विवाह व लग्नसंस्था
'भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे लग्न' हे परंपरागत गृहितक तपासून पहाण्याच्या दृष्टीने या सदरातील सर्व प्रश्न योजले होते. खरंतर या सदरातील केवळ ३ प्रश्न अनिवार्य ठेवले होते तरीही बहुतांशी विवाहित मैत्रिणी असल्याकारणाने की काय. यातील प्रत्येक प्रश्नाला भरभरुन प्रतिसाद आले.
- वैवाहिक स्थिती व लग्नाचे वय:
१२२ पैकी ३८% स्त्रियांनी लग्न न करण्याबद्दल विचार केला होता. म्हणजे बहुतांशी विवाहित अशा या स्त्रियांमध्ये (त्यांच्या मते ) त्यांनी लग्नच न करणे हा एक खरोखरीचा पर्याय म्हणून विचार केला होता ही विचार करण्याजोगी बाब आहे. (इतर पर्यांयांच्या तुलनेत या पर्यायाला किती वजन दिले होते हा आपल्या प्रश्नावलीचा भाग नव्हता.)प्रथम लग्नाचे सरासरी वय साडेचोवीस आहे. सर्वेक्षणात नोंदवलेल्याप्रमाणे प्रथम लग्नाचे किमान वय १८ आहे तर कमाल वय ३७ आहे. परंतू तिशीनंतर लग्न करणार्या स्त्रियांची संख्या फक्त तीन आहे. जास्तीत जास्त म्हणजे २८ स्त्रियांनी (२४%)लग्नाचे वय २४ नोंदवले आहे तर ८४ स्त्रियांची (७३%) २१ ते २५ या वयात लग्ने झाली होती.
- जोडीदाराची निवड:
९१ (७९%) स्त्रियांनी आपल्याच जाती /धर्म व भाषेचा जोडीदार निवडल्याचे नोंदवले आहे. परंतू या सदरातील सर्वच मैत्रिणींनी लग्न करताना या गोष्टींचा विचार केला नव्हता. या प्रश्नाचे उत्तर दिलेल्या ११८ स्त्रियांपैकी ७३ जणींनी म्हणजे ६२% स्त्रियांनी लग्न ठरवताना या बाबी विचारात घेतल्या होत्या. त्यापैकी ३ जणींनी हेही नमूद केले की ठरवून लग्न केल्यामुळे ह्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या. जर प्रेमविवाह केला असता तर या बाबींना महत्त्व दिले नसते. तसेच असेही नमूद केले आहे की ठरवून विवाह करताना बर्याचदा विवाह संस्थांमार्फत लग्न जुळवताना या गोष्टी बघणे भाग पडते.
४५ जणींनी म्हणजेच ३८% स्त्रियांनी जोडीदाराची निवड करताना या बाबी पाहिल्या नव्हत्या. परंतू यातील ६ जणींनी हेही सांगितले की त्यांचा प्रेमविवाह असल्यामुळे जरी जोडीदाराची निवड करताना त्यांनी जात, भाषा, धर्म इ. गोष्टी विचारात घेतल्या नाहीत, तरीही त्यांची आणि त्यांच्या जोडीदाराची जात एकच असल्यामुळे त्यांना लग्न करताना व नंतर जुळवून घेताना (नव्या घरात रुळताना) सोपे गेले/ मदत झाली. तसेच या ४५ जणींपैकी ६ जणींनी सांगितले की जरी जोडीदाराची निवड करताना त्यांनी जात, भाषा या बाबी बघितल्या नसल्या तरी परधर्मातल्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड केली नसती. जोडीदाराचा धर्म विचारात घेतला गेला.
'मुलांच्या लग्नाच्या वेळी धर्म, जात, भाषा इ. गोष्टी विचारात घेणार का?' या प्रश्नाला उत्तर देताना ज्या स्त्रियांनी आपल्या जोडीदाराची निवड करताना या बाबींचा विचार केला होता त्या ७० जणींपैकी १४ जणींनी मुलांच्या लग्नात या गोष्टी विचारात घेणार नाही असे सांगितले, तर १५ जणींनी मुलांच्या लग्नाचा निर्णय त्यांनीच त्यांच्या मर्जीने घ्यावा, आम्ही त्यात दखल घेणार नाही असे सांगितले. फक्त १६ जणींनी मुलांच्या लग्नात पण या बाबी बघू व मगच निर्णय घेऊ हे उत्तर दिले. तसेच ११ जणींनी जर मुलांनी स्वतः आपला जोडीदार निवडला नसेल तर आपण निवडताना हा विचार करु, परंतू जर त्यांनी दुसर्या जाती/ भाषेचा (ची) जोडादार निवडला (ली) असेल तर आक्षेप घेणार नाही असे सांगितले.
ज्यांनी स्वतःचे लग्न ठरवून केल्यामुळे या बाबी बघितल्या होत्या परंतू प्रेमविवाह असता तर याकडे दुर्लक्ष केलं असतं अश्या तीनजणींपैकी दोघींनी मुलांच्या लग्नात या बाबी बघणार नाही असे उत्तर दिले. एकीने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ज्या सहाजणींनी जोडीदाराची निवड या बाबी लक्षात न घेता केली परंतू योगायोगाने एकाच जातीचा जोडीदार असल्याने लग्न करताना व लग्नानंतर घरामध्ये रुळाताना सोपे गेले असे सांगितले, त्यांच्यापैकी ३ जणींनी मुलांच्या लग्नात या बाबी बघणार नाही, एकीने मुलांवर निर्णय सोपवणार, एकीने मुलांनी निवड केली नसल्यास स्वत: निवडताना या बाबी नक्कीच बघणार असे उत्तर दिले, तर एकीने यावर उत्तर दिले नाही. ज्या ५ जणींनी फक्त धर्म विचारात घेतला होता, त्यांच्यापैकी ३ जणींनी कोणतीही बाब विचारात घेणार नाही असे तर दोघींनी निर्णय पूर्णपणे मुलांचा असेल असे सांगितले. ज्यांनी स्वतःच्या लग्नात या बाबी बिलकुल बघितल्या नव्हत्या त्यांच्यापैकी ५८% मुलांच्या लग्नात पण याबाबी बघणार नाही असे सांगितले तर उरलेल्यांनी हा पूर्णपणे मुलांचा निर्णय असेल असे सांगितले.
रुढार्थाने पाहून/ठरवून पारंपारिक भारतीय पद्धतीने/ जोडीदाराच्या निवडीसाठी पारंपारिक निकष पारखून लग्न केलेल्या आधुनिक स्त्रियांचे प्रमाण किती ? त्यावेळेला आपली निर्णयप्रक्रिया नक्की कशी होती, आणि आता पुढील पिढीपर्यंत निर्णयप्रक्रिया कशी राहिल याचे हे आकडेवारीनुसार उमटणारे चलचित्र एक वाचक म्हणून तुम्हाला प्रातिनिधीक वाटते का ?
-
लग्नासाठी दबाव:
१२२ जणींपैकी ५ जणींनी लग्नासाठी दबाव जाणवला का या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्यातल्या २ विवाहित तर ३ अविवाहित आहेत. या ५ही जणी भारतीय वंशाच्या आहेत. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या महिलांपैकी २५ जणींना (२१%) लग्नासाठी दबाव जाणवला तर १० जणींनी (९%) थोडासा दबाव जाणवला योग्य वेळी लग्न केलेले बरे असा सूर जाणवत राहिला. यामध्ये २ जणी अभारतीय वंशाच्या आहेत. त्यांनी सुद्धा लग्नाचा दबाव नाही पण लग्नाबद्दल, कुटुंब सुरु करण्याबाबत विचारणा झाली असे सांगितले. ६ जणींनी (५%) दबाव जाणवणे सुरु व्हायच्या अगोदरच लग्न केले असे सांगितले. यात एक अभारतीय वंशाची स्त्रीसुद्धा आहे. ३ स्त्रियांनी दबाव जरी जाणवला नसला तरी लग्नाबद्दलची काळजी जाणवली असे नमूद केले आहे.
७३ (६२%) इतक्या लाक्षणिक संख्येने स्त्रियांनी लग्नासाठी कधीच, कोणताही दबाव जाणवला नाही असे उत्तर दिले. (टीपः आपण दबावाची व्याख्या स्पष्ट केली नव्हती. उदा- "मुलगी आहे, कधी न कधी लग्न होऊन सासरी जाईल" या वाक्याला दबाव म्हणावे की न म्हणावे याचा निर्णय प्रश्नावली भरणारीवर आणि आता वाचकावर सोपवत आहोत.)
लग्नासाठी दबाव जाणवलेल्या २५ जणींपैकी ११ जणींनी लग्न न करण्याच्या पर्यायाचा विचार केला होता. यावरून आपल्याला कदाचित असेही म्हणता येईल की या ११ जणींना दबावामुळे लग्न करावे लागले. लग्नासाठी दबाव न जाणवलेल्या ७३ जणींपैकी २४ जणींनी एकटे रहाण्याच्या पर्यायाचा विचार केला होता व त्यापैकी ३ जणी अविवाहित आहेत.
बहुतांशी म्हणजे २४ स्त्रियांनी २० -२५ या वयापासून लग्नासाठी दबाव जाणवायला सुरवात झाली असे सांगितले आहे. कमीत कमी म्हणजे १६-१७ व्या वर्षापासूनच लग्नासाठी दबाव जाणवल्याचे काही जणींनी नोंदवले आहे. अर्थात हे प्रमाण कमी आहे. अगदी वयाच्या १०व्या वर्षापासूनच एक दिवस लग्न होऊन सासरी जायचंय हे लहानपणापासूनच बिंबवले गेले होते, असेही सांगितले आहे. उशीरात उशीरा म्हणजे वयाच्या २७-३० या काळात दबाव जाणवल्याचे नोंदवले आहे. परंतू अशा स्त्रियांचे प्रमाणही कमीच आहे. त्याचबरोबर ३ जणींनी शिक्षण संपल्याबरोबर लग्नासाठी दबाब/ विचारणा सुरु झाली असेही सांगितले आहे.
लग्नासाठी दबाव घरच्यांच्यापेक्षा दारच्यांचाच (समाज, नातेवाईक, घरोब्याची म्हणवणारी मंडळी) जास्त होता. त्यांचा आक्षेप माझ्या खेळण्यावर होता. ही आधीच इतकी काळी इतकी उंच...उन्हातान्हात खेळून अजून काळी/उंच होणार..हिला नवरा कसा मिळणार? आणि आता काय खेळायचं वय आहे का? चांगली बी.ए. झालीये(तेव्हा माझं वय १९ होतं....शिक्षण लवकर झालेलं होतं.) तसा दबाव म्हणाल तर साधारण पणे १७/१८ पासून सुरू झालेला होता.
नाही. घरच्यांचा दबाव नव्हता. मी एकटीच कमावती होते त्यामुळे लग्न करु नये अशीच इच्छा होती. वडीलांना मी लग्न करावे असे अजिबात वाटत नव्हते.
तसेच काही स्त्रियांनी त्यांना स्वतःला असा दबाव जाणवला नसला तरी त्यांच्या बहिणींना असा दबाव जाणवला होता असे उत्तर दिले. यात एक अभारतीय वंशाची महिलासुद्धा आहे.
