आता तुझी पाळी

Submitted by जागोमोहनप्यारे on 19 January, 2010 - 08:34

'चला, कणकवली. कणकवलीवाले उतरून घ्या. गाडी दहा मिनिटे थांबेल.'
कंडक्टरच्या आवाजाने तंद्रीतून जागा झालो. घड्याळ पाहिलं-दुपारचे दोन. हात वर करुन एक आळस दिला.
अजून चार तासात कोल्हापूर. तिथून सांगली दोन तास. तिथून औदुंबरला जायला असा किती वेळ लागतो? अंग घामाने भिजलेले होते. कपडे तसेच चिंब भिजून अंगाला चिकटलेले. आधीच कोकण्-त्यात मार्च महिना- त्यातच हा लांबवरचा प्रवास्-दोडामार्ग ते कोल्हापूर- अंगभर घामाचे झरे पाझरणार, नाही तर काय होणार?
बरोबर दहाव्या मिनिटाला कंडक्टरने बेल मारली. बाकी एक मात्र खरं, गोवा डेपोच्या बसेस वेळेबाबत अगदी पंक्चुअल! गाडी कोल्हापूरकडे पळू लागली. आणि मन मात्र दीड वर्ष मागं रिवाइंड होऊ लागलं. बी. एड. झालो तो क्षण....

आयुष्यातल्या परमोच्च आनंदापैकी एक. ग्रुप्मधले सगळेच सुटले. अगदी पहिल्याच अटेंप्टमध्ये. हा आनंद काही औरच होता. पण आनंद सेलिब्रेट करायला कुणालाच वेळ नव्हता. दुसर्‍याच दिवशी सकाळी पेपरमध्ये राज्य शिक्षण संचालयाची हातभर लांब जाहीरात. शिक्षण्-सेवक भरती करणे असणेबाबत.
काही जणानी एम एड किंवा एम एस सी साठी पळापळ सुरु केली. येनकेन प्रकारेण कुठेही नंबर लागणे महत्वाचे होतं.
मुंबईला जाऊन पोस्टिंग ऑर्डर आणेपर्यन्त तसा थोडा वेळच झाला. तिथे पोहोचलो तेंव्हा तळकोकण आणि ठाणे जिल्हा एवढ्याच जागा शिल्लक होत्या...
'विचार कसलाय कराताय गुरुजी? तळकोकणात जा. निसर्ग बघा. समुद्र बघा. आंबे खावा.' खिडकीतून पानाची पिंक टाकत क्लार्क म्हणाला. आणि त्यानं स्वतःहून दोडामार्गवर फुली केली.

******************************

प्राथमिक विद्यामंदीर दोडामार्गला जॉइन झालो आणि तिथं रुळायला फारसा वेळ लागला नाही. दररोज सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत शाळा. वर्गात मुलं अगदी कमी. अगदी बोटावर मोजण्याएवढी-एकदम पेरिफेरीच्या काही वाड्यांसाठी असणारी शाळा. आजूबाजूला माणसं कमी आणि झाडं-झुडपंच जास्त.
शाळेचे मुख्याध्यापक कर्णिकसर आणि इतर स्टाफ कोऑपरेटिव. शाळेच्या कामाव्यतीरिक्त अधून्मधून इतर कामंही असायची. जनगणना करा, लहान मुलांची यादी गोळा करा, पल्सपोलिओ... एक ना दोन.. दर महिन्याला काहीतरी नवीन असतंच.
पण असं असलं तरी कोकणची लाल माती, समुद्र, मासे, नारळीच्या बागा यात मात्र मन रमायला तयार नव्हतं.
इथला अनुभव घेणे आणि परत औदुंबरला जाणं, हेच मनात असायचं. इथल्या एकेका रंगाचा अनुभव तिथल्या फ्रेमवर कसा घेता येईल यातच मन गुंतलेले असायचं.

