श्वास

Submitted by VivekTatke on 5 March, 2008 - 09:32

माणसाचं असणं नि नसणं
यामध्ये असतो फक्त एक धागा
जनन नि मरण या दोन टोकांच्यामध्ये
झुलणारा अधांतरी धागा //

अगणित श्वासामध्ये एक श्वास
अकल्पित, अगम्य हाताने रोखला जातो
नि जे तुम्ही आत्ता असतात
श्री. वा सौ., कुमार वा कुमारी
ते होतात फक्त क्षणार्धात
एका अचेतन-अथांग विश्वाच्या प्रवासाला
निघणार्‍या अनामिक वस्तुमध्ये रुपांतरीत //

सायरनचा आवाज घोंगावत
जीवाघेण्या वेगाने गाडी धावतेय,
जगण्याची आस तेवत तेवत
वेळेचा पाठलाग चालू आहे, चालूच आहे
काळाच्या पाठलागापासून दूर जाण्यासाठी //

पण धागा खेचला जातोय, धागा अशक्त होतोय
पुढचा फक्त एकच श्वास--फक्त एकच श्वास
असं करत्--एका श्वासाची मिळवणी होते
बेरजेचे उत्तर माहीत नाही आणि म्हणून फक्त
शेवटचा श्वास कधीच कळत नाही //

विवेक ताटके

गुलमोहर: