रेस्ट हाऊसवरून स्पेशल आयजींची गाडी बाहेर पडली आणि त्यापाठोपाठ पत्रकारांचा जत्था बाहेर पडला. डावीकडच्या गेटमधून सारे बाहेर आले. त्या क्षणी त्यांच्यापैकी कोणाच्याही हाती काहीही बातमी नव्हती.
स्पेशल आयजींची बैठक सुमारे सव्वादोन तास सुरू होती. बैठकीत एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्याचं फक्त स्पेशल आयजींनी सांगितलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती नियंत्रणात होती. वाटाघाटींचा प्रयत्न सुरू असला तरी, जन संघर्ष समितीकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद आलेला नव्हता; मात्र समितीच्या कारवायाही थांबल्या असल्यानं कोंडी फुटण्याची चिन्हं होती.
अर्थात, स्पेशल आयजींनी हे जे काही सांगितलं ते पत्रकारांच्या समोर. मागं बरंच काही घडलं असणार याची किशोरला खात्री होती. किशोरचं काम तेच होतं. मागं जे काही घडलं असेल ते बाहेर काढायचं. तालुक्याच्या ठिकाणी, तेही प्रत्यक्ष संघर्षग्रस्त क्षेत्रात, स्पेशल आयजी येतो, सव्वादोन तास बैठक घेतो आणि फक्त परिस्थितीचा आढावा घेतो यावर त्याचा विश्वास नव्हता. बैठकीला त्यानं एसआरपीही बोलावली होती. एसआरपीचा कमांडंट बैठकीला येण्याची ही पहिलीच वेळ होती, पण ज्याअर्थी तो होता, त्याअर्थी स्पेशल आयजीच्या वरही काही घडलं असलं पाहिजे इतकं त्याला कळत होतं.
साडेचार झाले होते. अंधार पडायला दोन तास बाकी. म्हणजे हाती असलेला वेळ फक्त एका तासाचाच. किशोर रेस्ट हाऊसमधून बाहेर आला आणि त्यानं डावीकडचा रस्ता धरला. फॉरेस्टचं ऑफीस तिथून मैलावर. अर्थात, तिथंपर्यंत जाण्याची गरज नव्हती. अर्ध्या मैलाच्या अंतरावर रस्त्याच्या डावीकडं त्यांचा अड्डा होता. जमणारे सारेच बातमीदार. तिथं बसून बातम्या लिहायच्या. शेजारच्या पीसीओवरून फॅक्सनं पाठवायच्या. पूर्वी फॅक्सच्या आधी एसटीडी करायचे तिथूनच. एका बाजूला पीसीओ. दुसर्या बाजूला चहा-भजीची टपरी. दोन्हीच्या मध्ये तीन फूट बाय दहा फुटांची मोकळी जागा. त्या जागेचाच हा अड्डा. सगळ्यांनी मिळून पंचायत सभापती आणि इतरांनाही दमात घेऊन छत टाकून घेतलं. तिथं सगळ्यांना बसण्यासाठी शाळेतल्या बेंचसारखी लांबसडक सोय केली होती. सोपं जायचं. शेजारून चहा यायचा. एकत्र गप्पा करत बातम्याही कळायच्या. आणि मुख्य म्हणजे पीसीओ असल्यानं फोनचा फायदा.
स्पेशल आयजीनं जे सांगितलं होतं, त्याची बातमी किशोरनं सव्वापाचपर्यंतच तयार करून टाकली. त्याच्याकडं ती फार तर दुकॉलमी गेली असती. त्यापलीकडं नाही. त्यामुळं एका पानात त्यानं बातमी संपवली आणि ती पीसीओवर द्यायला तो निघाला तेव्हा तिथूनच बारक्या हाक मारत आला. "फोन आलाय..."किशोर धावत गेला.
"उद्या रात्रीनंतर केव्हाही डामखेड्यापासून सुरवात." किशोरच्या 'हॅलो'वर एवढं एक वाक्य उच्चारून फोन बंद झाला.
***
साला... देवरामनं मनातल्या मनातच शिवी हासडून घेतली. जवळपास सव्वापाच होत आले होते. सकाळपास्नं मिटिंगच्या नावाखाली पिट्टा पडला होता. मिटिंगमध्ये आतही शिरता येत नव्हतं. त्यामुळं आधीच आलेला वैताग, आता मिटिंग संपल्यानंतर तास होत आला तरी ही सारी मंडळी रेस्टहाऊसमधून जाण्याचं नाव घेत नसल्यानं, वाढू लागला होता. परिणामी ती शिवी.
दुपारी एकच्या सुमारास जेवणासाठी मंडळी उठली तेव्हा देवरामला मिटिंगच्या खोलीत घुसण्याची संधी थोडीशी मिळाली होती. त्यावेळी त्याच्या कानावर फक्त डीवायएसपींचं एकच वाक्य पडलं होतं, "सर, डामखेडा जर झालं तर पुढं फारशी अडचण येणार नाही."
पण त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे मात्र त्याला समजलं नव्हतं. त्यामुळं आतलं काही तरी ऐकणं गरजेचंच होतं. पण ती संधी मिळत नव्हती. मिटिंगच्या हॉलला एकूण तीन दारं. त्यापैकी एक मुख्य प्रवेशद्वारानंतरच्या व्हरांड्यातील. दुसरं दार होतं ते रेस्टहाऊसकडं तोंड करून उभं राहिल्यानंतर उजव्या हाताला असलेल्या व्हीआयपी स्यूटमध्ये उघडणारं. तिसरं दार मागच्या बाजूला. तिन्ही दारं आतून बंद होतीच. शिवाय पुढचा सज्जा आणि मागल्या बाजूला कोठीपर्यंतच्या मोकळ्या जागेत पोलीस होते. तिथं ते कुणालाही फिरकू देत नव्हते. त्यामुळं काही ऐकू येणं मुश्कीलच होतं. जेवणानंतरच्या सत्रात काहीही करून माहिती लागली पाहिजे... देवराम मनाशीच ठरवत होता.
अडीच वाजता देवरामला एका पोलिसानं बोलावलं आणि चहा सांगितला. देवरामच्या वैतागात भर पडली. तीस कप चहा. माणसं तीस, रेस्ट हाऊसवर कप मात्र फक्त बारा. म्हणजे तीन फेर्या तर नक्कीच. हा वैताग असायचा. कारण मधल्या काळात चहा गार होणं, एकाचवेळी सारे कप न मिळणं, एखाद-दुसर्याची नाराजी... पन्नास भानगडी.
चहाचं आधण टाकून देवराम वळला. कपाटातून त्यानं कप काढले. ट्रे काढला. सिंकवर जाऊन त्यानं कप विसळून घेतले आणि ट्रे घेऊन तो ओट्याकडे येऊ लागला. काय झालं ते त्याला कळलं नाही, पण त्याचा पाय निसटला आणि तोल सावरण्याच्या नादात ट्रेच्या हातात, ट्रेखाली अंगठ्याला अडकवून ठेवलेला कप निसटला, पडला आणि फुटला. क्षणात देवरामनं स्वतःलाच एक सणसणीत शिवी घालून घेतली आणि पुढच्याच क्षणी तो सावध झाला. त्याच्या डोक्यात काही तरी चमकलं आणि चेहरा सैल झाला. देवरामनं स्वतःला सावरलं आणि तो ओट्याकडं सरकला.
चहाचा तिसरा राऊंड होता तो फक्त पुढच्या-पाठीमागच्या बंदोबस्ताच्या पोलिसांसाठी. त्यापैकी पुढं जे तिघे होते, त्यांच्यापैकी एक जण येऊन तीन कप घेऊन गेला. मागचे तिघेच बाकी होते. देवराम त्यांच्यासाठी हातातच कप घेऊन गेला.
देसले हा हवालदार डांबरट आहे हे देवरामला ठाऊक होतं. त्यानं आधी त्याच्याच हाती कप ठेवला. मग तो दोघा कॉन्स्टेबलच्या दिशेनं वळला. आशेनं ते दोघं एकेक पाऊल पुढं आले आणि काही कळायच्या आत देवराम कडमडला आणि पडला. एका कॉन्स्टेबलला दिसलं ते इतकंच - डावीकडून पाठीमागं वळताना देवरामनं फक्त डावा पाय फिरवला असावा आणि उजवा पाय पुढं घेताना तो डाव्या पायाला अडला आणि त्याचा तोल गेला. दोन्ही कप पडले, फुटले. चहा देवरामच्या अंगावर सांडला. दोघांपैकी एक जण आधी पाणी आणायला पळाला. कप पडल्याचा झाला तितकाच आवाज. त्यानंतरच्या हालचाली निःशब्दच. कारण आत मिटिंग सुरू होती. दरवाजा फार काही भक्कम नव्हता. पाणी आलं, कॉन्स्टेबलनं देवरामला उठवलं, दंडाला थोडा चटका बसला होता. पाठीमागंच मिटिंग कक्षाच्या भिंतीला लागून असलेल्या खुर्चीवर त्याला बसवून दुसरा कॉ़न्स्टेबल चहा आणायला निघाला. देवरामनं हळू आवाजात सांगितलं, "काही नाही राव, पाय सटकला. बसतो थोडा वेळ इथंच. चहा घेतला की ठीक."
देवरामनं डोळे मिटून घेतले होते. त्याचे कान मात्र पूर्ण जागे होते. ज्या खुर्चीवर तो बसला होता, ती खुर्ची बरोबर मिटिंग कक्षात उघडणार्या खिडकीपाशी होती आणि खिडकीचं एक दार पूर्ण लागत नव्हतं हे त्याला ठाऊक होतं. त्याला तेवढंच हवं होतं. एकेक शब्द तो टिपत राहिला. त्याच्या गावाची लढाई होती अखेर. त्याच्याच गावाची नव्हे तर त्याच्या पंचक्रोशीची. एकदा जमीन गमवावी लागल्यानंतर आलेल्या शहाणपणाला आता समितीच्या कामाची जोड मिळाली होती. पुरेसं होतं देवरामसाठी, त्याच्या गावासाठी काम करण्याकरता.