त्यातच दीड वर्ष हां हां म्हणता निघून गेलं. कामाचे ताण एवढे. त्यातच बदली शिक्षक मिळणं महाकठीण असायच. त्यामुळे रजा मिळणं मुष्किल असायचं.
आणि एक दिवस मित्राकडून अचानक बातमी मिळाली. सांगलवाडीच्या एका शाळेत शिक्षकाची एक जागा रिक्त झाल्याबाबत. तिथल्या एका शिक्षकानी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि ती पोस्ट वेकंट झाली...

बातमी कळताच मन थरारून उठलं. कसंही करून तिथं आपला क्लेम लावायचाच.
साहेबाना गाठलं.
त्यानी थोडे आढेवेढे घेतले खरे, पण वरच्या ऑफिसमधून तसा आदेश आणलाच तर बघता येईल असं म्हणाले.
सांगलवाडी-औदूम्बर तसं फारसं अंतर नाही. आपल्याच भागात राहून कदाचित आणखी मनमोकळेपणानं काम करता येईल.....
शेवटी खास या कामासाठी साहेबानी चार दिवसांची रजा मंजूर केली.
रजा मंजूर करताना साहेब गालातल्या गालात का हसले, ते मात्र कळलं नाही....

*****************************************

घरी पोहोचायला रात्र झाली. पोहोचेपर्यंत सर्वांची जेवणं झालेली होती. आई, दादा, उमेशदादा, उमावहिनी सगळेचजण टीव्ही बघत होते. आईनं पटकन ताट वाढायलाच घेतलं. दादा वहिनी' काय कसा आहेस' वगैरे बोलून निघून गेले. त्यानंतर बोलणार तर कुणाशी? बोलण्यासारखं खूप होतं.
पण ऐकायला सवड कुणाला होती? स्टती रुममध्ये गेलो. टेबलवरचं शो पीस, भिंतीवरचं दिल्वाले दुल्हनियामधलं काजोलचं पोस्टर कधीकाळी लावलेलं... पण कशाचाच पत्ता नव्हता...
खूप दिवसानी घरी आलो. भरतीची एक प्रचंड लाट अंगावर येणार असं वाटलं होतं. प्रत्यक्षात विस्मृतीच्या ओहोटीत एकेक वस्तू- एकेक आठवण खेचली जात होती. बदलीची ऑर्डरसुद्धा त्यातच कुठेतरी वाहून गेली.
ओकाबोका किनारा-
आणि जुन्या पाऊलखुणा शोधू पहाणारा एकटाच मी.....
बदलीचं सांगून सगळ्याना एक सरप्राईज देणार होतो. पण बोलायचं धाडसच झालं नाही. दुसर्‍या दिवशी गावात एक चक्कर मारली. वाटेत पोंक्षेकाका भेटले, माफक हसले, माफकच बोलले.
बस्स!
दीड वर्षापूर्वीचे जे गाव मी सोडले होते ते हे नव्हते.
मी फक्त एक स्वल्पविराम दिला होता, पण माझ्या माघारी काळाच्या ओघात त्याचा पूर्णविराम बनलेला होता..
पुन्हा त्याला फोडून काढणं- महाकठीणच!

