काजलची आजी ही एक अत्यंत तापट बाई होती हे काजलला माहीत असले तरी दिपूला तिने सांगीतलेच नव्हते. 'याचा कुठे तिच्याशी फारसा संबंध येणार आहे' या विचाराने काजल त्याला घेऊन घरात शिरली. आजी पांडुरंगाचे नाव घेत डोळे ताणून दाराकडे बघत होती. तोंडाला येईल ते बोलायची. सीमाकाकूला तिने प्रचंड छळले होते. पण ऐन उमेदीच्या काळात भलीभली संकटे आलेली असताना यशवंत अन त्याच्या भावाला तिने गावापासून कसे वाचवले अन कसे मोठे केले हे आठवले की यशवंत बायकोला सबुरीचा सल्ला द्यायचा. यशवंतची परिस्थिती बरी झाल्यावर त्याला गावात सन्मान मिळू लागला. मात्र त्याच्या आईकडे, काजलच्या आजीकडे कुणी फिरकायचेही नाही. हिम्मतच नव्हती कुणाची. जोरजोरात हातवारे करत घशाच्या शिरा ताणून ओरडत बोलायची ती! म्हणजे, रेग्युलर बोलणेच तसे होते तिचे!
आजी - काय गं चिमुरडे? येश्या कुठंय?
आता ही नात आहे. तिच्याशी तिच्याच वडिलांबद्दल, म्हणजे आपल्या मुलाबद्दल बोलताना त्याचा उल्लेख 'येश्या' असा करू नये वगैरे प्रगतीशील विचार आजीपासून योजने दूर होते.
काजल - नय आये..
आजी - यकटींच भटकतीयस???
काजल - हा आलाय.. दीपक
आजी - ह्यं कोण भूत?
कोणत्याही अँगलमधून आपण भूत वाटत नाही याची दिपूला कल्पना होती. तो बावचळला.
काजल - दीपक हय ये... ढाबेपे रयता हय.. बाबाने इसको और बाळ्याको मेरेको यहां छोडनेको बोला था
आजी - तुझ्या बापाला डोकंय का? कुनी तुझा हात बित धरलान तर ह्यंच पह्यलं मुतंल...
काजलला ही कल्पना अत्यंत विनोदी वाटली. ती खळाखळा हसली. दिपूला मात्र तो अपमान वाटला. तो निरागसपणे म्हणाला:
दिपू - मी नय मुतणार!
काजल कंबरेत वाकून तोंडावर हात ठेवून हसायला लागली. दिपूला आणखीनच राग आला.
आजी - नय मुतेंगा? तो क्या करेंगा?
रस्त्यात काजलचा कुणी हात धरला तर त्याचा प्रतिकार न करता आपण घाबरून लघ्वी करणे याला दुसरा काय पर्याय असू शकतो याचा दिपू विचार करू लागला.
आजी - ती वैजयंतीमाला कुटंय?
काजल - आईबी नय आयी...
दिपूच्या माहितीत क्षणाक्षणाला भर पडत होती. सीमाकाकूला काजलची आजी वैजयंतीमाला म्हणते.
आजी - नय आयी? नय आयी म्हणजे?
काजल - तिची तब्येत बरी नय
आजी - अन मी वयात आलीय काय?
काजलही बावचळली.
आजी - ह्या उंदराचं काय करायचंय?
दिपूला उंदीर म्हंटलेले काजलला खरे तर आवडले नाही, पण तिला हसूच येत होते. ती खुसखुसत म्हणाली:
काजल - काय म्हंजे?
आजी - माझ्या डोक्यावर बसवतीयस का ह्याला? हा इथे नय रहेंगा..
काजल - वो नयच रह्यरहा.. अबी जायेंगा वो चायवाय लेके..
आजी - चाय? तुझा आजा नरकातून पैसे पाठवतोय काय हितं? चा पाजतीय निरूपा रॉय...
आजीला पिक्चरचे फार वेड होते. पण वय झाल्यावर अन आजोबा गेल्यावर पिक्चर बघणेच बंद झाले होते. मग रेडिओवर गाणी ऐकत बसायची.
काजल - आता शिरवाडसे आयी मय.. ये मेरेको इतना संभालके लाया.. इसको पानीबी नय पुछनेका क्या?
काजलचं एक होतं! ती घरातील एकच अशी व्यक्ती होती की जी आजीला सरळ रोखठोक उत्तरे द्यायची अन तिच्यावरच्या अतीव प्रेमामुळे आजी ऐकून घ्यायची अन चरफडत बसायची.
'ये मेरेको इतना संभालके लाया' या वाक्याचा कोण अभिमान वाटला दिपूला. पण अजून तो हादरून उभाच होता.
आजी - बापानं शिकवलं नय काय? मोठ्यांचे पैर छुनेको?
घाबरून काजलने आजीला वाकून नमस्कार केला. दिपूकडे तिने पाहिल्यावर त्यानेही पुढे होऊन नमस्कार केला.
आजी - कंत्या जातीतलाय?
यावर काय उत्तर द्यायचं समजेना दिपूला. काजलला कसं कुणास ठाऊक माहीत होतं.
काजल - धनगर हाय
आजी - ये टरपोकट्या.. व्हो भाईर.. हितं पाय नय ठेवायचा.. (किंचाळत बोलली)
काजल - अगं? हा व्हय? हा नय! मला वाटलं तू पाव्हण्यांच म्हणतीयस..
आजी - पावणं? ५६ च्या आतलं घर आणंल का मी हितं तुला बघायला? जीभ गिळ स्वतःची... लय चालतीय
हां! म्हणजे स्थळ ५६ कुळी होतं तर! आता दिपूची जात काय सांगायाची हे काजलच्या लक्षात आलं.
काजल - ५६? मंग हा बी त्येच हय की...
आजी - काय आडनाव?
काजल - वाठारे
आजी - अबे हाट... असलं आडनाव नसत्यंच...
काजल - ह्ये मूळचे नाशकाचे हायत.. आता हिकडं आल्यात.. तिकडं असतं आडनाव ह्यं...
नाशिक ही आजीच्या दृष्टीने विलायत होती. नाशिकचं तिला काहीही पटायचं!
आजी - ह्य मच्छर नाशकांचंय?
मच्छर! भूत, उंदीर, टरपोकट्या अन मच्छर! दिपू आपला ऐकत होता.
काजल - मंग? च्या घेणारेस काय?
आजी - आणलीयस काय भुकटी येताना?
काजल - म्हंजी?
आजी - हितं पिकत नय च्या पावडर.. दुकानात मिळतीय...
काजल - घरात च्या पावडर नय?
आजी - तुज्या बानं दुभत्या गायी अन दोन मारवाडी ठिवलेत काय?
काजल - मी घेऊन आली..
आजी - पैसं लागतात... फुकट द्यायला सुलतान नव्हता आजा तुझा...
काजल - पैसे हय मेरे पास..
आजी - उधारी फिटायचीय आधीची..
काजल - फेडती मय...
आजी - आं? फेडती? काय खजिना गावला का मढ्याखाली कन्त्या?
काजल - पैसा दियाय बाबाने! बोला सब उधारी फेडनेका और सामान भरनेका घरमे..
आजी - और मै अकेली मरेंगी इधर .. व्हय ना? मला का नय नेत ढाब्यावर?
काजल - मुर्ग्या मारते.. चलेंगा?
आजी - व्ह भाईर.. अवदसा..
काजल - हम नय खाते.. देखनेको मिलता... चार मुसलमान काम करते वहा पे...
आजी - चल फुट... जल्दी आ
काजल गेल्यावर दीपक अण्णू वाठारे हादरले. आता ही बाई आपल्याला काय करणार याची त्यांना चिंता पडली.
आजी - काय रं!
दिपू - काय?
आजी - बा काय करतो?