अर्ध्या तासानं देवराम तिथून उठला. आता ठीक आहे म्हणत त्यानं किचन गाठलं आणि कप धुवायला सुरवात केली.
मिटिंग संपल्यानंतर केव्हा एकदा आपण फोन गाठतो असं देवरामला झालं होतं, पण सव्वापाचपर्यंत ती संधी त्याला मिळाली नाही. डीवायएसपींनी त्याला पुन्हा चहा टाकायला सांगितला होता. चहा घेऊन देवराम मिटिंग कक्षात गेला तेव्हा डीवायएसपींसह सारेच व्हीआयपी स्यूटमध्ये होते. तिथंच त्यानं सार्यांना चहा दिला. दार लावलं गेलं, देवराम मिटिंग कक्षात आला. दोनेक मिनिटं तो दाराच्या पुढं दोन पावलं येऊन थांबला आणि ते आता इतक्यात उघडणार नाही याची खात्री झाल्यावर त्याच कक्षात मागल्या खिडकीपाशी असलेल्या फोनकडं वळला.
"किशोरभाईला द्या. मी नरसापूरहून जिवाल्या बोलतोय..." देवरामनं सांगितलं. किशोरला कधीही कोणाचा फोन आहे हे सांगावं लागत नाही हे ठाऊक असूनही त्यानं आपलं 'नाव' सांगितलं.
किशोरचा हॅलो ऐकल्यानंतर देवराम बोलू लागला, "उद्या रात्रीनंतर केव्हाही..."
***
जबाबदारी किशोरवर होती. डामखेडा हे समितीचं पक्कं गाव. या गावानंच भूसंपादन रोखून धरलं होतं. सर्वेच होऊ दिला नव्हता. तिथूनच सर्वेची सुरवात सरकार करणार होतं हा त्या खबरीचा अर्थ होता. देवरामनं बाकी काहीही विचारण्याची संधी त्याला दिली नव्हती. ज्या अर्थी त्यानं झटकन फोन बंद केला त्याअर्थी तो रेस्टहाऊसमध्येच होता आणि अद्याप त्यानं तिथून फारसं काही बोलण्याजोगी परिस्थिती नसावी. म्हणजे, पोलीस आणि इतर मंडळी अद्याप तिथंच असावीत. त्यांच्या चहा-पाण्यातून मिळालेल्या सवडीचा देवरामनं निरोप दिला होता हेच महत्त्वाचं. आणि ज्याअर्थी त्यानं संध्याकाळी भेट वगैरे काही सांगितलेलं नव्हतं त्याचा अर्थ इतकाच की त्याच्याकडं तेवढीच माहिती होती.
पोलिसांची पहिली माघार झाली तेव्हाच खरं तर किशोरला संशय आला होता की सरकार गप्प बसणार नाही. ती माघार म्हणजे समितीची जित नव्हतीच. ती त्यांची तात्पुरती माघार होती. पोलीस तिथं असेपर्यंत त्यांना म्हणावे तसे हात-पाय हलवता आले नव्हते. गावात प्रवेशही करणं मुश्कील होतं. कॅप उभे होते आणि उभेच होते. पोलिसांच्या त्या माघारीनंतर प्रेशर वाढवायला हवं होतं. किशोरनं ते बोलूनही दाखवलं होतं, पण... असो. आत्ता गरजेचं होतं माहिती काढणं.
बातमी गेली होती. किशोर पीसीओतून बाहेर पडला. पोलिसांत दोन पर्याय होते. इन्स्पेक्टर गुर्जर किंवा डीवायएसपी जाधव. दोघंही पक्के. ताकास तूर लागू न देणारे. तिसरा पर्याय होता प्रांताधिकारी यंत्रणा. पण तिथंही पंचाईतच. शेवटचा पर्याय होता तो म्हणजे थेट अरवली गाठणं. अरवलीत पोलिसांचा आणि एसआरपीचा एकेक कॅप होता. तिथं हालचाली असणार. उद्यापासूनच काही होणार असेल तर नक्कीच. पण अरवली म्हणजे किशोरलाच परतायला रात्रीचे नऊ वाजणार. त्यानंतर निरोप जायचा कसा पुढं?
थोड्या विमनस्क स्थितीतच तो चालू लागला. स्टँडपर्यंत पोचायला पाचेक मिनिटं लागतात. पलीकडं तिठा. एक रस्ता सरळ अरवली आणि पुढं डामखेड्याकडं जाणारा. डोंगरांमध्ये घेऊन जाणारा. पुढं रस्ता म्हणायचा म्हणूनच. कारण डामखेडा गाठायचं झालं तर किमान सहा मैलांची पायपीट नक्कीच. मोटरसायकल जाऊ शकते, पण सराईतांनाच ते शक्य. तिठ्यावरून दुसरा रस्ता जिल्ह्याकडं. डोंगरांतून बाहेर नेणारा. स्टँडच्या गेटबाहेरच तीन जीप ओळीनं उभ्या होत्या. माल भरला जात होता. किशोरनं स्टँडकडं वळून पाहिलं. जिल्ह्याहून आलेल्या एसटीच्या टपावरून बॉक्स उतरवले जात होते. एक पोलीस व्हॅनही पलीकडं उभी होती. उजवीकडं दूरवर टेकडीच्या बाजूनं जिल्ह्याकडं जाणारा रस्ता दिसत होता. पाचेक मिनिटं तो तिथंच उभा होता. पोलिसांच्या जीपमध्ये सामग्री भरली जात होती. काय करायचं याचा निर्णय होत नव्हता. पण हिय्या करून त्यानं एका ड्रायव्हरला गाठलं.
"काय धावपळ इतकी?"
"आपल्याला काही कळत नाही." त्याचं तोडून टाकणारं उत्तर.
किशोर इतक्यात हार खाणारा नव्हता. "अरवली का? मला जायचंय तिकडं म्हणून विचारतो." त्यानं सूर बदलला.
"हो. पण सायबांना विचारा." या भागात असं अनेकदा जाता येतं एखाद्या सरकारी गाडीतून. त्याचाच फायदा घेण्याचा आपला प्रयत्न आहे असं किशोरनं दाखवलं. ड्रायव्हर किशोरला ओळखत नव्हता.
"उद्या परत येता येईल का? दुपारी दोननंतर बस नाहीये तिथून," किशोर.
"आता काय सांगावं? उद्या की परवा? मला नाही वाटत..." तो बोलू लागला. किशोरनं त्याला बोलू दिलं. पाच मिनिटांनी तो तिथून निघाला आणि स्टँडच्या दिशेनं वळला. वळतानाच त्याचं लक्ष गेलं जिल्ह्याच्या रस्त्याकडं. ओळीनं व्हॅन्स थांबलेल्या दिसत होत्या. म्हणजे ड्रायव्हरनं दिलेली माहिती नक्की होती. देवरामची माहितीही नक्की होती. आज निरोप पुढं जावाच लागेल. त्याच्या पायांना गती आली. किमान तिघांना भेटावं लागणार होतं.
अड्ड्यावर येताच किशोरनं बारक्याला बोलावलं. एका कागदाचे तीन तुकडे केले. प्रत्येकावर फक्त दुसर्या दिवसाची तारीख लिहिली. वकीलांकडं आधी, तिथून त्याच्या दोन खास माणसांकडं - रुपसिंग दुकानदार आणि धनजीसेठ - ही माहिती जाणं गरजेचं होतं. पैसाही महत्त्वाचा आता अशा वेळी; शिवाय धनजीकडून इतर माहितीही मिळणार हे नक्की. चिठ्ठ्या देऊन त्यानं बारक्याला पिटाळलं.
***
रातंब्रीच्या पुढं दोन रस्ते फुटतात. एक खाली उतरतो. खोल खाली. सूर्य मावळण्याच्या साधारण तासभर आधी त्या रस्त्यावरून वाहतूक बंद होते. कुणाचीही. दुसरा रस्ता डावीकडे वळून पुन्हा पहाडात चढतो. घाटाची वळणं घेत चढण संपवतो आणि पठाराला लागतो. तीन गावं ओलांडली की पुन्हा उजवीकडं वळण. एक घाट उतरून तासाभरानंतर तालुक्याचं ठिकाण. आधीच्या फाट्यावरून खाली उतरलेल्या रस्त्यानं मात्र तालुक्याचं ठिकाण गाठायला फक्त वीस मिनिटं लागतात. कारण तो खाली उतरताना पाचेक मैलातच डोंगर संपतो आणि तिथून डावीकडं वळलं की सपाटीचा रस्ता आणि पुढं तालुक्याचंच ठिकाण. पण ते पाचेक मैलांचं अंतर जीवघेणं, अशी त्याची ख्याती. तरसं आणि एखादा बिबटा यांचं क्षेत्र, अशी चर्चा. त्यामुळं मावळतीनंतर कोणीही तिकडून जात नाही. अपवाद दिवा आणि त्याच्या साथीदारांचा. त्यांची खुशाल जा-ये सुरू असते. त्यामुळं, त्यांनीच ती तरस आणि बिबट्याची चर्चा उठवून दिली असावी असं सरकारी लोक नेहमी बोलतात, पण ती चर्चा खोटी ठरवण्यासाठी त्या रस्त्यानं मावळतीनंतर जाण्याचं धाडस दाखवत नाहीत हेही लोकांना पक्कं ठाऊक आहे. अर्थात, लोक या गोष्टींवर अवलंबून नसतात. ते त्यांच्या गतीनं चालत असतात.
