एकदा सिंगापुरातील ग्रंथालयात पायाच्या टाचा वर करुन कपाटातून पुस्तके काढत असताना एक पुस्तकं माझ्या पायापाशी पडले. मी नमस्कार करुन ते पुस्तक सरळ करुन वाचले तर त्यात मला काही फोटो आढळले. ते कृष्णधवल फोटो पाहुण माझे मन आतल्या आत कुठल्या तरी हळव्या स्पर्शानी विरघळले. त्यात काही पत्राचा भाग होता जो कुठल्या तरी अगम्य भाषेत लिहिला होता. मग मी मुखपृष्ठावर नजर टाकली तर नाव दिसले 'The Diary of a Young Girl - Anne Frank'. मी ते पुस्तक तिथल्या तिथेच उभ्यानी वाचायला सुरवात केली आणि पुस्तकाशी समरस होऊन गेलो. जेवढी पाने तिथल्या तिथे वाचली ती वाचून मला अगदी तरल भावनिक आनंद मिळाला. मी ते पुस्तक घरी आणले. ते पुस्तकं वाचता वाचता मला कितीतरी गोष्टी कळत गेल्यात. अॅनी तर कळलीच पण ज्यू लोकांचा इतिहास कळला, हिटलरनी त्यांच्यावर केलेला अन्याय कळला, concentrations camps किती अमानुष प्रकार होता हे कळले, अॅनी सारखे कित्येक निरागस जीव किती करुण अवस्थेत मरण पावलेत हे कळले. माझे अंत:करण अगदी हेलावून गेले. बरेच अश्रू डोळ्यांवाटे ओघळून डोळे स्वच्छ झाले आणि अजून आपल्याला हृदय आहे आणि संवेदनांचा इथे वास आहे याचाही आनंद झाला. इतिहास आणि भुगोल दोन्हीचे ज्ञान वाढले. दहावीच्या शालांत परिक्षेनंतर पुन्हा कधी या विषयांचा संबंध आला नाही की या विषयांबद्दल माझ्यात अभिरुची निर्माण झाली नाही.
त्यानंतर डिसेंबर २००३ च्या शेवटी शेवटी कामानिमित्त मला फ्रांसला जायची संधी मिळाली. तिथे पोचलो तर थंडी म्हणते मी!!! कडाक्याच्या थंडीत आपल्या जिवाचा सांगाडा करुन उभी असलेली ओक वुक्षाची ती झाडे पाहूण माझा देह आणखीनचं थरथर कापायचा. ही झाडे कुठल्या विरक्त स्थितीत उभी आहेत.. ती सजीव आहेत की निर्जीव याचाही थांग लागायचा नाही. जेटलॅगचे सुरवातीचे ते दोन आठवडे. जेंव्हा जेंव्हा मी रात्रीच्या कभिन्न काळोखात खिडकीच्या काचेतून ती झाडे पहायचो तेंव्हा तेंव्हा मला मर्ढेकर आठवायचे आणि परत परत माझ्या गालावर थंडगार अश्रूंची धार अगदी हनुवटी पर्यंत सरसर ओघळत जायची. किती बळ असते कवितेत! आणि किती सुख असते असे अवचितपणे आपल्याला मुक्तपणे वाहू देताना!!! सुखासुखी माझ्यासारख्या निगरगट्ट व्यक्तीचे डोळे ओले व्हायचे. मर्ढेकरांचा शिशिर एक एक ओळ घेऊन मला आठवायचा...
शिशिरर्तुच्या पुनरागमे,
एकेक पान गळावया
का लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.
पानात जी निजली इथे
इवली सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे?
खरचं इतक्या कुडकुडत्या थंडीत या झाडीत निजलेली पाखरे कुठे गेली असतील? माझी एक नोईडाला राहणारी मैत्रीण म्हणते इथे आले तर पाहते घराच्या छताच्या आधाराने राहणारी कबुतरे थंडीमुळे मरुन पडलेली. रोज पहाटे आपण उठावे आणि कबुतरांचे ते शव पहावे. शिशिर ऋतुचे केवढे हे क्रोर्य! अगदी ना. वा. टिळकांची पक्षिण आठवायची. अशा किती पहाट माझ्या वाट्याला येणार आहेत? आता पहावत नाही!!!!
हळूहळू माझा जेटलॅग कमी होत गेला. डिसेंबरच्या त्या सर्द थंडीत रात्री दुलई ओढून भिंतीवरील वॅन गॉचे सुर्यफुल पाहता पाहताचं मला डोळा लागायचा. इथली माणसे सिंगापुरातील माणसांसारखी अगदी पहाटेच रहाटगाड्याला लागायची नाहीत. साखरेझोपेत इथलं जग निवांत पहुडलं असायचं. दिवस क्वचित सोनेरी किरण घेऊन उमलायचं. ऐरवी गगनाला चुंबणार्या ईमारती पाहून निवलेले डोळे आता आकाशाचा निरभ्र निळाशार रंग मनभर पाहून...त्याला हृदयात मणभर साठवून मग दिवसाच्या कामाला मला लागू द्यायचे. बहुतेक वेळी दिवस उजाडायचा तो ढगाळ वातावरणामुळे म्लान वाटायचा. माझे ते अपार्टमेंट हॉटेल होते. खाली गुलाबाच्या फुलांचे एक छोटेशे कुंपण होते. ऐन थंडीत ती फुलेच काय तेवढी फुललेली दिसायची. वर फुले आणि खाली घमघमणार्या पाकळ्यांचा सांडलेला सडा. दिवसाढवळ्या कामे करताना आपल्या भावभावना दाखविण्याचा प्रश्न उरतच नव्हता. कामे करताना ईमारतीला वेढून असलेला अल्प्स आणि त्यावरची ती निष्पर्ण झाडोरी काचेआडून बघताना 'चार डोळे, दोन काचा, दोन खाचा, यात कोठे प्रश्न येतो आसवांचा' या आरती प्रभुंच्या ओळी अगदी आपसूक माझ्या ओठावर यायच्यात.
