दाते उर्फ दातार
नमस्कार. माझ नांव नयन दाते उर्फ दातार. आता तुम्ही म्हणाल ह्या आडनांवात उर्फ काय तर सांगतो. म्हणजे बघा मी तेव्हा पाचवि सहावीत असेन. त्या वेळेला माझे दात थोडे पुढे होते. आईच्या आग्रहाखातर दात सरळ होण्याकरीता काही महीने दातांना तारा लावलेल्या होत्या. त्यामुळे शाळेत मला सर्व जण दातांना तारा लावलेला तो दातार असेच ओळखायला लागले. सारख सारख तेच एकुन मी माझ खर आडनांवच विसरुन गेलो. त्यामुळे पुढे कधी कसला फॉर्म भरायचा असेल तर संपुर्ण नांव द्या, सदर खाली मी आधी दातार असच लिहायचो. मग लक्षात यायच की माझ आडनांव दातार नाही दाते आहे. त्यामुळे मी दातार खोडून परत दाते लिहायचो. त्यामुळे जो माणूस माझा भरलेला फॉर्म घेई तो आधी माझ्याकडे संशयाने पाही की हा आपले आडनांव कां खोडतो ? हा खरच ओरिजीनल माणुस आहे की डुप्लिकेट ?
त्यामुळे पुढे कंटाळुन मी माझ नांव बदलायला सरकारी खात्यात ऍप्लिकेशनच दिला. त्यात मी माझ आडनांव दाते उर्फ दातार करावे असे म्हटले. सरकारी खात, तिथले साहेब म्हणाले तुमच आडनांव दाते च दातार करुन देईन, दोन्ही देणार नाही. म्हटले कां ? मी म्हटले अहो तुम्ही, दगडू उर्फ नाना गाढवे , हणमंत उर्फ तात्या गोसावी अशी नांव बदलुन तुमच्या गॅझेटमध्ये देता. माझ्या दाते उर्फ दातार करतांना तुमच्या दातात काय अडकत ? म्हणाले नांव बदलतो, आडनांवात उर्फ येत नाही. मी काही माझा मुद्दा सोडला नाही. अहो कुठल्याही ऍप्लिकेशनमध्ये संपुर्ण नांव अस लिहिलेल असत त्यात स्वतचे, वडलांचे व आडनांव मिळून संपूर्ण नांव होते. मी माझा बदल नांवात नाही आडनांवात उर्फ टाकायला सांगतो तर काय प्रॉब्लेम आहे ? नाहीतर मी कोर्टात जाईन अशी धमकी दिली. कित्येक मोठमोठया नाचणा-या, गाणा-या बायकांची आडनांव माहेर-सासर अशी दोन्ही मिळून आहेत. मी आमच पुर्वापार आलेल व शाळेतल असं लावल तर काय झाल?
शेवटी एकदाच ते गॅझेटमध्ये छापुन येऊन मी दाते उर्फ दातार झालो. आता माझी खाडाखोड थांबली. म्हणजे आता तुम्हाला कळचल असेल की मी वकील आहे म्हणून. म्हणजे हल्लीच दोन एक वर्षापासून वकीली सुरु केली आहे. गिरगांवात भाडयाचे छोटे ऑफीस आहे. क्रिमीनल प्रॅक्टीस करतो. क्रिमीनलमध्ये मला पहिल्यापासून इंटरेस्ट आहे. का विचारा ? अहो मला इथे माणसांचे हर त-हेचे रंगढंग बघायला मिळतात. आणि मुख्य म्हणजे त्यांना मदत करायला मिळते. आता तुम्ही म्हणाला चोरीमारी , खुन करणा-याला कसली मदत? तर काय होत बघा, एखाद्या माणसाची चोरीकरता आलेली केस जेव्हा मि स्टडी करतो तेव्हा कळत की कुठलाहि सामान्य माणुस अगदी दुसरा काही उपाय नाही तेव्हाच चोरी करतो. त्याला पकडल जात, रितसर कारवाई होते. जेल होते पण जेव्हा त्याने ती चोरी कां केली हे जेव्हा मि बघतो तेव्हा कोणी चांगली नोकरी नाही म्हणून, कामधंदा नाही म्हणून ,जवळ पैसा नाही किंवा नातेवाईकांच्या ऑपरेशनला पैसा हवा म्हणून, काहिना काहि कारणाने तो चोरी करतो. अशा माणसांना जेवढी कमीत कमी शिक्षा होईल ते मी बघतो. मुख्य म्हणजे पुढे तो समाजात एक चोर, शिक्षा भोगलेला आहे, त्यामुळे परत काम नाही, म्हणुन परत चोरी ह्या दुष्टचक्रातुन सोडवण्याचा प्रयत्न करतो.
