बरयाच वर्षापुर्वी पावसाळ्यात नाणेघाट चा ट्रेक केला, तेव्हा जवळच असलेला जिवधन व त्याचा वानरलिंगी सुळका खुणावत होता पण वेळेच्या कमतरतेमुळे राहुन गेला होता. अचानक आसमंतच्या जिवधन-नाणेघाट-हडसर या ट्रेकच्या निमित्ताने सन्धी जुळुन आली..
ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता मुलुन्ड स्थानकाबाहेर सर्वजण जमा झालो व गोरेगाववरुन येणार्या बसची वाट पाहत बसलो. पश्चिम रेल्वेवर झालेल्या ओवरहेड वायर कटमुळे गोरेगावला बसमध्ये चढण्यार्या सर्वांना उशिर झाला अन त्यामुळे बस मुलुंडला उशिरा पोचली. रात्री साडेबारा वाजता बसमध्ये बसुन कल्याण-भिवंडी बायपासमार्गे मुरबाड मळशेजघाट रस्त्याने जुन्नरच्या दिशेने निघालो. दिवसभर काम (?) करुन थकल्यामुळे लवकरच सर्वजण झोपी गेले अन बस जिवधनच्या पायथ्याशी असलेल्या घाटघर या गावात पोचल्यावरच उठले. बस गावात पोचली तेव्हा सकाळचे पाच वाजले होते, काही जण उतरुन आपली सकाळची कार्ये उरकायला लागले तर बाकीचे अजुन साखरझोपेतच होते.
उजाडल्यावर बघीतले तर गावामागेच एका डोंगराच्या साथीने जिवधन किल्ला गावाला कुशीत घेउन पहुडला होता. उजव्या बाजुला वर्हाडी डोंगर सकाळच्या परेडला जसे जवान उभे राहतात, तसे उभे होते. दुरवर एक रस्ता नाणेघाटाच्या दिशेने जात होता जिथे आम्ही संध्याकाळी जाणार होतो.
सुप्रभात
वर्हाडी डोंगर
जवळ्च्याच एका घरात चहापाणी उरकुन, ड्राय लंच (श्रीखंड,छुंदा, ठेपला,लोणचे) पाकिट घेउन सर्वजण गावाच्या मागच्या बाजुने जिवधनवर जाण्यास निघाले. अजुनतः पुर्ण सुर्योदय न झाल्यामुळे सकाळच्या मंद प्रकाशात चालण्यास मजा येत होती. वातावरणातील गारवा सुखावत होता. थोडे अंतर कापल्यावर सर्वजण जिवधनच्या पायथ्याशी येउन पोहचलो. येथुन वाट किल्ल्याला उजव्या बाजुस ठेउन सरळ समांतर पुढे जाऊन एका मोठ्या बांबुच्या बनातुन उजव्या बाजुस किल्ल्यावर चढत होती. थोडा वेळ गर्द झाडीतुन चालल्यावर किल्ल्याच्या चढावाला लागलो. पहिल्याच चढावाला एका आगंतुक पाहुण्याने सर्वांचे स्वागत केले. तो होता एक पुर्ण वाढ झालेला विंचु. राजेसाहेब फोटोला पोज दिल्यासारखे एका दगडावर पहुडले होते. प्रथम मागच्या बाजुने फोटोसेशन झाल्यानंतर राजांनी पोज बदलुन पुढच्या वाजुने सर्वांना फोटो काढण्यास संधी दिली.
तात्याविंचु
भगवान सहस्त्ररश्मी
विंचवाला मागे टाकत, मजल दरमजल करत, दोन तीन चढ मागे टाकत सर्वजण किल्ल्याच्या मुख्य भिंतीपाशी येउन पोहोचले. येथुन दगडात कोरलेल्या पायर्यांच्या वाटेला सुरवात होते. सर्वानुमते येथे न्याहरीकरता थांबुन बघता बघता साठ -सत्तर इडल्यांचा फडशा पाडण्यात आला. आता पुढे या ट्रेकचा सर्वात कठीन टप्पा पार पाडायचा होता. तो म्हणजे किल्ल्याचा प्रसिध्द रॉक पॅच, मराठे अन इंग्रज यांच्यामधील शेवटच्या १९१८ च्या लढाईत इंग्रज जिंकल्यानन्तर त्यांनी किल्ल्यावर जायची प्रमुख वाट व तीच्या पायर्या सुरुंग लावुन उडवुन टाकल्या होत्या. त्या पायर्यांच्या जागी आता होता दोन टप्प्यांचा सरळ रॉक पॅच आणि तोहि चढायचा होता त्यावर खोदलेल्या खोबण्यांच्या मदतीने.
