संशयित- २

Submitted by कौतुक शिरोडकर on 9 April, 2010 - 00:11

(संशयित भाग-१ वरून पुढे चालू)

"आर यु ओके ?"डॉक्टरांनी विचारणा केली.
"मी... ठिक... आहे." आगंतुकाने पुन्हा हाताने इशारा करत ती शब्द कष्टाने उच्चारले.
"तुम्हाला वेड लागलय का डॉक्टर ? तुम्ही जीव घेतला होता त्या माणसाचा आता." स्वतःला सावरून ती चक्क किंचाळलीच त्यांच्यावर. ते वरमले. आपल्या हातून चुक झाली हे त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते.
"सॉरी. बॉथ ऑफ यु. तुम्हाला खरचं काही लागलं नाही ना ? " ते पुन्हा आगंतुकाकडे वळले.
"अजून दोन मिनिटे आवळलं असतं तर नक्कीच झालं असतं." आगंतुकाने स्पष्टपणे आपली भावना व्यक्त केली.

"पुन्हा सॉरी. इतके दिवस क्रिमिनोलोजीचा नुसता अभ्यास करतोय पण नुसतं वाचन. मेडीकल प्रोफेशनमध्ये प्रॅक्टीकल्सची इतकी सवय झालेली आहे की मी यातही प्रॅक्टीकल्सच्या विचारात होतो. एखाद्या प्रॅक्टीकल एक्स्पिरीअन्स फार मस्ट. ते कसं आणि कुठे करावं मी या विचारात होतो. तुमच्या थिअरीच्या निमित्ताने आत्ता इथे ते सुचलं आणि मी अमलात आणलं. मी असं करायला नको होतं, पण राहावलं नाही. सॉरी अगेन. माझ्या अशा वागण्याने तुम्हाला त्रास झाला. पण मला माझा मुद्दा जरा माझ्या पद्धतीने सिद्ध करायचा होता. बळी, आरोपी व साक्षीदार यांच्या अशावेळेस नेमक्या काय रिऍक्शनस असतात हे नुसतं अभ्यासुन वा धोकून चालत नाही. त्यासाठी जरातरी अनुभव हवाच." डॉक्टरांनी त्याच्या वागण्याचे समर्थन केले.

"हा शुद्ध मुर्खपणा आहे. जीव जातो की नाही हे पहायला उद्या विषाची परिक्षाही घ्याल." ती अजूनही संतापाने थरथरत होती.
"सांगता येत नाही. कधी कधी काही प्रयोग आधी स्वत:वरच करावे लागतात. प्रत्येक प्रयोगाला गिनीपिग उपलब्ध असतात असं नाही." डॉक्टर तिच्या नजरेत नजर मिळवत म्हणाले. आपला मुद्दा पटवायला ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हा ठामपणा तेव्हा त्या डोळ्यात नक्कीच होता. क्षणभर थांबून त्यांनी रागाने थरथरणाया तिला पाहील आणि बळीच्या बकयासारखा चेहरा केलेल्या आगंतुकाकडे पाहीलं. मग पुन्हा ते तिच्याकडे वळले. क्षण दोन क्षण तिच्या रागावलेल्या चर्येला पाहून ते म्हणाले.