दिपू - कुणाचा?
आजी - कुणाचा म्हंजी? मी इचारतीय अन हितं तू एकटा हायस.. काय करतो बा???
दिपू - कुछ नय
आजी - मग तंगड्या वर करून आढ्यावर थुंकतो काय?
दिपू - मेला
आजी - का?
दिपू - मला काय म्हैत?
आजी - तू कुणाचायस मग?
दिपू - मतलब?
आजी - तू असताना मेला का नंतर?
दिपू - नक्की म्हैत नय.. पण मै छोटा था उसवक्त ऐसा बोलते लोगां..
आजी - मुर्ग्या खाताय तू?
दिपू - ह्या... कुछ बी... मै तो देखता बी नय मुर्गी!
दिपूला मनातच पद्याची ऑम्लेट्स अन अबूची बिर्याणी आठवली.
आजी - जा आता..
दिपू - आँ? .. क्यो?
आजी - भाडं भरतोयस काय हितलं? का म्हंजी? बापाच घर वाटलंन..?
दिपू - काजलको आनेदो..
आजी - काजलका नाम नय लेनेका..
दोन मिनिटांनी काजल आली. दिपू पळायच्या तयारीत बसला होता.
काजल - क्या हुवा?
दिपू - जानेको बोलती दादी..
काजल - ऐसे कैसे जायेगा तू? च्या करतीय.. बस..
काजलपुढे आजी जात नाही हे दिपूला समजलं! मग एकंदर प्रकरणाची त्याला मजाच वाटायला लागली. आता तो आजीपुढे बिनदिक्कत बसून राहिला.
आजी - ए भवाने.. इस्तू आन...
काजल एक जळत असलेला कागद घेऊन बाहेर आली. आजीने कंबरेच्या चंचीतून एक बिडी काढली अन पेटवली.दिपू पुन्हा चक्रावला. काय बाई आहे का काय?
आजी - घंटेमे आयेंगे ससुरालवाले.. दुसरी साडी नेस..
काजल - दुसरी लायीच नय
आजी - का?
काजल - येकच हय ही..
आजी - आवर मंग.. हे बाहुलं कुटं राहतं?
बाहुलं?? काय दैन्यावस्था आहे आपली.. दिपूला वाटले.
दिपू - म्हौर्वाडी..
आजी - वो धनगरबस्ती?
काजल- न्हाय.. त्या अलीकडे.. वाडाय आठ कमरेका..
काजल थाप मारते? दिपूला हे नवीन होतं!
आठ खोल्यांचा वाडा? अन या पोराला आपण असे बोललो? आजीला मनात जराशीच धाकधुक वाटली.
चहा आला. काजलला चहा बर्यापैकी जमायचा. पण आजीला काय पटणार?
आजी - शक्कर डालीच नय?
काजल - डाली ना? तीन कपको सात चम्मच...
आजी - शादी कौन करेंगा तेरेसे... जा.. दो चमच और डालून आण...
काजल गेली आत.
आजी - हं! जा रे ए बुजगावण्या... च्या झाला आता...
आता काजललाही काही बोलणे शक्य नव्हते.
बुजगावणं उठलं! सात आठ प्रकारे वेगवेगळे उल्लेख झाल्यावर आपण नक्की कोण आहोत याचा दिपूच्या मनातही संभ्रमच निर्माण झाला होता.
दिपू - कल आता मय.. तीन बजे.. क्या? तय्यार रह्य..
काजलने विरह सुरू झाल्याच्या दु:खात निराश होऊन मान हलवली.
आजी - तय्यार रह्य? तेरी घरवाली हय क्या? ये कल क्युं आरहा फिर?
काजल - मेरेको लेजानेको
आजी - मय नय छोडेंगी इसके साथ तुला
उद्याचे उद्या पाहू या तात्विक निर्णयानंतर दिपू दारातून बाहेर पडणार तोच गावातला एक माणूस, ज्याचे नाव बापू होते, तो दारात उगवला.
बापू - ए बुढ्ढी! वो लोगां हिधर नय आरहे.. उप्पर म्हौर्वाडी आरहे.. उधरच बुलाया लडकीको...
आजी - बुढ्ढी तेरी बीवी.. तेरा पोता बुढ्ढा.. मोंगलाई हय क्या?
बापू - लडकेवाले हय.. सीधी बात नय करेंगी तो लडकी घरमेच रहेंगी...
आजी - अबे तेरा दादा लडकीवाला रहेंगा.. मय नय ले जायेंगी इसको व्हां!
बापू - तो पी इधरच बीडी! मय चला...
ही सुखद बातमी ऐकून दिपूला उड्या माराव्याशा वाटू लागल्या.
काजल मधे पडली. महुरवाडीचा उल्लेख तिला सुखावणारा होता.
काजल - आजी.. अगं व्हां जायला नको का? येवढी मै इथे आली..
आजी - असले ५६ लडके मिलेंगे टहेरेमे.. ए क्रान्तीकारक? तू का उभा अजून?
दिप्या हादरला. तरी धाडसाने म्हणाला.
दिपू - आप बोलती तो मय लेके जायेंगा इसको..
आजी - शेंबुड पुसता येतो का? चल्ल भाग
बापू, काजल अन दिपू यांच्या पंधरा मिनिटांच्या समजावणीनंतर आजीला हे पटले की इतका सायास करून दाखवायला आलेल्या काजलला आपल्या अट्टाहासामुळे दाखवलेच न जाणे अयोग्य आहे. पण दिपूच्या बरोबर फक्त तिने अन काजलने जाण्याला तिचा विरोध अजूनही कायम होता. मग बापूने मध्यस्थ म्हणून स्वतः जायची तयारी दाखवली.
अर्ध्या तासाच्या घनघोर चर्चेनंतर चौघे महुरवाडीला जायला घरातून निघाले.
आणि उंबर्यातच आजीचा पाय घसरुन ती पडली अन ठयाठया बोंब मारू लागली. काजल अन दिपू भलतेच घाबरले. काजलने धावाधाव करून पाणी आणून तिला पाजले. तरी ती बोंब मारतच होती. एवढेसे पडल्याने इतके कसे लागले म्हणून बापू शंकीत होता. आजूबाजूचे लोक जमले होते.
बापू - क्या हुवा अय बुढ्ढी?
आजी - बुढ्ढा तेरा बाप.. क्या हुवा म्हणे.. कंबर आतून तुटलीय माझी
बापू - आतून म्हंजी?
आजी - आतून म्हंजी आतून.. अयायायायायाया... कुटलं भोग माज्या पदरात आलया...
बापू - आता कसं जायचं गं ए पोरी..?
दिपू मधे पडला. मोठा जबाबदार चेहरा करून म्हणाला.
दिपू - मय एक काम करता.. इसको मय लेके जायेंगा.. आप दादीको देखो..
आजी भेसूर ओरडली.
आजी - खबरदार पोरीला या निवडुंगाबरुबर धाडलन तर कुणी..
बापू - अगं मंग करायचं काय?
आजी - तुझी बाईल दाखीव त्या नवर्या मुलाला... करायचं काय म्हणी..
बापू - अय बुढ्ढी... तू गिरगयी करके इतना सब सुनरहा मय.. नय तो
आजी - नय तो क्या? अयायायायायाया...
काजल - आजीको डागदरकेपास लेचलो..
आजी - डागदरचं नाव काढलन कुणी तर गावाच शमशान करल मय
बापू - म्हातारी वेडी हाये...
आजी - वेडा तुझा बाप हाय... ये हेलन... चल ऐसेच मेरेको लेके
हेलन! काजलला नवीन नाव मिळाले. आता दिपूला हसू आले. काजलही मनापासून हसायला लागली. आजीची वेदना राहिली बाजूलाच!
काजल - असं कसं जायचं?