दिवा संध्याकाळी सूर्य मावळला की त्याच रस्त्यानं निघतो आणि साडेसातला तालुक्याला पोचतो. आजही तेच. दुपारी तो रातंब्रीच्या पुढं निमखेड्याला गेला होता. तो आणि रामदास. रामदासला मोटरसायकल चालवता येते, पण रस्त्यावर. रातंब्री ते निमखेडा म्हणजे केवळ पायवाट. पायवाट म्हणजे नेहमीच्या पायवाटेपेक्षा रुंद. वाटेत तीन ठिकाणी ओढे ओलांडून जावं लागतं. अंतर सहा मैलांचं. गाडी पहिल्या आणि दुसर्या गियरवरच चालवता येते. हे अंतर दिवा कापतो तीस मिनिटांत. मागं बसणार्याची तयारी हवी. रामदासची ती आहे. तो नुसता बसत नाही. निमखेडा आणि पुढच्या गावांना न्यायची सामग्री घेऊनच जातो प्रत्येकवेळी. त्यात अगदी वह्या-पुस्तकांपासून काहीही असतं. 'मसाला' तर असतोच असतो. अर्थात, 'मसाला' असेल त्यावेळी प्रवास रात्रीचा. मोहीमेतील ठिकाणाच्या आधी मैलभर अंतरावर थांबायचं आणि तिथून चालत पुढची वाटचाल.
रातंब्रीच्या फाट्यावरून खाली उतरणार्या रस्त्यावरून दिवानं मोटरसायकल काढली आणि रामदासनं काही मिनिटांसाठी दोन्ही बाजूंनी मिळणार्या आडोशाचा फायदा घेत बिडी पेटवली.
"अंडी न्यायची का जाताना?" रामदासनं एक झुरका मारून दिवाला विचारलं. तालुक्यालाच मुक्काम करण्याचा त्यांचा विचार होता. दिवानं मान डोलावली. भाकरी आणि अंड्याची भाजी हा बेत रामदासचा आवडता. त्यामुळं स्वारी खुश झाली.
साडेसातला दहा मिनिटं कमी असताना मोटरसायकलनं मधल्या नाल्यावरचा पूल ओलांडला आणि ती डावीकडं गावाच्या दिशेनं वळली. फर्लांगभर अंतर कापलं असेल - नसेल तेवढ्यात दिवाचं लक्ष वेधून घेतलं ते रुपसिंगच्या दुकानावरच्या झेंड्यानं. समितीचा झेंडा. तो त्यावेळी तिथं फडकतोय याचा अर्थ होता की दिवानं तिथंच थांबायचं आहे. किशोरनं आखून दिलेली शिस्त होती ती. दिवानं ब्रेक दाबला. गती कमी झाल्यावर रुपसिंगच्या दुकानाशेजारी असलेल्या बोळात गाडी वळवली, थांबवली आणि तो व रामदास उतरले. दहा एक पावलं चालले आणि रुपसिंगच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतात शिरले. शेत मोठं होतं. डावीकडून चालत ते नाल्याच्या दिशेनं जाऊ लागले. उतार सुरू होतो तिथं चार दांडकी जमिनीत ठोकून चौरस आडोसा तयार केला होता. आतून प्रकाश पाझरत होता याचा अर्थ किशोरभाई आत्ता तिथंच असणार.
"सलाम, किशोरभाई." दोघंही एकाचवेळी दरवाजातून आत शिरतानाच म्हणाले. किशोरनं हात कपाळापाशी नेला.
औषधाच्या बाटलीतून बाहेर आलेल्या वातीची भगभग सुरू होती. त्या उजेडात तो चिठ्ठी लिहित होता. दोन चिठ्ठ्या लिहून झाल्या होत्या. त्यांच्या घड्या समोर होत्या. दिवा विचारात पडला, किती ठिकाणी जावं लागणार आहे? त्याची ना नव्हती; प्रश्न वेळेचाच असायचा. रात्री किती फिरायचं याला मर्यादा होतीच नाही तरी. साधारण वीसेक मैलांच्या टापूत चार ठिकाणी पोलिसांचे कॅम्प वाटेत लागायचे. तो धोका होता म्हणून. पूर्वी तो रात्रीच्या रात्रीच फिरायचा.
"दिवार्या," किशोर हाच एकटा असा की जो दिवाला त्याच्या पूर्ण नावानं हाक मारायचा, "आज कुठल्याही परिस्थितीत सायगावला जावं लागेल..." किशोर बोलू लागला. दिवानं चमकून त्याच्याकडं पाहिलं. सायगाव म्हणजे डामखेड्याच्या पुढं. जायचं म्हणजे आले त्याच्या विरुद्ध दिशेला. रस्ता ठीक, पण वाटेत सर्वांत मोठा पोलीस कॅम्प. अरवलीचा.
"पर्याय नाही. भाई तिथंच आहे. तो उद्यापर्यंत काही डामखेड्यात येणार नाहीये. उद्या अॅक्शन सुरू होतीय डामखेड्यातून..." भाई म्हणजे समितीचा सरचिटणीस अनीश रेगे. सध्याचं नाव भाई.
थोडा वेळ सारेच गप्प होते. चर्चा करण्याची गरज नव्हती. भाईपर्यंत निरोप पोचवायचा इतकं पुरे होतं कृती करण्यासाठी. पंधरा मिनिटांनी किशोरनं दिवाच्या हाती तिन्ही चिठ्ठ्या ठेवल्या. एक डामखेड्यात रतीलालला द्यायची होती. ती पूर्वतयारीसाठी असणार. उरलेल्या दोन्ही पुढं सायगावला भाईसाठी. वेगळे विषय असतील तर एकच चिठ्ठी लिहायची नाही; दोन चिठ्ठ्या त्या नियमानुसार.
"आता इथं थांबू नका. आज फौजफाटा आहे इथं. आठनंतर गावांत गाड्या येऊ लागतील. आत्ता बाहेर थांबल्या आहेत..." किशोरनं थांबलेल्या गाड्यांचा उल्लेख केला. गांभीर्य लक्षात येण्यास तेवढं पुरेसं होतं.
किशोरनं गरजेपुरती माहिती त्या दोघांनाही दिली. डामखेड्यात उद्या हजार पोलीस घुसतील. एसआरपीसह. सोबत महसूलची पथकं. तीनशे लोकसंख्येच्या गावाच्या तिप्पट बंदोबस्त. म्हणजे काहीही करून परवा दुपारी मोजणीचा पहिला रिपोर्ट पाठवायचा असणार सरकारला. सुप्रीम कोर्टात चार दिवसांनी सुनावणी. रात्रीच्या सुमारास पोलीस घुसतील. गावात शिरल्यानंतर प्रत्येक घरामागं पोलीस असतील. सोबत एक डेप्युटी कलेक्टर. फायरिंगची ऑर्डर काढणं सोपं. रात्रीतून मोर्चेबांधणी पक्की. सकाळी सगळ्या शेतांची मोजणी सुरू. व्हीडीओ शुटिंग होईल. दुपारपर्यंत डामखेडा पूर्ण करून रिपोर्ट येईल.
दिवा आणि रामदासनं स्वाभाविकच विचारलं, "परत येणार माघारी की...?"
"परत कशाला येतील? पुढचं गाव कळलेलं नाही. पूर्व की पश्चिम इतकाच प्रश्न आहे. उद्या कळेल. निरोप पोचवून तुम्ही दोघंही माघारी या. येताना रस्ता कुठला घ्यायचा हे जाताना परिस्थिती पाहून ठरवा. अरवलीच्या कॅम्पवर हालचाल असेल. त्यातून अंदाज येईल. जमलं तर आरवलीत रामदासला उतरून आत जाऊदे. तासाभरात तो गाव ओलांडून येईल. मग त्याला घे सोबत. तू बाहेरूनच जा..." किशोरच्या सूचना सुरू होत्या.
मोटरसायकल सव्वाआठला तिठ्यावर आली आणि डावीकडं वळून अरवली-डामखेड्याच्या दिशेला लागली.
***
संध्याकाळी साडेसातनंतर स्टँडवर कोणीही असत नाही. शेवटची बस साडेसहालाच गेलेली असते. सात ते सव्वासातच्या दरम्यान दोन गाड्या परत यायच्या असतात. त्या आल्या की सारं सुनसान. पोलीस ठाण्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर स्टँड, पण या दिवसांत रोज संध्याकाळी सहानंतर रात्री साडेआठपर्यंत कॉन्स्टेबल पवारची नेमणूक. काम काहीच नाही. चोहीकडं नजर ठेवून रहायचं. कोण येतंय, कोण जातंय हे पहायचं. स्टँडवर फक्त बसायचं नाही. स्टँडच्या समोरून जाणारा रस्ता ते तिठा, तिठ्यावरून माघारी परत स्टँड ते बाजार हा रस्ता आणि त्याला तिथंच डावी-उजवीकडं फुटणारे दोन रस्ते. डावीकडच्या रस्त्यानं नदीकडं जाता येतं. उजवीकडचा रस्ता वसाहतीत. तिथं सरकारी अधिकारी-कर्मचार्यांचं वास्तव्य. मुख्य रस्त्यावर स्टँड आणि तिठा यांच्या मध्ये नदीच्या दिशेला एक रस्ता फुटला आहे, तिथं रेस्टहाऊस. तिथंही नजर ठेवायची. बाहेरगावचे पत्रकार रात्रीच गावात पोचतात आणि मुक्कामासाठी रेस्टहाऊसच गाठतात म्हणून.
ठरल्याप्रमाणे बाजार रस्ता, आतले दोन्ही रस्ते करून तो स्टँडवर आला तेव्हा सातचा ठोका झाला. एकटा कंट्रोलर - कंट्रोलर म्हणजे क्लार्कच - होता बसून. त्याच्या शेजारची खुर्ची पवारनं गाठली. खिशातून पुडी काढली. तो तंबाखू मळू लागला. तशी हालचाल नव्हती. त्यामुळं पवार निश्चिंत होता.
पहिली बस यायला दहा मिनिटं लागली. जागेवरूनच पवारला कळलं की बसमध्ये खच्चून सहा-सात जण आहेत. त्यामुळं त्याला उठण्याचीही गरज नव्हती. त्यानं फक्त नजर लावून बारकाईनं पाहिलं. सरपंचाची बायको आणि मेहुणी होती. त्या मेहुणीला पाहताना पवारचा काटा किंचित हलला, पण त्यानं आवरलं. रुपसिंगचा पोरगा होता. तो बहुदा माल घेऊन आला असणार. इतरांमध्ये दोघं तर मास्तरच होते. आज त्यांची मिटिंग असणार झेडपीत. ती उरकून येत असावेत. बाकी एक-दोघं गावकरी. दुसरी बस पाठोपाठच आली. तिच्यातून तर केवळ कंपौंडर उतरला. बस थेट आतमध्ये गेली.
