मुंबईपुढचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात दुर्लक्षिला गेलेला प्रश्न कोणता असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा. मुंबईपुढचे पाणीटंचाईचे संकट दरवर्षी उग्र स्वरुप धारण करत आहे. पावसाळ्यात तानसा,वैतरणा,विहार्,मोडकसागर तलाव भरुन वाहू लागल्याच्या बातम्या एकेकाळी वर्तमानपत्रांमधे आल्या की आता उन्हाळ्यापर्यंत पाणी नक्की पुरणार असं समजून मुंबईकर सुटकेचा निश्वास सोडायचा. पण अफाट गतीने वाढणारी लोकसंख्या, भरमसाठ बांधकामे आणि मोजके जलस्त्रोत, पाणीनियोजनाच्या कोणत्याही ठोस नियोजनाचा अभाव यांचा ताळमेळ परस्परांशी जमेनासा झाला आणि गेली अनेक वर्षे ही भरपूर मान्सूनचे वरदान लाभलेली आणि समुद्राच्या पाण्याने वेढलेली ही मुंबई कायमस्वरुपी पाणीटंचाईच्या समस्येनी ग्रस्त होऊन गेली. भविष्यात जास्तीतजास्त तीव्र होत जाणारा मुंबईपुढचा हा पाणीटंचाईचा प्रश्न सोडवायचा कसा यावर अनेक उपाययोजना चर्चेत आहेत.
मुंबईतल्या पारंपरिक जलस्त्रोतांचे- विहिरी, तलाव, तळी यांचे पुरुज्जिवन करणे हा त्यापैकीच एक.
मुंबई बेटाचा इतिहास तपासला तर एक गोष्ट लक्षात येते ती ही की पिण्याच्या पाण्याची टंचाई इथे कायमच होती. १६ व्या शतकात (सन १६६५) जेव्हा इंग्रजांनी हे बेट पोर्तुगिजांकडून आपल्या ताब्यात घेतले तेव्हादेखील इथे गोड्या पाण्याचा तुटवडा असल्याचा उल्लेख जुन्या पुस्तकांमधे अनेकदा आढळतो. पण त्या काळात मुंबई बेटावर लोकवस्तीच अतिशय कमी असल्याने आणि फारसे लोक बाहेरुन इथे रहाण्यास येण्यास उत्सुक नसल्याने मोजक्या विहिरी आणि तळ्यांवर काम निभावत होते.
१६६१ पासून १९व्या शतकापर्यंत पाणीटंचाईने उग्र स्वरुप धारण केल्याच्या किंवा दुष्काळांची नोंद आढळत नाही. मात्र इंग्रजांनी व्यापाराच्या दृष्टीकोनातून मुंबई बेटाचा विकास करण्याचे मनावर घेतले आणि बेटावरची लोकसंख्या वाढायला लागली तेव्हा पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीवर आणि काही मोजक्या गोड्या पाण्यांच्या विहिरींवर सर्वथा आधारलेली मुंबईची पाणीव्यवस्था बिकट स्वरुप धारण करु लागली. श्री. गो. ना. माडगावकरांच्या १८६३ साली छापलेल्या ' मुंबईचे वर्णन' या पुस्तकामधे 'मुंबईत आठ दहा वर्षांनी साधारण अवर्षण' पडू लागल्याचे उल्लेख आहेत.
उन्हाळाच्या दिवसांमधे विहिरींनी तळ गाठल्यावर पाण्यासाठी एकच आटापिटा सुरु होई. मुंबैकर त्या वेळी रात्री एकेक वाजल्यापासून विहिरीवर पाण्यासाठी ताटकळत उभे राहायचे. इतर ऋतूंमधेही विहिरी आणि हौदांमधून पाणी खेचण्यात बरेच श्रम खर्चायला लागत.
पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाचा तत्कालिन मुंबई सरकारला तातडीने विचार करायला लावणारी मुख्य घटना म्हणजे सन १८०३ साली मुंबईतील किल्ल्याच्या आवारात लागलेली भयंकर आग. ही आग विझवण्यासाठी पुरेसे पाणी किल्ल्याच्या आवारात उपलब्ध नव्हते आणि त्यावेळचा गव्हर्नर जोनाथन डंकन याला (हा त्यावेळी किल्ल्यातच राहत असे) हताशपणे मालमत्तेची होळी पाहण्याशिवाय काहीच करता येण्यासारखे नव्हते. या प्रसंगामुळे त्याने ताबडतोब पाणीपुरवठ्यासाठी उपाय योजले. पण ते औरे होते. वाढत्या लोकवस्तीला पाणी पुरवायचे म्हणजे त्याला दीर्घकालीन पाणी-पुरवठा योजनाच हवी.