"मिस. साटम, इथे तुमच्यासमोर एक खून होत असताना तुम्ही ओरडला नाहीत की कुणाला मदतीला बोलावलं नाही? घाबरलेलात का ?" त्यांच्या स्वरातलं वेगळेपण जाणवलं तिला. गोंधळली ती त्या प्रश्नाने. 'अरे, हो खरेच. किती विचित्र वागलो आपण. निदान किंचाळायला हवं होतं. चुकलचं.' तिचा राग ओसरला. पण नकळत ती स्वतःवर चिडली. तिने दोघांकडे पाहील. डॉक्टर तिच्या उत्तराची वाट पहात होते आणि आगंतुकही.
"हो." तिने शेवटी होकार दिला.
"क्राईम रिपोर्टरला असं घाबरून कसं चालेल ? " त्याच्या स्वरात आता मघासचा मिश्किलपणा डोकावू लागला.
"नाही चालायचं. पण जे घडलं ते इतकं अनपेक्षित होतं की काही सुचलच नाही." तिने सारवासारव करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही.
"घटना अनपेक्षितच असतात मिस. साटम. इथे जर खरोखरच खुनी असता तर तुमच्या डोळ्यादेखत एक बळी गेला असता. यु नीड टु बी स्ट्रॉंग मिस. साटम." तिने होकारार्थी मान डोलावली पण तिची नजर आता दरवाज्याकडे होती. त्यांनी वळून पाहीलं. म्हातारा दाराजवळ उभा होता. बहुधा मघासच्या किंचाळण्याने आला असावा, त्यांनी अंदाज बांधला. क्षण दोन क्षण त्यांच्याकडे विचित्रपणे पाहून म्हातारा पुन्हा आत दिसेनासा झाला.
"लेटस गो बॅक टू युवर रिपोर्ट. मला वाटते मिस साटम, जर मी डॉक्टर नाही तरीही हा स्टॅथोस्कोप माझ्याकडे आहे म्हणजे मी खुनी असू शकतो. राईट ?" ते तिच्याजवळ पोहोचले.
"राईट" थोडं मागे सरत ती म्हणाली.
"गुड. ज्याप्रमाणे हे विजिटींग कार्ड आणि स्टॅथोस्कोप हे सिद्ध करत नाहीत की मी डॉक्टर आहे तसेच खुन्याचे मला लागू पडणारे वर्णन आणि हा स्टॅथोस्कोप हे सिद्ध करू शकत नाहीत की मी एक खुनी आहे. ऍम आय राईट, मिस. साटम ?" त्यांनी तिच्या एकदम जवळ जाऊन विचारले.
"राईट." ती मान हलवत म्हणाली.
"थॅंक्स. पण मिस. साटम, उद्या तुमचा हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर या वर्णनात बसणार्‍या प्रत्येकाला दुसरा माणूस संशयित म्हणून पाहीलं असं नाही वाटत तुम्हाला ? यामुळे बराच गोंधळ होऊ शकतो असं वाटत नाही तुम्हाला." त्यांनी शक्यता बोलून दाखवली.
"शक्य आहे." ती विचारात पडली.
"आणि हे वाचून खरा खुनी तुमच्यापत पोहोचला तर... " त्यांच्या या वाक्यावर ती दचकली. "मग काय ? तो कोणीही असू शकतो. मी....... हा......" त्यांनी आगंतुकाकडे बोट दाखवलं. तो गोंधळला. "कोणीही." डॉक्टरांच्या चेहर्‍यावर पुन्हा स्मित होते. तिच्या कपाळावर घाम जमा झालेला. "चिंता करू नका. तुमच्या तर्काप्रमाणे तो जर खरोखरच हुशार असेल तर तो तुमच्यापर्यंत येणार नाही. मी असतो तर कधीच आलो नसतो. शिवाय तो फक्त आमच्यासारख्या सायकॅट्रिस्टचेच खुन करतोय....... " बोलता -बोलता डॉक्टर थांबले. त्याबरोबर दोघांनी चमकून त्यांच्याकडे पाहील. तसे ते हळूच कुजबुजले. "म्हणजे..... म्हणजे उद्या माझाही खून होऊ शकतो. होऊ शकतो ना ? " ते आळीपाळीने दोघांकडे वळले. दोघांच्या माना त्यांच्या नकळत होकारार्थी हलल्या."आय हॅव टू टेक कॅअर ऑफ मायसेल्फ."
"मि. सरदेसाई, तुम्ही नेमकं काय करताय ?" तिने आवंढा गिळत विचारलं.
"विश्लेषण. तुमच्या तर्कांचे. माझ्या पदधतीने. मला वाटतं तुमचे तर्क बरोबर आहेत. तुम्हाला काय वाटतं ? " डॉक्टर आगंतुकाकडे वळ्ले.
"आता बरं वाटतयं" त्याचा हात अजून गळ्यावरच होता.
"आय ऍम रियली सॉरी." डॉक्टरांनी पुन्हा दिलगिरी व्यक्त केली.
"मि. सरदेसाई, तुम्हाला असं वाटतयं की खुनी एक मानसतज्ञ आहे." ती विचारांच्या वादळात हरवल्यासारखी बोलली.
" शक्यता आहे, पण कारण माहीत नाही. एखादी नवीन थिअरी मांडता येईल." त्यांनी तिला आव्हान दिले.
