'या खटल्या दरम्यान सरकार पक्षाने सादर केलेले साक्षी, पुरावे आरोपी सुनील आपटे यांना दोषी ठरवण्यास पुरेसे नसल्याने हे न्यायालय आपटे यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करीत आहे.'
न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. आयकर अधिकारी सुनील आपटे आरोपीच्या पिंजर्यातून खाली उतरले आणि पुढच्या कायदेशीर औपचारिकतेबाबत चौकशी करण्यासाठी वकील आणि पोलिस अधिकार्यांकडे वळले. न्यायालयात निर्दोष शाबीत होऊनही आपट्यांचा चेहेरा आनंदाने, समाधानाने फुललेला नव्हता; तर चेहेर्यावर होता केवळ एक विषण्ण भाव! एक विषाद!!
सौ. सुनीता आपट्यांची अवस्थाही काही फारशी वेगळी नव्हती. न्यायकक्षातल्या बाकावरून उठून त्या खालमानेनी आणि भरल्या डोळ्यांनी उभ्या राहिल्या. संथपणे पावलं टाकंत आपट्यांच्याकडे गेल्या. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले. मात्र दोघांच्या नजरा जमिनीवरंच खिळून होत्या. शब्द घशातंच अडकून होते. जड पावलाने सुनीताबाई न्यायालयाच्या पायर्या उतरू लागल्या. एवढ्यात एका वकिलाची हाक त्यांच्या कानी पडली.
"बाई... अहो बाई..."
त्यांनी चमकून मागे मान वळवली.
"अहो बाई तुमच्या सेवांचे दर काय असतात? मी एरवीपेक्षा दुप्पट पैसे द्यायलाही तयार आहे. आपण कधी भेटू शकाल?"
छद्मीपणे हसंत त्या वकिलाने विचारलं आणि आजूबाजूच्या चारचौघांनीही दात विचकले. उकळतं तेल घुसावं तसे हे शब्द सुनीताबाईंच्या कानात घुसले.
"नंतर कधीतरी फोन करा. मग सांगीन तुम्हाला."
नजरेतून आग ओकत सुनीताबाई उत्तरल्या आणि झपझप पावलं टाकंत न्यायालयाच्या प्रवेशद्वाराकडे निघाल्या.
-----------------------------------------------------------
अॅड.विवेक शेंडे आपल्या घरासमोरंच असलेल्या ऑफिसमधे आपल्या गुबगुबीत खुर्चीवर नुकतेच पहुडले होते. रात्रीचे सव्वादहा वाजलेले. पक्षकारांची वर्दळ नुकतीच आटोपली होती. अॅड. शेंडे हे शहरातले नामांकित फौजदारी वकील. वकील आणि डॉक्टर यांच्यापासून काहीही लपवायचं नाही असा त्यांचा दंडक. तुम्ही कोणताही गुन्हा करा. काय काय झालं ते मला येऊन खरं खरं सांगा. तुम्ही दोषमुक्त होण्याची खात्री; असा त्यांचा दावा! या दाव्यात अतिशयोक्तीही अजिबात नव्हती. त्यांचा लौकीकही त्यांच्या या दाव्याला साजेसा असाच होता. आपल्या अशीलाची खटल्यात कायदेशीर सरशी व्हावी यासाठी साम, दाम, दंड, भेद याच्याही पलिकडचा कुठला मार्ग असलांच तर तो ही त्यांना निषिध्द नव्हता.
"एक्स्क्युज मी सर; आपटे म्हणून कुणीतरी तुम्हाला भेटायला आलेत. तुमच्याशीच बोलायचंय म्हणतायत."
शेंडॅ वकिलांच्या असिस्टंटने त्यांच्या केबिनचा दरवाजा किलकिला करून सांगितलं.
"पाठवून द्या."
शेंडेवकिलांनी त्यांच्या सहाय्यकाला सांगितलं.
"मी आत येऊ का?"
"या"
"नमस्कार वकीलसाहेब. मी इन्कमटॅक्स ऑफिसर सुनील आपटे. लाचखोरी, भ्रष्टाचार, बेनामी संपत्तीबद्दल कुणीतरी माझ्या हितशत्रूंनी 'अँटी करप्शन'कडे खबर दिली. त्यांनी माझ्या घरावर धाड घालून बरांच काही मुद्देमाल जप्त केलाय. खास करून अडीच लाखाची रोकड, सव्वा किलो सोनं, चांदीची वीस ताटं, चाळीस वाट्या, वीस भांडी, चार..."