आणि १८२४ साली मुंबईत संबध पावसाळ्यात फक्त पंचवीस इंच पाऊस पडला. फार मोठे अवर्षणाचे संकट मुंबईकरांवर कोसळले. गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनच्या अध्यक्षतेखाली पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर तातडीने एक समिती स्थापन केली गेली. त्या समितीच्या आदेशानुसार मुंबईतल्या विहिरी आणि हौद यांचा गाळ उपसून त्या खुल्या करण्यात आल्या. अनेक नव्या विहिरीही खोदल्या गेल्या. त्यावर्ष अखेरपर्यंत मुंबईत जवळजवळ तीन ते चार हजार सार्वजनिक आणि खाजगी विहिरी तसेच हौद खोदण्यात आल्याची नोंद 'मुंबई वृत्तांत' मधे मिळते.
सन १८३१ साली आत्ता जिथे मेट्रो सिनेमागृह आहे त्याच्याबाहेर एक मोठा हौद बांधला गेला. तो धोबीतलाव. आता तिथे फ्रामजी कावसजी इन्स्टिट्यूट आहे. या भागाला आजही धोबीतलाव म्हणूनच ओळखले जाते. या हौदावर त्यावेळी एका बाजूला धोबी आपले कपडे धूत असत म्हणून हा धोबीतलाव.
सन १८४९ साली बाबुला टॅन्क हा तलाव जे.जे. हॉस्पिटलजवळ बांधला गेला. फोर्ट (किल्ला) ते माहीम या भागामधे त्यावेळी अनेक हौद बांधले गेले. यातील पुष्कळसे हौस मुंबईतील दानशूर व्यक्तींनी बांधले आणि त्यांची नावे या तलावांना त्याप्रमाणे देण्यात आली. उदा. माधवबागेजवळील कावसजी पटेल टॅन्क (सी.पी.टॅन्क), मस्तान तलाव, नबाब तलव इत्यादी. किल्ल्याच्या आतल्या आवारात देखील टाकसाळीच्या पाठीमागच्या भागात एक तलाव होता. मुंबादेवीच्या देवळाजवळ एक तलाव होता. तो बर्याच नंतर बुजवण्यात आला. सुप्रसिद्ध गोवालीया टॅन्क हा सुरुवातीला पाणी-पुरवठ्यासाठी बांधला गेला, पण नंतर जनावरांसाठी वापरण्यात येऊ लागला. हे तलाव कालांतराने बुजवण्यात आले मत्र त्या जागांना अजूनही त्याच नावाने ओळखले जाते.
मुंबईतला सर्वात जुना हौद १७७५ मधे बांधला गेलेला कावसजी पटेल टॅन्क. १८ व्या आणि १९ व्या शतकामधे मुंबईत पिण्याच्या पाण्यासाठी एकुण १० टॅन्क बांधले गेले. त्यासाठी ज्यांनी पैशांची मदत केली त्या धनिकांचे नाव या हौदांना देण्यात आली.
१) कावसजी रुस्तुमजी पटेल टॅन्क ( सी.पी. टॅन्क) गिरगाव १७७५
२) गोवलिया टॅन्क
३) खारा तलाव
४) धोबी तलाव
५) बाबुला टॅन्क- ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजजवळ
६) नवाब टॅन्क
७) फ्रामजी कावसजी टॅन्क- एस्प्लनाड (१८३१) मेट्रो सिनेमाजवळ आता एका भिंतीमधे एक खांब शिल्लक आहे याचा.
८) मुंबादेवी तलाव- पुतळीबाई नावाच्या एका बाईने हा बांधून घेतला.
९) बाणगंगा तलाव- याचे अस्त्तित्व फार प्राचीन अगदी पुराणकाळापासून असल्याचे मानले जाते.
१०) बान्द्रा तलाव- एका श्रीमंत कोकणी मुसलमान व्यक्तीने नवापाडाजवळ हा बांधला. बरीच वर्षे गुरांना धुण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी हा वापरात होता.
मुंबई उच्च न्यायालयाजवळ एक जुनी विहिर अजूनही आहे. ही रामलाल मारवाड्याने बांधली. त्यावेळचे किल्ल्यातले रहिवासी त्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत असत. त्याच्याच अलीकडची सेन्ट्रल टेलिग्राफ ऑफिससमोरची पारशी विहिर तर प्रसिद्धच आहे.
