नयना

Submitted by sunil patkar on 10 May, 2010 - 12:14

नयना

एका लाखाच्या त्या छोट्याशा गाडीने टि.व्ही.चा छोटा पडदा अगदी दिवसभर व्यापून टाकला होता.ती कशी असेल ? कशी दिसेल ? तिचा रंग काय असेल ? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार आणि त्यांची उत्तरे यांनी हा छोटा पडदा व्यापून गेला होता.आणि त्याही पेक्षा, कित्येक पटीने आँफिसमधल्या माझ्या सारख्या अनेकांच्या मनाचे पडदे तिने काबीज केले होते.दिवसभर लोकल मध्ये लोंबकळणारे,बसच्या रांगेत तासनतास उभे राहून प्रवास करणारे , गळ्याला टिफिन अडकवून आँफिसला पळणारे माझ्यासारखे अनेकजण ,त्यांची अनेक वर्षे उराशी असणारी स्वप्नं या गाडीने पुन्हा जिवंत केली होती.बाकी आम्ही मध्यमवर्गीय... ! स्वप्नांवर जगणारे ,स्वप्नातच रममाण होणारे !
स्वप्नात आम्ही कधी तेंडूलकर होतो आणि सामना जिंकून देतो. कधी आम्ही अमिताभ होतो आणि ‘आज भी मै फेके हुए पैसे नही उठाता ’असे म्हणत स्वाभिमानी होतो.एखादी सुंदर तरूणी आमच्या प्रेमात पडते तिला आम्ही ताज मध्ये जेवायला.स्वप्नात !.नाहीतर माँरिशीसच्या एका रमणीय बेटावर निवांत झोपून ज्यूस पितो हे देखिल स्वप्नातच ! पण आम्हा मध्यमवर्गीयांना स्वप्नपूर्तीचा आनंद मिळवून देणाचं काम केलं ते नितीन छ्ड्डाने ! छोट्या का होईना पण,स्वत:च्या कारमध्ये आपल्या पत्नीमुलांसह बसण्याचं भाग्य मिळणार होतं.खरंतर ही कल्पनाही पुढील काही दिवस सुखात जगण्यासाठी आम्हाला पुरेशी होती.तसा माझा संबंध लहानपणीच काय तो गाड्यांशी आला होता.काका मामांनी आणून दिलेल्या जत्रेतील त्या छोट्या गाड्या फिरवता-फिरवता मी लहानाचा मोठा झालो.अगदी माझ्यासारख्या इतर मध्यमवर्गीयांसारखा !.पण ,टि.व्ही वर अनेक दिवस दिसणार्‍या त्या छोट्याशा गाडीने लहानपणीची आवड पुन्हा मनात निर्माण केली होती.तिच नावही अगदी सुंदर होतं ‘ नयना ’
खरंच !नितीन छ्ड्डाने आम्हा मध्यमवर्गीयांना गाडीत बसविण्याचा विचार जर केला नसता तर आँफिस बाहेर उभ्या असलेल्या रंगीबेरंगी गाड्या पाहण्यात आमचं उभं आयुष्य गेलं असतं.!
गेले दोन दिवस टि.व्ही वरच्या त्या बातम्या मीही पहात होतो.एकदाची पिवळ्या रंगाची नयना मला दिसली.पहिल्या नजरेतच मी तिच्या प्रेमात पडलो आणि मनाशी पक्का निश्चय झाला , नयनाला घरी आणायची .गाडी अगदी रोडवर येईपर्यंत दिडलाख गेले तरी चालतील पण, नयना दारात उभी राहिलीच पाहीजे ! गाडीत बसण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे !
तसं लहाणपणापासूनच मला गाड्यांचं खूप आकर्षण. माझ्या एका मित्राच्या वडिलांची त्या काळी गाडी होती.त्या गाडीतून मित्राबरोबर शाळेत जाण्याचा योग कधी - कधी यायचा.सुट्टीत त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या बंद गाडीत आम्ही खेळतही असू.माझ्या वह्यांमध्येही गाड्यांचे फोटो असायचेत्या वेळी गाड्या कमी होत्या. पण काँलेजला गेल्यावर ही आवड वाढली.मी चारचाकी चालवायला शिकलो.आयुष्यात एकदा तरी गाडी घ्यायची,त्यातून मनसोक्त फिरायचं आणि वाटलं तर नंतर विकून टाकायची.पण,गाडी घ्यायचीच ! गाडी घेण्याची इच्छा अजूनही कायम होती.परिस्थिमुळे शिक्षण अर्धवट राहिले.सुदैवाने मुंबईत चांगली नोकरी मिळाली.माझ्या कार्यालयात माझ्या सारखे अनेक जण होते नी ते सुद्धा ही लाखाची गाडी घेण्यासाठी उत्सुक होते.
