हिरवेकच्च टपोरे झाडदेखील भेसूर राखाडी दाखवणार्या संध्याकाळच्या अंधार्या प्रकाशात तो त्या विस्तीर्ण माळावर थकून खाली बसला. दूर नजर पोहोचेल तिथवर खुरटी काटेरी झुडुपे आणि सगळीकडून थुलथुलीत सुटलेल्या भोंगळ बाईप्रमाणे दिसणारे मातीचे उंचवटे पसरले होते. थोड्याच वेळापूर्वी डोक्यावर ऊन बडवत असताना लागलेली जबर तहान खोल गाढ विहिरीत आवाज विरुन जावा त्याप्रमाणे लुप्त झाली होती. भुकेने तर कधीचीच साथ सोडून दिलेली होती. रोजच्या रोज पोटभर अन्न मिळालेल्या आतड्यातल्या पेशींनी पहिले काही दिवस थयथयाट केला व त्या थयथयटालादेखील बधत नाही म्हटल्यावर पोटातील अवयवांनाच भक्ष बनवून काही दिवस काढले. आपण स्वतःलाच खातो आहोत आणि त्रागा करुन उरली-सुरली शक्तिदेखील गमावत आहोत हे लक्षात आल्यावर मात्र त्या थांबल्या.
तो बसला होता तिथेच समोरुन एक मुंगळा एका मागोमाग एक सतत फेर्या मारत काही अंतरावर पडलेल्या एका वाळक्या शेणाच्या ढेकळातून एक एक तुकडा तोडून, तो तोंडात धरुन थोड्या अंतरावर एका छोट्याश्या उंचवट्याला पकडून केलेल्या त्याच्या निवार्याच्या जागी आणून टाकत होता. आयुष्यभराच्या निरिक्षणाच्या सवयीनेच त्याची नजर इकडून तिकडे करणार्या त्या मुंगळ्याच्या मागोमाग थोडावेळ फिरली व थकून स्थिर झाली. त्या एकाकी मुंगळ्याची धडपड, कुणीतरी खाउन-पचवून मागे टाकलेल्या विष्ठेचा पुढे जात राहणारा तो प्रवास त्याला त्या क्षणीदेखील अतिशय विस्मयकारी वाटला. पण आता त्या प्रवासाच्या आदी-अंताची आणि त्यामागच्या कारणांची अज्ञात पोकळी त्याला बेचैन करुन गेली नाही. कारणे न मिळाल्याचा विषाद मात्र छाती भरून राहिला.
जो प्रदेश तो मागे टाकून आला होता त्यात दररोज लालभडक मद्याचे पाट मद्यागारातून वाहत आणि लवचिक नाजूक कमरा लयीत झुलवत स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या ललना मद्यपींच्या फेसाळ नजरांना उत्तेजन देत त्यांचे पेले सतत भरलेले ठेवत. फक्कन हसल्यावर दिसणार्या बोळक्या म्हातारीच्या दोनच भेसूर दातांप्रमाणे, द्युतागारातून कवड्या खुळखुळत होत्या आणि हजारो चकाकत्या सोन्याच्या मोहरा ह्या हातातून त्या हातात सहज फिरत होत्या. ही सगळी द्युतागारे आणि मद्यालये लोकांच्या गर्दीने उतू जात होती आणि त्या प्रदेशाचा राजाच त्या द्युतागारातून सर्वात मोठे डाव खेळत होता.