गावातला एक जण म्हणाला हिला झोळीत टाकून जीपमधे ठेवा. जीप जाईल निवांत महुरवाडीला. झोळी उचलायची कुणी यावर थोडा वेळ वादावादी झाली. शेवटी बापू व गावातला एक जण झोळी उचलणार, त्याबदल्यात आजीने बरे झाल्यावर त्यांना काहीतरी द्यायचे अन काजल अन दिपू बाजूने चालत हात धरणार, जेणेकरून झोळी काळजीपुर्वक जीपपर्यंत पोचेल असे ठरले. त्यात पुन्हा महुरवाडीला झोळी कोण उचलणार हा प्रश्न निघाला. त्यावर दिपूने 'मेराच गाव हय.. लय लोगां है उठानेको' असे बिनदिक्कत सांगीतल्यावर मोठी माणसे या चमत्काराकडे निरखून बघायला लागली.
आजी बोंब मारतच होती. शेवटी तिला एका कांबळ्यावर ठेवले. ठेवताना जोरात उचलल्यामुळे तिने शिवाला एक करकचून शिवी हासडली. शिवा हा बापुचा पार्टनर झाला होता या म्हातारीला उचलण्याच्या कामी!
वरात निघाली. मागून सगळे हसत होते. खरे तर या म्हातारीला महुरवाडीला जायचे कारण नव्हते. बापू काजलची भेट तिथे घालून तिला घेऊन आलाही असता. पण हेकटपणा!
आता भर टहेर्यातून ही अशी वरात चाललेली पाहून मागून बारकी पोरे यायला लागली. त्यांना एक दोघे हाकलू लागले. पोरे हसू लागली. आजी मात्र बोंब मारत होती. कुणालाही काहीही बोलत होती.
मधेच वाण्याचे दुकान तिला दिसले. तिने झोळीतूनच बंडा वाण्याला हाक मारली.
आजी - य बंडावं.. फिटली उधारी ना? आता गपगुमान मागल ते द्यायचं उद्यापासून..
बंडा वाणी त्या प्रकाराकडे बघतच बसला. आजूबाजूचे हसत होते. मधेच एक स्थानिक डॉक्टर आला. तो शुद्ध मराठी बोलू शकायचा. त्यामुळे त्याच्याकडे पेशंटच जायचे नाहीत.
डॉक्टर - यांना काय झालंय?
काजल - पड्या...
डॉक्टर - तपासायला हवे. आणा यांना दवाखान्यात ...
आजी - भुकंपात ग्येलान तुझा दवाखाना ए... चल नाकाम्होरं.. मुझे लेके जारहा.. शेपटी आलीय मागे ती तपास.. बापाला तपासला नाय का स्वतःच्या...आ?? .. नाकाचं भजं तपास... मला तपासतोय मुंगळा...
डॉक्टरने मुंगळा हा शब्द ऐकलाही नव्हता इतक्या वेगात तो तिथून सटकला. दिपू खदाखदा हसत होता.
आजी - ह्यं दुतोंडी गांडुळ का दात काढतंय ग काजल?
काहीही चाललेले होते. रस्त्याच्या दुतर्फा माणसे थांबून तो प्रकार बघत होती. काजल शरमली होती.
मधेच शॉर्टकट घेतल्याने जरा खड्ड्यांचा रस्ता आला. शिवाने अन बापूने थकल्यामुळे झोळी मिनिटभर खाली ठेवायचा विचार केला.
आजी - तिरडी हाय व्हंय रं बापाची खाली उतरवायला ? वाटण्यांवरून गळे दाबायला? आ? चल फुडं...
निघाले बिचारे. हिच्या तोंडाला लागण्यात अर्थच नव्हता.
या शॉर्टकटने ती बरेच महिन्यात गेलीच नव्हती. काही बदल झालेले तिला माहीत नव्हते. मधला एक वड कापुन टाकला होता अन त्या जागी होटेल झालं होतं!
आजी - हितला वड कुणाच्या *** घातला रं बाप्या??
आता मात्र बापू भडकला. एकतर ही पडणार, हिला उचलून न्यायचं! त्यात हीच शिव्या देत चालणार. सगळे आपल्याला हसणार! यांची लग्नंही आपणच जुळवायची. नोकर आहोत का काय आपण?
बापूने सरळ झोळी खाली टेकवली अन ओरडला.
बापू - ये थेरडे.. त्वांड बंद क्येलं न्हायस तर हितंच टाकंल झोळी..
शिवाच्या हातात झोळीची एक बाजू तशीच असल्यामुळे म्हातारी तिरकी झाली होती. तशीच बोंबलू लागली.
आजी - खून खून खून.. मारलन मला म्हातारीला या द्वाडाने...
बापूने घाईघाईने झोळी उचलली. झंगटच झालं होतं!
जीपपर्यंत पोचेपर्यंत नुसता तमाशा झाला. चार जीपवाले एकदम आले.
एक - महुरवाडीला दवाखाना नाय.. हितंच उपचार करो..
बापू - उपचार बिपचार नाय करायचा.. आमचेच उपचार करायचेत.. ही झोळी न्या महुरवाडीला
दुसरा - क्या हुवा क्या?
शिवा - पड्या
एक - किधर?
बापू - अरे किधरबी पडेली रहेंगी? तेरेको दुनियादारी कायको? ले जाता के नय इतना बोल?
तिसरा - डालो इधर..
कशीतरी झोळी मधल्या सीटवर ट्रान्स्फर झाली. म्हातारी स्थलांतरीत होईपर्यंतच काय ती गप्प होती. आता सुरू झाली.
आजी - मै इधरसे पडेंगी फिर.. मारनेको भेज रहे जीपमे मला..
ड्रायव्हर - नाय पडणार आजी.. दार बंद होतं..
आजी - आजी? कोन आजी? तुझी भन आजी! कोल्हाटणीच्या..
ड्रायव्हर हबकून बाहेर आला.
ड्रायव्हर - ये ऐसा कैसे बोलती?
बापू - महुरवाडीतक क्या क्या सुनेगा तू ये मेरेकोच पता नय.. कितना देनेका तीन शिटां का?
ड्रायव्हर - कायका तीन सीट?
बापू - ये बुढ्ढी, ये लडका और ये लडकी
ड्रायव्हर - मधली सिट खाल्ली म्हातारीने.. पाच जण बसतात थितं
बापू - मंग?
ड्रायव्हर - आठ शिटांका पैसा होता.. अडतालीस..
बापू - याड लागलं का? माणसं जाणार तीन.. अन शिटा लावतोय आठ
बापू बाकीच्यांकडे बघत म्हणाला. जीपवाल्यांपैकी कुणीच सहमती दर्शवली नाही. त्यांच्यातला एक म्हणाला:
एक - ये सही कहरहा.. पाच सिटका नुस्कान नय क्या हमारा?
नवा वाद निर्माण झाला. काजल अन दिपूला आजीला महुरवाडीला न्यायचच नव्हतं! त्यामुळे पैसे असूनही त्यांनी तसं सांगीतलं नाही. शेवटी झोळी खाली काढुन घेण्यात आली.
आजी - चीजवस्तूय व्हय रं म्या? वाटला.... टाकला डाग आत.. वाटला.. काढला भाईर..
बापू - तू चूप बैठ... पोरे जाणार हायत
आजी - यकट्या ज्वान प्वारीला जीपातून पाठविलात तर उलथ्न घालंन तापलेलं..
बापू - बरी झाल्यावर घाल.. चल रे शिवा.. झोळी टाकू घरात पुन्हा...
बोंबलत आजी परत जात होती तेव्हा प्रेमाने काजल तिच्या चेहर्यावरून हात फिरवत म्हणाली:
काजल - आजी.. मय नय जाती.. तेरेको खूप लागलंय ना? चल मय बी घरपे आती.. दवापानी देखती
आजी - नय गं मेरी बाय! तेरा शादी होनेको होना ना? मेरी चिंता छोड बाय.. जल्दी वापस आ..
