कजरारी अखियाँ रह गयी रोती
नथली से टुटा मोती रे.. (पारंपारिक)
"राधिका आप असाईनमेंट कर लिये हो का?" असं त्यांनी घाम पुसत पुसत खुर्चीत टेकता टेकता त्यांच्या नेहमीच्या खास बिहारी शैलीत विचारलं.
लायब्ररीत खिडकीबाहेर शुन्यात पाहत असलेली ती दचकली एकदम. बाहेर तोच तो अंतर्बाह्य पेटुन उठलेला वेडाबागडा लालभडक गुलमोहोर, झाडाखाली पाकळ्यांचे पिवळशेंदरी गालीचे,डांबर वितळेलसा सणसणीत तापलेला उन्हाळा, असह्य कोरडे फक्क वा-याचे झोत, वा-याच्या फुंकरीबरोबर हलणा-या लगडलेल्या गुलमोहोराच्या फांद्या लपलपत्या पण दोलायमान विझेल न विझेलश्या ज्वाळेसारख्या भासणा-या. आत सावलीत बसल्याबसल्यासुद्धा गुलमोहोराकडे पाहणा-याला क्षणभर दीप्तीची ग्लानी यावी ! आतली जुल्माची भयाण शांतता, करकरणारे लांब दांड्यांचे फॅन, वसकन अंगावर येणारे तुसडे ग्रंथपाल. भवती अभ्यासाच्या नावाखाली खिदळत असलेली मुलं मुली, चिठ्ठ्या आदानप्रदान करत असलेली प्रेमी युगुलं, पुस्तकांच्या चळतीवर डोकं ठेवून दुपारच्याला गाढ झोपलेले काही श्रमिक विद्यार्थी, पेनानी कुरुकुरु लिहीणारे काही तुरळक चष्मिष्ट घासू स्कॉलर्स आणि एखाद दुसरे नवीनच टेंपरवारी लागलेले उत्साही प्राध्यापक. सगळ्यांनी रिडींग हॉल जवळपास भरला होता.
"का हुआ? बरं वाटत नाहीये का तुला ? सोये नही हो का ? आणि ती तुझी आगाऊ मैत्रीण तिच्या त्या मित्रासोबत बाहेर भेटली मला. चप्पडगंजू है साला. " श्रीवास्तवजींचा हा खास शब्द.
त्यांच्या वयाकडे आणि ब-यापैकी हुद्द्याकडे पाहून त्यांना फारसं कुणी दटावत नसत, तरी ग्रंथपालांनी एवढा आवाज केल्याबद्दल त्यांच्याकडे पाहून खुनशी चेहरा केलाच होता.
एवढं झालं तरी हू नाही का चु नाही. एरवी या पोरीने आतापावेतो त्यांना नवीन पुस्तकाचा गोषवारा सांगीतला असता आणि त्यांच्या अनुपस्थितीत अजून कोणीतरी कोणाशी सूत जमवल्याचे गॉसीप सांगीतले असते. नावाला हसून असाईनमेंट तिने काही न बोलता त्यांच्या हवाली केली. नोकरी सांभाळुन इतक्या वर्षानंतर पुन्हा वेळ काढून शिकायला येणा-या श्रीवास्तवजींबद्दल राधिकाला माया होती. तिच्या आणि इतर एकदोघांच्या वह्या उतरवून ते कसेतरी सबमिशन पुरे करत. जितक्यांदा येत, त्याहून अधिक वेळा कामानिमीत्ताने तास बुडवावे लागत त्यांना. आता या वयात मला काही डिग्री मिळवायची नाही, मी आपला शिकायला येतो असे ते म्हणत, आणि वर्षानुवर्षे तासाच्या घंटेबरोबर लाळ गळु लागणा-या पावलोवच्या कुत्र्यासारखा विषय आपोआप ओकणा-या प्राध्यापकांना त्यांच्यामुळे पूर्ण सज्ज होऊन यावं लागत असे. दामटायला आणि थातुरमातुर कारणं देऊन गप्प बसवायला ते काही नेहमीचे विद्यार्थी नव्हते ! पोरांच्या वतीने प्राध्यापकांशी ते बोलत, पोरांना मधुन मधुन खायला घालत, क्वचित स्वतःची गाडी वापरायला देत, आपले अनुभव मोकळेपणानी सांगत, सतत उपदेश करत नसत आणि त्यांची टर उडवली तरी रागवत नसत, त्यामुळे पोरंपोरी त्यांच्यावर तशी खुश असत.