हवेत उंच धगधगीत आगीचा गोळा उडवण्यासाठी लागणारी गलोल, बाणाच्या टोकाला लावायचा महाविषारी आणि अंगाचा दाह करुन असह्य वेदना देत मारणारा लेप, केळ्याचे साल सोलावे तसे मनुष्याला जिवंत ठेवून त्याची कातडी सोलणार्या किड्यांनी भरलेले गोळे आणि ते शत्रुसैन्यावर फेकण्यासाठी लागणारी यंत्रे - अश्या लढाईत वापरण्यासाठी लागणार्या नवनवीन संहारक शस्त्रांची निर्मीती करण्याकरीता त्या प्रदेशाच्या राजाने त्याला आपल्या पदरी ठेवले होते. आजूबाजूच्या प्रदेशांवर हल्ले करुन तिथली संपत्ती लुटून आपल्या खजिन्यात भर घालणे, जित प्रदेशातील स्त्रीयांना आपल्या व आपल्या प्रजाजनांच्या भोगदासी बनवणे व पराभूत राजांचा वध करणे हे ह्या राजाचे नियमित कार्य होते. संहारक शस्त्रांच्या विद्येत पारंगत अश्या ह्याला राजाने लगोलग आपल्या पदरी ठेवून उंची वस्त्रे, उत्तमोत्तम दास्या, सुग्रास अन्न, उंची मद्याची रेलचेल व आरस्पानी दगडांनी सजवलेला महाल बहाल केला होता.
दुसर्या प्रदेशांवरच्या चढाया जेव्हा बंद असतील तेव्हा राजा मद्यालये-द्युतागरातून मदिरा, स्त्री आणि द्यूताचा एकत्रित आनंद घेत निधड्या छातीने एकापेक्षा एक मोठे डाव खेळत होता. युद्ध करणे, द्यूत खेळणे आणि स्त्रीदेहाचा उपभोग घेणे ह्याकरीताच आपला जन्म झालेला आहे ह्याबद्दल राजाला तीळमात्रही शंका नव्हती. पण ह्याला मात्र वाळवंटात चूळ भरल्यावर ज्या उत्साहाने पाणी पुढे सरकते तेव्हडादेखील उत्साह त्या नशेत नव्हता. राजाला ज्यांच्याशी संवाद साधता येत असे अश्या मोजक्या लोकांपैकी एक म्हणून तो राजाबरोबर ह्या रोजच्या फेरीत सहभागी होत असे. शेकडो पुरुष उंचावरुन कोसळणार्या रौद्रप्रपाताच्या उत्साहाने उपभोग घेणार्या राजाने मग अश्याच एकेरात्री त्याला एक कथा सांगितली.
बारा वर्षे गुरुगृही राहून व कठोरातील कठोर दिनचर्या अंगीकारून तीन राजपूत्र धर्म-न्याय-गणित-शास्त्र-भाषांमध्ये पारंगत झाले. तिन्ही राजपुत्रांना त्या गुरुने दिलेल्या व तिघांनीही आत्मसात केलेल्या ज्ञानात तीळाच्या दाण्याचे शंभर भाग केल्यास होणार्या एका भागाइतकादेखील फरक नव्हता. देण्यायोग्य असे सर्वकाही देउन झाल्यावर त्या गुरुने त्यांना जाण्यापूर्वी दूरवर असणार्या एका घनदाट रानाबद्दलची माहिती दिली.
हिंस्त्र पशू व विषारी सर्पांनी भरगच्च अश्या त्या रानात भरदुपारीदेखील मशाल घेउन जायला लागेल इतका अंधार अनेक ठिकाणी दाटून राहिला होता. युगानुयुगे कोणीही पार न केलेल्या त्या रानाच्या मध्यभागी एक प्राचीन मंदिर होते. आजवर कुणाचीही नजर न पडलेली मुठीएव्हडी मोठाली हिरे-माणके आणि वाहून न्यायला शेकडो गाढवेदेखील अपुरी पडतील इतके सोनेनाणे भरुन ठेवलेले रांजण त्या मंदिरात होते. केवळ दैवाचे फासे उलट पडल्याने, साक्षात देवांचा राजादेखील जिच्यासाठी झुरत असे व जिच्यापायी कित्येक राजांनी आपापसात लढाया करुन राखरांगोळी करुन घेतली अश्या राजकन्येवर सुटका होइपर्यंत दगडी शिल्प होउन त्या मंदिरात मध्यभागी राहण्याचे नशिबी आले होते. जो कोणी शूरवीर जंगलातील श्वापदे-चकवे-विखारी साप आणि त्या मंदिराचे अहोरात्र रक्षण करणार्या अजिंक्य दैत्यांचा नाश करुन मंदिरापर्यंत पोहोचेल त्याला ते सर्व वैभव मिळेलच पण शतकानुशतके दगडात गोठलेली ती स्वर्गीय सुंदरी पण जिवंत होउन त्याचीच होईल.