"लेट मी ट्राय." तिने आव्हान स्विकारलं.
"मी हे तुमच्यासाठी सिंपल करतो. मी एक मानसतज्ञ आहे आणि हे खुन मीच केलेत. " ती त्यांच्याकडे रोखून पहाते. "असं समजा आणि सांगा." ते मिश्किलपणे हसले.
"माझ्या एक-दोन प्रश्नांची तुम्ही उत्तरे दिली तर ते जमेल असं वाटतयं मला." तिने तिची नजर त्यांच्यावर अजून रोखलेली होती.
"गो अहेड." त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
"मानसतज्ञ म्हणून गेली किती वर्षे तुम्ही या क्षेत्रात आहात मि. सरदेसाई ?" पहिला प्रश्न.
"जवळ जवळ दहा वर्षे."
"ज्या शहरात पुर्वी तुम्ही होता तिचे तुमचा चांगला जम बसला होता का ?" प्रश्न दुसरा.
"यस. अलबत."
"मग ते शहर व जम बसलेला व्यवसाय सोडून इथे यायचं कारण ?" प्रश्न तिसरा.
"मिस. साटम. थिअरीसाठी एक-दोन प्रश्न ठिक आहेत. संपुर्ण उलटतपासणी घ्यायची गरज नाही." डॉक्टर ठासून बोलले.
"मी उलटतपासणी घेत नाही. तुम्ही समजा म्हणालात ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तुमच्यावरून थिअरी मांडायची आहे म्हणजे थोडीबहूत पार्श्वभुमी माहीत असणं गरजेचं आहे." तिने तिचा मुद्दा स्पष्ट केला.
"हरकत नाही. पण आता आहे त्याच माहीतीच्या आधारे तुमची थिअरी मांडा." ते तिच्या समोर येऊन बसले.
"ऍज यु विश. एक मानसतज्ञ म्हणून तुम्ही अनेक केसेस गेल्या दहा वर्षात हाताळल्या असणार. लोकांच्या मनावर इलाज करता-करता तुमचं स्वत:च मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण हे जाणवूनही तुम्ही स्वत:चे नीट निदान करू शकत नाही की स्वत:वर उपचार करू शकत नाही. इज इट पॉसिबल, मि. सरदेसाई ?" तिने मध्येच प्रश्न केला.
"शक्य आहे."
"यामुळे तुमच्यात न्युनगंडाची भावना निर्माण होऊ शकते आणि तुम्ही वेळी अवेळी त्यामुळे ढासळू शकता. शेवटी नाईलाजास्तव तुम्हाला दुसर्‍या मानसतज्ञाकडे जावं लागते. पण तो तुम्हाला ओळखत असल्याकारणाने त्याचा तुमच्यावर विश्वास बसत नाही, तो तुमची खिल्ली उडवतो, जे त्यावेळी तुम्हाला जास्त फिल होते. त्यामुळे तुमच्या मनाला व पर्यायाने स्वत:ला, स्वत:च्या कह्यात ठेवता न आल्याने समोर पडलेल्या स्टॅथोस्कोपने तुम्ही त्याच्यावर हल्ला करता आणि त्याचा गळा आवळाता. मग हे चक्र पुढे ह्या ना त्या कारणाने चालू राहते."
"हे असं होऊ शकतं ?" आगंतुक त्यांच्या या आगळ्यावेगळ्या खेळाने भांबावलेला.
"होऊ शकतं. मी हाताळल्यात अशा काही केसेस. कधी कधी निव्वळ न्युनगंडाची भावना साधारण माणसाला मनोरूग्ण बनवते. ही भावना जसजशी खोल रूजत जाते, तसतसा तो रूग्ण बाह्य जगाशी स्वत:चा संपर्क तोडून स्वत:चं असं त्याला हवं असलेलं विश्व बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या संकल्पनेत न बसणारी प्रत्येक व्यक्ती मग त्याची शत्रू होते. तुमच्या या थिअरीला मी मान्यता देतो. अजून काही ?" सरदेसाई पुन्हा तिच्याकडे वळले.
"आता अस गृहीत धरू की तुम्ही मानसतज्ञ आहात. पण मुळात तुम्हाला या प्रोफेशनची आवड नाही. दुसर्‍याच्या इच्छेने....... म्हणजे..... वडीलांच्या.... जे नॉर्मली होते... वडीलांच्या इच्छेने तुम्ही हे प्रोफेशन स्विकारलेलं आहे. आवड नसल्याने यात तुमचा जम बसत नाही." तिने नवीन थिअरी मांडायला सुरूवात केली.
"खराय..." सरदेसाई नकळत स्वत:शीच पुटपुटले.
"आपल्या आंतरिक इच्छा डावलून नको असलेलं ओझं घेऊन आपण फिरतोय हे डाचत राहतं. त्यातच अपयशाची भर दु:खाला डागण्या देत राहते. त्यामूळे या व्यवसायातील यशस्वी सहकारी वा संबधित व्यक्तींबद्दल नकळत एक राग मनात धगधगू लागतो. ज्वालामुखीसारखा. ज्यावेळेस तो उफाळून वर येतो तेव्हा कोणा ना कोणाचा बळी जातो." तिने त्यांच्या नजरेत नजर भिडवली.