पवारनं हातातल्या कागदावर काही लिहिलं. कंट्रोलरनं पाहिलं पण काही विचारलं नाही. हे आता सवयीचंच होतं. आपला गाशा गुंडाळून तो निघाला.
"ये लवकर उरकलं तर. मी आहे बसलेलो." कंट्रोलरनं बसलेलो या शब्दावर जोर दिला. अर्थ स्पष्ट होता. गावातल्या एकमेव बारमध्ये. पवारनं मान डोलावली. आणि तोही निघाला.
पवारनं रेस्ट हाऊसचा राऊंड केला. तिथं कोणी आलेलं नव्हतं. एसआरपीचे दोन डेप्युटी कमांडंट सोडले तर. ते सकाळपासूनच होते. देवराम मागं स्वयंपाकाच्या तयारीत होता. आज त्या दोघा कमांडंटच्या जेवणात त्याचं जेवण निघून जाईल. सहजच पवारनं चौकशी केली. कोंबडी होती. देवराम त्याच्याकडं अपेक्षेनं पहात होताच, पण पवारनं स्वतःला आवरलं. बारमध्ये जायचं आहे, हे त्याला आठवलं. तरी देवरामनं आग्रह केलाच. "ये की तिकडून, मी नाही तरी अर्धा किलो जादा आणलंच आहे. तू येशील म्हणून." देवरामला पक्कं ठाऊक होतं. बारमधून आल्यानं पवार थोडा ढिला होईलच. पुढची कामं मार्गी लावता येतील हा त्याचा विचार.
तिठ्याच्या पलीकडं थोडा उंचवटा आहे. तिथं पोचल्यावर पवार मागं वळला. पंधरा एक पावलं त्यानं कापली असावीत आणि त्याचे डोळे चकाकले. समोरून प्रकाशाचा झोत आला. काही क्षणात मोटरसायकल दिसली आणि ती अरवलीच्या दिशेनं वळली. पवारनं शेजारी शेतात उडी घेतली आणि मधनं धावत त्यानं अरवली रस्ता गाठला. कुंपणाच्या आड असतानाच त्याला चेहरे अर्धवट दिसले - दिवा आणि रामदास! मोटरसायकल निघून गेली आणि पवार वळला. त्यानं पुन्हा आठवून खात्री केली. मोटरसायकलला नंबरप्लेट नव्हती. म्हणजे दिवा आणि रामदासच. आजचं काम संपलं होतं.
रात्रीच्या सुरवातीला दिवा आणि रामदास अरवलीच्या दिशेनं? कुठं निघाले असावेत? ही काही वेळ नाही पहाडात शिरण्याची. अर्थात, समितीच्या लोकांचं काही सांगता येत नाही. ते केव्हाही, कुठूनही उगवतात. हत्यारं असतातच. वेळ आला तर मारायची तयारीही असतेच. पण तरीही...
पवारचं विचारचक्र सुरू होतं. दिवा आणि रामदास हे कधीही सापडत नाहीत. दिसतात सर्वत्र. असतात सर्वत्र. सारी निरोपानिरोपी आणि पोचवापोचवी तेच करतात. या भागांत तरी. आत्ता यावेळी हे दोघं त्या दिशेनं कसे? पवारला आठवलं, दोनेक महिन्यांपूर्वी या दोघांना त्यानं रातंब्रीच्या रस्त्यावर रात्री असंच पाहिलं होतं. ठाण्यात येऊन त्यानं रिपोर्ट केला आणि तो खोलीवर गेला. सकाळी आठ वाजता त्याला कळलं होतं ते इतकंच की रातंब्रीच्या पुढं समितीच्या लोकांनी समरी गावाकडून येणार्या पोलीस पार्टीवर हल्ला केला. तिघं मारले गेले. ती पोलीस पार्टी येणार असल्याची खबर दिवा आणि रामदासच घेऊन गेले होते इकडून. पण पुरावा नाही. तेव्हापासून दिवा आणि रामदास यांच्याकडं सारं लक्ष केंद्रित झालं.
डीवायएसपी ऑफीस आणि कंट्रोल रूम. दोन ठिकाणं अशी होती की जिथं दिवा आणि रामदासच्याबाबतीतील निरोप जाणं गरजेचं होतं.
विचारांच्या चक्रातच पवार ठाण्यावर आला. पीआय गुर्जर अद्याप होते. त्यांनाच जाऊन सांगावं, पवारनं ठरवलं.
"सर, दिवा आणि रामदास आत्ता अरवलीकडं गेले. मोटरसायकलवर."
गुर्जरांनी डोकं वर केलं आणि नजर प्रश्नार्थक केली.
"बाकी काही माहिती नाही. मी तिठ्यावरून परतताना ते वळले तिकडं."
गुर्जरांनी पुन्हा मान डोलावली. पवार ताठ झाला आणि त्यानं पाऊल मागं टाकलं.
पंधरा मिनिटांत डीवायएसपी, होम डीवायएसपी आणि एसपी या तिघांशीही गुर्जरांचं बोलणं झालं. उद्याची दुपार ही डेडलाईन ठरली, समितीची काय तयारी असेल याची माहिती काढण्याची. अर्थात अॅक्शन प्रोग्राममध्ये काहीही बदल नाही.
अर्ध्या तासानं गावाबाहेर थांबलेल्या व्हॅन्स गावाच्या दिशेनं सरकू लागल्या.
***
नदीपात्राच्या किनार्यावरून वर चढू लागलो की, साधारण दोनशे फुटांवर शेताचा बांध. ते शेत ओलांडलं की गावातलं पहिलं घर. जिवा कारभार्याचं. एरवी त्याचं वर्णन झोपडी म्हणूनच होत आलं होतं. बातम्यांमध्ये आणि सरकारी दस्तावेजांमध्ये. पण या घराचं सरकारी कागदपत्रांतील, मोजणी न करताच नोंदलेलं, क्षेत्रफळ सहाशे चौरस फुटांचं. सागाचा वापर. म्हणजे मोल काही लाखांमध्ये जाणारं. नदीकडून वर चढून आलं की घरात प्रवेश करण्याची लाकडी चौकट. सहा फूट रुंदी, आठेक फूट उंची. आत डाव्या हाताला गुरांची जागा. तिच्या पाठच्या बाजूला बहुदा न्हाणीघरासदृष्य सोय असावी. कारण ओल दिसायची. उजव्या बाजूनं घराचा मुख्य भाग. पहिली मोठी खोली. बैठकीची खोली म्हणतो तशी. आत गेलं की कळायचं ही खोली काही स्वतंत्र नाही. सार्या घराचीच एक खोली आहे. बाकीच्या सोयी केवळ आडोसा उभा करून आखलेल्या.
रात्री बाराच्या सुमारासही या घराच्या नदीच्या बाजूच्या अंगणात किमान वीसेक डोकी होती. तिघं एका बाजूला होते आणि बाकी सारे त्यांच्यासमोर त्यांचं बोलणं ऐकत असल्यासारखं घोळ करून बसलेले. बाटलीतून काढलेल्या वातीच्या चार ज्योती गरजेपुरता प्रकाश देत होत्या. त्यापैकी दोन या तिघांच्यासमोर ठेवलेल्या. इतर दोन त्या घोळाच्या दोन्ही बाजूंना. हळू आवाजात तिघांचं काही बोलणं सुरू होतं. समोरचे गप्प होते. काही जण हातातील बिड्यांमध्ये गर्क होते. बसलेल्या प्रत्येकाच्या शेजारी त्याचं-त्याचं हत्यार होतं. बहुतेक शस्त्रं बहुदा पोलीसांवर केलेल्या हल्ल्यातून मिळवलेली. 'मसाला' नंतर मिळवलेला. शस्त्र आहे म्हणजे नदीच्या पल्याड 'वर्दीवाला' म्हणून आणि इकडच्या बाजूला 'दादा' म्हणून मिळतो तो मान. घोळक्यापासून सुमारे पन्नास फूट अंतरावर नदीच्या विरुद्ध दिशेला दाट झाडोरा होता हे त्यावेळच्या चांदणप्रकाशातही दिसून येत होतं. त्याच बाजूला आणखी दोन जण होते. गस्तीवर. हातात बंदुका.
पाच-सात मिनिटं कुजबुजीतच गेली आणि त्या तिघांपैकी एकानं तोंड उघडलं.
"रामराम," समोरच्या घोळक्यातील काही जण नव्यानं आले असावेत. "आत्ताच दिवा आणि रामदास आलेत. एवढ्या रात्री जंगलातला रस्ता कापत आले दोघंही. आपल्यासाठीच. आपलेच आहेत..." आवाज जरबेचा होता. समोर शांतता होती. बसलेल्यांमध्ये काहीही हालचाल नव्हती.
"उद्या, खरं म्हणजे आजच, रात्रीपासून अॅक्शन घ्यायचं पोलिसांचं ठरलं आहे. डामखेड्यात घुसून मोजणी करणार आहेत. परवा मोजणी पूर्ण करून रिपोर्ट जाईल. त्यानंतर दोनच दिवसांनी कोर्टात केस आहे. तिथं तो सादर केला जाईल..."
बोलता-बोलता तो उठून उभा राहिला. त्याचे हात फिरू लागले. आवाज तापू लागला.
"महिनाभर ठेवलेली शांतता स्वतःच मोडायचं सरकारनं ठरवलंय. आपल्याला उत्तर द्यावं लागेल. उद्याच्या सर्वेतून एका गावाची माहिती सरकार देऊ शकलं तर आपला मुद्दा संपला. काहीही करून उद्या गावात घुसायचं हे त्यांचं ठरलंय. मोजणीसाठी माणसं असतील. हजाराहून जादा पोलीसच आहेत. एसआरपी आहे त्यात. एक डेप्युटी कलेक्टर आहे. फायरिंगची ऑर्डर देण्यासाठी. रात्री घुसायचं आणि परवा सर्वे करून घ्यायचा. हा डाव हाणून पाडावा लागेल..."