आजीची झोळी परत जाताना दिपूने मागून काजलच्या खांद्यावर हात ठेवला.
दिपू - रो मत... मै हुं ना..
दिपूची आई ढाब्यावरुन रडत परत जात असताना काजलने त्याला दिलेल्या धीराची परतफेड करण्याची संधी नशीबाने दिपूला आज दिली होती.
उदास मनाने दोन सीटचे पैसे भरून जीपमधे बसताना काजलचे लक्ष आजी गेलेल्या रस्त्याकडे लागले होते. दहाच मिनिटात भरलेली जीप चालू झाली. एकंदर पंधरा प्लस ड्रायव्हर अशी विक्रमी भरती झाल्यामुळे काजलला अगदीच चिकटून बसायची संधी मिळालेला दिपू त्याच्या मांडीला होणार्या तिच्या मांडीच्या लुसलुशीत स्पर्शाने भंजाळला होता. अन हळूहळू तीच जाणीव तिलाही होऊ लागली होती. दिपू आणखीनच रेलून बसला तसे विरुद्ध बाजूला तोंड असलेल्या काजलने डोळ्यांच्या कोपर्यातून हळूच दिपूच्या मांडीकडे बघितले. दातात ओठ रोवून आपल्याच बोटांचा चाळा करत ती जीपच्या समोरच्या खिडकीतून रस्त्याकडे बघत होती. हळूहळू आजीचे दु:ख कमी होऊ लागले. दिपूचे धाडस वाढू लागले. आता त्याच्या दंडाचे आपल्या दंडावर घासले जाणे हे जीपच्या धक्क्यांमुळे नसून हेतूपुरस्पर आहे हे काजलला समजू लागले. तिने विरोधही केला नाही अन सहकार्यही!
पहाटेच्या प्रवासाच्या तुलनेत आत्ताचा प्रवास अत्यंत बोलका अन जास्त दिलखेचक वाटला दिपूला. चोरून केलेल्या प्रेमाची मजा औरच! पहाटेही चोरूनच एक पुसटसे चुंबन घेतले होते. आत्ता तर चुंबन काय, साधा हातात हातही घेता येत नव्हता इतक्या लोकांसमोर! पण घट्ट चिकटून 'बसावेच लागत आहे' ही भावना निर्माण करून तिचा जो निकटचा सहवास त्याला मिळत होता त्यात तो खुष होता.
अर्ध्याच तासात मुक्कामस्थान आले.
महुरवाडी!
फारसे काहीही आठवत नव्हते दिपूला. याही वाडीला वेस होती. हनुमंताचे छोटेखानी दगडी व पडके देऊळ होते. दोघांनी तिथे नमस्कार केला. निघाले.
श्री. दीपक अण्णू वाठारे अत्यंत अगतिक मनस्थितीत व अपमानीत अवस्थेत जिथून बाहेर पडले होते तिथे आज ते नऊ, साडे नऊ वर्षांनी पुन्हा परंतू अत्यंत अभिमानाने येत होते.
महुरवाडी! हे आपले गाव? हे? कुठे चांदवड, कुठे टहेरं! कुठे वडाळी भुई! अन कुठे महुरवाडी! छ्या!
आपण इथेच का जन्मलो? नाही सांगता येत! असो. बघू तर कसं झालंय आता गाव?
लांबवर काही घरे दिसत होती. जीपमधून उतरलेले सगळे तिकडेच जात होते. एकच पायवाट होती. पण सगळे या दोघांच्या खूप पुढे होते.
दिपू काजलला घेऊन निघाला. त्याच्याकडच्या तीन पिशव्यांमधे त्याच्या 'आपल्या' लोकांसाठी काय काय घेतलेले होते त्याने. काजलला ज्यांच्याकडे जायचे होते त्यांचे फक्त आडनाव माहीत होते. कदम! महुरवाडीत कदम किती होते हे माहीत नव्हते दोघांनाही!
मात्र, संपूर्ण वाटेवर दिपू अबोलपणे चालला होता. टकामका इकडे तिकडे बघत होता. काजल आपल्याबरोबर आहे याचेही भान त्याला राहिले नव्हते.
आणि पंधरा मिनिटांनी पहिल्या घराच्या जवळ ते आले. एक ठिगळाठिगळांचे पोलके घातलेली पन्नाशीची बाई हातपंपावर पाणी भरत होती. तिला पाहून दिपूने विचारले.
दिपू - सुनंदा वाठारे???
'माझी आई कुठे राहते'! हा प्रश्नच त्याला विचारता आला नसता. असं कसं विचारायचं? त्या बाईने कुतुहलाने त्याच्याकडे अन अत्यंत नवलाने काजलच्या लावण्याकडे बघत कुठेतरी हात दाखवत 'वहांसे तिसरा घर' असे सांगीतले. दिपू असतानापेक्षा बहुधा वस्ती वाढली असावी. लक्षात काही नव्हतेही अन येतही नव्हते.
मात्र!.. तो क्षण...
तो क्षण अचानकच आला.. केवळ पन्नास पावले चालून डावीकडे वळल्यावळल्याच तो क्षण आला.
हाच तो उंबरा..!! हाच.. हाच उंबरा तो...
आपण पाठमोरे बसलो होतो. घराकडे पाठ करून! सणकन लाथ बसली होती पाठीत.. गुरासारखे ओरडत होतो आपण! हेच ते घर! आपले घर! आपल्याला घर आहे.
काजल तर जाऊचदेत.. हातातल्या पिशव्या आहेत तिथे टाकत दिपू भावनातिरेकाने वादळी वेगाने त्या उंबर्याकडे धावला. काजल बघतच बसली.
दिपू - आई.. आई.. ये आई.. आईगं.. मय आया.. आगया मै.. देख.. दिपू हय मय...
धाडधाड दार वाजवताना आईला दारही उघडू देण्याची उसंत दिपू देत नव्हता.
'दिपू हय मय' हे वाक्य उच्चारताना मात्र दार उघडले गेले अन ...
कित्येक... कित्येक म्हणजे कित्येक वर्षांनी मायलेकरांची त्याच घराच्या उंबर्यात... भेट झाली.
चक्कर यायची बाकी राहिली होती सुनंदाला आनंदाने...
तिने अक्षरशः दिपूला मिठी मारली.
घळाघळा रडत होती सुनंदा..
तो प्रसंग शब्दात वर्णन करणे कुठल्याही लेखकाला.. कवीला.. कधीच शक्य होणार नाही....
आई! आई म्हणजे काय असते.. अन आईला आपले मूल म्हणजे काय असते..
कसे वर्णन करणार? निसर्गाने निर्माण केलेले सर्वात जास्त प्रेमाने ओथंबलेले नाते.. ज्यातून पुन्हा निसर्गच स्वतः निर्माण होत राहतो.. कसे वर्णन करायचे??
मानवी ऐंद्रीय क्षमतेच्या पलीकडच्या भावना ज्यात असतील .. त्याचे वर्णन कसे करायचे?
सावत्र? होय! सावत्र! पण.. तरीही.. आई... तरीही ... मुलगाच..!
फक्त घळाघळा अश्रू वाहू द्यायचे डोळ्यांमधून! आनंद झाला तरीही... दु:ख झाले तर तर.. सरळच..
स्पर्शातून काही भावना पोचतात. काही शब्दांमधून.. काही अश्रूंमधून.. काही मुलाच्या केसांचे चुंबन घेताना आईला त्याच्या केसांमधून येणार्या अन आईने आपल्या पोटाशी धरल्यावर मुलाला आईच्या अंगाला येणार्या मायाळू गंधामधून..
