फक्त माणूस म्हणून जगायची संधी मला मिळेल कधी?

Submitted by नानबा on 18 February, 2010 - 15:39

गोष्ट तशी जुनी. फारा वर्षांपूर्वीची. जेव्हा भारतवर्षावर सवर्णांचं राज्य होतं. सवर्ण म्हणजे कोण? तर राज्यकारभार बघणारे क्षत्रिय आणि ब्राह्मण. जातीनुरुप समाजरचनेचा काळ होता. स्पृश्यास्पृश्य भेद होते, पण भरडल्या जाणार्‍या घटकालाही जाणीव नव्हती की तो भरडला जातोय! पूर्वसुकृत, प्रारब्ध अशा गोंडस नावाखाली प्रत्येकानं आपलं जगणं बिनभोबाट स्विकारलेलं (किंवा त्यांना स्विकारायला भाग पाडण्यात आलेलं)
काबाडकष्ट केल्यानंतर पोटाला मीठ-भाकर मिळणं हीच मोठी गोष्ट. मग समाजात मान, माणूस म्हणून वागणूक वगैरे गोष्टी बहुसंख्य लोकांना कल्पनेतही माहित नव्हत्या, मग त्या प्रत्यक्ष अनुभवणं तर दुरची गोष्ट! तसे, एखादे एकनाथ असायचेही, जे समाजाचा विरोध पत्करूनही जातपातीच्या पलिकडचा माणूस पाहू शकायचे, ज्यांना खरं ब्रह्म कळलेलं! किंवा एखादे शिवाजी महाराज- जे माणसाला जाती धर्मापेक्षा नियत आणि योग्यता बघून ओळखायचे. पण संत लोक वगळता अशांची संख्या कमीच! कुणी अशी वेगळं वागण्याची हिम्मत केलीच तर तोच वाळीत टाकला जायची शक्यता जास्त! त्यामुळे मनात असणारेही धाडस करू शकायचे नाहीत.
तर अशा चरकात आपला समाज सापडला असतानाची ही गोष्ट. दिग्या नावाच्या माणसाची. दिग्याचं खरं नाव काय होतं कुणास ठावूक, पण जातीवरून माणसाला हाक मारण्याच्या काळात लोक त्याला दिग्या म्हणायचे हेच विशेष!
दिग्याचा बाप गावच्या पाटलाकडे वेठबिगारी करायचा. त्याच्या बापाच्या बानं मोठ्या पाटलाकडून कर्ज घेतलेलं म्हणे - अन तेव्हापासून बाप पाटलाकडे कामाला लागला. थोडा मोठा झाल्यावर बापाबरोबरच दिग्याही जायला लागला पाटलाकडे.
"दिवसभर राब राब राबल्यानंतर पाणी पिण्यासाठी आपल्याला दुसर्‍यापुढे ओंजळ का पसरावी लागते?", "गोठ्यातल्या गुरांचा होत नाही, पण आपल्या सावलीचाही विटाळ कसा होतो?", "आपण किती वर्ष असं भाकरतुकड्याकरता दिवसदिवस मरायचं" असले प्रश्न दिग्याला कधी पडलेच नाहीत. कदाचित आपलं माणूस असूनही माणूस नसणं एखादेवेळेस जाणवलं असेलही, पण हे असलं जगणं एक प्रकारच्या अपरिहार्यतेनं सगळ्यां इतकंच दिग्यानही स्विकारलेलं होतं - एकतर ही सर्वमान्य समाज व्यवस्था होती, त्यातून दिग्याचा बराचसा वेळ जायचा तो त्याच्या विठूरायाच्या स्मरणात! जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी फक्त विठ्ठ्ल! त्याच्या स्मरणात तो तहानभूकही विसरायचा!
