तोरणा (निवी) ते रायगड

Submitted by आनंदयात्री on 1 January, 2010 - 03:53

साधारण ६-७ वर्षांपूर्वी मी जेव्हा दुर्गभ्रमंती बऱ्यापैकी आवडीने करायला सुरूवात केली, तेव्हापासून तोरणा ते रायगड व्हाया बोराट्याची नाळ हा ट्रेक हे एक स्वप्न होतं. बहुतांश वेळी सलग सुट्टी नसणे आणि ह्या heavy ट्रेक साठी अट्टल भटके दोस्त नसणे ह्या दोन कारणांमुळेच हा ट्रेक लांबत गेला. यावेळी मात्र साऱ्या गोष्टी जमून आल्या आणि मी, मयूर, श्रीकांत, ओंकार आणि आशिष उर्फ लॉली असे पाच जण २४ डिसेंबरला तोरणा ते रायगड या जुन्या स्वप्नाचा वेध घ्यायला निघालो. नेट वर थोडीफार माहिती मिळाली. GS नेही वाटांबद्दल थोडी माहिती दिली. पण मुळात हा ट्रेक केलेल्यांची संख्य़ा कमी आणि त्यातून नेट किंवा ब्लॉगवर त्याबद्दल लिहिलेल्यांची संख्या कमी. त्यामुळे, ट्रेकमध्येच बऱ्याच गोष्टी उदा, वाटा, अंतरे इ. समजल्या आणि finally we did it!! Happy

This trek is not a joke!! ही भटकंती महाराष्ट्रातल्या अत्यंत दुर्गम तालुक्यांपैकी एक असणाऱ्या वेल्हा तालुक्यातील आहे आणि मग खडा सह्याद्री उतरून थेट कोकणात शिरायचे आहे. खड्या चढाचे डोंगर, विरळ मनुष्यवस्ती, पायवाटांचा सुळसुळाट - त्यामुळे हमखास वाट चुकण्य़ाची शक्यता, आजुबाजुला (बऱ्यापैकी श्वापदविरहित) जंगल, भरपूर शांतता ह्या गोष्टी म्हणजे कलंदर भटक्यांसाठी पर्वणीच!
********

तोरणा ते रायगड : Day - 1 (२४ डिसेंबर)
आम्ही हा ट्रेक तोरण्याच्या पुढे जिथपर्यंत ST पोहोचते त्या शेवटच्या गावापासून सुरू करणार होतो. कारण तोरण्यापासून सुरूवात केल्यास त्यासाठी छान ५-६ दिवस लागले असते - तेवढे आमच्याकडे नव्हते.

या ट्रेकसाठी घिसर किंवा हारपूड या गावांपर्यंत जाणाऱ्या एसटी बसेस सोयीच्या आहेत. घिसर गावासाठी सकाळी साडेसहा वाजता आणि हारपूडसाठी दुपारी साडेतीन वाजता स्वारगेटहून एसटी आहे. यातली घिसरची एसटी निवी गावापर्यंत जाते. स्वारगेट-निवीसाठी ३ तास लागतात आणि स्वारगेट-हारपूडसाठी साधारण ४ तास लागतात. त्यामुळे हारपूडच्या एसटीने गेल्यास पहिला मुक्काम मोहरीत करता येत नाही, कारण हारपूड-मोहरी हे अंतर कमीत कमी दीड तासांचे आहे, आणि अंधारात त्या वाटेवर न जाणे श्रेयस्कर कारण वाटेवर जनावरांची (रानडुकरे, साप) गाठ पडण्याची शक्यता आहे.

आम्ही २४ डिसेंबरला सकाळी साडेसहाच्या घिसर एसटीने निवी गावात उतरलो तेव्हा साडेनऊ झाले होते. एसटीतून उतरलो तेव्हा आमच्या पाठीवरील प्रचंड मोठ्या ट्रेकींग सॅक्स बघून एसटीचे दार लोटता लोटता कंडक्टरने ’आयला पैसे देऊन वर जिवाला त्रास!’ अशी comment केली, गावकऱ्याच्या हातावर टाळी-बिळी दिली आणि आम्हीही खोखो हसायला लागलो. निवीहून घेवंडे आणि घेवंडेहून हारपूड असा पहिला टप्पा होता. हारपूडला जेवून मग मोहरीकडे मुक्कामासाठी निघायचे होते.

अर्ध्या तासात घेवंडेला पोहोचलो. तिथे एका म्हाताऱ्या गावकऱ्याने आस्थेने विचारपूस केली आणि स्वत:हून येऊन हारपूड गावची वाट सांगितली. घेवंडे गावातून एक पायवाट तोरणा किल्ल्याला डाव्या हाताला ठेवत सरळ डोंगर चढून जाते. या डोंगरावरचे आणखी दोन दांड चढून मग उजव्या हाताला वाट वळेल तेव्हा वळा असे त्या म्हाताऱ्याने बजावून ठेवले होते. त्याप्रमाणे निघालो. मध्ये एकदा वाट चुकून भरकटलो आणि पुन्हा माघारी फिरलो. यात बारा वाजून गेले होते. एव्हाना पायांनी आपापली गती पकडलेली असल्याने मी, मयूर आणि ओंकार पुढे आलो आणि श्रीकांत-आशिष मागून येत होते. असेच साधारण तासभर चालत होतो. एका U-turn वरती दोन पायवाटा निघाल्या होत्या. त्यापैकी वरच्या बाजूच्या पायवाटेलगतच्या दगडावर पांढरा arrow दिसला आणि आम्ही कमालीचे खूष झालो. निर्जन जंगलात हे arrows भटक्यांची खूप मोलाची मदत करतात. दुर्दैवाने, मागून येणाऱ्या श्रीकांत-आशिषने तो arrow पाहिलाच नाही आणि ते त्या बाजूच्या दुसऱ्या पायवाटेने ती दरी उतरून सरळ खाली गेले. दीडच्या सुमारास श्रीकांतने फोन करून सांगितले ( BSNL जिंदाबाद!), की आम्ही गावात पोहोचलो - पण त्या गावाचे नाव होते - घिसर!! Sad