आमच्या कार्यालयात ही नयना एक चर्चेचा विषय झाली होती.
देसाई म्हणाला "बापट,बायकोला कालच बजावलय आपल्याला कुठलंही व्यसन नाही,आता तु विघ्न आणू नकोस ,मी गाडी घेणार आहे."
तर सुर्वे कार्यालयामध्ये पहिली गाडी आपली असणार हा निश्चयच करून आला होता.
"पण,त्याने प्रदुषण हूणार आहे .पार्किंगची समस्या निर्माण होणार आहे " गोडबोले मँडम फाईलमध्ये डोकावत म्हणाल्या.त्यांच्या या वाक्यावर माझा पारा चढला.
" कसलं आलयं प्रदुषण ? बाकीच्या गाड्यांनी काय प्रदुषण होत नाही.गरीबांची गाडी आली ना, मग पार्किंग काय , प्रदुषण काय ? सारं काही दिसेल .हे श्रीमंतांचे शोध , त्यांनीच फक्त गाड्या चालवायच्या काय ?"माझा राग पाहून सारे थोडावेळ गप्प राहिले.
" हे अगदी बरोबर बोललात आण्णा " शिंदे शिपाई ओरडला.
आँफिस,ट्रेन, बस, सोसायटीमध्ये या एक लाखाच्या गाडीची चर्चा रंगत होती.घरीही माझ्या डोक्यातून हा विषय जाईना.
"हे बघ काय लिहिलयं पेपरात,म्हणे या गाडीचा आवाज मोठा आहे" एवढ्या मोठ्या पेपरात माझं लक्ष त्याच बातमीकडे गेलं.
"काय झालं मोठा आवाज असेल तर ? ट्रक ,डंपरच्या नसतो मोठा आवाज "माझ्या या बडबडीकडे बायको शांतपणे पहात होती.माझा त्रागा पाहून ती म्हणाली "तो गाडीचा विषय सोडून इतर विषयांवर बोलाल का तुम्ही.घर नाही ,आँफिस नाही बघावं तेव्हा गाडी गाडीन गाडी.थोडं मन शांत ठेवा ."
बायकोचा आवाज ऐकून मी थोडा शांत बसलो .थोड्यावेळानं मी तिच्या जवळ बसलो.
" तुला काय वाटतं आपण नयना घ्यावी ?माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं स्वत:च्या गाडीत बसायचं " माझा चेहरा पाहून बायको हसली."कैवल्य पण करत नव्हता कधी असा हट्ट.तसं तुम्ही इतके वर्षात स्वत:साठी काहीच केलं नाहीत. तुम्हाला आवडली आहे ना, घ्या गाडी. पण,पैशाचं काय?"
"आहेत पैसे. रिमाचं लग्न झालयं , ती जबाबदारी आता नाही ,ब्लाँकचे हप्ते संपलेत .रिमाच्या लग्नाला अपेक्षेपेक्षा कमी खर्च आला. मी पैसे काढून ठेवलेत बाजूला ,आपली ओढाताण होणार नाही."माझ्या बोलण्यावर ती सुखावली.माझ्या मनाची तळमळ तिला कळली होती.
" हे बघा, आता गाडी घ्यायची नक्की झालयं.यापुढे घरी ,बाहेर ,टि.व्ही वर गाडीचा विषय बंद.बुकिंग सुरू होईल तेव्हाच या विषयावर बोलायचं,समजलं ?"बायकोने हसतहसतच मला दम दिला.
त्यानंतर गाडीचा विषय आमच्या घरी क्वचितच निघे.दरम्यान गाडीसाठी लागणारे दीड लाख रुपये मी वेगळे काढून ठेवले. माझी नोकरी ,त्यात ब्लाँकचा हप्ता मुलांची शिक्षण ,प्रपंचाच्या या रगाड्यात गाडी घेण्याचा विषय कधिच मागे पडला होता..पण आता सारं स्थिरावलं होतं मुलगा इंजिनिअर झाल्यावर अंधेरीच्या एका कंपनीमध्ये नोकरीला लागला होता.भावाची मुले स्थिरावल्याने गावीही पैसे पाठविण्याची चिंता नव्हती.कैवल्य नोकरीला लागल्याने माझाही प्रापंचिक भार कमी झाला होता.त्याच्या इतर मित्रांप्रमाणे तोही अमेरिकेला जाण्याच्या मन:स्थितीत होता.आम्ही गावाहून तालुक्याला ,तालुक्याहून मुंबईत आलो.आताची पिढी मुंबईतून अमेरिकेला जाण्याआठी उत्सुक आहे.नेटवर बसून कैवल्यचे काहीनकाही सुरू असायचे.परदेशी नोकरीसाठी नेटवरून तो बायोडेटा पाठवित असे.त्यांने घरी न सांगताच पासपोर्टही काढला होता. पासपोर्ट आल्यानंतर आम्हाला कळलं आमचे चिरंजिव परदेश गमनाची तयारी करत आहेत ! एक दिवस आपला मुलगा सातासमुद्रा पलिकडे जाणार हे मी माझ्या मनाला समजावलं होतं.आँफिसमधील सहकारी म्हणायचेही "बापट ,रिटार्यमेंट्नंतर अमेरिकेत जाण्याचा योग आहे तुझ्या नशिबात." आणि माझी मान अभिमानाने उंचावायची.
