आंधळी कोशिंबिर

Submitted by सुनिल परचुरे on 8 March, 2010 - 04:17

आंधळी कोशिंबिर
``अरे या या डॉक्टर साहेब, मी तुमचीच वाट बघत होतो`` सोफ्यावरुन उठत मोहनराव म्हणाले.
``अरे म्हणजे काय , तुम्ही एवढया प्रेमाने बोलावलत की यायलाच पाहिजे. त्यामुळे आज संध्याकाळी सात नंतर कोणालाही अपॉईंटमेंट दिली नव्हती. त्यामुळे कन्स्लटंसी लौकर बंद करुन मुद्दाम आलो``. डॉ. आकाश गोखले म्हणाले.
``हं मग कसा काय गेला आजचा दिवस ?`` डॉक्टरांनि विचारले.
``खर सांगु , आज रिटायर होणार असल्यामुळे सकाळपासुनच माणसांची रिघ होती. किती बुके, किती फोन याला सुमारच नाही. आणि सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळि सत्कारसमारंभाला आपले गेल्या टर्मचे अर्थमंत्री पण आत्ताचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री श्री. आबासाहेब सावंत हे ही अचानक आले. मला मुद्दामच त्यांनी आधी सांगितले नव्हते. खरच आज मी इतक्या लोकांच माझ्यावरील पेम पाहून धन्य झालो. आणि हे फक्त तुम्हा दोघांमुळेच शक्य झाले. हे डॉ. लेले, आमचे शेजारी म्हणा, चांगले मित्र म्हणा की काहीही ... आमचे नाते हे शब्दांतीत आहे. आणि दुसरे म्हणजे तुम्ही , डॉ. गोखले, ``मोहनरावांना बोलताना थोडे गहिवरुन आले .

डॉ. लेल्यांच्या डोळ्यासमोर गेल्या काही वर्षातल्या गोष्टी झरझर सरकु लागल्या. डॉ. लेले हे जेव्हा दहा वर्षापुर्वी ह्या सोसायटीत दाखल झाले तेव्हा आधी त्यांनी बघितले की शेजारी कोणकोण आहेत. पण पहिल्याच दिवसापासून ते मोहनरावांच्या प्रेमात पडले. नविन घरामुळे अगदी घरात लागणा-या छोटया छोटया सामानांपासून ते दुधवाला, पेपरवाला, इस्त्रीवाला, फुलवाला ह्या सगळ्या माणसांना त्यांच्याकडेही रतीब घालायला सांगण्यापर्यंत सर्वच कामे त्यांनी आपलेपणाने केली. डॉ. लेल्यांची स्वतची कन्सलटनसी जवळच होती. मोहनराव हे नुसते सरकारी खात्यात राजपत्रित अधिकारि नव्हते तर राज्य सरकारी कर्मचारी संघाचे अध्यक्षही होती. सच्चा कार्यकर्ता कसा असावा त्याचे ते मुर्तिमंत उदाहरण होते. कधीही त्यांनी कुणाकडून लाच म्हणून पैसेच काय कसल्या वस्तुही स्विकारल्या नाहीत. दर दिवाळीत तर ते 15 दिवस रजेवरच असायचे. तरी काही जणांनी भेटवस्तु आणुन ठेवल्याच तर ते आल्यावर सर्व स्टाफमध्येच वाटायचे.

डॉ. लेले इथे राहायला आल्यानंतर काही दिवसातच मोहनरावांचा 50 वा व मोहनरावांच्याच लग्नाचा 25 वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनि धडाक्यात साजरा केला होता. त्यानंतर लगेच ते दोघे नवरा बायको चारधाम यात्रेला गेले होते. हातपाय धड आहेत तोपर्यंत जाऊन या अस म्हणत त्यांच्या मुलांनी त्यांचे एका चांगल्या टुर कंपनी बरोबर बुकींग करुन दिले. त्याची दोघेही मुले म्हणजे दिपाली व शौनक कॉलेजमध्येच शिकत होति.