पाणी-पुरवठ्याच्या निरनिराळ्या योजना आखल्या जात असतनाच्ग १८५४ ते ५६ साली मुंबईकरांना एका मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. माणसांना किल्ल्याबाहेर हलविण्यात आले. गरीब जनतेला कसल्या तरी घाणेरड्या आणि अपुर्या पाण्यात दिवस कंठायची पाळी आली. माडगावकरांच्या 'मुंबई वर्णन' या पुस्तकात या दुष्काळाचे यथार्थ वर्णन आहे. हे पुस्तक १८६३ साली छापलेले असल्याने माडगावकरांनी लिहिलेले हे वर्णन प्रत्यक्ष अनुभवाचेच आहे.
ते लिहितात," पावसाचे ऐनबहराचे महिने सुके गेले. विहिरी तळी बहुधा कोरडी पडली; तेव्हां पुढचे वर्ष कसे पार पडेल" या चिंतेच्या उग्रतेने लोक हैराण होऊन गेले.
माडगावकर पुढे हिंदूसमाजाने अवर्षणावर उपाय म्हणून जे होमहवन, तोडगे, भुलेश्वरच्या तळ्याकाठी रामायणातील शृंगऋषींच्या कथेचा प्रयोग, चिमकणमातीने बनवलेल्या पुरुषभर उंचीच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे उपाय योजले आणि कुचकामी झाले त्याबद्दल सविस्तर लिहितात. ते पुढे म्हणतात- " इतकेही केले तरी पाऊस ज्यावेळी पडायचा त्याच वेळी, जितका पडायचा तितकाच पडला."
मुंबईत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे हैराण होतो तो सामान्य माणूस, राज्यकर्त्यांना त्याची झळ सोसावी लागत नाही हे सत्य ब्रिटिशकाळातही तेच होते आणि आताही तेच आहे याची एक विदारक जाणीव माडगावकरांचं अवर्षणग्रस्त मुंबईचं वर्णन वाचून होतं हे मात्र खरं.
१८५६ सालच्या पाणीटंचाईचं वर्णन करताना माडगावकर लिहितात," ह्या वर्षी माघ महिन्यापासून ज्येष्ठ अखेरपर्यंत पाण्याची अतिशय तंगी पडली. गरिबगुरीब लोकांत पाण्यासाठी मोठा हाहाकार पडला. कित्येक लोक डोईवर हंडे घेऊन रस्तोरस्ती व गल्लोगल्ली पाणी पाणी करीत फिरत. मुंबईतील गाईम्हशी व दुसरी ढोरें माहिमास नेऊन ठेवावीं असा सरकारांतून हुकूम झाला होता. कित्येक गरीब लोकांच्या बायका कांपाच्या मैदानांत मध्यरात्रीपर्यंत बसून मोठ्या सायासाने एक दुसरा हंडा पाणी भरुन घरी घेऊन जात. कित्येक बावींत उतरुन वाट्यांनी पाणी जमवीत. सरकारने बाहेरगावांतून आगीचे गाडीवरुन हजारो पाण्याची पिंपे आणवून डोंगरी, चिंचबंदर, बोरीबंदर येथल्या विहिरींत ओतली. असे अनेक प्रयत्न करुन इंग्रज सरकारने रयतेस या अरिष्टांतून मुक्त केले."
याच दुष्काळामुळे विहिरी आणि तलाव यांनी वाढत्या मुंबईचा प्रश्न सुटणार नाही हे नक्की झाले. त्यामुळे विहार तलावाची योजना पुढे आली, आणि ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याची जबाबदारी ब्रिटिश शासनावर येऊन पडली. अनेक धनिक पारशी आणि वाणी गृहस्थांनी कापांत म्हणजे फोर्ट विभागात या काळात विहिरी आणि टाक्या खोदल्याचा उल्लेख मिळतो. नाखुदा महंमद रोगे या मुसलमान धनिक गृहस्थाने कापांवरील मारुतीच्या देवळासमोर हजारो रुपये खर्चूंन एक प्रशस्त व आरामशीर दगडी तलाव बांधल्याचा उल्लेख आहे. या तलावाचा विशेष म्हणजे तो अष्टकोनी आकाराचा असून त्याच्या प्रत्येक कोनावर एक दगडी सोपा बांधला होता.
नाखुदाच्या पुष्कळ वर्षं आधी (१८२३ पूर्वी) डंकन रोडवर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दोन तलाव बांधण्यात आले होते व तेथे कावसजी पटेल तळ्यातून पाणी पुरवले जात असे. डंकन रोड तलावाचे बांधकाम करणारा कोणी हुलसाजी सुभानजी नावाचा मुसलमानच होता.
