सोबत

Submitted by रुपाली अलबुर on 26 May, 2010 - 11:54

भाजी वाल्याशी हुज्जत घालणाऱ्या देशपांडे काकूला पहिले आणि काकांची आठवण झाली.

देशपांडे काका .... बोलता बोलता कविता करायचे. कारकुनी नोकरी असली तरी फक्त हिशोबाची वही नाही तर बरेच काही लिहिणारे देशपांडे काका .... बोलता बोलता कविता करणारे देशपांडे काका...... " सोनू ..... एक दिवस माझे पण नाव येईल हे कोण कवी लोक आहेत त्यांच्या सोबत "... असे म्हणणारे देशपांडे काका.... आणि आमच्या फुटकळ दाद देण्यावर सुद्धा मनापासून खुश होणारे वल्ली ... देशपांडे काका !!

५०००० रु साठले कि माझे पुस्तक छापेन असे कायम स्वप्न पाहत जगणारे देशपांडे काका....

काका आणि काकू असे हे सरळ रेषेसारखे सरळ आयुष्य जगणाऱ्या दोघांचे कुटुंब. काका आणि काकुनी माझ्यासारखी खूप मुले आणि कबिलाच म्हणूया असा गोतावळा लावून घेतला होता. आणि खरच काकुच्या हातच्या पदार्थांना चवच न्यारी !! आणि ते चाखणारे आम्ही आणखीन न्यारे !! काकांचे खूळ एकच त्यांना आपले पुस्तक प्रकाशित करायचे होते.

कुठून तरी पिवळ्या पडलेल्या वह्या काढून आवर्जून कविता वाचून दाखवणे आणि मगच "अहो आता चहा आणा आमच्या रसिकांसाठी " अशी काकुकडे फ़र्माईश करणे हा काकांचा आवडता नाद होता . आणि त्या चहा साठी त्यांच्या कविता ऐकण्याचा नाद आम्हाला पण जडला होता. मनापासून सांगायचे तर ते खरच खूप सुंदर लिहायचे.

" एक होती परी .. सुंदर गोरी गोरी .. देवाचं घर स्वच्छ ठेवी भारी " हि कविता त्यांनी मला स्पर्धेसाठी खास लिहून दिली होती आणि हो त्याला चक्क शांता शेळकेंची दाद मिळाली होती. " छान आहे अशीच लिहितरहा " हा त्यांचा ठेवा अजूनही माझ्या वहीत आहे. पण ती दाद पाहून काकांनी " अहो पाहिलंत का ? सोनुला शांता बाई म्हणाल्यात ? अशीच लिहित रहा .. म्हणजे मलाच हा संदेश नाही का ? " .. " हो त्यांना काय जातंय दाद द्यायला ?? लहान पोरींनी लिहिले आहे वाटून दाद दिली आहे त्यांनी . तुम्ही वही नेली असती न तर थेट भिरकावून म्हणाल्या असत्या अहो हे काय लहान मुलासारखे लिहले आहे ? " इति काकू . " हो पण अहो त्यांना ती लहान मुलीने लिहिले आहे असे वाटणे हि पण दादच नाही का ? " काका

हे संवाद नवीन नव्हते . चहा हातावर टेकवताना " तिकीट लावा हे सगळे येतात का पाहू. काय ग सोने येशील का ? चहा देणार नाही मी... फक्त कविता ऐकायच्या " असे काकू म्हणाली नाही तर आज काहीतरी चुकलं असे वाटायचे. पण तीच काकू काकांची समीक्षक होती. संध्याकाळी घराच्यापायऱ्यांवर बसून काकांनी काकूला ताजे ताजे ऐकवायचे आणि हातात वाती धरून काकू ने ते ऐकत हे असे का नाही लिहित म्हणायचे हे दृश्य आता सगळ्यांच्या सवयीचे झाले होते. त्यांना तसे पाहताना लग्न ठरले तेव्हा मी नवऱ्याला म्हणाले होते " आपण पण असे म्हातारपण जगायचे" " तू नाहीस ना कविता वाचणार ? " असे म्हणून त्याने माझी टर उडवली होती.