चारधाममध्ये आधी बद्रिकेदार झाले. तिथ पर्यंत गाडीच जाते त्यामुळे काही प्रश्नच आला नाही, पुढे केदारनाथला जातांना मोहनराव चालतच गेले पण सौ. ला घोडयावरुन जाणे श्रेयस्कर वाटले. तिथेही दर्शन चांगले झाले. पुढे गंगोत्रीला गेल्यावर त्यांच्या पायांनी चांगलाच दगा दिला. थंडीने व सारखे घोडयावर बसुन म्हणा त्यांना जास्त चालताच काय , उठता बसतानाही त्रास व्हायला लागला. खरतर पुढे असलेली गोमुखाची एच्छिक सफरही त्यांनी आधीच बुक केली होती. पण बायकोला होणारा त्रास बघुन त्यांनी पुढे जायचा प्रोग्राम रहित केला. पण तिथून हट्टाने त्यांना घेऊन वहिनी भोजवासापर्यंत आल्या. पण पायांचा खुपच त्रास होऊ लागल्याने वहिनींनी मोहनरावांना आग्रहाने गोमुखाला जाऊन यायला सांगितले त्या तिथेच भोजवासाला हॉटेलमध्ये राहिल्या. सकाळी निधुन संध्याकाळी परत यायचे असल्याने मोहनरावांनी एकटेच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ते
सकाळी लौकर निघाले. पण तिथले वातावरण खरच लहरी असते. साधारण दुपारनंतर सुरु होणारा पाउस त्या दिवशि अचानक त्यांना वाटेतच लागला. धुंवाधार पाऊस व त्यात एवढा जोरदार वारा की त्यांना वाटही दिशेनाशी झाली. दुरवर एके ठिकाणी एक झोपडी वजा घर दिसत होते. त्यामुळे त्यांनि तिथे धाव घेतली.

आत एक प्रसन्न व्यक्तिमत्वाचे साधु महाराज होते. मोहनरावांनी जरी रेनकोट घातला होता तरी ते थोडे भिजले होते. त्यामुळे आत गेल्यागेल्या त्या साधुंनी आपल्या एका शिष्या करवी त्यांना गरम गरम गाईचे दुध दिले. तिथले वातावरण एकदम भारावल्यासारखे होते. मंद सुगंध भरुन राहिला होता. वातावरणही खुप उबदार होते. थोडया वेळातच पाऊस थांबला. मोहनरावांनी त्या साधुंचे त्यांच्या सरबराईबद्दल आभार मानले व निघण्याची परवानगी मागितली. त्या साधुंनी त्यांना जवळ बोलवले.
``बेटा - यहाँ बैठो`` - त्यांच्या आवाजात खुपच माधुर्य होते.
``तुझी आई खुप भाग्यवान होती. तिची पुण्याईच तुझ्या कामी येतेय. त्यामुळेच तुझ आयुष्य खुप सुखी पण प्रतिष्ठेत गेले. तुझी मुलगी विलायतेला शिकायला जाईल. मुलगा जरी हुषार असला तरी तो इथेच राहील. तुलाही येत्या काही वर्षात आणखीन प्रतिष्ठा मिळेल. तुझ्या रिटायर होण्याच्या दिवशीच तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल. व ह्या जन्ममरणाच्या रहाटगाडयातुन तु मुक्त होशील`` असे म्हणून त्यांनी आशिर्वादाकरता आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला.

हा प्रसंग नंतर त्यांनी आपल्या पत्निला सांगितला. खर तर बाबा, साधु, महाराज ह्यांच्या पासून ते नेहमी लांबच राहात. गणपती हा एक देव सोडला तर त्यांचा बाकी कशावरही विश्वास नव्हता. त्यामुळे ह्या साधुबाबांच बोलणेही त्यांनी तेवढे मनावर घेतले नाही.