"एक मिनिट..." सरदेसाई तिला थांबवतात.
"काय झालं ? ही थिअरी तुम्हाला लागू होतेय का मि. सरदेसाई ?" तिने नजर न हटवता विचारलं.
"डॉन्ट जम्प टू कन्क्लुजन, मिस. साटम. तुमची थिअरी वर्केबल आहे. माझं म्हणालं तर माझे वडील एक मानसतज्ञ होते व मी या प्रोफेशनमध्ये यावं ही त्यांचीच इच्छा. त्यांच्या शेवटच्या इच्छेला प्रमाण मानून मी हा मार्ग स्विकारला. आपण दुसर्‍याने सांगितलेलं आयुष्य जगतोय असं वाटायचं सुरूवातीला. पण नंतर मात्र मला यात गोडी निर्माण झाली." सरदेसाई तिच्या शंकेचे समाधान करण्याचा आपल्या परिने प्रयत्न केला.
"जर तुम्हाला गोडी निर्माण झाली नसती तर....." तिने पुढचे फाटे फ़ोडले.
"जर तरचे सवाल निरर्थक असतात मिस. साटम. पण तुमच्या या थिअरीसोबत एक थिअरी मी सुचवू का ?" सरदेसाईने नवाच पेच टाकला.
"बोला." ती सरसावून बसली. त्या दोघाच्या या खेळात आता आगंतूक रमू लागलेला.
"माझ्यासारखा एक नामवंत मानसतज्ञ एका शहरात दहा वर्षे प्रॅक्टीस करतोय. पैसा आणि प्रतिष्ठा पायावर लोळण घेतेय. आणि अचानक काही कारणास्तव मला ते शहर सोडून नव्या शहरात जावं लागतं. जिथे मला कोणीच ओळखत नाही. प्रसिद्धीच्या शिखरावरील मी क्षणार्धात गर्दीचा भाग होतो. इथे आधीच अनेक प्रतिस्पर्धी जम बसवून आहेत. त्यात माझं बस्तान बसवण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे प्रस्थापितांना मुळासकट उपटायचं व या व्यवसायाची जाहीरात करायची. यासाठी सरळ सोपा मार्ग म्हणजे मनोरुग्णाच्या अर्विभावात इथल्या मानसतज्ञांना संपवणे."
"तुमची ही थिअरी.. थिअरी नसून..."तिने मध्येच त्यांना अडवलं.
"आत्मकथा वाटतेय." त्यांनी तिचं वाक्य पुर्ण केलं. तिने मान डोलावली. आगंतुकानेही. "वेल, ही थिअरीच आहे, मिस. साटम."
"तुमची थिअरी माझ्या थिअरींपेक्षा जास्त परिणामकारक वाटतेय मि. सरदेसाई. कदाचित..." ती विचारमग्न होऊन बोलत असतानाच त्यांनी तिचं वाक्य कापलं.
"तो मी नव्हेच." त्यांनी दोन्ही हात वर केले.
"कदाचित तो खूनी एखादा मानसतज्ञ असावा." त्यांच्याकडे लक्ष न देता तिने वाक्य पुर्ण केले.
"पण खूनी ’तो’ आहे असं गॄहीत का धरताय ? ’ती’ ही असू शकेल ?" त्यांनी आपला सुरूवातीचा मुद्दा पुन्हा मांडला.
"ती कशावरून ?" तिला ते पटलं नाही हे जाणवलं त्यांना.
"खून आतापर्यंत फक्त पुरूषांचेच झालेत. म्हणून खुनी एखादी स्त्री असण्याची शक्यता नाकारता येत नाही." त्यांनी स्वत:च्या भात्यातला तर्क काढला.
"हा तर्क पोकळ आहे मि. सरदेसाई." ती ठासून बोलली.
"मलाही असचं वाटतयं." आगंतुकाने त्यांच्या संभाषणात भाग घेतला.
"नो वे. पुरुषद्वेषाने हत्या करणाऱ्या स्त्रियांची अनेक उदाहरणे आहेत मिस. साटम. ती एखादी डॉक्टर, नर्स, पेशंट किंवा..." ते क्षणभर थांबले.
"किंवा ?" तिने प्रतिप्रश्न केला.
"एखाद्या मानसतज्ञाची बायको."ते शांतपणे बोलले.
"वॉट नॉनसेन्स ?" ती उठून उभी राहीली. "काहीही बरळताय तुम्ही."
"नथिंग नॉनसेन्स मिस. साटम. याच शहरात चार वर्षापुर्वी स्टॅथोस्कोपने एका प्रख्यात मानसतज्ञाचा त्याच्याच वेड्या बायकोने गळा आवळून खून केला होता." डॉक्टरांनी पुरावे द्यायला सुरूवात केली.
"अस कधी घडलेलं नाही." तिच्या वरच्या पट्टीतल्या स्वरात ठामपणा मात्र नव्हता.
"घडलय. याच शहरात. ती बाई वेडी होती. मनोरुग्ण होती. ती...." डॉक्टरांच्या बोलण्यात खात्री होती.
"ती वेडी नव्हती." तिचा स्वर किंचीत कापरा झाला.
"होती. शंभर टक्के होती. स्वत:च्या नवर्‍याचा खून करणारी ती बाई वेडीच होती." डॉक्टर आता फारच ठामपणे बोलले.
"स्टॉप इट. ती वेडी नव्हती. ती वेडी नव्हती."ती जवळ-जवळ त्यांच्या अंगावर धावून गेली.
"रिलॅक्स. तुम्ही एवढं पर्सनली का घेताय ? मी वर्तमानपत्रात जे वाचलं तेच सांगितलं. ती वेडीच होती म्हणून तर...." स्वत:ला सावरत डॉक्टर बोलले.
"ती वेडी नव्हती." ती ओरडली. एक हुंदका मागोमाग आला. तिचा स्वर रडवेला झाला." माझी मम्मा वेडी नव्हती," ती हुंदके देत सोफ्यावर कोसळली. ते एकताच तिथे शांतता पसरली. बाहेर पावसाचा जोर बराच वाढला होता. खिडकीच्या तावदानावर थेंबाचा मारा होत होता. दुर कुठेतरी वीज कडाडली. आता फक्त पावसाचाच आवाज होता.