उन्हाळ्यात पटेल तलावाच्या पाण्याची उसनवारी पुरेना तेव्हा फ्रामजी कावसजी बनाजी या नावाचे त्या काळातले एक परोपकारी धनाढ्य पारशी गृहस्थ पुढे सरसावले. त्यांनी मुगभाट वाडीत तीन मोठाल्या विहिरी खणल्या. त्यातील पानी वर ओढण्यासाठी एक वाफेचे इंजिन व चार रहाट अशी योजना अंमलात आणून त्या विहिरींचे पाणी आधी तयार असलेल्या कालव्याच्या साह्याने डंकन रोडवरील तलावात सोडण्यात येऊ लागले. बनाजींनी विहिरींकरता तीसहजार रुपये खर्च केले तरी इतर व्यवस्थेसाठी दरमहा दोनशे रुपयांची जबाबदारी बनाजीसेठच वाहत होते. या उपकाराच्या बदल्यात त्यांनी मागणी केली मह्णून मुगभाट वाडीत तेव्हा उभ्या असलेल्या आणि पुढे लावल्या जाणार्या नारळांच्या झाडावरील कर घेण्याचे सरकारने सोडले. फ्रामजी कावसजी बनाजी हे १८५१ साली वारले, पण मुगभाटातील विहिरीतील पाणी पुढे कित्येक वर्ष डंकन रोडवरील तळ्यांना पुरवले जात होते.
पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने योग्य अशा पवईजवळील विहार तलावाकडे ब्रिटिशांचे लक्ष वेळीच गेले हे मुंबईकरांचे भाग्यच. पवई येथील ही इस्टेट फ्रामजींनीच बागकामासाठी आणि फळबागांसाठी तयार केली होती. ह्यासाथी ते जवळच्या तलावाच्या पाण्याचा उपयोग करीत. हाच तलाव पुढे पवई तलाव म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांनी विहार ह्या पाणलोटाच्या भागाकडे शासनाचे लक्ष वेधले. श्री. कॉनीबेअर नावाच्या इंजिनियरने पाणी-पुरवठ्याचा आराखडा तयार करुन मंजुरीसाठी पाठवला. आणि १ जानेवारी १८५६ रोजी त्यावेळचे भारताचे गव्हर्नर लॉर्ड कॅनिंग आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी विहार पाणी-पुरवठ्याचे उधाटन केले. जवळ जवळ १४,००० एकर क्षेत्रफळाच्या विहार तलावात ८८०० दशलक्ष गॅलन पाणी साठवण्याची क्षमता असल्याने मुंबईकरांस पाणी टंचाईस भविष्यकाळात कधीही तोंड द्यावे लागणार नसल्याची आशादायक नोंद या उदघाटन वृत्तांतात केली गेली. मुळ आराखड्यानुसारच विहार तलावातून मुख्य पाईपाद्वारे निघालेला प्रवाह दोन वेगवेगळ्या पाईपांवाटे विभागून शहरातील दोन भागांकडे नेण्यात आला. यातला एक मोठा पाईप कुर्ल्याच्या वाटेने माझगाव भंडारवाडा येथील पाण्याच्या साठवणाकडे जातो आणि दुसरा पाईप परळ येथील हाफकिन इन्स्टीट्यूटवरुन माहीम आणि वांद्रा येथे जातो.
श्री. न. र. फाटक यांच्या 'मुंबई नगरी' पुस्तकामधे मुंबईकरांना अशा तर्हेने प्रथमच जेव्हा तलावातून पाईपांद्वारे पाणीपुतवठा करण्याची महा योजना ब्रिटिश सरकारने राबविली तेव्हा त्यांनी जनमताला कसे विचारात घेतले त्याचे वर्णन केले आहे. 'इथले पाणी प्रत्यही जनतेच्या पोटात जायचे ते सर्वथैव निरोगी आणि चवदार असायला पाहिजे याकडे आधी बारीक लक्ष पुरविल्याशिवाय त्याच्या संचयाचा विचार करता येत नाही' याची जाणीव ब्रिटिश शासनाला असल्याचा उल्लेख न.र.फाटक करतात.