सुरवातीच्या दिवसात माझी सोबत कवितांनी केली ती अशी. मग हळूहळू माझ्यातील मी बोलका व्हायला लागलो. कामाचे सोडून इतर माहिती गोळा करायलो लागलो. येताना मी कुठलीचं तयारी करु शकलो नाही. ऑफीसमधील लोकांपेक्षा इतर दोस्तमित्रचं अधिक मिळत गेले. येताजाता वाटेवर रोज नटूनथटून आपल्या दोन धष्टपुष्ट श्वानांना बाजूला घेऊन भिक मागणार्या एका आजीशी माझी ओळखी झाली. ती रोज मला बॉनजुर म्हणायची. मी तिला नो नो म्हणायचो. रोज रोज तिला मी नाणे दिले नाही. तिच्यापेक्षा मीच मला जास्त दीन वाटायचो. मग कळले ती मला बॉनजुर म्हणजे सुप्रभात म्हणते आहे. माझ्या हॉटेलच्या खालिचं बागेत (फ्रेंच ब्रेड) विकणारे एक दुकान होते. तिथे ती वेणीसारखी पिळदार लांबलचंक बागेत मी रोज विकत घ्यायचो. त्यातील निम्मी मी त्या बाईला द्यायचो तर निम्मी मी खायचो. मागे वळून पाहता मला कळायचे की मी दिलेल्या निम्म्या बागेतमधील निम्मी ती तिच्या कुत्र्यांना द्यायची आणि उरलेली ती खायची. हळूहळू ती कुत्रे मला पाहून हातभर जीभ बाहेर काढून आपला प्रेमळपणा व्यक्त करायची. तिथल्या बसस्थानकावर सकाळी सकाळी मला शाळकरी मुलेमुली भेटायची. ती गोरीभुरी मुले थंडीने गुलाबी झालेली असायची. त्यांच्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीत ती माझ्याशी बोलायची. त्यांचे फ्रेंच उच्चार मला फार निरागस वाटायचे. आपण भारतीयचं काय तेवढे इतर उच्चारांचे अनुकरण करतो हे मला तिथे जाणवले. बस सुरु व्हायची ती ऑफीसमधे पोचायला दीड तास घ्यायची. वाटेत अनेक घाट-चढ-उतार लागायचे. मधेच अल्प्समागून सुर्याची किरणे फाकलेली दिसायची. नाताळाचे दिवस जवळ येत चालले होते..तसे ख्रिसमस-ट्रीच्या खाचाखाचा असलेली फळे मोठमोठी होताना दिसायची. पुर्वी कधी पाहिली नव्हती ही फळे म्हणून मला त्या फळांचे मला कोण अप्रुप वाटायचे. खूप फळे गोळा करुन संगळून ठेवली होती. परत येताना त्यातील काही सोबत आणली. ती घर बदलताना हरवून गेलीत मात्र स्मरणात अजून तशीच झुलत आहेत. बागेत-ब्रेड विकणारा मनुष्य, बस चालविणारा कॅप्टन, रसरशीत भाज्या विकणारा जेम्स आणि शाळेत जाणारी पोरटी यांच्याशी माझी मैत्री सहज जमून गेली. रोज ती गाजरानी लदबदलेली मुळासकट उपटलेले झुडुप, टप्पोरे दाणे असलेली वाटाण्याची शेंग, लालबुंद टमाट्याची फांदी इतका माझा भाजीपाला असायचाचं. कितीतरी वर्षानंतर ताजे मटार मला चाखायला तिथे मिळाले. भारतापेक्षाही जास्त छान मटार युरपात मिळतात याचे नवल वाटले आणि येताना आपण उगीच नको तेवढे धान्य आणले असे वाटायचे. जे सोबत आणले ते परत तसेच सोबत नेले. पिठे फक्त तेवढी संपून गेली होती. कुठे विकत मिळते का म्हणून खूप शोधली पण मिळाली नाही. एका श्रीलकंन तमिळ दुकानात मिळाली पण त्यात काळे सोंडे दिसले मग ते पिठ विकत घेतलेचं नाही.
माझा पर्यटक म्हणून प्रवास असा सुरु झाला. आधी ईटली आणि फ्रांस यांच्या सीमेवर वसलेली खेडीपाडी पहायला लागलो. ती खेडी मला जवळ पडायची. तेथपर्यंत बस सुविधा पण असायची. ती पाहून भारतातील खेडीपाडी किती वेगळी आणि इथली किती सुबक अशी तुलना वारंवार माझ्याकडून मनातल्या मनात व्हायची. मला लवंगी मिरच्या हव्या होत्या. त्या मला खेड्यातील एका सुपरमार्केटमधे मिळाल्या. त्या सुकलेल्या मिरच्या कोल्हापुरच्या कुठल्यातरी कंपनीतून इथे आल्या होत्या हे वाचून मला खूप आनंद झाला. एके ठिकाणी मी चहाचा कप ठेवायचे कोस्टर विकत घेतले. नंतर कळले ते कोस्टर भारतात तयार केलेले होते. माझ्यातला मुर्ख मला हसायला लागला. खेडेगाव म्हणून भव्य सुपरमार्केट आणि किमतीलाही तिथल्या वस्तू शहरी किमतींपेक्षा कमी होत्या.