काहीतरी पाणी मुरत असल्याचा संशय श्रीवास्तवजींना तसा ब-याच दिवसा पासुन होताच.
हळुहळू विझत चालली आहे ही मुलगी. काहीतरी बिनसलय खास. धारदार प्रश्न विचारणारी अतिशय मेहनती बुद्धिमान मुलगी. प्रशासकीय अधिकारी व्हायचं म्हणते आहे. होणार यात त्यांना कसलीही शंका नव्हती. अशी मुलं लाखात एक. त्यांची संवेदनशीलताही. वयही अडनिडं.
आपल्याला वयाच्या या टप्प्यावर न भेटता आधी भेटली असती तर.. असं त्यांनाही (क्वचितापेक्षा किंचीत जास्त वेळा) कधीतरी वाटल्याशिवाय रहात नसे. आणि भेटली असती तरी आपण तिची बुद्धिमत्ता झेलु शकलो असतो का हा प्रामाणिक प्रश्नही त्यांना पडे.
आपण शिंग मोडुन वासरात शिरलोय याची जाणीव त्यांना पुन्हा एकदा झाली. पोरंपोरी काका म्हणत नव्हते एवढंच. त्यांची स्वतःची मुलगी हिच्यापेक्षा ८-९ वर्षांनीच तर लहान. प्राथमिक शाळेत शिक्षीका असणा-या बायकोला नव-याचं हे शिक्षणाचं नवीन खूळ अजिबात पसंत नव्हतं. करायचय काय या वयात शिकुन? तरूण पोरी पहायला जाता ते सांगा आधी, हाही आरोप वाढत्या भांडणाबरोबर होऊन गेला होता. नेहमीचीच भांडणं आणि नेहमीचेच आरोप, नेहमीचाच शरीरधर्म, वय आणि जाडी वाढलेली चारचौघांसारखी सामान्य बायको, सासुसुनांची खडाजंगी, अश्रुपात, वाढलेलं बी.पी/ साखर, आजारपणं आणि थकबाक्या, चुकवलेले हप्ते, केलेली नोक-या आणि तडजोडी.
संसारात राहुनी काय झालो
पोराबाळांचा फक्त बाप झालो (आरती प्रभू, नक्षत्रांचे देणे)
एकमेकांच्या दृष्टीस शक्यतोवर कमी पडावे या रेषेवर संसार कधी येऊन ठेपला हे समजलंच नव्हतं त्यांना. नवीन लग्न झाल्यावर वर्ष दोन वर्षातच त्यांच्यातील सर्व धग संपून गेली. उरला फक्त संसार. इतक्या वर्षानंतर त्यांना नवीन लग्न झाल्यावरचे गुलाबी दिवसही फारसे आठवत नसत. त्या सगळ्या नवलाईच्या महिन्यादिवसांची मिळून एकच पुसटशी स्मृती त्यांच्या कर्णेंद्रियात होती - काचेच्या बिल्लोराची नाजुक किणकिण. आताशा बायको बांगड्या घालते की नाही हेही त्यांना सांगता आलं नसतं. संसाराचा गाडा ओढताना त्याचा खटारा कधी झाल्याचं कळलंच नाही. सगळं यथासांग चाललं होतं. चारचौघांच्या संसाराची गत तीच त्यांच्या. दु:खी वगैरे नव्हते ते, किंबहूना इतकं काही आसुसुन वाटण्याइतकी संवेदनशीलता त्यांनी जोपासली नव्हती. तरी आपण जगतो त्याला आयुष्य म्हणावे का असं त्यांना कधीतरी वाटुन जाई, तेही तेवढ्यापुरतच. एका नेहमीच्या पराकोटीच्या भांडणाच्या तिरमीरीत, बायकोवर चांगला सूड म्हणून त्यांनी ही प्रौढशिक्षणाची टुम काढली होती. बायकोलाही आदळआपट करायला नवीन कारण अनायसे चालुन आलंच होतं. आणि दिवसाचे अजून काही तास एकमेकांच तोंड पहायला लागणार नव्हतं, हे तसं तिच्याही पथ्यावरच पडलं होतं, पण तिने कबुल केलं नसतं. हे श्रीवास्तवजींनाही चांगलंच ठाउक होतं.