हाय रे देवा!! एव्हाना दीड वाजला होता. अजून हारपूडचा पत्ताही नव्हता आणि हारपूडहून २ तास चालून मग अंधार पडायच्या आत मोहरी गाठायचे होते. त्यांना आम्ही ’गावातूनच एखादा माहितगार माणूस बरोबर घ्या आणि हारपूड गाठा’ असं सांगितलं आणि आम्ही तिघे पुढे निघालो. अर्धा-पाऊण तास तसेच चालत राहिलो आणि पायवाट एका सपाटीवर आली. आता तोरणा मागे होता आणि खूप दूरवर दिसायला लागला होता - शिवतीर्थ रायगड, जिथे आम्ही परवा असणार होतो.. आता घिसर गावची दरी आमच्या उजव्या हाताला होती. त्या सपाटीवरून ५-१० मिनिटे चाललो असू, तेवढ्य़ात आम्हाला दोन पायवाटा लागल्या - एक डावीकडची, सरळ जाणारी आणि दुसरी उजवीकडची खाली उतरून गेलेली. डाव्या पायवाटेवर झाडाची छोटी फांदी आडवी टाकलेली होती, त्यामुळे ही वाट वर्ज्य असावी असा ग्रह करून आम्ही उजव्या वाटेला लागलो. पण ५ मिनिटातच लक्षात आले, की ही वाट खालच्या दिशेने चालली आहे आणि डोंगराच्या आतल्या बाजूस जात आहे. अजूनही हारपूड गावाचा मागमूस नव्हता, आजुबाजुला चिटपाखरूही नव्हते, घरे नव्हती, चरणारी गुरे नव्हती, गुराखी नव्हते, धनगर नव्हते, शेतकरी नव्हते,चिडिचूप जंगल आणि आम्ही हरवल्यागत फिरणारे ३ ट्रेकर्स! आता आम्हालाही वाटायला लागले होते की आपण चुकलोय आणि हरवलोय! शेवटी मयूर आणि ओंकारला तिथेच थांबवून मी पुन्हा माघारी येऊन त्या ’बंद’ केलेल्या पायवाटेने १५ मिनिटे पुढे गेलो. पण गावाचा नेमका अंदाज आला नाही, फक्त दिशा बरोबर आहे असं strong intution होतं. त्यामुळे आम्ही त्या ’आतल्या आवाजाचं’ ऐकायचं ठरवलं आणि त्या बंद पायवाटेनेच पुढे चालायचा निर्णय घेतला.

तासभर चालल्यावर एके ठिकाणी छोटासा झरा लागला, तिथे तहान भागवून घेतली. ह्या अनिश्चित पायपीटीचा शेवट कधी होईल असा विचार करत असतानाच एका वळणावर साधारण ८-९ वर्षांची एक गुराखी चिमुरडी समोर आली आणि आम्ही "अजि म्या ब्रह्म पाहिले" च्या आनंदात न्हालो.. ’कुठून आलात? कुनिकडे जायाचंय’ असे एकापाठोपाठ तिने प्रश्न सुरू केले. मग तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिचे समाधान होईस्तोवर दिल्यावर तिला त्या भागाची व तिची माहिती विचारली. ह्या मुलीचे नाव होते चिंधी. दुसऱ्या गुरांत शिरलेल्या स्वत:च्य़ा गाईला परत आणण्याच्या मोहिमेवर निघालेल्या ह्या मुलीने आम्हाला दूरून पाहिले होते आणि म्हणून आमचा शोध घेत ती पुढे आली होती. गाव कधी आणि मुख्य म्हणजे कुठले - हारपूड की मोहरी (आम्ही इतका वेळ चालत होतो की आम्हाला शेवटी शेवटी असेही वाटायला लागले होते की आपण आता थेट मोहरीतच पोहोचणार) येईल याची अनिश्चितता आता संपली होती. आम्ही हारपूडच्या धनगरवस्तीपासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर आलो होतो. त्याच डोंगराच्या धारेवरून चालत यथावकाश वस्तीवर दाखल झालो. अंगणातून त्या छोट्या कौलारू घरात आवाज गेला - ’माये, गडवाले आले आहेत.’ (अट्टल ट्रेकर्सना त्या प्रदेशात ’गडवाले’ असे मावळी संबोधन आहे.) अंगणात बसल्याबरोबर आतून लगेच एक लोटाभर पाणी आणि अंथरायला कांबळ आलं. हारपूड गाव त्या डोंगराच्य़ा पायथ्याला वसलेले होते. त्या घरातील छोटा चुणचुणीत पोरगा - संतोष नाव त्याचे, वाट दाखवायला बरोबर घेतला आणि ओंकारला तिथेच बसवून मी व मयूर तो अख्खा डोंगर उतरून आशिष-श्रीकांतला आणण्यासाठी गावात आलो. त्या घराच्या मागच्या सपाटीवरून पश्चिमेला दुर्ग लिंगाण्याने पहिले दर्शन दिले. अर्धा तास त्यांची वाट पाहिली आणि वरून विश्वास (उर्फ ’इस्वास’)- संतोषचा भाऊ सांगत आला की तुमचे दोन मित्र वर वस्तीवर आले आहेत. आम्ही २ तासांपूर्वी उताराकडे जाणारी जी पायवाट सोडून फांदीने बंद केलेली पायवाट धरली होती, त्याच पायवाटेने डोंगर चढून हे दोघे आमच्याच वाटेने त्या वस्तीवर पोचले होते. आणि तीच पायवाट त्या हारपूड धनगरवस्तीवरून पुढे मोहरीकडे जात होती. (मोहरीला जाण्यासाठी हारपूड गावामध्ये शिरायची अजिबात आवश्यकता नाही. डोंगराच्य़ा धारेवरून वाट सोयीची आहे.) परत तो अख्खा डोंगर चढून वर आलो आणि जेवणाच्या पुड्या सोडल्या.