सगळ्या माध्यमातून पोचूनही काहीतरी अर्धवटच राहते. नाही बोलता येत ते.. जाणवते मात्र खचितच!
अक्षरशः दोन ते तीन मिनिटे दोघे एकमेकांना घट्ट धरून ओक्साबोक्षी रडत होते.
सुनंदा मुलगा एवढा मोठा होऊनही त्याच्या कपाळाचे, डोक्याचे पापे घेत होती.
आज परिस्थितीत खूप फरक पडलेला होता. अजाण दिपूला मारून हाकलून देताना तिला मन्नूचाचापासून मिळू शकणार्या सुखाची चटक लागली होती. आज मन्नूची तिला किळस येत होती. घृणा वाटत होती. स्वतःच्या वागण्याची शरम वाटत होती. ढाब्यावर दिपूने यायला नकार दिल्यावर तिच्यासाठी आयुष्य एक 'मरण येत नाही म्हणून जगायचे' अशी गोष्ट बनलेली होती. आणि आज...
सावत्र का असेना.. लहानपणी आपल्या कुशीत आल्याशिवाय ज्याला झोपच यायची नाही तो दिपू..
कित्ती कित्ती राजासारखा दिसत होता.. आणि..
चक्क घरी परत आला होता...
अस्मान ठेंगणे झाले त्या माउलीला..
'आगया दिपू, आगया मेरा बच्चा' करत ती मुळी त्याला सोडतच नव्हती.
वस्तीतले जवळचे सगळे लोक तिथे जमा झाले. अगदी आक्का म्हातारी सुद्धा! मुस्तफासुद्धा ! पद्या अन अबूकडून गुरासारखा मार खाऊनही सुनंदाचे ओसंडणारे प्रेम पाहून तोही ओलावला होता.
आणि काजल?
काजल घळघळा रडत होती. तिला माहीतच नव्हते.
आजवर आपण ज्याची इतकी थट्टा करायचो.. ज्याच्यावर आपले हळूच प्रेम बसले..
त्या या दिपूचे त्याच्या आईवर किती प्रेम आहे आणि... तिचे तर त्याच्यावर आणखीनच...
तरी हा ढाब्यावर का राहतो??
हळूहळू सगळ्यांना समजले. दिपू परत आला. मन्नूला कुठूनतरी बोलावून आणले कुणीतरी! आधी तो घाबरतच आला. त्याला वाटले दिपू आला म्हणजे सुनंदा पुन्हा त्याला काठीने मारणार! पण सुनंदाचे लक्षच नव्हते त्याच्याकडे!
मन्नूला आत्ताही जास्त झालेली होती. दिपूपासून तो दोन तीन फूट लांबच उभा राहिला. काय दिसत होता दिपू! नवे कपडे, मस्त भांग बिंग पाडलेला! मालेगावचाच वाटत होता जणू! मन्नू बघतच बसला.
दिपू - मन्नूचाचा?
काय हाक होती ती! मन्नूला आपल्या अख्ख्या आयुष्याचा पश्चात्ताप झाला. खिळल्यासारखा तो दिपूची ती हाक ऐकून दिपूकडे बघतच बसला. हा आपल्याशी बोलला? हा तोच! ज्याला आपण... छे!..
दिपू त्याच्याजवळ गेला. अब्दुलच्या जवळ गेल्यावर यायचा तसाच वास दिपूला आला. म्हणजे मन्नूचाचा पीत होता हे त्याला समजले.
दिपूने त्याच्या हाताला हात लावत विचारले...
दिपू - भोत पीते तुम? .. कायको??.. ये देखो मय क्या लेके आया तुम्हारे वास्ते..
दिपूने त्याच्या तीनही पिशव्या उलट्या केल्या. आपण कुणासाठी काय आणले आहे हेही त्याला आठवेना.
दिपू - ये लो.. ये बंडी तुम्हारेलिये...
मन्नू मुळापासून पश्चातापाचे एक जिवंत उदाहरण झालेला होता. हातात असलेल्या बंडीकडे पाहताना तो काहीही न बोलता खाली बसून बंडीत तोंड खुपसून रडू लागला. सुनंदाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मग मात्र मन्नूचा बांध फुटला. सुनंदाच्या मांडीत डोके खुपसून तो रडू लागला. दिपू त्याला कुरवाळून आक्का म्हातारीकडे गेला.
दिपू - आक्का, ये साडी.. तेरे लिये...
आक्कालाही आजवर केलेल्या तंत्रमंत्राच्या नाटकापेक्षा हे निरागस प्रेम ढवळून आणणारे वाटले. तिनेही त्याला पोटाशी धरत अश्रू गाळले.
दिपू - मुस्तफाचाचा.. आपको भोत लगा ना उस दिन.. लोगां बुरे नय वो.. लेकिन.. मारामारी हुवी तो.. माफ करनेका हां? ये देखो.. स्वेटर लाया मै.. तुमको.. थंड नय लगेगी अब..
मुस्तफा मात्र मटकन खाली बसला. या मुलाला आपण जबरदस्तीने आणायला अन मारामारी करायला गेलो होतो? किती जबाबदार अन शहाणा मुलगा आहे हा! लज्जीत झालेला मुस्तफा दिपूला जवळ घेऊन त्याची पाठ थोपटत होता.
दिपू - ये साडी रेहानामौ... रेहानामौसी किधर हय???
सगळ्यांनी मान खाली घातली. कुणीतरी पुटपुटलं! गुजरगयी!
गुजरगयी...
मेली? रेहानामौसी मेली??
दिपू एका भिंतीवर तोंड दाबून रडू लागला. सुनंदाने त्याला सावरले. मिनिटभराने दिपू सुनंदाला म्हणाला...
दिपू - हरा रंग पसंद हय ना मा? हे बघ तुला दोन साड्या .. अन हा डबा पावडरचा..
सुनंदाला मन्नूने गेल्या कित्येक वर्षात साडी घेतलेली नव्हती. मन्नू फक्त प्यायचा. कमवायचा काही नाही. सुनंदाकडे एक ठेवणीतील अन दोन वापरण्याच्या साड्या फक्त होत्या.
दिपूने आणलेल्या साड्या हातात घेऊन ती अक्षरशः कोलमडली. एका डोळ्यातून आनंदाश्रू अन एका डोळ्यातून दु:खाश्रू येताना कुणाला पाहिलयंत? सुनंदा तशीच रडत होती.
दिपूबरोबर पुर्वी काही ना काही खेळणार्या मुलामुलींना त्याने बरोबर ओळखले. सगळीच बावळट दिसत होती आत्ता! निदान वाटत तरी होती त्याला. एक दोन मुला मुलींची बहुधा लग्नेही झाली असावीत. ते तिथे नव्हतेच! दिपूने बरोबर आणलेल्या कॅडबर्या अन क्रीमरोल, बिस्किट वगैरे वाटली.
आणि त्यावेळेस आक्का म्हातारीचे काजलकडे लक्ष गेले..
आक्का - यं कौन हय रं.. इतनी सुंदर बेटी.. परी हय परी...
काजल! काजलकडे कुणाचे लक्षच नव्हते. आत्ता लक्ष गेले. सगळी वस्ती दिपूला सोडून काजलकडे धावली. काजल 'आपल्याकडे दिपूचेही आता लक्ष नाही' म्हणून नाराज झालेली असतानाच 'दिपू राहिला बाजूलाच अन आपलेच कौतूक सुरू झाले' अशी परिस्थिती आली.
काजलचे असामान्य सौंदर्य पाहून अख्खी वस्ती खुळावली. बायाबापड्यांनी कडाकडा बोटे मोडली तिच्या कपाळावर! आक्काने कसलातरी अंगारा लावला तिला.
ही कोण परी? परीच म्हणायची की? आपल्यात कुणाचा असतो तरी का असा रंग कधी?