कधी या वयात शिकण्याच्या तळमळीबद्द्ल प्राध्यापक दोन कौतुकाचे शब्द बोलत तेव्हा त्यांना हे सर्व आठवे. पोरं कधी खुशीत येऊन " श्रीवास्तवजी यु आर कुल" म्हणत, आणि कधीतरी त्यांची लेक बालसुलभ प्रेमाने त्यांच्या गळ्यात पडे हीच त्यांच्या आयुष्यातली एकमेव दाद होऊन राहिली होती.
तिनी लिहीलेलं वाचून काढता काढता या मुलीच्या प्रखर बुद्धिमत्तेविषयी त्यांना पुन्हा एकदा विस्मय वाटला. सरळ विचारावे का हिला कुठे प्रेमाबिमात पडलीस का म्हणुन? नाहीतरी अलिकडे तो दामल्या हिच्या जरा जास्तच अवतीभवती दिसायचा. पडली तर बरंच आहे, जरा बाहेरच्या जगाची हवा लागेल या मुलीला. तरीपण तो दामल्या काही त्यांच्या खास मर्जीतला नव्हता.
बाहेर आता सापांनी टाकलेल्या फुत्कारांसारखे वा-याचे गरम झोत वाढले होते.
राधिका एकाच पानावर रेघोट्या ओढत बसली होती. समोर पुस्तक उपडं पडलं होतं. आजारपणातून उठल्यासारखा ओढलेला चेहरा, गालावर दिसतील न दिसतीलश्या पुसटश्या वाळलेल्या मळकट अश्रुंच्या रेषा.
"चलिये राधिकाजी, चाय पीने चलते है, अरे चSSलो भी....."
"श्रीवास्तवजी आज नही प्लीज, पढाई करनी है, एक्झॅम सरपे है "
"जिस तरह से आप पढ रही हो, उससे अच्छा बाहर बैठो अम्माजी. एक घंटेमे एक पन्ना तो आपने पलटा है नही. बात करती है. "
त्या गोडढुस्स साखरेच्या पाकाला शिव्या घालत श्रीवास्तवजींनी दोघांसाठी चहा घेऊन जवळच्या पाय-यांवर बसलेल्या राधिकेला गाठलं. एरवी ती सहजासहजी अशी कोणाही बरोबर चहा वगैरे पिताना दिसली नसती, पण ते ज्येष्ठ असल्याकारणाने तिच्या कॅम्पसवरच्या प्रतिमेला तसा धोका नव्हता (असा तिचा समज होता !).
"कहिये पढाई का क्या हाल है ?"
"...ठिक ही है... "
या नी त्या गप्पा मारत, दामल्याचा विषय सफाईने काढत श्रीवास्तवजींनी अंदाज घेतला. हाती काही लागलं नाही. आता मात्र त्यांना जरा काळजी वाटु लागली. पुन्हा अभ्यासासाठी ते दोघं परतले, इतर मुलं मुलीही आले आणि जोरात अभ्यास चालु झाला. एकदा दणक्यात अभ्यास चालु झाला की श्रीवास्तवजींनाही इतर सगळ्याचा विसर पडे. शिवाय त्यांना बुडालेले विषय भरुन काढायचे असत.