बर्याच जणींच्या उत्तरामध्ये दबावाबरोबरच किंवा दबाव नसलातरी घरातून वेळच्या वेळी लग्न झालेले बरे असा सूर जाणवला असे लक्षात आले. यात अभारतीय महिलांचाही समावेश आहे. - लग्नसमारंभाचा खर्च
- लग्नसमारंभामध्ये आवडलेल्या व खटकलेल्या गोष्टी:
आयुष्यातील एका महत्वाच्या विधीबद्दल स्त्रियांच्या मनात आज वळून पाहताना नक्की काय भावना आहेत, या प्रश्नाला अजून टोकदार बनवण्यासाठी आवडलेल्या आणि खटकलेल्या गोष्टींबद्दल विचारले आणि अक्षरशः 'दिल खोलके' प्रतिसाद आले. या प्रतिसादांना प्रातिनिधीक म्हणता येईल का याबद्दल वाचकांनी मत जरुर कळवा. बहूतांशी भारतीय स्त्रियांचा एकंदरीतच समारंभीय लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, आणि आयुष्यात बर्याच अंशी समानतेचा अनुभव आलेल्या स्त्रियांना लग्नसमारंभाचा खर्च हा मुलीकडच्यांनीच करावा आणि एकंदरीत लग्नसमारंभातले रुसवेफुगवे आणि अनुभव याबद्दल वाचकांनी विचार करावा.
एकुण ६५ जणींनी लग्नसमारंभामध्ये आवडलेल्या गोष्टींचा उल्लेख केला. त्यातील २५ जणींनी एकापेक्षा जास्त आवडलेल्या गोष्टींचा उल्लेख केला.सर्वात जास्त म्हणजे २० जणींना लग्नातला साधेपणा, कमी खर्च, कमी व फक्त महत्त्वाचे विधी असणे आणि आटोपशीरपणा या गोष्टी आवडल्या तर त्याखालोखाल १० जणींना त्यांचे लग्न हसत खेळत कोणत्याही तणावाशिवाय पार पडले ही गोष्ट आवडली. याशिवाय आवडलेल्या गोष्टी म्हणजे:
- विधीवत साग्रसंगीत केलेला solemn समारंभ (९)
- मानपान न करणे (८),
- सासरच्यांनी काहीही मागण्या केल्या नाहीत (६),
- नोंदणीपद्धतीने केलेला विवाह (८),
- लग्नात भेटवस्तु व आहेर न घेणे/ न करणे (४),
- नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे लोक यांच्याशी झालेली भेट (६),
- मनासारखा जोडीदार मिळाला (४),
- नवरा व स्वतः दोघांनी साठवलेल्या पैशातून लग्नाचा खर्च केला / आई-वडिलांकडून पैसे घेतले नाहित (५),
- नवर्याने/ सासरच्यांनी लग्नसमारंभात सांभाळून घेणे/ पाठीशी रहाणे (३),
- जेवण (३),
- दोन्ही बाजूंनी लग्नखर्च वाटून करणे, स्वतः लग्न खर्च करणे (२),
- नवर्यामुलाने कर्ज काढून लग्न खर्च भागवणे,
- विधवा सासुबाईंनी विधी करणे,
- एकुणच लग्न समारंभ आवडणे व व्यवस्था आवडणे ई.
- दोन वेगवेगळ्या वातावरणातिल दोन्ही बाजुच्या नातेवाईकांनी एकमेकांच्या चालीरीती समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवडले.
८१ जणींनी लग्नसमारंभात काय खटकलं या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यामध्ये १२ जणींनी कोणतीही खटकण्यासारखी गोष्ट नव्हती असे सांगितले. उरलेल्या ६९ पैकी ४४ जणींनी एकच गोष्ट खटकल्याचे सांगितले आहे तर २५ जणींना एकापेक्षा जास्त गोष्टी खटकल्या. सर्वात जास्त म्हणजे २४ जणींना (३५%) लग्नातला खर्च फक्त मुलीकडच्यांना करावा लागला किंवा दोन्ही बाजूंनी मिळून लग्नखर्च केला नाही ही बाब खटकल्याचे सांगितले. यात २ स्त्रिया अभारतीय वंशाच्या आहेत हे महत्त्वाचे. त्याखालोखाल १२ जणींना (१७%) लग्नसमारंभातील सासरच्या व्यक्तींचा वरचढपणा खटकला, तर ८ जणींनी ( १२ %) लग्नसमारंभातील पाय धुणे व तत्सम वरपक्षाचा वरचढपणा दाखवणारे विधी खटकल्याचं सांगितलं. याव्यतिरिक्त आहेर व मानपान, दागिन्यांची मागणी, आहेरावरुन कुरकुर या बाबी ८ जणींना (१२%) तर सासरच्या व्यक्तींचे लग्नसमारंभातील गैरवर्तन व रुसवेफुगवे या गोष्टी ७ जणींना (१०%) खटकल्या. सासरचा वरचढपणा आणि नातेवाईकांची लुडबुड न आवडल्याचे सांगणार्या स्त्रियांमध्ये अभारतीय स्त्रियांचा पण समावेश होता.
याशिवाय उल्लेखलेल्या न आवडलेल्या गोष्टींमध्ये विधीवत लग्न केले त्याऐवजी नोंदणी पद्धतीने लग्न करायला हवे होते, स्वतःच्या आई-वडिलांचा मान राखला गेला नाही, घाईघाईत लग्न झाले, जास्त पाहुणे आले होते, लवकर लग्न केलं, खूप दगदग झाली, नवर्याचा जास्त सहभाग नव्हता, स्वयंपाक कमी पडला, रुखवत ठेवले होते, साखरपुडा करावा लागला, अक्षता ठेवल्या होत्या, भटजींनी गोंधळ घातला, खेडेगावात लग्न असल्यामुळे अव्यस्थितपणा होता, RSVPची सोय असायला हवी, हेअरस्टाईल आवडली नव्हती इ. गोष्टी आहेत.
-
घटस्फोटीत/विभक्त असल्यास तो अनुभव घटस्फोट घेण्याच्या/ विभक्त होण्याच्या कारणांसहित (सांगावसा वाटल्यास) सांगा. पुनर्विवाहाबद्दल मत काय?
या प्रश्नाला अतिशय मोकळेपणाने काही उत्तरं मिळाली.