असंच काहिसं आजही झालं. पाटलाची गुरं राखता राखता त्याच्याही नकळत तो पांडुरंगाच्या भजनात रंगला. भक्ताची चाकरी करण्याचा नावलौकिक असणार्‍या विठोबानही आज भक्ताची कसली परिक्षा पहायचं ठरवलं कुणास ठावूक! इकडे दिग्या भजनात गुंतलेला असताना तिकडे गुरांनी पिकाची नासाडी केली. पाटलाला हे कळलं अन तो भडकला. आधीच जाग्या झालेल्या पाटलाच्यातल्या सैतानाला जागं करायचं काम कुलकर्ण्यांनं केलं. दिग्यानं झालेली तूट भरून द्यावी असा पाटलानी हुकुम सोडला. दिग्यानं चुक मान्य केली - पण त्याच्याकडे द्यायला होतंच काय? त्याची जमीन दोन पिढ्यांमागेच पाटलाकडे गहाण पडलेली. घाबरतच त्यानं ह्या गोष्टीची वाच्यता केली, मात्र पाटील आणखीनच भडकला. दिग्याला अन इतर कामकर्‍यांना वेळीच जरब बसावी, म्हणून पाटलानं दिग्याला फटक्यांची शिक्षा सुनावली. विठ्ठलाचं नाव घेऊन पाठीवरचा एकएक कोरडा सहन करणार्‍या दिग्याला बघून पाटलाच्या संतापात आणखीनच भर पडत होती- त्याचबरोबर कोरड्यांचा जोरही. आणखीन जोरात- जोरात - अशाच एका क्षणी दिग्याला कळलं की आपण काही ह्यातून वाचत नाही.
पांडुरंगाला कधीच काही न मागणार्‍या दिग्यानं त्या क्षणी मात्र एक मागणं मागितलं "पुढल्या येळेला मला पाटलांच्या नायतर कुलकर्ण्याच्याच घरी जल्माला घाल. मी ह्ये समदं बदलीन."
त्या सत्शील माणसानं मरतानाही कुणाचं वाईट चिंतलं नाही - हे असं पहिलं अन शेवटचं मागणं मागून त्या विठ्ठलभक्तानं शेवटचा श्वास घेतला.
----------------------------------------
१९४० सालातली गोष्ट. भाऊराव आणि त्यांचे वडील बंधू दादासाहेब कुलकर्णी, दोघांनाही साधारणतः महिन्यापूर्वी अटक केलेली. घरात पुरुषमाणूस कुणीच नाही - अशात भाऊरावांच्या पत्नी सौ पार्वतीबाईंचे दिवस भरत आलेले. खरंतर लग्नानंतर बरेच वर्ष मुलबाळ नाही म्हणून किती लोकांनी भाऊरावांना दुसर्‍या लग्नाचा सल्ला दिला. ते फक्त हसून म्हणायचे " माझा दुसरा विवाह आधीच झाला आहे. ह्या हिंदुस्थानाशी!"
नऊ महिन्यापूर्वी मात्र त्यांचा दत्त त्यांना पावला. पार्वतीबाईंना दिवस गेले. खरंतर किती कोडकौतुक व्हायला पाहिजे होतं त्यांचं! पण देशाकरता सर्वस्वाची होळी करण्याचे दिवस होते ते - त्यात स्वतःच्या छोट्या मोठ्या कष्टांची तमा कुणाला होती!
त्या दिवशी सकाळ पासून पार्वतीबाईंना कळा येत होत्या. नुसतीच घालमेल! तशी आक्का सुईण होतीच मदतीला! अखेर रात्री बाराच्या आसपास सुटल्या पार्वतीबाई! मुलगा झालेला त्याना. मुलाचा पायगुण चांगला म्हणून भाऊराव आणि दादासाहेबही सुटून आले तुरुंगातून. दत्त दिगंबरांचा प्रसाद म्हणून मुलाचं नावही दिगंबरच ठेवलं. आईचं (आणि तुरुंगात नसतील तेव्हा वडिलांचं) कौतुक झेलता झेलता दिगू दिसामाशी मोठा होत होता.