सिझेन (Cezanne) नावाच्या चित्रकारचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या Aix-En-Provense इथे माझा चार महिने मुक्काम होता. छोटेशे पण व्यवस्थित सांभाळ केलेले हे शहर खूप आखीव-रेखीव आहे. हमरस्त्याच्या दुतर्फा बाजूला ओकची झाडे लावलेली आहेत जी सुमारे दोनशे-तिनशे वर्ष जुनी आहेत असे तिथले रहिवाशी सांगतात. ती संपुर्ण निष्पर्ण झाडांची कॅनोपी कधी पाने फुटून हिरवीगार होते असे मला सतत वाटायचे. पण एप्रिलमधे मी परत आलो आणि तेव्हा जरा कुठे झाडाला पालवी धरायला लागली होती. ओक मला कधी बहरलेला दिसलाच नाही. यश चोप्रांच्या मोहब्बतेमधे जेवढा त्यांना दाखवायला जमला तेवढाच काय फक्त. सिझेनची चित्रे आज पाहू उद्या पाहू परवा पाहू तेरवा पाहू.. असे करता करता मी ती पाहिलीचं नाही. जी काही पाहिली ती कुठल्या तरी हॉटेलच्या दिवानखान्यात नाहीतर कुणाच्या तरी क्युबीकल्स मधे. ती मला वॅन गॉच्या चित्रांसारखी पाहताक्षणीचं काळजाचा ठाव घेणारी वाटली नाही. कदाचित तेवढी तरल संवेदना माझ्यात नाही म्हणूनही तसे झाले असेल. पण योजना करुन ठेवलेल्या स्थळांपैकी सिझेनचं तेवढा राहून गेला. क्षमस्व प्रिय कलावंता.. परत कधी तरी!!!
दोन आठवड्यानंतर पॅरीस हा माझा सर्वाच लांबचा पहिला प्रवास होता. माझ्या घरापासून ९०० किलोमीटर अंतरावर इतका. इथे Train TVG म्हणून सर्वात जलद धावणारी ट्रेन पकडून अवघ्या तीन तासात मी पॅरीस गाठले. तिथला तो गोंगाट पाहून मुंबईची आठवण झाली. कुठे सिंगापुरातील ट्रेन टेशनं आणि कुठे इथली ट्रेन टेशनं! मुंबईसारखीच वाटलीतं. त्यांची नावे देखील उच्चारता येत नव्हती. कुठे ईंग्रजी बोर्ड दिसले नाही. दोन दिवस जमेल तेवढे फिरलो. पायाच्या पोटर्या सुजून आल्या होत्या. आतमधे कळा उठत होत्या. तरी अजून फिरुया हा हव्यास मात्र होताचं. नव्याची नवलाई आणि तारुण्याचा जोष ओसंडून वाहत होता. जसे इतर पर्यटक फिरतात पाहतात तसेच मीही फिरलो. कुठलीच आखणी न करता फिरणे किती आनंददायी असू शकते हे तिथे स्वानुभवानी जाणले. सर्वाधिक भावला तो रॉडीन. The Thinker ही रॉडीनचीचं प्रतिभा. कितीतरी तास 'दी थिंकर' भोवती घुटमळलो. शनिवार रविवार दोन दिवसात पॅरीस पुर्ण पाहणे शक्यचं नव्हते. माझ्याकडे त्यावेळी डिजीटल कॅमेरा नव्हता. याशिका नावाचा एक जुना कॅमेरा होता. तोच वापरला. आता ते फोटो अकोल्याच्या घरी कुठेतरी आहेत. आई म्हणाली मोरणेच्या पुरामुळे काही खराब झाली. आता परत जेंव्हा वेळ असेल, पुरेसे पैसे असतील आणि अंगात जोर असेल तेंव्हा परत एकदा युरप पाहीन.