त्या रानाबद्दलची व मंदिराबद्दलची ही माहिती देउन गुरुने आता त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य व्यतीत करण्यासाठी मुक्त केले. तिन्ही राजपुत्रांच्या राज्यामध्ये लक्ष्मी ओसंडून वाहात होती आणि एकाहून एक सुंदर स्त्रीया तिघांसाठीही उपलब्ध होत्या. पण मनुष्याच्या स्वाभाविक स्वभावाप्रमाणे तिघेही त्या रानाच्या दिशेने संपत्ती व स्वर्गीय सौंदर्याच्या केवळ ऐकीव माहितीवर निघाले. मात्र रानाच्या सीमेशी पोहोचताच त्या उद्देशाच्या पुर्तीसाठी मोजावी लागणारी किंमत बघून एकाने परत फिरण्याचा निर्णय घेतला. उरलेले दोघे रानात घुसले. जात्याच असलेली निडरता व गुरुगृही संपादन केलेल्या ज्ञानाच्या सहाय्याने दोघांनी सर्व अडथळ्यांवर मात करत जवळपास रानाच्या मध्यभागापर्यंत आगेकूच केली. आता मध्याच्या जवळ आलो आहोत आणि मंदिर आता फारसे दूर नाही अशी जाणीव झालेली असताना एके ठिकाणी मात्र त्यांना एक तिठा लागला. फुटणारे दोन्ही रस्ते सारखेच अज्ञात होते. एकाने डावीकडून व दुसर्याने उजवीकडून पुढे चालू लागावे असा निर्णय घेउन दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले, शुभेच्छा दिल्या व आपापल्या रस्त्याने आगेकूच केली. तितकीच शूरता व कौशल्य अंगी असलेल्या त्या दोघा राजपुत्रांपैकी उजव्या बाजूने गेलेला राजपूत्राच्या वाटेत अधिक अक्राळविक्राळ दैत्य आले व त्यांचा सामना करता करता तो मृत्यमुखी पडला. पण डाव्या बाजूने गेलेला राजपूत्र त्या मंदिरापर्यंत पोहोचून, तिथली दौलत लुटून आणि त्या राजकन्येला आपली राणी बनवून आज इथे तुझ्यासमोर बसून ही गोष्ट सांगतो आहे.
गोष्ट संपल्यावर गडगडाटी हसत राजाने कवड्या खुळखुळवत पुढचा डाव टाकला.
राजाच्या त्या गोष्टीची प्रवृत्ती त्याला समजली होती पण उमजली नव्हती हे त्यालाही माहिती होते आणि राजालादेखील माहिती होते. अश्या अनेक राजांच्या पदरी त्याने काम केले होते. त्या सर्वांमध्ये असलेली सत्तेची भूक त्याला कधीच लागली नाही. त्या सर्व राजांपेक्षा जास्त संहार करण्याची क्षमता अंगी बाळगणार्या त्याने स्वतः फुटकी कवडी मिळवण्याचा मोहदेखील कधी बाळगला नव्हता. पण त्या मोहाची मोहिनी आणि मोहिनीच्या व्युत्पत्तीचा शोधाच्या मोहात तो कित्येक प्रदेश पालथे घालत इथे पोहोचला होता. अर्थात राजाला स्वतःच्या मोहाची निश्चिती होती. ह्याला मात्र निश्चितीच काय पण त्या मोहाच्या खर्याखुर्या अस्तित्वाचीदेखील निश्चिती नव्हती. मध्यभागी मंदिर असलेल्या रानाबद्दल ऐकून तिकडे धाव घेण्यापेक्षा तिकडे धाव घेणार्यांकडे धाव घेण्याची त्याची ओढ जास्त प्रबळ होती. त्याचबरोबर तिठ्यावर पोहोचल्यावर कुठला मार्ग निवडावा हा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता त्याच्या आयुष्यात जवळपास नव्हतीच. कुठल्याही तिठ्यावर त्याच्याकडून एकच मार्ग निवडला गेला होता. रस्त्याची निवड करण्यात मात्र राजाचा सहभाग किती होता हा प्रश्न त्याला नेहेमीच हुलकावणी देत राहिला. रस्ता राजाने निवडला की त्याच्याकडून केवळ निवडून घेतला गेला ह्याचे उत्तर सापडणे त्याला नेहेमीच शक्यतेच्या बाहेरचे वाटले. असाच एकदा रस्ता निवडण्याचा महत्त्वाचा प्रसंग एकदा त्याच्या आयुष्यात आला होता.