घरच्या दबावामूळे ही व्यक्ती जोडीदार म्हणून योग्य नाही हे साखरपूड्यानंतर कळूनही वाङनिश्चय तोडण्याचं धाडस केलं नाही व त्याचा शेवट घटस्फोटात झाला.
घरच्या परिस्थितीमुळे स्वत:चं लग्न स्वत: ठरवून थोडं लवकर केलं तेव्हा नातं म्हणजे नक्की काय हे कळत नव्हतं. जेव्हा ते समजलं, नात्याच्या जबाबदार्या समजल्या तेव्हा आपण घेतलेला निर्णय चूक होता हे जाणवलं. त्यातूनही घटस्फोटापर्यंत गोष्ट जाऊ नये म्हणून नातं सुधारण्यासाठी काहीकाळ समुपदेशकाकडे गेले, नवर्याने नकार दिला, मला जे आयुष्य हवं होतं तसं तो देऊ शकत नव्हता. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कर्ता पुरूष म्हणवण्यासाठी घरासाठी काही जबाबदार्या पार पाडाव्या लागतात हेच त्याच्या गावी नव्हतं. नावलौकिक हवा पण जबाबदारी नको? हे कुठलं गणित? त्यामुळे मी घटस्फोटासाठी अर्ज केला. नवरा किंवा सासरकडची मंडळी कधीही कोर्टात हजर राहिली नाहीत.
पुनर्विवाह करावा की नाही याविषयी अजून ठाम निर्णय नाही झालेला. घटस्फोट होऊन काही काळ लोटला आहे. सुरवातीला दुसर्या लग्नासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. नंतर बर्याच लोकांना भेटून त्यांचा पॅटर्न लक्षात आल्यावर कधी कधी वाटतं एकटंच बरंय. पण मग पुढचे विचार डोक्यात येतात तेव्हा अवघड वाटतं. पुनर्विवाह केला तरी तो पुर्णपणे व्यवहारीक दृष्टीकोनातून करेन.घटस्फोट घेणे हा अतिशय दुखदायक अनुभव होता, लहान मुले असतिल तर अजूनच दुखदायी अनुभव ठरु शकतो. घटस्फोट टाळता आलेलं कधीही चांगलच या प्रतिक्रिया अभारतिय महिलांनी दिल्या.
त्याच बरोबर हा दुखदायक पण त्याचबरोबर मुक्त करणारा अनुभव होता अशीही प्रतिक्रिया मिळाली.याव्यतिरिक्त घटस्फोटानंतर योग्य विचार करुन पुर्नविवाह करावा असेही मत काही जणींनी मांडले.
-
तुम्ही Live-In प्रकारचे नातेसंबंध अनुभवले आहे का ? किती काळ ?
या प्रश्नाचे उत्तर दिलेल्या ९६ स्त्रियांपैकी ८९ जणींनी नाही आम्ही लिव्ह-ईन नातेसबंध कधीच अनुभवला नाही असे उत्तर दिले. असे उत्तर देणार्यांपैकी बहुतांशी स्त्रियांनी अशा नातेसंबंधांवर विश्वास नाही असेही सांगितले.
नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्ही अनुभव घेतला नाही पण असे राहून बघण्यास हरकत नव्हती असे उत्तर ११ स्त्रियांनी दिले. असे उत्तर देणार्या सर्व स्त्रिया भारतीय वंशाच्या आहेत. या स्त्रियांपैकी काहींनी पुढे असेही म्हटले आहे की, जरी त्यांना स्वतःला लिव्ह-ईन नातेसंबंधाचा अनुभव घ्यायला हरकत नव्हती तरी घरच्यांनी हरकत घेतली असती/ तेवढी हिंमत नव्हती किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. याचबरोबर भावनांवर ताबा असेल तर लिव्ह-ईन नातेसंबंधांना काहीच हरकत नाही असेही मत मांडले गेले.
याव्यतिरिक्त १० जणींनी लग्नाआधी अशा नातेसंबंधांचा अनुभव घेतला होता. यात ४ अभारतीय वंशाच्या तर ६ भारतीय वंशाच्या स्त्रिया आहेत. अशा नातेसंबंधाचा कालावधी किमान १५ दिवस-एक महिना ते कमाल एक वर्षापर्यंत दिसून आला आहे. ज्या भारतीय स्त्रियांनी असा नातेसंबंध अनुभवला आहे त्यांनी logistical कारणांमुळे किंवा एका शहरात असताना एकत्र राहिलो होतो, असे उत्तर दिले. याचबरोबर घरच्यांच्या सल्ल्यानुसार लग्नाआधी काही महिने एकत्र रहात होतो असेही उत्तर मिळाले. -
लग्नाला, Live In नातेसंबंधाला झालेल्या काळानुसार शारीरिक आकर्षण कमी होते असं वाटतं का?
या प्रश्नाला १२२ पैकी ९ जणींनी उत्तर दिले नाही, त्यातल्या ५ जणी अविवाहित आहेत. उत्तर दिलेल्या ११३ जणींपैकी ५८ जणींना काळाप्रमाणे शारीरिक आकर्षण कमी होते असे वाटते तर ४३ जणींच्या मते शारीरिक आकर्षण कमी होत नाही. याव्यतिरिक्त ८ जणींनी 'माहित नाही' हे उत्तर दिले आहे. बाकीच्या उत्तरांमध्ये आकर्षण काळानुसार कमी होते, परिस्थितीनुसार बदलते, प्राथमिकता (priority) बदलते व असे आकर्षण कधी वाटलेच नाही अशी उत्तरे मिळाली आहेत.
असे आकर्षण कमी होणे नॅचरल आहे कारण नंतर शारिरीक आकर्षणाबरोबरच अनेक इतर सूरही जुळलेले असतात. त्यामुळे शारीरिक आकर्षण हाच केन्द्रबिंदू रहात नाही. व जोडीदाराची खात्री पटत जाते, एकमेकांतला विश्वास दृढ होत जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर प्रापंचिक जबाबदार्या वाढल्यामुळे शारीरिक संबंधांना दुय्यम स्थान मिळते. हाच सूर ज्यांना आकर्षण कमी होते असे वाटते अशा बहुतांशी स्त्रियांच्या उत्तरामध्ये दिसून आला.