"आपटे..."
त्यांना मधेच थांबवत शेंडेवकील म्हणाले;
"कागदपत्रं आणलियेत?"
"होय वकीलसाहेब. "
आपट्यांनी ब्रीफकेस उघडली आणि त्यातली एक फाईल काढून शेंडे वकिलांसमोर ठेवली.
"ठेऊन जा इथे. मी बघून घेतो. परवा रात्री साडेसात वाजता या. मी सांगीन तुम्हाला मी केस घेणार की नाही ते."
"होय वकीलसाहेब. फाईल राहू दे इथेच. मी परवा येतो. पण वकीलसाहेब; नाही नका म्हणू वकीलसाहेब. मला सोडवा यातून वकीलसाहेब..."
आपटे अजीजीने म्हणाले.
---------------------------------------------------------------
आपटे साडेसातच्या ठोक्याला शेंडे वकिलांच्या ऑफिसमधे पोहोचले. आतमधे शेंडे वकील कुठल्यातरी पक्षकाराशी बोलंत होते. बाहेर हॉलमधे आणखी बरेच जण वाट पहात होते. शेंडे वकिलांचे असिस्टंट्स टायपिंग, ड्राफ्टींग, डिक्टेशन वगैरे कामात गुंतले होते. त्यातल्याच एकाला आपट्यांनी गाठलं आणि म्हणाले;
"नमस्कार; मी आपटे. परवा येऊन गेलो. आज साडेसात वाजता बोलावलं होतं वकीलसाहेबांनी..."
"ठीकाय; बसा तिकडे थोडा वेळ. जरा वेळ लागेल."
आपटे कोचावर जाऊन बसले. समोरच्या टेबलवर ठेवलेल्या वर्तमानपत्रांपैकी एक त्यांनी हातात घेतलं आणि त्यातल्या अक्षरांवरून नजर फिरवू लागले. मात्र वाचल्यापैकी एक अक्षरही त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. त्यांच्या डोक्यातल्या विचारांचं वेगळंच थैमान चालू होतं. 'आता शेंडे वकील काय उत्तर देतील? ते आपली केस चालवतील का? चालवली त्यांनी तरी आपण खात्रीने त्यातून सुटू का? सुटलो तरी पुन्हा नोकरीवर सन्मानाने जाता येणार का? तिथे आपल्याला विश्वासाने वागवतील का? आणि नाहीच सुटलो तर??? घरा दाराचं काय? बायको आणि पोरा-बाळांचं काय? आणि अब्रू? तिचे तसे तर आत्ताही आत्ताही धिंडवडे निघालेच आहेत. काय स्सालं जग आहे... अख्ख्या इन्कमटॅक्स डिपार्टमेंटमधे बाकी सगळे सावंच बसले आहेत ना...; या 'एसीबी'वाल्यांना मीच एकटा बरा दिसलो...'
"अहो आपटे; सरांनी आत बोलावलंय."
शेंडे वकिलांच्या असिस्टंटने हाक मारल्यावर आपटे भानावर आले. आजूबाजूला नजर फिरवली तर पक्षकारांची गर्दी विरळ झाली होती. घड्याळाचा काटा पाऊण तासाने पुढे सरकला होता. आपट्यांना आपल्याच तंद्रीचं आश्चर्य वाटलं. ते लगबगीने शेंडॅ वकिलांच्या केबिनमधे शिरले. असिस्टंटने त्यांच्या कागदपत्रांची फाईल शेंडॅ वकिलांच्यासमोर आणून ठेवली.
"नमस्कार वकीलसाहेब."
"नमस्कार. या आपटे. बसा. हे बघा आपटे; केस मोठी कठीण आहे. अँटी करप्शनच्या पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल आणि कागदपत्रांचा मोठा पुरावा उभा केलाय. काही साक्षीदारही जमवलेत."
आपट्यांच्या मनात धडकी भरली. 'आता शेंडे वकील नाही म्हणतायत की काय...!"
"पण आपटे; तरीही मी तुमची केस घ्यायला तयार आहे. मी तुम्हाला यातून सोडवूही शकतो. पण त्यासाठी माझ्या काही अटी असतील. एक तर या खटल्यासाठी मी दोन लाख रुपये फी घेणार! शिवाय खटला तुम्हाला अनुकूल व्हावा यासाठी काही कागदपत्रं बनवावी लागतील. काही माणसं तयार करावी लागतील. त्यासाठी एक लाख रुपये वेगळे द्यावे लागतील. आणि हे सगळे पैसे खटल्याचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच..."
