शीर्षक आणि शेवट सुचवा !!

Submitted by दिनेश. on 20 March, 2010 - 02:36

वर्षांपूर्वीच तर कॉलेजनंतर पहिल्यांदा भेटलो होतो. मुंबईला ब्रीच कॅंडीजवळच्या आइसक्रीम पार्लरमधे, रात्री दोन वाजता .मला बघितल्याबरोबर ओळखले त्याने. "निशा, काय मस्त फ़ॉर्म टिकवलायस अजून. अजून कॉलेज क्वीन दिसते आहेस. " सुरी ओरडलाच होता.

"अबे, तू पण चिकना दिसतोयस रे, यावेळी फ़िरलास या एरियात, तर एखादी शेठाणी तूला पळवून नेईल, लॉंग ड्राइव्हला." मी म्हणाले.

"वैसे आयडीया बुरा नही यार. तू नेतेस काय ? पण बाकी तू काय शेठाणी दिसत नाहीस. " तो म्हणाला. "काय करतात आपके मिया, निसरीनजी ?"

" अरे तेरेजैसा कोई मिलाही नही. अजून इंतजार करतेय. " मी म्हणाले.

मग लिची मेल्बा खात खात बऱ्याच गप्पा रंगल्या. त्याचवेळी त्याने विचारले, कि "अजून डिटेक्टीव्ह स्टोरीज वाचतेस काय ?"

"अरे आजकाल कुणी लिहितच नाही. आवड आहे पण टिव्हीवरच्या सिरियल्स बघून उलटी येते मला. परत परत जून्याच वाचत असते" मी म्हणाले. "तू काय करतोयस ?"

"ष्टोरी रायटर आहे समज. डोक्यात आयडिया आहे. तू डेव्हलप करणार काय ? " तो म्हणाला.

"व्हॉट अ जोक. तूला लिहायचा किती कंटाळा होता, ते मला माहित नाही का ? " माझा विश्वासच बसेना.

"आय अ‍ॅम सिरियस. मस्त आयडीया आहे" तो सांगू लागला.

***

दारावरची बेल वाजली. आरश्यात बघितले, दु:खी वगैरे दिसत होते. खरे तर सोहेलची बॉडी मिळाली नाही, हे परत परत सांगून वैताग आला होता. लोकाना उगाचच आशा असते. अजून जिवंत असेल. आयत्यावेळी गाडीतून उडी मारली असेल.तूम्ही धीर सोडू नका. दैवाच्या लिला, नशीबाचा फ़ेरा. बुलशीट !!

आयहोल मधून बघितले, तर एस्के साहेब होते. मी दार उघडले. "आत येऊ ना ?" त्यानी नम्रपणे विचारले. खरे तर मी दरवाजाच उघडला नव्हता अजून. उघडत म्हणाले, " या ना. "

ते एकटेच होते. मी आत जाऊन पाणी घेऊन आले. "साहेब चालेल ना पाणी आमच्या घरचे ? अजून महिनाही झाला नाही. " मी विचारले.

" हो हो चालेल ना. " त्यानी ग्लास रिकामा केला.

"साहेब कॉफ़ी करू ? म्हणजे चालेल ना ? " मी धीर करुन विचारले.

"हो घेईन पण तू घेणार असशील तर. ओ सॉरी तूम्ही घेणार असाल तर, मिसेस दलवाई " त्यांच्या आवाजात नाटकीपणा नव्हता.

"अहो, तू म्हणा. नम्रता म्हणा. तूमच्यापेक्षा खुप लहान आहे मी, वयानेही आणि स्टेटसनेही !! माझ्यासाठी करायचीच होती. म्हणजे मी नेसकॉफ़ीच घेते. चालेल ना ? " मी परत विचारले.

"हो हो चालेल ना. साखर दोन चमचे, मला गोड लागते " ते म्हणाले. मी आत गेले. दूध आत्ताच गरम केले
होते. दोन मग भरुन घेतले. साखर, कॉफ़ी वेगळी घेतली, आणि बाहेर आले. ते सोहेलचा फ़ोटो निरखत होते.

मुद्दाम, काढून घेतला होता. नमाजाच्या पोझमधे.

"साहेब, कॉफ़ी " मी त्यांचे लक्ष वेधले. त्यानी स्वत:च करुन घेतली. मला विचारुन माझा मग पण करुन दिला.

"मस्त" ते म्हणाले, "नेसकॉफ़ीला पण चव आणावी लागते"

"तूम्हीच तर केलीय. खरेच छान झालीय. जेवण जातच नाही. तोंडच कडू होऊन गेलेय अगदी" मी म्हणाले.

"मी खास कामासाठी आलो होतो." ते बॅग उघडत म्हणाले. "हा चेक " माझ्या हातात चेक देत ते म्हणाले.
मी रकमेकडे ओझरते बघून घेतले, पण म्हणाले. "साहेब तशी गरज नाही. तूम्ही पाठवले होते, ते आहेत
ना अजून."