जर एकमेकांबद्दल प्रेमादर वाटत असेल तर शारीरिक आकर्षण अजिबात कमी होत नाही, उलट मुरलेल्या लोणच्यासारखी त्याची लज्जत वाढत जाते. तेच जर प्रेमादर नसेल तर शारीरिक संबंध केवळ mechanical act म्हणुन उरतात. शारीरिक आकर्षण कमी होत नाही असे मानणार्या बर्याच जणींनी नात्यामधल्या परिपक्वतेमुळे आकर्षण वाढते असेही नमूद केले.
-
लग्नानंतर नाव / आडनाव बदलले का ?
या प्रश्नाच्या उत्तरात ४०% स्त्रियांनी नाव/ आडनाव बदलले नाही असे उत्तर दिले तर ५९% स्त्रियांनी बदलल्याचे सांगितले. यापैकी ३ जणींनी नाव आणि आडनाव दोन्हीही बदलल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे १% स्त्रियांनी दोन्ही आडनावं लावते असेही उत्तर दिले.ज्या स्त्रियांनी आडनाव बदलले नाही असे सांगितले आहे त्यातल्या ५ जणींनी वेळेअभावी बदलू शकले नाही, नविन पासपोर्ट बनवताना बदलणार आहे, बदलायला आवडले असते परंतू व्यावसायिक कारणांमुळे बदलता आले नाही असे सांगितले. याचबरोबर एकीने मी आडनाव बदलले नाही तर नवर्यानेच आडनाव बदलले व तो माझे आडनाव लावतो असे सांगितले.
नाव का बदललं किंवा का बदललं नाही याबाबत सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रियांनी केलेल्या टिप्पण्ण्या वाचण्यासारख्या आहेत.
हो. आडनाव बदललं. मला आवडतं नवर्याचं आडनाव लावायला. माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याच्या कुटुंबाचा मी हिस्सा आहे असं मला वाटतं. असं केल्याने माझ्या माहेरच्या आडनावाचा अपमान होत नाही, की कमीपणा येत नाही, की माझं कर्तृत्व झाकोळलं जात नाही, म्हणून बदललं.
आडनाव बदललं. एक कुटूंब म्हणून ओळख असण्यासाठी आपल्या समाजात मुलीने लग्नानंतर नवर्याचं नाव आडनाव लावण्याची पद्धत आहे जी मला मान्य आहे.
इच्छा नव्हती पण माझ्याच घरच्यांनी दबाव आणला. आणि त्याचं मला लग्नाला १० वर्ष झाली तरी वाईट वाटत. माझी ओळख बदलल्यासारखी वाटते.
आईवडिलांच्यामुळे आपण घडतो तेव्हा त्यांनी दिलेलं नाव-आडनाव हे महत्वाचं. नवर्याचं आडनाव लावणे हे नवर्याची व नवर्याच्या कुटुंबाची मालकी मान्य केल्यासारखं वाटतं. नवर्याच्या आडनावाशी associate करू शकत नाही.नाही. लग्न ही फक्त एक phase असते, त्यासाठी स्वता:च्या अस्तित्त्वात कसलाही बदल घडवायची गरज वाटली नाही. नवरा बदलतो का नाव/आडनाव?
आडनाव न बदलणे असाही काही विचार असु शकतो हेच माहित नव्हते. सगळ्यांची आडनावं बदलतात तसंच माझंही बदललं गेलं.
-
कोर्टशीप कालावधी किती होता आणि तो तुम्हाला पुरेसा वाटला का ?
या प्रश्नाच्या उत्तरात मैत्रिणींनी काहीच कालावधी नव्ह्ता, फक्त एकदा नवर्याला भेटायला गेले होते, ४ दिवसात लग्न झालं पासून ते ८ वर्षे कोर्टशीप होती इथपर्यंत वेगवेगळी उत्तरं दिली.सर्वात जास्त म्हणजे १६ जणींनी कोर्टशीप ६ महिने होती असे सांगितले आहे. एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कोर्टशीप कालावधी असलेल्या स्त्रियांचे प्रमाण ४५% आहे. त्यातील ७७% मैत्रिणींना कोर्टशीपचा कालावधी पुरेसा वाटला. ५% स्त्रियांनी अजून कालावधी असायला होता असे सांगितले तर एकीने कालावधी कमी नव्हता पण अजून असता तरी चालले असते असे सांगितले.
एका वर्षापेक्षा कमी कोर्टशीप कालावधी असलेल्यांची संख्या ५४% आहे. एकीने कालावधी किती होता हे न सांगता पुरेसा होता इतकेच सांगितले आहे. एका वर्षापेक्षा कमी कोर्टशीप कालावधी असलेल्यांपै़की ३१ जणी सध्या परदेशात रहात आहेत (त्यातल्या २ जणी अभारतीय वंशाच्या आहेत.) यापैकी ४९% मैत्रिणींनी त्यांना कोर्टशीप कालावधी पुरेसा वाटला असे सांगितले तर ३ जणींना हा कालावधी कमी नसला तरी अजून कालावधी मिळाला असता तर चालले असते असे वाटले. एका मैत्रिणीने हा कालावधी कमी होता की पुरेसा होता याची खात्री नाही असे सांगितले. तर १४ जणींना निश्चितपणे हा कालावधी कमी वाटला. या १४ जणींपैकी ९ जणी परदेशात स्थित भारतीय स्त्रिया आहेत तर एकजण अभारतिय वंशाची स्त्री आहे.
एक वर्षापेक्षा जास्त कालावधी मिळालेल्यांपै़की बहुतेकांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी हा कालावधी पुरेसा होता असे सांगितले.
