसाही आपल्याला तिचा काय उपयोग नाहीये. सद्ध्या महत्त्वाचे आहे ते तो अनामिक सापडणे, तेव्हा आपल्या तपासाचे केंद्र त्यावर टार्गेटेड असु द्या. रोहीतवर देखील जास्त माणसे सोडा. मला वाटते आपण हळु हळु योग्य मार्गावर येतोय."

गावडे भंजाळून गेले होते. रावराणेसाहेब आपल्या खुर्चीतून उठले, त्यांनी हलकेच गावडेच्या खांद्यावर थोपटले आणि शिळ वाजवीत केबीनच्या बाहेर पडले.

तसे गावडे चमकले. त्यांचा साहेब केस सॉल्व्ह करण्याच्या जवळपास आला की त्यांच्या तोंडी अशी शिळ येते हे त्यांना पक्के माहीत होते.

***********************************************************************************************************

त्याने अलगद डोळे उघडले. डोके भयंकर ठणकत होते. प्रचंद गरगरल्यासारखे होत होते. डोक्याच्या मागच्या बाजुला भयंकर वेदना होत होत्या. त्याने हात हलवण्याचा प्रयत्न केला ...

आणि त्याच्या लक्षात आले की आपले हात मागे बांधण्यात आले आहेत. कसेबसे त्याने डोळे उघडले आणि ...

"अरे साला ये जमीन उपर क्युं नजर आ रही है, ऐसा लग रहा है जैसे के मै सर के बल खडा हूं!"

"खडा नही, लटकाया है तेरे को!"

अंधारातून आवाज आला आणि त्याने चमकुन आवाजाच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न केला.

"कौन है?"

"तेरा कोइ मददगार तो हो नही सकता! क्युंकी ये जगहा सिर्फ दोही लोगोंको मालुम थी! एक तू, दुसरी कामिनी सॉरी काम्या आणि आता मलाही माहीत झालीय. कशी?

"ऑफ कोर्स माय डिअर, मला कामिनी आणि काम्यामधला संबंध माहीत आहे म्हणजे हे देखील माहीत होणारच. बाय द वे काम्या कुठे आहे हे मात्र विचारू नकोस. मला माहीती आहे, पण सांगताना वाईट वाटेल खुप तुला. जावुदे...चल सांगुनच टाकतो एकदाचा......

"कोण आहेस तू? समोर का येत नाहीयेस्..आणि ही जागा कुठली आहे? मला असे उलटे का लटकवून ठेवले आहेस्?......ए...ए....एक मिनीट ये जगा कही मेरा बेसमेंट तो नही? या अल्ला....., तुने काम्या के साथ क्या किया? उसे टच भी मत करना.. साले चिर डालूंगा उपरसे नीचे तक!"

त्या तशा अवस्थेतही तो प्रचंड भडकला.

"हे डिअर, काल्म डाऊन."

अंधारातून पुन्हा तोच मिस्कील आवाज आणि त्यापाठोपाठ खळखळुन हसण्याचा आवाज. दुसर्‍याच क्षणी लाईट्स ऑन झाल्या. स्वीच बोर्डपाशी भिंतीला टेकून तोच पोरगा उभा होता, त्याचे डोके फोडून डायरी घेवून गेलेला.

"तूम?.....फीरसे? काम्या किधर है?"

तसा शिर्‍या खदखदून हसला.

"च्या मारी, स्वतः उलटा लटकतोय, पण काळजी बहिणीची करतोय. मला अगदी गहिवरून आलं रे. बट आय एम सॉरी... तुझी बहीण गेली.. अल्लाला भेटायला. पण तिला मी नाही मारलं. खरेतर ती अगदी एकटीच होती, एका एकाकी कंटेनरमध्ये. खुप रडत होती. मला एकटीला सोडून जावू नकोस रे म्हणून. मग मला तिची दया आली आणि मी माझे काही मित्र तिच्या सोबतीला त्या कंटेनरमध्ये सोडून दिले. थोडे थोडके नाही तर शेकड्यांनी.....

