विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका

Submitted by अभय आर्वीकर on 22 April, 2010 - 13:28

विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका

औंदाच्या उन्हाळ्यानं, धमालच केली
आनं श्याम्याची दाढीमिशी, भाजूनच गेली ......॥१॥

हे ऊन व्हंय कां कां व्हंय, काही समजत नाही
पाण्यासाठी जीव कसा, करते लाही-लाही
पन्नास डिग्रीच्याह्यवर, पारा चढून गेला
पाणी पेऊ-पेऊ जीव, आदमुसा झाला
इच्चीबैन ओठ-जीभ, सोकूनच गेली ......॥२॥

बाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते
घरामंधी घुसावं तं, उकाडा फ़ोडणी घालते
लोडशेडींग पायी बाप्पा, नाकात नव आले
कुलर-पंखे गर्मी पाहून, कामचुकार झाले
उष्माघात आकडेवारी, वाढूनच गेली ......॥३॥

नदी-नाले कोरडे कारण, बरसात नाही झोंबली
पाणी कमी हाय म्हून, वीजनिर्मिती थांबली
नळामधून पाणी कमी, हवा शिट्ट्या मारते
विहीर-तलाव ठणठण, पाणी आंग चोरते
दुष्काळाची बहीणमाय, माजूनच गेली ......॥४॥

पशू-पक्षी अभय नाही, निवारा ना थारा
मागून-पुढून मस्त देते, चटके गरम वारा
दैवाचे फ़टके सोसून, आयाबाया झाल्या धीट
घागरभर पाण्यासाठी, अर्धा कोस पायपीट
नशिबाले जगरूढी, चिपकूनच गेली ......॥५॥

गंगाधर मुटे
.........................................................
ढोबळ मानाने शब्दार्थ.
जम्मून = जोराने,झपाट्याने.
झावा = गरम हवेचे तडाखे.
.........................................................

गुलमोहर: 

अरे उन्हाळा उन्हाळा,
जीव होई वेडा-खुळा ...

नळात नाही पाणी,
काय बोलावे कुणी ...

तापलाय बघा वारा,
जीव घेतो खरा...

गंगाधर आले घेऊन,
विदर्भाचं तळपतं ऊन...

तुमची भाषा माझ्या माहेराची आठवण करून देते राव पुन्हा पुन्हा. मस्त !!

Happy माही जवानीच अमरावतीले गेली न बाप्पा !! तुही कविता वाचली की हळवून जाते कालीज !! असाच लिहीत रहाजो. Happy

वर्ध्याले संजुभाऊ हरदासले ओलखते का बापू ? तो माहा भाऊ लगते न दूरचा.

खरी परिस्थिती मांडली मुटे साहेब तुम्ही, आणि तीही वर्हाडी भाषेत.. पुण्या मुंबई कडचा माणूस खरच नाही राहू शकत इथल्या गर्मीत, भयानक असते, आणि त्यात लोड शेडींग म्हणजे मरण... दुपारी बाहेर पडला म्हणजे उन्ह लागतेच... तुम्ही जवळपास सगळे मुद्दे मांडले आहेत, शैली फारच आवडली.. लिहित राहा, धन्यवाद...

Best.

सहृदय अभिप्रायाबद्दल आभारी आहे सर्वांचा....!!

शुभंकरोती Happy

उदयजी, सध्या ४५ ते ४८ वर तापमान खेळतेय.

अज्ञातजी, अहो या ना पुन्हा विदर्भात. बंबाड मज्जा येइल. Happy
संजूभाऊंना नाही ओळखत. पण पुर्वी मुकुंद हरदास होते वर्धेला, कृषी विभागात.
आता बहूतेक ते पण पुण्यातच असावेत.

वाचून उन्हाळ्यातही पावसाची सर आल्यासार्खं वाटलं ! छानच !
'जम्मून झावा चालते" चा अर्थ नाही लागला.सांगाल?
[पूर्वी एकदां अल्लापल्लीहून भर उन्हात चंद्रपूरला पोचलो. जवळचं पाणी संपलेलं आणि संपूर्ण बाजारपेठ
शुकशुकाट पांघरून बंद. चुकून एक कापडाचं दुकान किलकीलं उघडं दिसलं व बाहेरच पाण्याचा अमॄत कलश ! उडी मारुनच आंत गेलो तर गादीवर सिंधी दुकानदार हंसून स्वागताला तयार. पाणी ढोसून, हात जोडूनच त्याना म्हटलं " अख्या बाजारात फक्त तुमचंच दुकान उघडं कसं ?" " गिर्‍हाईक व मरण केव्हां येईल सांगता येत नाही " , त्याने हंसून अमॄताबरोबर अमॄतानुभवही पाजला ! कवितेमुळे विदर्भीय उन्हाळ्याचा पुनःप्रत्यय आला !! ]

सहृदय अभिप्रायाबद्दल आभारी आहे सर्वांचा....!!

भाऊ,
ढोबळ मानाने शब्दार्थ.
जम्मून = जोराने,झपाट्याने.
झावा = गरम हवेचे तडाखे.

