मराठी भाषा दिवस - स्पर्धा निकाल आणि समारोप

Submitted by संयोजक on 27 February, 2010 - 21:15

नमस्कार मंडळी,

संवाद साधणं ही सजीवांची जवळपास मूलभूत गरजच! प्राणीपक्षीसुद्धा अन्न सापडल्याची किंवा धोक्याची सूचना विशिष्ट ध्वनी करून आप्तस्वकीयांना देतात. माणसाची धाव त्यापुढची. 'भाषा' हे त्याच्यासाठी केवळ 'माहितीची देवाणघेवाण' करण्याचं माध्यम किंवा साधन नाही. ते त्याच्या जगण्यातलं एक आनंदनिधान आहे. तो भाषा 'वापरत' नाही, तो एखाद्या शिल्पासारखी भाषा 'घडवतो', तिला अलंकारांची लेणी चढवतो.. आणि हे करतांना नकळत स्वतःही अधिक सुसंस्कृत घडत जातो.

साहजिकच दोन आरसे परस्परांसमोर धरावेत तसं भाषेचं प्रतिबिंब संस्कृतीत पडतं आणि संस्कृतीचं भाषेत. 'सप्रेम नमस्कार' या आपल्या पत्रप्रदर्शनात जवळपास तीन पिढ्यांच्या जीवनाचा, विचारसरणीचा, माया/प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीचा असाच एक ह्रद्य आलेख उमटलेला आपण पाहिला.

अर्थात, तुमचं आमचं मराठीबद्दलचं प्रेम गेल्या दशकभराहून जास्त काळ मायबोलीच्या पानापानांवर झळकत आहेच. यंदाच्या 'मराठी दिवसा'च्या सोहळ्यात एक पाऊल पुढे टाकावं म्हणून मायबोलीकरांच्या पुढच्या पिढीसाठी काही उपक्रम घ्यायची कल्पना प्रशासनाने मांडली. त्यानुसार आपण लहानग्यांसाठी 'बोलगाणी' आणि मोठ्या मुलांसाठी 'इवलेसे रोप' या दोन स्पर्धा जाहीर केल्या. सांगायला अतिशय आनंद होतो की या स्पर्धांना, विशेषत: 'बोलगाणी'ला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याहून आनंदाची बाब म्हणजे सगळ्याच मुलांनी इतक्या छान प्रवेशिका पाठवल्या की त्यांत तुलना करून क्रमांक देणं हे अवघडच नाही, तर जवळपास अशक्य झालं!

तरीही जे सर्वोत्तम, त्याचं यथायोग्य कौतुक व्हावं या भावनेतून गुणांकन केलं आहे.
गुणांकन करताना स्पर्धकाचं वय विचारांत घेऊन त्यानुसार पाठांतर आणि सादरीकरण (बोलगाणी) किंवा मजकूर (इवलेसे रोप) यांचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला आहे. 'बोलगाण्यां'चं गुणांकन करताना माध्यमामुळे निकालावर परिणाम होऊ नये म्हणून श्राव्य आणि दृक्श्राव्य असे निरनिराळे गट केले, तर 'इवलेसे रोप'साठी आलेल्या प्रवेशिकांचं गुणांकन माध्यमाचा/सादरीकरणाचा विचार न करता केवळ मजकुरावरून केलं आहे.

प्रत्येक गटातून दोन सर्वोत्तम प्रवेशिका निवडल्या आहेत..

आणि विजेते आहेत....

बोलगाणी (श्राव्य)
बोलगाणी - प्रवेशिका १ (तोषवी)
बोलगाणी- प्रवेशिका १०- (HH)

बोलगाणी (दृक्श्राव्य)
बोलगाणी- प्रवेशिका १२- (नील्_वेद)
बोलगाणी - प्रवेशिका ३ (मिलिंदा)

इवलेसे रोप
इवलेसे रोप - प्रवेशिका ३ (संपदा)
इवलेसे रोप- प्रवेशिका ४ (मंजिरी)

या सर्व विजेत्यांना 'मायबोली खरेदी' विभागाचे $२५ चे गिफ्ट सर्टिफिकेट पारितोषिक म्हणून देत आहोत.