मी, विनीत आणि अजय आम्ही एकदा माझ्याचं घरी जेवत होतो तेंव्हा विनीतचे लगेच ठरले आपण बार्सिलोनाला जाऊ. आम्ही लगेच तयार झालो. त्याच्याकडे गाडी होती. मुलींचे त्याला फार वेड. फक्त स्पेन मुली पहायला तो निघाला होता. मी पहाटेच तीनला उठून झटपट ५ थालिपिठं आणि बटाट्याची भाजी केली. दिवसभर पुरेल इतका चहा थर्मास मधे ओतला. थर्माकोलचे प्याले सोबत घेतले आणि बार्सिलोना पहायला निघालो. गावकुसाबाहेर पडताचं नयनरम्य देखावे आणि जिथेतिथे ऑलिव्हची झाडी पाहून मन टवटवीत झाले. बार्सिलोनाला पोचलो तेंव्हा कार पार्क करायला जागाचं मिळेना. तिथले पोलिस बलदंड धिप्पाड कडक कपड्यात आणि नाकावरची माशीही हलणार नाही इतके स्तब्ध उभे होते. मी त्यांच्यासमोर उभा त्यांच्याकडे टकमक पहात होतो. ते मात्र अजिबात हलत नव्हते. माझे बाबा, काका, भाऊ, चुलत भाऊ सर्व पोलिस तेंव्हा मला स्पेन पोलिसांचे जराही भय वाटले नाही. मी त्यांच्यासोबत एक फोटू घेतला. त्यांना ते फार आवडले. विनित मला उगाच दरडावत होता. त्या पोलिसांशी बोलताना मात्र ते जेवढे कडक वाटतं होते तेवढे ते नव्हतेचं. आतून खूप मृदू वाटलेत. मला जर विनितही वेळ दिला असता तर मी स्पेन पोलिस चौकी कशी असते तेही पाहिले असते. पण त्याची कार होती आणि त्याला मुली पहायच्या होत्या म्हणून त्याची सारखी चल यार.. चल यार अशी उबग आणणारी विनंती सुरु होती. मी पोलिस चौकी अगदी दुरुनच पाहिली. त्यावरची मोठमोठी चिन्हे मला फार आवडली. वाटेत हॉटेल शोधताना दिसणारे सुवेनिअर मका इतके आवडले की हॉटेलमधे पाय ठेवल्याबरोबर मी विनितला सांगून टाकले की मी माझा फिरेन तुम्ही तुमचे फिरा. प्रत्येकाकडे हॉटेलच्या किल्ल्यांचा जुळगा होता. तो जुळगा आणि पत्ता घेऊन मी माझी पहिली भरारी मारली. कुठे फिरु आणि कुठे नाही असे झाले होते. त्या वेळी जे काही पाहिले त्याची नावे त्याच वेळी नव्हती माहित नव्हती तर आता लिहिताना काय बरे आठवतील. 'ला सग्रादा फॅमिली' नावाचे अजूनही बांधकाम सुरु असलेले चर्च आम्ही फक्त दोन मिनिटात पाहिले. वेळ म्हणून नव्हताचं हाताशी. बार्सिलोना केवळ आहे. पहाल तेवढे प्रेमात पडत जाल इतके विलोभनीय आहे. तिथले ऑलिम्पिकचे मैदान मी दुरवरुनचं पाहिले. सागराच्या लाटा रस्त्यावर आदळू नयेत म्हणून त्रिकोणी आकाराचे दगडी ओंडके पाहुन मला नरिमन पॉईंटमधील क्वीन्स नेकलसचा किनारा आठवला. तिथेही तसेच दगडी ओंडके आहेत. रात्री मी, अजय आणि विनीत आम्ही तिघे सोबत फिरायला निघालो तेंव्हा दिवसा हेच का आपण शहर पाहिले यावर विश्वास बसत नव्हता. मग विनित मला म्हणाला यार ये नाईट-लाईफ है. या साठीच तर मी आलो आहे म्हणताना तो खूप खूष होता. त्यांच्यासोबत त्या रात्री रस नसतानाही मला कुठेकुठे फिरावे लागले. शेवटी रात्री २ वाजता मी एकटाच घरी आलो. मला हा नाईट-लाईफ प्रकार फारचं हिडीस वाटला. दुसरा दिवस कधी उजाडतो आणि कधी मी शुचिर्भुत होतो असे झाले होते. दुसर्या दिवशीच्या संध्याकाळी बार्सिलोना सोडताना मागे पडत चाललेले हे शहर परत कधी वाट्याला येईल याची मी देवाकडे प्रार्थना करत होतो. एकदा गौरी देशपांडेचे लेख वाचत होतो त्यावेळी त्यांचे तिथले अनुभव वाचताना मला फार आनंद होत होता. बार्सिलोनाचे बशीच्या आकाराचे उभे ठेवलेले एक चिनीमातिचे सुवेनिअर माझ्या अकोल्याच्या घरी मी शो-केस मधे ठेवले आहे. जो तो येतो त्याला हे बशीसारखे सुवेनिअर फार आवडते. त्यावरचा मोर आणि त्याचा तो मनमोहक पिसारा पहातचं बसावेशे वाटते.