एकंदरीत (वाट चुकल्यामुळे वाया गेलेल्या) वेळेचा अंदाज घेतला. एव्हाना पाच वाजून गेले होते. दिवसभर खूप चाललो होतो, मोहरी अजून २ तासांवर होते, वाट अंधारात चालण्यासारखी नव्हती. म्हणून मग ती रात्र त्याच वस्तीवर काढायचा निर्णय घेतला. त्या वस्तीवर एकूण ३ घरे होती. सर्वात पहिले घर रामजी-भागाबाई या जोडप्याचं. त्यांच्या घराच्या बाजूला छोटा गोठा होता. त्या रात्री त्या गोठ्याच्या नशिबात मनुष्यवास होता. एका बाजूला त्यांच्या ३ बैलांनी अंग पसरले होते आणि दुसऱ्या बाजूला आम्ही डेरा टाकला होता. आता वेळ भरपूर असल्यामुळे, बॅग्स आत ठेवून सूर्यास्ताचे फोटो काढायला बाहेर पडलो.
उगवतीला तोरणा आणि त्याची बुधला माची, राजगड, वरंध्याच्या डोंगररांगा, कोकणदिवा, लिंगाण्याचे टोक, आणि मावळतीला रायगड असा सुंदर देखावा दिसत होता.
send off 19.11.09 025.jpg
[हारपूड पठारावर घेतलेला हा फोटॉ - मागे तोरणा व बुधला माची आणि राजगड, समोर ओंकार आणि मयूर]

रात्री मयूरने मॅगी बनवली, अस्मादिकांनी चहा बनवला, रात्री थंडी वाढली म्हणून शेकोटी पेटवली आणि निद्राधीन झालो. The Great hunter Jim Corbett ने बऱ्याच गोष्टींमध्ये त्याने शिकारीच्या निमित्ताने दिवसभर मैलोगणती पायपीट केल्याची रोमांचकारी वर्णने लिहून ठेवेली आहेत. आज झोपताना एक शतांश प्रमाणात का होईना, पण एक तसा दिवस अनुभवल्याचा feel होता. अखेर ट्रेकचा पहिला दिवस संपला होता..
*********

तोरणा ते रायगड : Day - 2 (२५ डिसेंबर)
सकाळी पाचचा गजर लावून सातला उठलो. (उत्तम, लज्जतदार इ.इ.) चहा-पोह्यांचा फक्कड नाश्ता बनवला. भागाबाईने दोन लोट्या भरून गाईचे दूध आणून दिले (वाह!!). सर्व आवरून निघायला साडेआठ झाले. सोबत वाट दाखवायला भागाबाई आणि तिचा पोरगा ’इस्वास’ येणार होते. रात्रभरच्या कडाक्याच्या थंडीत रहाण्याची मस्त सोय केल्याबद्दल रामजीबावांचे आभार मानले, व त्यांचे ’मानधन’ देऊन निघालो. भागाबाईने मोठी बाटलीभरून ताक (विकत) दिले. पुढच्या घराच्या अंगणातून चिंधी डोकावून बघत होती. तिला बोलावले, तिच्या हातावर गोळ्य़ा-चॉकलेट्स ठेवली आणि मोहरीकडे निघालो. हारपूड धनगरवस्ती ते मोहरी ही वाट तशी सरळ. पण पुन्हा तेच - गुरांच्या फसव्या वाटांनी गेलो तर आपण चुकलो हे लक्षात येईपर्यंतही कदाचित एखाद डोंगर पार झालेला असेल - चुकीच्य़ा दिशेला!! पण आता भागाबाई आमच्याबरोबर असल्यामुळे निश्चिंत होतो. मोहरीच्य़ा अलिकडे एका पठारावर पोहोचलो तेव्हा मागे तोरणा आणि समोर रायगड सारख्याच अंतरावर दिसत होते. लिंगाणा कड्यापलिकडे गायब झाला होता. मोहरीच्या वाटेवर असतानाच भागाबाईने "बोराट्याच्य़ा नाळेतून जाऊ नका, सिंगापूरच्या नाळेने उतरा असा सल्ला दिला होता". पण आमचे ’तोरणा-रायगड व्हाया बोराटा नाळ’ हे जुने स्वप्न होते. त्यामुळे तिला बोराट्याच्या नाळेपर्यंत घेऊन चल, वाट उतरण्यासारखी नसेल तर सिंगापूरच्या नाळेचा रस्ता दाखव असं सांगितलं. तीही याला तयार झाली.
send off 19.11.09 060.jpg
[मोहरीपूर्वी उंचावरून घेतलेला हा फोटो. डावीकडील बाण - लिंगाण्याचा सुळका आणि उजवा - रायगड]

send off 19.11.09 054.jpg
[लिंगाणा झूम करून]

मोहरीला पोहोचलो तेव्हा पावणेदहा झाले होते. बोराट्याच्या नाळेच्य़ा तोंडाशी पोहोचलो आणि आमच्य़ा तोरणा-रायगड व्हाया बोराटा नाळ या प्रवासनाट्याने एक अनपेक्षित वळण घ्यायला सुरूवात केली...

नाळेच्या तोंडावरून दिसणारे दृश्य मनोरम होते. दोन्ही बाजूला कडे, त्यामधून गेलेली खड्य़ा उताराची, प्रचंड कातळांची घळीसारखी वाट (हीच नाळ), साधारण दीड हजार फूट उतरल्यानंतर एकदम open होणारा नजारा... - यात उजव्या हाताला एका दरीपलीकडे उभा असणारा लिंगाणा किल्ला, डाव्या हाताला डोंगररांगा, डावीकडे दूर दापोली गाव आणि समोर खोऽऽऽऽऽल दरी!!
send off 19.11.09 063.jpg
[बोराटा नाळेच्या मुखापाशी घेतलेला फोटॉ]