जमीन जाऊ द्यायची नाही हे गावकर्यांचं पक्कं होतंच. त्यामुळं त्याविषयी फारसं बोलण्याची गरज नव्हती. घर-घर उलथून माती खोदून त्यातून धातू काढण्याचा, म्हणजेच तिथं खाणी काढण्याचा सरकारचा डाव आहे खासगी कंपनीसाठी वगैरे त्यानं काही वाक्यांतच संपवलं. जिओरिसोर्सेस लिमिटेड हे कंपनीचं नाव घेऊन झालं. जिव घेणारी कंपनी असाही उल्लेख झाला. पण ते काही वाक्यांपुरतंच. समितीचं काम आता त्यापुढं आलं होतं याची त्याला जाण होती. नव्हे, परिस्थितीवर त्याचीच मांड पक्की होती. मग चर्चा सुरू झाली. चर्चा एकाच मुद्याची - एकूण किती माणसं डामखेड्यात न्यायची?
अरवलीतून डामखेड्याकडं येताना रस्ता सुटला की सहा मैलांची पायपीट. त्यातल्या मैलभर आधी उजवीकडं वळलं की नदीच्या दिशेनं माणूस जातो. नदीच्या काठावरून एक रस्ता आहे गावात येण्यासाठी. पण ही नदी मगरींची. त्यामुळं तो रस्ता बाद. अरवलीतून मुख्य रस्त्यानंच गावात येणं-जाणं. गाव पहाडात उंचावर आहे. गावात शिरायचं तर तीनेकशे फुटांची चढ आहे. तीनेकशे फूट म्हणजे उंची. अंतर मैलभराचं. ही चढ गाठण्याआधी सखल पठारी भाग. त्यातूनच वाटचाल करत यायचं. या पठारात जंगल नाही. चढ, म्हणजेच डोंगर सुरू होतो तिथं पुन्हा जंगल. त्यामुळं पोलिसांना गाठायचं तर त्या सखल पठारासारखी खिंड नाही. हा प्लॅन पक्का झाला.
डामखेड्यातील वीस जण पक्के होते. आणखी ऐंशी जणांची जुळणी करायची. आजूबाजूच्या गावांतून. शंभर जणांची फौज पुरेशी आहे असं सगळ्याच प्रमुखांना वाटत होतं. त्याच्याशी बाकी सहमत होते. कारण पोलिसांना परतून लावण्याचा फक्त मुद्दा होता आणि आजवरच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होती. थोडी जोमाची चढाई केली तर ते ठिकाणच असं आहे की पोलिसांना माघार घ्यावीच लागणार. एकदा का पोलीस इकडं-तिकडं विखुरले गेले की मग विषय संपतो.
"भाई, गोळ्यांचं काय?" एकानं मुद्दा काढला. भाईनं त्याची नोंद केल्याची खूण केली.
बैठकीतूनच जाऊन काही जणांनी जंगलाच्या सीमेवर काही झाडं पाडून रस्ता अडवायचं काम सुरू केलं. जिल्हा कोर्टात जाऊन पोलीस अॅक्शनला मनाई मिळवण्याचा प्रयत्न करण्याचं ठरलं. हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही केस सुरू असताना सर्वे करण्याचा सरकारला अधिकार नाही, कारण त्या सर्वेचा अर्थ आमचा मालकी हक्कच नाकारण्याच्या प्रक्रियेची सुरवात वगैरे युक्तिवाद आहे खरा. तरीही मनाई मिळेलच असं नाही, पण कोर्टात गेल्याच्या निमित्तानं बोंबाबोंब करता येणार होती हे नक्की.
शेजारच्या सहा गावांत फौजफाट्यासाठी निरोप रवाना झाले. निरोपे चालतच गेले. चालतच ते थेट डामगावांत येतील.
दिवा व रामदासनं मोटरसायकलला किक मारली तेव्हा पहाटेचे अडीच वाजले होते. जिल्ह्याकडं जायचं होतं - सकाळीच कोर्टात मनाईसाठी अर्ज जावा हा निरोप घेऊन. सोबत काही चिठ्ठ्या होत्याच.
***
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या समोरचा एसटीडी बूथ शंकरनं उघडला तेव्हा साडेनऊ झाले होते. दुकानाच्या दारात दिवा आणि रामदास थांबले होते. रामदासचा चेहरा ओळखू येत नव्हता. सरदारफेटा डोक्यावर. अंगात टीशर्ट. दिवाच्या डोक्यावर कॅप. त्या दोघांना घेऊन शंकर आतल्या खोलीत गेला. पाचेक मिनिटांतच तो बाहेर आला आणि त्यानं फोन फिरवण्यास सुरवात केली.
सव्वा अकराच्या सुमारास शंकरनं आत जाऊन दिवा आणि रामदासला जागं केलं. कोर्टातली सुनावणी दुपारी होती. त्या दोघांसाठी शंकरनं जेवण मागवलं. जेवून दोघांनीही पुन्हा अंग टाकलं. आधीचा दीड तास आणि आता आणखी अडीचेक तासांची झोप निश्चित होती आणि गरजेचीही होती.
दुकान नोकरावर सोपवून शंकर बाहेर पडला. आज त्याची पायपीट नव्हती. रामदासकडून मोटरसायकलची चावी त्याच्या हाती आली होती. परतताना टाकी फुल्ल करून आणायची होती इतकीच प्रेमाची 'अट'.
शंकरनं आधी मुख्यालयातच फेरी मारली. एका खोलीत तो शिरला आणि अर्ध्या तासानं बाहेर आला. मग त्यानं गाडीला किक मारली आणि त्यानं नवागावचा रस्ता पकडला. खडबडाटी रस्त्यांवरून आरामात गाडी हाकत तो पोलीस लायनीत एका घरात शिरला. तासाभरानं तेथून तो बाहेर पडला तेव्हा संध्याकाळी पाचनंतर त्याच्या बूथवर येण्याचं त्याच्या मित्राचं आश्वासन त्याच्या हाती होतं.
शंकरनं मग टाकी फुल्ल केली. बूथवर येऊन त्यानं एक फोन आतल्या खोलीत घेतला आणि आतल्या कपाटातून एक डायरी काढली. प्रमुख वृत्तपत्रांतील प्रतिनिधींना निरोप देण्याचं काम त्यानं सुरू केलं.
***
सकाळी सहा वाजता किशोरचा गावात फेरफटका झाला होता तेव्हा एकही व्हॅन त्याला दिसली नाही. याचा अर्थ फौजफाटा अरवलीला गेला होता.
नदीच्या किनारी किशोर भेटला तेव्हा देवरामनं बरोबर दहा मिनिटं पवारनं आदल्या रात्री जे काही सांगितलं होतं त्याची उजळणी केली. त्यानुसार डामखेड्यानंतर राळखेड्याचा नंबर होता. डामखेड्याच्या पश्चिमेला. रेस्टहाऊसवर किशोरनं बारा वाजता चक्कर मारावी असं ठरलं आणि देवराम निघाला तेव्हा साडेसात झाले होते, रेस्ट हाऊसवर एसआरपीचे अधिकारी चहाच्या प्रतीक्षेत होते.
दुपारी बाराच्या सुमारास डीवायएसपींना जिल्हा कोर्टातील अर्जफाट्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीनं तिकडं धाव घेतली. सुनावणी साडेतीनला होती. त्याच निमित्तानं त्यांनी चौकशी केली तेव्हा समितीनं कोर्ट आणि समर्थकांकडून आवाज उठवणे यावर सारा भर ठेवला असल्याचं त्यांना कळलं. अर्थात, त्यावर त्यांनीही विश्वास ठेवला नाही. तयारी पूर्ण करायचीच होती.
प्रांताधिकार्यांनी डेप्युटी कलेक्टरच्या कार्यालयात तीस जणांचं मोजणी पथक हजर केलं तेव्हा अडीच वाजले होते. निघण्यास केवळ दीड तासांचा अवधी होता आणि तेवढाच वेळ कलेक्टरांकडून आलेल्या सूचना अधिक डेप्युटींच्या सूचना यासाठी होता.
रुपसिंग आणि धनजीसेठच्या मागं जिल्ह्यातून आलेल्या पत्रकारांचं पथक रातंब्रीच्या दिशेनं चालू लागलं तेव्हा साडेतीन झाले होते. रातंब्रीमार्गे त्यांना डामखेडा गाठायचं होतं. रातंब्रीच्या पुढं बारा मैलांचं अंतर होतं. काही अंतरावर जीप होती, तिथून ती रातंब्रीच्या थोडं पुढं वेगळ्या वाटेवर नेऊन सोडणार होती. त्यानंतर पायपाटी. ती सारी अंधारात करावयाची होती. काहींच्या पोटात आत्ताच गोळा आला होता. रातंब्रीपासून धनजी आणि रुपसिंग मागं येणार होते, तिथून पुढं समितीच्या हत्यारींच्या ताब्यात पत्रकार जाणार होते.
"पोलिसांचा कोणताही वावगा इरादा नाही, महसूल यंत्रणेचं संरक्षण यासाठीच आम्ही तिथं जाऊ," पोलिसांचं प्रतिज्ञापत्र मान्य करून, आणि समितीकडून काहीही ठोस पुरावा नसल्यानं, न्यायालयानं सर्वेच्या कारवाईला मनाई हुकूम देण्यास नकार दिला आणि दिवा व रामदास यांनी जिल्ह्याच्या ठिकाणाहून मोटरसायकलला किक मारली. तालुक्यापर्यंत दीड तास आणि त्यानंतर पुढचा वेळ. काहीही झालं तरी मावळतीला अरवली ओलांडलेलं असलं पाहिजे. रामदासनं गाडी सुसाट सोडली तेव्हा सव्वाचार झाले होते.
डेप्युटी आणि प्रांतांच्या पथकासोबत पोलिसांच्या व्हॅन अरवलीच्या दिशेनं निघाल्या तेव्हा पाच वाजले होते.