"खरे तर आमच्याकडे पेन्शन स्कीम नाही. इन्शुरन्स मिळेपर्यंत वेळ जाईल. तो पर्यंत असू दे" ते म्हणाले.

"मला माहीत नाही, मी विचारु शकतो का ते. पण विचारतोच. पुढे काय करायचे ठरवले आहेत तूम्ही ? आय मीन तू . ऑफ़िसच्या पार्टीला आणि नंतर नव्या साईटच्या भूमिपूजनाला भेटलो होतो, तेवढेच. तसे बोलणे झालेच नव्हते आपले."

" अजून विचार नाही केला आहेब. तूम्हाला कल्पना असेलच. आमच्या दोघांच्या घरातून, आमच्या लग्नाला
विरोध होता. घरुन ना कुणाचा फ़ोन आला, ना भेटायला कुणी आले. एखादा जॉब मिळाला तर करीन म्हणते" मी उत्तरले.

" ओ म्हणजे ती धार्मिक तेढ वगैरे का ? बाय द वे, आधी जॉब केला होता का ? " त्यांनी विचारले.

" हो पप्पांच्या ऑफ़िसमधे जात होते, लग्नाआधी काहि वर्षे. पप्पा अ‍ॅडव्होकेट होते.आय मीन आहेत. दिल्ली
हायकोर्टात पण आता परत तोंड दाखवायची लाज वाटते. लग्नाचे सांगितल्यावरच म्हणाले होते. तू आम्हाला मेलीस म्हणून." मी ओढणीला नाक पुसत म्हणाले.

" असतात काहि माणसे अशी. निवळेल राग हळू हळू. पण तूझी हरकत नसेल तर, आमच्या ऑफ़िसमधे येणार का काहि दिवस ? म्हणजे आवडले तर कंटिन्यू करता येईल. मला एक विश्वासू माणूस पाहिजे.
काहि पर्सनल मॅटर्स बघायला. काहि लॉ मॅटर्स आहेत. तसे फ़ार काम नाही, इतर स्टाफ़ आहेच. तुझापण वेळ जाईल." ते म्हणाले.

" बघते मी थोडे दिवस. मला तसा फ़ार अनुभव नाही. शिवाय ते कंप्युटर्स वगैरेची फ़ार सवय नाही मला.
पण बाकिच्या स्टाफ़चे ऑबजेक्शन नसेल ना ? म्हणजे अजून महिनाही झाला नाही.. " मी विचारले.

" त्याची नको काळजी.. तयारी असेल तर सांग. उद्याच गाडी पाठवतो. सकाळी साडेआठला जमेल ना ? " त्यानी जवळजवळ फ़ायनलच केले.

मी मानेनेच हो म्हणाले. ते जायला निघाले. दार बंद करुन मी गिरकी घेतली. मगाशी मागवलेली बटर चिकन , गरम करायला घेतली.

***

सोहेल दलवाईची विधवा, दिसेल, असाच गेट अप केला. साडेआठलाच तयार झाले. कालचे सगळे इमेल
केलेच होते. पण ठरल्याप्रमाणे ती सेंड न करता ड्राफ़्ट मधेच सेव्ह केली होती. तो वाचेलच.
बरोबर साडेआठला गाडी आली. ड्रायव्हर ओळखीचा होता. नऊपर्यंत पोहोचलोच. तसे ऑफ़िसमधे गेले होते

दोनचार वेळा. पॉश होते. माझे टेबल एस्के साहेबांच्या केबिन बाहेर. साहेबांची केबिन भली मोठी, पण
पूर्ण काचेची. साहेबांची नजर असायची सगळीकडे, पण तशी भिती नव्हती, त्यांची. छान होमली
वातावरण होते.

बरोबर नउ वाजता ते आले. आल्या आल्या त्यानी छोटिशी मिटिंग बोलावली. जो स्टाफ़ ऑफ़िसमधे हजर
होता, त्या सगळ्याना बोलावले. माझी ओळख करुन देण्यासाठी. तशी रुटीन कामात मी लक्ष घालणार
नव्हते. त्यासाठी वेगळा स्टाफ़ होताच.

मार्केटींग मधे काही मुली होत्या. पण नवीन दिसत होत्या, बाकी सगळे पुरुषच, बहुतेकांची तोड ओळख होतीच.

सगळ्यांनी हसून स्वागत केले. सोहेलचा आणि प्रकाशचाही विषय निघाला नाही. साहेबांच्या केबिनमधे
प्रकाशचा मोठा फ़ोटो लावलेला दिसला.