माझ्या हॉटेलमधे तीन ईटालियन मुले होती. ती सिसिलिहून आलेली होती. तिथेही आमची एक शाखा आहे. ती मुले भारतीय जशी एकमेकांशी तंटतात तशीच वागत बोलत होती. त्यांचे उच्चार आणि हातवारे फ्रेंच माणसांसारखे भावणारे नव्हते. विनित म्हणाला गवारो की तर्हा बाते करते है ये लोग. मलाही नंतर तसेचं वाटले. पण असे कुणाला नावे ठेवू नये म्हणून मी ते विशेषण परत त्यांना कधी लावले नाही. त्यांच्याशी बोलताना येणारा ऑलिव्हचा वास कधीकधी नको तेवढा उग्र वाटायला. एकदा त्यांनी मला त्यांच्या शेवया खायला बोलाविले. मग कळले हीच ती स्पॅगथी नावाची कृती. त्यांच्यापैकी एकाचे आणि माझे अजिबात पटायचे नाही. पण तरीही तो मला कुठेही जाताना बोलवायला यायचा आणि पहिला मुद्दा त्याचा असायचा की आपण सोबत गेलो की कमी खर्च येईल. त्यानी मला ईटालीमधे शिव्या शिकविल्या. जेंव्हा मी त्या अनोळखी ईटालियन व्यक्तीला दिल्यात त्यावेळी कळले ते शब्द म्हणजे रांगड्या शिव्या होत्या. मला माझी ही फसवणूक आवडली नाही. पण भारतीय पण असेच नाही का करत म्हणून मी राग गिळून घेतला. ईटालियन लोक भारतीयांच्या अगदी जवळ जाणारे वाटलेत. मी पिसा बघायला गेलो त्यावेळी रेल्वेतून प्रवास करताना रुळाच्या बाजूला घरे आहेत. अगदी मुंबईमधे दिसतात तशी फक्त थोडी जास्त नीटनेटकी. घराच्या घरसरत्या छपरावर सुपामधे ठेवलेले वाळवण पाहून मला आपली घरे आठवली. तिथल्या स्त्रीयांचे डोळे देखील भारतिय स्त्रियांसारखेचं काळेशार होते. नीटनेटकी वेणीफणी न करता केसांचा अंबाडा देखील घरातल्या घरात वावरणार्या भारतीय मुलींसारखाचं होता. परकराचा ओचा कमरेत खोचून घेण्याची पद्धतही भारतीयचं वाटली. रेल्वेतून मला कितीकाही दिसत होते. मी आपले कधी पिसा येते याची वाट पहात होतो. झुकलेला पिसा पाहून मला असे क्षणभर देखील वाटले नाही की आपण जगातील ७ पैकी एक आश्चर्य पाहत आहोत. उलट हेच का ते पिसा याचेचं जास्त आश्चर्य वाटत होते. आजुबाजूला लोकांची पिसासोबत फोटो घेण्यासाठी वेड्यापिश्यासारखी गर्दी होती. आजूबाजूचा गलका हा आपल्या भारतात स्वेटर विकायला येणार्या नेपाळी लोकांसारखा होता. तिथल्या भिंती जुन्या पडक्या विटाविटांच्या आकार कोरलेल्या होत्या. पिसा पाहून मी परत फ्लोरेन्सला आलो.
फ्लोरेन्स अतिशय जुने शहर आहे. १४ शतकात फ्लोरेन्सला अनन्यसाधारण महत्त्व होते. मिकेल अँजेलोची कला इथेचं सर्वाधिक पहायला मिळते. नग्न डेव्हीड पहाताना तिथली एक स्त्री मला म्हणाली असे वाटते याला आपल्या बाहुपाशात घ्यावे. तिची ही प्रतिक्रिया ऐकून तो तिला किती सजीव आणि मादक वाटतो आहे हे मला कळले. एक स्त्री असून इतकी उघड उघड प्रतिक्रिया ऐकताना मला सुरवातिला नवल वाटले. पण कुठेतरी वाचले होते की प्रवासात अपरिचित लोक खूप मोकळेपणानी बोलतात. बहुतेक तिच ही प्रचिती असावी असे त्यावेळी वाटले. स्वर्गाचा दरवाजा ही कलाकृती देखील मिकेल अॅजेलोचीचं. आजूबाजूला कमालीची गर्दी आणि मधे तो जुना दरवाजा. तो सर्व परिसरचं कलाकृतींनी भारलेला वाटतो. उफ्फेझ्झी नावाच्या संग्रहालयातील अनेक शिल्प पाहून पाहून माझे डोळे थकले होते. हे आपण फक्त पाहत आहोत पण या कलाकृतींबद्दल आपल्याला काहीचं माहिती नाही याची मनोमनी उणिव वाटतं होती. त्या इतक्या प्राचीन शहरातील वास्तूंबद्दल आणि कलेबद्दल सहजपणे लिहायला पुलंसारखा एखादा प्रतिभावाण लेखकचं हवा. तिथे १६०० शतकातील एक जुना पुल आहे. असे म्हणतात तो पुल फक्त दगड मातिचा आहे तरी अजून तिथे उभा आहे आणि त्या पुलावर आपली दुकाने थाटून अनेकांचे व्यवसाय चालले आहेत. खास करुन सोने विकणार्यांचे. तेही शुद्ध २४ कॅरेट. मी माझ्या आईकरिता २४ कॅरेटचे एक साखळी विकत घेतली. ती साखळी असेल २४ कॅरेटची पण ती दिवसेदिवसं लांबत चालली आहे. किआंती नावाची हिरव्या द्राक्षापासून बनवलेल्या बीयरबद्दल मी 'दुस्तर हा घाट' मधे वाचले होते. ती बीअर कशी बनवतात याची पुर्णपणे माहिती देणारा एक टुर मी तिथे घेतला होत. एका जुन्या किल्ल्यात आम्ही सर्व पर्यटक गेलो. तिथे दारु बनवण्याची ती पुर्ण विधी पाहीली. तिथल्या वंशजांबद्दल ती बाई बोलत होती. तिथल्या वंशजांनी आम्हाला एका छोट्याशा झाकणात बीयर आणि ब्रेडचे तुकडे दिले खायला दिले. पहिल्यांदाच बीयर आणि तीही कियांती मी दुस्तरला मनातल्या मनात चीअर्से करत चाखली. हाउ ग्रेट!!! चवीपेक्षा मला तिचे फिकट पोपटी आणि पिवळी झाकं असणारे पोत फार आवडले. पुढे तशाच रंगाचा शर्ट आपण विकत घेऊ असेही ठरविले. कुणाचे काही आणि माझे आपले वेगळेचं! इतरांनी कियांतीच्या बाटल्या विकत घेतल्यात. मी फक्त दारुला किती शान आहे हेच अनुभवत होतो. फ्लोरेन्समधे मला चिंकीतेरे म्हणजे पाच गावांचे शहर हे ठिकाण पहायचे होते. ते मी एकदा नॅशनल जिओग्राफिकमधे की काय नंतर पाहिले. बहुतेक ते नाव आणखीनच वेगळे असेल. पण मी माझा चिंकीतेरे म्हणूनचं ओळखतो.