मी वाटेचा अंदाज घ्यायला नाळेत उतरलो. माझ्या मागून सुरक्षित अंतर ठेवत आशिष आणि मयूर उतरले. नाळेमधे बरीच झुडुपे उगवली होती. मी साधारण २००-३०० फूट उतरलो असेन. rock patches अवघड आणि अनियमित असले तरी उतरायला अशक्य नव्हते. योग्य ती खबरदारी घेऊन नाळ उतरणे शक्य होते. हिच गोष्ट मी आशिषला सांगत असतानाच माझ्या कानाशी घोंघावण्याचा आवाज आला.. चमकून पाहिले तर २-३ मधमाशा उडत होत्या. जरा निरखून पाहिल्यावर असं लक्षात आले की आसपासच्य़ा सर्व झुडुपांमध्ये मधमाश्यांची शाळा भरली आहे!!! आणि ही झुडुपे सबंध नाळभर वाढलेली असल्यामुळे नाळ उतरतांना या झुडुपांना आणि पर्यायाने माश्यांना टाळून उतरणे केवळ अशक्य होते! अजिबात आवाज न करता तसेच मागे परतलो. आता प्रश्न वाटेतल्या rock patches चा नव्हता, तर या उपटसुंभ माश्य़ांचा होता. नाळेमध्ये आग्यामोहोळ होते, पण ते नक्की कुठे लागले आहे ते दिसतच नव्हते. कदाचित ५०० फूट उतरल्यावर, कदाचित नाळेच्या exit जवळ असेल, कदाचित नाळेमध्ये नसेलही. पण नकळतसुद्धा माश्या डिवचल्या गेल्या तर आम्हाला पळायला जागा नव्हती ही वस्तुस्थिती होती. म्हणून मुकाट्याने आम्ही बोराट्याच्या नाळेने न उतरता सिंगापूरच्या नाळेने उतरण्याचा निर्णय घेतला. भागाबाई म्हणत होती त्याप्रमाणे नाळेमध्ये दरड कोसळल्यामुळे मागच्या ३ वर्षांपासून नाळेमधून मनुष्यवावर बंद आहे. त्यामुळे झुडुपे वाढून ती वाट आता ट्रेकर्ससाठी बंद झाली आहे. (२००६ नंतर बोराट्याच्य़ा नाळेतून सह्याद्री उतरल्याची एकही नोंद कुठल्याच ट्रेकर्स ब्लॉगवर आम्हाला मिळाली नव्हती ही Light 1 नंतर पेटली. अर्थात, आनंद नावाच्या एका बहाद्दराने हा ट्रेक २००८ मध्ये २ दिवसांत (वाट एकदाही न चुकता, सलग चालत हे गृहीत आहे) केल्याची नोंद हा लेख लिहिल्यानंतर नेटवर सापडली आहे.) असो.

एव्हाना अकरा वाजत आले होते. आता सिंगापूरची नाळ हा एकमेव option उरला असल्यामुळे वेळ आणखी जाणार होता. त्याचबरोबर लिंगाण्यापर्यंतचे तब्बल ३ तासांइतके अंतर वाढणार होते. मोहरीच्या खालच्या अंगाला सिंगापूर गाव वसले आहे. तिथूनच नाळेकडे वाट जाते. पण पुन्हा उलटे मोहरीपर्यंत जाण्यापेक्षा मधूनच एक सोयीची वाट आहे असं भागाबाईने सुचवले. तिच्याकडून ती वाट डोंगरमाथ्यावरूनच समजावून घेतली आणि तिला निरोप दिला. ’नीट जा रे बाळांनो, अजिबात चुकू नका’ असं दामटवून ती आणि तिचा इस्वास निघून गेले.

प्रिय वाचकहो, ट्रेकच्या इथपर्यंतच्या वर्णनामध्ये जितक्या patience ने माझी साथ दिलीत ती अशीच द्याल अशी आशा आहे, कारण संपूर्ण ट्रेकमधल्या माझ्या मते सर्वाधिक exciting अशा ६ तासांची कहाणी आता सुरू होते आहे.

आम्हाला तो डोंगर पायवाटेने उतरायचा होता. तासभर उतरलो की एक ओढा डावीकडून येईल ज्यात तहान भागवता येईल, तो ओढा न ओलांडता उजव्या हाताने पायवाट धरून पुढे जायचे होते, मग एक अवघड असा rock patch ओलांडायचा होता. त्यानंतर मात्र मळलेली वाट दिसेल ती नाळेकडे घेऊन जाईल - इति भागाबाई. त्याप्रमाणे उतरायला लागलो. वाट झाडीतून होती. मध्येच गायब व्हायची, मध्येच वाटेला २ वाटा फुटायच्या. अशा वेळी खबरदारी म्हणून सर्वात शेवटी चालत मी झाडाच्या डहाळ्या खोडांवर खुणेसाठी खोचत निघालो होतो. अर्धा तास उतरलो असू, तेवढ्यात उजवीकडून एक ओढा लागला!! या ओढ्याबद्दल भागाबाईने काहीच सांगितलेले नव्हते. हा ओढा उजवीकडून कसा काय आला अशा विचारात पडलेले असतांनाच डावीकडून आणखी एक ओढा उतरला! (या ऋतुमध्ये ओढे बहुतांश कोरडे असतात, हे आपण जाणताच! - हे ही तसेच होते) परत solllid confusion!! वाट अनोळखी, आसपास मनुष्य़ाचा मागमूस नाही, सिंगापूरच्या नाळेपर्यंतच्या अंतराचाही अंदाज नाही. शांत जंगल आणि पाच ट्रेकर्स! जय हो!

बॅग्स खाली ठेवल्या आणि मी आणि आशिष वाट शोधायला पुढे निघालो. दोन ओढ्यांच्या संगमामधून चालत पुढे निघालो. थोड्या अंतरावर तो ओढा एका dropनंतर थेट कोकणात उडी घेत होता! त्याच्या दोन्ही काठांवरून चालत गेलो, पण वाट सापडली नाही.
send off 19.11.09 065.jpg
[त्या ओढ्याच्या डाव्या काठावरून उजव्या काठापलीकडचा फोटो. फोटोमध्ये आशिष पाहत असलेल्या दिशेला वाट होती, जी शोधायला वेळ लागला. बाण - रायगड आणि लिंगाणा]