मला साहेबांनी काहि लॉ मॅटर्सच्या फ़ाईल्स दिल्या. बऱ्याच जुन्या केसेस होत्या. सगळ्या प्रॉपर्टीच्या.
वर्षानुवर्षे चाललेल्या होत्या. माझ्या हयातीत तरी निकालात लागण्याची शक्यता नव्हती.
कुणीतरी हाताने व्यवस्थित रोजनामा लिहिलेला दिसत होता. तोच वाचत होते. फ़ाईलींग अगदी
नेमके दिसत होते. सगळे पेपर्स जागच्या जागी होते.

डब्यात मी मुद्दाम दुधीची भाजी आणली होती. गळ्याखाली उतरेल कशी, याचीच शंका होती.
पण साहेबानीच सांगितले कि कंपनीचे कॅंटीन आहे. छान जेवण होते. पण जपूनच जेवले.
नंतर दुपारी साहेबांनी मला एकेक केस समजाउन दिली. काहि नोट्स असतील तर काढायला
सांगितल्या. टेबलवर लॅपटॉप होता. पण मी हातानेच नोट्स काढायला लागले.

वादाचे मुद्दे, दाखल केलेली कागदपत्रे, असे काहिबाही नोंदवत होते.पण या केसेस मधे खास
काहि दिसत नव्हते. मला हवे होते ते तर नव्हतेच.जूने रेकॉर्ड कुठे ठेवले आहेत, ते बघायला
पाहिजेत.

संध्याकाळी पाच वाजता आवराआवर झाली. मार्केटींग वाले बसले होते. साहेबानी ड्रायव्हरला पाठवले.
मग मीच म्हणाले, गाडी पाठवायची गरज नाही. मी बसने येत जाईन. एखाद्या स्टाफ़च्या नजरेत मला
विस्मय दिसला होता.

****

असेच काहि दिवस गेले. सोहेल म्हणाला होता, त्या जुनागढच्या प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे दिसतच नव्हते.
मला थेट विचारता येत नव्हते. ऑफ़िसमधे माझे टेबल, वॉशरुम आणि कॅंटीन सोडून फ़ारशी कुठे जात
नसे. बाकिच्या डिपार्टमेंटशी माझा संबंध नव्हता.

पण एकदा साहेबच म्हणाले कि, एअरटिकेट्सचे काम बघत जा. स्टाफ़ आणि स्वत: साहेबांचे बूकींग
मी करु लागले. आठवड्यातून एक दोनदा करावे लागे. पण एजंटला फ़ोन केला, तर तो सगळे करत
असे. उलट माझा फ़ोन नाही गेला, तर दीपा ट्रॅव्ह्ल्सच्या सौरभचाच फ़ोन येत असे. त्याला बहुतेक सगळे
डिटेल्स माहितच असत. पण तो माझ्याकडून कन्फ़र्म करुन घेत असे.

साहेबांच्या मिसेसचे पण एकदा बूकिंग केले होते मी. त्या कधी ऑफ़िसमधे आल्या नाहीत, पण पार्टिला भेटले होते मी. एकदम रॉयल पर्सानिलिटी. त्या खरोखरच रॉयल फ़ॅमिलीमधल्या होत्या, असे मला
मग ड्रायव्हरने सांगितले. पण प्रकाश गेल्यानंतर दिड महिन्यानी त्या युरपच्या टूअरवर गेल्या होत्या.त्यांचा
पासपोर्ट, मलाच साहेबानी सेफ़ मधून काढून द्यायला सांगितला. सेफ़मधले युरो पण द्यायला सांगितले. सेफ़
चा कोड त्यानीच मला सांगितला. मला जरा नवलच वाटले. सख्खा मुलगा गेल्यानंतर, असे टुअरवर जाणे
म्हणजे. असो, आपल्याला काय करायचेय, म्हणत मी सोडून दिले.

एक दिवस अचानक, दुपारचा एक अगदी हॅंडसम तरुण सरळ साहेबांच्या केबिनमधे घुसला. जायच्या आधी
मला. हाय करायला विसरला नाही. यूरोपीयन लूक होता त्याचा.

साहेबानी बहुतेक माझ्या चेहर्‍यावरचा गोंधळ बघितला होता. त्यानी पाच मिनिटानी मला आत बोलावले.
ओळख करुन दिली. तो राकेश. साहेबांचा धाकटा मुलगा. प्रकाशचा भाउ. केंब्रिजला होता शिकायला.
नुकताच परत आला होता.

हा अगदी आईसारखा दिसत होता. पण प्रकाशचा भाउ म्हणून शोभत नव्हता. म्हणजे तसा प्रकाशपण
हॅंडसम होताच, पण हिज लुक वॉज एंटायरली डिफ़रंट. साहेबानी मला त्याला इमेल वगैरे शिकवायला
सांगितले.