ते अजून एक मजेशिर उल्लेख करतात," पाण्याची धरणे व कालवे यांचे ज्ञान भारतीयांना प्राचीन काळापासून आहे. संचित पाणी लोखंडी अगर शिसाच्या नळांनी घराघरांतून खेळविणे हा व्यवहार हिंदुस्थानामधे बराच अपरिचित होता, यामुळे यासंबंधीची सारी खलबते इंग्रज कामदारांतच घोतली जावी हे स्वाभाविक होते. याप्रमाणे सर्व प्रकारे विचारविनिमय होऊन विहारचे पाणी मुंबईकरांना विनायास घरबसल्या मिळू लागले. त्यापूर्वी नळ लोखंडाचे असावे याविषयी वाद उद्भवला म्हणून ते शिसाचे वापरले. टिनचे अस्तर त्या नळांना आतून जोडण्यात आले. "
गो. ना. माडगावकरांच्या पुस्तकात हे 'विहाडचे पाणी' मोठ्या रंजक पद्धतीने वर्णन केलं गेलय-
" मुंबईसारख्या मोठ्या शहरांत पाण्याच्या कमताईमुळे पूर्वी गरीब गुरीब लोकांचे फार हाल होत होते. परंतु सरकारने लाखो रुपये खर्च करुन मुंबईपासून सुमारे सहा कोसावर एक मोठा तलाव केला. त्याकरिंता तेथील काही खेडीही उठवावी लागली. हल्ली त्या तलावाचा घेर सुमारे दहा बारा कोस झाला आहे. जे लोक तेथे जाऊन पाहातात त्यांस हा समुद्रच आहे की काय, असा भास होतो. सरकारास गरिबांचा वगैरे कनवळा येऊन एवढें मोठे कृत्य केले आहे."
ब्रिटिशांनी बांधलेल्या या विहार तलावाचे पाणी नियोजन अत्यंत काटेकोर पद्धतीने केलेले होते आणि त्याची नोंदही सविस्तर आराखडा देऊन वर्णन केलेली आहे. त्या नोंदींनुसार भंडारवाडा येथील साठवणाच्या पाण्याच्या टाकीची क्षमता बारा दशलक्ष गॅलन असून ती बांधण्यास दीड कोटी रुपये खर्च आला. यात पाणी शुद्ध करण्यासाठी नऊ गाळणी आहेत, आणि त्यांनीच जवळजवळ १५६०० चौरस वार एवढी जागा व्यापली आहे. मुंबईतली सर्वात मोठी पाणी साठवण्याची टाकी मलबार हिलवर आहे. हिला तुलसी तलावातून पाणी पुरवठा होतो. विहारपेक्षा तुलसी तलावाचे पाणी कमी दर्जाचे आहे. मलबाराहिल पेक्षा विहारतलाव कमी उंचीवर असल्याने त्याचे पाणी तिथल्या टाकीत पोचू शकत नव्हते. तुलसी तलावाचेच पाणी मलबारहिलच्या टाकीत येऊ शकते. ते पाणी चोवीस इंच व्यासाच्या पाईपमधून मरोळ, अंधेरी, वांद्रा आणि प. रेल्वेच्या बाजूने रेसकोर्सपर्यंत आणले जाते. मलबारहिलवरील टाकीची क्षमता वीस दशलक्ष गॅलन असून यात ९००० चौरस वार जागा व्यापणारी सात मोठी गाळणी आहेत.
(आज तीन शतके उलटून गेल्यावरही ही ब्रिटिशकालीन पाणी नियोजनाची पद्धती आपले अस्तित्व जसेच्या तसे राखून आहे आणि ही गोष्ट कोणत्याही प्रकारे आत्ताच्या महानगरपालिकेस अभिमानास्पद नाही असे खेदाने नमुद करायलाच हवे.)
त्यानंतर लवकरच मुंबईला पाणीपुरवठा करणारा तिसरा तलाव तानसा बांधला गेला. हे धरण बांधायची गरज लगेचच सरकारला का भासली याबद्दल बोलताना गो . ना. माडगावकर 'मुंबई नगरी' पुस्तकातल्या 'पाण्याची टंचाई व भरपाई' प्रकरणात लिहितात- " एकटे शहरातले नागरिक व पशूच तेवढे पाणी खपवतात असा प्रकार नसून मोठ्या शहराच्या वस्तीतील आगी, रस्त्यातील रहदारीने उडणारी धूळ, नव्या घरांची आणि कारखान्याची बांधकामे वगैरे पाण्याच्या खर्चाची आणखी कितीतरी कलमे सांगता येतील. १८५० नंतर आगगाड्या, कापडाच्या गिरण्या भराभर निघू लागल्या त्यांचेही पाण्यावाचून पान हालत नाही. कारखाने म्हणजे माणसांच्या वस्तीची वाढ हे ठरलेलेच आहे.अशा अनेकविध वृद्धीकडे लक्ष देऊन व एखाद्या वर्षी पाऊस न पडल्यास त्या वर्षी शहरवस्तीला पाण्याची विशेष ओढाताण सोसावी लागणार नाही अशा हिशोबाने तान्साचे धरण बांधण्यात आले. दीड कोटी रुपये विल्हेस लागून १८९२ सालच्या मार्च ३१ रोजी तेव्हाचे व्हाईसराय लॉर्ड लान्सडौन यांच्या हस्ते या धरणाचे पाणी मुंबईकडे वाहू लागले. "
तानसाच्या तांत्रिक बाबींची दखल 'ऐक मुंबई तुझी कहाणी' मधे सविस्तर घेतली आहे. हा तलाव मुंबईपासून जवळजवळ ५५ मैल दूर सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. ह्याचा परिसर पाच-साडेपाच मैल एव्हढा लांबरुंद असून क्षमता जवळजवळ १८६०० दशलक्ष गॅलन आहे. जर ह्या तलावाच्या भिंती १५० उंचीपर्यंत वाढवल्या तर पाण्याची क्षमता आणखीदेखील वाढवता येईल. टाउन हॉलजवळील रस्त्याच्या पातळीपेक्षा २०० फूट उंचीवर असलेल्या तानसा तलावाचे पाणी मलबार हिल आणि भंडारवाडा येथील टाक्यांपर्यंत त्यामुळे पोचू शकेल. हे पाणी तीन फूट व्यासाच्या पाइपाद्वारे दर्याखोर्यांतून आणि खाडी ओलांडून मुंबईत येते.
