चिल्का

Submitted by सुनिल परचुरे on 5 April, 2010 - 06:25

ःः चिल्का ःः
``अपर्णा , अग झाली का तयारी ?``
``तयारी , कसली रे ?``
``मस्करी करतेस ?अग चारंच दिवस राहिलेत आपल्याला काश्मीरला जायला ?``
``मग काय झाल ? तयारि कसली करायचीय ? आपली जायची , यायची , तिथल्या हॉटेल्सची ,सगळी-सगळी बुकीग्जस् झाली आहेत. आता फक्त बॅगा भरायचाय न? गेल्या वेळी मी जेव्हा म्हटल की बॅग भरायची म्हणजे कसल मोठ्ठ काम असत, ते जो करतो त्यालाच कळत तर तु म्हणालास होतास त्यात काय एवढ , पुढल्या वेळेला मी भरेन. तेव्हा आता ते काम तुझ``.
``अग तु डॉक्टर आहेस की वकील ? अस नव-याला शब्दात पकडायच नसत. तुझा नवरा किती बिझी असतो तुला माहीत्येन ? बर बुबा ... बॅग भरण हे खुप मोठ काम असत मला मान्य आहे. मग तर झाल ?``
``अरे , मी तुझी थोडी मस्करी केली. कालच बॅगा भरुन ठेवल्यात. मला पार्थनेही केवढी मदत केली माहितेय ?``
``अरे व्वा , म्हणजे एक नवीन गडी तयार होतोय तर``.
``तयार करायलाच हवा. मुकादमच जागेवर नसेल तर गडया कडून काम करुन घ्यायलाच हवीत मला.``.

पार्थ म्हणजे आमचा दोन वर्षाचा मुलगा. खर तर मी आणि मोहित कॉलेजपासून एकत्र होतो. कॉलेजात एम.बी.बी.एस. ला आम्ही एवढी धमाल केली होती. छोटया छोटया ट्रीप्स काय, नाटक काय, खरच कॉलेजात मित्रांचा चांगला गुप असेल तर तो काळ आपण कधी विसरुच शकत नाही. मोहित म्हणजे नुसत वादळ होते. पण लेक्चर्स आणि प्रॅक्टीकल्सला कधीही दांडी म्हणून मारायचा नाही. ते इतक्या लक्षपुर्वक करायचा की बाकीचा वेळ मग तो ऊंडारत बसायचा व आम्हाला मात्र त्रास द्यायचा. त्याला मी कितीवेळा सांगितले की अरे अजून अभ्यास केला तर टॉपर होशील. पण पठ्ठ्या नेहमी पहिल्या दहात असायचा. आम्ही दोघेही एम.बी.बी.एस. झालो. त्याच ठरल होत एम.एस. ऑर्थोपेडिक व्हायच. म्हणायचा ..
``शाळेत जेव्हा मुलांना हाडाचा सापळा दाखवतात तेव्हा बरीचशी मुल घाबरतात. का माहत नाही पण मला त्याच खुपच आकर्षण वाटल. म्हटले अरे म्हणजे आपल्या शरिरातल वरच सगळ मास गेल्यावर हे अस राहत ? म्हणजे ही हाड आपल्या शरीराचा बेस आहेत. तो जर मजबुत असेल तर बाकीच्या रोगांना आपण औषधाने बरे करु शकतो. तेव्हापासून मनात होत की जर पुढे कधी डॉक्टर झालो तर ह्याचाच व्हायच.``

एम.एस. करता सिईटी देऊन त्याने ऍडमीशनही घेतली. पण माझे वडिल , म्हणजे तेही जनरल प्रॅक्टीशनरच होते , त्यावेळचे एम.बी.बी.एस. , ते अचानक गेले. आई खूप मागे लागली होती की तु तुझ शिक्षण चालू ठेव म्हणून. पण मला ते पटल नाही. त्यांचीच प्रॅक्टीस मी पुढे चालु ठेवली. माझ पुढच शिक्षण थांबल पण मला कधी त्याचा खेद वाटला नाही.