दीड वर्ष कालावधी होता पण मला काय प्रश्न विचारयचे तेच माहित नव्हते. फार लवकर लग्न केले. ते चुकले त्यात पुढे नवर्याची पण ओढाताण झाली असणार नक्की
कोर्टशिप नव्हतीच. एकदा दाखविण्याच्या कार्यक्रमात भेटलो नंतर मुलाकडच्यांचा होकार आला म्हणून डायरेक्ट साखरपुड्यालाच गेलो.
८-९ महिने आम्ही एकमेकांशी बोलत होतो, अर्थात त्यावेळेस एकमेकांशी लग्नाचा निर्णय घेतलेला नव्हता. कालावधी अजूनही चालला असता, पण आधीच वय उलटून गेल्यामुळे वेळही नव्हता.९ महिने कालावधी मला जास्तच वाटला खरंतर.
९ महिने कोर्टशिपचे घालवूनही लग्नानंतरची काही सरप्राईजेस चुकली नाहीतचसहा महिने वेळ मिळाला पण मला बिलकूल वेळ नको होता किंवा ८ दिवस मिळाले, तेव्हढेच पुरले
-
लग्न झालेल्या स्त्रीसाठी बाह्यसंकेत (सौभाग्यचिन्ह इ.) वेगळे असावेत का? ते फक्त स्त्रियांसाठीच लागू व्हावेत का? तुम्ही वापरता का?
या प्रश्नाच्या उत्तराला नुसते हो किंवा नाही असे उत्तर न देता, बहुतांशी जणींनी मनापासून आपले मत विस्तृतपणे मांडले आहे.
वरील स्त्रियांमध्ये अभारतीय वंशाच्या मैत्रिणीही आहेत. जर बाह्यचिन्हाच्या वापराबद्दल अभारतीय वंशाच्या मैत्रिणींचे (आपल्याकडील अभारतीय मैत्रिणींचे प्रतिसाद संख्येने पुरेसे नसले तरी प्रतिसाद आलेल्यांपैकी) काय मत आहे हे वेगळे तपासले तर लक्षात येते की त्यापैकी ५०% मैत्रिणींना अशी चिन्हे असावित असे वाटते, तर ३०% बाह्यचिन्हे ऐच्छिक असावित या मताच्या आहेत. उरलेल्या दोघींनी दोघांनाही लागू असावीत वा नसावीत अशी उत्तरे दिली.
भारतीय वंशाच्या स्त्रियांपेक्षा अभारतीय वंशाच्या स्त्रियांनी बाह्यचिन्हे असावीत या मताला जास्त झुकते मत देत असल्याचे एक कारण बहुधा त्या समाजामध्ये अशी चिन्हे स्त्री व पुरूष दोघांनाही लागू होतात हे असावे.
७८% स्त्रीयांच्या मते सौभाग्यचिन्हे नसावित किंवा ऐच्छिक असावित, परंतू तुम्ही सौभाग्यचिन्हं वापरता का या प्रश्नाला ३० जणींनी (२९%) घालते असे उत्तर दिलेय तर ३९ जणींनी (३८%) स्थळ, परिस्थिती यानुसार घालते (म्हणजे कधी कधी घालते, लग्नसमारंभात घालते, सासरी घालते, भारतीय पोशाख असेल तर घालते वै. वै.) असे सांगितले आहे. फक्त काही गोष्टी जसे की फक्त मंगळसुत्र, किंवा फक्त जोडवी, फक्त अंगठी इ. घालते असे सांगणार्या मैत्रिणींची संख्या ७ आहे, तर घालतच नाही असे २७ जणींनी (२६%) सांगितले आहे.यातील बर्याच मैत्रिणींच्या मतावरून असे लक्षात आले आहे की, बहुतांशी जणी मंगळसुत्र किंवा तत्सम सौभाग्यचिन्हाकडे एक दागिना म्हणूनच बघतात. सवय आहे म्हणून, किंवा नटण्याची आवड आहे, किंवा घरातल्या मोठ्यांची मने दुखावली जावू नयेत म्हणून सौभाग्यचिन्ह वापरणार्याचे प्रमाण खूप जास्त आहे.
बाह्यसंकेत असावेत का व आपण वापरता का या प्रश्नाच्या उत्तरात आपण बाह्यसंकेत का वापरतो किंवा का वापरत नाही हेही सांगितले आहे.बर्याचजणींनी भारतात स्त्रीला संरक्षणाच्या दृष्टीने बाह्यसंकेताचा उपयोग होतो असे सांगितले आहे.
बाह्यसंकेत दोघांसाठी असावेत. स्त्रीच्या दृष्टीने ते एक कवच असते (कधी कधी). मी मंगळसुत्र अशावेळी वापरते जेव्हा 'मी एकटी नाही' असे मला लोकांना जाणवु द्यायचे असते. कुंकु मी फार कमी लावते (साडी नेसली तर). तसेच पुरुषांनी वापरले तर बरे, म्हणजे अविवाहित मुली कमी फसतील.
बाह्यसंकेत नसावेत. हा खरं तर अप्रामाणिकपणा झाला, पण मी मंगळसूत्र लपेल असे करत देशात वापरते. अमेरिकेत अजिबात नाही. देशातही न घालण्याचा प्रयत्न करणार आहे.
लग्न झालेला पुरूष वेडिंग रिंग केवळ घालत असेल तर स्त्रीलाही तितकेच बास आहे. मी केवळ रिंग घालते ९९% वेळा. पण जेव्हा भारतीय पोषाख केला जातो तेव्हा मंगळसूत्र घातले जाते. तसेच आईबाबा-सासूसासरे यांच्याबरोबर असताना मी आवर्जून स्वतःहून ते घालते. मी नाही घातले तर ते काही बोलणार नाहीत, परंतू घातलेले त्यांना आवडेल हे माहीत असल्याने मी त्यांचे मन मोडत नाही.