पुढे दोन एक वर्षात त्यांच्या युनियनने संप पुकारला होता. केंद्राप्रमाणे त्यांनी राज्य कर्मचा-यांनाहि सर्व भत्ता, सवलती मागितल्या. हा संप फोडण्याकरता सरकारनेही खुप प्रयत्न केले. पण शेवटी वाटाघाटी यशस्वी होऊन राज्य सरकारने त्यांच्या ब-याच मागण्या मान्य केल्या. खरतर त्यावेळचे अर्थमंत्री आबासाहेब सावंत व हे एकाच गावचे, एकाच शाळेचे. गावातले शेजारी शेजारी. त्यामुळे त्या संपाला एक वेगळेच वळण लावण्याचाही ब-याच लोकांनी प्रयत्न केला. पण मोहनरावांच्या स्वभाव वैशिष्ट्याचि पारख त्यावेळी झाली. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी हा संप यशस्वी केला. त्यावेळेपासून तर त्यांचा परिचय सर्व थरातील लोकांशी होत गेला. त्यांच्या स्वभावामुळे एकदा त्यांना भेटलेला माणुस हा त्यांचाच होऊन जाई.

संप यशस्वी झाल्यावर बायकोशी बोलतांना एकदा त्या साधुमहाराजांचा विषय निघाला होता. पण परत एकदा त्यांनी तिथे दुर्लक्ष केले.

पुढे त्यांचा मुलगा एम.बी.ए. झाला. नोकरीसाठी त्याला चांगल्या ऑफर्सही आल्या. काही देशी कंपन्या तर एका फॉरीन कंपनीनेही ऑफर दिली होती. तात्पुरता जरी जॉब इथे असला तरी फॉरीनला रहायचे चान्सेस खुप होते. मोहनरावांची ही इच्छा त्याने त्याच कंपनीत जावे अशी होती. पण मुलाला फॉरीनला जाण्याची जराही इच्छा नव्हती. त्याने स्पष्टपणे त्यांना सांगितले की, मला काही तिथली क्रेझ नाही. मी इथेच तुमच्या बरोबर राहीन. शवेटी त्याने इथलाच एक जॉब सिलेक्ट केला.

मोहनरावांना त्यावेळी शंकेने ग्रासले. म्हणजे ते कोण साधुबाबा पण त्यांनी सांगितलेली ही ही गोष्ट तशीच झाली. म्हणजे .... पण त्यांनी कष्टाने मनातुन वाईट विचाराला थारा दिला नाही.

पुढच्याच वर्षी दिपाली सी.ए. झाली, ती देशात दहावी आली, तिला लगेच एका आंतरराष्ट्रीय सी.ए.च्या फर्मने ऑफर दिली. तीला ऑस्ट्रेलियात प्लेसमेंट मिळत होती. तिथल्या ही काही परिक्षा तिला घाव्या लागणार होत्या. पण कंपनीच ते सर्व स्पॉन्सर करणार होती. ति ऑस्ट्रेलियात गेलीही.

आता मात्र मोहनराव अस्वस्थ झाले. त्या साधु महाराजांची भविष्यवाणी तंतोतंत होत होती. ते तो सर्व प्रसंग पुन पुन्हा आठवु लागले. शेवटचे त्यांचे वाक्य होते तुझ्या रिटायर होण्याच्या दिवशीच तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल. बापरे म्हणजे 31 जानेवारी 2010 ला मी रिटायर होणार त्याच दिवशी मी... मी... मरणार?

त्यांना काही सुचेना. सगळे पुढचे विचार यायला लागले. म्हणजे माझ आयुष्य आता किती राहयल. अजुन दोन्ही मुलांची लग्न बाकी आहेत, ही आहे ....... त्यांना कळेचना, आता काय कराव ? त्यांना ऑफिसात जायला, त्या खुर्चीवर बसायचीही भिती वाटायला लागली. पुढे पुढे ते ऑफिसला जायला काहिनकाहि कारणाने टाळू लागले. एकदा त्यांना अंगात खुप ताप भरला म्हणून ते माझ्याकडे आले.