अर्ध्या तासाने, तो बाहेर आला. आल्या आल्या मला त्याने कंडोलन्सेस दिले. खरे तर त्याला पण
प्रकाशसाठी ते द्यायला हवेत, ते मला सुचलेच नाही.मग माझ्या शेजारी चक्क स्टुल घेउन बसला.
मलाच कसे तरी वाटले, मी त्याला माझी चेअर ऑफ़र केली, तर त्याने चक्क नकार दिला. मला
सगळे समजाऊन दिले. मी चेहऱ्यावर इनोसंट भाव ठेवले होते, व हे सगळे पहिल्यांदाच बघते
आहे, असे भासवत राहिले. त्याने चक्क, माझ्यासाठी सगळे पासवर्डस वगैरे लिहून ठेवले.
टिकेट, हॉटेल बूकींगच्या साईट्स दाखवल्या. परत वेळ मिळाला कि आणखी शिकवेन असे म्हणत
तो निघून गेला.

मग तो रेग्युलरली यायला लागला.

***

एकदा संध्याकाळी साहेबानी मला, अहमदाबादच्या फ़्लाईट्स बद्द्ल विचारले. सौरभला फ़ोन
करु लागले, तर ते म्हणाले, कि मेक माय ट्रिप, वगैरे साइट्स बघायला सांगितल्या. पण
ते क्रेडीट कार्डवर बूक करण्या ऐवजी, ड्रायव्हरला पैसे देउन, एअरपोर्टवरुन तिकिट घ्यायला
सांगितले. स्क्रीनवरुन त्यानी फ़्लाइट डिटेल्स लिहून घेतले व त्यानी स्वत: ड्रायव्हरला, अश्वाक
पटेल, असे नाव लिहून दिलेले मी डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितले. मला वाटले प्रायव्हेट बूकींग असेल
.अर्ली मॉर्निंगची फ़्लाइट होती ती.

दुसऱ्या दिवशी साहेब ऑफ़िसमधे आलेच नाहीत. ज्या संधीची मी दोन महिने वाट बघत होते,
ती आज आली होती. मला हव्या त्या फ़ाइल्स, बॅंक अकाउंट डिटेल्स, वगैरे मी स्कॅन करुन,
घेतले. क्रेडिट स्विस, बॅंकेचे सर्व डिटेल्स, पासवर्ड्स सगळे फ़्लॅश ड्राइव्हवर घेतले.

घरी गेल्यावर सगळे, आमच्या कॉमन ड्राफ़्ट इमेल मधे ठेवले. माझ्या पर्सनल इमेल आयडी वरून,
त्या अकाउंटला, एक फ़ालतू फ़ॉरवर्ड करुन ठेवले. उद्या इनबॉक्स काउंटर बघून, मला त्याने ते
अकाउंट ऍक्सेस केले कि नाही, ते सहज कळले असते.

राकेशचे डिनरचे इन्व्हिटेशन होते.

***

साहेब आल्यावर मी मुद्दामच बरं नव्हतं का ? दोन दिवस आला नाहि्त ते, असे विचारले. त्यानी
नुसतेच हं हं केले. मी त्यांच्या हातात एक वकिलाची नोटीस ठेवली. प्रकाशच्या बायकोच्या
वकिलांकडून ती आली होती. बरीच मोठी मागणी होती त्यात.

ज्यावेळी आली, त्यावेळी आत काय आहे ते मला माहित नव्हते. रुटीन लॉ मॅटर असेल म्हणून
मी उघडली. पण लगेच सील करुन ठेवली. असे मी सांगून टाकले.

पण त्यानी काहि नाराजी दाखवली नाही. थोडा वेळ विचार करुन, मग मला आत बोलावले.
म्हणाले, कि ती आता घर सोडून गेलीय. परत येईल असे वाटत नाही. उगाच कोर्टात लढत
बसायला वेळ नाही. तिच्या वकिलाना फ़ोन करुन, बोलावून घे. बघूया डिस्कस करून.
आऊट ऑफ़ कोर्ट सेटल करता येतय का ते बघू या. तशी रक्क्म रिझनेबल आहे, देउन
टाकू.

खरे तर हे सगळे त्यानी मला का सांगावे, तेच कळले नव्हते. पण मला दिलेली रक्क्म
आणि हि रक्क्म, यात बरिच तफ़ावत होती. एकाचवेळी गेलेल्या दोन जीवांची किंमत
वेगवेगळी होती तर.

मी अ‍ॅडव्होकेट ठक्करना फ़ोन केला. खरे तर एवढ्या लगेच फ़ोन येईल, असे त्याना पण
वाटले नव्हते. मी मुद्दामच त्याना म्हणाले, कि मी साहेबांशी बोललेय. आउट ऑफ़ कोर्ट
सेटलमेंटला ते तयार आहेत. इतक्या लवकर मॅटर सेटल, होतेय म्हम्टल्यावर, त्यानी पण
रक्क्म लगेच थोडी कमी केली. मी साहेबांना तसे सांगितले. डॉक्यूमेटस काय करायचे, ते
मी बघते, असे पण सांगितले होते. मागे पप्पांच्या ऑफ़िसमधे अशीच एक केस सेटल केली
होती. तो ड्राफ़्ट बर्‍यापैकी लक्षात होता.