रात्र झाली या गोंधळात. राक्षसाच्या नाकपुडीतल्या नि:श्वासासारखे अजूनही गरम वा-याचे झोत फिसकारत येतच होते. रातीच्या अपु-या उजेडातही गुलमोहोर तसाच भासत होता चेतवलेला, दिस निवल्याचं त्याला तसं घेणंदेणं नव्हत.
प्रत्येकजण आपापल्या घरी जायची वेळ पुढे पुढे ढकलु लागला. घरी पोरांना आईबापांच्या आणि श्रीवास्तवजींना बायकोच्या उलटतपासणीला सामोरं जायचं होतं. गाड्यागाड्यांपाशी गप्पांचे फड जमु लागले. पोरांचे पाय निघेनात.
मुलींना घरी सोडायची वगैरे व्यवस्था मुलांमध्ये मोठ्या हाताने वाटुन देऊन श्रीवास्तवजी निघाले.
ही मुलगी दिसेना तेवढ्यात. तिला सोडतो म्हणुन सांगीतलं होतं ना? दामल्याही नव्हता आज, त्यामुळे तिला घेऊन गेल्याची शक्यताही नव्हती. गेली कुठे ही मुलगी ?
तिच्या नेहमीच्या रस्त्यावर त्यांनी गाडी दामटली, तर ही जवळजवळ धावताना दिसली.
"राधिका, अंदर बैठिये बेटा. ऐकायला आलं नाही का घरी सोडतो सांगीतलं ते. ?"
"देर हो रही थी इसलिये.... " पोरीचा चेहरा ओशाळा ओशाळा झाला. धडपणे सफाईदार खोटं बोलायला अजून शिकायचं होतं हिला.
"का बात है राधिकाजी ? " आपल्या बाजूची खिडकी उघडता उघडता श्रीवास्तवनी विचारलं. आता तिच्या बाजूची खिडकी उघडतील, रिअर व्ह्यु मिरर ठिक करतील. या माणसाच्या हाताचा ओझरता जरी स्पर्श आपल्याला झाला तर पळुन कसं जाता येईल असा विचार राधिकाच्या डोक्यात आला. श्वास रोखुन ती वाट पाहू लागली.
"कुछ हुआ है राधिकाजी, परचे आ रहे है. बहूत उम्मीदे है आपसे. प्रोफेसर मणी भी कह रहे थे कुछ दिन पहले..."
"काय म्हणत होता तो हरामखोर माणुस ?" असं फाडकन तिच्या तोंडुन निघालंच त्याबरोबर श्रीवास्तवांचे प्रवचन थांबले.
"काहे ? तमीझसे बात किजीये, थोडे सनकी जरुर है लेकीन है तो आपसे बडे. प्रोफेसर आदमी है. ये बात ठिक नही है राधिकाजी. आप स्टुडंट लोग को लगत है, दुनिया जीत ली है का आप लोगो ने. अरे अभी देखा ही क्या है आपने, ४ किताबें क्या पढली...." श्रीवास्तव फुटले की हिंदीत फुटत. सात्विक संतापाने ते अजून काही ऐकवणार होते तो शब्दागणिक धुमसणा-या त्या पोरीच्या चेह-याकडे पाहून त्यांनी वाक्य गिळली. मध्यान्हीच्या गुलमोहोराप्रमाणे पिवळाधम्मक सुर्य अंगात वस्तीला आल्यासारखा दिसत होता तिचा चेहरा.
या पोरांनी काय भानगडी करुन ठेवल्यात कोण जाणे हे त्यांच्या मनात येतय तो त्यांना जाणवलं, ही मणींच्या तासाला अलिकडे बसल्याचं आठवत नव्हतं. हिला सरळ विचारुन काही फायदा नाही.
