कोलाज

Submitted by क्रांति on 7 March, 2010 - 02:22

चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला?
चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली.
"मग आज काय, मस्त मस्त चित्रं काढणार तर?" बाबानं विचारलं. "हो, तू ऑफिसमधून येशील तेव्हा बघच मी किती छान छान गंमत करते चित्रांची." चिऊताईनं बाबाला प्रॉमिस केलं. त्याला हसून दुजोरा देऊन बाबा ऑफिसला गेला, आईचंही सगळं आवरून झालं आणि मग मायलेकीचं राज्य!
आत्यानं आणलेली मोठी स्केच बुक, मावशी, काका, आजी यांनी दिलेल्या रंगीत पेन्सिली, खडूच्या पेट्या, स्केच पेन, बाबाच्या मित्रानं दिलेली गोल गोल वड्यावाली वॉटरकलरची छानशी रंगपेटी, आईच्या मैत्रिणीनं दिलेलं सुंदर चित्रांचं पुस्तक सगळी मंडळी हॉलमध्ये गोळा झाली. कार्पेटवर फतकल मारून चिऊताईची रंगसाधना सुरू झाली.
कुठंतरी गरगट्टा, कुठं दोनच फराटे, एका पानावर दोनचार टिकल्या, आकार ना उकार अशा आगळ्यावेगळ्या कलेनं अख्खी वही भरूनही गेली अर्ध्या तासात! मग ती आईला दाखवून झाली. "हा किनई, हत्ती आहे, तो ढगातून उडतोय. आणि हे आहेत टॉम आणि जेरी. ती जेरी टॉमला मारतेय. ही सोनपरी. तिच्या हातात जादूची कांडी आहे. ती फिरवली की दुष्ट राक्षसाचं कबुतर होतं. आणि हा बघ तो राक्षस. हा आहे डोनाल्ड डक आणि आणि हा मिकी." एक एक करत सगळ्या चित्रांचं वर्णन करून झालं. आईच्या चेहर्‍यावर कौतुक ओसंडून वहात होतं. मध्येच स्वारी पहिल्या पानावर गेली. "ए आई, हे काय आहे ग?"
"अग, हा तर हत्ती आहे ना ढगातून उडणारा?"
"हट् मुळी! तो हत्ती नाही दिसत. तो तर भोपळा झालाय! आणि त्या जेरीला तर शेपटीच नाहीय! सोनपरी नकटी दिसतीय." गाल फुगवून चिऊताई बोलली. हळू हळू सगळ्या चित्रांमधल्या चुका शोधून झाल्या. चिऊताई जाम वैतागली. "हूं, मला मुळी चित्रच नाही काढता येत. सगळा नुस्ता कचरा झालाय. मला नाय आवडली ही चित्रं." त्राग्यानं तिनं उरलासुरला रंग प्रत्येक चित्रावर अक्षरशः फासला, आणि अख्ख्या वहीचे तुकडे तुकडे केले. रात्रीची उरलीसुरली झोप डोळ्यांत दाटून आली होती. फुरंगटून, हिरमुसून चिऊताई तिथंच झोपून गेली.
तासाभरानं चिऊताई उठली, तेव्हा आईनं सगळा पसारा आवरून ठेवलेला होता. वाटीत डाळिंबाचे लालचुटूक दाणे घेऊन आई चिऊताईची वाट पहात होती. पण तिचा रुसवा अजून गेलाच नव्हता. "तुझ्या सोनपरीनं तुझ्यासाठी एक गंमत ठेवलीय. तू एवढे दाणे खाल्लेस, की ती तुला मिळेल." आईनं समजूत काढली. "मी नाई इतके सगळे खाणार. एक्कच घास खाईन!" रुसुबाई चिऊताई अजूनही घुश्शातच होती. "ठीक आहे राणी. एक्कच घास खा, मग तुला ती गंमत देते." कसेबसे चार दाणे खाऊन चिऊताई आईच्या मागे गेली, तर एका मोठ्या पांढर्‍या कागदावर ढगात उडणारा हत्ती होता, तिच्याच रंगांचा! "वॉव! हा तर खराच उडणारा हत्ती! ए आई, हा कसा आला ग?"
चिऊताईच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी आईनं एक-एक कागद तिच्यापुढं ठेवायला सुरुवात केली. सोनपरी, दुष्ट राक्षस, टॉमला मारणारी जेरी, मिकी, अगदी चिऊताईला हव्या असणार्‍या मित्रांची सगळी चित्रं त्यात होती, फक्त रंग नव्हते. "आई, पण सोनपरी यात रंग भरायला विसरली का ग?" बघता बघता चिऊताई खुलली होती. "नाही, ते तुला भरायचे आहेत, आणि तेही रंगपेटीतून नाही." आईनं रिकामी झालेली डाळिंबाच्या दाण्यांची वाटी ओट्यावर ठेवली. चित्रं पहाता पहाता आपण सगळे दाणे फस्त केलेत, हे चिऊताईला कळलंही नाही! "मग सांग ना कसे भरायचे?" ही तर एक नवीनच गंमत होती!
आईनं चिऊताईच्या चित्रकलेच्या वहीचे फाटके कागद, कात्री, फेविकॉलची ट्यूब घेतली. त्या वेड्यावाकड्या कागदांचे छानसे आकार कापले आणि एका चित्रात ते आकार चिकटवले. चिऊताई मन लावून पहात होती. बघता बघता सोनपरी हातात जादूची कांडी घेऊन त्या कागदावर उतरली! "काय मस्त! ए आई, हे मी करू?" चिऊताईला हे नवं काम आवडलं. "हो, हे तुलाच तर करायचं आहे!" आणि हे चिकटकाम आईनं चिऊताईला दिलं करायला. मग ते झाल्यावर स्केच पेननं डोळे, नाक, कान काढून झाले. बघता बघता सगळी चित्रं हवी तश्शी तयार झाली! चिऊताई मनापासून खूश झाली. मनासारख्या जमलेल्या त्या कलाकृती पहाताना तिचा आनंद डोळ्यांतून ओसंडून वहात होता!
बिघडलेल्या चित्रांच्या कपट्यांमधून मनासारखं कोलाज घडवण्याची कला किती सहजपणे शिकली होती ती!