बरेच दिवस मागे पडलेला नयनाचा विषय पुन्हा अचनक चर्चेत आला तो नयना शोरुमला आल्याने ! ‘नयना शोरुमला दाखल ’ अशा बातम्या वृत्तपत्रात झळकल्या आणि गाड्यांची शोरुम गर्दी खेचू लागली.फक्त एक लाख लोकांनाच नयना मिळणार म्हणून माझ्या सारखे अनेक जण हिरमूसले.शेवटी इथेही नशिबाचा भाग होताच.बायकोला नेऊन नयना दाखविली.तिला गाडी आवडली.चांगला गुरुवार पाहून ३ हजार रुपये भरून नयना बुक केली.माझ्या आयुष्यातील तो एक आनंदाचा क्षण होता.पण त्या बरोबर एक काळजीही होती एक लाख लोकांत आपला नंबर लागेल ना ?.
पण , बायकोने दिलासा दिला ".इतकी वर्षे गाडीच स्वप्न पाहताय, आपल्याला गाडी नक्की मिळेल."
बुकिंगनंतर काही दिवस पिवळ्या रंगाची ती इवलिशी नयना मला डोळ्यासमोर सारखी दिसत असे.सहा महिन्यात नयना आपल्याला खरेदी करावी लागेल याचा अंदाज बांधून मी पैशाचे नियोजन केले होते .
पावसाळ्यातील चार महिने बघताबघता निघून गेले आम्ही गाडी बुकिंग केल्याची बातमी सर्व नातेवाईकांत वार्‍यासारखी पसरली होती.
अन एक दिवस कैवल्यने घरी बाँम्ब्च टाकला."पप्पा ,मला जाँब मिळतोय यु.एसला ,काय करू ?"त्याच्या या वाक्यावर मी आणि पत्नी त्याच्याकडे पहातच बसलो.
" सकाळी सकाळी गंमत करू नको कैवल्य" त्याच्या आईने त्याला सुनावलं.
"गंमत नाही करत मी खरंच मला जाँब मिळतोय ."
त्याच्या वाक्याने आमचे चेहरे आनंदाने फुलले.या आनंदामागे थोडं दु:खही दाटलेले होते.
" काय करू काय विचारतोस ?जायचं ."
"पप्पा, जास्त नाही तीन-चार वर्षे तिकडे जाँब करून इकडे येईन." आमची मन:स्थिती कैवल्यला कळली असावी म्हणूनच तो असं बोलला. त्याच्या बोलण्यानं मला दिलासा मिळाला.
" काय जाँब आहे ?"
"पप्पा, उद्या इंटरव्ह्यू आहे फोर्टला,मोठी कंपनी आहे.त्यानंतर सर्व काही ठरेल."
" बेस्ट लक ,तू जा.फक्त सर्व माहिती नीट घेऊन ठेव."
" त्याची काळजी करू नका ,फक्त मम्मीला समजावा."
" नक्की ,ते तू माझ्यावर सोड "मी आत्मविश्वासानं सांगितलं.
कैवल्यला परदेशात नोकरी मिळणार या कल्पनेने माझी छाती अभिमानाने फुलून आली होती.त्याच्या आईला मात्र वाईट वाटलं होतं.आत्तापर्यंत शेजारीपाजारी आपला नातेवाईक अमेरिकेत असल्याच्या फुशारक्या मारायचे.आता मीही फुशारक्या मारायला तयार झालो होतो.
कैवल्यचा इंटरव्ह्यू अतिशय सुंदर झाला.आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला यु.एस.मध्ये जाँब निश्चित झाला.पगारही भलाभक्कम होता.इतर सोयी सवलतींची तर सरबत्ती होती.परंतु तरिही कैवल्य नाराज होता.मोठ्या उत्साहासाने इंटरव्ह्यूला गेलेल्या कैवल्यचा उत्साह मावळलेला दिसत होता.शेवटी न राहवून मी त्याला विचारलं.