मी त्यांना तापावर औषध दिली. पण विचारले की हल्ली तुम्ही ब-याचवेळा घरी दिसता. काय रिटायरमेंटची प्रॅक्टीस करता की काय ? त्यावर त्यांचा चेहरा कसनुसा झाला. दुस-या दिवशी वहिनींनि माझ्या घरी येऊन सर्व हकीकत मला सांगितली. म्हणजे हे प्रकरण मला वेगळेच वाटले.
``हे बघा वहिनी मी त्यांना गेल्या काही दिवसापासून बघतोय. त्यांच्यात खुपच बदल झालाय. नेहमी हसणारे, आत्मविश्वास दिसणारे ते आता एकदम मलुल झाल्येत. पण आज खर कारण कळल. अगदी खर सांगु ही त्यांची सुरुवात असेल तर त्यांना आपण एका सायक्रियाटीस्ट डॉक्टरना दाखवू``.
``सायक्रियाटीस्ट ? अहो त्यांना वेड कुठे लागलय ``?
``अहो वेड लागल्यावर तिथे नेतात हे कोणी तुमच्या डोक्यात भरवल`` ? माझा अवाज थोडा चढला.
``नाही.. हे बघा हा शरीराचा नाही तर मनाचा आजार आहे. त्याला तशाच डॉक्टरांकडे नेण्याची गरज आहे. एखाद्या पेशंटला आम्ही टाटात जाऊन टेस्ट करायला सांगतो म्हणजे त्याला कॅन्सरच आहे व तो काही दिवसांचाच सोबती आहे अस नसत. काहीवेळा काहि गोष्टी ह्या कराव्याच लागतात``.

शेवटी वहिनींना कसबस समजवल. शौनकच्याही कानावर घातल. माझा क्लासमेट , म्हणजे डॉ. गोखले ह्यांच्याकडे मीच त्यांना घेऊन गेलो. त्यांना नेण्याआधी मि डॉ. गोखल्यांना सर्व हकीकत सांगितली. पहिल्या सिटींगला त्यांनी फक्त जुजबी माहिती विचारली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मनाने त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. अशी काही औषधे दिली कि ज्यामुळे त्यांचे मन थोडे डल होईल. जास्त विचार करणार नाही, थोडे जास्तच झोपतील. पण त्यामुळे त्यांची रिटायरमेंटची विचारशृंखला थोडी फार तरी थांबली. पुढे त्यांनी आणखीन काही सिटिंग्ज घेतल्या. त्यात हल्लीचे साधु कसे भोंदु असतात हेच त्यांच्या मनावर बिंबवल. जुन्या पेपरातल्या बातम्या नेटवर दाखवल्या, ज्यात साधु कसा गैरफायदा घेतात, भाविक लोकांना कसे फसवतात, लुटतात तेच दाखवले. पुर्वी ते एकटयाने ट्रेनने जात. पण त्यांना आता कॉन्ट्रक बसने ऑफिसला जायला लावले की जेणेकरुन कोणीना कोणी त्यांच्याबरोबर असेल.सगळ्यांशि वेगवेगळया विषयांवर बोलण होइल असे बघितले. वहिनींना ही ते घरी आल्यावर त्यांनि टि.व्ही. बघायला,त्यांच्याशि गप्पा मारायला , म्हणजे त्यांना सतत मनाने बिझी ठेवायला सांगितले. थोडी औषध चालु होतीच.

पण ह्या सर्व एकत्रित गोष्टींचा एक परिणाम झाला की ते ब-यापैकी नॉर्मल झाले. अगदी पुर्वीसारखे नाही पण नवख्या माणसाला आजारी आहेत हे कळणार नाही इतपत झाले. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे अगदी पुर्वीसारखे आत्मविश्वासाचे नसले तरी त्यांचे रुटीन सुरु झाले.

पुढे त्यांच्या घरात दोन्ही मुलांची एका पाठोपाठ लग्न झाली. मुलांच्या लग्नाच्या जबाबदारीतुन तरी ते मुक्त झाले. रिटायर व्हायला आता दोनेक वर्षेच राहयली होती. आणि अचानक परत तोच आजार उद्भवला. 31 तारीख जवळ आली की ते अस्वस्थ व्हायचे. पण पुढे पुढे आधी ते आठवडा आठवडा आधीच भरकटल्यासारखे वागायला लागले.मग परत डॉ. गोखल्यांची औषधे, सिटिंग्ज. पण ह्यावेळी काही गुण येईना. एकदा त्यांच्या घरीही मी त्यांच्याशी थोडी चर्चा केली.