साडेपाचला किशोरला अड्ड्यावर फोन आला तेव्हा तो नुकताच तिथं पोचला होता. पोचेपर्यंत फोन कट झाला, पण लगेचच पुन्हा रिंग झाली. किशोरनंच फोन उचलला. शंकरचा आवाज. माहिती तीच, 'डामखेड्यानंतर पश्चिमेकडं. नदीकाठच्या रस्त्यानं; सोबत रस्ता दाखवण्यासाठी फुटके मोती आहेत. फुटके मोती म्हणजे अरवलीचा माजी सरपंच आणि पाटील. समितीतून फुटलेल्यांपैकी दोघं. पश्चिमेकडं म्हणजे राळखेडा हे कन्फर्म.
रेस्टहाऊसच्या मागं नदीच्या किनारी झाडोर्यात दिवा आणि रामदास पोचले तेव्हा पावणेसहा झाले होते. सहापर्यंत त्यांनी तिथं थांबायचं होतं. त्यानंतर ते अरवलीच्या दिशेनं जाणार होते.
अस्वस्थ दिवा सारखा घड्याळाकडं पहात होता. सहाला पाच मिनिटं कमी होती. किशोरच्या भेटीशिवाय निघायचं म्हणजे काही घोळ तर नाही? त्याच्या डोक्यात गुंता होऊ लागला होता, पण फार काळ नाही. रेस्ट हाऊसच्या मागून भराभरा चालत येणारी किशोरची मूर्ती दिसली तसा तो स्वस्थ झाला. डामखेड्यानंतर पश्चिमेकडं, हा निरोप सकाळीच गावांत गेला होता. पण अपुरा. आता सविस्तर. पश्चिमेकडंही मोर्चेबांधणी करावी लागणार होती.
नवं आव्हान होतं. पोलिसांनी अरवलीहून कूच करण्याच्या वेळेसच डामखेड्याला पोचण्याचं. कारण तसं झालं तरच पोलिसांच्या 'स्वागता'ची पश्चिमेच्या गावांतील मोर्चेबांधणी करता येणार होती. अंदाज असा होता की, पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांची पहिली तुकडी आली असेल. गाव वाचवायचं असेल तर दहाच्या आधी गावकर्यांची हालचाल सुरू झालेली असली पाहिजे. अशी स्थिती आली की दिवाच्या अंगात यायचं. आत्ताही तेच झालं. गावात निरोप पोचवायचा म्हणजे पोचवायचाच. दहाच्या आतच. त्यानं मोटरसायकलला किक मारली आणि पाहता-पाहता ते तिठ्याच्या पलीकडं दिसेनासे झाले.
***
नदी गावाच्या दक्षिणेकडून यायची आणि गाव वसलेला तिनसाचा डोंगर संपला की किंचित डावीकडं वळून निघायची. नदीच्या पूर्वेकडच्या किनार्याकडं जाण्यासाठी हिर्या डुंगीतून निघाला तेव्हा स्वच्छ चंद्रप्रकाश पसरला होता. नदीच्या पात्रात आपण दिसू अशी त्याला भीती होती आणि ती साधार होती. पात्र साधारण पन्नासेक मीटर रुंदीचं. तो ते सरळ ओलांडू लागला असता तर पंचाईत नक्कीच होती. त्यामुळं त्यानं नदीच्या प्रवाहात आधी डुंगी टाकली. साधारण मैलभर खाली जाऊन तिथून त्यानं पात्र ओलांडलं आणि समोरच्या बाजूनं तो पुन्हा वर आला. त्या किनार्यावर पुढं आत जायचं आणि जाताना इकडच्या किनार्यावरच्या रात्रीच्या स्तब्धतेवर नजर ठेवायची. स्तब्धता थोडीजरी विचलीत झाली की काम सुरू. झोप येऊ नये म्हणून बिडी ओढायची. बिडीचा निखारा दिसू नये याची दक्षता घेण्यासाठी उभी ओंजळ बिडीभोवती.
चंद्र डोक्याला तिरपा झाला तेव्हा आपल्याला भूक लागल्याची जाणीव हिर्याला झाली. त्यानं डुंगी तिरावर घेतली. बाहेर उडी मारली. डुंगीचा दोर ओढून घेतला आणि काठावरच्या एका बुंध्याला ती बांधली. तो जंगलात शिरला. दहा मिनिटांनी तो पुन्हा डुंगीवर आला तेव्हा त्याचं पोट भरलं होतं. किनार्यावर या बाजूला किती वेळ थांबायचं उगाच, असा विचार करून त्यानं डुंगीला थोडी गती दिली. दक्षिणेकडं तो डुंगी हाकू लागला. फर्लांगभर अंतर त्यानं कापलं असेल. नदीच्या पश्चिमेला पठारी भाग सुरू होण्याची चिन्हं होती. कोणत्याही परिस्थितीत डुंगी पश्चिमेच्या तिराला न्यायची नाही असं त्याला भाईनं सांगितलं होतं. त्यामुळं त्यानं डुंगी पूर्वेकडंच ठेवली होती.
डावीकडच्या डोंगरातून एक आवाज हिर्याला ऐकू आला. हुंकारासारखा. कोणता तरी प्राणी. अर्थात, हिर्याला त्याची भीती नव्हती. तो नदीत होता. पण जिथं हा आवाज ऐकू आला तिथंच त्याला थांबणं भाग होतं. थोडं पुढं मगरींचा टापू. वेळ रात्रीची. त्यामुळं सावधानता अधिक गरजेची. एरवी दिवसा जिथंपर्यंत माणसं जातात, त्याच्या अलीकडंच तो थांबला. त्यानं दूरवर नजर टाकली. अंधारात झाडांच्या फक्त सावल्या दिसत होत्या. हालचाल काहीही नव्हती.
रात्रीच्या वेळी एकट्यानं अशी कामगिरी करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. त्यामुळं हिर्या निवांत होता. एकच अडचण होती, आज त्याला पावा वाजवता येत नव्हता. एरवी अशा वेळी तो निवांत पावा वाजवत असायचा. आज पोलिसांना त्याचं अस्तित्व कळण्याची भीती होती. त्यामुळं फक्त बिडीवर काम भागवावं लागत होतं.
कंटाळा उडवण्यासाठी हिर्यानं तोंडावर पाणी मारलं. टॉवेलनं तोंड पुसलं आणि पुन्हा एक बिडी पेटवली. एक दीर्घ झुरका घेतला. धूर सोडत त्यानं समोर दूरवर नजर फेकली आणि तो सावध झाला. दूरवर काही हालचाल दिसू लागली होती. नेमकी कशाची हे कळत नव्हतं. पण हालचाल होती. हिर्या टक लावून पाहू लागला. पाचेक मिनिटांत चित्र स्पष्ट झालं. ओळीनं काही माणसं चालत येत होती इतकं त्या सावल्यावरून कळत होतं.
हिर्यानं डुंगी वल्हवायला सुरवात केली. लगेच गावात जाणं गरजेचं होतं. ठरवून त्यानं डुंगी पात्रात मध्यावर टाकली आणि तो भराभरा काठीनं पाणी मागं लोटू लागला.
***
डामखेड्यात नैऋत्येला असलेल्या उतारावर दामाचं घर होतं. तिथंच बातमीदारांना थांबवलं होतं. ते पोचले तेव्हा रात्रीचे साडेअकरा झाले होते.
दामाच्या घरापासून पूर्वेला नदी दिसायची. नदीच्या काठाला लागून असणारं जंगल दिसायचं. दक्षिणेला अरवलीहून येणारा रस्ता. त्या रस्त्याच्या अलीकडं असणारंही जंगल दिसायचं. ही मंडळी पोचली तेव्हा मात्र फक्त छाया आणि अंधुक प्रकाशाचा खेळ. त्यावरून अर्थ लावायचा. अरवलीचा रस्ता तिथून जवळ, तर नदीकिनारची वाट लांब. हे ठिकाणच सुरक्षीत आहे, असं बरोबरच्या दादानं सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्यापलीकडं जाण्याची हिंमत कोणाचीच नव्हती.
मध्यरात्रीचे साडेतीन झाले होते. फोटोग्राफरनी सरळ ताणून दिली होती. अंधारात आणि इतक्या अंतरावरून आपला काहीही उपयोग नाही हे त्यांना ठाऊक होतं. 'अग्निहोत्रीं'च्या गप्पा सुरू झाल्या होत्या. नेहमीच्याच, राजकारणाविषयी. चहाचा, बिनदुधाच्या, एक राऊंड आल्या-आल्या झाला होता. आता दुसरा व्हावा अशी काहींची इच्छा होती. पण तिथली एकूण परिस्थिती पाहता तशी इच्छा व्यक्त करणं मुश्कीलच. एक दोघा अनुभवी मंडळींनी आपल्यासमवेत प्रथमच आलेल्या दोघांचा 'पाठ घेणं' सुरू केलं होतं. गंमतीगंमतीत या अशा अनभिज्ञ भागाविषयी, माणसांविषयी काही असे ग्रह करून द्यायचे की हे नवागत काही काळ तरी त्या 'प्रभावा'तून बाहेर येत नाहीत.
तासभर असाच गेला तेव्हा आत्तापर्यंत डोळे ताणून बसलेल्यांना थोडा पश्चाताप होऊ लागला होता. डोळे ताणण्याऐवजी आल्या-आल्या ताणून दिली असती तर बरं झालं असतं वगैरे त्यांना वाटू लागलं. पण असं करून चालत नसतं हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. पोलीस केव्हाही जंगलापलीकडं आणि नदीच्या मधल्या टापूत जमतील आणि त्याचवेळी कदाचित ठिणगी पडेल.
प्रवासात प्रत्येक बातमीदाराला काही गोष्टींची कल्पना समितीकडून स्पष्ट दिली गेली होती. पहिली म्हणजे ते सारे त्यांच्याच जबाबदारीवर तिथं आले आहेत, त्यांना समितीनं आणलेलं नाही. फक्त त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं समितीनं सुरक्षीत रस्त्यावरून त्यांना इथंपर्यंत आणलं आहे. समितीनं हीही दक्षता घेतली होती की, आपल्याकडून त्यांच्या हाती काहीही दिलं जाणार नाही. त्यांची तटस्थता शक्य त्या मार्गानं एस्टॅब्लीश होणं महत्त्वाचं.