वा वा मुटे साहेब... खरंच मजा आली.. उन्हाळ्यात आपल्या वर्धेला आलो म्हणजे मी दोनंच गोष्टी करतो..लग्नातली आलू वांग्याची भाजी झोडणं आणि दुपारच्याला मस्तपैकी ताणुन देणं...

मुटेजी,
मी नागपुरला मार्च मधे आलो,२ दिवस ऊनात असाच फिरलो,खूप त्रास झाला, तोंडाला कापड्,टोपी घालुन सवय नव्हती,लाजत होतो, डोक्टरला १००-१५० रु. दिले ,नंतर मात्र तोंडाला रुमाल्,टोपी घ्यावीच लागली ,पण नागपुर आवडलं

जाने वो कैसे दिन थे...
इतनी धुपमे भी नागपुरका मझा कुछ औरही है....
मुटेसाहेब : ----- बंबाड मज्जा येइल-----ते "बंबार्ड" ना की बंबाडच बरोबर ..

गिरिश, "बंबार्ड" बरोबर असले तरी "बंबाड" वाले नागपूरकर सुद्धा आहेत.

<<लगनसराई पण उन्हायातच असते ...हया घामाच्या धारा लागते पंगतीत तिखड भाजी खातांना>>
अथक, अस्सल नागपूरी!

मुटे साहेब, आठवणी ताज्या झाल्या कविता वाचून.
हा नागपुरी तडका चालू ठेवा असाच....

हया घामाच्या धारा लागते पंगतीत तिखड भाजी खातांना>> मला तर लग्नातिल दाळभाजीची खुप आठवण येवुन रायलीजी. आणि आपल्या नागपुरातली आजुन एक आवडती भाजी म्हणजे भरलेलं ढेमसं. आss हाss हाss. हे साला ढेमसं ईकडे सापडतच नाहिजी कुठे.

वाईट असतो विदर्भातला उन्हाळा Sad
आम्ही इंजिनिअरिंग चे पेपर मे महिन्यात भर दुपारी २.३० ते ५-५.३० द्यायचो. घरून बाटलीत बर्फ जमवून घेऊन जाय्चो, थोडं थंड पाणी प्यायला मिळावं म्हणून्..पण झावा लागून ते अगदी उकळतं गरम (खरंच) होऊन जायचं Sad
जाता जाता: विदर्भात ८-१६ तास लोड्शेडिंग करणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या अमानुषपणाचा कळस आहे. बरे महा. ची ६०% च्या वर वीज विदर्भात निर्माण होते, त्यासाठी लागणार्या पाण्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याच्या अति टंचाईला तोंड द्यावे लागते..आणी याच विदर्भाच्या वीजेच्या जीवावर पुण्या-मुंबईला बनतात आयटी पार्क अन इंड्स्ट्रीअल एस्टेट्स .... अन शेवटी निष्कर्ष काय तर म्हणे विदर्भातले लोकंच कामचुकार, म्हणून तिकडे प्रगती नाही.. अत्यंत चीड येते.. कधी कधी वाटते या नेत्यांना सरळ आलापल्लीच्या जंगलात भाजून काढायला सोडून यावे २-३ दिवसांसाठी..मग बघु काही बोलायची हिंमत राहाते का ते Happy

उदयजी,
चंद्रपुरने *** ५० सें पार केले अशी बातमी आहे आज पेपरमध्ये.
तापमानाची जिथे नोंद होते ती सर्व केंद्रे शहराच्या जवळ असतात.
उजाड माळरानातील तापमान कदाचित त्याहीपेक्षा जास्त राहत असेल काय?

कविता मस्तच झालीय..
माही जवानीच अमरावतीले गेली न बाप्पा !! तुही कविता वाचली की हळवून जाते कालीज !! असाच लिहीत रहाजो.>> हा हा.. छान आठवण करून दिलीत.. माझे वडील अजूनही कधी तरी असे बोलतात तेव्हा मजा येते ..ते सुद्धा हे म्हणतात (माही जवानीच अमरावतीले गेली न !!!!)

विदर्भात उष्माघाताचे आणखी दोन बळी..... एक बातमी
देसाईगंज (जि. गडचिरोली)/दिग्रस (जि. यवतमाळ) - विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, आज (ता. 14) वाढलेल्या तापमानाने दोन बळी घेतले. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमधील एक आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसच्या एकाचा समावेश आहे. दिग्रस येथील जिनिंगमधून सेवानिवृत्त झालेल्या पुरुषोत्तम सीतारामपंत पेनुरकर (वय 58, रा. कासारावाडा, जि. हिंगोली) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारच्या सुमारास घडली

हो, काल ता १४ ला चंद्रपुरात ४८ तापमान होतं म्हणे.
मित्राना फोन केला होता, सगळे बियरबारमधे आंघोळ करत होते.

नळामधून पाणी कमी, हवा शिट्ट्या मारते
विहीर-तलाव ठणठण, पाणी आंग चोरते
दुष्काळाची बहीणमाय, माजूनच गेली ......॥४॥
wow great & very nice i like it yaar....................