"सॉरी."भावनांचा आवेग ओसरून गेला तशी ती भानावर आली. डॉक्टरांनी उठून तिची बॅग उघडली व आतला नॅपकीन काढून तिच्यासमोर धरला. त्यांनी बॅग उघडली हे पाहताच तिने पटकन पुढे सरून बॅग बंद करण्याचा प्रयत्न केला व त्याच वेळेस बॅगेतल्या वस्तूवर डॉक्टरांनी ओझरती नजर टाकलीच . तिने शक्य तेवढ्या चपळाईने बॅग बंद केली. नॅपकीनने तोंड व डोळे पुसून तिने नॅपकीन जवळच ठेवला. डॉ. पुन्हा आपल्या जागेवर बसले.
"यु आर ओके मिस. साटम." क्षणभराने डॉक्टरांनी तिची विचारपुस केली.
" यस." तिने त्यांच्याकडे पाहील. थोडा वेळ कोणीच काहीच बोललं नाही. मग त्या शांततेचा डॉक्टरांनी भंग केला.
"मला कल्पना नव्हती की....."
"रणजित साटम माझा बाप होता." तिने त्यांचा रोख ओळखून बोलायला सुरूवात केली." पण बाप म्हणवण्याच्या लायकीचा तो माणूस नव्हता. जगाच्या मनाची उकल करण्याचा दावा करणारा माणूस आपल्या बायकोचं मन कधीच ओळखू शकला नाही. मी तेव्हा हॉस्टेलवर असायचे. ममा नेहमी तिच्या पत्रात त्यांच गुणगान करायची. पण त्यांचा बाहेरख्यालीपणा तिच्या आंधळ्या प्रेमाला कधी दिसलाच नाही. व्हिजीटस आणि सेमिनारच्या नावे चालणारा धुडगूस तिला कळला, तेव्हा ते सहन करायच्या पलिकडचं होतं. मग रोज भांडण. आपल्या प्रेमाचा पराभव तिला सहन झाला नाही. त्याचाच फायदा उचलून त्यांनी तिला मनोरुग्ण म्हणून जगजाहीर केलं. मला तिच्या पत्रातून सारं कळत होतं. त्या रात्री मात्र त्यांनी कहरच केला. ते एका बाईला घेऊन घरी आले. काय वाटलं असेल माझ्या ममाला तेव्हा ? नशेत बेगुमान झालेल्या माणसाला तिने अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या माणसाने एका बाजारबसवीसाठी आपल्या लग्नाच्या बायकोवर हात उचलला. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि तिने समोरच पडलेला स्टॅथोस्कोप उचलला आणि त्यांच्या गळ्यात घातला. ती बाई पळाली. त्यांनी तिला शिव्या हासडायला सुरूवात केली व प्रत्येक शिवीगणिक तिच्या नकळत त्यांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला गेला. झाला प्रकार तिच्या लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता आणि मग..."
बोलता-बोलता ती पुन्हा हुंदके देऊ लागली.
"रिलॅक्स मिस. साटम. रिलॅक्स. शांत व्हा." डॉक्टरांनी सांत्वनाचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा वातावरणात शांतता पसरली. तिने नॅपकीनने डोळे पुसले. नॅपकीन बॅगेत ठेवून बॅग स्वत:शेजारीच ठेवली. थोड्या वेळाने ती शांत झाली आहे हे लक्षात येताच डॉक्टर पुढे बोलू लागले.
"त्यानंतर त्यांनीही आत्महत्या केली. पण त्या रात्री तिथे काय झालं ते कोणालाच माहीत नाही, मग तुम्ही एवढ्या खात्रीने कसं सांगू शकता ?"
"आत्महत्या करण्यापुर्वी तिने सगळ्या गोष्टी एका पत्रात लिहील्या होत्या व ते पत्र माझ्या स्टडीटेबलमध्ये तिने ठेवलं होतं. साधारण सहा महिन्यांनी मला ते सापडलं." तिने त्यांच्या शंकेच निरसन केलं.
"मिस. साटम रागवणार नसाल तर एक सांगतो." तिने मुक संमती दिली. डॉक्टरांनी संभाषण चालू ठेवले."तुम्ही हॉस्टेलवर होता. तुमच्या घरातल्या गोष्टी कळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या आईंची पत्रे. त्यामुळे तुम्ही जेवढं तुमच्या आईवर प्रेम करत होता, तेवढाच.. किंबहूना त्याहीपेक्षा जास्त तुम्ही तुमच्या वडीलांचा तिरस्कार करत होता. तुमच्या घरी जे घडलं, त्या सगळ्या घटनेला तुम्ही तुमच्या वडीलांना जबाबदार मानता."
"सत्य तेच आहे." दुसरं कोणतही सत्य ती स्विकारणार नाही हे तिच्या आवाजावरून त्यांना जाणवलं.
"असेल. मग त्या पुढचा उत्तरार्ध काय ?" डॉक्टरांचा प्रश्न तिला गोंधळवून गेला.
"म्हणजे?" तिने चमकून विचारलं.
"म्हणजे वडिलांच्या बद्दल वाटणार हा तिरस्कार इतका वाढत गेला की शेवटी प्रत्येक मानसतज्ञात तुम्हाला तुमचे वडील दिसू लागले." डॉक्टरांनी वेगळीच थिअरी मांडली.
"मि. सरदेसाई, तुम्ही भलत्याच कल्पना करताय. तेव्हा आता हा थिअरीजचा खेळ थांबवुया. इनफ नाऊ." ती किंचित चिडून बोलली. पण डॉक्टर आता थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते,