सव्वापाचच्या सुमारास उतारावर काही हालचालीची चाहूल लागली. आवाज येऊ लागले. एक हत्यारधारी आधीच त्या दिशेनं गेला होता. आवाजांपाठोपाठ तो धावत आला निरोप घेऊन: "घुसतायेत साले..."
***
हिर्या गावात काही मिनिटं थांबला आणि लगेच अरवलीच्या वाटेवर धावत सुटला. साठेक जवान जंगलातच होते. त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे लगेचच.
गावातून त्याचवेळी मेगाफोनवरून एक आवाज आसमंतात घुमला. समितीच्या विजयाचा नारा होता तो. पाठोपाठ दुसरा नारा झाला, "हमारे गावमें हमारा राज"! नारा दिला अनीश रेगेनं, अनुभवी मंडळींनी आवाज ओळखला होता. त्यानंतर अनीशचाच आवाज घुमू लागला.
"सर्वेला सहकार्य केलं जाणार नाही. ताकदीच्या बळावर गावांत घुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी करू नये. डेप्युटी कलेक्टर आणि प्रांताधिकार्यांनी नोंद घ्यावी की हे प्रकरण हायकोर्टात गेलेलं आहे. तिथं सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत सर्वे करण्याचा प्रयत्न म्हणजे कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो..."
मेगाफोन गावात वरच कुठं तरी होता. अंधारात दिसणं शक्य नव्हतं. दहा-पंधरा मिनिटांत झुंजुमुंजू झालं की सारंच स्पष्ट होईल अशा बातमीदार मंडळी होती. बरोबर असणारे दोन्ही तरुण निघून गेले होते. हालचाल करायची तरी कशी हा प्रश्न होता. त्यामुळं तिथंच थांबून राहणं त्यांनी पत्करलं.
सुरवात कशी झाली, काय झालं हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. गोंधळ सुरू झाला खाली जंगलापाशी. काही गडबड आहे इतकंच कळत होतं. उजाडलं तेव्हा नदीतीराच्या दिसणार्या भागात पोलिसांचीच धावपळ दिसत होती. तिथून अलीकडं फक्त जंगल. पोलिसांकडंही मेगाफोन होता, त्यांचे इशारे समितीच्या पहिल्या घोषणेबरोबरच सुरू झाले होते. त्यामुळं आधी सारंच मेगाफोनचं युद्ध वाटत होतं. आणि त्या युद्धातच केव्हातरी आलेला गोळीचा आवाज विरून गेला. त्यामुळं ती कुठून सुटली, जंगलातून की पठारावरून हे आता कोणालाही सांगता येणं शक्य नव्हतं. एका गोळीनंतर हे आवाज वाढले. पुढं मग फारसं काही कळेनासं झालं. आवाज कानी येत होते. काही कळत नव्हतं, पण त्यांचा अर्थ इतकाच होता की चकमक सुरू आहे.
अंदाज घेत फोटोग्राफर आणि बातमीदार दामाच्या घरापासून खाली उतरू लागले. निघताना त्यांच्यातल्या अनुभवींपैकी कोणी एकानं ओरडून सांगितलं, "काही झालं, एकमेकांना चुकलो तरी ठीक दीड तासानं आहे त्या स्थितीत सगळ्यांनी दामाच्या घरी यायचं. धुमश्चक्री त्याआधी संपली तर आधीच." किती जणांच्या ते डोक्यात शिरलं हे तपासत बसण्यात अर्थ नव्हता.
खाली उतरता-उतरताच गोळ्यांचा आवाज कानात साठवत कुणी पुढं, कुणी मागं असं करता-करता ते कधी विखुरले गेले ते त्यांनाही कळलं नाही.
***
"सर्वेला विरोध करणार्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. झाडं आडवी टाकून पोलिसांचा रस्ता रोखला होता. पोलिसांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच आधी तुफान दगडफेक करण्यात आली, मग जंगलातून गोळीबार झाला. दीड तासांहून अधिक काळ चकमक सुरू होती. तीन पोलीस मारले गेले. सहा जण जखमी झाले. पथकाला अर्ध्या रस्त्यातूनच माघार घेणं भाग पडलं, कारण सुरक्षीत वाट नक्षलींनी बंद केली होती. मगरींचा संचार होता तिकडून वळून पुढं गावात जाणं शक्य नव्हतं..."
एसपी सांगत होते. घाई दिसत होतीच बोलण्यात, कारण प्राथमिक माहिती देऊन मी घटनास्थळी जाणार आहे असं ते म्हणाले होते. घटनास्थळी म्हणजे अरवली कॅम्पपर्यंत तर नक्की. ब्रीफिंग करताना एसपींनी काहीही मागं ठेवलं नाही. पोलिसी कारवाई फसते आहे हे त्यांनी शांतपणे कबूल केलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात समितीचीही हानी झाली आहे इतकंच त्यांना सांगता आलं. प्रत्यक्षात किती आणि काय हे मात्र सांगणं शक्य नव्हतं, कारण ती माहिती गोळा करण्यासाठी सरकारला गावात शिरताच आलं नव्हतं. इंडियन मेडिकल असोसिएशनचंच पथक फक्त आत येऊ शकेल असे फलक समितीनं लावले होते. त्याहीपलीकडं, त्या जंगलात अद्याप किमान पंचवीसेक शस्त्रधारी तरी होतेच.
आयएमएचं पथक तिथं पोचेपर्यंत दुपार उजाडणार होती.
***
खडकी, निमखेडामार्गे दिवा एकटाच मोटरसायकलवर आला. रुपसिंगच्या शेतावरच थांबला. किशोर, धनजीसेठ तिथंच होते. निरोप स्वच्छ होता: समितीचा डामखेड्याचा कार्यकारी मंडळ सदस्य वेस्ता आणि सायगावचा सिक्का हे दोघं 'शहीद' झाले होते. भाईच्या दंडात आणि मांडीत गोळी घुसली होती. आणखी तिघं जखमी झाले होते. सर्वांना डोली करून निमखेड्याला नेलं होतं. तिथल्या दवाखान्यात उपचार सुरू झाले होते. पोलिसांनी गोळीबार थांबवून मागं जाण्यास सुरवात केली, तसा जंगलातून गावकर्यांनीही गोळीबार थांबवला होता. दोन तासांपूर्वीपर्यंत पुढं आलेले सगळे पोलीस अरवली कँपला गेले होते. बातमीदार आणि फोटोग्राफरचं पथकही परस्पर अरवलीला गेलं होतं.
वेस्ता आणि सिक्का यांच्यावर दोन्ही गावांच्या मध्ये जंगलात अंत्यसंस्कार करायचा निर्णय झाला होता.
अंत्यसंस्काराचा निरोप घेऊन समितीचे कार्यकर्ते गावागावांत पोचत होते तेव्हा त्या दोघांच्याही बायका आपले बछडे आणि इतर काहींसमवेत डामखेड्यातच होत्या. दुःखासाठीची उसंत त्यांना अंत्यसंस्कारानंतर मिळणार होती. घरी पोचल्यावरच. ते त्यांनी पत्करलेलं होतं. जमिनीसाठी, कारण एरवीही काही पर्याय नव्हताच, ही त्यांची धारणा होती!
***
कलेक्टर ऑफिसात एकूण रिपोर्ट तयार व्हायला दुसर्या दिवसाची दुपार उजाडली. स्वतः कलेक्टर अरवलीपर्यंत जाऊन आले. एसपीही गेले होते. त्यांच्या पाठोपाठ स्पेशल आयजी. नंतरची रिव्ह्यू मिटिंग कलेक्टर ऑफिसलाच झाली. पालकमंत्री दुपारी साडेतीन वाजता तिथं पोचणार होते, नेहमीप्रमाणे त्यांना उशीर झालाच. चार वाजता ते आले तेव्हा स्पेशल आयजींसमवेत कलेक्टर, एसपी अँटे चेंबरमध्ये बसले होते. पालकमंत्री थेट तिथंच गेले.
"नमस्कार. काय परिस्थिती आहे आत्ता?" आत शिरताच पालकमंत्र्यांचा पहिला प्रश्न. कलेक्टर बोलू लागले. मोजक्या पंधरा-वीस वाक्यांत त्यांनी आढावा घेतला.
"पुढं काय? सर्वेला किती दिवसांची स्थगिती आहे?"
"स्थगितीची मुदत नाही. मी आपल्याकडून पुढच्या सूचनांची वाट पाहतोय." कलेक्टरांचा खुलासा.
"आत्ता घाई नको. सुप्रीम कोर्टच काय ते सांगेल..." पालकमंत्री म्हणाले. कलेक्टरांनी मान डोलावली.
काही औपचारिक चर्चा करून पालकमंत्र्यांनी आतला फोन उचलून सूचना दिली, "रेव्हेन्यू सेक्रेटरींना लाईनवर घ्या." त्यांचं खातं तेच.
काही क्षणातच फोन लागला. पालकमंत्री इकडून बोलू लागले. पलीकडचं बोलणं ऐकू येणं शक्यच नव्हतं. "तुमच्याकडं प्राथमिक माहिती असेल... कलेक्टरांचा रिपोर्ट येईलच. काय आहे, या कोर्टाच्या 'जैसे थे' वगैरे आदेशांनी त्यांना जोर दिला. नाही तर त्यांची ही हिंमत झाली नसती. आता जे झालं ते उत्तम झालं. आय सजेस्ट, वी मस्ट टेक द रिपोर्ट डायरेक्टली टू दिल्ली... सुप्रीम कोर्ट. एकदाचं हायकोर्टातलं लफडंही तिकडं दिल्लीत जाणं गरजेचं आहे. मग या सगळ्यांवर सुप्रीम कोर्ट ऑर्डर देईल. ती काही भूसंपादन करू नका अशी असणार नाही. आत्ता घडलेल्या घटनेतून कोर्टातही गांभीर्य मांडता येईल..."
