खिडकी

Submitted by अरुण मनोहर on 10 April, 2010 - 20:54

"तुम्ही काही काळजी करू नका. दिवसाचा तर प्रवास आहे. पोहोचल्यावर लगेच फ़ोन करतेच मी तुम्हाला."
गाडी सुटता सुटता अनुराधाने पुन्हा एकदा सुभाषला सांगीतले. वेग घेणाऱ्या गाडीबरोबर धावणारा सुभाष तिला आणि सोनुला हात हलवून निरोप घेता घेता दिसेनासा झाला. त्याबरोबर आणखी वेळ न दवडता शेजारी बसलेल्या बाईने लगेच सोनुकडून आपली खिडकीची जागा मागून घेतली. मस्तपैकी मांडी घालून कोपऱ्याला रेलून तिने मासीकात डोके खुपसले.

सोनुने नाराज होऊन आईच्या बाजुची आपल्या जागेवर टेकल्यासारखे केले. त्या लठ्ठ खवीस बाई शेजारी बसण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. जरी खिडकीच्या बाहेरचे तिथून चांगले दिसले असते तरी! "काय बाई आहे ही!" अनुराधाने खिडकीतल्या लठ्ठी कडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पहात नाक मुरडले. "जर मासिकातच डोके खुपसायचे होते, तर ह्या छोट्या जीवाला बसू दिले असते पाच दहा मिनीट आपल्या जागेवर. येवढी वाढलीय पण लहानांहून लहान आहे बया." ’वाढली” च्या कोटीने स्वत:वरच खूष होऊन तिच्या ओठांवर हलकेसे स्मित टपकले.

इकडे सोनू खिडकीची मजा आपल्या नशीबात नाही तर आता वेळ घालवायला काय करावे ह्याच्या विचारात होती. तिला साहजीकच आईने डब्यात भरून घेतलेल्या चिवड्याची आठवण झाली. तिने लगेच आईच्या पाठीमागे चिवड्यासाठी भुणभुण सुरू केली.
"अग आत्ताच तर प्रवास सुरू झालाय. थोड्या वेळाने देते. तू गप्प रहा बर थोडी."
"मग मी काय करू? मला कंटाळा आला."
"येवढ्यात कंटाळा? अजून दहा तास बसायचे आहे."
"मग मला खिडकीजवळ बसू दे." सोनूने खिडकीच्या बाजुला ठाण मारून बसलेल्या बाईकडे पहात हेका धरला.
एक लहानशी मुलगी येवढी तोंड भरून म्हणते आहे. पण ही साळकाय कसली ढीम्म! बसलीय मासीक वाचत. ह्या लठ्ठीने काही ऐकलेच नाही जणू. अनुराधाने मनातल्या मनात बाजुच्या बाईला शिव्या पण देऊन घेतल्या.

असाच वेळ गेला. स्टेशने येत होती, जात होती. ती बाई थोड्यावेळासाठी देखील खिडकी सोडायला तयार नव्हती. मोठ्या स्टेशनवर निदान खाली तरी उतरेल? पण खिडकीतूनच वडे, समोसे काय वाट्टेल ते घेऊन चरत ठाण मांडून होती. तिनदा चिवडा खाणे झाल्यावर सोनुचा त्यातलाही इन्टरेस्ट गेला. गाडीने जसा वेग घेतला, तशी ती आईच्या मांडीवर डोके ठेवून पेंगली.

कुठलेसे स्टेशन आल्याच्या खुणा दिसू लागल्या. अजून कीती वेळ असे बसायचे आहे कोण जाणे. अनुराधाने जांभई दाबत बाहेर पाहीले. बाजुची बाई आता मासीक सोडून अगदी खीडकीला चेहरा टेकवून बाहेरच्या गार हवेचा झोत चाखत होती. ही बया तर लहाना्हूनही लहान आहे. असा काहीसा विचार अनुराधाच्या मनात तरळला.

..थन्न्न.थड्ड.. कहीतरी आपटुन कपच्या डब्यात उडाल्या.
"आईग्ग" बाजुच्या बाईने एक विव्हळणारी किंचाळी मारली. अनुराधेला तिच्याकडे बघताच कपाळावरून रक्ताची मोठी धार लागलेली आणि बाईचा वेदनंनी पिळवटलेला चेहराच तेवढा दिसला. काय झाले काय झाले ओरडत डब्बाही पेंगेतून सावध झाला. सोनू घाबरून रडू लागली.

कोणा हलकटाने गाडीवर उगाचच भिरकावलेला दगड डब्यात कुठेतरी पडला होता. तो हातात धरून कोणी तावातावाने ओरडत होते. "चेन खेचा चेन खेचा."

बाईच्या कपाळावरचे रक्त रुमालाने पुसता पुसता तिला धीर देत अनुराधा नकळत सोनुच्या डोक्यावरून हात फ़िरवित होती.

गुलमोहर: 

ह्याला काय म्हणावे बरे? योगायोग असतो एकेक वेळेला....छान आहे कथा ..पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

खरच.
काळ आणि वेळ कोणावर सान्गुन येत नाहि हेच खर.
नशिबाच्या पुढे कोणीच जाउ शकत नाहि.
धन्स.
पु.ले.शु.

हे माझे स्वतःचेच लेखन आहे. उगाच आरोप करण्याआधी कृपया पुरावा द्यावा. (तारीख, प्रकाशन आणि "लेखकाचे(!)" नांव.