माझ्यामते लग्न झालेल्या स्त्रियांसाठी बाह्यसंकेत त्यांना आवडत असतील तर त्यांनी वापरायला हरकत नाही. लागू कोणालाच असावेत असं वाटत नाही मला. मनाने नातं स्विकारलं की बाह्यसंकेतांची आवश्यकताच काय? सर्व बाह्यसंकेत पाळून नातं निभावलंच नाही तर उपयोग काय? त्यामूळे पुरूषांनाही बाह्यसंकेत लागू असावेत अशी आडमोठी मागणी जरी मी केली तरिही त्यांनी जर नातं आतून निभावलं नाही तर ते बाह्यसंकेत फक्त बाह्यसंकेत किंवा शोभेच्या वस्तू होतील. त्या संकेतांपेक्षा आंतरिक बदल आवश्यक आहे.
(हिंदूधर्मात) त्यांच्यामागे शास्त्रीय कारण असते, जसे की पायाच्या बोटात चांदीची जोडवी.
निष्कर्ष
या विभागाला आलेल्या प्रतिसादांवरून लग्न हा एकंदरीतच स्त्रियांच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे लक्षात येते. सर्व उपप्रश्नांच्या विश्लेषणात ठळक Trends ना अधोरेखित केलेले आहेच.
लग्न हा जितक्या जिव्हाळ्याचा विषय तितकाच घटस्फोट हा कठीण अनुभव याबाबत स्त्रियांचे दुमत नाही.
लग्नासाठी (त्यांच्या मते) कसलाही दबाव जाणवला नाही असे बहूतांशी स्त्रियांना वाटते.
शिक्षण आणि लग्नाचे वय, लग्नाचा खर्च, जोडीदाराची निवड करताना लक्षात घेतलेले घटक यामध्ये काही ठोस संबंध प्रस्थापित झाला नाही.
कोर्टशिपचा कालावधी हा भारतीय स्त्रियांच्या लग्नाविषयीच्या भुमिकेत खूप जास्त महत्त्वाचा घटक नाही, ठरवून केलेल्या लग्नाच्या निर्णयात पारंपारिक निकषाचे स्थान अबाधित आहे, परंतू पुढील पिढीच्या लग्नाबाबत निश्चित असे विचार आहेत.
लग्नसमारंभातील आवडलेल्या/ खटकलेल्या गोष्टींमधून मैत्रिणींचे विचार स्पष्ट होतात, लग्नखर्च दोन्ही बाजूंकडून वाटून घेतल्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मानपान, लग्नानंतर बदललेले अथवा न बदललेले आपले नाव, लग्नानंतर लागू होणारे लग्न झाल्याचे निदर्शक असे बाह्यसंकेत, वाढत्या काळानुसार लग्नसंबधातले कमी होणारे शारीरिक आकर्षण याबाबतही स्त्रियांनी खूप विचार केला आहे. लिव्ह-ईन नातेसंबंधाबाबतही एक पर्याय या दृष्टीने विचार केलेला जाणवतो.
एकंदरीत प्रश्न जितके टोकदार तितकाच त्याबद्दल न संकोचता /न बिचकता येणारा प्रामाणिकपणाचा सूर हेच या सर्वेक्षणाचे यश असे म्हणावे लागेल.
खुपशा प्रश्नांना "हो त्यावेळी आम्ही असे केले, परंतू...." अश्या प्रकारच्या उत्तरांमध्ये अतिशय विचारपूर्वक आपल्या स्वतःचा लग्नानुभव, वैचारिक बैठक आणि त्याच्याशी ताळमेळ न साधणार्या प्रकारे केलेले लग्नाबाबतचे/ बाह्यसंकेतांबाबतचे निर्णय, आणि पुढील पिढीच्या लग्नसंबंधाबाबत अपेक्षा यासंबंधी व्यक्त केलेले प्रामाणिक विचार हे विश्लेषक म्हणून आम्हाला महत्त्वाचे वाटतात.
स्वाती,बाह्यसंकेताच्या सगळ्या
स्वाती,बाह्यसंकेताच्या सगळ्या पोस्टना अनुमोदन.
मध्यंतरी कुठेतरी लेख वाचला
मध्यंतरी कुठेतरी लेख वाचला होता. हिंदू धर्मात दागिन्यांचे महत्व असा काहीतरी, त्यात जवळ जवळ सगळ्या दागिन्यांविषयी माहिती होती अगदी पुरूष घालतात त्या पण.
बघते परत मला मिळाला तर. इथे टाकेन.
केवळ 'कोणाला तरी' नाही तर
केवळ 'कोणाला तरी' नाही तर 'एकाच कोणासाठी तरी छान दिसायचे' असा त्यामागचा उद्देश स्वत:ला तर आरशात पण बघायचे नाही म्हणे
लई भारी ! अभिनंदन सर्वे टीम
लई भारी ! अभिनंदन सर्वे टीम !
'मुलांच्या लग्नाच्या वेळी धर्म, जात, भाषा इ. गोष्टी विचारात घेणार का?' >>> अजुन २० वर्षानंतर मुलांनी सांगुन जरी लग्न केलं तरी पुष्कळ आहे
'मुलांच्या लग्नाच्या वेळी
'मुलांच्या लग्नाच्या वेळी धर्म, जात, भाषा इ. गोष्टी विचारात घेणार का?' >>> अजुन २० वर्षानंतर मुलांनी सांगुन जरी लग्न केलं तरी पुष्कळ आहे >>>>
लग्न केलं तरी पुष्कळ आहे कालच सर्वोच्च न्यायालयाने लग्नाशिवाय संबधाना परवांगी दिली आहे
मुलानी मुलीशी आणि मुलीनी
मुलानी मुलीशी आणि मुलीनी मुलाशी लग्न् केले/ लॉयल रिलेशन्शिप ठेवली तरी पुष्कळ आहे :).
लग्न झालेल्या स्त्रीसाठी
लग्न झालेल्या स्त्रीसाठी बाह्यसंकेत (सौभाग्यचिन्ह इ.) वेगळे असावेत का? ते फक्त स्त्रियांसाठीच लागू व्हावेत का? >>> आता पुरुषांना अंगठीशिवाय अजुन दुसर्या कुठल्या चिन्हांची गरज आहे का ? हातात दोन पिशव्या अन दाढीचे वाढलेले खुंट पाहिले की तो विवाहीत आहे असे खुशाल समजावे
...