सुनंदा अवाक झालेली होती काजलला पाहून! तिने पटकन काजलला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाली..
सुनंदा - दिपू.. ये कौन रं?
दिपू - ये काजल.. ढाबेपे इसके पिताजी काम करते.. ही, ते अन हिची आई थितंच रयतात..
सुनंदा - .... पर.. इधर कैसे लाया इसको?
आता आक्का बोलली.
आक्का - अरे कैसे लाया वो छोडदे.. कितनी सुंदर है बेटी..
सगळी वस्ती टक लावून आपल्याकडे पाहतीय म्हंटल्यावर काजल शरमली.
पोरे तर पागलच झालेली होती. पोरी असूयेने तिच्याकडे पाहात होत्या.
आक्का - क्या रं दिपू.. काय बातमी..
दिपू - कुछ बी क्या आक्का.. इसको लडकेवालोंको दिखानेको लाया.. कदम करके हय अपनी बस्तीमे..
कदम हे तिथले नव्हतेच. आज ते महुरवाडीला आपल्या नातेवाईकांकडे आलेले होते. इथून ते टहेर्याला जाणार होते. पण कुणालातरी ऐनवेळेस काजलच्या घरी पाठवून त्यांनी काजल अन तिच्या आजीलाच इथे आणायचा निरोप धाडला होता. तो पंचावन्न वर्षांचा गृहस्थ पुढे झाला.
कदम - अरे? सुनीलके लिये तेरा रिश्ता आया क्या? किती सुंदर मुलगीय.. लेकिन...
रिश्ता म्हंटल्यावर अन सुंदर म्हंटल्यावर दिपू हताश झालेला होता. काजलही! पण 'लेकिन' या शब्दाने किंचित आशा पालवली.
कदम - लेकिन तू तो मेरे बेटेको पसंदच नय करेंगी.. तेरेको तो.. यहीच पसंद होएंगा..
दिपूकडे बघत त्यांनी उच्चारलेले हे वाक्य ऐकल्यावर मात्र काजल आजवर लाजली नसेल अशी लाजली अन सुनंदाला बिलगली. सगळे हसायला लागले. दीपक अण्णू वाठारे स्वतःच शरमले व खाली पाहू लागले. कदमही हसू लागले.
काजलची ती अदा सगळ्या वस्तीला खुळावून गेली. सुनंदाने तिला जवळ घेतले व काहीतरी कानात कुजबुजली. काजल आणखीनच लाजली.
मगाचचे रडण्याचे वगैरे सगळेच मूड आता जाऊन तिथे एक गुलाबी मूड प्रस्थापित झाला होता.
अचानक मन्नू ओरडला.
मन्नू - ए.. सबलोगा आज नाचनेका.. गानेका.. मुर्गी बनानेका.. मेरा.. हा.. मेराच.. मेरा बेटा आगया हय...
'मेरा.. हा.. मेराच बेटा' .. दोन चारच शब्द! क्षणभर सगळी वस्ती जुने प्रसंग आठवून अंतर्बाह्य पाणावली. अन त्यानंतर एकच जल्लोष झाला.
नुसता धिंगाणा सुरू झाला. दोघातिघांनी मन्नूला डोक्यावर घेतले. पार्टी म्हंटल्यावर. अन तीही मन्नू, सुनंदाने घोषित केली म्हंटल्यावर कोण आनंद झाला वस्तीला. एकतर सुनंदासारखी मुर्गी कुणी बनवायचे नाही अख्ख्या वस्तीत! त्यात मन्नूसारखा विविध पाखरे पकडणारा पारधी नव्हता. आज मेजवानीच! त्यात पुन्हा मन्नू पार्टी देणार म्हणजे ओली असणार! अर्थात, पैसे सुनंदाचेच! पण सुनंदाला आज हरकत असणे शक्यच नव्हते.
मन्नूचे वस्तीत चाललेले कौतूक पाहून कित्येक वर्षांनी सुनंदालाही मन्नूबद्दल प्रेम वाटले. आपले सुरुवातीचे प्रेम तिला आठवले. तिनेही मन्नूच्या पाठीवरून हात फिरवला. या माणसाला आपण किती मारायचो हा पिऊन आल्यावर! पुन्हा सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले. मन्नू मात्र पूर्ण जळत होता पश्चात्तापाने... ओक्साबोक्शी रडत सुनंदाला जवळ घेत म्हणाला:
मन्नू - सुनी.. नय पियेंगा.. आज लास्ट.. आजके बाद नय पियेंगा मय.. तेरी कसम.. खरच.. सर्व्या वस्तीसमोर बोलतोय रे.. ऐका.. आज लास्ट.. उद्यापासून नय शराब पिणार मय.. कुनाला पिताना दिसलोच तर सरळ खल्लास करून टाकायचा मला.. काय.. या पोराला.. या बाईला लय .. ... ... लय छळलं म्या...
'लय छळलं' म्हणता सुनंदा अन दिपू राहूदेत.. काही जुन्या बायाबापड्याही रडल्या..
त्या दिवशी संध्याकाळी जर महुरवाडीच्या कुठल्याही माणसाला विचारलं असतं की जगातील सर्वात सुखी वस्ती कुठली...??????
'महुरवाडी'..
एकदिलाने सगळ्यांनी एकच उत्तर दिलं असतं!
एक माणूस मात्र सकाळीच घाईघाईत टहेर्याला पाठवण्यात आला होता. आणि त्याच्या बरोबर त्याची बायकोही. या दोघांना टहेर्यातील काही जण ओळखायचे. त्या ओळखीच्यांना घेऊन ते म्हातारीकडे गेले होते काजलच्या. आणि तिला निर्धास्त रहा, काजल उद्या सकाळी येईल असे सांगीतले होते. आजी नाखुष असली तरी एकदम गावातल्या महत्वाच्या चारचौघांना बघून हो म्हणाली होती. आणि तिची कंबर आता बरीच बरी आहे असा निरोप घेऊन तो काजलला सांगायला हे दोघे दुपारी साडे चारला महुरवाडीला आले सुद्धा होते.
साडे सहालाच जंगी पार्टी सुरू झाली. एका बाजूला पिणारे बसले होते. नाचत होते. पीत होते. एका बाजूला मोठ्या चुलीवर एका मोठ्या पातेल्यात कोंबड्या मसाल्यातच शिजत होत्या. चार बायका भाकरी थापू लागल्या होत्या. कुणीतरी साखरभाताची जबाबदारी घेतली होती. मन्नूला दुपारी मिळालेल्या दोन वांब अन दोन ससे आज आस्वादासाठी उपलब्ध होते.
आणि कशातही इन्व्हॉल्व्ह नसलेले पण तिथेच असलेले दिपू अन काजल..
दिपूने तिच्याकडे बघितले की ती लाजून मानच फिरवत होती..
इतकी लाजत बसली तर आपली नवरी कशी करायची हिला या निरागस प्रश्नाने दिपूला भंडावले होते.
आणि तिला वाटत होते की आपल्या अन दिपूच्या स्वागतासाठी ही पार्टी, हा जल्लोष आहे. अन ते बरोबरच होते. सुनंदा आत्ताच स्वतःला सासू समजायला लागली होती. आज तिला आपल्या पहिल्या नवर्याचीही प्रकर्षाने आठवण येत होती.
पोरापोरींनी वस्तीतले खेळ सुरू केले. या दोघानाही खेळात घेतले. दिपू फार पुर्वी ते खेळ खेळलेला होता. तरी किंचित सरावाने त्याला ते जमू लागले.
इथेच राहावे? राहावे का इथेच???