***

अ‍ॅडव्होकेट ठक्करना, साहेबानी हॉटेल ऑर्कीड मधे बोलावले होते. ती व्यवस्था पण मलाच
करायला सांगितली होती. अकराची वेळ ठरली होती, तरी मला त्यानी घरुन थेट तिथेच
यायला साण्गितले होते. मी दहाला पोहोचले तर साहेब माझी वाटच बघत होते.
वेळेआधी एक तास का आले, याचा खुलासा त्यानी लगेच केला. म्हणाले, तूझ्याशी काही
पर्सनल बोलायचे आहे. पण त्या आधी त्यानी ब्रेकफ़ास्ट मागवला. मला आग्रह करुन
खायला लावला.

"प्रकाश, माझा सख्खा मुलगा नव्हता. माझ्या एका जिवलग मित्राचा मुलगा. जिवलग मित्र
म्हणजे, माझा पार्टनर होता तो. आलमगीर पटेल. त्याच्या लहानपणीच तो गेला. त्याच्या
आईने दुसरा घरोबा केला. मग मी प्रकाशला रितसर दत्तक घेतला. पण त्याला हे सगळे
बहुतेक कळले होते. तसा मी, सुधा किंवा राकेशने, कधीच त्याला परक्यासारखा वागवला
नाही. पण "

ते पाणी पिण्यासाठी थांबले.

"पण अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी शिरले. तरूण वय होते, तोपर्यंत मी दुर्लक्षच केले.
पण लग्न झाल्यावर पण त्याचा अटिट्यूड तोच राहिला. शिवाय मित्र होतेच. बाय द वे,
सोहेलला, तू किती वर्षे ओळखत होतीस. लव्ह मॅरेज होते ना तूमचे ? "

"तशी फ़ार नाही, लग्नाआधी सहा महिनेच आमची ओळख झाली होती. त्याच्या मॅजिकल
पर्सनालिटीची माझ्यावर जादू झाली. घरच्यांचा विरोध पत्करुन आम्ही लग्न केले. पण
लग्नानंतर दिड महिन्यातच.. " माझ्या डोळ्यात पाणी आले. (मी एवढा चांगला अभिनय
करु शकते !!)

"वेल. अय अ‍ॅम सॉरी फ़ॉर दॅट. पण इन अ वे, तूझी सुटका झाली असे मी म्हणेन." ते
म्हणाले.

"म्हणजे ? " मी विचारले.

"त्याची पर्सानिलिटी मॅजिकल होती, यात शंकाच नाही. तो आमच्या मार्केटींग टीमचा
लीडर होता. टार्गेटस नेहमीच पूर्ण करायचा. पण .. " ते परत थांबले.

"सांगा ना प्लीज." मी म्हणाले.

"गेलेल्या माणसाबद्द्ल वाईट बोलत नाहीत. पण हि वॉज व्हेरी. अ‍ॅम्बिशियस. भिती
वाटायची मला. आमची कंपनी खुप प्रोग्रेस करत होती, अजूनही करतेय. त्याची पण
प्रगती होतच होती. पण त्याची स्वप्ने मोठी होती. भल्या बुर्‍या मार्गाने त्याला वर
यायचे होते. त्याचे आणि प्रकाशचे, नेहमी काहीतरी प्लॅन चालत असत, असे माझ्या
कानावर येत होते. " त्यांना एक फ़ोन आला म्हणून ते थांबले. बहुतेक अ‍ॅडव्होकेट ठक्करचा
फ़ोन होता. पण मला धीर निघत नव्हता.

"हं तर काय सांगत होतो मी ?" त्यानी विचारले.

"साहेब सोहेलच्या प्लॅनबद्दल बोलत होतात." मी आठवण करुन दिली.

"हो येस प्लॅन्स. भयंकर असायचे ते. जमिन वगैरे मिळवायला, कुठल्याही थराला
जायची, तयारी असायची त्यांची. खरे तर त्याचे सगळे उद्योग माझ्या माघारीच चालत,
पण एखाद्या पार्टीत त्याला जास्त झाली. म्हणजे तशी नेहमीच व्हायची त्याला. की
तो सगळे बरळत असायचा. आणि मला नवल वाटायचे, प्रकाश तिथे असूनही
कधी त्याला अडवायचा नाही. मग मला वाटायला लागले, कि प्रकाशही त्याला
सामील आहे कि काय ? फ़ार दोस्ती होती त्यांची. सोहेलला, तोच तर घेऊन आला होता,
माझ्याकडे. तू म्हणालीस तशी माझ्यावर पण त्याच्या पर्सनालिटीची छाप पडलीच.
मार्केटींगमधे तो एक्सलंट होता. पण..मला कल्पना नाही, तो तूझाकडे याबद्दल काहि बोलत
होता का ते. " ते माझ्याकडे बघत राहिले.