पाच सहा दिवसात काहीही खायला न मिळालेले, भुकेने पिसाळलेले उंदीर! त्यांनी आतापर्यंत कुरतडून खाल्ली असेल रे तिला. ती केवढी किंचाळली असेल, ओरडली असेल. सुटकेसाठी धडपडली असेल... जसा माझा सत्या रडला असेल, सुटकेसाठी धडपडला असेल... अगदी तशी!"

शिर्‍याच्या आवाजात एक विलक्षण खुनशीपणा आला होता.

ते ऐकले आणि मोमीन रडायलाच लागला.

"तो मुझे क्युं जिंदा रखा है, अबतक मुझे भी मार डाल साले!"

"मारुंगा...तुझे भी मारुंगा.. ऐसी भी क्या जल्दी है मेरे दोस्त! माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे. तुझ्या कुठल्याच माणसाला ही जागा माहीत नाही. तुझा अतिसावधपणाच नडलाय तुला मोमीन. तुझी माणसं तुला सगळ्या मुंबईत शोधताहेत. त्यांना काय माहीत? धारावीतल्या त्यांच्या अड्याखालीच मोमीनचे एक गुप्त बेसमेंट आहे, साउंडप्रुफ, अभेद्य आणि तिथेच सद्ध्या मोमीन बंद आहे.

इमर्जन्सीमध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी तू बांधून घेतलेल्या या गुप्त बेसमेंटचा कुणी तुला मारण्यासाठी वापर करेल असा विचार तुझ्या स्वप्नात देखील आला होता का बे?

तू मरेगा मोमीन, जरुर मरेगा. लेकीन इतनी जल्दी नही. अभी तो तूझे बहुत कुछ बोलना है! तुम लोगोंका ये धंदा, रोहीत भारद्वाज का इस धंदेमे क्या रुतबा है! असा बघू नकोस माझ्याकडे मला माहीत आहे सारं....

"रोहीत हे केवळ एक खेळणं आहे, कठपुतळीसारखं. जगाला दाखवण्यासाठी नामधारी राजाच जणू. खरा धंदा चालवता ते तू आणि तुमचा तो तिसरा पार्टनर. आधी मी ठरवले होते की तुम्हा सगळ्यांना संपवायचं, पण रोहीत लिंबुटिंबू असल्याने आपोआपच माझ्या लिस्टमधून बाद झालाय. अर्थात त्याला पण मी मारेनच पण त्याच्यासाठी इतकी मेहनत घ्यायची गरज नाहीये. तो पण इतर कुणाही इतकाच अंधारात आहे. मला माहिती हवीय ती तुझ्या तिसर्‍या आणि खर्‍या पार्टनरची. आता तू ठरव तूला काय हवय मरण की सुखाने मरण?"

शिर्‍या बोलायचा थांबला.

"मतलब मै समझा नही?" मोमीन साशंक स्वरात उदगारला.

"हे बघ मोमीन, मरना तो तेरेको है ही. लेकीन किसीको मौत देनेके कई तरिके होते है! तु ज्याप्रमाणे माणसे संपवतोस त्याप्रमाणे एक गोळी घालून किंवा चाकू खुपसुन एखाद्याला मारणे हा फार सोपा उपाय झाला. ज्याला मी सुखाचे मरण म्हणतो. तुझी बहीण तयार नाही झाली, तडफडून मेली बिचारी. उंदरांनी कुरतडून कुरतडून जीव घेतला तिचा. तुला काय हवेय... एका क्षणात येणारे सुखाचे मरण की मरणाची वाट बघत एक एक क्षण, अंत बघणारं वेदनामय जीवन. म्हणजे बघ तुला एक उदाहरण देतो.....

परवा दिवशी संध्याकाळी मी तुला उचलला त्यानंतर तू सलग ४८ तासापेक्षाही जास्त वेळ इथे असाच उलटा लटकतो आहेस. सगळं रक्त डोक्यात जमा झालं असेल. आता समज मी तुझ्या डोळ्यापाशी एक बारीकसा, अगदी छोटासा कट दिला ब्लेडने तर....