ज्यावेळी तानसा तलाव बांधला त्यावेळीही पुन्हा एकदा शासनाची आणि जनतेची खात्री पटली की आता मुंबईचा पाण्याचा प्रश्न पुढे पन्नास वर्षांपर्यंत कसाबसा सुटला. त्यावेळची बारा लाख लोकवस्ती वाढता वाढता पन्नास-साठ लाखापर्यंत पोचली, तेव्हा पाण्यासाठी नवीन योजना आखण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. १९५५ साली तयार झालेले वैतरणा धरण म्हणजे नदिचे विस्तीर्ण खोरे. पुढे १९६० नंतर अपर वैतरणा जल-प्रकल्प मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पुढे आला. १९६७ साली उल्हास नदीचेही काही पाणी मुंबईकडे वळवण्यात आले.
मुंबईकडे येणारे हे सर्व पाणी पूर्वी त्यात क्लोरिन टाकूनच पुरवण्यात येत होते. पुढे भांडूप येथे यांत्रिक पद्धतीने संपूर्ण पाणी गाळून शुद्ध करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि १९८० नंतर तो पुरा झाल्यावर मुंबईला शुद्ध पाणीपुरवठा सुरु झाला. याचवेळी जागतिक बँकेच्या सहकार्याने भातसा नदीवरील पाणी प्रकल्प हाती घेतला गेला. यामुळे पाण्याची टंचाई पुन्हा थोडीफार भागली गेली. पण त्याचवेळी हेही माहित होते की आज अस्तित्वात असलेल्या तलावांचे पाणी मुंबईची किमान गरज जेमतेम भागवते त्यामुळेच या शतकाच्या अखेरीस मुंबईची लोकसंख्या एक कोटीच्या पुढे जाईल त्यावेळी आजचे सर्व तलाव अपुरे पडतील हे भाकीत वर्तवले गेले. आता मुंबईची लोकसंख्या एक कोटी पस्तीस लाखांचाही आकडा कधीच पार करुन पुढे गेली आहे. आता पुन्हा नव्या पाणी नियोजनाच्या प्रश्नांनी डोके वर काढले आहे.
----------
मुंबईतल्या एकेकाळच्या इतक्या विहिरी, टॅन्क्स,तलाव कुठे गेले या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. विहार, तुळशी चे पाणी नियमित मिळायला लागल्यावर शहरातल्या तलावांच्या पाण्याचा वापर थांबला. त्यात जलपर्णीसारख्या वनस्पतींची वाढ झाली, नागरिकांनी त्यात कचरा फेकण्यास सुरुवात केली. लवकरच डासांच्या पैदाशीचे केन्द्र अशी या तलावांची प्रसिद्धी होऊ लागल्यावर ते बुजवण्यात आले आणि त्यावर बांधकामे उभी राहिली. विहिरी बर्याच काळापर्यंत अस्तित्त्वात होत्या. पण सत्तरीच्या दशकानंतर मुंबईवर बिल्डर्सचा संपूर्ण कब्जा झाला आणि विहिरी बघता बघता नामशेष झाल्या. मात्र अजूनही काही विहिरी आहेत व त्या चक्क वापरात आहेत. बरेच टॅन्कर्स नियमितपणे त्यांच्यातून पाण्याचा उपसा करत असतात. शिवाजीपार्कमधे अशी एक विहिर आहे. त्यात सुंदर मासे आणि कासवेही आहेत.