तस आमचे दोघांच भेटण चालूच होत. माझी प्रॅक्टीसही चालु होती. कॉलेजात असतांना आम्ही दोघे खुप चांगले मित्र होतो. पण ह्या मैत्रीच रुपांतर प्रेमात कधी झाल कळलच नाही. डॉक्टरांच हेच असत. एम.एस. नंतर इंटर्नशिप करता करता तिशी कधी होऊन जाते कळतच नाही. मोहितच्या वडिलांचा बिझिनेस होता. त्याच्या करता त्यांनी आधीच एक हॉस्पीटल काढण्याचा उद्देशाने एका उपनगरात एक अख्खा मजलाच विकत घेऊन ठेवला होता. आमच्या दोघांच्याही घरातून तशी संमती असल्याने हॉस्पीटल सुरु केल्या केल्या आमच लग्नही झाल.

``अग अपर्णा , एक प्रॉब्लेम झालाय. ज्यांनी आपली टुर ऍरेंज केली त्यांचा फोन आला होता. काश्मीरमध्ये परत चार दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे. तेव्हा तुम्हाला जायचेच असेल तर खुप काळजी घ्या.
आपल आणि काश्मीरच काय वाकड आहे माहीत नाही. आपला हनिमुनच्या वेळी आठवतय , तुझी इच्छा काश्मीरला जायची होती म्हणून आपण एटीत बुकींग केले. पण दोन दिवस आधी तिथे काही बॉम्बस्फोट झाले आणी आपल्याला ऍडव्हेंचरस हनिमुन करायचा नसल्याने आपण सिमला कुलु मनालीला गेलो होतो. ह्यावेळी मी ठरवल होत की त्यावेळचा वचपा काढायचा म्हणुन."
``म्हणजे ...``
``नाही म्हणजे ... मी मनात ठरवल होत की आपण हनीमुनलाच जातोय अस ``.
``पुरे रे , पार्थ आहे आजुबाजूला .. कधी तरी सिरियस हो न. पण आता काय करायच ?``
``अस करु ? माझ्या मनात लेह-लडाख करायच होतच. नाहीतरी नेहमी मी जे मनात ठरवतो तसच होत. म्हणजे बघ लहानपणीच मी ठरवल होत कि आपण असाच डॉक्टर व्हायच , हॉस्पीटल काढायच , तीच लाईन मिळाली. कॉलेजात मनात होत हीच मुलगी बायको म्हणून मिळावी , मिळाली``.
``मग काश्मीरच अस का झाल दोनदा ?``
``काश्मीरला हनीमूनला जायची कल्पना कुणाची ? कुणाची होती ?"
``अं हो माझीच``.
``आताही तिथे जायच कुणी ठरवल ?``
``मीच``.
``मग बघ , पण माझ्या मनात खरच लेहला जायच होत. खरतर मनालीहुन बाय रोडने जाण चांगल. कारण लेहची उंची एवढी आहे कि वर दोन दिवसात जाताना आपण त्याच्याशी जुळवून घेऊ शकतो. अचानक दिल्ली लेह विमानाने गेलो तर कदाचित त्रास होऊ शकतो . म्हणजे मि पार्थचा विचार करतोय. आधी मी विचारतो बुकींग मिळेल का ? मिळत असेल तर बघु. मग ठरवु , कारण कधी नव्हे ते 8 दिवस हॉस्पीटल सांभाळायला डॉ. जयंत ही तयार आहे. "
पण जरी सिझन असला तरी मुष्कीलीने दिल्ली-लेह-दिल्ली अस विमानाच अपर क्लासच तिकीट मिळाल, हॉटेलचेहि कसेबसे बुकिंग मिळाले. त्यामुळे अचानक आमच काश्मीर एवजी लेहला जाण झाल.

हो-नाही, करता करता शेवटी एकदाचे लेहला उतरलो. नुकताच पाऊस पडून गेला होता. बाहेर एकदम जबरदस्त थंडावा होता. तिथून एक जीप करुन गावात हॉटेलला आलो.
``अपर्णा बघितलस, समोर बघ . लांबच लांब डोंगरांच्या रांगा आणि हे डोंगरही कसे वेगळ्याच रंगाचे आहेत. समोर खोल दरी, स्वर्ग म्हणजे दुसर काय असणार? हेच हेच . खरच सुंदर आहे .माझी एक ही पण इच्छा आहे की, कधी मला मरण येणार असेलच तर असल्याच ठिकाणी येऊ दे. ते कुठेतरी हॉस्पीटलमध्ये किंवा .......``
``अरे कसल्या गोष्टी करतोयस ? पार्थ आता दोन वर्षाचा आहे अजुन ...``.
``ए तुला ती जुनी रेडियोवरची जाहिरात आठवते ? अग हा मुलगा आता तिन वर्षाचा झाला , मग त्याला एक बहीण नको कां ?``
``मोहित तु म्हणजे न , थांब``
हसत हसत पार्थला खांद्यावर घेऊन मोहित कधीच रुम बाहेर पळाला.