काकांचे पैसे साठवणे नेमाचे होते आणि काकू पण पदरमोड करून पैसे साठवत होत्या. महिन्याला ५०- १०० कसे जमेल तसे आणि तेवढे काकू " कविता संग्रहासाठी फंड " असे लिहिलेल्या पेटीत पैसे टाकत रहायची. आणि आम्ही पण चार आठ आणे टाकायचो. खाऊ ला शाळेत मिळायचे ते. मी दुसरी तिसरीत होते तेव्हापासून हे स्वप्न त्यांच्या इतकेच मी पण पहिले होते. पहिला पगार आला तेव्हा मी ५०० रु घेऊन गेले आणि काकांनी " सव्वा रुपया टाक सोने पुरे तेवढा !! " असे म्हणून सव्वा रुपया आपल्या फंडात टाकलेला.

मला आठवते.... पगार झाल्यावर सहाच महिन्यात काकांनी "५०००० रुपये जमले हम्म सोने " असे म्हणून मला पेढे भरवलेले . " आता प्रकाशक पाहायला हवा. " असे म्हणून प्रकाशकाकडे खेपा घालणे त्यांनी सुरु केले होते. रोज ह्या ना त्या कारणाने त्यांचे लेखन नाकारले जात होते. पण निराशा नव्हती. त्यांची हि भावना पण कवितेतून आलेली.

" बाजारात विकण्यासाठी शब्द नाही मांडले , अन बाजारासाठी त्या शब्द माझे सांडले. "

वर्षभर काका खेटे घालत होते. साठी आली असेल त्यांची . पण " अभी तो जवानी कि शुरुवात हे सोनी " असे म्हणत ते धावत राहिले. त्या फंडातून बरचशी रक्कम प्रकाशकांकडे खेटे घालताना खर्च व्हायची. पण आमच्यासाठी येताना खाऊ आणणे त्यांनी कधीच नाही सोडले . काकांचा षष्ठी होम मी आणि आमचा गोतावळा यांनी मिळून घरातच केला. आणि मग काकू पण नटून थाटून शामिल झाली. " सोने पोर नाही पोटची पण तू आहेस गं . नाहीतर यांचे असे वेड पांघरून जगणे आता सहन नाही होत. काल त्यांचे कसले पगारातून कापले जायचे कसला प्रोवी काहीतरी... फंडाचे पत्र आलंय . तू पहा बाई . ते पैसे पोस्टात टाकू. नाहीतर त्यांच्या फंडात जातील ते. " असे डोळ्यात पाणी आणून काकू म्हणाली तेव्हा पहिल्यांदाच काकांच्यावेडाचा तिला त्रास होतोय असे जाणवले. तोपर्यंत तिने कधीच तक्रार म्हणून नाही केली.

दोन खोल्यांचे घर आणि वर्षाला ३ साड्या हे आयुष्य हसत जगली. आणि फंडात पैसे टाकत राहिली . ती काकू खूप वेगळी वाटत होती. पण अगदी लक्ष्मी सारखी दिसत होती त्या दिवशी काकू. त्यात तिने डोळ्यात पाणी आणू नये असे खूप वाटले .

पण शेवटी काकांना एक प्रकाशक मिळाला. आणि पुस्तक छपाई ला प्रेस मध्ये गेले सुद्धा !!! त्या दिवशी काकूचा आनंद पाहण्याजोगा होता. " पुस्तकाच्या १० हजार प्रती सोने १० हजार. पहा आता " ... " काका मला सही करुन द्यायचे हम्म पुस्तक " असे म्हणत त्या आनंदात शामिल झालेली मी . सोन्याचाच दिवस होता तो.

पुस्तके छापून आली. आता प्रसिद्धी ?? त्याचा विचार आम्ही कोणी कधी केलाच नव्हता. बरे असाच पत्रिका छापणारा कोणीतरी होता आणि प्रकाशक म्हणून त्याने पुस्तक छापून दिले होते आणि प्रसिद्धीची जबादारी काकांनी आपल्याच खांद्यावर घेतली होती हे नव्यानेच समजले. मग मी थोडी पुस्तके फुकट ऑफिसात वाटावीत असे ठरले.

