एअरपोर्ट वरून सरळ धावत पळत हॉस्पिटल मध्ये पोचली सुजाता पण ICU च्या दाराशी पोचेपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता की ती पाहू शकते की नाही काकूला शेवटचं. बँगलोर वरून फ्लाइट निघालं तेव्हा पासूनच तिच्या डोक्यात एकच होतं माझी काकू, माझ्या आई नंतर जिने मला आईची कमतरता भासू दिली नव्हती, ती पण आईसारखीच मला सोडून जाते आहे. पूर्ण फ्लाईट ती काकूचाच विचार करत होती. तरी बरं अगदी ऐनवेळेला शोधून सुद्धा कधीही न मिळणारं ईंडिगो चं डायरेक्ट फ्लाईटचं तिकीट मिळालं होतं. बाकी सगळं नवर्यावर सोपवून ती अगदी धावतपळत निघाली. तोही जाणून होताच तिचं काकू प्रेम. १.३० तासाचा प्रवास पण खरंतर तिला नको वाटत होता. विमानात बसल्यावर सुद्धा तिला त्या सगळ्या एअरहोस्टेस काही काही विचारतात ते पण काहीच ऐकायची इच्छा नव्हती.
८ वर्षांपुर्वी जेव्हा आई गेली तेव्हा सुजा होती १९ वर्षाची. कॉलेजचं दुसरं वर्ष नुकतच सुरू झालं होतं. ती आणि आई अगदी पक्क्या मैत्रिणी. अगदी जिवाभावाच्या. लहानपणापासूनच अघळपघळ स्वभावामुळे तिला बर्याच मैत्रिणी होत्या पण आई त्यातली सुद्धा अगदी जवळची. तिला सुट्टीच्या दिवसात कधीही कंटाळा आला नाही त्यामुळे. तशीच तिला तिची काकू पण आवडायची खूप. काकू आणि तिची तिच्याहून लहान असलेली चुलतबहीण ऋतुजा ह्या दोघी पण ती आणि तिच्या आईसारख्याच अगदी सख्ख्या मैत्रिणी.
त्यामुळेच की काय त्या चौघीही पण बर्याच जवळ होत्या एकमेकींच्या. त्यातही एकाच गावात असल्यामुळे वारंवार भेटी गाठी. त्यामुळे आई गेल्यावर सुजाला काकू आणि ऋतुजाचा खूप आधार वाटायचा तिला. कधीही काहीही वाटलं तरी चलो काकूकडे असं होतं तिचं. मग हळूहळू शिक्षण पूर्ण झालं, नोकरी निमित्तानी नागपूर सुटलं, पण जेव्हा कधीही नागपुरला पाय लागतील तेव्हाही काकू कडेच दिवसभर मुक्कम ठरलेला असायचा.
अशातच दोन वर्षांपुर्वी समीरशी भेट झाली. ती दोघही एकाच कंपनीत कामाला होते. असं अगदी टिपीकल प्रेम वगैरे नसलं तरी दोघही एकमेकाना आवडायचे. दोघानाही ते माहिती होतं. त्यातच समीरने मग तो जॉब सोडून बँगलोरला एक जॉब जॉइन करायचं ठरवलं. आणि जायच्या आधी सुजाला लग्नासाठी विचारलं. सुजाची ना नव्हतीच पण तिने स्पष्टपणे समीरला सांगितलं माझ्या घरच्यांना मला आधी पूर्ण कल्पना द्यायची आहे, आणि मगच आपण पुढे काही ठरवायचं. आणि सुजानी लगेच नागपुरला धाव घेतली. घरी बाकी कोणाला काही नसलं माहिती तरी काकूला सगळं आधीच माहिती होतं आणि ईनटर्न ऋतुजाला सुद्धा. म्हणून मग काकूनेच सुजाच्या बाबांशी बोलायचं असं ठरवून ती काकूवर सगळं सोपवून निर्धास्त झाली. काकूने पण सगळं व्यवस्थित सांभाळलं. बाबांशी बोलून त्याना पण काहीही हरकत नाहीये हे पाहून मग पुढचे सगळे सोपस्कार यथावकाश पार पडलेत. आणि ८ महिन्यांआधीच त्यांचं लग्नं झालं. काकूनी चांगलीच कंबर कसली होती लग्नासाठी. अगदी तिच्या आईने केलं असतं अगदी सगळं तसंच आणि तितक्याच प्रेमानी.