" का रे नाराज तू ? एवढा चांगला जाँब आहे ना ?"
"पप्पा, जाँब चांगला आहे.तिकडे गेल्यावर पैसेही खूप मिळतील पण तिथे जाण्यासाठी कमीतकमी दोन लाख रूपयांची गरज आहे.आणि एवढे पैसे म्हणजे ?...."हताश झालेला कैवल्य पुढे काहीच बोलला नाही.शेवटी मी त्याची समजूत काढली.
"अरे, पैसे लागणारच ,पेरल्या शिवाय थोडंच उगवणार.आणि पैसे काय फुकट जाणार आहेत.हे बघ पैशांची तू काळजी करु नकोस.तयारीला लाग ."
"पण ,पप्पा...."
" आता म्हटलं ना तयारीला लाग ." त्याच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो. आणि कैवल्यचा चेहरा हास्याने उजळला.
कैवल्य परदेशी जाणार म्हणून ही थोडी दु:खीच होती.परंतु मी तिला समजावलं. ‘ मुलाच्या भवितव्याच्या आड भावना आणू नकोस ’असं सांगितल्यावर ती थोडी सावरली होती.एक दिवस तिने मला अचानक विचारलं " पैशाचं काय करणार आहात तुम्ही ?"
तिच्या वाक्यावर मी हसलो.
"हसून प्रश्न सुटत नाहीत." ती म्हणाली.
’ अगं ,तू असं विचारतेस की सगळे पैसे संपले."
"तसं नाही पण तयारी तर करायली हवी."
"बँन्केत आहेत ,काही एफ़.डी.मोडायला लागतील.आज उद्या त्या मोडीन ." माझ्या वाक्यावर तिला थोडं बर वाटलं.
" आणि गाडीचं काय करणार ?समजा नंबर लागला तर ?"तिने माझ्या वर्मावरच बोट ठेवलं.जो विषय मी टाळतं होतो तो तिनं अचूक काढला.
"गाडीचं काय ?नंतर बघू.रिटायर्ड झाल्यावर घेऊ."
" अहो, पण तुमचं स्वप्न ?"
" मुलांच्या स्वप्नांपुढे आपली स्वप्ने काय महत्वाची ?तसं त्या गाडीचा विषयही मागे पडलाय.मी गाडीसाठी ठेवलेली दिड लाख काढतो.थोडी भर करू. कैवल्यला चांगली संधी आलेय.ती वाया जाता कामा नये."
बायको माझ्याकडे बघतच बसली.
"बघतेस काय अशी, आपण मध्यमवर्गीय , आपल प्रपंच हेच आपलं सुख, मुलांच्या स्वप्नांपुढे माझी स्वप्ने महत्वाची असतील ,तर मी स्वार्थी नाही का? " माझ्या मनातल्या भावना तिला कळल्या होत्या.
आठ-दहा दिवसातच मी पैशाचा बंदोबस्त केला.नयनासाठी ठेवलेले पैसे आणि एफ़.डी.मोडून मी सर्व पैसे घरी आणले.आणि कैवल्यची जाण्याची सर्व तयारी पूर्ण झाली.एफ़.डी.मोडताना एक लाखाची ती देखणी पिवळी गाडी माझ्या डोळ्यासमोर येत होती.गेले चाळीस वर्षे पाहात आलेलं स्वप्न हवेत विरून गेलं .ते पूर्ण होईल की नाही हे सांगता येणंही कठीण होतं.
पण , त्याचवेळी एक नवीन स्वप्न डोळ्यात आकार घेत होतं...माझ्या मुलाच्या २५ लाखाच्या गाडीत बसण्याचं !
.......................................................समाप्त........................................................
प्रपंच दिवाळी अंक २००९ मध्ये माझ्या या कथेची ६५० कथांमधून उत्कृष्ट कथा म्हणून निवड झाली.

गुलमोहर: 

छान आहे. मध्यम वर्गीय आई वडिलांची कितीतरी स्वप्न्न अशीच उडून जातात नाही का? पण मुलं मार्गी लागताहेत याचा आनंदही खूप मोठ असतो.

कथा चांगली आहे पण अमेरिकेतल्या नोकरीसाठी दोन लाख भरणे?
एवढे पैसे ऑफिशियली किंवा टेबलाखालून नोकरीसाठी भरायला लागण्यासाठी ती सरकारी नोकरी निश्चितच नाही.
आईवडिलांना जराशीही शंका येत नाही? थोडे आश्चर्य वाटले.
परदेशातल्या नोकरीचे अमिष दाखवून लाखो रूपयांना गंडा घातल्या जाण्याच्या बातम्या भरपूर ऐकतो आपण. त्याची आठवण झाली. बघा विचार करून.