आधी म्हटल्याप्रमाणे बक्षिसपात्र ठरलेल्या आणि न ठरू शकलेल्या प्रवेशिकांमधे गुणांचा फरक इतका कमी होता, की एका अर्थी सगळेच स्पर्धक विजेतेच आहेत. सगळ्याच मुलांचा उत्साह, पाठांतर, उच्चार, तालासुराची/आवाजातल्या चढ-उतारांची समज पाहता यांना आपण उत्तेजन देण्यापेक्षा मराठी भाषेच्या (अनेकांना चिंता असलेल्या) भवितव्याला यांनीच उत्तेजन दिलं आहे असं म्हणता येईल. म्हणूनच 'बोलगाणी' आणि 'इवलेसे रोप' स्पर्धांमधे भाग घेणार्‍या बाकी सर्व लहानग्यांनाही आपण पारितोषिकाने गौरवणार आहोत. या सर्वांना 'मायबोली खरेदी' विभागाचे $१० चे गिफ्ट सर्टिफिकेट देण्यात येईल.

ही पारितोषिके मायबोली प्रशासन आणि काही मायबोलीकरांनी मिळून पुरस्कृत केली आहेत.

सर्व स्पर्धकांचं आणि त्यांच्या पालकांचं हार्दिक अभिनंदन! Happy

'मराठी भाषा दिवस' उपक्रमाच्या आयोजनात मायबोली आणि संयुक्ता प्रशासनासोबत संयुक्ताच्या खालील सदस्यांनी संयोजक म्हणून हातभार लावला : अमृता, बस्के, चिन्नु, रैना, सायलीमी, सायो, सिंडरेला, सीमा

स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून स्वाती_आंबोळे यांनी काम केलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर उपक्रम. पत्रांची कल्पना जेवढी अभिनव होती, तितकीच छान बोलगाणी आणि इवलेसे रोपची कल्पनाही.

संयोजकांचे हार्दिक अभिनंदन, आणि आभारही. Happy

सर्वप्रथम बक्षिसाबद्दल धन्यवाद . मैत्रेयीला फार आनंद झालाय . Happy
खरंतर मराठी भाषा दिवस हा उपक्रम फार अप्रतिम आहे . आमच्यासारख्या भारताबाहेर राहणार्‍यांसाठी हा उपक्रम गणपती , दिवाळी एव्हढाच आनंददायक , मनोरंजक आणि अभिमानास्पद असा होता . सगळ्यांचा सहभाग लक्षणीय होता . सर्व मुलांचे , त्यांच्या पालकांचे आणि आयोजकांचे खूप खूप कौतुक .:) दरवर्षी असेच उपक्रम होत राहोत , ही सदिच्छा .

पाल्य, पालक, शेपु, चुका, दोडके, मुळे, बटाटे ह्यांचे हार्दिक अभिनंदन! Happy

सर्व बालकलाकारांचं कौतक करावं तेवढं कमीच आहे . सगळ्यांच अभिनंदन , तुमच्यामुळे मराठी भाषा दिनाचा आनंद द्विगुणित झाला.
मायबोली प्रशासन , संयुक्ता टीम , सर्व बालकलाकार आणि त्यांचे पालक , या सर्वांचे आम्हाला एवढा सुखद अनुभव दिल्याबद्दल खुप खुप आभार.>> श्री ला अनुमोदन!

खरंच... संयोजकांचे मनापासून आभार!
>>आमच्यासारख्या भारताबाहेर राहणार्‍यांसाठी हा उपक्रम गणपती , दिवाळी एव्हढाच आनंददायक , मनोरंजक आणि अभिमानास्पद असा होता .>>
संपदाला अनुमोदन Happy
वरचेवर असे उपक्रम होत राहोत!

बच्चे कंपनीला त्यांच्या कला दाखवायला हुरुप येईल असा हा उपक्रम खरंच खूप छान आहे. ! संयोजक समितीला आणि पर्यायाने अ‍ॅडमिन टीम ला अनेक धन्यवाद ! असे उपक्रम नियमित होत राहिले पाहिजेत. मदतीला मायबोलीकर नक्कीच तयार असतील.

माझं अजून सगळं ऐकून झालं नाहीये, पण मला ते घाईत ऐकायचेही नाहीये. तेव्हा सावकाश त्यांचा आनंद घेत ऐकेन.

इराला बक्षिस मिळाले त्याचा तिला प्रचंड आनंद झाला आहे, तिचे पहिले बक्षिस आहे हे !!

आणि आता आम्ही रोज एक - एक गाणे वेगवेगळ्या व्हर्जन्स मध्ये ऐकतो आहोत Happy

सर्व बालचमू आणि आयोजकांना धन्यवाद. अत्यंत स्तुत्य उपक्रम होता.

