घण घण घण्..
हातोडीचे घाव बसत होते. एक दोन तीन चार पाच कामगार होते. काळेकभिन्न कामगार. एखाद्या यमदूतासारखे. दुपारच्या बाराचं ऊन तापत होतं.. डांबरी रस्ता चरचरीत तापला होता.. बिनाचपलांचे त्याचे पाय पोळत होते. पण समोर घाव चालूच होते. त्याच्या बंगल्यावर.
घण घण घण...
ती श्यामलची खिडकी होती. रोज संध्याकाळी तिथे बसून त्याची वाट पहायची. हसर्या, गोबर्या गालाची श्यामल. कुरळ्या केसाची, करवंदी डोळ्याची श्यामल. त्याच्यासारख्याच नजरेची श्यामल. सुभद्रेच्या रक्ताची श्यामल. मागच्याच वर्षी भेटून गेली . "मला तुला बाप म्हणायची लाज वाटते" असंच ओरडली होती ना त्याच्यावर.
कुणीतरी हलकेच पिसासारख्या आवाजात गुणगुणत होतं.. "नजर लागी राजा.. "
तो हसला. आजूबाजूला गर्दी जमली होती. आज अख्ख्या शहरात हाकाटी पिटवलीच होती. साळव्याचा बंगला तोडणार म्हणून. त्याच गर्दीतला तो पण एक ठिपका. बाकीचे गंमत बघायला आलेले. तो स्वतःचा बंगला तोडतानाचा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी म्हणून.
घण घण घण घण...
अजून श्यामलची खिडकीच तोडतायत. तोडू देत.. नाहीतरी आता श्यामल त्या खिडकीमधे बसणार नाही. त्याने आणलेल्या खाऊची वाट बघत. त्याने लाल वाटाणे आणले नाही की गाल फुगवून रूसणार नाही.. आणि रूसली की झोपाळ्यावर जाऊन बसणार नाही... त्याची नजर झोपाळ्याकडे वळली. त्या तिकडे बंगल्याचा दुसर्या टोकाला होता तो झोपाळा. कधीकाळी तो लहानपणी त्याच्यावर खेळायचा. शेजारची माधू यायची त्याच्यासोबत खेळायला.
माधू.. घण घण घण घण.. परत घाव बसले. कुठे ते मात्र माहित नाही. त्याची आणि माधूची एकत्र अशी कितीतरी गुपितं होती. कुणाच्या घरात शेवया कधी बनवतात? कुणाच्या अंगणात वाळत घातलेले सांडगे पळवता येतात? काडेपेटीत ठेवलेली फुलपाखरं कधी उडून जातात? त्याच्या अंगणातल्या झाडाच्या कैर्या कधी खाल्ल्या तर खोबर्यासारख्या गोड असतात? माधूचे आजोबा झोपल्यावर बरोब्बर किती वेळाने घोरताना शिट्टी फुंकतात..ही आणि अशीच कधीतरी.. पुढे कधीतरी दोन तीन वर्षानी निघून गेली या गावातून. राहिली ती ही अशी कुणालाच न सांगता येण्यासारखी गुपितं. तो आणी त्याने कधीच कुणालाच न सांगितलेली गुपितं.
पुढे कित्येक वर्षानी सोनसळी पदर डोक्यावर घेऊन माधू बंगल्यामधे आली होती... भरपूर दागिन्यानी लगडलेली. तो बंगल्याच्या दाराशीच सिगरेट फुंकत बसला होता. त्याच्याकडे पाहून ती हसली ना हसली. आज्जीजवळ आईजवळ कितीतरी वेळ बोलत बसली होती. त्याने तिला ओळख पण दाखवली नाही.... काय गरज.. कोण होती ती? आपल्या माळ्याची नात! ती गेल्यावर आई कितीतरी वेळ तिचं गुणगान गात बसली होती!!! एके काळी आईला हीच माधू घरात आलेली आवडायची नाही, तिने इकडे तिकडे शिवलेलं चालायचं नाही आणि आता तीच माधू देवघरामधे जाऊन आईकडून ओटी भरवून घेत होती.
आता थोड्या वेळाने ते देवघर राहणार नाही. आधी श्यामलची रूम फोडणार.
घण घण घण घण...