"आईवर झालेल्या अत्याचाराचा सुड घ्यायचाच, हे प्रकर्षाने तुमच्या मनात घोंगावत राहीलं. प्रतिशोधाच्या या वणव्यात तुम्हाला फक्त तुमच्या आईचाच मार्ग योग्य वाटू लागला आणि म्हणून तुम्ही..." बोलता-बोलता डॉक्टरांनी तिच्या बॅगेवर झडप घालून त्यातला स्टॅथोस्कोप काढला." तोच स्टॅथोस्कोप घेऊन नव्या सावजाच्या मागे लागलात."
"आय सेड स्टॉप इट." ती किंचाळली.
"हेही सत्य आहे मिस. साटम. पुढील सत्य." डॉक्टर स्टॅथोस्कोप तिच्यासमोर हलवत म्हणाले. अचानक डॉक्टरांनी तिच्यावर केलेल्या या आरोपामुळे आगंतुकही गोंधळला. नकळत तिच्याबद्दल त्याच्या मनात संशय दाटू लागला जो काही क्षणापुर्वी डॉक्टरांसाठी होता. पण त्या दोघांच्या कात्रीत सापडल्यासारखा तो दोघांपासून समांतर अंतर राखून बसला. कोणत्याही क्षणी पळ काढता येण्याच्या पवित्र्यात. त्याचवेळेस म्हातारा धावतच तिथे आला. तिची मघासची किंचाळी त्याने ऐकली होती. डॉक्टरांच्या हातातला स्टॅथोस्कोप पाहून मात्र तो दाराजवळच उभा राहीला. डॉक्टर तिच्या चिडलेल्या चर्येकडे पहात होते. ती त्यांच्या हातातल्या स्टॅथोस्कोपकडे. काही क्षणातच तिच्या चेहर्‍यावरची चीड नाहीशी झाली आणि ती खळाळून हसली. तिच्या हसण्याने ते तिघेही गोंधळले. पण तिचं हसणं थांबवण्याचा मात्र कुणीच प्रयत्न केला नाही. तिघेही आता ती काय स्पष्टीकरण देते हे ऐकण्यासाठी कान लावून उभे. बसल्या जागेवरून तिने हसता-हसता तिघांकडे पाहीलं.
"गुड वन डॉक्टर. माझाच खेळ माझ्यावर उलटवताय. " ती म्हणाली.
"हा आता खेळ नाही मिस. साटम." डॉक्टरांचा स्वर गंभीर होता.
"आहे डॉक्टर. मघाशी माझ्या नजरेत तुम्ही संशयित होता, आता तुमच्या जागी मी आहे. फरक इतकाच. आता राज्य माझ्यावर." ती उठून उभी राहीली. तिने त्यांच्या हातातला स्टॅथोस्कोप घेतला. त्यांच्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली,
"यस, आय हेट माय फादर. त्या माणसाने माझ्या ममाला मारलं. तो जिवंत असता तर मीच एव्हाना त्याचा खुन केला असता. पण ते काम माझ्या ममाने केलं. अशा माणसाला तिने धडा शिकवला या गोष्टीचा मला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल असलेला तिरस्कार मी जिवंत असेपर्यंत माझ्या मनात जिवंत राहील."
"म्हणून.... ?" डॉक्टर अजून तिच्या कन्फेशनची वाट बघत होते.
"म्हणून...... म्हणून काहीच नाही डॉक्टर. राग फक्त एका व्यक्तीबद्दल आहे, तुम्हा समस्त मानसतज्ञांवर नाही. मी इतकी कमकुवत नाही की त्यामुळे सिरियल किलर बनून सगळ्यांचे खून करत राहीन." तिने त्यांच्या थिअरीच्या ठिकर्‍या उडवल्या.
"मग एका रिपोर्टरच्या बॅगेत स्टॅथोस्कोप कशाला ?" डॉक्टरांचा संशय ठिय्या मांडून होता.
"फक्त माझ्या बॅगत स्टॅथोस्कोप आहे म्हणून मी खुनी आहे असं म्हणायचय का तुम्हाला ?" तिने त्यांना खिजवण्याच्या सुरात विचारलं.
"प्राप्त परिस्थितीत दुसरं काही दिसत नाही मिस. साटम." डॉक्टर अजून साशंकच.
"डॉक्टर तुम्ही मांडलेली थिअरी चांगली आहे. पण निव्वळ अशा परिस्थितीजन्य पुराव्यामुळे मी खुनी सिद्ध होत नाही. हा तुमच्या भाषेत म्हणायचं तर फक्त एक संशयित ठरतेय तुमच्याप्रमाणे. ऍम आय राईट डॉक्टर." यावेळेस डॉक्टरांनी मान डोलावली व आगंतुकानेही.
" बाय दे वे, डॉक्टर हा स्टॅथोस्कोप माझ्या एका डॉक्टरमित्राचा आहे. हवं तर तुम्ही त्याच्याशी आता बोलू शकता. या विषयावर कवर स्टोरी बनवायची म्हटल्यावर मला हत्याराची संपुर्ण माहीती द्यायलाच हवी. शिवाय हत्यार हाताळल्याशिवाय त्यातले बारकावे कसे कळतील? मला अंदाजे रिपोर्ट लिहायचा नाही डॉक्टर." तिने तिची बाजू मांडली. म्हातारा ते ऐकल्यावर आत निघून गेला.
"तुमचा रिपोर्ट आल्यावर काय होईल ते होईल, पण आता या क्षणी निव्वळ त्याच्यावरील चर्चेने आपण दोघे सशयित ठरलो." डॉक्टर पुन्हा मिश्किल झाले.
"नक्कीच. पण या तुमच्या गप्पांच्या आयडीयामुळे काही नव्या थिअरीज कळल्या. रिपोर्ट बनवताना याचा फार उपयोग होईल मला." तिने त्यांना हसून अनुमोदन दिले.