चार पावसाळे जास्त पाहिलेल्या श्रीवास्तवांनी एकदम दामल्याचा विषय काढला. "आज तुझा तो दामल्या दिसला नाही, एवढी परीक्षा जवळ आली आहे, गेलाय कुठे उंडारायला ? " एवढे म्हणताच तिच्या मनातला गढुळ ओहोळ डुचमळ डुचमळ करीत वाहू लागला, गुलमोहोराच्या रंगीत पाकळ्यांना घेऊन.
आपल्या गाडीत तरुण मुलगी हमसून रडताना कोणी पाहिली तर आपलं शिक्षण संपलच. कशाला या पोरांच्या भानगडीत पडलो आपण? मरेनात का!
त्यांना तसं वाटलं नाही असं नाही, पण तिला शांतवायला हात वगैरे लावणे त्यांच्याच्याने झाले नसते. पोटात तुटलं त्यांच्या. त्याबरोबरच त्यांनी आसपास कोणी ओळखीचं दिसत नाहिये हे नीट पाहून खात्री करुन घेतली आणि एकएक पळ मोजू लागले.
हळुहळु बाहीने नाकीडोळी पुसत हमसत शब्द उमटु लागले.
"तुम्ही आला नव्हता मध्ये आठवडाभर. मणी म्हणाले अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडतो. बस मिळेपर्यंत थांबले माझ्यासोबत... एवढ्या डॉक्टरेट माणसानी माझ्यासाठी थांबावं, छान वाटलं पण नजर वेगळीच.... खात्री होईना. काहीतरी भास झाल्यासारखं वाटलं. दुस-या दिवशी तसाच माझ्यासोबत वाट पहात थांबला कुत्रा आणि अंगावर हात..... " (इतकी किळस आली स्वतःची. ओरडायलाही सुचलं नाही. एक बस आली. काय कुठली न पाहता चढले सुन्न होउन. कशीतरी घरी पोचले. रात्रभर अंगावर झुरळं फिरत असल्याचा भास होत होता. अजूनही होतो. एवढी भाषणं देणारी मी पण त्याला चपलेनी बडवायला जमलं नाही. अजूनही तक्रार करायची हिम्मत होत नाही.)
"घरमे किसीसे कहा ? " (साला कमीना XXXX. और अब ये लडकीके पेपरका क्या होगा. इसका गोल्डमेडल तो गया. गनिमत है इज्जत बच गयी. हे भगवान.!! श्रीवास्तवांच्या हृदयाची धडधड वाढू लागली, हातापायाला कंप फुटला. एक किंचीत पाव क्षण अगदी जवळून पण बाजूला सरपटत जाण्या-या सापासारखा, मणीबद्दलचा हेवाही त्यांना जवळजवळ चाटुनसा गेला. त्याची जीभ गुल्लेरानी मारलेल्या खड्यासारखी त्यांना नेमकी लागणार एवढ्यात क्षीणश्या विवेकानी आणि लाजेने त्यांचा ताबा घेतला. मग त्या हेव्याला भिऊन त्यांना आपल्याच अस्तित्वाची धास्ती वाटली.)
"कोणाला सांगणार. ? " (आईवडिल त्यांच्या व्यापात. आणि त्यांना सांगीतलं तरी मला कोर्स सोडायला लावण्याशिवाय ते काही करणार नाही. शिवाय अजून याहून काही जास्त झालं नाही याचचं त्यांना जास्त समाधान वाटेल. खोटं कशाला बोला? अश्रुंच्या उत्पातात, मनाला अगणित धुमारे फुटले असतानाही, हे सुक्ष्म समाधान तिलाही वाटलंच होतं की ! शरीराच्या कुठल्या अवयवाचे रेटकार्ड आपल्याकडे जास्तं असतं हे माहित होतं तरी यावेळेस तिला चांगलंच उमजलं होतं. शी: ! काय हा गलिच्छ विचार. जग जिंकु पाहणारं पोरपण असं विजेच्या झटक्यानी संपायला नको होतं असं तिला गेल्याकाही दिवसात वाटे.)