रॉकपॅच
सुरवातीला एका लीडरने पुढे जावुन पहीला पॅच सहज सर केला अन वरुन मदती करता रोप सोडला. हळुहळु सर्वांनी चढावयास सुरवात केली. काही जणांनी तो पॅच सहज सर केला, पण एका बाईंना बर्याच वर्षांनी ट्रेक करत असल्यामुळे तो पॅच चढण्यास जमत नव्हता. भरपुर प्रयत्नानतर व सर्वांच्या मोरल सपोर्ट मुळे त्यांनी तो पॅच सर केला. त्यांनी तो पॅच चढताच सर्वांनी टाळ्या वाजवुन त्यांच्या प्रयत्नांना व इच्छाशक्तीला दाद दिली. ईथुन पुढे काही पायर्या चढुन, एका मोडक्या प्रवेश दारातुन आम्ही किल्ल्यावर प्रवेश केला तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते.
धान्यकोठार
थोडा वेळ आराम करुन सर्व जण किल्ल्यावर फेरफटका मारण्यास निघाले, जिवधन किल्ला तसा लहान असुन किल्यावर एक धान्यकोठार, मोडकळीस आलेले जिवाई देवीचे मंदिर, एक-दोन पाण्याची टाकी सोडल्यास काही पाहण्यासारखे नव्हते. थोडयाच वेळात ही सर्व ठिकाणे पाहुन सर्व जण किल्ल्याच्या मुख्य आकर्षणाकडे पोचले. हे आकर्षण म्हणजे किल्ल्यापासुन सुटावलेला वानरलिंगी उर्फ खडा पारशी सुळका. जवळपास किल्ल्याच्याच उंचीचा असलेला हा सुळका अन मुख्य किल्ला यांच्यामध्ये खोल दरी आहे. सुळक्याची उंची एव्हढी होती की वरुन त्याचा पायथा दिसत नव्हता.
वानरलिंगी
आमच्या गाईडने दिलेल्या माहितीनुसार काही गिर्यारोहण संस्था मुख्य किल्ला व सुळका यांच्यावर व्हॅली क्रोसिंगचा कार्यक्रम करतात. किल्यावरुन टोकावरुन झोपुन खाली पाहिले असता खाली काहि गिर्यारोहकांचा एक ग्रुप सुळकयावर चढाईच्या बेतात होता. या सुळक्याच्या पोटात एक गुहा आहे त्यात चार्-पाच जण आरामात रात्र घालवू शकतात. या टोकावरुन पाहिले असता समोर धाकोबाचा सुळका खुणावत होता.
एव्हाना दुपारचे बारा वाजले होते व सर्वांच्या पोटात कावळे ओराडावयास लागले होते. सर्वजण जवळच्या एका टाक्यावर पाणी भरुन धान्यकोठारा कडे निघाले. पोहोचतात सर्वांनी आपआपल्या मॅट अंथरुण थोडा वेळ आरामाची तयारी केली. बघता बघता चारी बाजुने लयीत घोरण्याचे आवाज येऊ लागले. मध्येच आवाज इतका वाढला कि गुहेतील वटवाघुळे घाबरुन उडुन गेली. तासाभरात उठुन मस्तपैकी श्रीखंड-चपाती, ठेपला, बटाट्याची भाजी, लसुन चटनी यांचे भरपेट जेवण केले.
महादरवाजा
थोडा वेळ आराम केल्यानंतर किल्ला दुसर्या बाजुच्या महादरवाज्याने उतरुन नाणेघाटात रात्रीच्या मुक्कामासाठी जायचे ठरले. किल्ल्याचा हा दरवाजा दोन कातळभिंतीच्या मध्ये खुबीने बनवलेला आहे. इंग्रजांनी केलेल्या नासधुसीमुळे पुर्ण दरवाजा वर पर्यत दगड मातीने चिणुन गेलेला होता. वाकुन दरवाजा पार करत पुढे आलो तर समोर परत एक दहा फुटाचा रॉक पॅच आ वासुन उभा होता. थोड्याच वेळात बाजुच्या भिंतीला बांधलेल्या दोराच्या साह्याने तो पॅच सहजरित्या पार करुन सर्वजण वाटेला लागले.