ह्या एका राज्यातून दुसर्या राज्यात आणि एका राजाकडून दुसरया राजाकडे प्रवासास सुरुवात करण्यापुर्वी तो अनेक वर्षे आपल्या गुरुच्या घरी राहून विद्यार्जन करीत होता. त्याच काळात त्याने संहारक शस्त्रांच्या निर्मितीकरता लागणार्या सर्वात उपयुक्त अश्या गणिताचा गाढा अभ्यास केला. पण त्याचबरोबरीने त्याने धर्मशास्त्र, नितीशास्त्र आणि तर्कशास्त्र ह्या तीन विषयांचा विशेष सखोल अभ्यासदेखील केला. तर्कशास्त्र व नितीशास्त्राच्या बाबतीत त्याच्या व गुरुंमधील घडणार्या वादातून त्याचे ज्ञान जितके विस्तृत झाले तितकेच त्याचे विचार अधिक धूसर झाले. जितक्या अधिक प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली त्याहून अधिक प्रश्नांची निर्मिती त्यातून झाली. आज विस्तीर्ण माळावर थकून पडल्यावर मागे वळून पाहताना त्याला गुरुकन्या प्रकर्षाने आठवली. अतिशय लाघवी स्वभावाची व शीतल सौंदर्य लाभलेली अशी गुरुंची कन्या त्याची सहाध्यायी देखील होती. अनेकदा तर्कशास्त्राच्या सहाय्याने नितीशास्त्रातील एखाद्या कूट प्रश्नाची उकल करताना ती व तो विरुद्ध मार्गावरुन धावत असत. अर्थात नितीशास्त्र हे त्याच्यासाठी केवळ एक खेळणे होते. नैतिकतेचे अस्तित्व त्याच्या तर्कात कधीच बसले नाही. गृहीतकाचा धागा पकडून मग पुढे जाणार्या तिला अनेक प्रश्नांची उत्तरे ठामपणे सापडत. पण गृहीतकांनाच स्थान न देणार्या त्याच्या पद्धतीत उत्तरांऐवजी प्रश्नांचेच भेंडोळे गुंतवळ होउन बाहेर पडत. केवळ प्रखर बुद्धीमत्ता व तर्काचा आधार ह्या दोनच गोष्टी त्या दोघांना वादाचे वितंडवाद होण्यापासून बचावित होत्या. एकमेकांच्या सानिध्यात आलेल्या त्या दोघांमध्ये प्रकृतीच्या स्वाभाविकपणे सहाध्यायापेक्षाही अधिक उत्कट असे नाते बनले.