******************************************

चार दिवसांची रजा घेऊन गेलो होतो. पण दुसर्‍याच दिवशी परतलो. स्टाफला थोडं आश्चर्य वाटलं.
पण कामाचा सपाटा सुरु झाला आणि सगळं रुटीन नॉर्मलला आलं. दोन दिवसानी कर्णिक्सरानी मंथली मिटिंग बोलावली. पुढच्या महिन्यात परिक्षा सुरु होणार. त्यानंतर लगेचच चौथीच्या मुलांसाठी जादा तास सुरु करायचे होते.
मिटिंग संपली. सगळेजण निघून गेले. सोहनी मात्र साहेबांच्या मागेमागे रेंगाळत होता. असेल काहीतरी त्याचं काम- मी रुमवर जायला निघालो.
तेवढ्यात कुणीतरी पाठीवर हात ठेवला, म्हणून मागं पाहिलं.
मागं सोहनी उभा होता. हातात कागद झेंड्यासारखा फडकावत. मला हाताला धरूनच कँटीनकडे घेऊन गेला.
'एक गुड न्यूज देतोय.' सोहनी सांगत होता.
'साहेबानी चार दिवसांची रजा मंजूर केली आहे!'
'कशासाठी?' म्हणून मी विचारायच्या आत तोच उत्साहाने बोलू लागला.
'तुला माहीतच आहे यार, इथं आपला जीव रमत नाही. इथं येऊन दोन वर्षे झाली. पण सोलापूरजवळच कुठेतरी परत जावंसं नेहमी वाटतं.'
अजून विषय माझ्या ध्यानात येत नव्हता..
'आणि कालच मित्राचा सोलापूरवरून फोन आला...' तो पुढे सांगत होता. 'सोलापूरला गुंडेवाडीतल्या शाळेत शिक्षकाची एक पोस्ट वेकंट आहे....'
त्याच्या आनंदाचं (!) रहस्य माझ्या डोक्यात शिरलं आणि डोकं एकदम गच्च झालं. सोडावॉटरच्या बाटलीसारखा सोहनी फसफसत होता.
पुढं काय काय बोलत होता. माझं लक्षच नव्हतं. त्याच्या उत्साहाला मी बूच घालणं हे योग्य नाही एवढंच त्याक्षणी मला जाणवलं. मी भानावर येत असताना सोहनी मला विचारत होता..

' ए, पण रजा मंजूर करताना साहेब जरा गालातल्या गालात हसले, ते रे कशासाठी?'

**********************************************
उत्तमकथा , मे २००३, कथास्पर्धा प्रथम क्रमांक....
**********************************************

गुलमोहर: 

जिंदगी एक सफर है सुहाना....
कल क्या हुवा...कल क्या होगा ... किसने जाना..?
बस इसिका नाम है झिंदगी..!!

भरतीची एक प्रचंड लाट अंगावर येणार असं वाटलं होतं. प्रत्यक्षात विस्मृतीच्या ओहोटीत एकेक वस्तू- एकेक आठवण खेचली जात होती. >>>> भारी वाक्य...आवडली कथा. पु ले शु .

आवडली कथा.. वाचताना हसुही येत होतं आणि वाईटही वाटत होतं.. जिथे जायची आपल्याला ओढ आहे तिथे आपण मात्र विस्मृतीत गेलेलो असतो याचा अनुभव वारंवार येतो सगळीकडे.. जिंदगी एक बहती धारा है, कोई रुकता नही किसी के लिये.... Sad

उत्तमकथा , मे २००३, कथास्पर्धा प्रथम क्रमांक....
अभिनंदन...

भरतीची एक प्रचंड लाट अंगावर येणार असं वाटलं होतं. प्रत्यक्षात विस्मृतीच्या ओहोटीत एकेक वस्तू- एकेक आठवण खेचली जात होती. >>>> छानच.. आवडली कथा..

जिथे जायची आपल्याला ओढ आहे तिथे आपण मात्र विस्मृतीत गेलेलो असतो याचा अनुभव वारंवार येतो सगळीकडे.. जिंदगी एक बहती धारा है, कोई रुकता नही किसी के लिये..>> अगदी अगदी साधना

छान

मस्त कथा आहे जामोप्या... Happy
निसटलेले क्षण छान टिपलेत... आपणही त्यातून जातो मग दुसर्‍याला जाताना पाहतो, अप्रतिम वर्णन... Happy

कथा छान आहे. मला पण असाच अनुभव आलेला आहे.आपल्याच गावात आपण परके होतो आणि हे सहन करता येत नाही.तसंच जे हवं ते न मिळणं आणि जे नको ते न मागता मिळणं हा नियतीचाच एक भाग असावा. मग याद येते ती गुरुदत्तच्या प्यासाची.

Pages