"हो तसा बोलायचा. पण फ़ार डिटेल्समधे नाही. तूला घरची आठवण देखील येणार
नाही, एवढ्या सुखात ठेवीन, वगैरे म्हणायचा. " मला काहितरी उत्तर देणे भाग होते.

"वेल, आता तो आणि त्याची स्वप्ने सगळेच संपले. मलापण आधी थोडी आशा होती,
कि फ़क्त प्रकाशची बॉडी मिळाली, म्हणजे सोहेल वाचला असेल. पण ती एक बॉडीपण
पुर्ण जळून गेली होती. घड्याळावरून ओळख पटली. पण ड्रिंक्स जास्त झाली, कि
प्रकाश, सोहेलला ड्राईव्ह करु देत नसे. आणि सापडलेली बॉडी हि ड्रायव्हरच्या सीटवरच
होती. म्हणजे तो प्रकाशच होता." त्याना बोलणे जड झाले. मी लगेच पाण्याचा ग्लास
पुढे केला.

"पण सोहेल जिवंत असता तर, इतक्यात नक्कीच आला असता. निदान त्याची
खबर तरी मिळाली असती. मला नाही वाटत, आता आणखी वाट बघण्यात काही अर्थ आहे.
तूझे सगळे आयुष्य पडलेय. तरुण आहेस. नवा साथीदार शोध. एकटी राहू नकोस. हवं
तर मी तूझ्या पप्पांशी बोलतो. नाहीतर आपण ऍडव्होकेट ठक्करना सांगू. ते तूझ्या
पप्पांना ओळखतात का ते विचारु या. " ते म्हणाले.

"नको नको, प्लीज." मी घाईघाई ने त्याना म्हणाले‘ "पप्पाना आवडणार नाही ते.
मीच बोलून बघते."

तेवढ्यात अ‍ॅडव्होकेट ठक्कर आलेच. ती मिटींग लवकरच आटपली. सेटलमेंट ज्यूवेलरी,
रोख रक्कम, अशी झाली. माझ्या अंदाजाप्रमाणे, मागणीपेक्षा जास्तच झाली होती, टोटल.
अ‍ॅडव्होकेट ठक्करनी, सगळे डॉक्य़ुमेंट्स तयारच ठेवले होते.

परत दोन तासानी हॅंड ओव्हरसाठी भेटायचे ठरले. त्यावेळी, माधुरी, पण होती. मला तिने थॅंक्स दिले,
पण ते कश्यासाठी ते कळले नाही. पण ती काही दु:खी वगैरे दिसत नव्हती.

***

माझं मिशन पूर्ण झाले होते. मी एस्के साहेबांचा निरोप घेतला. पप्पांकडे जातेय म्हणून सांगितले.
त्यानी मला मुद्दाम सांगितले, कि परत यावेसे वाटले, तर कधीही येऊ शकते. राकेश, नेमका
बाहेर गेला होता, पण त्याने आवर्जून बुके आणि चॉकलेट्सचा मोठा बॉक्स पाठवला होता.

साहेब गाडी देतो म्हणाले, पण मीच नको म्हणाले. टॅक्सी मस्जिदकडे वळवून, दोन हिजाब
घेतले. बुके दर्ग्यावर ठेवला. चॉकलेट्स सिग्नलवरच्या मुलाना वाटून टाकली.

घरातले सामान कालच आवरुन ठेवले होते. माझ्या इ टिकेटचा प्रिंट आउट कालच
ड्राफ़्ट इमेलमधून कॉपी करुन, ऑफ़िसमधून प्रिंट करुन ठेवला होता. परत एकदा
तपासून बघितला. शेख निसरीन एम \ मिस. एमिरेट्स फ़्लाईट, ई के ५०४ फ़्रॉम
मुंबई टू दुबई, ऍट २२१५, कन्नेक्टीग फ़्लाईट ऑन किश एअर टू किश आयलंड के एस २७४४
ऍट ०७१५. पासपोर्ट तपासला.

घरीच हिजाब वगैरे घेतला. घर पूर्ण रिकामे केल्याची खात्री केली. आणि संध्याकाळी सहा
वाजता सहार एअरपोर्ट कडे निघाले. सव्व दहाची फ़्लाइट म्हणजे, सात पर्यंत पोहोचले तरी
चालण्यासारखे होते,

तशी पावणेसातलाच पोहोचले. गेटवर चेहरा दाखवण्यापूरता हिजाब हटवला. आत एमिरेट्सचा
काउंटर समोरच होता. पण तिकडे शुकशुकाट होता.मी फ़ार लवकर आले होते का ? पण
सगळ्या एअरलाइन्सचे काउंटर्स तीन तास आधी उघडतातच.