"मी काही बोलू शकतो का ?" बर्‍याच वेळाने आगंतुकाने तोंड उघडले. ती त्याच्याकडे वळली.
"बोला." डॉक्टरांनी त्याला अनुमती दिली.
"मी हे जे पुस्तक वाचतोय ते अशाच सिरियल किलरबद्दल आहे. यातला कथानायक एक सरळमार्गी माणूस असून त्यांची बायको मानसिक रुग्ण होते. तो तिला घेऊन एका मानसतज्ञाकडे जातो. पण तो मानसतज्ञ त्याच्या बायकोचा गैरफायदा घेतो, ज्यामुळे त्याची बायको त्याच क्लिनिकमधून उडी मारून आत्महत्या करते. कथानायक बायकोचं रक्तबंबाळ शव पाहून सैरभैर होतो. तो डॉक्टरला जाब विचारतो तेव्हा डॉक्टर त्याच्या बायकोला चरित्रहीन असल्याचा आरोप करतो. म्हणून तो त्याचा खून करतो. मग एकामागोमाग एक." त्याने कथा संक्षिप्तपणे सांगितली.
"ही एखाद्या सत्यकथेसारखी वाटते." ती बोलली आणि पुन्हा सोफ्यात विसावली.
"सगळ्याच कथा कल्पित नसतात मिस.साटम. प्रत्येक कथेत कुठे ना कुठे सत्याचा अंश असतोच." डॉक्टर तिच्यासमोर स्थानापन्न होत म्हणाले.
"तुम्हाला तो तरूण गुन्हेगार वाटतो का?" आगंतुकाने दोघांना विचारलं.
"माणूसकीच्या दृष्टीकोनातून म्हणाल तर ’यस’ आणि डॉक्टर म्हणून म्हणाल तर मला तो एक पेशंट वाटतो ज्याला उपचारांची गरज आहे." डॉक्टरांनी त्याला उत्तर दिले.
"पण जर तो एखाद्या डॉक्टरकडे गेला व त्याने त्याचा जर प्रोब्लेम डॉक्टरला सांगितला तर ते सरळ पोलिसांनाच बोलावतील. मग आणखी एक खुन."त्याने पुढचा परिणाम सांगितला.
"ही इज राईट." ती म्हणाली.
"मान्य." डॉक्टरांनी होकार दिला.
"मला या कादंबरीचा अनुवाद करायचाय. त्यासाठी मला तुमची मदत मिळेल का डॉक्टर ?" त्याने डॉक्टरांना विनंती केली.
"माझी काय मदत होऊ शकते ?" डॉक्टरांनी त्याच्या विनंतीत रस दाखवला.
"तुम्ही स्वत: एक सायकॅट्रिस्ट आहात. काही बारकावे तुम्हीच नीट सांगू शकाल. मला तुमचं कार्ड मिळेल का ?" त्याने पुन्हा विनंती केली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. आगंतुकाने त्याची बॅग उघडली. म्हातारा बाहेर आला. डॉक्टरांनी खिशातुन कार्ड काढले व आगंतुकाला द्यायला पुढे सरले.
"हे घ्या."म्हणत त्यांनी कार्ड पुढे केले. आपल्या उघड्या बॅगेला बंद करण्यापुर्वीच आगंतुक डॉक्टरांकडे वळला. त्याने कार्ड घेतलं. डॉक्टरांची नजर बॅगेवर खिळली.
"जरा एक मिनिट मला ते पुस्तक दाखवता का ?" असं म्हणत डॉक्टर पुढे सरले. म्हातार्‍याने दरवाजा उघडला. डॉक्टरांनी बॅगेत हात घातला आणि आगंतुक काही करण्याआधीच बॅगेतून स्टॅथोस्कोप बाहेर काढला. दारात उभी व्यक्ती इन्स्पेक्टर होती.
"तू ?" डॉक्टर न राहवून ओरडलेच. त्याबरोबर इन्स्पेक्टरचे लक्ष त्यांच्याकडे गेले. इन्स्पेक्टर त्याच्या दिशेला धावले.
"कोणाचा आहे हा स्टॅथोस्कोप ? " इन्स्पेक्टरांनी दरडावणीच्या सुरात विचारलं
"याचा." डॉक्टर चटकन बोलले.
"यांच्याकडेही आहे." आगंतुकाने तेवढ्याच वेगाने इन्स्पेक्टरला माहीती पुरवली.
"हिच्याकडेही आहे साहेब." म्हातार्‍याने तिच्याकडे बोट दाखवले.
"तिघांकडे ? सरप्रायजिंग. "इन्स्पेक्टरांनी डॉक्टरांच्या हातातला स्टॅथोस्कोप काढून घेतला.
"साहेब, वेळेवर आलात. मी मघापासून या तिघांचं बोलण ऐकतोय. ह्या माणसाने तर याच्या गळ्यात स्टॅथोस्कोप घालून त्याचा गळा पण आवळला. ह्या बाईच्या आईने आपल्या नवर्‍याचा खुन या स्टॅथोस्कोपनेच केला होता. मला वाटतं या तिघांपैकी कोणी तरी एकजण खूनी आहे." म्हातार्‍याने घडल्या प्रकारातील महत्त्वाचे तेवढे इन्स्पेक्टरला सांगितले.
"तुम्ही कोण ?" इन्स्पेक्टर म्हातार्‍याकडे वळले.
"मी इथला नोकर आहे साहेब." म्हातार्‍याने ओळख दिली.
"नाव काय ?"
"म्हादेव. म्हादेव बेंद्रे, साहेब."
"मघाशी फोन तुच उचलला होतास तर."
"फोन ?"
"आंग्रे. इन्स्पेक्टर आंग्रे."
"पण साहेब अजून आले नाय."
"हरकत नाही." इन्स्पेक्टर तिघांकडे वळले. "तुम्ही तिघांनी इतके टेन्स व्हायचे काही कारण नाही. तुमच्यापैकी कुणी खुनी नाही. कारण आम्ही खुनी मघाशीच पकडला." त्यांनी स्टॅथोस्कोप आगंतुकाला दिला.
"कोण आहे कोण तो ?" तिघांनी एकदम विचारलं.
"डॉ. रेगे."