कसे होइल बघ..., सुरूवातीला रक्त अतिशय वेगाने उसळी मारून बाहेर पडेल. मग हळु हळू त्याचा वेग मंदावत जाईल. मुळात जखम अगदीच बारीक असल्याने तो हळु हळु थेंब थेंब करत रक्त बाहेर टपकायला लागेल. डोंट वरी... ती जखम कायम वाहती राहील याची काळजी मी घेइनच. माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे."

एखाद्या खाद्यपदार्थाची रेसीपी सांगावी तसा शिर्‍या वर्णन करत होता. ते ऐकताना हळू हळू मोमीनचा धीर सुटत चालला होता. त्याच्या चेहर्‍यात घडणारे बदल त्याच्या बदलत्या मनस्थितीबद्दल स्पष्ट बोलत होते. अतिशय थंड डोक्याच्या मारेकर्‍यासारखा शिर्‍या शांतपणे मोमीनला त्याच्या संभाव्य मृत्युचे दर्शन घडवीत होता.

"तू बेहद खतरनाक आदमी है! लेकीन पुलीसवाले तेरको भी नही छोडेंगे! और ये सब तू क्यों कर रहा है? उस लौंडेके साथ तेरा क्या रिश्ता था जो उसके लिये तू हम सबके पिछे हात धोके पडा है?"

"वो सबकुछ था मेरा, मेरा दोस्त, भाई .... सबकुछ ! तुम्ही लोकांनी मारला त्याला. त्यामुळे तुमचे मरण हे निश्चितच आहे, पण ज्या कामासाठी त्याने आपले प्राण गमावले ते कार्य पुर्ण करणे, तुमचा हा घाणेरडा धंदा नेस्तनाबूत करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. पुलीसका क्या करना है, मै सोच लुंगा. तू तुझं ठरव! तुला कसले मरण हवे ते. मला हवी असलेली माहिती दिलीस तर एका गोळीत तुझी सुटका करेन, अर्थात तुझ्याच रिवॉल्व्हरने. नाहीतर आहेच मग थेंब थेंब मृत्यू ! डिसाईड युवरसेल्फ, माय डिअर्....डिसाईड! "

"देख बे, पैली बात तो ये है कें वो तिसरा बंदा कौन है ये मुझे नही पता, मेरे लिये भी वो एक राज ही है! पिछले तीन सालोंसे उस बंदेको बाहर लानेकी कोशीश कर रहा हूं मै! अब वैसे भी मरना ही है, तो तुझे बतानेमें कुछ हर्ज नही, लेकीन आज की तारिखमें इस कंपनी का १००% फायदा अपनी जेबमें जाता है! रोहीत तो साला पगारी आदमी है! उस तिसरे आदमी का नाम पता तू मेरेको दे दे...और मेरी जिंदगी भी.... तुझे मालामाल कर दुंगा! करोडो में खेलेगा बच्चे तू! ये बदला बिदला एक हद तक ठिक है, थोडा प्रॅक्टिकल सोच! अपनी आनेवाली जिंदगीके बारेंमे सोच! मेरे साथ रहेगा तो बहोत पैसा कमायेगा, सोच ले! वैसे चाहे तू ऐसे मारे या वैसे मै तेरे को इससे जादा कुछ भी नही बता सकता! इअसलिये बोलता हूं...भुल जा बदला-बिदला और आगे की सोच!"

मोमीनचे डोके आता हळु हळु ताळ्यावर यायला लागले होते. त्याने शिर्‍यालाच घोळात घेण्याचा प्रयत्न केला. पण शिर्‍या ही काय चीज आहे हेच त्याला माहीत नव्हते. शिर्‍या नुसताच हसला.

"मै अब जा रहा हूं, तेरे पास आज रात तक का वक्त है.... सोच के बताना! असो, जाता जाता तुला आणखी एक बातमी देतो. तुझा रोहीत आत्तापर्यंत हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाला असेल. फुड पॉयझनिंगमुळे. तासा दोन तासात जाईल वर्...तुझ्या काम्याला आणि त्याच्या कामिनीला भेटायला. तू ठरव आणि रात्री सांग मला........."