पण तिथे आल्यापासून पार्थ काही नॉर्मल वाटत नव्हता. संध्याकाळी परत थोडा वेळ जोरदार पाऊस पडला. हवा आणखीन कुंद झाली. त्याला अस्वस्थ वाटायला लागले होते.
``मला वाटत मी जे म्हणत होतोन तेच होतय. आपण दिल्लीहून गरमीतुन अचानक इतक्या उंचीवर आल्याने त्याला हा त्रास जाणवत असावा. मी छोटा ऑक्सीजन सिलिंडर आणलाय. त्या बँगेत आहे. तो दे बघु जरा.`` मोहित मधला डॉक्टर जागा झाला होता.
रात्री जेवण झाल. जेवण म्हणजे पार्थ ने काही जास्त खाल्लच नाही. जे खाल्ल ते ओकारी होऊन उलटुन पडल. आमचही त्यामुळे जेवण झालच नाही. आता तर त्याला थोडा श्वासोश्वास करायलाही त्रास होऊ लागला होता.
``अरे हा असा काय करतोय ? ह्याला इथे कुठल्या हॉस्पीटलमध्ये न्याव लागेल का?``
``मी हॉटेलमध्ये सांगितलय. इथले एक लोकल डॉक्टर आहेत त्यांना हॉटेलवाल्यांनी निरोप दिला आहे, ते येतीलच इतक्यात."
ते आल्यावर त्यांनी पार्थला तपासले, आम्ही दोघेही डॉक्टर आहोत हे आम्हि त्यांना सांगितले. त्यांच ही तेच म्हणण पडल की एक तर ह्याला इथल्या वातावरणाशी अकस्टम होईस्तो तुम्ही थोडी वाट बघा, किंवा दुसरा एकच पर्याय आहे की, जितक्या लौकर तुम्हाला खाली जाता येईल तेवढे बघा. जसा जसा तो खाली मनालीपर्यंत जाईल त्याचे हे दुखणे, धाप लागणे कमी होईल.
आमचा दोघांचा मुडच गेला.
``हे बघ मी आत्ताच खाली चौकशी करुन आलो. फ्लाईट तर सर्व बुक आहेत. आपल्याला उद्या सकाळी लौकर निघुन जी टुरिस्ट बस , गाडी , जे मिळेल त्याने लौकरात लौकर खाली जाव लागेल. हॉटेलच्या किंवा त्यांच्या ओळखीच्यांच्या सर्व गाडया बुक आहेत. पण ते म्हणाले की स्टँडवर गेलात तर नशीबाने एखादी रिकामी टॅक्सी मनालीहुन येते- जाते ति मिळू शकेल.``
रात्रभर आम्ही दोघे जागेच होतो. मधुन मधुन ऑक्सीजन सिलिंडर पार्थच्या नाकाला लावत होतो. पण पार्थ सारखा अस्वस्थच होता. त्याचे ब्रिदिंग काही नॉर्मल झाल नाही. पहाटेच लौकर आम्ही बाहेर पडलो. सामान काही अनपॅक केलच नव्हत. त्यामुळे तशाच बॅगा उचलून स्टँडवर आलो. नशिब जोरावर होते. रात्री नुकतिच मनालीहून एक जीप काही टुरिस्टना घेऊन आली होती. सहा दिवस ते टुरिस्ट इथेच राहणार होते. त्यांनी इथलीच एक टॅक्सी ओळखीने आधीच बुक केली होती. त्यामुळे ह्या टॅक्सीवाल्याने परत एक फेरी करायचे ठरवले होते. एक हिमाचलचेच जोडपे व बरोबर त्यांची एक 6 महिन्यांची गोंडंस मुलगी होती. ते आधीच जीपमध्ये होते. आम्ही हो म्हटल्यावर लगेच गाडी निघाली.