दुसरा रॉकपॅच
ही वाट वानरलिंगी सुळक्याच्या पायथ्याकडुन खालच्या जंगलात उतरत होती. येथुन सुळक्याचे सुंदर दर्शन होते व त्याच्या ऊंचीची अन भव्यतेची खरी कल्पना येते. सुळक्यावर सकाळी वरुन पाहिलेला ट्रेकर्सचा ग्रुप चढाई करताना दिसत होता. एक-दोघे जण तर सुळक्याच्या माथ्यावर उभे राहुन आजुबाजुच्या स्रुष्टी सोउदर्याचा आस्वाद घेत होते. चोउकशी करता असे कळले की पुण्याच्या गिरीदर्शन ट्रेकिंग क्लुब चे काही ट्रेकर सुळक्या वरील जुने खराब झालेले बोल्ट काढुन नवीन बोल्ट बसवत होते. त्यांना पार करुन घनदाट जंगलातुन पुढे निघालो. वाटेत एक ठिकाणी गिरीदर्शन ट्रेकिंग क्लुबने त्यांचा बेस कॅम्प वसवलेला होता. त्या घनदाट जंगलात त्यांनी सपाट जागा बघुन १०-१२ तंबु ठोकले होते. जवळपास ५०-६० कार्यकर्ते तिथे दिवसरात्र वावरत होते. त्यांच्या लीडरशी थोडी चर्चा करुन थोड्याच वेळात त्या जंगलातुन बाहेर निघुन आम्ही नाणेघाटाच्या पठारावर आलो. पठारावर थोडी फोटोग्राफि करुन तापलेल्या मातीवर बुटाचे छाप उठवत नाणेघाटाच्या वाटेने चालु लागलो.
वानरलिंगी पायथ्याकडुन
नानाचा अंगठा
जिवधन किल्ला
नाणेघाटाची नळी
सातवाहनकालीन नाणेघाटाजवळ येताच नळीतुन येणारे जोरदार वारे अंगाशी झोंबु लागले. हा घाट नाणे नावाच्या व्यापारयाने बांधा-वापरा-हस्तांतरण तत्वावर त्या काळी बांधलेला होता. कल्याण, नालासोपारा बंदरात येणारा माल मुरबाड, वैशाखरे, नाणेघाट, जुन्नर मार्गे सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान उर्फ पैठण पर्यत जात असे. हा घाट वापरणरया सर्व व्यापार्यांना टोल द्यावा लागत असे. घाटाच्या काठावर अजुनही टोल जमा करण्याचा दगडी रांजण अजुनही सुस्थितीत उभा असलेला दिसत होता. नळी पार करुन खालच्या अंगाला असलेल्या गुहेत रात्र घालवायची होती. जवळपास पन्नास ते साठ माणसे झोपु शकतील अशा गुहेत प्रवेश करताच आतापर्यन्त अंगाला झोंबणारे वारे कुठच्या कुठे पळुन गेले व उबदार वाटायला लागले. लगेचच आपआप्ल्या जागा पकडुन, मॅट पसरुन काही जण आराम करायला लागले, एक ग्रुप नानाच्या अंगठ्यावर सुर्यास्त बघायला गेला तर आम्ही चार्-पाच जण जवळच असलेल्या विहीरीवर आंघोळ करावयास निघालो. दिवसभर उन्हातानात चालुन दमल्यावर विहीरीच्या थंड पाण्यात आंघोळ करण्याची मजा काही वेगळीच होती.
जकातीचा रांजण
नाणेघाटातील गुहा
आंघोळ करुन गुहेत परत येई पर्यन्त पुर्ण अंधार झाला होता व दुरवर कोकणात धसई-मुरबाड कडील दिवे चमकायला लागले होते. गुहेत येउन बघतो तर मस्त गाण्याची महफिल जमलेली होती. मग कोणी गाणी म्हणत, कोणी माउथ ऑरगन वाजवत, कोणी प्राण्यांचे वेगवेगळे आवाज काढत, कोणी मजेदार चुटके व किश्शे सांगत रात्रीचे जेवण होई पर्यन्त मजेत वेळ घालवला. रात्रीच्या जेवणात गरमागरम पुलाव व सुप यांचा आस्वाद घेऊन उत्तर रात्री सर्वजण आकाश दर्शनास निघाले. आमच्या ग्रुपमधील दोघेजण खगोल शास्त्रात माहिर होते. त्यांच्या मार्गदर्शानाखाली मग सर्वजण ग्रह-तारे, आकाशगंगा, राशी, नक्शत्रे ओळखू लागले, त्यात बरससा वेळ घालवल्यानंतर परत गुहेत जाउन झोपलो ते सकाळी सात वाजता उठण्याच्या बोलीवर. पहाटे चार वाजता कोकणातुन एक ग्रुप आवाज करत नाणेघाट चढुन वरती आला तेव्हा थोडी जाग आली पण परत झोपी गेलो ते सकाळी सात वाजता ऊठलो.