...
माफ करा, हातात दोन पिशव्या
माफ करा, हातात दोन पिशव्या ह्या बरेचदा बायकोने दिलेली यादी हरवल्याने व वाट्टेल ते सामान घेतल्याने असतात. शिवाय दाढीचे वाढलेले खुंट हा निव्वळ आळशीपणा असतो
दाढीचे वाढलेले खुंट हा निव्वळ
दाढीचे वाढलेले खुंट हा निव्वळ आळशीपणा>>> हॅहॅहॅ तरीच बॉस खुंट वाढवून येतो मला वाटल त्यान लग्न केल
हॅहॅहॅ तरीच बॉस खुंट वाढवून
हॅहॅहॅ तरीच बॉस खुंट वाढवून येतो मला वाटल त्यान लग्न केल <<
केलंच असणार. लग्न झाल्यावर बाप्या असतो त्याच्यापेक्षा जास्त आळसाचा गड्डा होतो...
>>लग्न झाल्यावर बाप्या असतो
>>लग्न झाल्यावर बाप्या असतो त्याच्यापेक्षा जास्त आळसाचा गड्डा होतो... >>
या वाक्यासाठी तुला हवं ते...
>>ही संख्या सकृत्दर्शनी
>>ही संख्या सकृत्दर्शनी चांगली आहे, पण त्याच्याच जोडीला ८४% नी २१-२५ वयात (तरीही) लग्न केलंच ही देखील लक्षणीय बाब आहे.
२१-२५ मधे लग्न झालं म्हणजे दबावाखाली केले असेच काही नाही! काही वेळा होऊन जातात गोष्टी पटापट.
तसेही, वैद्यकीय द्रुष्टीने हे वय योग्यच आहे पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी!
मला वाटले हा गृप फक्त
मला वाटले हा गृप फक्त स्त्रियांचा आहे.. इथे श्री, डुआय हे प्राणी कुठुन अवतरले?????????????????/
साधना, सर्व्हेचे निष्कर्ष
साधना, सर्व्हेचे निष्कर्ष सार्वहनिक केले आहेत. ह्या विषयावर चर्चा व्हावी, पुरुषांचाही दृष्टीकोन कळावा, किंवा त्यांना स्त्रीयांची मतं काय आहेत ते समजावे, म्हणून निष्कर्ष सार्वजनिक केले आहेत.
बाकी 'संयुक्ता'मधल्या चर्चा फक्त बायकांपुरत्याच मर्यादित आहेत.
इथे श्री, डुआय हे प्राणी
इथे श्री, डुआय हे प्राणी कुठुन अवतरले?????????????????>>>> एवढी ? का? कशासाठी? चर्चा खुली केली नसती तर आलो/येऊ शकलो असतो का आम्ही?
केलंच असणार. लग्न झाल्यावर बाप्या असतो त्याच्यापेक्षा जास्त आळसाचा गड्डा होतो... >> कुणामुळं गं??
लग्न केलं तरी पुष्कळ आहे कालच सर्वोच्च न्यायालयाने लग्नाशिवाय संबधाना परवांगी दिली >> लिव्हइन कधीपास्नंच मान्यताप्राप्त होतं. आता तर अॅग्रीमेन्टही करता येत.
>>लग्न झाल्यावर बाप्या असतो
>>लग्न झाल्यावर बाप्या असतो त्याच्यापेक्षा जास्त आळसाचा गड्डा होतो... >>
लग्न झाल्यावर बाप्या असतो
लग्न झाल्यावर बाप्या असतो त्याच्यापेक्षा जास्त आळसाचा गड्डा होतो... >>
लग्न झाल्यावर बाप्या असतो
लग्न झाल्यावर बाप्या असतो त्याच्यापेक्षा जास्त आळसाचा गड्डा होतो... >> कुणामुळं गं??<<
असतो हे वंशाचा दिवा म्हणून डोक्यावर बसवून वाढवण्यामुळे... जास्त होतो ते घरच्यांनी आता तुझी हक्काची मोलकरीण (सबटेक्स्ट...) आली हे विविध पद्धतीने अलंकारीक भाषेत समजावून दिल्यामुळे...
(विचारलास ना प्रश्न आ. भो. आ. क. फ.!)
असतो हे वंशाचा दिवा म्हणून
असतो हे वंशाचा दिवा म्हणून डोक्यावर बसवून वाढवण्यामुळे... >> हॅ हॅ हॅ आणि ते डोक्यावर बसवून घेत कोण??
(विचारलाच ? आता दे उत्तर नाहीतर वेताळ येईल ) सी द आन्सर इज व्हेरी सिम्पल डोन्ट मेक इट कॉम्प्लिकेटेड बाय स्बटेक्सटींग...
इथे श्री, डुआय हे प्राणी
इथे श्री, डुआय हे प्राणी कुठुन अवतरले?????????????????/ >>> साधना आम्हाला मनुष्यप्राणी न म्हणता फक्त प्राणी म्हणालीस म्हणुन तुझा त्रिवार निषेध ! निषेध !! निषेध !!!
( आज एवढच बास , बाकीचं आंदोलन उद्या )
उत्कृष्ट विष्लेशण, सर्वेमधला
उत्कृष्ट विष्लेशण, सर्वेमधला हा सर्वात विचार करायला लावणारा भाग वाटला.
उत्तम सर्व्हे आणि अगदी
उत्तम सर्व्हे आणि अगदी व्यवस्थित रीपोर्ट. सर्व्हे टीमचे अभिनंदन !
आता पुरुषांचा एक सर्वे घ्या.
आता पुरुषांचा एक सर्वे घ्या. अध्यक्ष म्हणून युयुत्सु ना बोलवा मिपावरुन.
Pages