जसे माझे सिंगापुरला जाण्याचे दिवस जवळ आलेत तसे मला कळले की येथून Q-Basic हे विमान घेतले तर मला फ्रान्सच्या निसवरुन थेट अॅमस्टरडॅमला जाता येते. मी क्षणाचाही विलंब न लावता विमान बुक केले. जवळ पैसे उरले नव्हते. तेंव्हा एका सहकार्याकडून उसणे घेतले. त्यानी मला ते पैसे त्याल परत देईपर्यंत १०० वेळा मेलमधून माझ्या कुटुंबाचे पैसे तुझ्याकडे आहेत हे सांगितले.
रात्रीच्या एक वाजता खास अॅनी फ्रॅन्कचे घर पाहण्यासाठी मी अॅमस्टरडॅमला आलो होतो. ठिकठिकाणी निऑनमधे चमकणार्या हिनकेन बीअरच्या पाट्या दिसत होत्या. रात्रीच्या अंधारात गेरु रंगांची घरे ओलांडत मी माझ्या अॅनी फ्रॅन्क नावाच्या लॉजपाशी पोचलो. तिथली खोली पाहून मी हताश झालो. आजूबाजूला तरणी मुलेमुली ताल करीत होती. त्यांना खेकसावून लॉज संभाळणारा मुलगा माझ्यापाशी येऊन सॉरी म्हणाला. कारण त्यावेळी मला फारचं भिती वाटली त्याच्या त्या डच आवाजाची आणि तिथे चाललेल्या धडगुसाची. मी माझ्या खोलीचे दार पक्के बंद करुन रूम-हीटर लावला. दोन तास झोप घेऊन पाचला स्नान करुन खाली लाकडी जीना उतरलो. तिथला चहा आणि टोस्ट न्याहरीला घेतली. बाहेर हमरस्त्यावर आलो तर सगळीकडे पसरलेले कालवे पाहून मन मोहरुन गेले. मार्चेमधली थंडी अगदी पायाला लटपट कापवत होती. नऊची वेळ होईपर्यंत तिथली सकाळ अनुभवण्यात माझा छान वेळ गेला. फलाफल नावाचा एक तळलेला पदार्थ कोंबून मी वॅन गॉला भेट दिली. त्यावेळी हा चित्रकार इतका महान आहे हे माझ्या गावी देखील नव्हते. एका तासात मी ते संग्रहालय पाहून बाहेर पडलो आणि एके ठिकाणी जाहीरात वाचली - एका दिवसापुरता बेल्जीअम टुर. आपल्याकडे जसे लक्झरीच्या गाड्या भरवण्याकरिता मुले आपल्यापर्यंत पोचतात तशी तिथली मुले माझ्यापर्यंत चलायचं का बेल्जीअम म्हणत आहे. ९० युरो तिकिटावर खर्च करुन मी लगेच तयार झालो. वाटेत काळ्या रंगाच्या आणि लांब लांब गवताचे पाते असलेल्या कुरणात चरणाता पाहून असे वाटते आत्ता इथेच आपण उतरावे आणि त्यांना जवळून न्याहळावे. दुरुन दिसणारा तो गाईंचा कळप आणि वरतून रिमझिम पावसाची सर ते दृष्य छानचं होते. परंतू मधे मधे बसमधून काहीबाही सांगणारा गाडीचा मालक मात्र व्यत्यय आणत होता. पण एक छान झाले. वाटेत आम्हाला दुसर्या महायुद्धात concentration camps जिथे भरविल्या गेले ते कॅम्प दिसले. तो कॅम्प दिसताक्षणीच मला इथेच कुठेतरी अॅनी असेल असे वाटले. अगदी उजाड भुमी आणि तिथे तो कॅम्प उभा होता. चहोबाजूनी तारांच्या कुंपणाने वेढलेला. बेल्जीअम मधे आम्ही तो सू करणारा मुलगा छोटा मुलगा पाहिला. त्याला पाहण्यासाठी केवढी मोठी गर्दी आणि त्या मुलाचा केवढा मोठा इतिहास. अबब!!!!