अर्थात ज्या पद्धतीने ते दोघे ते नाते जगत होते त्यात मात्र अगदी टोकाचे अंतर होते. त्यांच्या एकत्र असण्याचे, कृतींचे तो निरिक्षकाच्या भावनेतून विच्छेदन करत होता तर ती मात्र त्या एकत्र अस्तित्वाचा उपभोग घेत होती. निरिक्षणासाठीदेखील नात्याचे बंध खरेखुरे असणे गरजेचे होते हे त्याला माहिती होते आणि तो ते खरेपण खरेच जगत होता. पण जिथे शारीरसुखाच्या परमोच्च क्षणीदेखील त्याचा एक भाग परिघाच्या बाहेरुन त्या क्षणाचे विच्छेदन करत असे तिथे हे दुहेरी जगणे तिच्यासारख्या विदुषीपासून लपून राहु शकले नाही. प्रत्येक क्षण संपूर्णपणे उपभोग घेत जगल्यासच प्रत्येक क्षणाचा अर्थ आपल्या हातास लागेल, पण त्यासाठी आधी जगण्याचे काम करावे लागेल हे तिचे मत ठाम होते. आणि मग जर जगण्यामागे काही अर्थच नसेल असे हाती लागले तरी जगण्याचे संपूर्ण सूख तर नक्कीच लाभलेले असेल. त्याच्यासाठी मात्र जोपर्यंत उकल होत नाही तोपर्यंत वेळ घालवण्यात काही अर्थ नव्हता. निरिक्षकाचा मुखवटा फेकून देणे त्याला जमले नाही. जीवन व्यतीत करण्यास तिच्यापेक्षा अधिक योग्य सहचारिणी मिळणे अशक्य आहे हे माहिती असून देखील तो तिला तिथेच सोडून प्रवासास निघाला. शब्दातच मांडता न आलेल्या प्रश्नांच्या मृगजळाच्या मागे धावण्याचा निर्णय त्याने घेतला पण ह्यापेक्षा वेगळा निर्णय आपल्याला घेताच आला नसता हे त्याला आतून माहिती होते. रस्ता त्याने निवडला पण त्या निवडीचे त्याला संपूर्ण स्वातंत्र्य होते की नव्हते हे अनुत्तरीतच राहिले.
गुरुकडे विद्यार्जनास येण्यापुर्वीचा काळ मात्र त्याला अंधूकसाच आठवत होता. त्याचे लहानपण सगळे एका घनदाट रानाच्या बाहेर वसलेल्या शिकार्यांच्या वस्तीत गेले होते. लहान असताना तो इतर सगळ्या मुलांप्रमाणे दिवसभर पक्षांच्या मागे हिंडत, झांडांच्या फांद्यांवर झोके घेत, नदीच्या पात्रात डुंबत घालवत होता. आपल्यात आणि बाकी मुलांच्यात काही फरक असेल असे त्याच्या मनास कधी चाटूनदेखील गेले नाही. बालपणातली एक घटना मात्र त्याच्या मनःपटलावर कोरीव उमटली गेली. एकेदिवशी संध्याकाळी इतर मुलांबरोबर खेळत असताना शिकारीहून मोठी माणसे परतली. त्यादिवशी एक भलंमोठं रानडुक्कर त्यांच्या हाती लागले होते. चारी पाय झाडाच्या तोडलेल्या एका जाडजूड फांदीला बांधून त्या प्रचंड मोठ्या प्राण्याला उलटे लटकवले होते आणि दोन जण पुढे आणि दोन जण मागे असे ती फांदी खांद्यावर पेलीत वस्तीत आले. शरीरात बाण घुसून घायाळ झालेला तो प्राणी अद्याप जिवंत होता. त्या डुकराला मग सर्व झोपड्यांच्या मधोमध एका उंच काठीला लटकवून सोलला व मांसाचे सर्व घरात वाटप झाले. इतर लहान मुलांनी त्या डुकराला सोलताना बघून घरात धाव घेतली व आपापल्या आयांच्या पोटात डोके खुपसले. रात्री त्याच मुलांनी ते चविष्ट कालवण अत्यंत आनंदाने खाल्ले. ह्याने त्या डुकराला सोलायची सर्व प्रक्रिया काळजीपूर्वक पाहिली व रात्रीच्या जेवणात डुकराचे कालवण सोडून सर्वकाही खाल्ले. दुसर्या जीवाला संपवून आपल्या जीवाची पुष्टता हा इतरांना जन्मदत्त समजलेला संदेश त्याला उमजला पण मधमाश्यांचे पोळे विस्कटल्यावर फोफावणार्या माश्यांप्रमाणे विस्कटलेल्या प्रश्नांची साथ मात्र घेउन बसला.