तिनेही लग्नाआधीच मुंबईतला जॉब सोडला होता, आणि बँगलोर मधेच नवीन जॉब शोधला. सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि काल अचानकच नागपुर हून फोन आला, काकूला अॅडमिट केल्याचा. मॅनेंजायटिसचं नाव ऐकूनच तिचं धाबं दणाणलं. तिच्या आईला पण तर हेच झालं होतं. आणि शेवटपर्यन्त डॉक्टर्सना हेच कळलं नव्हतं की मॅनेंजायटीस झाला आहे. कारण सगळ्या टेस्ट्स खूपच कंफ्यूजींग होत्या. तसंही तिच्या घरी ते नेहमीच विनोद करायचे, कुळकर्ण्यांच्या घरातल्या सुनांचे दुखणे कुठल्या डॉक्टरला कधी कळतील असं होतच नाही. कारण तिची आई काय किंवा काकू काय जेव्हाही कधीही कशासाठीही डॉक्टरकडे जायच्या तेव्हा त्याना डॉक्टर भलतंच काहीतरी सांगायचेत. तिच्या आईचा मॅनेंजायटीस सुद्धा डिटेक्ट होऊन काहीही उपाय होण्याच्या आतच सगळं संपलं होतं. पूर्ण वेळ दवाखान्यात बसून होती ती तेव्हा, आईची डोळे उघडण्याची वाट बघत. पण शेवटी ते तिने नाहीच उघडलेत.
आता काकूसाठी फोन आला तेव्हा सुद्धा जसं बाबांनी सांगितलं की डॉक्टर्सनी आशा सोडली आहे तशी ऐकूनच तिच्या पायातलं त्राण गेलं. धावतपळत सगळं करत एअरपोर्ट्ला पोचून फ्लाईट सुटेपर्यंत हजारदा तिला धावत सुटावं नागपुरला आत्ता असं किती तरी वेळा वाटून गेलं. पण इलाज नव्हता. त्यात समीर पण सोबत नव्हता येऊ शकत. त्याचे आई बाबा आले होते त्यांच्याकडे. आणि सासुबाईंना बरं नाही म्हणूनच ती त्याना आपल्या घरी घेऊन आलेली. त्याना एकटं सोडणं शक्य नव्हतं. चेक ईन करण्याआधी समीर ने तिला जवळ घेऊन सगळं ठीक होइल असा धीर दिला होता पण सत्य परिस्थिती माहिती असल्यामुळे ती अजूनच हळवी झाली होती.
शेवटी एकदाचं फ्लाईट पोचलं आणि तिने बाहेर धाव घेतली. तिला एअरपोर्ट ला घ्यायला बाबा आलेच होते. त्यांच्यासोबत हॉस्पिटल ला पोचेपर्यतं तिचा जीव वरखाली होत होता. जशी तिथे पोचली तशी तिची नजर तिथेच बसलेल्या ऋतुजा कडे गेली आणि तिला ८ वर्षांपुर्वीची सुजा आठवली. आणि अचानक तिला तिचीच लाज वाटली, इतक्या वेळात आपण एकदाही हिचा विचार केलाच नाही. कशी असेल ती काय करत असेल. नागपुरातच सगळा गोतावळा असल्यामुळे बरेचसे नातेवाईक हॉस्पिटल मध्ये येऊन गेल्याचं तिला माहिती होतं. फोनवर बाबाना विचारलं आपण ऋतुजा बद्दल पण तेव्हढंच. आताही ऋतुजा तिच्या मामा-मामींसोबत बसली होती. मामीचं हळूच डोळे टिपणं चालू होतं. काकापण जवळच बसले होते. येणारे जाणारे पण अगदी सहानुभुतीने बघत होते. ऋतुजा मात्र तिथेच मान खाली घालून बसली होती. तिचा चेहरा अगदी रडवेला होता तरीही ती रडली नव्हती हे दिसत होतं. तशी धीराची आहे कार्टी ही असं वाटून गेलं तिला त्या क्षणी सुद्धा. तिचा अगदी अभिमान वाटला. आणि काय झालं कुणास ठाउक, सुजाला वाटलं हिला बाहेर न्यायला हवंय. ह्या क्षणी, तिला ह्या रडणार्या लोकांची नाही थोड्या मोकळ्या हवेची गरज आहे. मला पण तर असंच वाटलं होत, पण सगळ्या नातेवाईकांच्या गर्दीतून पळून जावसं वाटत होतं. सगळे फार फार वाईट आहेत असंही वाटलं होतं पण तेव्हा काहीही इलाज पण नव्हता.