इंटरनेटच्या माध्यमात असा उपक्रम करणारी मायबोलीच प्रथम असावी.
अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन!
आणि संयोजन समितीमधिल सदस्यांचे आणि मायबोली प्रशासनाचे ह्या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल आभार

घरी आधि स्वत:चे रेकॉर्डींग मग आठवडाभर सगळ्या मुलांची गाणी आणि पत्र ऐकुन/वाचुन, हल्ली घरी रोज न चुकता एकदा तरि प्रश्न असतो, चल आज कोणत गाण रेकॉर्ड करु या? Happy

सर्व बालकांचे आणि त्यांच्या पालकांचे मनापासुन अभिनंदन!
सर्व गाण्यांवर प्रतिसाद लिहायला जमले नाही पण इथेच सर्वांचे जाहीर कौतुक. अगदी गोड वाटले बोलगाणी ऐकताना.

सर्व स्पर्धकांचे व संयोजकांचे अभिनंदन!!!

२७ फेब्रुवारी हा खरंतर 'कविता दिवस'. पुलं व सुनीताबाईंच्या कल्पनेनुसार कुसुमाग्रजांचा वाढदिवस 'कविता दिवस' म्हणून साजरा केला जात असे. सुनीताबाईंनी मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठांना देणगी देऊन २७ फेब्रुवारी हा कायम 'कविता दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी व्यवस्था करून ठेवली होती. पुलं व सुनीताबाई आणि नंतर इतर अनेक कवी या दिवशी नेमाने काव्यवाचनाचे कार्यक्रम करत असत.

कुसुमाग्रज गेल्यानंतर राज्य सरकारने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करण्याचं ठरवलं.

पुढच्या वर्षी या वर्षीच्या उपक्रमांबरोबरच पुलं व सुनीताबाईंच्या कल्पनेतला 'कविता दिवस'सुद्धा मायबोलीवर साजरा केला जावा. अशी अपेक्षा.

हा उपक्रम मनापासून आवड्ला. आपले सगळेच बालकलाकर एकदम भावले. परिक्षकांना निर्णय घेणं नक्कीच अवघड गेलं असणार.

हस्तलिखीत पत्रपण खूप आवडली. भावनांचे कितीतरी अविष्कार वाचायला मिळाले. सुरेख अक्षरांचे नमुने पहायला मिळाले. संयोजकांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार.

पाल्य, पालक, शेपु, चुका, दोडके, मुळे, बटाटे ह्यांचे हार्दिक अभिनंदन! >>>> LOL चंपक मला अचानक माकाचु बीबीवर गेल्यासारखं वाटलं Lol

उप क्रम आवडला... सप्रेम नमस्कार ..बोलगाणी..इवलेसे रोप ..सगळे आवडले
सर्व स्पर्धकांचे व संयोजकांचे अभिनंदन!!!

फारच छान उपक्रम. सप्रेम नमस्कार, बोलगाणी, इवलेसे रोप .. एकेक कल्पना भावणारी..
संयोजक, सहकारी,स्पर्धक, पालक, परीक्षक, विजेते आणि प्रोत्साहन देणारे वाचक सगळ्यांचाच हा उपक्रम यशस्वी होण्याला हातभार लागलेला आहे , सर्वांचेच अभिनंदन!
दरवर्षी उपक्रम करण्याबद्दल अनुमोदन!
हिप हिप हुर्रे! Happy

संयोजक आणि सर्व स्पर्धकांचे अभिनंदन. नव्या पिढीसाठी मराठी भाषा दिवस ही संकल्पना आवडली.
माझ्या मुलीला अजून बक्षिस म्हणजे काय समजत नाही पण तिने पहिल्यांदाच कुठल्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्याचे कौतुक सर्वांनी केले याचा मलाच फार आनंद झालाय Happy
बाहेरगावी गेल्याने अजून बरच काही वाचून आणि ऐकून व्हायचं आहे पण एकुणच बोलगाण्यातली किलबील फार गोड वाटली ऐकायला. मोठ्या मुलांचे निबंध आणि पत्रे या सप्ताहांताला सावकाश वाचणार.
दरवर्षी आणखी व्यापक प्रमाणात मराठी भाषा दिवस साजरा होऊ देत ही शुभेच्छा!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
इतका छान उपक्रम घेतल्याबद्द्ल संयोजकांचे आभार.

जर बाल कलाकारांच्या पालकांची ,संयोजक , अ‍ॅडमीन ,परीक्षक , कोणाचीही हरकत नसेल तर , कोणी ही सगळी बोलगाणी डाऊनलोड कशी करता येतील सांगेल का प्लीज ?

सर्वप्रथम मायबोली आणि सयुक्ता च्या मैत्रीणी,सयोजक यान्चे मनापासून आभार.सनिकाच हे पहील बक्षीस आहे त्यातून तिच्यासाठी मराठी मूळाक्षरान्च पुस्तक घेतलय,सानिका तर इतकी खूश आहे तर रोज एकदा तरी सगळी गाणी ऐकतेच्.मला स्पर्धक ऐकायचय अस म्हणते, ती गाणी आता तिला पाठही झालीत.
सर्व मुलांचे , त्यांच्या पालकांचे आणि आयोजकांचे खूप खूप कौतुक .सगळी पत्र ही खूपच सुन्दर्!
दरवर्षी असेच उपक्रम होत राहोत , ही सदिच्छा.