एसपींना त्याक्षणी मारल्या गेलेल्या तीन पोलिसांची आणि त्यातून एकूण पोलीस दलामध्ये निर्माण होणार्या प्रतिक्रियेची चिंता होती. समितीविरुद्ध त्या दुर्गम प्रदेशात झुंजणं सोपं नव्हतं. वर्षभरात बळी पडलेल्या पोलिसांची संख्या आता १२ वर गेली होती.
कलेक्टरांना सर्वे आणखी लांबवता येईल का याची चिंता भेडसावत होती. त्यांना ठाऊक होतं की सर्वे होईलही, पण भूसंपादन शक्य नाही सध्याच्या स्थितीत. पुनर्वसनाचा प्लॅन पक्का नसताना 'जिओरिसोर्सेस'नं कितीही मोठ्या कल्पना मांडल्या तरी त्या या प्रदेशात प्रत्यक्षात आणणं नेहमीच्या चौपट कामाइतकं होतं.
स्पेशल आयजींचा विचार सुरू होता तो समितीचं कंबरडं कसं मोडायचा याविषयी. जिओरिसोर्सेसच्या एम.डीं.ना दिलेला तो शब्द होता. त्या शब्दावरच पुढं हरिप्रसाद महाराजांचं समाधान अवलंबून होतं. महाराज समाधानी झाले तरच सीबीआयमध्ये जाण्याची संधी, एरवी इथंच राज्यात सडत रहावं लागेल.
"या तीन पोलिसांची नावं काय आहेत?" पालकमंत्र्यांचा अचानक प्रश्न आला एसपींना.
"हेड कॉन्स्टेबल रावण पाटोळे, कॉन्स्टेबल रफीक मुकादम आणि प्रभाकर चव्हाण. तिघंही मुख्यालयातच नेमणुकीला होते." एसपींनी माहिती पुरवली. पालकमंत्र्यांना नावात काय इंटरेस्ट आहे हे त्यांच्या ध्यानी आलं नाही.
"आपण त्यांच्या घरी जाऊया. भरपाईसाठी मी सीएमसायबांशी बोललो आहे. त्याशिवाय कंपनीही मदत करणार आहे. मुलं केवढी आहेत?"
"तिघंही तरूण होते. मुकादमचा मुलगा आणि चव्हाणची मुलगी बालवाडीत वगैरे आहे. पाटोळ्यांचा मुलगा पुढच्या वर्षी दहावीला जातोय." एसपी.
"ठीक आहे, त्यांची व्यवस्था करू. जरा डीआयओंना बोलवण्याची व्यवस्था करा..." पालकमंत्र्यांनी जिल्हा माहिती अधिकार्यांना बोलावण्याची सूचना केली. उद्याच्या बातम्यांची सोय. चौघंही बाहेर आले.
छोट्याशा औपचारिक बैठकीनंतर मंत्री पुन्हा अँटे चेंबरमध्ये गेले. यावेळी सोबत फक्त कलेक्टर आणि मंत्र्यांचे सचिव व दोन सहायक होते. पाऊण तासानं सारेच बाहेर आले. "चला, आधी पोलिसांच्या कुटुंबियांना भेटून येऊ..." मंत्री म्हणाले.
पत्रकारांना निरोप देण्यासाठी डीआयओंच्या सहायकांची पळापळ सुरू झाली.
***
सचिवालयात महसूल सचिवांच्या दालनांमध्ये नेहमीच्या वेळेनंतरही जाग होती. सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे प्रतिज्ञापत्र तयार होत होतं. भूसंपादनाला गावकर्यांचा विरोध नाही. विरोध आहे तो फक्त समितीचा. समितीच्या शस्त्रांच्या धाकदपटशामुळं गावकरीही दबलेले आहेत. त्यामुळं सर्वंकष कारवाईची गरज आहे असा मुद्दा मांडण्याची सूचना सरकारच्या विशेष वकिलांसाठी त्या प्रतिज्ञापत्रासोबतच्या नोटमध्ये लिहिली गेली होती.
घटनास्थळापाशी केलेल्या व्हिडिओची एक प्रत घेऊन पालकमंत्र्यांचे एक सहायक तिथं पोचण्यास निघाले होते. महसूल सचिवांसाठी निरोप होता, या व्हिडिओवरून 'आँखो देखा हाल' तयार करून तो सुप्रीम कोर्टात देण्यासाठी सज्ज ठेवायचा.
***
पालकमंत्र्यांचा ताफा पोलीस लायनीत शिरला. पाटोळे, चव्हाण आणि मुकादमच्या घरांसमोर शोकाकूल मंडळी होती.
विचारपूस करून पालकमंत्री पत्रकारांशी बोलू लागले. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून विशेष घोषणेची अनुमती त्यांना मिळाली होती. तिन्ही पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून नियमित मदतीव्यतिरिक्त प्रत्येकी एक लाखाची मदत. तिघांच्या पत्नींना सरकारी नोकरी. तिघांचीही पहिली नावं घेत पालकमंत्री आपुलकीनं बोलले. त्यांचे डोळे पाणावले होते. कॅमेराचे फ्लॅश उडत तेव्हा ते चकाकत!
तिन्ही पोलिसांना श्रद्धांजली वाहून पालकमंत्र्यांनी रेस्टहाऊसकडं कूच केलं.
***
सूर्य मावळतीला निघाला होता तेव्हा पोलीस लायनीपासून साधारण अर्धा फर्लांगभर अंतरावर असलेल्या संस्कार केंद्रातील मुलांना तिथली शिक्षिका प्रार्थना शिकवत होती. तिची आणि त्या मुलांचीही आवडती प्रार्थना,
इतनी शक्ती हमें देना दाता
मनका विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्तेपे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना...
केंद्रातून बाहेर येणारे शब्द आसमंतात विरून जात होते.
शिक्षिकेच्या आवाजातच दोन चिमुकले आवाजही मिळालेले होते - रोशन मुकादम आणि रेवा चव्हाणचा आवाज!
बापाच्या मृत्यूचा 'निरोप' त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आणखी काळ जाऊ द्यावा लागणार होता.
पूर्ण
हे सगळं खरच असं असतं का?
हे सगळं खरच असं असतं का? गोष्टं आवडली म्हणण्याची हिम्मत नाही. पण फ्लो छान आहे. कोण खरं कोण खोटं काहीही कळत नाही.
सुन्न करणारी कथा आहे
सुन्न करणारी कथा आहे !
वेगवान.
जबरदस्त फ्लो आहे कथेचा.
जबरदस्त फ्लो आहे कथेचा. सत्यघटना वाटावी इतकी खरीखुरी वाटतेय कथा.
खूपच सुंदर. वेगळाच विषय आणि
खूपच सुंदर. वेगळाच विषय आणि गुंतवून ठेवणारी मांडणी.
@ नविना: कोण खरं, कोण खोटं हे
@ नविना: कोण खरं, कोण खोटं हे सांगण्याचा हेतू नाही. लेखक कोण तो न्यायाधीश?
श्रावण - काय कुणास्ठाऊक - पण
श्रावण - काय कुणास्ठाऊक - पण वाचताना ही सत्य घटना आहे असे सारखे वाटत राहिले.
@ नंद्या: तुम्हाला तसे वाटणे
@ नंद्या: तुम्हाला तसे वाटणे ही माझ्या कल्पनाविलास क्षमतेची मर्यादा (आणि म्हणूनच कदाचित ताकद) असावी.
हम्म्म्म.. ही कथा वाचून
हम्म्म्म.. ही कथा वाचून सिंगूरच्या भूसंपादनाच्या वेळी झालेल्या आंदोलनाची नि हिंसाचाराची आठवण झाली. कथेची मांडणी आवडली.
जबरदस्त! वातावरणनिर्मिती
जबरदस्त! वातावरणनिर्मिती पर्फेक्ट!
जबरदस्त कथा! कथानक फार
जबरदस्त कथा! कथानक फार प्रभावी पद्धतीने मांडले आहे.
वेगळा विषय आहे कथेचा...
वेगळा विषय आहे कथेचा... आम्हाला फारसा परीचीत नसलेला.
कथा आवडली. अगदी सुरेख उतरली आहे.
मंजू-डी ला अनुमोदन. कथा
मंजू-डी ला अनुमोदन.
कथा आवडली.
('काही नोंदी...' ची थोडी सावली आहे या कथेवर - असं वाटलं. बाकी, बर्याच दिवसांत नवीन नोंदी आल्या नाहीत?)
सुरेख कथा....
सुरेख कथा....
कथा आवडली. मांडणी, फ्लो, विषय
कथा आवडली. मांडणी, फ्लो, विषय सगळंच छान आहे. वाचल्यावर मी अंतर्मुख झाले.
जमिनीचे भुसंपादन, त्याला असणारा गावकर्यांचा विरोध आणि तो विरोध मोडून काढायच्या प्रयत्नात असलेली यंत्रणा हे ढोबळ कथानक. अशा कित्येक घटना सध्या घडत आहेत. मी अशा प्रकल्पांमध्ये काम केलं आहे. ते पण यंत्रणेच्या बाजुने. माझ्या अनुभवाप्रमाणे जिथे ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला विरोध केला, तिथलं काम गेली २ वर्षे थांबवलं गेलं / किंवा ते गाव / त्या जमिनी सर्वेक्षणातून वगळल्या गेल्या. त्या पार्श्वभुमीवर ही कथा वाचून धक्का बसला.
वर म्हटल्याप्रमाणे कथा खरंच सत्यघटना वाटतेय.
मंजूडी, ललिता-प्रीती,
मंजूडी, ललिता-प्रीती, हिम्सकूल, अल्पना: धन्यवाद!
ललिता - नोंदींची सावली असू शकते. अनुभवांची जातकुळी सारखी असते अनेकदा.
अल्पना - भूसंपादनाची कहाणी प्रकरणनिहाय वेगळी होते. एक युनिफॉर्म असं काही सापडत नाही तिथं.
जबरादस्त शैली. विशेषतः कथेचा
जबरादस्त शैली. विशेषतः कथेचा प्रवाह खूपच प्रभावी.