"कोई है जिसे तुम खुलकर बात कर सको.." (नक्की काय केलं हे विचारायला श्रीवास्तवांची जीभ रेटत नव्हती. झाल्या गोष्टीचा बभ्रा व्हायला नको पण पोरीची घालमेल बघवत नव्हती.)
".....दामले.. त्याला कसंतरी सांगायचा प्रयत्न केला..... तो म्हणाला..... मीच......." ( मीच .....लोकांना आकृष्ट करते म्हणे....नेहमी कमीझवर ओढणी घ्यायला हवी होती, तर हा प्रसंगच आला नसता म्हणाला......प्रेम होतं म्हणे त्याचं माझ्यावर आणि चांदण्या रात्री टेकडीवर नेणार होता चंद्र पहायला. तेव्हा स्वतःचा नक्की काय इरादा होता त्याचा ? शी! ही माझी अक्कलहुशारी. असल्या माणसावर चालले होत्ये प्रेम करायला. पुरुषांची जातच हलकट ! पण...... पण त्याचं म्हणणं बरोबर असेल का? कोणीतरी वळुन पाहीलं की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं पण ते सगळ्यांनाच वाटतं ना ? पण आधी दामल्यानी हात हातात घेतला की छान वाटायच हे खरं, हुळहुळ कापरं भरायच,अजूनही हवहवंस वाटायचं हेही, पण म्हणुन....
आता कोणी वळुन पाहिलं की भडभडून ओकारी होईलसे वाटते. डोक्यापासुन पायापर्यंत बुरखा घालुन गप झाकुन पडावसं वाटतं. ओंगळ...ओंगळ...नजरांची गांडुळं कायेत वळवळत रहातात)
आता हिला काय म्हणावं दिवंगत पोरपणाच्या सांत्वनार्थ? श्रीवास्तवजी लटपटले. (बाई रामायणापासून युगानुयुगे चालत आलेली ही अग्निपरिक्षाच आहे. कितीही बुद्धीमान झालीस तरी आहेस मादी, हे विसरुन कसं चालेल ? आयुष्यात तुला शृंगाराचा अर्थ समजण्याइतपतजरी सहचर लाभला तरी ते सफल होईल. सहचराच्या सान्निध्यात स्पर्शाची जादू दाखवणारी एखादी जरी पहाट लाभली तरी त्या भरवशावर पुढचं सर्व नीरस रामायण ढकलून नेशील. गणितं सोडवताना स्त्रीयांची उत्तर वेगळी येत नाहीत म्हणुन आयुष्य तर्काधिष्ठित असतं असं कोणत्या गाढवानी सांगीतलं तुला ?)
अर्थ चिमणे चिमणे ; शब्द मादी
बोले... मिनीटें मिनीटां विसंवादी (आरती प्रभू, नक्षत्रांचे देणे)
श्रीवास्तवजींकडून एवढंही म्हणवल्या गेलं असतं तर काय हवं होतं !! पण एवढा तरी विचारांचा विस्तृत पट अतिसारासारखा अचानक उद्बवला म्हणुन त्यांच्यातलंही शेवाळं क्षणभर थक्क झालं.
(छ्या. असह्य उन्हाळ्यात डोकं चढतं हेच खरं ! उष्ण कोरड्या फक्क वा-यानी मनातला माध्यान्हीचा गुलमोहर भडकून उठतो.
वन्ही विझेलच आपोआप, स्वतःचेच थोडीच सरपण घालणार आहोत या वयात! मग आहेच मळकट हिरवे नेहमीचेच सगळे !)
प्रत्येकाने एकेक वाक्य
प्रत्येकाने एकेक वाक्य आपल्याला जाम भिडलेलं, खल्लास असं लिहिलंय.. सगळी कथाच तुकड्यातुकड्यात येतीये परत प्रतिसादात..
थोडक्यात काय आख्खी गोष्ट, प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ महान झालेली आहे गं रैने!!
छान
छान
सही..
सही..