बेल्जीअमच्या प्रवासात माझी ओळख एका पोरसवदा वयाच्या अमेरिकन मुलाशी झाली. तो भारतात गोव्याला शिकायला जाणार होता. त्याच्याकडचे पैसे संपले होते आणि त्याला पैशाची मदत हवी होती. दुसर्या दिवशी मी आधी अॅनी फ्रॅन्क हाऊस पहायला जाणार होतो. तो मुलगा म्हणाला तू जर मला सोबत देशील तर तिथे तिथे मी येईल आणि होतील तेवढे पैसे मी तुला नंतर पाठवून देईल. मला त्याच्यावर काही भरवसा नव्हता. पण आपले थोडे पैसे गेले तर काय फरक पडणार आहे असा विचार करुन मी त्याला म्हणालो ठिक आहे उद्याला तू इथे ७ वाजता उभा रहा मी येईल. मग आपण निघूया. तो खरचं दुसर्या दिवशा मंकी कॅप चढवून माझी प्रतिक्षा करित होता. मला त्याची किव आली. आम्ही दोघांनी मिळून अॅनीचे घर पाहिले. ती अलमारी जिच्या आधारे इतके वर्ष अॅनी गुप्तपणे राहू शकली ती अगदी जवळून पाहिली. ते घर अगदी लपाछपी खेळायला किती उत्तम असेल असे वाटून गेले. अॅनीच्या कितीतरी गोष्टी तिथे जशाच्या तशाच जपूण आहेत. तिची वाश बेसिन, तिची पेपरातील कात्रणे, ती कात्रणे चिकटवलेली भितं, तिच्या पहिल्या प्रणयाबद्दल लिहिलेली ती खोली, तो जीना, तिचे अनेक छायचित्र, वाचकांच्या ढीगभरुन प्रतिक्रिया असलेल्या त्या जाडजुड वह्या आणि खास करुन तिची काचेखाली ठेवलेली ती डायरी. तिची ती 'किटी' नावाची लाल बटणाची .. अबोली रंगांचे कापडी आवरण घातलेली डायरी पाहुन मला खूप आनंद झाला. ज्यांना डच समजते ती लोक चकीत होऊन आपसात नवल व्यक्त करत होती. इतकी लहान मुलगी इतकं काही लिहू शकते!!!! अनेक भाषेत अनुवादीत झालेली तिची पुस्तके. त्यात एक पुस्तक मराठीत देखील होते. मराठी अनुवाद देखील झाल्याचे पाहून आनंद झाला. अॅनीचे पोस्टर मला विकत घ्यायचे होते ते राहून गेले. मी त्या अनेरिकन मुलाला माझा पत्ता दिला आणि सांगितले हे बघ मला काहीही करुन ते पोस्टर सिंगापुरला पाठवं. त्याच्या आईनी खरचं मला ते पोस्टर पाठविले आणि सोबत जेवढे पैसे त्यानी उसणे घेतले होते ते पैसेही. अॅनी म्हणते तशी जगात सर्व सुहृदयी माणसे आहेत याचा प्रत्यय कदाचित त्या मुलाला माझा आला असावा आणि मला त्याचा आला हे तर निश्चितच!!!! माझ्या लॉजजवळ एक भव्य कनसर्ट हॉल होता. तो बघण्यासाठी मी रात्री ९ ला तिथे गेलो. तिथे ऐटीत माणसे उभी होती. तिकिटांची रिघ लागलो होती. हळूहळू सर्व तिकिटे खपलीत. मी तेवढाच फक्त त्या रिकाम्या हॉलमधे उरलो होतो. एक व्यक्ती बाहेर आली आणि तिने तिकिट रद्द केले. मला तिथल्या बाईने हाक मारली. एक तिकिट आहे... ही संधी सोडू नका. मोझार्ट आणि बाख दोन्ही ऐकून तल्लीन व्हाल. मी मोझार्ट आणि बाखबद्दल दुस्तर मधेच वाचलं होत. त्यातली नमू म्हणते अगदी तसे काळीज चिरत जाणार मोझार्ट आणि बाख असतं. मी लगेच ते तिकिट २१ युरोमधे विकत घेतलं. आतमधे सर्व प्रेक्षक किती नीटनेटकी आणि उंच प्रतिचा पोषाख करुन आली होती. कलेप्रति त्यांचा सन्मान तिथे मला कळला. माझ्या बाजूला एक वृद्ध जोडपे बसले होते. ते मला अधूनमधून एक एक लय सांगत होते. नंतर मलाचं आपले काळीज आतवर कुणी चिरत चालले आहे असे वाटले. तीन तास तो कन्सर्ट ऐकून पाहून मला त्यानंतर कन्सर्टचे वेडचं लागले. त्यानंतर इथे अनेक कन्सर्ट मी पाहिले आहेत. पण पहिल्या त्या कन्सर्टची सर अजून कशालाच आली नाही. तो हॉल आणि त्या हॉलमधील ती सजावट अगदी घरंदाज वाटतं होती. खास करुन त्या हॉलचे ते गडद रंग. तो हिरवा रंग अगदी राजेशाही पाचूसारखा होता!!!!
चार महिने युरपात राहून मी जेंव्हा पुन्हा एकदा या बेटावर यायला निघालो तेंव्हा नुकतीच कुठेतरी तिथल्या झाडांना कोवळी पालवी फुटली होती. जाण्यापुर्वी पुन्हा एकदा पॅरीस मनभरुन पाहिले. ग्रनोबल देखील पाहिले. अनेक छोटी छोटी गावे पाहिलीत. लिऑन, निस, मार्सेई ही जवळची शहरं यांना भेट दिली. काल पहाटे जिथे पानांचा मागमूस देखील नव्हता तिथे कित्येक महिन्यांचा दबा धरुन बसलेले पानांचे अंकूर रातोरात सोनसळी कांती घेऊन इवली इवली पालवी हजारोंच्या संख्येनी जन्माला आली. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल तेवढी माझ्या वाट्याला आली. त्या पानांकडे पाहतचं मी 'अदमा' अर्थात उद्या भेटू म्हंटले. तो उद्याचा दिवस परत कधी येईल माहिती नाही. पण जरुर येईल.