सकाळी अकरा वाजल्यापासूनच हा विचार दिपूचे मन पोखरू लागला होता. आणि नेमके काजललाही तेव्हा तेच विचार करावेसे वाटत होते. आपण सुंदर आहोत याचा या लोकांना कोण अभिमान! दिपूची बायको झालो तर काय या कल्पनेने आत्ताच खुळावलेत! तिच्या मनाला तर मोहरच आला होता.
पण..
वारंवार... अगदी वारंवार..
अबूचाचा... गणपतचाचा.. पद्या.. बाळ्या.. झिल्या..
सगळ्यांचेच चेहरे डोळ्यासमोर तरळत होते...
ही.. आज ही माणसे जी नाचतायत.. ती... त्या दिवशी..
त्या दिवशी यातले कुणीही... कुणीही धावले नव्हते मदतीला...
त्या वेळेस आपल्याला आईबापाचे प्रेम फुकटात दिले ते चाचा अन अबूने...
दिपूने मनातून तो विचार दूर सारला.. वस्तीवरच राहण्याचा..
रात्री एक वाजेपर्यंत नुसता धिंगाणा चालला होता. होळीसारख्या पेटवलेल्या लाकडांभोवती बायकांनी फेर धरला तेव्हा सुनंदाने काजललाही फेर धरायला आपल्याबरोबर घेतले.
आगीच्या ज्वाळांच्या प्रकाशात काजलचे रसरसलेले शरीर स्वतःच आगीसारखे भासत होते दिपूला..
अन काजलने तर त्याच्या नजरेत नजर मिळवणेच सोडून दिले होते.. असलं बघणं तिला सहनच होत नव्हतं!..
दिड वाजता शांत झालेली अन भरल्या पोटाची वस्ती आपापल्या घरात झोपायला गेली तेव्हा आक्का म्हातारीने काजलची जबाबदारी स्वीकारली. मन्नू बाहेर झोपला..
आणि.. वडाळी भुईच्या तुकारामकाकाची बायको काकू.. कांबळे काकू.. स्वातीताई.. मनीषा ताई.. गणपतचाचा.. अबूबकर.. झरीनाचाची..
सगळ्या सगळ्या स्पर्शांमधून ज्या स्पर्शांची आठवण चेतवली जायची..
तो..
खुद्द स्वतःच्या आईचा स्पर्श..
त्या स्पर्शाच्या सावलीत कित्येक वर्षांनी आज झोपायचा प्रयत्न करत असलेला दिपू अन त्याची आई सुनंदा..
दुसरा शांत झोपलेला आहे असे समजून.. अजिबात हालचाल न करता..
अचानक मिळालेल्या सुखांना आठवत आठवत.. दोघेही रात्रभर जागेच होते..
कित्येक वर्षांनी त्याच खोलीत दिपू आपल्या आईबरोबर झोपला होता.
महुरवाडीत झालेली ती सकाळ अवर्णनीय होती. उगवता सूर्य पाहणे इतके मोठे सुख असते हे काजलला आयुष्यात पहिल्यांदाच समजले. कितीतरी वेळ ती भान हरपून सुर्याकडे अन दिपू भान हरपून किरणाच्या वाढत्या तीव्रतेमुळे तिच्या गोर्यापान चेहर्याच्या बदलणार्या छटांकडे पाहात होता.
पुन्हा सकाळी झालेली नजरानजर काजलला लाजवून गेली.
कौतुकाने माखलेली काजल आज वस्तीला गाणे म्हणून दाखवणार होती. हा कार्यक्रम सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत चालला.
गरम गरम नाश्ता झाल्यावर दिपू अचानक म्हणाला:
दिपू - चल मां.. निघतो हम लोगां..
खाड! खाडकन सगळा विरसच व्हावा तसे झाले..
सुनंदा - म्हंजी?
दिपू - चलते हय हम अब..
सुनंदा - किधर?
दिपू - ढाबेपे? काम तो हैच ना?
सुनंदा - तू.. .. तू .. रयनेको नय आया इधर??
दिपू - इधर आनेकाच हय रयनेको.. लेकिन और बडा होके.. अब .. ये काजलको बी पहुचाना हय..
दिपू निघताना पुन्हा खूप रडारड झाली. पुढच्या महिन्यात दोघांनी परत यायचं याचे वचन घेतल्यानंतरच त्यांना जाऊ दिले वस्तीने.
वेशीपर्यंत सगळी वस्ती अन टहेर्यापर्यंत मन्नू, सुनंदा अन काही जण आले होते. मात्र काजलच्या आजीला भेटू नका असे निक्षून सांगीतल्यामुळे सगळे तिथूनच परत गेले. काजल धावत घरी पोचली. तिला आजीची काळजी होती.
काजल - आजी.. कशी हाय?
आजी - म्येली आजी.. तू रंगढंग दाखीव अन फिर गावोगाव..
काजल - रागवू नको.. तूच भेजी ना मेरेको??
आजी - पसंद किया क्या ससूरने?
काजलने हळूच दिपूकडे पाहिलं! पुन्हा तिने लाजून मान फिरवली अन म्हणाली..
काजल - किया.. बस्तीमे भोत बडा पार्टी बी रख्खा था..
आजी - तो जाके येश्याको बोलदे.. अगले महिनेमे शादी बनाके डालनेका..
काजल - हा.. तू बी चल ढाबेपे..
आजी - अरे हाट.. मुर्गी काटता तुम लोगां.. मी पाय नय ठिवणार.. हा फुटाणा तुला घेऊन चाललाय का?
काजल - आजी.. त्याला कुछबी मत बोल..
आजी - कायको?
काजल - इसीके पिताजीने पसंद किया हय तेरे काजल को.. वो कदमने नय.
आजी त्याही परिस्थितीत खाडकन उठून बसली.
आजी - क्या बोली?
काजलने मान खाली घालून होकारार्थी हलवली. आजीने दिपूकडे पाहिल्यावर त्याने घाबरून मान खाली घातली. आता बहुधा या म्हातारीचा मार खावा लागणार..
आजी - कलसेच मेरे मनमे था.. इतना अच्छा लडका हय.. उसमे क्या जातपात देखनेका.. मेरेको मालूम हय महुरवाडीके सब वाठारे धनगर हय करके.. लेकिन तुम दोनो एक दुसरेको इतके जपत व्हतात.. मलाबी कालच वाटलं.. ह्यं बाहुलं ह्या बाहुलीला चांगलं शोभंल..
काजलने आजीच्या मांडीवर डोके ठेवले. आजीने दिपूलाही जवळ बोलावले. तो जवळ गेल्यावर त्याच्या हातावर सव्वा पाच रुपये ठेवले. जावयाचा मान म्हणून! त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
आजी - जप बरं बाळा माझ्या पोरीला?? फुलासारखी हय.. हं??
त्या दिवशी अडीच वाजता चांदवडच्या बसमधे बसताना काजल अन दिपू एकमेकांकडे बघतच नव्हते. मनात मात्र दोघांच्याही नुसती कारंजी उडत होती.
आणि चांदवडला तीन ते सहा वाट पाहूनही बाळ्या आलेला नव्हता. मग आठवले. तो सहा वाजताच येणार होता. पण...
सात वाजले तरीही आला नव्हता..
शेवटी दोघांनी निर्णय घेतला. शेअर जीप बघून आपणच आपले परत निघून जाऊ ढाब्यावर!
साडे आठ, नऊला दोघेही ढाब्यावर पोचले तेव्हा काजलने दिपूला सांगीतले होते.
बाबा जर टहेर्याला गेले अन आजी त्यांना काही म्हणाली तुझ्याबद्दल तर ठीक.. नाहीतर आपण इतक्यात काही बोलायचे नाही. कदमांनी नापसंत केले म्हणून सांगायचं! ...
आणि बाळ्या नसताना तुम्ही कसे काय आलात अन बाळ्या कुठे आहे या प्रश्नाने गणपतचाचाने दोघांनाही भंडावून सोडले होते..