१४ ऑगस्ट १९४७ - भाऊरावांसारख्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या प्रयत्नांना अखेर यश आलं होतं. आज रात्री बारा वाजता - म्हणजे १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं. गुलामगिरीचे दिवस आता गेले होते - आता गांधीबाबाचं राज्य येणार! सगळं वातावरण कसं भारलेलं होतं!
स्वातंत्र्य मिळालं खरं - पण पाठोपाठ सुरू झाल्या त्या हिंदू मुसलमान दंगली. लाखोंनी निरपराध लोक मारले गेले! सगळं वातावरणच गढूळल्यासारखं झालं! ह्या सगळ्याप्रकाराला एक वर्षही झालं नसेल, पण इंग्रजांची जागा 'देशी' साहेबांनी घ्यायला सुरुवात केलेली! अर्थातच स्वातंत्र्यानंतर रामराज्य येईल हा फुगा अजून पूर्णपणे फुटला नव्हता. अशातच ३० जानेवारी १९४८ ला गांधिजींचं मुस्लिम विषयक धोरण सहन न होऊन नथुराम गोडसे नं गांधीजींवर गोळ्या झाडल्या! गांधीजी अनंतात विलिन झाले.
गांधींचा मृत्यू, नथुराम गोडसे अन नाना आपट्यांना फाशी- येवढ्यावर हे प्रकरण संपलं नाही. हिंदू मुसलमानांचं रक्त अजून सुकतच होतं - तोच एक नवीन लाट पसरली - गोडसे ब्राह्मण असल्यानं - ब्राह्मण विरोधी लाट. पुरोगामी म्हणवल्या गेलेल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी ब्राह्मणांची घरं जाळली गेली, होती नव्हती ती संपत्ती लुटली गेली, काही ठिकाणी तर पोरीबाळींची विटंबना करण्याचे घाटही घातले गेले होते. जे नशीबवान होते, ते आहेत त्या वस्त्रांनिशी पळून गेले. पण सगळ्यांचच नशीब एवढं चांगलं नव्हतं!
भाऊराव कुलकर्ण्यांना हे सगळं होणार ह्याची कुणकुण लागली. अत्यावश्यक गोष्टींचं गाठोडं बांधून ते कुटुंबासहित बाहेर पडणार तर दाराला बाहेरून कडी असल्याचं लक्षात आलं. काय घडतंय हे लक्षात आल्यानं त्यांच्या काळजात चर्र झालं. निदान दिगूला तरी बाहेर काढलं पाहिजे ह्याविचारांनी त्यांनी मागचं दार, खिडक्या सगळं पाहिलं - पण खूप उशीर झालेला. लोक वाड्याभोवती जमलेले. त्यांना भाऊरावांचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे कष्ट/हालअपेष्टा आठवल्या नाहीत, नाही दिसला मुलाच्या काळजीनं काळवंडलेला पार्वतीबाईंचा चेहरा, दिगू तर अजून उमललाही नव्हता- पण ह्यातलं काहीच दिसत नव्हतं त्या जमावाला. कळत होतं तर इतकच की हे ब्राह्मण आहेत अन त्यांना जाळायचं आहे.
पेटलेल्या वाड्यात आकांत माजला. बायकापोरांच्या किंचाळ्या , हुंदके एकच कल्लोळ झाला. अप्पा कुलकर्ण्यांनी बाधलेल्या त्या वाड्याबरोबर जळताना दिगूला त्याचे सगळे जन्म आठवले! हो सगळे जन्म! एका जन्मात तो विठ्ठलभक्त दिग्या होता - आणि जातीमुळे नागावला गेलेला. ते सगळं बदलायला तर तो ह्या जन्मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला ना! पण त्याला मोठं व्हायची संधीही मिळाली नव्हती! बाहेरच्या जमावात आडनाव बदललेला, जात बदललेला तोच पाटलाचा, अप्पा कुलकर्ण्याचा चेहरा दिसत होता!
अन मग असे इतर अनेक जन्म :- जर्मन छळछावण्यात मारला गेलेला ज्यू, मुसलमानी राजवटीत धर्मांतराकरता छळला गेलेला हिंदू, दंगलीत मारला गेलेला मुसलमान, गुलाम म्हणून विकला गेलेला आफ्रिकन, ग्रीक साम्राज्यात लोकांच्या मनोरंजनासाठी भुकेल्या वाघाबरोबर कुस्ती करणारा गुलाम, नवर्‍याबरोबर चीतेला जबरदस्तीनं बांधला गेलेला अन नंतर सती म्हणून मंदीरात उभा असणारा दिगू! असे किती गेलेले जन्म! असे किती येणारे जन्म!
=========================
दिगूची ही कथा ऐकून मी सुन्न झाले. ही कथा फक्त दिगूची नाहिये, तुमची माझी- आपल्यातल्या कुणाचीही असू शकते! सैतानाला कुठली जात, कुठला धर्म नसतोच मुळी. तो फक्त आपल्याला आपण सगळेच माणूस आहोत हे विसरायला भाग पाडतो. मग सुरु होतं - मी मुसलमान- तू हिंदू, मी ब्राह्मण- तू मराठा, मी पुरुष तू बाई, मी गोरा- तू काळा, तू ह्या देशीचा - मी त्या देशीचा. भेद होतच रहातो प्रत्येक पातळीवर. जगात फक्त मुसलमान धर्मच राहिला तरी ते सुन्नी शिया म्हणून एकमेकांना मारतीलच. एकाच जातीचे लोक राहिले तरी पुन्हा पोटजाती असतीलच! अगदी सगळे भेद नष्ट केले तरी बाई-पुरुष, गरीब-श्रीमंत, छळणारा- छळ सहन करणारा असे भेद कधी जातील?