हा लेख नजरेतून कसा काय सुटला
हा लेख नजरेतून कसा काय सुटला कोण जाणे.
फारच छान लिहिलयस बी.
खुपच छान प्रवासवर्णन केलंत
खुपच छान प्रवासवर्णन केलंत आपण..
पुर्व युरोप पुन्हा डोळयांसमोर जागा झाला.
अँमस्टरडँम, अँटवर्प, Paris, Rotterdam यांना जोडणारी आलिशान Thally's आणि TVG ट्रेन; Paris मधले स्वत:ला पंजाबी म्हणवणारे पाकिस्तानी, फ्रेंच ब्रेकफास्ट आणि वाईन्स ; बेल्जियमचे मनमोहक रस्ते, नेदरलँड्सची शहरे आणि आपले वेगळेपण जपणारी गावे; युरोपची friendly माणसे ; तिथली गोठवणारी थंडी - सगळेच खुप छान आहे.
आपण आपल्या लेखणीतून सगळे अगदी मस्त टिपले आहे.
प्रथम, धन्यवाद. दक्षिणा
प्रथम, धन्यवाद.
दक्षिणा धन्यवाद.
फार छान लिहिलयंत, बी.
फार छान लिहिलयंत, बी.
किती छान लिहिलंय!
किती छान लिहिलंय! कॅलिडोस्कोपमधून बघतोय असं वाटलं रंगीबेरंगी!
खुप सुंदर प्रवासवर्णन लिहिले
खुप सुंदर प्रवासवर्णन लिहिले आहे. अगदि माहीत नसलेली ठिकाणं आणि माणसं डोळ्यासमोर उभी राहीली ,तुमच्या या अनुभवामुळे खुप मस्त माहीती वाचायला मिळाली. पुरामुळे खराब झालेलया फोटोंबद्दल तुमच्या इतकेच वाईट वाटले.पण पुढच्याच वाक्यामुळे असं वाटलं,कधीतरी तुम्ही अशाच प्रवासवर्णना बरोबरच काढलेले सुंदर फोटो नक्की दाखवाल आम्हा सर्वांना.
मी काय काय लिहिले हेच मला
मी काय काय लिहिले हेच मला आठवत नाही. तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला माझा लेख वाचायला हवा
एक दोन उतारे लिहायचे राहून गेलेत. ते इतके मजेशीर होते ना ..
मीरा, इथे वाच युरप वरचा माझा
मीरा, इथे वाच युरप वरचा माझा लेख.
मीरा का मोहन इथे वाच युरप
मीरा का मोहन इथे वाच युरप वरचा माझा लेख.
>>
अहो, त्या मोहन की मीरा आहेत.
वा.... अत्ता वाचला.. मस्त
वा.... अत्ता वाचला..
मस्त निरिक्षण आणि खुप प्रमाणीक....
हे प्रवास वर्णन पेक्षा अनुभव वर्णन झाले आहे आणि ते ही अनप्लांड.... खुप मस्त..... तु लिंक दिली होतीस पण वाचु शकले नव्हते..... छान
फोटो हवे होते रे !!!!
तेंव्हा माझ्याकडे डिजिटल
तेंव्हा माझ्याकडे डिजिटल कॅमेरा नव्हता. आणि एक दोन रोल लगेच संपून जायचे. बॅटरी सुद्धा संपून जात असे. मग मी फक्त युरोप पाहिले. फोटो खूपच कमी आहेत.
अर्र...हे वाचायचं कसं काय
अर्र...हे वाचायचं कसं काय राहिलं?
कधी कधी गडबडीत वाचून प्रतिसादही दिला जातो(कारण लिखाण खूपच आवडलेलं असतं)....आणि नंतर विसरायला होत. तसं तर झालं नसेल ना असंही वाटलं एकदा.
पण मस्त लिहिलंस...............अगदी "बी" इष्टाइल!
युरप पहायचाय एकदा.
बी, अप्रतिम अनुभव कथन. जसं
बी, अप्रतिम अनुभव कथन. जसं न्यू यॉर्क बघितले म्हणजे अमेरिका बघितली असे होत नाही, लंडन म्हणजे यूके नाही तसच फक्तं पॅरिस म्हणजे फ्रांस नाही हे या लेखामुळे कळलं. फ्रांस चे हे अनोखे रूप दाखविल्याबद्दल खूप खूप आभार. तसेच बार्सीलोना, फ्लोरेन्स सगळेच अनुभव मस्तं. फार आवडले.
शीर्षकातल्या '... फ्रान्सच्या
शीर्षकातल्या '... फ्रान्सच्या रात्री' हे वाचून भलताच समज झाला! बी तुम्हीसुद्धा?!
आ.न.,
-गा.पै.
नुसतं प्रवासवर्णनही नाही तर
नुसतं प्रवासवर्णनही नाही तर भावनीक पातळीवरचे अनुभव छान लिहिले आहेत.>>>>>
लईभारी!
आवडला लेख....
आवडला लेख....
धन्यवाद सर्वांचे. हा एकच लेख
धन्यवाद सर्वांचे. हा एकच लेख असा आहे माझा की अजूनही अभिप्राय मिळतात.
खूपच छान लेख!
खूपच छान लेख!
Pages