शिर्‍या मोमीनला तसाच लटकत्या अवस्थेत सोडून त्या जागेच्या बाहेर पडला.

************************************************************************************************************

"ट्रिंग ट्रिंग...ट्रिंग ट्रिंग....ट्रिंग ट्रिंग....ट्रिंग.... ट्रिंग

रावराणे साहेबांनी फोन उचलला...

"हॅलो, इन्स्पे. रावराणे बोलतोय....."

"....................................."

"ओह, मी तुमच्याच फोनची वाट पाहात होतो. व्हॉट्स द न्युज? काही नवीन?"

".............................................."

"ग्रेट, आता मजा येइल. त्या भ....ला आत घेवून ठोकायला जाम आवडेल मला. खुप परेशान केलय त्याने आम्हाला गेल्या कित्येक दिवसात."

"................................................................."

"ओहो... प्लान चेंज? ठिक आहे. तूम्ही म्हणता तसे होइल. पण हे किती दिवस लपवता येइल आपल्याला. उद्या कुणी क्लेम करायला आलं तर जास्त काळ त्याला तंगवता नाही येणार आपल्याला."

"............................................................"

"असं म्हणता? ठिक आहे. ते माझ्याकडे लागलं. पण तुम्हाला खरेच वाटतं, तो अशाने बाहेर येइल म्हणून.

"............................................................."

"डन......!"

इन्स्पे. रावराणेंनी गावडेला बोलावून घेतले. त्यांना काही सुचना दिल्या आणि शिळ वाजवीत बाहेर पडले.

******************************************************************************************************************

तीन दिवसांनंतर देशातील सर्व मुख्य वर्तमानपत्रात एक बातमी झळकली.

"मुंबई पोलीसांचा आणखी एक यशस्वी कारनामा! गेली ४-५ वर्षे टॅलेंट हंटच्या नावाखाली मानवी शरीरे, तसेच लहान मुले, स्त्रीया यांचा परदेशात नेवून विकण्याचा बेकायदेशीर घृणीत व्यवसाय करणार्‍या सोनेरी टोळीचा पर्दाफाश. इन्स्पे. रावराणेंनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलेल्या माहितीनुसार ते खुप दिवसांपासून या टोळीच्या मागावर होते. त्यासाठी त्यांनी त्या कंपनीतच काम करणारे श्री. सतीश देशमुख यांची मदत घेतली होती. गेल्या काही दिवसांपुर्वी लंडनला टॅलेंट हंट च्या शोसाठी म्हणुन गेलेले सतीश देशमुख यांचा प्रत्यक्षात खुन झाला असल्याचे पोलीसांच्या माहितीस आले आणि पोलीसांनी आपला तपासाचा वेग वाढवला. त्यांच्या हातात काही नावे आणि माहिती देखील पडली होती. पण रावराणे त्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याआधीच एका अनामिक व्यक्तीने त्या टोळीच्या चार मुख्य व्यक्ती रोहीत भारद्वाज, मोमीन पठाण, कामिनी उर्फ काम्या पठाण आणि इरफान अशा चौघांची अतिशय निर्घुणपणे हत्या केली आहे. मिस कामिनी यांचे प्रेत तर अतिशय वाईट अवस्थेत सापडले आहे. इन्स्पे. रावराणेंची पक्की खात्री आहे की या सर्व हत्या शिरीष भोसले नामक एका माथेफिरू तरुणाने केल्या असुन तो सद्ध्या फरार आहे.

इन्स्पे. रावराणे यांनी आमच्या प्रतिनिधीला पुढे असेही सांगितले की या माथेफिरु खुन्याने, शिरीषने त्यांनाही फोन करून केस पासुन दुर राहण्याची अन्यथा जिवे मारण्याची धमकी दिली होती. पण रावराणेसाहेब आपल्या जिवाची काळजी न करता प्रकरणाचा तपास करत राहीले आणि आता जे सत्य समोर आले आहे ते भयंकरच आहे. यातील मोमीन पठाण यांच्या धारावीतील अड्ड्याखाली असलेल्या अद्ययावत बेसमेंटमधून या सर्व काळ्या धंद्यांची सुत्रे हलवली जात होती. रोहीत भारद्वाज हा जरी कंपनीचा मालक असला तरीही खरा कर्ता धर्ता मोमीन पठाणच होता असे पोलीसांचे म्हणणे आहे. पण मोमीनचे प्रेतही अतिशय वाईट अवस्थेत सापडले आहे. तरीही शिरीषने हे चार खुन का केले असावेत? त्याचा सतीश देशमुखशी काही संबंध आहे का? याचा काहीही शोध लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस कसुन तपास करत आहेत."