तसे मी केले सुद्धा , आणि मग कोणी ती विकत घेईना .कारण .. " कविता संग्रह खरेदी करुन कोण वाचेल सोनाली ? " ... " फारच छान आहे हो सोनाली. मग मी हे भेट म्हणून ठेवून घेऊ ना ? " " सोनाली.... मला ना हि छान आयुष्याचे स्वप्न फारच आवडली . बाकी ठीक ठाक आहेत ." या प्रतिक्रिया हे मुख्य कारण होते.

वर्षभर ती पुस्तके बाहेर अंगणात असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पडली. काकांचे पण वय वाढत होते. आणि पुस्तकाच्या छपाई ला ६० हजार रुपये लागले म्हणून काकूचे तोडे गहाण टाकले आणि १० हजार रुपये उचलले हि कबुली काकांनी दिली आणि घरातले वातावरण गढूळ झाले . काकू ची बडबड आणि वाद वाढले. ती पण थकली होती. आणि काका विश्वास गमावून बसले होते.

अशातच एक दिवस मेंदू मध्ये ताप गेला आणि काका गेले. माझा साडीचा पदर ओला होईपर्यंत काकू रडली. " सोने हा माणूस प्रसिद्ध झाल्याशिवाय मरू कसा शकतो ? " असे पुन्हा पुन्हा म्हणत राहिली. अशी हतबल आणि रडताना काकूला मी त्याच दिवशी आणि त्या नंतर प्रत्येक दिवशी पहिले.

वाती वळताना हातातला कापूस भिजून जायचा आणि काकूला भानच नसायचे. मी गेले कि म्हणायची " आता चुका काढायला कोण गं राहिले माझे ? " रोज एकदा सगळी पुस्तके काढून साफ करणे हा तिचा नित्यक्रम झाला होता. आणि तिला सफाई करताना पाहून मला सासरी फोन करुन " सोनी ये गं बाई " म्हणत आईचाओला आवाज ऐकणे हा माझा नित्य क्रम झाला होता. फोन ठेवताना " देवा काकूला सोडव " हे वाक्य नकळत निघून जायचे.

काकू मात्र नवऱ्याला प्रसिद्ध झालेले पाहिल्याशिवाय नाही जाणार असे ठाम ठरवून असल्यासारखी आपला क्रम जगत होती. आम्ही अधून मधून जाऊन भेटत होतो. एकदा गप्पा मारताना एका सेवाभावी संस्थेसाठी काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीने मला काकांच्या कवितांचा कार्यक्रम करुन बाहेर त्या पुस्तकांचा खप करायला stall लावावा असे सुचवले . आणि तिच्या कल्पनेला मूर्त रूप आले . ६० पुस्तके खपली आणि त्याचे पैसे घेऊन मी काकुकडे आले. तिने ते काकांचा फंड असलेल्या डब्यात टाकले आणि " त्यांचे आहेत बाई त्यांनाच राहू देत " असे म्हणाली.

एक दिवस आई चा फोन आला . अगं काकूने बोलावले आहे म्हणाली. काकू कडे आल्यावर तिने मला एक पत्र दाखवले. काकांचे पुस्तक वाचून कोणीतरी त्यांना पाठवलेले पत्र . " सोने हे असे पत्र आले कि त्या पत्रांचे पुस्तक छापायचं गं " असे म्हणत तिने तो कागद माझ्या हातात दिला. " आता हा दारातला पहा कसा हसतोय . म्हणाला बाकी पत्र सोनी आणि तुझा गोतावळा करेल गोळा . आणि छापेल पुस्तक . आता तुझी वेळ झाली. कविराज वाट पाहत आहेत म्हणतोय पहा कसा. ते गेले तेव्हापासून दारात उभा आहे हा असा . रोज त्याला सांगते थांब रे एक पत्र आले कि लगेच निघू. मी माझी कामे केली. कोणी खरेदी करेना म्हणून मग रद्दी वाला आलेला म्हणाला आजी चला एक रुपया जास्ती देतो किलोला , म्हणून त्याला ती पुस्तके विकली. रद्दीच्या दुकानातून पण लोक घेतात गं पुस्तके. तू आलीस आणि मघाशी सखाराम चा मुलगा आणि बाकी रसिक लोक येऊन गेले. आता तुला चहा देते थांब " असे बोलत ती हातात चहा घेऊन आली.