"काय ?" बाहेर कडकडणारी वीज अंगावर कोसळल्यासारखं झालं चौघांना.

"पण त्यांनी हे सगळे खुन का केले ?" डॉक्टरांनी विचारलं.

"आताच तर थोड्या वेळापुर्वी अटक केली त्यांना. अजून संपुर्ण माहीती मिळाली नाही. पुढील तपासासाठीच आलोय येथे. म्हणून तर मघाशी फोन करून पाहीलं, कोणी आहे की नाही घरात ते." इन्स्पेक्टरांनी कारण सांगण्यास असमर्थता दर्शवली. मग त्यांनी खिशात सेल काढून कॉल केला.

"हॅलो, आंग्रे बोलतोय. वॉरंट मिळालं का ? ठिक आहे. या लवकर मी वाट पहातोय." त्यानी सेल पुन्हा खिशात सारला आणि ते तिघांकडे वळले.

"पण तुम्ही सगळे इथे का जमलात ?"

"मी डॉक्टर. निशिकांत देसाई. डॉ. रेगेंना भेटायला आलो होतो. त्यांच्या प्रबंधावर चर्चा करायला." डॉक्टरांनी उत्तर दिले.

"आपण ?" आंग्रे तिच्याकडे वळले.

"मी सुहास साटम. ’शोध’ या पाक्षिकाची रिपोर्टर. डॉक्टर रेगेंची मुलाखत घ्यायला आले होते." ती उत्तरली.

"मी सदानंद वाणी. इक्विपमेंट सप्लायर आहे साहेब. हे माझं कार्ड."

समाप्त.

गुलमोहर: 

कथा सुरुवाति पासुन छान आहे..पण शेवट गुंडाळल्यासारखा वाटला.

जर डॉ. रेगे खुनि आहेत, तर त्यांनी खुन का केले..त्या खुन करण्यामागची कारणीमिमांसा काय हे कळले नाही..

एक डॉ सिरियल किलर दाखवला आहे..तर तो तसा का वागला, हे स्पस्ट करण जरुरी आहे..त्यामुळे शेवट अर्धवट वाटला..

मानसोपचार तज्ञांकडे 'स्टॅथोस्कोप' ? आणि तो सुद्धा एक असताना नविन घेण्यासाठी विक्रेता घरी ?
थोडा खुलासा कराल का? इथे मानसोपचार तज्ञा ऐवजी 'इतर / जनरल' डॉक्टर दाखवला तर काही अडचण होईल का ?

1 number

एक डॉ सिरियल किलर दाखवला आहे..तर तो तसा का वागला, हे स्पस्ट करण जरुरी आहे..त्यामुळे शेवट अर्धवट वाटला.. >> +१