ह्या सुंदर उपक्रमासाठी मायबोली अ‍ॅडमिन टिम, संयुक्ता टिम, संयोजक, परीक्षक आणि सहभागी सर्वांचं हार्दिक अभिनंदन!!

'सप्रेम नमस्कार' हा उपक्रम खुपच छान होता. शाळेत असताना इंग्रजी सुधारण्यासाठी 'पेन फ्रेंड्स' जोडायचो त्याची आठवण झाली. आता ह्या उपक्रमाद्वारे मराठी सुधारण्यासाठी, वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन 'पत्रमित्र' योजना हाती घ्यावी. Happy

बोलगाणी आणि इवलेसे रोप तर फारच छान.. सगळ्यांचीच गाणी/निबंध अजून वाचून/ऐकून व्हायचे आहेत. पण एकूण कार्यक्रम खरोखरच कौतुकास्पद झाला.

दरवर्षी हा 'मराठी भाषा दिवस' साजरा करण्यासाठी माझेही अनुमोदन. Happy

संयोजकांचं, विजेत्यांचं अन सगळ्या छोट्या पिल्लांचं अभिनंदन.
बोलगाण्यांची तर पारायणं चालू आहेत घरी. पोराला जेवू घालताना रोज सगळी गाणी ऐकवावी लागतात. निबंध अन पत्रे अजून पूर्ण वाचून नाही झाली. एक एक करत रोज वाचतेय. Happy
खूप आवडला हा उपक्रम.

अतिशय सुंदर उपक्रम!!

सर्व विजेत्याचे हार्दिक अभिनंदन, आणि सर्व संयोजकाचे व परीक्षकाचे आभार....

जागोमोहनप्यारे
http://www.maayboli.com/node/13621
या पानावर लिहल्याप्रमाणे सप्रेम नमस्कारमधे भाग घेण्यासाठी कुणालाही सदस्यत्व घ्यायची गरज नव्हती. तिथे लिहलेल्या संपर्कपत्त्यावर ईमेल पाठवून तुम्हाला भाग घेता आला असता. ग्रूपचे सभासदत्व फक्त या स्पर्धेचे संयोजन करणार्‍या मायबोलीकरांसाठीच मर्यादित होते.

सर्व विजेत्यांना आणि स्पर्धकांना ईमेल ने शुभेच्छा भेटपत्र (Gift card)पाठवली आहे. तुम्हाला जर ईमेल मिळाली नसेल तर कृपया तुमच्या Junk/Spam फोल्डर मधे गेले का ते पहा.

अतिशय छान उपक्रम होता व आहे!! आणि लहानग्यांच्या आवाजातील बोलगाणी, इवलेसे रोप म्हणजे कानांसाठी पर्वणी होती. ऐकताना खूप मजा आली. सर्व विजेत्यांचं अभिनन्दन आणि सहभागी झालेल्यांचंही भरघोस कौतुक!!
Happy

>>>> तर कृपया तुमच्या Junk/Spam फोल्डर मधे गेले का ते पहा.
बर झाल हे सान्गितलत, स्पॅम मधेच जाऊन पडली होती इमेल! Happy
(इमेलवाल्या कॉप्म्युटला पण काही अक्कलच नाही, येवढी भारीची मेल तो जन्क्/स्पॅम मधे टाकुच कसा शकतो??? Wink )
भेटपत्राबद्दल मनःपूर्वक धन्यवाद Happy
[पण ते वापरायच कस? या गोष्टी नेमक्या कुठून खरेदी केल्या जातात? कोण घेत ऑर्डरी? कोण पुरवत? पेमेण्ट कस काय होत? पोस्टेज्/क्युरियरचा खर्च किमत्तीतच अस्तो की तो वेगळा द्यायचा? व्हॅलिडीटी या अर्थाने याला वेळेचे बन्धन असते का? पूर्ण वा काही हिस्सा वापरला न गेल्यास, ती रक्कम भेटकार्ड इश्युअरला परत मिळते की नाही?
अरे ब्बापरे, किती ते प्रश्न उद्भवतात! एक आरोसीची फी सोडली, ती देखिल कम्पनीच्या कार्ड वरुन, तर मी इन्टरनेटच्या फन्दात कधी पडलो नाहीये, मलाच येत नाही/कळत नाही/माहित नाही तर पोरीला काय दाखविणार्-शिकवणार? ]

Pages