अखेर वाट चुकलो असे वाटून परत फिरलो. एव्हाना बारा वाजून गेले होते. म्हणून मग तिथेच ओढ्याच्या काठी जेवण उरकावे असा विचार केला आणि बाटल्या भरायला सर्वजण पुन्हा ओढ्याकडे निघालो. आम्ही बाटल्या भरत असताना मयूर आणि आशिष १५ मिनिटात येतो असे सांगून उजव्या काठावरून पुन्हा चालत कड्याच्या दिशेने गेले आणि तेवढ्यात मला पात्रामधे एका कातळावर उजव्या काठाकडे काढलेला पिवळ्या रंगाचा बाण दिसला. त्या काठावर एका कातळावर सरळ रेषेत काढलेला अजून एक बाण होता. आता एवढ्या दोन बाणांमुळे आशा निर्माण झाली होती खरी, पण मी थोड्या वेळापूर्वी त्याच काठावरून जाऊन आलो असल्यामुळे तिकडे वाट असेल अशी खात्री मला तरी वाटली नाही. म्हणून आम्ही तिघे माघारी फिरलो आणि मयूर-आशिषची वाट बघत बसलो. जरा वेळाने सिंगापूरच्या डोंगरावरून मनुष्यहाळी ऐकू आली आणि त्याच वेळी मयूर-आशिषही परत आले. त्यांनी वाट शोधली होती. भागाबाईच्या खुणा, आम्ही चालून आलेली वाट आणि ते बाण हे सगळे perfect होते. बाकीच्यांना स्वयंपाक करायला सांगून मी आणि मयूर त्या डोंगर-उतारावरून आलेल्या आवाजाशी गप्पा मारायला निघालो.

डोंगर उतरून पलीकडच्या काठावर एक पन्नाशीच्या आसपासचा धनगर पाणी पित होता (हा जर आधी भेटला असता तर?). त्याला रामराम केला, त्याचं नाव - बाबू पोटे. आपल्या एकुलत्या एका शेळीला आणि तिच्या पाडसाला चारायला तो तिथे फिरत होता. त्याला नाळेपर्यंतच्या आणि नाळ उतरून पुढच्या प्रवासाबद्दलही माहिती विचारली. आम्ही कालपासून वाट चुकतो आहोत असं म्हटल्यावर त्याने आठवड्यापूर्वी घडलेला किस्सा सांगितला. पुण्याहून ४ जणांच्या ग्रुप सिंगापूरच्या नाळेने उतरण्यासाठी हारपूडला आला होता. तिथून कसल्यातरी जबरदस्त misunderstandingमधून कोणीतरी त्यांना मोहरीची वाट दाखवायच्य़ा ऐवजी घिसरची वाट सांगितली आणि तो ग्रुप घिसरला जाऊन पोहोचला!!! मग पुन्हा घिसर-मोहरी असा उलटा फेरा मारून तो जेव्हा सिंगापूरला पोहोचला तेव्हा त्यांची एकच इच्छा उरली होती - कसंही करून दापोलीपर्यंत पोहोचवा! मग या बाबूने त्यांना खाली पोहोचवले होते. आम्ही हे ऐकल्यावर हसून कोसळायचे बाकी होतो!! मग त्याला जेवायचे आमंत्रण देऊन आम्ही परत फिरलो. तोपर्यंत श्रीकांतने शेगडी पेटवून झकास मॅगी बनवली होती. बटर, सॉस, मॅगी आणि नंतर फलाहार असा मस्त जेवणाचा बेत पार पडला. जंगलातली ती पंगत कायम आठवणींत राहिल. अर्ध्या तासात जेवण आटोपून सर्व कचरा पिशवीत भरून घेऊन आम्ही लिंगणमाचीपर्यंतच्या दीर्घ प्रवासासाठी सज्ज झालो होतो. ओढ्यावर बाटल्या भरून घेतल्या आणि नाळेच्या तोंडापर्यंत वाट दाखवण्यासाठी बाबूलाच तयार केले.

ओढ्याच्या उजवीकडील rockpatch खरंच अवघड होता. पायवाट नाहीच, तर खडा डोंगर उतार शरीराला आतल्या बाजूला झुकवून दरीला समांतर रेषेत पार करायचा होता. ही अशी काही वाट असेल हा विचार न सुचल्यामुळे मगाशी मला आणि आशिषला ही वाट दिसली नव्हती. (ह्या अशा वाटा मयूरलाच नेहमी दिसतात).
send off 19.11.09 078.jpg
[हीच ती वाट. फोटोत मी. बाण - रायगड व लिंगाणा]

इथपासून सिंगापूर नाळेपर्यंतची वाट मात्र खरोखर अनुभवण्यासारखी आहे. डाव्या बाजूला खोल दरी उजव्या हाताला डोंगरकडा अशी ही वाट डोंगराला वळसे घेत घेत लिंगाण्याच्या दिशेने सरकते. सिंगापूरची नाळ आणि लिंगाण्याची दरी यांमध्ये बोराट्याची नाळ आहे. वाचक यावरून दिशांचा अंदाज लावू शकतील. घाटमाथ्य़ावरून उतरल्यास लिंगाण्यावर जाण्य़ासाठी सर्वात सोयीची वाट ही बोराट्याच्य़ा नाळेपासूनच आहे. त्यामुळे, सिंगापूरची नाळ उतरल्यावर बोराट्याच्या नाळेच्य़ा वाटेला जोडणारी एखादी वाट आहे का असा शोध आम्ही घ्यायला लागलो. बाबूनेही तशी एक वाट सांगितली, आणि सिंगापूर नाळेच्य़ा तोंडापाशी कड्याजवळच उभे राहून दिशांच्या आधारे समजावूनही दिली. ह्या वाटेने गेलो असतो तर आमचा लिंगाण्याला वळसा वाचला असता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच लिंगाण्याच्या पायथ्याला पोहोचू शकलो असतो.