मग त्याची खोली, सुभद्रेची खोली. आज्जीची खोली. सामानाची खोली. आईबाबाची खोली, झोपाळ्याची पडवी. तवर पहिला मजला पूर्ण ओसाड झालेला असेल. दगड, माती, चुना, सिमेंट.
सर्वत्र पसरलेलं असेल. त्यावर ते पाच कामगार कारकार पाय देत फिरतील. खालच्या मजल्यात स्वयंपाकघर, न्हाणीघर, कोठीची खोली, माजघर, बाहेरची पडवी आणि समईच्या ज्योतीमधे अंधारलेलं देवघर. देवघरात प्रवेश फक्त ठराविक व्यक्तीनाच. आता हातोडीचे पहारीचे घाव बसतील आणि देव नसलेलं देवघर मोडून जाईल. तिथेच कामगार थकून भागून लोळत पडतील. एखादी माचिस पेटवतील आणि निरांजनाऐवजी बिडी पेटवतील.
आणि तो तिथेच रस्त्यावर शांत उभा असेल. या घराचा मालक नसल्यासारखा. नसल्यासारखा काय... तो नव्हताच आता या बंगल्याचा मालक.
तीन वर्षापूर्वी त्याने घराची कागदपत्रं सुभद्रेच्या नावावर केली होती. तिच्या कटकटीला कंटाळून. एकदा बंगला तिच्या नावावर झाला तशी ती शांत झाली.. वरकरणी तरी.
आजोबानी तीस वर्षापूर्वी बांधलेला हा बंगला. आजही शहरात याच्यासारखा दुसरा बंगला नव्हता. प्रशस्त, हवेशीर, मोठठाच्या मोठ्ठा. तो शाळेत असताना त्याचे मित्र त्याला कायम "मजा आहे यार तुझी.. राजवाड्यातच राहतोस जणू!!" असं म्हणायचे. त्याला आधी समजायचंच नाही की असं का म्हणतात.. त्याला वाटायचं सर्वचजण असल्या घरातून राहत असतील. त्याच्या इतर मित्राची घरे कधीतरी पाहिली आणि मग समजलं.. पाठच्या पडवीत असलेली माधूची खोली कितीतरी मोठी होती!!! तेव्हापासून ते मित्र त्याला आवडेनासे झाले. ज्याच्याजवळ त्याच्यासारखा बंगला नाही.. तो त्याचा मित्र कसा होईल?
वास्तविक पाहता तो या बंगल्याचा एकुलता एक मालक. बाबा खूप लहान असताना आजोबा गेले. नंतर तो एकुलता एकच. बाबाचा भलामोठ ट्रान्स्पोर्टचा बिझनेस होता. फक्त तोच त्याने जरी संभाळला असता तरी तो सुखात मेला असता. पण नाही... एका कचकचीत अमावस्येला त्याला सुभद्रा भेटली होती आणि त्याचं अख्खं आयुष्य अभद्र करून गेली होती.
तीच सुभद्रा.. त्याच्या कानात मलमली आवाजात गुणगुणणारी... "नजर लागी राजा तोरे बंगले पे.."
===============================================
सुभद्रा...त्याच्या आयुष्यात आलेलं वादळ. प्रेमाचं वादळ. वासनेचं वादळ. एखाद्या वेडाचं वादळ. ती आली आणि सालं सगळंच बदलून गेलं. कोण कुठची पोरगी ती. रोज बंगल्यावरून चालत जाताना दिसायची. तीच मळकटलेली साडी. तोच वेणीचा लांब शेपटा आणि तीच भेदक नजर.
रोज जाताना हा बंगला बघायची. स्वतःशीच हसायची. रोज तो झोपाळ्यावर बसून तिला बघायचा. आजोबानी बंगला बांधला तेव्हा अगदी आडरानात होता. अजूबाजूला झाडंच झाडं.. तो मोठा होत गेला आणी शहर वाढत गेलं. आता बंगला भर रस्त्यावर होता. आणी त्या रस्त्यावरून अशाच दुपारच्या उन्हात सुभद्रा जायची.
त्याने नजर इकडे तिकडे वळवली. सुभद्रा आज इथे असेल अशी अपेक्षा त्याची बिल्कुल नव्हती. थोड्याच दिवसापूर्वी तिने एक फ्लॅट घेतला होता. आलिशान फ्लॅट. पार्किंगसकट. १४०० स्क्वे. फुटाचा... हा बंगला विकून आलेल्या पैशाचा फ्लॅट!!! त्याला भर दुपारी बारा वाजता रस्त्यावर उभा करून त्याच्या बंगल्याची छकलं करून आलेला पैसा.