आमच्या बरोबर जे होते त्यांचा रोहतांगपास जवळ टुरिस्ट लोकांना बर्फात खेळायला जाताना लाँगकोट, टोपी, काठी, हँडग्लोज हे भाडयाने द्यायचा व्यवसाय होता. त्या माणसांचा भाऊ लेहला रहात होता. छोटी छोटी हॉटेलातली काम करुन तो कसाबसा इथे रहात होता. काल त्यांचा सण होता म्हणून एका दिवसाकरता ते इथे आले होते. तिथला धंदा बुडू नये म्हणून लगेच ते निघाले होते. चिल्का हे त्या छोटुकलीचे नांव होते. गोबरे गोबरे तांबुस गाल, सुंदर चेहरा होता तिचा. निघालो तेव्हा त्या झुंजुमुंजु प्रकाशातही ती गोड दिसत होती. रात्री पाऊस पडून गेल्याने हवेत एकदम गारठा होता. मोहित पुढे कडेला व ड्रायव्हर व त्याच्यामध्ये पार्थ होता. मागे त्या जोडप्याच्या कडेला मी होते. आमच्यामध्ये चिल्का होती. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. कधी एकदा खाली जातोय अस झाल होत.गाडीत सारख पार्थवर लक्ष होते पण मधूनच हलक हलके डोळे मिटत होते.
आणि अचानक एका वळणावर एक समोरुन ट्रक आला. आमच्या डायव्हरने करकचून बेक दाबला पण पावसाने म्हणा की रस्ते ओले होते म्हणून म्हणा गाडी अचानक घसरलि. माझ्या डोळ्यादेखत आम्ही दरीत कोसळू लागलो आणि एकदम एक जोरदार धक्का बसला.

खोल कुठेतरी आपण भुयारात आहोत, खुप श्वास घुसमटतोय, अशी माझ्या मनात जाणीव होत होती. अचानक एका लहानग्याचा रडण्याचा आवाज एकु येऊ लागला. पार्थ, पार्थचा आवाज , एकदम मी शुध्दिवर आले. आधी मला कळेचना की आपण कुठे आहोत. संदर्भच लागेना . फक्त वेदना, वेदना आणि वेदनेचीच जाणीव होत होती. आता उजाडल होत. मी डोळे उघडले. बाजूला रडण्याचा आवाज एकु येत होता. मी हळु मान वळवून बघितले चिल्का जोरजोरात रडत होती. म्हणजे .. म्हणजे आपण कुठे आहोत. आणि माझ लक्ष पुढे गेले. ऍक्सिडेंट झालाय. बापरे पुढे एका डोंगरालगत असणा-या 5-6 फुट रुंद मातीत आमच्या गाडीचे बॉनेट तिरासारखे घुसले होते. ड्रायव्हरच्या छातीत व्हील पार आत गेले होते. आणि हा.. हा.. हा पार्थच बापरे. त्याचा चेहरा रक्ताने व काचांनी भरला होता. आणि बाजूला मोहित. त्याची मान वाकडी होऊन तो पुढल्या डॅशबोर्डवर टेकला होता. मला खुप जोरजोरात रडावेसे ,ओरडावेसे वाटत होते. पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. डोक्यात घणाचे घाव घातल्यासारखे होत होते. मला चक्कर आयला लागली. तेवढयात परत चिल्काचे रडणे माझ्या कानात घुसायला लागले. बाजुला बघते तर तिचे आई-वडिल दोघेही अगदी भयानक अवस्थेत होते. आता आपल्यालाच हालचाल करायला हवी अस मनात बजावून मी उतरायला लागले तर एक भयानक कळ पायातून आली. माझा डाव पाय ड्रायव्हरच्या सीटखाली अडकला होता. तो नक्कीच फॅक्चर झाला होता. कारण गुडघ्यातून खालून तो आहे हेच सेंशेशन मला होत नव्हते. डावा हातही फिरला होता. मी उजव्या हाताने आधी चिल्काला जवळ घेतले, कष्टाने भयाकन कळा सोसत तो पाय सोडवून घेतला व आधी उजवा पाय टेकवून बाहेर आले. अर्धी जिप त्या मातीत घुसली होती. मी जशी बाहेर आले तशी ती तिथली भुसभुशित झालेली माती हळुहळु गाडीच्या वजनाने खाली सरकु लागली. माझा पार्थ.. मोहित.. मला परत भोवळ येऊ लागली ,आणि माझ्या डोळ्यादेखत ति गाडी हळु हळु सरकुन खाली दरित कोसळली. मला काहीच करता आल नाही. जणु आम्ही दोघी बाहेर यायचीच ती वाट बघत होती. ही मुलगी नसती तर त्या गाडीबरोबर मी नक्किच खाली उडी घेतली असती.
डोक नुसत बधीर झाल होत. अंगभर वेदना डसत होत्या. त्यात चिल्का रडत होती. मोठया कष्टाने मनावर मि ताबा ठेवला. म्हटले आधी हिला हॉस्पीटलमध्ये पोहोचवायलाच हवे. पण वर बघितल तर 50 एक फुट उंचीवर रस्ता होता. आजुबाजूला बोडके लालसर डोंगर. माझा डावा पाय व डावा हात मला उचलवेचना. मी एकदम रडकुंडीला आले. कुणाला कळणार कस की आम्ही खाली आहोत. इथे अपघात झालाय . नाही आता कसहि करुन आपल्यालाच वर जायला हव. अंगात घातलेल्या स्वेटरची मी उजव्या हाताने वरची दोन तिन बटणे सोडली, स्वेटरमध्ये त्या चिल्काला घातले व परत बटणे लावली.साडीच्या पदराने एकाच हाताने तीला स्वेटरखाली घट्ट लपेटले.