जगाच्या दृष्टीनं मी भारतीय असते, भारतात महाराष्ट्रातली अन हिंदू, हिंदूंमध्ये मी ब्राह्मण असते, ब्राह्मणात देशस्थ (त्यातही पुन्हा ऋग्वेदी), स्त्री हे आणखीन एक वर्गीकरण.
मग पेटत रहाते मी वेगवेगळ्या भेदांवरून.
श्रेष्ठ मानत रहाते- माझाच देश, माझंच राज्य, माझाच धर्म, माझीच जात, माझंच स्त्रीत्व!
मला कुठलं नाव नाही, नाहिये कुठला चेहरा!
धर्म- जात पेटण्यापुरतं, मला नाहीच कुठला सोयरा!
अशीच मी धुमसत रहाते, रहाते पेटत पुन्हा पुन्हा!
जाळत जाताना माणुसकीला, मी असते हस्तक सैतानाची- फक्त घेते देवाधर्माचा चेहरा!

गुलमोहर: 

कुलकर्णी, पाटील ही फक्त सार्वत्रिक आडनावं म्हणून वापरली आहेत. कुठल्याही जातीधर्माच्या लोकांना दुखावण्याचा हेतू नाही. किंबहूना -माझ्यासकट आपण सर्वांनी जागं व्हावं, एक व्हावं- म्हणून हा लेखन प्रपंच.

छान !!

नानबा छान लेखन.

कुलकर्णी, पाटील ही फक्त सार्वत्रिक आडनावं म्हणून वापरली आहेत. कुठल्याही जातीधर्माच्या लोकांना दुखावण्याचा हेतू नाही. >>>>>पण पूर्वी हीच परिस्थिती होती नां?

किंबहूना -माझ्यासकट आपण सर्वांनी जागं व्हावं, एक व्हावं- म्हणून हा लेखन प्रपंच.>>>जे जागे असूनही झोपेचं सोंग घेतायत त्यांना कसं जागं करायचं?

आपल्याही आवडलं. छान लिहीलयं.

नानबा हे खास तू म्हणालीस म्हणून ..
रँड मोड ऑन - कुठल्याही व्यवस्थेत पिडीत / शोषीत वर्ग तयार होत असतोच, अशी व्यवस्था नसणारा समाज कधीही होणार नाही हेच सत्य. त्यामुळे कोणीतरी शोषीत राहणार हे मान्य केले तर आपण त्यात राहायचे की दुसर्‍यात हे ठरविने क्रमप्राप्त आहे. ह्या विचारसरणीमुळेच क्रांती घडतात, व पुढे क्रांती करणारेच त्या समाजाचे शोषन करत राहतात, व परत क्रांती घडण्यास वाव मिळतो. ताजे उदाहरण म्हणजे साम्यवादी क्रांत्या व तालिबान. शोषीत वर्गातील हे लोकं, पुढे जाउन ह्यांनीच शोषन केले. त्यामुळे दिग्या अमर आहे. दिग्या होत राहणार.

ऑफ.

अप्रतिम गं केवळ अप्रतिम Happy सगळं माझ्या मनातलंच लिहिलं आहेस. विषमता ही पाण्यासारखीच कुठल्याही वाटेने वहात रहातेय या जगात Sad

एक आठवलं, माझे आजोबा नोकरीसाठी कोल्हापूरहून गिरगावात आलेले. त्यांची जुनी पत्रं (आता कुठे गेली कुणास ठाउक Sad ) वाचायचा मला छंद होता लहानपणी. त्यात उल्लेख होते की "काल रात्री बाका प्रसंग आला होता. परंतु हरिहरकृपेने सर्व ठीक जाहले". नंतर कळले की बाका प्रसंग म्हणजे आमच्या वाड्यात पेटते बोळे टाकले जायचे.

तसेच, गिरगावात आम्ही रहायचो ती वाडी पुर्ण ब्राह्मण बिर्‍हाडांची होती. त्या वाडीवर बर्‍याच वेळा दगडफेक करण्यात आली होती.

नानबा आत्तापर्यंतचं मी वाचलेलं हे तुझं सगळ्यात सुंदर लिखाण! अप्रतीम - या पलीकडे शब्द नाही.

आकाशगंगेच्या मध्यभागी जसे कृष्णविवर असते तसेच मनाच्या मध्यभागीपण एक कृष्णविवर असते का - जन्मोन्मीच्या पिळवणूकींच्या आठवांनी बनलेले? माणूसपण ओरबाडून घेणारे आणि अमानूषपणाचे गरळ ओकणारे? संपणार कधी ते आणि कसे? नुसतेच प्रश्ण, उत्तर नाहीच!

Pages