दुसर्या दिवशी सकाळी उठुन तयार झालो अन परत घाटघर गावात पोचलो. ईथे एका घरात चहा नाश्ता करुन आम्हाला पुढचा टप्पा गाठायचा होता तो म्हणजे माणिकडोह धरणाजवळील किल्ले हडसर. ठरविल्याप्रमाणे झटपट नाश्ता करुन निघालो. घाटघर ते जुन्नर हा रस्ता वळणावळणाचा, बरेच डोंगराच्या सलगीणे जाणारा होता. निघाल्यापासुन तासाभरातच हडसरच्या पायथ्याशी असलेल्या गावात येउन पोचलो. गावातुन दोन वाटा किल्ल्यावर जातात, एक म्हणजे सोपी पायर्यांची महादरवाज्याची वाट अन दुसरी कठिन खुट्याची वाट. या दुसर्या वाटेने जाताना काही ठिकाणी किल्ल्याच्या भिंतीवर ठोकलेल्या खुट्या पकडुन चढावे लागते.
महादरवाज्याची वाट
आम्ही ग्रुप मोठा असल्याने नेहमीची महदरवाज्याची वाट पकड्ली. सुर्य देवता किल्ल्याच्या मागील बाजुस असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. थोड्याच वेळात काही घरे व शेते पार करुन किल्याच्या मुख्य भिंतीजवळ पोहचलो. ईथुन पुढे सोपी पण उभ्या कातळावर चढाई होती. पुढे शॉर्ट कट शोधण्याच्या नादात रस्ता चुकलो अन बाजुच्या टेकडीवर चढायला लागलो. थोडे वर आल्यावर जाणवले की आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने न जाता दुसर्याच दिशेने जात आहोत. या टेकडीवर निवडुंगाची भरपुर झाडे होती व त्यांना मस्त चैत्राचा बहर आला होता. एका लीडरने मग पुढे जाऊन रस्ता शोधला अन मार्गाला लागलो.
चैत्र बहर
मजलदरमजल करत किल्ल्याच्या प्रसिध्द पायर्यांच्या वाटे जवळ आलो. समोर जवळपास १००-१५० पायर्यांचा सोपान होता जो एका दमात चढणे खुपच कमी जणांना शक्य होते. पायर्यांची ऊंची जास्त असल्याने दर आठ-दहा पायर्यानंतर दम लागत होता. दमत बसत पायर्या चढत किल्याच्या मुख्य बुरुजाजवळ येऊन पोहोचलो. ईथुन एक वाट डाव्या बाजुने किल्ल्यावर जाते. या वाटेचे मुख्य वैशिष्ट म्हणजे एका मागे एक दगडात कोरलेली दरवाज्यांची त्रयी. एका भुयारवजा वाटेवर कोरलेली हे दरवाज्यांचे त्रिकुट पार करुन आम्ही किल्याच्या सपाट भागावर आलो. इथुन आजुबाजुचा सर्व परिसर दिसत होता. समोर माणिकडोह धरणाच्या पलीकडे हडसरचा साथीदार चावंड किल्ला, उजवीकडे ढाकोबा, जिवधन, नानाचा अंगठा, डावीकडे शिवजन्मस्थान शिवनेरी, लेण्याद्रीचा डोंगर, मागील बाजुस गणेशखिन्ड रस्ता, हरिच्चंद्रगड स्पष्ट दिसत होते. पुढे सर्वजण एका सुंदर व अजुनही सुस्थितीत असलेल्या शिवमंदिरात येउन पोचलो. मंदिरातील बाहेरील बाजुस असलेला नंदी, आतील कोनाड्यातील गणपती, मारुती व गरुड यांच्या मुर्त्या पाहण्यासारख्या होत्या.
महादरवाजा
शिवमंदिर
थोडा वेळ देवळात घालवुन किल्ला फिरावयास निघालो. फिरता फिरता खुट्याची वाट ज्या दिशेने वरती येते त्या बाजुस येउन पोचलो, खाली वाकुन पाहिले असता एका कातळभिंतीवर काही लोखंडी खुट्या ठोकलेल्या दिसल्या, या वाटेवरुन किल्ला चढायचे म्हणजे मोठे कसबिचे काम होते. पुढे किल्ल्याचे दुसरे आकर्षण दिसले, ते होते दगडात संपुर्ण खोदलेले भुयार अन त्या पुढिल कोरीव गुहा, वरुन पाहिले असता सपाट दिसणार्या जमिनीला मध्येच मोठी खाच होती व तिथुन होता गुहांमध्ये जाण्याचा रस्ता. पुढे गेले असता एक मोठा चोउक लागला आणि त्याच्या दोन्ही बाजुला होत्या मोठ्या कोरीव गुहा, गावकर्यांनी गुरे बांधण्यासाठी वापर केल्याने गुहा अस्वच्छ होत्या पण एकुणच खोद्काम वाखाणण्याजोगे होते.