बिझिनेस क्लासच्या काउंटर वर एक मुलगी बसलेली होती. तिच्याकडे गेल्या गेल्या वरच्या
बोर्डाकडे बोट दाखवत ती म्हणाली, "सॉरी मॅम, द फ़्लाईट हॅज ऑलरेडी टेकन ऑफ़. "
मला शॉक बसला, तरी धीर करुन मी विचारले, " कॅन यू चेक इफ़ एनी सीट इज अव्हेलेबल
ऑन द नेक्स्ट फ़्लाइट प्लीज. "

"यू नीड टू गो टू, अवर एअरपोर्ट ऑफ़िस मॅम. आय डोंट हॅव द फ़्लाइट डेटा हिअर. द नेक्स्ट
फ़्लाइट इज ऑन्ली टुमारो मॉर्निंग ऍट ०८२५ " तिने हसून सांगितले.

मी धावत पळत एमिरेट्सचे ऑफ़िस गाठले. तिथल्या स्टाफ़ने माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.
कदाचित माझ्यासारख्या केसेसची त्याना सवय असणार. पण माझे टिकेट घेउन त्यातला पिन
चेक केल्यावर मात्र त्याचा चेहरा बदलला. त्याने तो आणखी दोघाना चेक करायला दिला. मग आत
केबिनमधे तो गेला. दहा मिनिटाने तो बाहेर आला. तो म्हणाला,"मॅडम, कुछ गडबड है. ये ट्किटही
बोगस है. आपको किसने दिया ? ये पिन नंबर गलत है. इसी पिनसे एक पॅसेंजर ऑलरेडी फ़्लाय
कर चूका है ? अगर आप एजंट का नाम, पता दोगी, तो हम शायद हेल्प कर सहते है. "

मला तिथे जास्त वेळ काढता येण्यासारखा नव्हता. कॅश देऊन टिकेट मिळतेय का ते बघायचे होते
तेवढ्यात माझा मोबाईल वाजला.

"हॅलो मिस निसरीन उर्फ़ मिसेस नम्रता सोहेल दलवाई. कैसी हो आप ? कैसा लगा ईस ष्टोरी
का क्लायमॅक्स ? " फ़ोनवरचा आवाज बोलत होता.

मी लगेच, त्या ऑफ़िसबाहेर आले. एक कचकचीत शिवी घालत म्हणाले, "सुरी, तूला बघून
घेईन. "

पण लगेच माझ्या लक्षात आले, तो आवाज सुरीचा नव्हता.

************

गुलमोहर: 

मित्रानो,
कथा इथपर्यंत तर लिहिली. शेवटही लिहिलाय. पण तो मनासारखा झाला नाही.
कदाचित काहि कच्चे दुवे राहिलेत असे वाटतेय. तरिही मी लिहिलेला शेवट, शेवटी इथे पोस्ट
करीन . (वर्ड फाईल अपलोड कशी करायची ?)
पण मला एक मदत हवीय. या कथेचा शेवट आणि शीर्षक सुचवणार का ? म्हणजे लिहूनच काढा, आणि
इथे पोस्ट करा. कदाचित आपले विचार जुळतीलही.

आपलाच,
दिनेश

अफलातून दिनेशदा. कथेच्या एकूण रंगरुपावरून शेवटी मोठ्ठा झटका हवा दिनेशदा. शेवटी झटका झणझणीत नाही बसला तर हिंदी सिनेमासारखा शेवटात रसभंग होण्याची दाट शक्यता! आता झटका देऊनंच टाका!!!
श्री

>कौतुक शिरोडकर कुठेयत???
बरोब्बर! आणि वि. कु. राव पण....

दिनेशराव! लय भारी! एवढा केलाय, तुम्हीच करा अजुन थोडा विचार नाहीतर आणि झकास शेवट करा!

या कथेचा शेवट, या फाईलमधे आहे. घ्या सेव्ह करुन ठेवा. पण फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड आहे.
पासवर्ड मग कळवीन.

yaa kathechaa shevaT.doc (47.5 KB)

आता सुचवा शेवट !!! आणि शीर्षकही !!!

वरच्या फाईलचा पासवर्ड KARTASI8, असा आहे.
तो शेवट असा आहे. (पण आणखी वेगळा असू शकतो का, ते आजमवायचे होते )
shevaT.JPG

जबरा कथानक दिनेशदा !

आणखी एक शेवट...

सोहेल इज अलाईव्ह !