काल झपाटल्यागत वाचली!! आज परत
काल झपाटल्यागत वाचली!! आज परत सावकाश वाचली! परत तेच फीलींग... वाचता वाचता ओढलेच जातो कथेत.. श्रीवास्तवांचं पात्र अल्टीमेट लिहिलं आहेस.. चाळीशीतल्या पुरुषांचं अगदी पर्फेक्ट वर्णन- ते आकर्षण, ती तगमग, नक्की काय स्टँड घ्यावा हे कन्फ्यूजन.. बेस्टच रैन..
आज ही कथा मी पुन्हा एकदा
आज ही कथा मी पुन्हा एकदा वाचली कारण काल कळली नव्हती. मायबोलीवरचे एखादे लिखाण मला जेंव्हा कळत नाही तेंव्हा मी ते प्रिन्ट आउट काढून वेळ मिळेल तेंव्हा सावकाश वाचतो. वन्ही देखील आज अशीच सावकाश वाचली दुपारचे जेवण झाल्यानंतर. मला ही कथा कथाच वाटली नाही. राधिका, दामल्या, मणी, श्रीवास्तवजी यापैकी एकही पात्र डोळ्यासमोर उभे राहत नाही. राधिका बुद्धीमान म्हंटली आहे तसे ती मुळीच वाटत नाही, श्रीवास्तवजींची बोलण्याची शैली, त्यांचे खास शब्द कुठेच आढळत नाही. दामले आणि मणी तर ओझरतेच आलेले आहेत. अनेक ठिकाणी वेगळे शब्द आढळतात पण त्या त्या ठिकाणी ते ते शब्द चपखल बसलेले नाहीत. कथेत सुरवातीपासून शेवटपर्यंत येणारा गुलमोहोर आवडला पण कथेशी तो एकरुप वाटला नाही. कथेत नाविन्य असे काहीच नाही. त्यापेक्षा मला रैनाच्या जपानातून लिहिलेल्या कथा, लेख जास्त आवडलेले आहेत. पण ती अजून लिहिते आहे, लिहू पाहत आहे याचे चांगलेच वाटते. so.. keep it up!!!!!!
बरेच दिवस रेंगाळणार ही कथा
बरेच दिवस रेंगाळणार ही कथा मनात. दमले मी पण वाचताना. पुन्हा सावकाश वाचावी लागणार (आणि तेव्हाही दमणार नक्की). जबरदस्त उतरलेय कथा
जबरद्स्त कथानक!! वास्तवच
जबरद्स्त कथानक!! वास्तवच वाटाव इतकं जिवंत . सुपर्ब रैना..
रैना जबरी एकदम !!!!
रैना जबरी एकदम !!!!
रैना! काय डीटेल्स गं...
रैना! काय डीटेल्स गं... अप्रतिम 'रेंडरिंग' म्हणावं लागेल.. चित्र काढल्यासारखी कथा लिहीली आहेस.
रैना.. सुरेख लिहिलय.
रैना..
सुरेख लिहिलय.
आवडली कथा बी तुम्ही नळावर जा
आवडली कथा
बी तुम्ही नळावर जा
अप्रतिम! खास रैना टच!!
अप्रतिम! खास रैना टच!!
गुलमोहर आणि शेवाळाचं रूपक नितांतसुंदर. श्रीवास्तवांचे पात्र ताकदीने उभे केले आहेस. आजूबाजूलाच सहज सापडतात असे अनेक श्रीवास्तव. पण म्हणूनच त्यांना 'लिहून काढणे' तितकेच अवघड.
जबरदस्त, तो उन्हाळा जाणवला
जबरदस्त, तो उन्हाळा जाणवला एकदम,छ्या अस्वस्थपणा आला हो.
खूपच सुंदर लिहिले आहेस,
खूपच सुंदर लिहिले आहेस, रैना..मनाला एकदम भिडलं !
ज ब री !!
ज ब री !!