हळुहळु मी वर चढायचा प्रयत्न करु लागले. फक्त उजवा पाय व उजवा हात चालत होता. एक एक पाऊल चढतांना दिव्य होत होत. हाता पायांच्या बोटांची , अंगावरची सालटी निघायला लागली. एकदोनदा तर घसरत घसरत मी खाली आले. उजव्या अंगावर भार देऊन देऊन तो दुखायला लागला होता. पण निग्रहाने दुसरे कसलेही विचार बाजूला ठेवले, काहीही करुन वर जायचय, हीला वाचवाचय ही एकच भावना मनात होती . ती अजुनही रडत होती तिला कुठे कुठे लागलय हे बघत बसण्याची ही वेळ नव्हती.अंगावरील साडी व कातडीची लक्तर होत मी कशीबशी वर आले. तेवढयात एक गाडी आली पण माझा अवतार बघुन थांबलीच नाही. एका पायावर थरथरत मी उभी होते. तेव्हढयात एक ट्रक येतांना दिसला. मिलीटरीचा वाटत होता. काही विचार न करता मी चिल्काला घेऊन रस्त्यावरच आडवी झाले, माझी शुध्द हरपली.

मला जाग आली तेव्हा मी एका हॉस्पीटलमध्ये होते. डावा हात-पाय फ्लॅस्टरमध्ये होते . डोक्यालाही पट्टी होती . हळुहळु माझ्या संवेदना जाग्या होऊ लागल्या. शेजारीच कॉटवर चिल्का होती. तिच्याही डोक्याला व हाताला बँडेज होते. नर्सला मी उजव्य हाताने विचारले, ति कशी आहे ? ठिक आहे अस हातानेच तिने उत्तर दिले.
आता माझ्या डोळ्या समोर तो प्रसंग दिसू लागला. गाडीचा ब्रेक ,तिच घसरण आणि एक जोरदार धक्का. मी डोळे मिटून घेतले आणि अक्षरशः मोठमोठयाने रडायला लागले.पार्थ , पार्थ ... त्याचा काचेने भरलेला चेहरा. मोहितची तिरकी झालेली मान , तो ड्रायव्हर, चिल्काचे आई-वडिल एव्हडच डोळ्यासमोर येऊ लागल .तेवढयात डॉक्टर आले ,काही मीलिटरीचे जवानही आले.
त्यांनीच आम्हाला इथे आणले होते. माझी चौकशी केली. कुठुन आलात ,कुणाला बोलवायचे आहे का अस विचारल. तेवढयात माझ्या लक्षात आल की काही महिन्यापूर्वीच माझा चुलतभाऊ जो आर्मीत मेजर आहे त्याची लडाखलाच बदली झाली होती. तो कुठे आहे किंवा त्याचा फोन नं. माझ्याकडे नव्हता. पण त्याच नांव मेजर आनंद, हे मी त्या जवानांना सांगितले. त्यातले दोघे जण मराठी होते. नशिबाने त्यांना त्याचा ठिकाणा माहित होता. त्यांनी त्याला निरोप पोहोचवला. काही तासातच तो हजर झाला. तो माझ्या जवळ येऊन बसला. त्याने यायच्या आधी सगळी माहिती घेतली. आपल माणुस आल म्हटल्यावर माझ रडण थांबेचना.