पैसाच हवा होता ना सुभद्रेला. मग त्याने तरी काय कमी दिला होता का??? दिवसाचं उत्पन्न त्याचं पाच आकडी असायचं. पन तेव्हढं सुभद्रेला पुरेसं नव्हतं.. तिला अजून हवं होतं. सगळं तिला एकटीला हवं होतं. तिला तो नको हवा होता. बंगला हवा होता.. "नजर लागी राजा..."
आधी आधी तो भुरळला. मग थोडा वाहवला. श्यामल झाल्यावर खुश झाला. मग तिची कटकट सुरू झाली.
त्याने तिला समजावलं. खूप समजावलं. पण तिचा हट्ट कायम होता. तो चिडला. वैतागला. त्याने तिला मारहाण केली. खूप खूप समजावलं. पण तिचा हट्ट कायम होता... तिला बंगला विकायचाच होता!!!
त्याच्या आयुष्याचाच एक भाग असलेला बंगला तिला विकायचाच होता. कोणतरी मसणा बिल्डर तिला करोडो रूपये देणार होता. ते पैसे घेऊन तिला ऐश करायची होती. जग फिरायचं होतं. त्याच्या रोज रोजच्या धंद्याच्या कटकटीना ती कंटाळली होती.
तो रोज दारू प्यायला लागला. आधी आज्जी गेली आणि मग आई! त्याला जमिनीशी बांधून ठेवणारे दोन सांधेच निखळले. तो एकटा पडला... नको तितका एकटा. सुभद्रेच्या सोबत असून एकटा. ती होतीच की त्याला सांगत.."नजर लागी राजा तोरे बंगलेपर"
शेवटी बंगला विकायचीच पाळी आली. काय करणार?? धंदा बुडीत निघायची वेळ आली होती. त्या दिवशी तो खूप रडला. खूप खूप खूप रडला. अगदी बाबा मारायचे तेव्हा तस्साच रडला. आत्ताच्या आत्ता जायचं आणि आपलं आयुष्य संपवायचं.. त्याने मनोमन ठरवलं. झोपाळ्याचा आकडा त्याला खुणवत होता. कोठीच्या खोलीत रस्सी होतीच. देवघरात दार लावून बसला.
बाहेर सुभद्रा अत्यानंदाने खुशीत होती. आता लवकरच बंगला विकणार. तो आतमधे त्याच्या आत्महत्येची चिठ्ठी लिहत होता. लिहिता लिहिता त्याचा हात थबकला. डोळ्यातला एक अश्रू नकळत त्याच्या मनगटावर येऊन पडला.
आणि तो बदलला... "नजर लागी राजा...."
कसल्यातरी वेड्या ऊर्मीने धावत तो बंगल्याच्या बाहेर आला.. दूर दूर वर त्याची नजर जात होती. आकाश मोकळं होतं. जमीन मोकळी होती. वारा त्याच्या तोडावर आदळत होता. ढग इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत होते. त्याच्या मनगटात ताकद होती.
त्याने बंगला सुभद्रेच्या नावावर केला. तो शहर सोडून गेला. कुठे गेला कुणालाच सांगितलं नाही. अधून मधून यायचा इकडे. गावातून चक्कर टाकायचा. काहीबाही माहिती मिळवायचा. त्याने कागदपत्रात खूप किचकटगिरी करून ठेवली होती. सुभद्रेला बंगला विकताना धावपळ करावी लागली. "तुझा बाप एक नंबरचा नालायक होता, मला सोडून निघून गेला" हे श्यामलला शिकवावं लागलं. खूप कष्ट पडले तिला हे सर्व करताना. पण त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. तो आता स्वतंत्र होता. त्याने बरेच उद्योग केले. काही चांगले काही वाईट. पैसाच कमवायचा हा उद्देश ठेवल्यावर चांगलं वाईट ठरवणार कोण?
शेवटी बंगला विकला गेला. "कुणाच्या काही हरकत असल्यास" कोर्टात यायचं निमंत्रण त्याने वाचलं होतं. आज बंगला फोडतील. उद्या इथे भल्या मोठ्या पाच सहा मजली इमारती उभ्या राहतील. त्यामधे चिमणाचिमणीचे चिमुकले संसार उभे राहतील. काही आईबाबासारखे सुखाचे असतील. काही आज्जीआजोबासारखे क्षणाचे आणि काही त्याच्यासारखे दुर्दैवी.