प्रकाश आणि निसरीनचे कनेक्शन आहे. सोहेलला मारून त्याच्या जागी प्रकाश मेला असे दाखवायचे आणि विमा कंपनीला गंडा घालायचा. अपघातानंतर प्रकाशने लगेच दुबईला रवाना व्हायचे आणि निसरीन उर्फ़ नम्रताने सोहेलची पॊलीसी कॆश करुन मग दुबई गाठायची. त्याबरोबर निसरीनकडे आणखी एक महत्वाचे काम आहे, ते म्हणजे एस्के साहेबांचे बॆंक व इतर डिटेल्स (अलिगढ प्रॊपर्टीबद्दल) मिळवायचे आणि ते प्रकाशला फ़ॊरवर्ड करायचे. त्यानुसार आधीच तीने दुबईचे बुकिंगदेखील करून ठेवलेले आहे.

पण बहुदा सोहेल डबल गेम खेळतोय. त्याचे मृत प्रकाशच्या पत्नीबरोबर संबंध आहेत. किंबहुना त्या दोघांनी मिळुनच ही योजना आखलेली आहे. प्रत्यक्षात सोहेलच्या ऐवजी प्रकाशचाच मृत्यु झालाय. आता सोहेलच्या हातात स्वत:च्या नावावर असलेल्या विम्याचे पैसे, कंपनीने दिलेले चेक्स याबरोबरच प्रकाषच्या पत्नीला कंपनीने दिलेली रक्कम याबरोबरच एस्के साहेबांचे (अलिगढ प्रॊपर्टीसहीत)सर्व डिटेल्सही आहेत.

नाव म्हणाल तर ... चेकमेट !

एक शंका : स्विस बॆंकेचे पासवर्डस? माझ्या माहितीप्रमाणे स्विस बॆंकेच्या अकाउंटसना फ़क्त एक नंबर असतो आणि एक की.. तेच सबकुछ ! तो नंबर हरवला किंवा विसरला की संपले सगळे.... पैसा विसरून जायचा ! Happy

अश्वाक पटेल कोण असतो?>>>>

हा प्रश्न मलाही पडलाय. एस्केंच्या मित्रांचा "आलमगिर पटेलचा" मुलगा प्रकाश मग तोच जर अश्वाक पटेल आहे असे ग्रुहीत धरले तर.... प्रकाश जिवंत आहे हे एस्केंना माहीत आहे असा अर्थ ध्वनीत होतो. कारण त्याच्या नावे ते एक तिकीट बुक करताहेत. .... Uhoh

तरी मला वाटत होतेच कथा वाचल्यावर की काहीतरी धुक्यातुन दिसतंय कथेत्..अश्वाक पटेल त्याला कारणीभूत ठरला Proud

बाकी, दिनेशदा कथा उत्तम!! शेवटपर्यंत झुलवत ठेवलत Happy मला विशाल दादाने सुचवलेलं शिर्षक एकदम रास्त वाटतं. शेवटाचं म्हणाल तर तुमचा आणि विशाल दादाचा.. दोघांनी सुचवलेले शेवट छानच आहेत.

विशाल,
ही पण शक्यता होतीच. स्विस बॅंका आणि ऑफ़शोअर बॅंका यांच्या ऑपरेशन्सचे अनेक प्रकार आहेत.
त्यापैकि हा एक. हि व्यवस्था प्रचंड गुप्ततेने चालते.

अमि,
अश्वाक पटेल, हे एस्के साहेबांचे काहितरी गूढ आहे. (कदाचित त्यांचेच नाव ?!) सोहेल हे प्रकाशचे
मूळ नाव असू शकेल. त्याच्या वडीलांचे नाव आलमगीर पटेल आहे. एकंदर, एस्के चे पण व्यवहार
सरळ नाहीत. म्हणून निसरीन, त्यांचा उपयोग करुन घ्यायची शक्यता. कदाचित तिला त्यांचे काही
सिक्रेट्स माहित असायची शक्यता.
तिच्यावर एवढा विश्वास ठेवण्याचे काहि खास कारण असू शकते, तिचा उपयोग करत, प्रकाश पर्यंत
पोहोचण्याची शक्यता ? तिचाशी बोलताना, काहि कारण नसताना, प्रकाशच मेला असावा, असे सांगणे.
गरज नसताना, माधुरीच्या सेटलमेंट मधे तिला इन्व्हॉल्व करणे. (याचे कारण तिलाही समजलेले नाही.)
कदाचित हा सर्व डाव त्याचाही असू शकतो. ते दोघे त्याला डोईजड झालेच होते. प्रकाशला दत्तक
घेण्यात काहि हेतू असू शकतो. हा अपघात त्यानेही घडवलेला असू शकतो. पण एकच बॉडी मिळाल्याने
तो अस्वस्थ आहे. मुद्दाम तिला, ऑफ़िसमधे बोलवण्यात, खरे काय घडले, ते शोधायचा प्रयत्न असू
शकतो. (असा शेवट कुणीतरी सुचवेल असे वाटले होते.)

अश्या काहि शक्यता दिसल्याने, मला शेवटाबद्दल खात्री नव्हती.