ती जाउन आधी २ मिनिट काकांशी बोलली आणि मग काचेच्या बाहेरुनच काकूकडे बघितलं. शांत झोप लागल्यासारखी वाटत होती काकू. काकूला मनातूनच बाय म्हणत लगेच तिनी ऋतुजा कडे मोर्चा वळवला. तिच्या समोर जाउन खाली गुडघ्यावर बसली ति आणि तिला हळूच विचारलं "चलतेस?". ऋतुजाला त्याही परिस्थितीत बरं वाटल्याचं तिचा चेहरा पटकन बोलला. "हं" असं म्हणत ती उठली. तिने बाबाना सांगितलं " आम्ही जरा जाऊन येतो", तिच्या बाबानी मानेनेच हो म्हणत एक मंद स्मित दिलं. त्यांना अभिमान वाटला त्यांच्या पोरीचा हे स्पष्टपणे दिसत होतं तिला. ऋतुजाचा हात धरून तिला बाहेर हॉस्पिटलच्या गेट वर आणलं तिने. थोड्या दूर एक चहाची टपरी पाहिली आणि तिकडे मोर्चा वळवला. तिला तिथल्याच एका बाकावर बसवून तिने त्या टपरी वाल्याला २ चहा सांगितले. त्याने चहा आणून दिल्यावर तिच्या हातात एक कप देऊन सुजा पण तिच्याशेजारीच बसली. चहा संपवून पैसे देऊन मग ऋतुजाला हळूच विचारलं, "एक वॉक?". तिने मानेनेच हो म्हटलं. दोघीही निघाल्या. १५ मिनिटं असंच चालल्यावर ऋतुजानेच म्हटलं तिला, "चल जाऊयात.". दोघीही हॉस्पिटलला परतल्या. हॉस्पिटलच्या गेट वर पोचल्यावर ऋतुजा ने तिला मिठी मारली आणि १० मिनिटं नुसतीच रडली ती. रडून झाल्यावर, दोघीनी आधी वॉशरुम शोधली. ऋतुजाने चेहरा धुतला. केस थोडे ठिकठाक केलेत आणि मग दोघीही ICU कडे आल्यात. हळूच दाराशी जात दोघींनी पण डोळेभरून आईकडे पाहिलं आणि परत आल्यात. सुजाला तेव्हा काकू थोडी हसल्याचा भास झाला. पण मग लगेच १० मिनिटांनी डॉक्टर ने सांगितलं "Ventilators ठेवून पण काही उपयोग होणार नाही. कुठल्याही औषधांना रिस्पाँड करणं थांबवलं आहे बॉडी ने त्यामुळे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे." काकानी एकदा ऋतुजाकडे बघितलं, तिने मानेनेच होकार दिला आणि त्यानी डॉक्टर्सना तसं सागितलं. काकूच्या इच्छेप्रमाणे तिचे डोळे दान करण्याची फॉर्र्मॅलिटी पुर्ण करून सगळं संपलं. सगळ्या नातेवाइकाना निरोप द्यायच्या कामाला लागलेत बाबा आणि मामा. पूर्ण वेळ ऋतुजा आणि सुजा एकमेकींचा हात धरून बसल्या होत्या काकांच्या शेजारी, काहीही न बोलता. पण दोघींही रडत सुद्धा नव्हत्या. तश्याच शांत बसून असतानाच ऋतुजाने हळूच सुजाला थँक्स म्हटलेलंही कोणी ऐकलं नसेल हे नक्की, पण सुजाला मात्र ऋतुजाला शांत बघूनच बरं वाटत होतं.
छान आहे
छान आहे
हम्म!
हम्म!
खरच माझे डोळे पाणावले. कधी
खरच माझे डोळे पाणावले.
कधी काळी मलाहि अशाच शान्तेचि गरज होती.
पण मला सुजा नाहि भेट्ली आणि मी अजुनहि अशान्तच आहे.
मस्त.
अगदि मनापासुन भावली.
ग्रेट.
ग्रेट.
कथा आवडली .
कथा आवडली .
खरंच छान कथा आहे...अशा
खरंच छान कथा आहे...अशा परिस्थितीत तो चहा आणि वॉक किती महत्वाचा होता हे चांगलंच चितारलंय...आवडली!
आवडली..
आवडली..