सिंगापूरच्या नाळेपर्यंत पोहोचलो आणि मला चवड्याला भयानक वेदना व्हायला लागल्या. माझ्या नव्या कोऱ्या hunter shoesनी ऐनवेळी "खिंडीत" गाठले होते. त्यावर band-aid बांधून चालायला सुरूवात केली आणि डाव्या गुडघ्याने असहकार पुकारायला सुरूवात केली. कालपासूनच्या सह्याद्रीतल्या ’वजनदार’ पायपीटीमध्ये कुठेतरी तिरका पाय पडला असणार आणि त्यामुळे muscle pull झाला असणार ही खात्री झाली. पण इलाज नव्हता. त्यातल्या त्यात हलकी बॅग पाठीवर घेतली आणि नाळ उतरून खाली आलो. इथून बाबूच्या सांगण्यानुसार आम्हाला झुडूपात शिरून पश्चिमेच्या दिशेने जात राहायचे होते. ज्यामुळे आम्ही लिंगाण्याच्य़ा अलीकडच्या सोंडेवर पोहोचलो असतो आणि त्या उतारावरच्या वस्तीवर कोणीतरी आम्हाला पुढचा रस्ता दाखवला असता. अन्यथा मळलेल्या पायवाटेने दापोली गावात पोहोचाल असाही पर्याय त्याने दिला होता. पण ती झुडूपात शिरायची वाट सापडेना. बरं, घड्याळात पाच वाजत आले होते, आणखी तासा-दीडतासाने सूर्य मावळला असता, त्यामुळे घाई करायला हवी होती. अखेर, समोर आलेल्या पायवाटेने उतरायला सुरूवात केली. मध्येच एका मोकळ्या गवताळ सपाटीवर थांबलो, आणि मागे पाहिले. सुंदर view दिसत होता. डाव्या हाताला लिंगाणा, त्याला खेटून V-shape ची दरी, तिला खेटून उजवीकडे बोराट्याच्या नाळेचा कडा, लपलेली नाळ, तिच्या उजवीकडे वळसे घेत गेलेला डोंगर, त्याच डोंगराच्या मागे गायब झालेली सिंगापूरची नाळ आणि त्याच रेषेत उजवीकडे ’ती’ पायवाट आणि शेवटी ’तो’ ओढा, जिथून आम्ही तो rockpatch पार केला होता.
send off 19.11.09 094.jpg
[त्या सपाटीवरून घेतलेला फोटो. डावीकडचा बाण - लिंगाणा किल्ला व उजवीकडचा - बोराट्याची नाळ]

send off 19.11.09 095.jpg
[बोराट्याची नाळ - झूम करून]

send off 19.11.09 098.jpg
[ बाण म्हणजे 'तो' ओढा, जिथून rockpatch पार केला होता.]
तसेच चालत खाली आलो आणि संपूर्ण दरी उतरून एका ओढ्य़ामध्ये विसावलो. सूर्य दिसेनासा झाला होता, आणि जिथे आम्ही पोहोचणे अपेक्षित होते लिंगाण्याची ती सोंड खूप दूर ओढ्याच्या अलीकडच्या अंगाला होती. त्या सोंडेपर्यंत अंधार पडायच्या आत जाणे शक्य नव्हते, म्हणून ओढा ओलांडून हीच पायवाट follow करावी असा निर्णय घेतला आणि त्यानुसार पुढे निघालो. माझा गुडघा चांगलाच दुखत होता. त्यामुळे गाव गाठून त्याला विश्रांती देणे must होते. पाने तोडायला जंगलामध्ये गेलेला दापोली गावातील एक म्हातारा वाटेमध्ये भेटला आणि त्याच्या सोबत संधीप्रकाशात दापोली गावामध्ये दाखल झालो.

लिंगाणा किल्ल्याच्य़ा पायथ्याला वसलेले उण्यापुऱ्या १०० घरांचे दापोली हे टुमदार गाव.(लिंगणमाची किल्ल्याच्य़ा पलीकडच्या बाजूस आहे) छोट्या गल्ल्या, घरांमध्ये वीज आहे, पण रस्ते अंधारात. गावामध्ये दत्तमंदिरात औटघटकेचा संसार मांडला. मंदिरासमोरच्या घरातून कुणीतरी हंडाभर पाणी आणून दिले. जवळच विहीर होती, म्हणून त्यातून पाणी शेंदण्यासाठी पोहराही आणून दिला. विहीरीवर जाऊन हातपाय धुतले, Fresh झालो आणि स्वयंपाकाची तयारी केली. मयूरने mix veg soup आणि अस्मादिकांनी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली. (खिचडी चवीला उत्तम झाली होती हे इतरांचे मत इथे जाता जाता टायपून ठेवायला हरकत नाही. :-)) एकंदरीत सूप-खिचडी-चटणी-लोणचे-पापड अशी निरामिष पण तरीही Royal मेजवानी लिंगाण्याला आणि हूल दिलेल्या बोराट्याच्या नाळेला साक्षीस ठेऊन त्या दत्तमंदिरात पार पडली. रात्री १० वाजता मयूरला पान खायची हुक्की आली. तेव्हा गावात आम्ही आणि कुत्री सोडली तर कुणीही जागे नाही हे त्याच्या लक्षात आणून द्यावे लागले. Lol

दोन दिवसांच्या heavy पायपीटीमुळे आणि सिंगापूरच्या नाळेतून लिंगाण्याच्या विरुद्ध दिशेला उतरावे लागल्यामुळे लिंगाणा करून रायगडला जाणे ही आता अशक्य गोष्ट होती. माझा गुडघाही त्रास देत होताच. त्यामुळे एक किल्ला वजा करावा लागणार होता. अर्थातच लिंगाणा skip करून उद्या रायगडकडे निघायचे असे ठरवून आशिषने दिलेला Ice tea रिचवून अंथरूणावर आडवे झालो. घाटावरील हारपूडची धनगरवाडी ते घाटाखालील दापोली अशी forever memorable भ्रमंती आज झाली होती. ट्रेकचा मुख्य आणि the most exciting भाग आता संपला होता. आता उद्या बाकी होती शिवतीर्थ रायगडाला भेट आणि ट्रेकची सांगता... Happy
*********

तोरणा ते रायगड : Day - 3 (२६ डिसेंबर)
ओंकारने पहाटे ५ पासून सर्वांना उठवायला सुरूवात केली आणि सर्वजण उठले तेव्हा साडेसात वाजले होते. माझा गुडघा अधिकच दुखायला लागला होता. आणि त्यातच आमच्या गॅस शेगडीने काम बंद आंदोलन सुरू केले. नॉबचा काहितरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे ज्वाळा मंद पेटत होत्या. त्यामुळे चहाचाही कार्यक्रम रद्द करून आम्ही सामान बांधले. दापोलीहून महाडसाठी सकाळी ९ आणि सायंकाळी ६ अशा दोन एसटी बसेस आहेत. किंवा चालत दापोली-वाघिरे (२ तास) आणि वाघिरे-टकमकवाडी (टकमकटोकाच्या खालचे गाव - २ तास) हाही पर्याय आहे. आम्ही ९ च्या एसटीने महाड गाठले. तिथून मग ’विक्रम’ने रोपवे गाठला.