दोन्ही हात लांब पसरुन जमिनीवर पाठ टेकून पडलेल्या त्याच्या डोळ्यासमोर आकाशातील अगणित तारका धूसर होत गेल्या. शेणाच्या ढेकळाचे पूर्ण विघटन करुन व छोट्या छोट्या तुकड्यांचा गठ्ठा आपल्या निवासाच्या जागी रचून त्यात मधोमध तो मुंगळा झोपी गेला. मुंगळ्याच्या प्रवासाचा प्रश्न अद्यापी अनुत्तरीतच राहिला होता.
खुपच सुंदर ! आयुष्यात कितीतरी
खुपच सुंदर !
आयुष्यात कितीतरी प्रवास असेच अनुत्तरीत , दिशाहीन राहतात .
आवडलं.
आवडलं.
आवडलं!!
आवडलं!!
आवडली कथा..
आवडली कथा..
टण्या, जी. ऐंच्या शैलीचा
टण्या, जी. ऐंच्या शैलीचा प्रभाव वाटतो आहे कथेवर.. खासकरुन त्यांच्या 'स्वामी' या कथेचा.
आधी वारी पूर्ण कर लेका
आधी वारी पूर्ण कर लेका !
गोष्टीची संकल्पना आवडली, राजा , 'हा' डूड, अन ह्याची मैत्रीण तिघांचं वेगळेपण पण तरी समान शोध किंवा एकाच शोधाचे तीने वेगळे मार्ग ( तिठा?) हे इंटरेस्टिंग आहे.
पण एकदंरीत गोष्ट ही 'ट्रिब्युट टु जी ए' धर्तीची वाटतेय. यात टण्याची शैली कुठेय ? दोन वर्षापूर्वीच्या दिवाळी अंकातली रुपांतरीत कथा जास्त अस्सल जमली होती. ( क्लॅरिनेट वाली ).
जीए वगळून अन 'gore' वगळून परत एकदा लिहून काढ बरं!
तो पर्यंत 'वा वा' राखून ठेवणार मी
गोष्ट टण्याचीच आहे पण मसाला
गोष्ट टण्याचीच आहे पण मसाला जीएंचा वापरलेला आहे. त्यामुळं तशी चव येतेय.
मला विदुषक आठवला.
असो. वाचायला छानच वाटलं.
समजायला थोडं विस्कळीत वाटलं
समजायला थोडं विस्कळीत वाटलं .. पण आवडलं ..
(मी जी. एंचं साहित्य अजिबात वाचलेलं नाहिये .. दहावीच्या मराठीच्या पुस्तकात एक 'भेट' नावाचा धडा होता (तो बहुतेक जी. ए. चाच होता) तेव्हढंच त्यांचं वाचन ..)
आवडली, पण पहिल्या परिच्छेदातच
आवडली, पण पहिल्या परिच्छेदातच जीएंची छाप वाटली.
पूर्ण वाचल्यावर प्रतिक्रीया
पूर्ण वाचल्यावर प्रतिक्रीया देईन.
>>आधी वारी पूर्ण कर लेका !
अनुमोदन !
आवडली!!
आवडली!!
एकाकी मुंगळ्याची
एकाकी मुंगळ्याची धडपड,,,,,,,,,,,
सुंदर सपुर्ण छानय
पुन्ह पुन्ह वाचावे असे
टण्या missing वाटला रे.
टण्या missing वाटला रे.
काहितरि राहिलय असे वाटतयं !
काहितरि राहिलय असे वाटतयं !