बोलता बोलता बरच विषयांतर झाल कां ? माझे हे नेहमी अस होत बघा. बाबा अस माझ विषयांतर होत चालले की नेहमी म्हणायचे " ओ-ओ तिस-या लेनमधुन एकदम पहिल्या लेनमध्ये कुठे येता ? आता डिव्हायडर तोडून पलिकडे जाऊ नका ,ऍक्सीडेंट होईल. " ते पोलीस खात्यात आहेत.
खरतरन मला बोलण्याची खुप हौस आहे. जो मिळेल त्याच्याशी मी बोलतो. त्याची सुखदुःख जाणून घेतो. कधी कुणाला हे आगाऊपणाचही वाटत असेल पण स्वभाव , त्याला काही दुसरा पर्याय नाही. ह्यामुळे मला कित्येक माणसांचे नमुने बघायला मिळतात. ते एखाद्या प्रसंगी असे का वागतात, इतके कां रागावतात हे न उमगणार कोड आहे. मध्ये एका खेडयातल्या एका सधन शेतक-याची केस होती. शेतातल्या राबणा-या मजुराशी पैशावरुन काही तरी बोलाचाली झाली. त्यात रागाने ह्याने हातातली काठि त्याला मारली. नेमकी ति त्याच्या डोक्यात बसली व दोन दिवसात तो मजुर मेला. शेतक-याला म्हटले अरे बाबा इतका राग कां येतो, त्याच्यावर कंट्रोल करायला नको कां ? म्हटल तुला कुणी सांगितल नाही कां की राग आल्यावर 1-2-3-4 असे आकडे म्हणावे. म्हणाला पण मी शाळा शिकलोय कुठे? गावात लहानपणि शर्यतीमध्ये ती चालू होतांना 1-2-3 असे म्हणायचे, तेवढेच येते. पुढचे येतं नाही. मि 3 म्हणेस्तो काही राग खाली आला नाही. मग हाणली त्याला काठी.
आता ह्या आकडयावरन आठवल. आमच्या शेजारच्या जोशी काकु मजेशीरच बोलतात. परवा एकदा त्यांच्या घरी गेलो तर त्या मी. जोशांना म्हणत होत्या कि आता किति आकडे झाल्येत ? खर्व कि निखर्व ? मी म्हटले अहो अस काय त्यांना म्हणताय मला काही समजले नाही , तर म्हणाल्या अरे एकदा लहानपणी कधीतरी हे रागावले होते व आईने शिकवल्याप्रमाणे त्यांनी आकडे म्हणण्यास सुरवात केली. आता आमच्या लग्नाला 25 वर्षे झाली. मी कधी ह्यांना रागावलेले पाहिले नाही. मला वाटत अजुनही त्यांचे आकडे म्हणणे चालूच आहे. म्हणून विचारल की खर्वापर्यंत पोहोचलाय कि निखर्वापर्यंत?
आता बघा माझी परत लेन बदलायला लागली. म्हणजे मला तर एक तुम्हाला नुकतीच झालेली एक छोटीशी गोष्ट सांगायची होती. माझ्या प्रत्येक क्लायंटकडून मी फी भरपुर घेत नसेन पण मि समोरच्यांकडुन शिकण्यासारख्या , आपल आयुष्य समृध्द करण्यासारख्या खुप गोष्टी घेतो. तिच माझी खरी फी अस मी समजतो.
म्हणजे बघा दोन एक महिन्यापुर्वी एक दिवस मी घरुन स्टेशनवर जायला रिक्षा शोधु लागलो. कोपर्यावरच एक रिक्षावाला दिसला. त्याला म्हटले स्टेशन चलेगा ? पण त्याच लक्षच नव्हत. कसल्या तरी भयानक विचारात गुंतल्याच चेह-यावर दिसत होते. त्याला हात लावून हलवल्यावर त्याची समाधी भंगली. रिक्षात बसलो. मी कसला शांत बसतोय, त्याला विचारले काय बाबा कसल्या एवढया विचारात होतास ? झाल आपल दुःख कुणाला तरी समजल आणि कुणी आपलेपणाने विचारतय म्हणल्यावरच त्याने भडाभडा बोलायला सुरवात केली. म्हणाला कालपासून माझ्या बहिणींचे फोनवर फोन येतात. माझी आई आजारी आहे लौकर ये म्हणून, पण साहेब आता माझी आई 90 वर्षांचि गावी यु.पी. मध्ये असते. लग्न झालेल्या दोन बहिणी आहेत. जवळच्या गावातच त्यांच सासर आहे त्यामुळे त्या दोघी तिथे आहेत. मला पण खुप जावस वाटतय पण आमच्यात एक वाईट पध्दत आहे हो की घरातल कुणी गेल कि दिवस करतांना गाव जेवण घालाव लागत. विस ते पंचविस हजार रुपये खर्च येतो. तस नाही केल तर समाजात राहण मुश्किल होत. मला इथे दोन शाळेतल्या मुली आहेत. नुकतेच त्यांची शाळेची फी, पुस्तक, युनिफॉर्म ह्यावर बराच पैसा खर्च झाला. आता एवढे पैसे मी आणु कुठुन ? नाही गेलो तरी छिथु होईल की आई गेली तरी आला नाही व गावजेवण दिल नाहि . ही एक रिक्षा स्वतची आहे. भाडयाच्या घरात राहतो. आता पैसे कुठुन आणु ? एकदा मनात विचार आला की अरे बापरे आता हा आपल्याकडे पैसे मागणार की काय ?