घण घण घण घण.... बंगला फोडला गेला. श्यामलची खिडकी नाहीशी झाली. त्याने पुन्हा एकदा शेवटचं बंगल्याकडे पाहून घेतलं.
आणि मान वळवली. समोर रस्त्याच्या पलिकडे रिकामं माळरान होतं. त्या माळरानातला एक तुकडा त्याच्या नावावर नुकताच झाला होता.... . आणि तिथे त्याला त्याचा बंगला दिसत होता. तसाच मोठा, प्रशस्त खाकी रंगाचा आणि झोपाळ्याच्या पडवीचा. श्यामलची खिडकी नसलेला.
तो पाठी वळून त्या माळरानाकडे चालायला लागला. हसत. गुणगुणत. "नजर लागी राजा.....तोर बंगलेपर"
(समाप्त)
हम्म्म... चांगली चल्लिये..
हम्म्म... चांगली चल्लिये.. पुढे काय होतय याची उत्सुकता आहे
लवकर येऊ दे पुढचा भाग
मोरपिस कधि पुर्ण करणार आहेस
मोरपिस कधि पुर्ण करणार आहेस ग?
हि कथा सुद्धा ओघवती आहे.
आता हि तरी लवकर पुर्ण करा म्हणजे मिळवल.
पु.ले.शु.
नंदे परत क्रमशः :रागः आता
नंदे परत क्रमशः :रागः
आता पुढचा भाग वर्षानी का????
पटकन टाक दुसरा भाग
पटकन टाक दुसरा भाग
नंदे, इस्पितळात जायच्या
नंदे,
इस्पितळात जायच्या पूर्वी पूर्ण कर हा कथा....
अजून एक अपूर्ण कथा तर नाही
अजून एक अपूर्ण कथा तर नाही वाचत आहे ना मी...?
मला कंटाळा येतो अर्धवट कथांचा आणि पुढे काय असेल याचा विचार करून मेंदूचा भुगा होऊनही ती कथा अपूर्णच राहते याचा...
विनंती : कथा पूर्ण करूनच नंतर टाका ना... तुमच्या सुरूवात खुप चांगल्या झालेल्या कित्येक कथा... मेंदूचा भुगा करून अपूर्णावस्थेत पडून आहेत मा. बो. वर
मोरपिस कधि पुर्ण करणार आहेस
मोरपिस कधि पुर्ण करणार आहेस ग?>>>>>>> मोरपिस विसरून जा आत..
हुर्रे र्रे र्रे र्रे....
हुर्रे र्रे र्रे र्रे.... समाप्तची पाटी दिसतेय बहुदा खरं की काय??? डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.... (मिस वर्ड झालेले भाव पांघरलेली बाहुली)
धन्स मनापासून नन्दिनी... कथा झट की पट पूर्ण केल्याबद्दल!
आवडेश!!
आवडेश!!
कथा आवडली... श्यामल च काय
कथा आवडली...
श्यामल च काय झालं कळलं नाही मला..सांगणार का प्लीज..
आवडली. ही कथा त्याची आहे
आवडली. ही कथा त्याची आहे शामलची नाहीच हो ना नंदिनी?
फुपा, बरोबर!!!
फुपा, बरोबर!!!
छान!
छान!
मस्त! आवडली..
मस्त! आवडली..
कथा त्याची आहे कळलं.. सुभद्रा
कथा त्याची आहे कळलं.. सुभद्रा च काय झालं तेही कळलं ... श्यामल च काय झालं याची उत्सुकता मह्णून प्रश्न.
छान!
छान!
छान झाली कथा , तुझ्याच
छान झाली कथा , तुझ्याच स्टाईलची. पण जरा घाईत संपवल्यासारखी वाटते.
अगं कथा पुर्ण केलीयेस हे आधी कळलच नाही , मग वाचणार कशी? मी अशीच चक्कर टाकली तुझ्या पाउलखुणांमधे, तर समाप्तचा बोर्ड दिसला. ( हि गोष्ट पुर्ण कर म्हणुन सांगायला आले होते.)
मस्त कथा आहे.
मस्त कथा आहे.
मस्त कथा आहे.
मस्त कथा आहे.