गेले २ दिवस जरी आम्ही मनुष्यप्राण्यापासून खूप दूर होतो तरी २५ डिसेंबरची जोडून आलेल्या सुटीमुळे रायगडावर भरपूर प्रजा जमलेली असणार असा अंदाज होताच. रोपवेला पोहोचलो तेव्हा बारा वाजले होते. महाडहून पुण्याला शेवटची एसटी रात्री साडेअकराला होती. तोपर्यंत वेळ हातात होता. जास्तीत जास्त वेळ रायगड पाहण्यात घालवावा म्हणून रोपवेने रायगड चढून जायचे ठरवले. मयूर आणि ओंकार तिकिटे काढायला गेले आणि ६ तासांचे waiting असल्याचे बघून परतले. आता पायऱ्यांनी चढून जाणे हाच एकमेव पर्याय होता. माझ्या गुडघ्य़ाची अवस्था पाहता उरलेल्या चौघांनी मी वर येण्याचा निर्णय माझ्यावर सोपवला.

रायगडासारखी भव्य, आणि मराठी साम्राज्याची राजधानी असलेली पुण्यभूमी कितीही वेळा पहिली तरी कमीच. रायगड आणि बाकीचे किल्ले यात मला ठळकपणे जाणवणारा फरक हा की बाकीचे किल्ले बांधताना राजांचं बचाव आणि संरक्षण हे मुख्य धोरण होतं. पण रायगडाच्य़ा बांधणीतून या धोरणाबरोबरच मराठी सत्तेच्या स्थापनेबद्दलचा आणि शाश्वततेबद्दलचा निर्वाळा राजांनी दिला. इथे मराठी कारागिरीचे खुले प्रदर्शन आहे. होळीचा माळ असो, बाजारपेठ असो, नगारखाना असो, गंगासागर टाके असो. मराठी सत्तेची ताकद ठसवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न इथे जागोजागी दिसतो. रायगड बांधणाऱ्या हिराजी इंदलकराला रायगड पाहताना कितीतरी वेळा मनातून सलाम मिळत असेल. असा हा किल्ला न पाहता मी खालीच बसून राहणे शक्यच नव्हते. अखेरीस ट्रेकची सांगता मी रायगडावरतीच करेन असे ठरवले.(त्यादिवशी उभ्या रायगडाने काठीच्य़ा मदतीने एक ’किटक्या मावळा’ दिवसभर भिरभिरताना पाहिला. ;-))

पाच जणांचे आवश्यक सामान आणि किंमती चीजवस्तू (म्हणजे कॅमेरा आणि पैसे)एकाच बॅगमध्ये भरून घेतल्या. बाकीच्या बॅग्ज खालीच एका दुकानात (स्वत:च्य़ा जबाबदारीवर) ठेवल्या. मधल्या खिंडीतून चढून ५०० पायऱ्या वाचवल्या आणि आम्ही तासाभरात वर पोहोचलो. एका काठीच्य़ा आधारे दुखरा गुडघा घेऊन मी त्या दिवशी चढलेला रायगड हाही एक अविस्मरणीय प्रसंग होता. दिवसभर रायगड फिरून सायंकाळी टकमक टोकावरून सूर्यास्त पाहून ३ तासांच्या waiting नंतर रोपवेने साडेआठाला रायगड उतरलो.
send off 19.11.09 103.jpg
[रायगडावरून जगदीश्वराजवळून घेतलेला फोटो - लिंगाण्याचा सुळका आणि मागे उजव्या कोपर्‍यात तोरणा]

अर्ध्यातासाने वाळूची वाहतूक करणारा एक डंपर तिथे आला. त्या डंपरवाल्याने महाडपर्यंत सोडायचे कबूल केले. महाडपर्यंतचा तो उघड्या डंपरमधला परतीचा प्रवास कायम लक्षात राहिल. एका अविस्मरणीय ट्रेकची सांगताही तितकीच लक्षात राहणारी होती. Happy

*******

तोरणा ते रायगड हा खूप वर्षांपासून डोक्यात असलेला ट्रेक हा अशाप्रकारे पार पडला. सगळेच खूपदा वाट चुकलो होतो, भरकटलो होतो आणि दरवेळी finally वाटेला लागलो होतो. वाटाड्या घेऊन हा ट्रेक करणे हे उत्तमच. पण वाट चुकण्यातही मजा आहे आणि ती आपली आपण शोधण्यातही मजा आहे. :)लिंगाणा किल्ला राहून गेलाय खरा, पण त्याऐवजी या ३ दिवसांच्या सह्याद्रीतल्या भटकंतीने खूप काही दिलंय.. भागाबाईचं आतिथ्य, बोराटा नाळ ते सिंगापूर नाळ हा प्रवास, बाबू वाटाड्याने माझ्या शरीरयष्टीकडे(यष्टीसारख्या शरीराकडे) आणि मला rock patches उतरतांना पाहून दिलेलं ’किटक्या मावळा’ हे नाव, रायगडवाडी ते महाड हा उघड्या डंपरमधला प्रवास, हे सगळं त्या वाट चुकल्यामुळे अनुभवता आलं. सगळेच जण खूप थकलोही होतो आणि त्याचवेळी ३ दिवसातल्या close to heart अशा सह्याद्रीतल्या रानवाऱ्यामुळे आणि उनाड झऱ्यांच्या पाण्यामुळे fresh ही झालो होतो. महाडहून रात्री साडेअकराच्यागाडीत पुण्यापर्यंत उभे राहून आलो तेव्हाही पुणे-घिसर एसटीच्या कंडक्टरची ’पैसे देऊन वर जीवाला त्रास’ हीच comment डोक्यात घोळत होती. हा लेख लिहित असतांनाही गुडघा पूर्णपणे बरा झालेला नाही. पण पुढच्या ट्रेकपर्यंत तो खणखणीत बरा झालेला असेल हा भक्कम दिलासा त्या मावळातल्या आडवाटांनी, कभिन्न कातळांनी आणि घाटावरून कोकणात झेपावणाऱ्या ओढ्या-नाल्यांनी केव्हाच देऊन ठेवलाय आणि माझ्यासारख्या छोट्या भटक्यासाठी तो पुरेसा आहे.. Happy

- नचिकेत जोशी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे नचिकेत.. छान माहितीपुर्ण वर्णन.. खुप मस्त प्रवास घडवलास... तुमचा मेगा ट्रेक छानच झाला तर.. बंद झालेल्या बोरट्याच्या वाटेचे रहस्यही कळले Happy

खूपच मस्त रे नचिकेत, एक खडतर ट्रेक नावावर जमा !!! बाकी ट्रेकची मजा वाट चुकण्यातच आहे Happy

गुडघा बरा झाला की एका शेकोटी ट्रेकला जाउन येउ जवळपास.. ९-१० ला ?