शिर्‍याने वर्तमानपत्र वाचून खाली ठेवले. त्याच्या चेहर्‍यावर कर्तव्यपुर्तीचे समाधान होते. आता काय व्हायचे ते होवू दे... मी नाय घाबरत अशी भावना मनात होती. त्याने अवधूतला फोन लावला आणि त्याला काही सुचना देवुन फोन खाली ठेवला.

तेवढ्यात पुन्हा त्याचा फोन वाजला.

"तुला तो तिसरा आणि मुख्य पार्टनर हवा होता ना. मग आज संध्याकाळी ओबेरॉय पॅलेसच्या लॉबीत वाट बघत बस. बरोब्बर साडे आठ वाजता आठव्या मजल्यावर जा. रुम नं. ८०३ मध्ये तो तूला सापडेल."

"पण तुम्ही कोण बोलता......................!"

पलिकडून फोन कट झाला होता.

***********************************************************************************************************

"ट्रिंग ट्रिंग...ट्रिंग ट्रिंग....ट्रिंग ट्रिंग....ट्रिंग.... ट्रिंग

रावराणे साहेबांनी फोन उचलला...

"हॅलो, इन्स्पे. रावराणे बोलतोय....."

"नमस्कार रावराणे साहेब, मी बोलतोय. तुम्हाला तुमचा गुन्हेगार हवाय ना, मग आज संध्याकाळी हॉटेल ओबेरॉय पॅलेसला या. रुम नं. ८०३ मध्ये तुम्हाला तुमचा गुन्हेगार मिळेल."

"धन्यवाद! तुम्ही मला कुठे भेटाल?"

"मी ही तिथेच जवळपास असेन. जर योग्य वाटले तर भेटेनही तुम्हाला. जरी नाही भेटलो तरी काय फरक पडतो. तुम्हाला तुमचा खुनी गुन्हेगार मिळाला म्हणजे झाले. काय? चला मी फोन ठेवतो."

"पण मी त्याला कसे ओळखेन? कारण त्याच्याबरोबर जर दुसरे कोणी असेल तर गोंधळ व्हायला नको. ओबेरॉय तसे मोठ्या माणसांचे एकत्र येण्याचे ठिकाण आहे. उगाच कुणी निरपराध माणसाला त्रास व्हायला नको."

"......................................................................................!"

"काय बोलताय तुम्ही? आर यु शुअर?"

"....................................................................................!"

***********************************************************************************************************

संध्याकाळचे सव्वा आठ झालेले. शिर्‍या ओबेरॉय पॅलेसच्या लॉबीत हातात वर्तमानपत्र घेवून वाचण्याचा बहाणा करत बसला होता. लक्ष वारंवार हातातील घड्याळाकडे जात होते. डोळे हॉटेलच्या दरवाजाकडे लागलेले. तेवढ्यात्र दरवाज्यातून रावराणेसाहेब आत शिरले. शिर्‍याने वर्तमानपत्र चेहर्‍यासमोर धरले. रावराणेसाहेबांना लॉबीत काहीतरी संशयास्पद जाणवले पण सद्ध्यातरी त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले. ते रिसेप्शन काऊंटरपाशी एका कोपर्‍याला गपचुप कोणाच्याही नजरेत येणार नाही असे उभे राहीले.