महान लिहिल आहेस गं !!. थोड
महान लिहिल आहेस गं !!. थोड थोड सुन्न वाटतय.
लिहित रहा , मजा येते वाचायला
रैना, खुप आवडलि. शेवटच
रैना,
खुप आवडलि. शेवटच श्रीवास्तवजींच स्वगत आणि त्यानंतर येणार "श्रीवास्तवजींकडून एवढंही म्हणवल्या गेलं असतं तर काय हवं होतं !!"" हे वाक्य तर एकदम उच्च!
शब्दच संपले.....एखाद्या
शब्दच संपले.....एखाद्या युनिव्हर्सिटीतलं वातावरण वाटावं असं सुरुवातीला वाटलं...मुंबई विद्यापीठातल्या दिवसांची आठवण झाली. शेवट मात्र सुन्न करणारा! फारच छान!
कथा आधी कळली न्हवती मग पुन्हा
कथा आधी कळली न्हवती मग पुन्हा वाचली. खरे तर मला भाषेचा प्रॉबलेम असेल म्हणून पण बरेच अलंकारीक शब्द कळले नाहीत.
वन्ही म्हणजे काय?
वन्ही म्हणजे आग, अग्नी,
वन्ही म्हणजे आग, अग्नी, [छोट्या प्रमाणावरील आग असे मला वाटते, वणवा म्हणजे मोठ्या प्रमाणातील आग]
उन्हाळ्याचं वर्णन झकास !!
उन्हाळ्याचं वर्णन झकास !! अगदी जाणवला !! पुण्याच्या (सध्याच्या) गुलाबी थंडीत आणि ऑफिसातल्या ए. सी. मधे असुनही जाणवला....
जबरदस्त कथा...सुन्न करुन गेली
जबरदस्त कथा...सुन्न करुन गेली कथा!!! ह्या वन्हीची धगधग बाईच्या जन्माला काही केल्या जाणवतेच हेच शल्य
खरच सुन्न करुन गेली कथा.
खरच सुन्न करुन गेली कथा. सुरेख उतरली आहे.
आज परत वाचली. एकदम खास.
आज परत वाचली.
एकदम खास.
छान लिहिलयस रैना ! बर्याच
छान लिहिलयस रैना !
बर्याच दिवसांनी मायबोलीवर सुंदर वाचायला मिळाले.
उत्तम कथा. एकदम प्रमाणबद्ध.
उत्तम कथा. एकदम प्रमाणबद्ध. मनातले विचार कंसात लिहिण्याची शैली आवडली. परिणामकारक आहे.
सहचराच्या सान्निध्यात
सहचराच्या सान्निध्यात स्पर्शाची जादू दाखवणारी एखादी जरी पहाट लाभली तरी त्या भरवशावर पुढचं सर्व नीरस रामायण ढकलून नेशील. गणितं सोडवताना स्त्रीयांची उत्तर वेगळी येत नाहीत म्हणुन आयुष्य तर्काधिष्ठित असतं असं कोणत्या गाढवानी सांगीतलं तुला ?)
>> सोला आने सच.
मस्त लिहिली आहेस गोष्ट.
मस्त लिहलय्..भिडली
मस्त लिहलय्..भिडली कथा..शब्दयोजना अगदी अगदी..सुन्न करुन गेली..
काय वर्णन, काय पार्श्वभुमी
काय वर्णन, काय पार्श्वभुमी निर्माण केलियस! सुंदर, अस्वस्थ करणारं....
वन्हीची झळ भिडली, बाहेरची आणि
वन्हीची झळ भिडली, बाहेरची आणि आतलीही.
अगदी वेगळं ( हटके) वाचायला मिळालं.
पण काहितरी निसटल्यासारखं वाटतय, शब्दात पकडता येत नाहिये मला. माझी प्रतिभा प्रतिक्रिया लिहायलाही तोकडी आहे. फक्त वाचक म्हणून काय वाटलं ते सांगतेय. राधिकेबद्दल बी सारखच वाटलं मला.
Pages