चिनुक्स, झकासराव, अश्विनी, शँकी, सुन्या - धन्यवाद..
जीएस, यो, तुमच्यासारख्या माझ्या माहितीतल्या "अट्टल भटक्यांचे" reply अजून उत्साह वाढवतात.. Happy

मित्रा...छान भटकंती....किटक्या मावळा

आनंदयात्री, फारच सुरेख लेख. मी देखील गेली अनेक वर्षे राजगड ते रायगड हा ट्रेक करायची स्वप्न पाहत आहे. बोराट्याची नाळ बंद झाली असेल तर त्यासारखे दुख नाही. असो.
तुमच्या तपशीलवार वर्णनामुळे आता पुन्हा एकदा तो ट्रेक करायची इच्छा बळावली आहे.
जाता जाता एक सल्ला - गुढग्याच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करू नका. माझाही एकदा असाच गुढगा दुखावला होता राजगडला जाताना. त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढचे ७-८ महिने मला दमवले. अजूनही ट्रेकवर असताना मोठी स्टेप घेताना किंवा उतरताना काळजी घ्यावी लागते.

आनंदयात्री, छान वर्णन.

मला थोडे माझे अनुभव इथे लिहावेसे वाटतायत. खरंतर केव्हापासून इथे वर्णन टाकायचं होतं, पण फोटोअभावी राहून गेलंय.

आम्ही बहुधा २००६ साली (नक्की आठवत नाहीये) तोरणा-रायगड 'बोचेघोळ' मार्गे गेले होते. त्यावेळेस वेल्हा गावात उतरल्यावर टमटम वगैरे काहीच मिळाली नाही. गावात विचारल्यावर कोणीतरी सांगितलं, वेल्हा-घिसर अंतर फक्त १२ कि.मी. आहे. मग काय ११ नंबरची एष्टी पकडून सुरु झालो. आमची वाट काही संपता संपत नव्हती. शेवटी 'घिसर' गाव २-३ कि.मी राहिलेलं असताना एक टेम्पो दिसला व त्याने आम्ही उरलेलं अंतर कापलं. गावात पोचल्यावर कळलं, की अंतर १२ कि.मी. नसून २४-२५ कि.मी. आहे. Sad पण तो ट्रेक एकदम लक्षात राहाण्यासारखा झाला होता. तेव्हाच ठरवलं होतं, तोरणा-रायगड सगळ्या नाळांमधून जायचं.

बोराट्याच्या नाळेचे बरंच वर्णन ऐकून होते, अर्थात घाबरवलंच होतं बर्‍याचजणांनी. पण जायचंच आहे, हे ठरवलंही होतंच. तो योग २००८ मध्ये आला. आम्ही तिघंजण हारपूड गावी पोचलो. तिथे एक मामा आमच्याबरोबर वाटाड्या म्हणून यायला तयार झाले. त्यांनी आम्हांला बोराट्याच्या नाळेने न जाता सिंगापूरच्या नाळेने जाण्यासाठी हरप्रकारे समजवायचा प्रयत्न केला. पण आम्हीही ठरवूनच आलो होतो, त्यामुळे आम्हीही बोराट्याच्या नाळेने जाण्याचा आमचा हेका सोडला नाही व त्यात यशस्वी सुद्धा झालो. यात काहीच संशय नाही की ही वाट चॅलेंजिंग आहे, पण अनुभव मात्र अविस्मरणीय.

आता सिंगापूरच्या नाळेने जायचा योग केव्हा येईल त्याची वाट बघतेय.

>>तोरणा-रायगड 'बोचेघोळ' मार्गे गेले होते
खुपच लांबचा पल्ला आहे की.. कोकणदिव्याच्या पलीकडून...

आम्ही तोरणा-रायगड भर पावसाळ्यात केला होता.. त्यातून बोरट्याची नाळ... अ़क्षरशः फाटली होती..
रायलिंग च्या पठारावरुन लिगांणा काय दिसतोSS.. त्यासाठी तरी तिथपर्यंत जायला पाहिजे...

>>बाकी ट्रेकची मजा वाट चुकण्यातच आहे
म्हणुन म्हणतो GS, वाटाड्या घेऊन न जाता वाट शोधुया.. Wink

हो आनंद, तसा पल्ला आहे लांबचाच. पण खूप मजा आली होती ट्रेकला. निघाल्याच्या तिसर्‍या दिवशी रायगडावर होतो.

क्या बात है आनंद... अप्रतिम वर्णन आणि सुंदर ट्रेक Happy

रायगडावरून तोरणा नेहमीच खुणावतो... आणि मग तुमच्या सारखे किटक्या मावळ्यांचे अनुभव आम्हाला स्वस्थ बसवू देत नाही... GS लवकर मनावर घे रे...

अरे बापरे!! इथे खूप नवीन प्रतिसाद आलेत...
sorry दोस्तहो उशीरा वाचले ते..
आधी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद..

ashuchamp, उपचार चालू आहेत... तसंही मरणाचा उन्हाळा आहे, त्यामुळे ट्रेकचा विचार सध्या नाहीये..

आऊटडोअर्स,
मस्त अनुभव...

आनंद,
>>> रायलिंग च्या पठारावरुन लिगांणा काय दिसतोSS - खरंय!!

GS, आता सर्वांच्या तुझ्याकडूनच अपेक्षा आहेत... आणि तेही वाटाड्या न घेता..

पण, ट्रेकची मजा वाट चुकण्यातच आहे आणि ती आपली आपण शोधण्यातच आहे... Happy