गुलमोहर: 

बिघडलेल्या चित्रांच्या कपट्यांमधून मनासारखं कोलाज घडवण्याची कला किती सहजपणे शिकली होती ती!

वाह! हे जीवनाचं सूत्र आहे. असं खरंच ज्याला जमलं त्यालाच जीवन कळलं.

बिघडलेल्या चित्रांच्या कपट्यांमधून मनासारखं कोलाज घडवण्याची कला किती सहजपणे शिकली होती ती!>>>:)

मस्त लिहीलयस ग क्रांती

तिसर संपुन जेव्हा चवथ वर्ष वय होत तेव्हा मुल एका अनोख्या विश्वात जातात. त्यांना अनेक प्रश्न पडतात. रेडिओत माणुस बसलेला असतो का ? माणसे म्हातारी का होतात. यासारखे प्रश्न हाताळताना आई वडीलांची कसोटी लागते. याच बरोबर त्यांचे स्नायु विकसीत होऊन त्यांना खेळावेसे वाटते. नवनवीन गोष्टी आत्मसात करता येऊ लागतात. थोडक्यात ही फुलपाखरे उडु पाहतात. त्यांच्या छोट्याश्या पंखात आणखी बळ वाढवायच हे काम मोठ्यांच असत.

बिघडलेल्या चित्रांच्या कपट्यांमधून मनासारखं कोलाज घडवण्याची कला किती सहजपणे शिकली होती ती!<<< मस्तच Happy

बिघडलेल्या चित्रांच्या कपट्यांमधून मनासारखं कोलाज घडवण्याची कला किती सहजपणे शिकली होती ती!>>> Happy
खुपच छान क्रांति.... Happy अगदी पटेश.... Happy

बिघडलेल्या चित्रांच्या कपट्यांमधून मनासारखं कोलाज घडवण्याची कला किती सहजपणे शिकली होती ती.......क्या बात है.........मस्तच आहे गोष्ट Happy