साधारण ८.२५ च्या दरम्यान एक सुटा बुटातली व्यक्ती हॉटेलमध्ये शिरली. चेहर्‍यावर छान कोरलेली दाढी, डोळ्यांवर गॉगल आणि डोक्यावर एक मोठी फेल्ट हॅट, तो आपला चेहरा लपवण्यात बर्‍यापैकी यशस्वी झाला होता. त्या व्यक्तीने हळुच लॉबीत बसलेल्या शिर्‍याकडे नजर टाकली आणि इकडे तिकडे बघत ती व्यक्ती लिफ्टकडे जायला निघाली.

तेवढ्यात रावराणे साहेब भराभर चालत पुढे आले आणि त्या व्यक्तीच्या पाठोपाठ लिफ्टमध्ये शिरले. लिफ्ट हलली की लगेच शिर्‍या पटदिशी उठला आणि शेजारची दुसरी लिफ्ट पकडून आठव्या मजल्यावर निघाला. रावराणे साहेबांना बघून ती व्यक्ती थोडी चपापली खरी, पण लगेचच जणु काही झालेच नाही असा चेहरा करुन शांतपणे उभी राहीली.

लिफ्ट आठव्या मजल्यावर थांबली. दोघेही बाहेर पडले. त्या व्यक्तीने पुढे होवून रुम नं. ८०१ चा दरवाजा उघडला आणि ती ती व्यक्ती ८०१ मध्ये शिरली, तसे रावराणे गोंधळले. काहीतरी चुक झाली होती. चुकून दुसर्‍याच तरुणाच्या पाठीमागे आले होते ते. पण या तरुणाला नक्की कुठेतरी पाहीलय आपण, पण कुठे? जावु दे नंतर शोधू ते, असे म्हणत रावराणेंनी रुम नं. ८०३ कडे मोर्चा वळवला.....

ते ८०३ मध्ये शिरले आणि त्यांचा मोबाईल वाजला.

"साहेब तो आत्ताच ८०१ मध्ये शिरलाय. त्याने आपल्याला मुर्खात काढले बहुदा."

रावराणे साहेब तसेच बाहेर पडून ८०१ कडे पळाले. दार जोरात ढकलून त्यांनी आत प्रवेश केला. समोर दोन तरुण उभे होते. त्यातल्या एकाकडे बघून त्यांना शॉकच बसला........

"तू.......? हे सारं तू केलंस? मला विश्वास बसत नव्हता. याने जर सारे पुरावे दिले नसते तर मी विश्वास ठेवुच शकलो नसतो."

बोलता बोलता त्यांनी दुसर्‍या तरुणाकडे हात केला. तो शांतपणे त्या दोघांकडे पाहात होता. त्याच्या डोळ्यात मात्र काही वेगळेच भाव होते. क्षणभर रावराणेंना त्याच्या डोळ्यात अश्रु तरळल्याचा भास झाला.

क्रमशः

***********************************************************************************************************

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

विशाल भौ एकदम सही ... खूप बर वाटल पुढचा भाग वाचून. खूप दिवस झाले होते दोन भागांमधे ... या पेक्षा बर वाटला की घरातला कार्य एकदम सुरळीत पार पडल. तुम्हाला हॅट्स ऑफ की इतका सगळा करून पण एवढा मस्त भाग लिहिला ... आता पुढचा भाग लवकर येऊ द्या ... नाहीतर निलुभौ बरोबर मी पण तलवार घेऊन येतो ... Happy Wink

जो कोणी असेल त्याला हे माहीत असणार की सत्यावर अन्याय झालाय हे कळल्यावर शिर्‍या पेटून उठणार आणि त्याला हवे ते लोक मारले जाणार

बरोबर ??????

(१) जो कोणी असेल त्याला हे माहीत असणार की सत्यावर अन्याय झालाय हे कळल्यावर शिर्‍या पेटून उठणार आणि त्याला हवे ते लोक मारले जाणार >>>>>>>>>>>>> असं असलं तर तो सतीशच. कारण मोमिन म्हणतो 'मीच १००% कमाई करतो'. पुन्हा नुसतं शिर्‍याला सांगुन उपयोग नव्हता कारण सत्यानच दिलेली शपथ शिर्‍यानी तोडावी यासाठी तसंच स्ट्राँग कारण हवं. सत्याच्या मृत्युशिवाय असं आणखी काय कारण असणार? औध्या दुसरा तरूण असावा.