चर्चगेटला फ्लोरा फाऊंटनजवळ २८० वर्ष जुनी भिका बेहराम विहिर आहे. तिच बांधकाम १७२५ साली झाल्याची नोंद त्यावर आहे. या विहिरिचे पाणी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून काढण्याची सोय आहे. एक खास पार्शी लोकांसाठी आणि दुसरा इतर धर्मियांसाठी. समुद्राच्या इतके जवळ असूनही या विहिरीचे पाणी अत्यंत गोड आणि चवदार म्हणून प्रसिद्ध आहे. या विहिरिवर रंगित काचांचा एक सुंदर घुमट बांधलेला होता. मुंबईतल्या एका जातीय दंगलीत तो फोडला गेला.
भाबा हॉस्पिटलच्या आवारातही एक खूप जुनी विहिर सापडली. तिचे पुरुज्जिवन करण्यात येत आहे. मुगभाटातही काही प्राचीन विहिरींचे अस्तित्व अजूनही आहे. फक्त त्या झाकल्या असल्याने वापरात नाहीत.
मुंबईतल्या या जुन्या आणि प्राचीन विहिरी, हौद आणि तलावांना जोडलेल्या अनेक सुरस आणि चमत्कारिक दंतकथाही कानावर येत असतात. त्यांचेही अस्तित्व त्या विहिरींइतकेच जुने आहे.
----------------------
(माहितगारांनी यासंदर्भातली अधिक माहिती इथे जरुर द्यावी.)
वा! इन्टरेस्टिंग माहिती.
वा! इन्टरेस्टिंग माहिती.
पुढच्या भागाची वाट बघते.
बाकी मुंबईत पाणीटंचाई म्हणजे 'समुद्री चहुकडे पाणी - पिण्याला थेंबही नाही'चा प्रकार!
इंटरेस्टींग वाटतय. थोडसं
इंटरेस्टींग वाटतय. थोडसं चाळलं. आरामात वाचेन.
खुपच सुंदर माहीती , मुंबईला
खुपच सुंदर माहीती ,
मुंबईला पाणीपुरवठ्यासाठी डिसॅलिनेशन प्लाँटशिवाय गत्यंतर नाही .
मस्त माहिती! ह्याच्या पुढच्या
मस्त माहिती! ह्याच्या पुढच्या भागाची वाट पहातेय!
मला वाटतं, सरकारनी काम करण्याची जितकी गरज आहे, तितकीच गरज नागरिकांनी पाणी वाया न घालवण्याचीही आहे. जनरली जिथे पाणी, वीज हे प्रश्न फारसे नाहीत तिथे ह्या गोष्टी प्रचंड प्रमाणात वाया घालवल्या जातात (उदा. ब्रश करताना नळ चालू ठेवणे, रात्र रात्र इमारतींवरच्या लाईट्च्या माळा चालूच असणे वगैरे)
छान माहिती
छान माहिती
शर्मिला, इतक्या नाजूक आणि
शर्मिला, इतक्या नाजूक आणि जिव्हाळ्याचा प्रश्नाला हात घातल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
खूपच छान माहिती लिहिली आहेत, एवढा इतिहास माहितच नव्हता. आपल्या इथे पाणीटंचाई इतकी असून सुद्धा लोकं त्याच्या वापराबद्दल बेफिकीर आहेत. वरच्या नानबांच्या पोस्टशी मी सहमत आहे.
पुढच्या भागाची वाट पहातेय.
छान माहिती
छान माहिती
छान आहे माहिती. पुढचेही भाग
छान आहे माहिती. पुढचेही भाग येऊ द्या .... वाट पाहयेत...
छान माहिती. मुंबईमधल्या
छान माहिती.
मुंबईमधल्या बर्याच लोकाना त्याच्या वीज पाण्यासाठी किती लोकाना त्रास सहन करावा लागत असतो हे माहित नसते!! आणि जणू काही हे सर्व वाया घालवायचा आप्ल्याला अधिकार आहेच अशा थाटात ते वाया घालवत असतात.
चांगली माहिती.. अजून येउ दे
चांगली माहिती.. अजून येउ दे
खुप छान माहिती..
खुप छान माहिती..
एकदम माहितीपुर्ण लेख. आवडला.
एकदम माहितीपुर्ण लेख. आवडला.
खूप माहितीपूर्ण लेख!
खूप माहितीपूर्ण लेख!
सुंदर संशोधनात्मक लेख!
सुंदर संशोधनात्मक लेख!
छान माहिती मिळाली .धन्यवाद .