आम्हाला काहीच माहीत नाही.. दोघांचेही एकच उत्तर होते..
ढाबा तुफान वेगात चालला होता..
सीमाकाकूला अन यशवंतला काजलला नापसंत केल्याचे ऐकून आश्चर्य वाटले होते. दिड वाजता सगळे जेवले...
झोपले..
आणि पहाटे तीन वाजता पोलिस व्हॅन कर्कश आवाज करत ढाब्यावर आली..
सगळे खाडखाड जागे झाले.. सगळे म्हणजे सगळे..
आणि त्यावेळेस गणपतचाचाला पोलीस विचारत होते..
.. ये.. बाळू इधर काम करता हय क्या?? उसकी मौसेरे भाईसे मारामारी होगयी.. अॅरेस्ट किया हम लोग उसको.. आपको चांदवड चलना पडेंगा.. भोत मारा उसने भाईको.. वो तो मरेंगाच कल परसो.. लेकिन उसने जवाब दिया.. बोला बाळू दो बच्चोंको भगाके चांदवड लाया था.. आप जानते हय क्या वो बच्चोंको?
सगळा स्टाफ वळून वळून काजल अन दिपूकडे बघत असताना दिपू जरी काळवंडलेला असला तरीही...
काजलने उत्तर दिले होते..
हमहीच हय वो दोनो.. हमको भगाके नय.. हमारे मर्जीसेच लेगया था बाळूभैय्या.. है ना मा?.. उलटा वहीच कयरहा था.. के उसको उसका भाई भोत मारनेवाला हय.. तुम लोगां जल्दी टहेरेको निकलो..
आपली भावी बायको अस्सल थापा मारू शकते हा धक्का दीपक अण्णा वाठारे यांच्यासाठी नवीन होता....
या भागाने खरच डोळ्यात पाणी
या भागाने खरच डोळ्यात पाणी आणले . फारच छान लिहला आहे..अन .. दिपुचे आजीने बारसेच घातले . किती नावे एकदम मिळाली बिचार्याला ..................
सही....मस्त...चाबुक....लाजवाब
सही....मस्त...चाबुक....लाजवाब...अप्रतिम..सुरेख....लगे रहो...
लग्नापर्यंत पोहोचवण्यासाठी
लग्नापर्यंत पोहोचवण्यासाठी गाडी एवढे दिवस थांबून ठेवलेली काय? छाने हा पण भाग. काजलची आज्जी आवडली ब्वॉ
नुसती धमाल..मजा आली
नुसती धमाल..मजा आली वाचायला... प्रविण आनि रोहितला अनुमोदन...
खूप मजा आली वाचताना. आजीचं
खूप मजा आली वाचताना. आजीचं पात्र छानच जमलंय. भाषेचा बाज चांगला सांभाळंलाय. लगे रहो !
हो ना! भारीच मज्जा आणली
हो ना! भारीच मज्जा आणली आज्जीने
दिवसभर उपासमार झाल्यावर एकदम मेजवानी मिळावी असं झालं आज...
एकदम खुसखुशीत, चमचमीत, गोड...सगळं आवडतं जेवण मिळालं आज
व्वा!! कधी पासुन वाट बघत होते
व्वा!! कधी पासुन वाट बघत होते पुढच्या भागाची..खुप खुप खुप मजा आली..आता पुढचा भागही लवकर येऊदे..
आज्जी एकदम भन्नाट जमली आहे!
आज्जी एकदम भन्नाट जमली आहे! तुम्ही प्रत्येक भागाचा अंत असा करता की पुढचा भाग कधी येतोय याची आतुरतेने वाट बघत असतात सगळे...
चला लवकर अक्षता टाकु या
चला लवकर अक्षता टाकु या आता...
वीकान्त सार्तकी लागला ,
वीकान्त सार्तकी लागला , नाहीतर कीति वेळा चेक करुन झाले केव्हा पोष्ट होते .
छानच आहे हा भाग पण. आजी फक्कड गावरानी.
तुमच्या लिखाणाचे अॅडिक्शन
तुमच्या लिखाणाचे अॅडिक्शन झाले आहे... आता वेड्यासारखी येऊन १० वेळा नवीन भाग चेक करणं चालू आहे...पुढचा भाग कधी पोस्ट करणार ???
तुमच्या लिखाणाचे अॅडिक्शन
तुमच्या लिखाणाचे अॅडिक्शन झाले आहे... आता वेड्यासारखी येऊन १० वेळा नवीन भाग चेक करणं चालू आहे...पुढचा भाग कधी पोस्ट करणार ???
+१ सानी ला अनुमोदन बेफिकीर शेट टाका राव पटापट पुढिल भाग मस्त सुसाट चालु आहे कथा
तुमच्या लिखाणाचे अॅडिक्शन
तुमच्या लिखाणाचे अॅडिक्शन झाले आहे... आता वेड्यासारखी येऊन १० वेळा नवीन भाग चेक करणं चालू आहे...पुढचा भाग कधी पोस्ट करणार ???
सगळ्याना अनुमोदन
किती उशिर करणार अजून?
नायतर ई मेल नोटीफीकेशन सेट करावे लागेल कथा पोस्ट झाली की.
सानी सारखी सर्वाची अवस्था
सानी सारखी सर्वाची अवस्था झाली आहे . तर पुढचा भाग..............................!!!!!!!!!!!!!!!
सानी सारखी सर्वाची अवस्था
सानी सारखी सर्वाची अवस्था झाली आहे . तर पुढचा भाग..............................!!!!!!!!!!!!!!!
तुमच्या लिखाणाचे अॅडिक्शन
तुमच्या लिखाणाचे अॅडिक्शन झाले आहे... आता वेड्यासारखी येऊन १० वेळा नवीन भाग चेक करणं चालू आहे...पुढचा भाग कधी पोस्ट करणार ??? >>>>
अनुमोदन. लवकर येऊ द्या पुढचा भाग...!!!
बेफिकीर बन्धू आहात कोठे?
बेफिकीर बन्धू
आहात कोठे?
केमोथेरपी
केमोथेरपी
म्हट्ले जो पर्यन्त पुढ्चा भाग
म्हट्ले जो पर्यन्त पुढ्चा भाग पोष्ट करत नाहित तो पर्यन्त सगळे भाग Notepad मध्ये कोपी करावे
वाचुन लयी आनान्द होतो बघा !
लव्कर येवुद्या पुड्चा भाग
ओह्... क्षमस्व !!! लक्षात
ओह्...
क्षमस्व !!!
लक्षात राहीले नव्हते!!!
आरामात येऊ द्या.... तुमच्या सवडीनुसार
आजी मस्त जमलीये..
आजी मस्त जमलीये..
खरंच क्षमस्व! हा विचारच आला
खरंच क्षमस्व! हा विचारच आला नाही मनात... जमेल तेव्हा, जमेल तसे सवडीने लिहा. काळजी घ्या, स्वतःची आणि आईंची सुद्धा.
वाचुन लयी आनान्द होतो बघा
वाचुन लयी आनान्द होतो बघा !
मलाबी लयी आवडतं बगा बेफिकीर राव तुमचं ल्येखन का काय त्ये !!!
काय रंगवली आहे आजी! भन्नाट!
काय रंगवली आहे आजी! भन्नाट! काहीतरी चांगले वाचावे म्हणून ही सिरीज शोधून वाचू लागलो. मधे कधीतरी एक दोन भाग फक्त वाचले होते. आता सुरूवातीपासून वाचतोय. सगळी वाचून एकदमच प्रतिक्रिया देणार होतो पण यातली आजी असली खत्रा आहे की पुढे विसरू नये म्हणून आत्ताच लिहीले.
जबरी रंगली आहे ही सिरीज. वाचतोय.