``मोहनराव अहो कसले भलते सलते विचार करत बसता. ह्या साधुंच्या सांगण्याला कधी बोलाफुलाची गाठ पडली म्हणजे त्यांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी ख-या होणार का ?``
``डॉक्टर खर सांगु का ? मलाही समजत हो कि ह्या सर्व गोष्टींमुळे सर्वांनाच त्रास होतोय. पण काय आहे तुम्हाला तुमची मरणाची तारीख माहित नाही न म्हणुन तुम्ही अस बोलताय ?``
``अहो तारीख माहीती असली तर काय फरक पडतो?``
``फरक, अहो मी ही तुम्हासर्वांना वेडयासारखा वाटत असलो तरी वेडा नाही. मी ही विचारी होतो ... नाही आहे. लहानपणची गोष्ट सांगतो. गावी आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गेलो होतो, तेव्हा आम्हाला आमचे चुलतभाऊ सकाळी विहिरीवर घेऊन गेले. मोठया भावाला पोहायला येत नव्हते. पण त्याला काही कळायच्या आत त्याला बरोबर घेऊनच त्यांनी विहिरीत उडया टाकल्या. नाकातोंडात पाणी गेल्यावर तो आपोआप हातपाय मारायला लागला व पहिल्याच दिवशी तो पोहु लागला. मी वरच होतो. त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान. आधी ती खोल विहीर बघितल्यावरच मला भिति बसली. त्यात त्यांचे बोलणे झाले की इतक्या छोटयाला वरुन ढकलायचे की नाही ? एक दोघे जण म्हणाले की लहान मोठा कसला? फक्त त्या साइडनि नको कारण तिथे खाली आत कपार आहे. एकदा एक जण त्यात अडकलाय. हे सगळे मी वरती एकत होतो. हे एकुन माझ्या मनात जी भिती बसली की तिथुन मी पळालोच. त्यानंतर मला पोहायला कधीच आले नाही. तसच इथे झालय. अचानक जेव्हा मृत्यु येतो ना तेव्हा त्या निमिषार्धात माणुस कसला विचार करणार? अहो तसे कॅन्सर झालेल्यांनाही माहीत असत कि आपण आता काही महिन्यांचेच सोबती आहोत म्हणुन. तसे तर प्रत्येक माणसालाच माहीत असते की आपण अमर नाही आहोत .कधीन कधी तरी मरणारच. पण हाच मोठ्ठा फरक असतो. मला काय होत की कितिही नाही म्हटल तरी मरणाच्या तारखेशिवाय दुसरा विचारच मनात येत नाही. आता त्या साधुबाबांकडेच जाऊन राहाव असा मी विचार करतोय``.