कारण गेल्याच वर्षी मला असा अनुभव आला. दिवाळीच्या दिवसात काही भेटकार्ड पोस्टात टाकायला मी माझ्या ऑफीसमधल्या प्युनला सांगितले. ती घेऊन तो निघाला. दोन तास झाले तरी तो आला नाही. मी तर त्याला दुसरे काही काम सांगितले नव्हत. तेवढयात एक चाळिशी च्या आसपासचा एक माणूस ऑफीसात आला, म्हणाला सुभाष माने तुमच्याच ऑफीसमध्ये कामाला आहेत न ? त्यांचा गिरगांव नाक्यावर एक ऍक्सीडेंट झालाय. एका स्कुटरने त्यांना जोरदार धडक दिली आहे. मी तिथेच होतो. ते शुध्दीत होते. त्यांना घेऊन मि नायर हॉस्पीटलमध्ये गेलो. ऍडमिट केल, आता बरे आहेत. त्यांनीच मला तुमचा ऍड्रेस दिला व निरोप द्यायला सांगितला. त्यांना बसवल, चहा दिला. म्हटल बर झाल तुम्ही एवढी मदत केलीत. हल्ली तुमच्या सारखी देवमाणस दिसण दुरापास्तच. निघताना तो म्हणाला, बाकी नाही पण गिरगांव ते नायर व नायर ते इथे जे टॅक्सीचे पैसे झाले ते दिलेत तर बर होईल. मी म्हटले अहो ह्या बातमीमुळे हे माझ्या लक्षातच आले नाही. हे घ्या 100 रुपये, म्हणाला नको नको, 72 रु. झालेत तेवढेच द्या. मनात म्हटल ह्या इतक्या प्रामाणिक माणसाचा फोटोच काढून देवघरात ठेवला पाहिजे. तसाच तडक मी नायरला गेलो. सर्व हॉस्पीटल धुंडाळल पण आमच्या माणसाचा कुठेच पत्ता नाही. शेवटी इन्क्वायरी काऊंटरवर विचारल, सर्व हकीकत सांगितली तर तो म्हणाला आजच्या दिवसातले तुम्ही दुसरे. किति 70 रुपये घेतले का त्याने ? म्हटले नाही 72 . कां पण तुम्हि अस का विचारता? तर म्हणाला अहो रोज एखाद दोन माणस अशी येतातच. हेच कारण. कुठल्या माणसाने हा फसवाफसवीचा नवीन प्रकार शोधलाय कोण जाणे ? त्या माणसाचा मनातला देवासारखा फोटो मी टराटरा फाडून टाकला. ऑफिसात आल्यावर प्युनला विचारल तर म्हणाला एका नाक्यावर त्याच्या हातातून तो कार्डांचा गठ्ठा पडला तेव्हा एका माणसाने तो उचलुन देण्यास मदत केली. व नंतर त्याला एका गावचा मित्र भेटला व गप्पा मारुन चहा पिऊन होईस्तो वेळ लागला. म्हणजे ह्या पठयाने तेवढयात कार्डावरचा ऑफिसचा पत्ता पाहून व त्याला नांव विचारुन हे असं केल ? फक्त 72 रुपयांकरता? त्या समोर माझ जळलेल रक्त, श्रम मनातली घालमेल ह्याचि किंमत काय ?
बघा परत जरा गाडीने लेन बदलली. खर सांगु, कोर्टात कधीअस झाल्यावर जजहि म्हणतात अहो दाते-दातार तुमची बोरीवलीची गाडी मुलुंडला चाललीय, कांदिवलीला या . सर्वजण सांभाळून घेतात म्हणून बरय.