छान माहिती मिळाली .धन्यवाद .
छान
छान
खूप छान.
खूप छान.
वा ! फारच छान. खुप माहीती
वा ! फारच छान. खुप माहीती मिळाली. खुपच संशोधन आणि मेहनत घेतल्याचे ह्या लेखात पदोपदी दिसून येते. धन्यवाद.
वाचायला सरळ सोप्पा वाटणारा
वाचायला सरळ सोप्पा वाटणारा लेख... पण त्यामागील आभ्यास, मेहनत खरचं सगळ जबरदस्त
विहार, भातसा, तुलसी हे तलाव मुख्यत्वे मुंबईची औद्योगिक गरज भागवण्या करताच बांधले गेले...
विहिरींच्या उदासिनते बदद्ल सरकार पेक्षा नागरीकच जास्त जबाबदार आहेत... शितला देवी जवळ एक विहिर आहे.. तिथेही टॅंकर्स पाणी भरण्यासाठी येतात...
नीट व्यवस्थित वाचायला म्हणून
नीट व्यवस्थित वाचायला म्हणून बाजूला ठेवला होता तो आज वाचला.
अप्रतिम लेख. हा तर पुस्तकाचा ऐवज आहे शर्मिला.
मुंबईचा पाणीपुरवठा, वाहतूक, शौचालयव्यवस्था, एकंदरीतच मुलभूत मानवाधिकार याबाबत दूरगामी काही उपाययोजना सुचवणारे द्रष्टे टाऊनप्लॅनर्स यांची मतं जाणुन घ्यायला आवडतील. एकेका गोष्टीचा विचार करायला गेल्यास भोवळ येते.
'साहेबांना' सहज शक्य व्हावे
'साहेबांना' सहज शक्य व्हावे हे. असले प्रकल्प हाती का घेत नाहीत?
छान माहिती.
छान माहिती.
माहितीपुर्ण लेख. आवडला.
माहितीपुर्ण लेख. आवडला.
आजच वाचला हा लेख. छान
आजच वाचला हा लेख. छान लिहिलंय.
शिवाजी पार्कात गणपतीच्या देवळाजवळच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढ्यातच ती विहीर आहे. समुद्र इतक्या जवळ असूनही शिवाजी पार्क परीसरातल्या बर्याच इमारतींमधे बोअरवेल खोदली असता अवघ्या पंधरा-वीस फुटांवर गोडे पाणी लागते आहे, त्याचे कारण म्हणजे ही विहीरच आहे असे म्हटले जाते.
इंद्रा, शितळादेवीजवळची विहिर आठवतेय, ते दगडी बांधकाम एकदम मस्त आहे.
सिटीलाईट मार्केटमधे पण एक विहीर आहे ना? तोच गोपी टँक का?
वा, किती माहितीपूर्ण लेख.
वा, किती माहितीपूर्ण लेख.
शितळादेवीजवळ एक विहिर पार्वती
शितळादेवीजवळ एक विहिर पार्वती वाडीत आहे (विजय सेल्स च्या जवळ), सिटीलाईट मार्केटला गोपीटँक मार्केट हे अधिकृत नाव आहे पण गोपी टँक भाग म्हणजे बादल बिजली सिनेमा होता तो भाग
पाटील, शितळादेवी मंदिराच्या
पाटील, शितळादेवी मंदिराच्या आवारातच आहे ना एक विहीर?
बादल बिजली>> गोपी टँक>> ओह.. धन्यवाद!
ओह, हे मी विसरुनच गेले होते
ओह, हे मी विसरुनच गेले होते लिहिलेलं. भाग-२ टाकायचा राहीलाच त्यामुळे. टाकते शोधून लवकरात लवकर आता.
काय आहे सध्याच्या काळात समिती
काय आहे सध्याच्या काळात समिती नेमुन अहवाल बने पर्यंत एकतर कमिशनरची बदली झालेली असते किंवा मनपा च्या निवडणुका होऊन सरकार बदललेले असते.
दिर्घकालिन उपाय दिर्घकालानंतर सुध्दा कार्यांन्वीत होत नाहीत आणि सामान्य जनता पाणी पाणि करत रहाते.
पार्ल्याला आमच्या सोसायटीची
पार्ल्याला आमच्या सोसायटीची पण एक विहिर अजुनही मागिल आवारात आहे. १० वर्षापुर्वी ती वरुन बंद करण्यात आली आहे. लहान्पणी खुप विहिरी पार्ल्यात आणि बोरिवलीत पहायचो. बोरिवली त्यावेळी अर्धे गावच होते. आता बर्याच विहिरी बंद करण्यात आल्या आहेत.