(२) सत्याचा खरचं बळी गेला असला तर औध्या आणि गावडे. एकतर सत्याचा बदला घेण्यासाठी किंवा औध्याच तिसरा पार्टनर असावा. गावडेला त्यानी सामिल करून घेतले असावे, पैसे किंवा इतर काही मिषानी.

(३) तो वाळुंजकर पण शेडी वाट्टोय. औध्याकडे आधीपण नोकरीसाठी आला होताच. तेव्हाही माहिती घ्यायलाच आला होता की काय?

आता तू पुढचा भाग लवकर नाही टाकलास तर मला शिर्‍यानं मुंबईत आल्या आल्या ज्या गुरूजींना गंडवलं तेपण संशयित वाटायला लागतील. Proud

सत्या असण्याच माझी कारणं ही की,
१) शिर्‍या जरी चालू असला तरी हळवा आहे. कुणाशीही लबाडी करताना तो त्याचे नुकसान करत नाही. त्यामूळे तो बिलंदर असूच शकत नाही. पण असा माणूस आपल्यासाठी काहीही करु शकतो हे जाणून त्याचा उपयोग स्वतःसाठी करणारा 'बिलंदर'..तो सत्या..

२) रावराणेंना शेवटी आलेल्या टोपीवाल्याचा चेहरा ओळखीचा वाटला...ते अवधूतला भेटले नसतात( तसा कथेत उल्लेख नाही ), पण सत्याला भेटलेले असतात, तेव्हा....

३) मोमीन हा सत्याला जड जात असावा व त्याला डावलून स्वतः सुत्रधार बनण्यासाठी त्याने हे सर्व केले. तसेच या प्रकरणात मोमीनच्या डायरीचा उल्लेख नाही. ती स्वतःकडे बाळगणारा 'बिलंदर'...

४) जर सत्याला खरेच प्रामाणिकपणे हे सगळे प्रकरण बाहेर काढायचे असते तर त्याने ते कुरीयर शिर्‍याला नाही, रावराणेंना पाठवले असते.

जर सत्याला खरेच प्रामाणिकपणे हे सगळे प्रकरण बाहेर काढायचे असते तर त्याने ते कुरीयर शिर्‍याला नाही, रावराणेंना पाठवले असते.>>ह्याच कारणासाठी मी सतिश देशमुख म्हटले होते. Happy

शिर्‍या जरी चालू असला तरी हळवा आहे. कुणाशीही लबाडी करताना तो त्याचे नुकसान करत नाही. त्यामूळे तो बिलंदर असूच शकत नाही.>>>>
बिलंदर या शब्दाचा अर्थ तुम्ही फक्त लबाड, मतलबी असा का घेताय. बिलंदर कुणीही असु शकतो, एखादा बॉलर जेव्हा ऑफला बॉल टाकतोय असे भासवून बॉल स्विंग करतो तेव्हा तो बिलंदर असतो पण त्यामुळे तो खलनायक ठरत नाही. Wink

<<जर सत्याला खरेच प्रामाणिकपणे हे सगळे प्रकरण बाहेर काढायचे असते तर त्याने ते कुरीयर शिर्‍याला नाही, रावराणेंना पाठवले असते.>>

इथे सत्या आणि शिर्‍या हे जिवलग मित्र आहेत, इतर कुणापेक्षाही सत्याला शिर्‍यावर जास्त विश्वास आहे. आपल्या आयुष्याला पणाला लावून मिळालेली माहिती जर कुणाच्या स्वाधीन करायची असेल तर तो साहजिकच आपल्या जिवलग मित्राचीच निवड करणार. Proud

राहता राहीला मोमीनच्या डायरीचा प्रश्न तर ती ऑलरेडी शिर्‍याने हस्तगत केलेली आहे आणि त्याच्याजवळच आहे.