किल्ला सपुर्ण फिरुन आल्या वाटेने सर्व मागे फिरलो. वाटेत एका ठिकाणी विहिरीवर ताजेतवाने होउन लगेच बस गाठली. पोटात कावळे ओरडु लागल्याने सर्वांनी बसच्या चालकाला लवकरात लवकर गाडी लेण्याद्रिच्या पायथ्याला नेण्यास आग्रह केला. लेण्याद्रिच्या पायथ्याशी पोहोतचाच काही उत्साही जण गणरायाच्या दर्शनाला गेले. उरलेल्यांनी गरमागरम जेवणावर ताव मारला. जेवण झाल्यावर जवळच्या बाजारात द्राक्षे, मनुके, ताजी भाजी खरेदी करुन बस मध्ये चढलो ते मनात पुढच्या ट्रेकचे विचार घोळवत.......
मस्तच वर्णन आणि
मस्तच वर्णन आणि फोटोसुद्धा!!!!!!
वानरलिंगी फोटो एकदम झक्क्कास!
नाणेघाटाचे फोटो बघुन आमची सफर आठवली.
मस्तच.. छान वर्णन आणी फोटो.
मस्तच.. छान वर्णन आणी फोटो.
मस्त फोटो आणि
मस्त फोटो आणि वर्णन.
वानरलिंगीचा फोटो जबरी आहे.
मस्त!!
मस्त!!
आम्ही असाच एक ट्रेक ठाण्याहुन
आम्ही असाच एक ट्रेक ठाण्याहुन आदल्या दिवशी रात्री निघुन नाणेघाट, दुसर्या दिवशी नाणेघाटहुन जिवधन, हडसर करुन चावंडला मुक्काम आणि तिसर्या दिवशी चावंडहुन शिवनेरीला मुक्काम असा केला होता. आपले फोटो बघुन त्या ट्रेकची आठवण झाली. धन्यवाद. फोटो आणि वर्णन सुरेख.
वानरलिंगी सुळका !!!!!!
वानरलिंगी सुळका !!!!!!
गिरी.. सहि वर्णन नि एकापेक्षा एक सरस फोटो !!
छान !!!!!!!
छान !!!!!!!
अतिशय सुंदर वर्णन!! मी सुद्धा
अतिशय सुंदर वर्णन!!
मी सुद्धा या ट्रेकला होतो.
आठवले का???
नाणेघाटाला बर्याच वर्षांनी
नाणेघाटाला बर्याच वर्षांनी फोटोतून भेटले...खूप छान वाटले.... तो रांजण, ती घळी, नानाचा अंगठा, सातवाहन सम्राज्ञी नागणिकेचा शिलालेख असलेली गुंफा - तिचा स्वच्छ परिसर [ मी गेले होते तेव्हा आजूबाजूला लोकांनी केलेला कचरा होता], बहरलेला पळस...... त्या सर्व स्मृती पुन्हा जाग्या झाल्या. तिथून खाली कोकणात जाणार्या रस्त्याने गेलात की नाही? तो सर्व प्राचीन व्यापारी मार्ग आहे.... खेचरांवरून वाहतूक व्हायची म्हणे! आजूबाजूला पाडे पण आहेत अनेक!
गिरीविहार, चावंडच्या
गिरीविहार,
चावंडच्या दुव्यावरून इथे आलो. सुंदर वर्णन केलं आहे. वांदरलिंगीची प्रचि खास आलीयेत.
हडसरच्या महादरवाजाजवळील खोदकाम स्थापत्य अभियांत्रिकीचा अप्रतिम नमुना आहे. हे चित्र पाहून अवाक व्हायला होतं : http://cdn1.maayboli.com/files/u6213/P1020411.JPG
कसं खोदकाम केलं असेल हे? ज्याम विचारात पडलोय. आपल्या पूर्वजांचे आकलन काहीतरी वेगळेच होते. त्यांचा सार्थ वारस बनणं किती अवघड आहे!
आ.न.,
-गा.पै.
मस्त लेख. फोटो अफलातून आहेत.
मस्त लेख. फोटो अफलातून आहेत.