तर मला त्या 72 रुपये वाल्याचीच आठवण झाली. म्हटल परत काही फसायला नको. प्रश्न 25 हजार रुपयांचा होता. मि त्याला पैशांनी मदत करुन करुन किती करणार ? फक्त त्याला एवढच म्हटल अरे बाबा काही कर पण बेकायदेशिर किंवा काही लफडयाच काम करुन पैसे मिळवू नकोस, नाही तर आयुष्य एकदम बदलून जाईल.
हा प्रसंग मी विसरुनही गेलो. परवा तोच रिक्षावाला अचानक परत दिसला. रिक्षात बसलो. मिच विचारल गांवाला जाऊन आलास, आईच काय झाल ? त्याला आधी कळेना हा माणुस गुप्त हेर वगैरे आहे की काय ? ह्याला हे सर्व कस माहीत ? मग मी त्याला त्या दिवसाच्या प्रसंगाची आठवण करुन दिली. तेव्हा त्याला सर्व आठवल . म्हणाला काय करु जि माझी रिक्षा होती ती विकली. आई तर गेली, घातल गांव जेवण. रिक्षा गेली पण अब्रु तर वाचली. पदरात दोन मुलि आहेत. त्यांच्या भविष्याचा मलाच विचार करायला हवा. आता मी दुस-याच्या रिक्षावर काम करतो. डबल मेहनत करतो. सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत रिक्षा चालवतो. मला खात्री आहे काही वर्षातच मी माझी स्वतची रिक्षा घेईन.
बापरे एवढया छोटया माणसाकडे एवढा आत्मविश्वास. त्याच्या ह्या आत्मविश्वासाला मि सलाम केला. बघा ह्याच्याकडूनही मी काय शिकलो तर सकारात्मक विचार करण्याचि व्रूत्ति . अहो तुम्हीही कुठल्याही कठीण प्रसंगी हा असला सकारात्मक विचार ठेवला तर काहीही अघटीत ,बेकायदेशीर तुमच्या हातून कधिहि घडणार नाही. आणि हो कदाचित घडलच तर मी आहे न तिथे तुमचा वकील म्हणुन. काय ? बोलावणार न मला ?
ओघवती आहे एकदम! समाजाकरता
ओघवती आहे एकदम!
समाजाकरता म्हणून परवडत नसलेल्या गोष्टी करणं मला नाही पटतं..
पण शेवटी कथेतलं कॅरेक्टर आहे! काही करू शकत नाही!
वा वा सुनील भाऊ....दातार वकील
वा वा सुनील भाऊ....दातार वकील मस्त आहे बरंका! मला माझ्या वकीलाची आठवण झाली...
मस्तच! एकदम गोष्टीवेल्हाळ आणि
मस्तच! एकदम गोष्टीवेल्हाळ आणि छान माणूस वाटतोय! जाड भिंगाचा चष्मा लावलेला, थोडा वेंधळा गलगले येतोय डोळ्यासमोर!
72 रु. चा प्रसंग खुपच मजेदार
72 रु. चा प्रसंग खुपच मजेदार आहे...खरच अशीही माणस असू शकतात...बाकी लिखाण छान आहे...सुभेच्छा...
छान लिहीलय. समोर गप्पा मारत
छान लिहीलय. समोर गप्पा मारत बसल्यासारखे वाटते ही कथा वाचतांना.
मस्त लिहीलय , एकदम ओघवती
मस्त लिहीलय , एकदम ओघवती वाटली
छान लिहीलय...... गप्पा छान
छान लिहीलय......
गप्पा छान रंगल्या....
=> 72 रु. चा प्रसंग खुपच मजेदार आहे...खरच अशीही माणस असू शकतात
हो असतात मी अनूभव घेतला आहे.....
छान !! खुप सहज ..अगदी
छान !! खुप सहज ..अगदी गप्पांचा फिल येतो
छान लिहीलंय. लेन चेंज वगैरे
छान लिहीलंय. लेन चेंज वगैरे मस्त एकदम
क्या बात है!!! खुप खुप मस्त
क्या बात है!!! खुप खुप मस्त कथा....खुप आवडली
लिहीत रहा!!!
चांगली लिहीलिये. आवडली...
चांगली लिहीलिये. आवडली...
अगदी ओघवती शैली . छान .
अगदी ओघवती शैली . छान .
वावावा दाते मास्तर लई बेस
वावावा दाते मास्तर लई बेस लिवलियसा
गोष्टीवेल्हाळ दातार...
गोष्टीवेल्हाळ दातार...
दाते-दातार......... दंतकथा या
दाते-दातार......... दंतकथा या शब्दाचा उगम तुम्हीच का?
आवडली.
आवडली.
मस्तय. आवडली कथा.
मस्तय. आवडली कथा.
मस्त
मस्त
सुनिल्..मस्तच जमलीये कथा..
सुनिल्..मस्तच जमलीये कथा.. आवडली.. नेहमीसारखीच!!