बिलंदर या शब्दाचा अर्थ तुम्ही फक्त लबाड, मतलबी असा का घेताय. बिलंदर कुणीही असु शकतो, एखादा बॉलर जेव्हा ऑफला बॉल टाकतोय असे भासवून बॉल स्विंग करतो तेव्हा तो बिलंदर असतो पण त्यामुळे तो खलनायक ठरत नाही. >>>ईथे आमचा 'अ'बिलंदरपणा (असा शब्द असल्यास) नडला ना भौ! माफी असावी..

इथे सत्या आणि शिर्‍या हे जिवलग मित्र आहेत, इतर कुणापेक्षाही सत्याला शिर्‍यावर जास्त विश्वास आहे. आपल्या आयुष्याला पणाला लावून मिळालेली माहिती जर कुणाच्या स्वाधीन करायची असेल तर तो साहजिकच आपल्या जिवलग मित्राचीच निवड करणार. >>>
अहो पण या प्रकरणात रावराणे आधी पासून त्याच्या बरोबर होते की...आणि खरा मित्र आपल्या मित्राचा जीव असा धोक्यात घालेल का? निदान सगळी माहीती देताना, रावराणेंबद्दलही सांगेल ना!!

इथे सत्या आणि शिर्‍या हे जिवलग मित्र आहेत, इतर कुणापेक्षाही सत्याला शिर्‍यावर जास्त विश्वास आहे. आपल्या आयुष्याला पणाला लावून मिळालेली माहिती जर कुणाच्या स्वाधीन करायची असेल तर तो साहजिकच आपल्या जिवलग मित्राचीच निवड करणार>> precisely ह्याच मुद्द्यामुळे त्याच्यावर संशय अधिक नाही का Happy

मंडळी, थोडा गोंधळ निर्माण करण्यासाठी म्हणून काही उलट सुलट विधाने केली एवढेच.

<<अहो पण या प्रकरणात रावराणे आधी पासून त्याच्या बरोबर होते की...आणि खरा मित्र आपल्या मित्राचा जीव असा धोक्यात घालेल का? निदान सगळी माहीती देताना, रावराणेंबद्दलही सांगेल ना!!>>>

तिथेच तर खरी गोम आहे ना Wink

आत्ता तरी सत्या शीवाय कोणी दुसरा असेल असे वाटत नाहीये. नवीन पात्र किंवा घटनेची भर पडणार नसेल तर नक्की सत्याच तो.

अरे प्रसन्न भौ, शेवटचा भाग आधी इथेच टाकलाय, जरा यादीत खाली बघ तरी. माझी कुठलीही पोस्ट आधी माबोवर असते, मग इतरत्र. मावश्या कितीही लाडक्या असल्या तरी आई आधी. Happy

विशाल भौ... तब्बल एक महिना वाट पाहुन आता शेवटची संधी देतोय...आता पुढचा भाग टाकताय की.......................................

अमोलभाई...
बिलंदरचा अंतीम भाग कधीच टाकलाय http://www.maayboli.com/node/16863

त्यानंतर दुसरी कथाही सुरू झालीय, तिचेही दोन भाग आलेत.. http://www.maayboli.com/node/17213

तिसरा आणि शेवटचा भाग १-२ दिवसात टाकतोय.

भुषणजी आभार..., आपण एकदा बोलूया, तुमच्या विपुत नंबर दिलाय मी. Happy

नविन वर्श चालु झाले आनि ७ महिन्यात एकहि भाग नाहि.
उत्सुकता तानलि गेलि आहे.
प्लिज पुधिल भाग पोस्त करा.

राव छान कथा आहे ...........
आता जास्त प्रतीक्षा करवत नाही...
प्लीईईईईईईईईज्ज्ज्ज्ज्ज .....लवकर टाका पुढचा भाग .....

बापरे मी वाचलेच नव्हते. ह्या निमित्ताने वाचायला मिळाले. पण सगळे भाग वाचायला थोडा वेळ द्या. कथा आवडत आहे.

सगळे भाग सहाच्या सहाही एका दमात, कादंबरी वाचतो तसे वाचले. खुप प्रवाही, उत्कंठा वाढवणारे, खिळवून ठेवणारे असे लिखाण!!! पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!!

good Story. jast lambvu naka. interest kami hoel. Good luck for the Next!!!

Pages