खरतर मला कळेचना की मी त्यांना आता ह्यातुन बाहेर कसा काढु ? माणुस मरणाला का एवढा घाबरतो ? एक एवढी साधी गोष्ट कळल्यावर आपल मनुष्यपणच हरवुन बसतो ? विचार करता करता मला एक आयडिया सुचली. आम्ही डॉक्टरी शिकताना बरीच नाटक ही केली होती. नाटक म्हणजे स्टेजवरची. घरच्या परिस्थितीमुळे मी पुढे शिकु शकलो नाही. पण हा गोखले पुढे सायक्रियाटिस्ट झाला. माझी कल्पना त्याला, वहिनींना व शौनकलाही सांगितली व ही कल्पना डॉक्टर म्हणून नाही तर एक मित्र म्हणुन सांगतोय हे स्पष्ट सांगितले.
माझे एक मित्र होते. त्यांचे रिटायर झालेले वडिल होते. ते पुर्वि इंदूरला राहायचे. हिंदी शुध्द बोलायचे. ते थोडा योगाभ्यासही करायचे. प्रसन्न मुद्रा, शुभ्र दाढी होति त्यांचि . माझ्या डोक्यातलि कल्पना मी त्यांना सांगितलि . प्रथम हि गोष्ट त्यांना पटेना. पण जर आपण हि गोष्ट केल्याने मोहनराव सावरणार असतिल तर काय हरकत आहे हे समजावल्यानंतर तेहि ह्याला तयार झाले. मग मोहनरावांच्या आयुष्यातल्या बारीक सारीक गोष्टी मि त्यांना पढवल्या. एक आवठवडाभर आधीच मी मोहनरावांच्या कानावर ती बातमी घातली की हिमालयातुन एक साधु आमच्या ओळखीच्यांकडे येणार आहेत.
ते कुणाकडे जास्त जात नाहीत पण मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. एखाद्यावेळेस जे तुम्हाला त्यावेळी हिमालयात भेटले होते कदाचित तेच असतील. किंवा दुसरे कुणीही असले तरी आपण त्यांना भेटलेल चालेल ना तुम्हाला ?
कसे कोण जाणे पण जास्त आढेवेढे न घेता मोहनराव तयार झाले.
पुढच्याच आठवडयात त्यांची भेट झाली. चांगली तिन तास चाललि. त्यात त्यांनी हळुहळु त्यांच्या गत आयुष्यातल्या लहानसहान गोष्टीही सांगितल्या. त्यांचा विश्वास संपादन केला. मग मुलांची गोष्ट, त्यांची ऑफिसमधील कारकिर्द इथपर्यंत अगदी तंतोतंत सांगितले. त्यांचा अगदी पुर्णपणे त्यांच्यावर विश्वास बसला आहे हे लक्षात आल्यावर मी मुद्यालाच हात घातला.
``महाराज, एक गोष्ट सांगतो की ह्यांना कुणीतरी हिमालयात साधु भेटला होता. त्यांनी सांगितले की ज्या दिवशी हे रिटायर होतील. त्याच दिवशी त्यांचा आत्मा मुक्त होईल म्हणून -"
``कोणी सांगितले ? बघु तुमचा हात बघु . हा ही रेषा पाहिली . ही आयुष्यरेषा आहे. ही कुठपर्यंत गेली आहे पाहिलीत न. अहो कमीत कमी अजुन 20 वर्षे तरी यांना मरण नाही. बेटा माझ्यावर तुझा विश्वास आहे न. अरे तुझा नातु एक जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ होणार आहे. ते पाहुनच मग तु डोळे मिटशील``.
आमच्या ह्या महाराजांनी त्यांचे इतके छान ब्रेनवॉशींग केले होते की वयाच्या 80 व्या आधी आपण मरणारच नाही हे त्यांच्या मनाने पक्के घेतले. सहज केलेला प्लान एकदम सक्सेसफुल झाला होता. फक्त मनात आल की ही कल्पना मला आधी सुचली असती तर आणखी काही वर्षे त्यांची व्यवस्थित गेली असती.

"चला जेवायला येतान न ?`` मोहनराव म्हणाले.
``अहो जेऊया हो, आधी हा पेढा घ्या, ``डॉ. गोखल्यांनी पेढयाचा पुडा सोडत एक पेढा त्यांच्या तोंडात कोंबला. ``डायबिटीस नाही आहे न तुम्हाला ? कारण मी हि आणलेत पेढे`` डॉ. लेले म्हणाले.
खळाळुन हसता हसता अचानक मोहनरावांच्या छातीत एक जोरदार कळ आली. चेहरा कसनुसा करतच ते खाली कोसळले. तोंडातला पेढाही तसाच बाहेर पडला.
त्यांच्या नियतिशि मी आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळत होतो. खेळता खेळता अचानक डोळ्यावरचा रुमाल गळून पडला होता.

गुलमोहर: 

Happy
आमच्या एका नातेवाईकांच्या एका नातेवाईक बाईने असंच मनावर घेतलेलं की ती ३२ व्या वर्षी मरणार (कुणीतरी सांगितलेलं भविष्य) मग त्या वर्षी त्या खरंच खूप आजारी पडल्या. इतक्या की खरच काय होतंय.. अर्थातच वर्ष संपल्यावर बर्‍या झाल्या - आता ७०+ वय असेल त्यांचं Happy

खुप छान कथा...ही अंधळी कोशिंबीर त्यांच्या चांगल्यासाठीच खेळली गेली...म्हणा नियतीच्या पुढे कोणाचं काहीच चालत नाही....पण ते ह्या भितीतुन बाहेर येऊन मग गेले असं जे चित्रण केलंय तुम्ही..ते जास्त बरं वाटलं.