" सोने आता परत येऊ नकोस बाई . मला मग कवितांची आठवण येते, आता रसिक आहेत त्यांचे . पहा पत्र आले आहे. आता तुम्ही रसिक मंडळातल्या लोकांनी इथे येऊ नये हि इच्छा आहे म्हणून आज सगळ्यांना शेवटचं बोलावून चहा पाणी केले . सहज आई कडे आलीस तर ये गो बाई माझी. पण काकासाठी आणि काकुसाठी अशी नको येउस . मला त्रास होतो. "

" काकू पण ... " यापुढे काकूने मला बोलूच नाही दिले. आज किती दिवसांनी दिसतेय असे वाटले तिला बाजारात आज पाहिल्यावर. जाऊन मिठी मारावी आणि खूप रडून घ्यावे असे वाटले. पण तिची आज्ञा.... तिला शेवटचे भेटले २ महिन्यांपूर्वी आणि आज पहिले. " काकू " मी हाक मारल्यावर तीच येऊन मिठी मारून रडायला लागली " सोने येत जा गं . ते मला एकटीला कविता ऐकवतात. फार फार त्रास होतो. आणि तो दारातला मला इथून नेत नाही. वेड लागेल गं मला एकटीला ... "

" येईन गं काकू . करमत नाही मला पण " असे म्हणून मी पण पोटभर रडले. आल्या आल्या सगळ्या रसिक लोकांना फोन करुन काकुकडे जमायला सांगितले. आणि संध्याकाळी काकूला हसवण्याचा बेत केला.

"सोबती असेन मी दुरावलास तू तरी..... " अशी एकदा काकूने काकांना कवितेत सुधारणा सुचवलेली .. तेच आठवले. ती काकांच्या कवितांची खरी रसिक होती..... निस्वार्थी आणि दर्दी. कविता मनापासून जगली आणि तिनेच ती कविता काकांच्या मनात जगवली .

" पण तरीही .....आता सोबत पुरे . देवा काकूला सोडव " असे मनापासून वाटले . नेहमीप्रमाणे आणि पुन्हा एकदा !!!

गुलमोहर: 

नेहमीप्रमाणे आणि पुन्हा एकदा छान कथा .. छान लिहावं कि नाही बराच वेळ विचार केला Sad कारण नक्कीच कोणाची तरी कथा असणार..

नाही हि कल्पना आहे . म्हणजे संदर्भ असा होता कि एक पुस्तक आहे माझ्याकडे असेच कोणाचे तरी तर ते असेच पब्लिश झाले पण विकले नाही गेले आणि त्या माणसाने जीव दिला होता असे समजले. त्या पुस्तकाचे नाव आठवत नाही पण स्वातंत्र्य काळातली प्रेम कथा होती आणि खूप वेगळी आणि सुंदर होती. ते पुस्तक प्रसिद्ध नाही झाले आणि असेच एकीला फुकट मिळाले होते तिने मला दिलेले . कोणत्या तरी नदीचे पाणी असे काही... नाव होते नेमके आठवेना. तर तेव्हा पासून डोक्यात होती गोष्ट पण मला लेखकाला मरताना खुश पाहायचे होते म्हणून बदल केले.

त्यातला कवितेचा संदर्भ आहे न ती माझी कविता होती पाचवीत केलेली आणि त्याला खरच शांत शेळकेंची दाद मिळाली होती. तर ते मी वापरले आहे Happy

डोळे पाणावले..

राग, प्रेम ह्यात फरक आहे का खरंच?? आपल्याला ज्या माणसा बद्दल अतीव प्रेम असतं.. त्याचाच खूप राग येतो ना? :-|