``काय रे हे सगळ अचानक झाल . माझ्या.. माझ्या डोळ्या देखत , मी गाडितुन उतरल्यावर गाडी खाली गेली. मी काहीच करु शकले नाही. त्यातल्या कुणालाच वाचवू शकले नाही``.
``कुणालाच कस नाही. हि आहेन चिमुरडि``
आणि बस माझा हात हातात घेऊन तो किती तरी वेळ बसला. मधूनच मला थोपटत होता. त्या वेळेला त्याच्या त्या स्पर्शातून त्याला मला काय सांगायचय ते कळत होत. संध्याकाळी परत येतो अस सांगुन तो गेला.
बाजूला बघितल. चिल्का शांत झोपली होती. हिच्या नशिबात काय लिहिलय बघा. एवढया लहान वयात असा अपघात, आई-वडिल जाण. आता हिला कोण बघणार ? खरतर तिला जवळ घ्यावस वाटत होत पण मला हलताच येत नव्हत.

संध्याकाळी आनंद आला. म्हणाला पोलीस केस झालीय. सर्व बॉडया पोस्टमार्टमला गेल्यात. त्या मुलीचे आई-वडिल जे गेले , त्यांचा इथला भाऊ आलाय. तो आत आला व चिल्काला बघुन रडु लागला.
``कालच आमचा सण होता. आनंदाने तिघे आले होते. अचानक काय झाल, सगळच पारड फिरल ``म्हणत तो ओक्साबोक्शी रडू लागला.
``अपर्णा.. उद्या सर्व बॉडया ताब्यात येतील. म्हणजे तुझी इच्छा त्यांना इथेच अंतिम संस्कार करायचे की मुंबईला पाठवायचे ?``
बापरे , कालचाच प्रसंग माझ्या डोळ्या समोर आला.मोहितच सहज म्हणण , इथेच मृत्यु यायला हवा , ह्या स्वर्गात. म्हणजे त्याने सहज म्हटल की -
``नको - मुंबईत नको इथेच करु, फक्त न्यायच्या आधी मला तिथे घेऊन जाशील?``
``नको. मी मी त्या इथे आणीन``
``बहेनजी , मी निघु``
``हे बघा , मला तुम्हाला काही विचारायचय ? विचारु``
``हा . विचारान``
``तुम्हाला माहीतीच आहे. ह्या अपघातात तुमचा भाऊ व वहिनि बरोबर माझा नवरा व मुलगापण .."
``हां``
``खरतर आज मी इथे आहे न ति फक्त हिच्यामुळे . हिनेच मला जिवनदान दिलय .चिल्का जर नसती न तर नक्की मी त्या जीपमधून बाहेर आले नसते. माझी एकच इच्छा आहे , मी हिला मुंबईला घेऊन जाऊ ?``
क्षणभर तो थांबला.
``विचार करुन उद्या सांगतो``.अस म्हणत बाहेर पडला.

सकाळी हॉस्पीटलमध्ये ऍम्बुलन्समधून मोहित व पार्थच्य बॉडीज आणल्या. पांढ-या कपडयात गुंडाळलेल्या होत्या. एका खुर्चीत बसवुन मला त्यांच्याजवळ नेल. माझ्या डोळ्यांची धार काही थांबायला तयार नव्हती. त्यांच्या तोंडावरिल कापड बाजूला करायची माझ्यात हिंमत नव्हती. माझ्या सारख डोळ्यासमोर तो काचेच्या तुकडयांनी पार्थचा भरलेला चेहरा, मोहित असच येऊ लागल. मला ते बघवेना. मी परत मागे फिरायला लागले.
तेवढयात तो भाऊ आला , हातात चिल्काला घेऊन. हळुच त्याने तिला माझ्या कुशीत ठेवले. मी सुन्न होऊन दोन्हीकडे बघत होते.

गुलमोहर: 

किती भयानक आहे हे.
मी पण सुन्न झाले वाचुन.
खरच...................
शब्द सुचत नाहि आहेत मला.
अप्रतिम.

हो घटना घडतात. माझा एक मित्र कर्‍हाड हुन पुण्याला येत असताना एस टी घाटात दरीत कोसळली. तो सोडुन सर्व प्रवासी या अपघातात संपले. घटना २५ वर्ष जुनी पण अद्याप स्म्रुतीत आहे.

Sad वाचून फार त्रास झाला. मला मरण हि कल्पना आवडत नाही म्हणून असेल कदाचित . पण लिखाण आवडले. सुन्न झाले आहे वाचून....