"हो हो वकीलसाहेब. माझी काही ही हरकंत नाही..."
शेंडे वकिलांच्या होकाराने आपट्यांच्या जीवात जीव आला. काहीशा उतावीळपणानेच ते म्हणाले;
"वकीलसाहेब दोनंच दिवसात मी हे पैसे आणून देतो. पण तुम्ही ही केस चालवा आणि मला यातून सो..."
"अहो आपटे; पूर्ण ऐकून घ्या आधी. माझं बोलणं संपलेलं नाहीये..."
"बोला ना वकीलसाहेब..."
"मी तुमचं वकीलपत्रं घ्यावं असं जर तुम्हाला वाटंत असेल तर पुढच्या वेळी येताना आपटे वहिनींना बरोबर घेऊन या. या खटल्याच्य संदर्भात मला त्यांच्याशी खाजगीत काही बोलायचंय. त्यांना काही विचारायचंय."
"पण... पण... वकीलसाहेब... ती... तिचा या खटल्याशी काय संबंध? त्याबाबत तुम्ही तिला काय विचारणार? आणि ती तरी तुम्हाला काय आणि कसं सांगणार?
शेंडे वकिलांच्या या विचित्र अटीने आपटे चक्राऊन गेले.
" संबंध आहे आपटे. मी त्यांना काय विचारीन आणि सांगीन ते वहिनीच तुम्हाला सांगतील. तुम्ही दोघांनी त्यावर पूर्ण विचार करा आणि मग मला भेटा. तुम्हाला वाटलं तर वकीलपत्र करू. नाही तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा..."
"अहो पण वकीलसाहेब; तुम्ही तिला सांगणार; मग ती मला सांगणार; आम्ही दोघं त्यावर विचार करणार आणि मग निर्णय घेणार. त्यापेक्षा तुम्ही मलाच सांगा ना काय ते. मी तिच्याशी बोलीन आणि आम्ही ठरवू काय करायचंय ते..."
"हे बघा आपटे; मी सांगतो तसं करा. एक तर मी त्यांना जे सांगीन, विचारीन; ते तुम्ही सांगू, विचारू शकत नाही. त्यातून तसं धाडस केलंतंच तर ते तुमच्या अंगाशी येण्याची शक्यतांच अधिक! तुमच्या भल्याचं तेच मी सांगतोय. ऐकायचंय तर ऐका नाही तर दुसरा वकील बघा. आता माझा जास्त वेळ घेऊ नका. या आता.
"अहो पण वकीलसाहेब..."
"आपटे तुम्ही या आता."
---------------------------------------------------------
अर्धा तास झाला तरीही सुनीताबाई शेंडे वकिलांच्या केबिनमधून बाहेर पडल्या नव्हत्या. इकडे कोचावर बसून आपट्यांची चुळबूळ चालू होती.पेपर आणि मासिकं चाळण्यातही मन लागत नव्हतं. मधेच आत-बाहेर करणार्या असिस्टंट्सनी केबिनच्या दाराची उघड-झाप केली की त्यांचे डोळे आणि कान चाहूल घ्यायचा प्रयत्न करायचे. पण आत काय चाललंय याचा मागमूसही लागत नव्हता. अखेर बेचैनीचा ताण असह्य होऊन आपटे ऑफिसातून बाहेर पडले. खिशातून पाकिट काढलं आणि सिगरेट शिलगावली.
इकडे सुनीताबाईंच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्ह्तं. आतापर्यंत आसवं गाळंत शेंडे वकिलांचं बोलणं ऐकून घेणार्या सुनीताबाईंच्या सहनशक्तीची आता मात्र हद्द झाली. त्या धाय मोकलून रडायला लागल्या. शेंडे वकील आपल्या खुर्चीवर शांतपणे डोळे मिटून बसले होते. हाताच्या तळव्यावर तळवा ठेऊन त्यांनी बोटं एकमेकांत गुंफली होती. त्यांची एक असिस्टंट वकील सुनीताबाईंच्या खांद्यावर हात ठेऊन उभी होती. अधून मधून त्यांच्या केसातून हात फिरवंत त्यांचं डोकं थोपटंत होती. सुनीताबाईंच्या रडण्याचा आवेग ओसरताच शेंडे वकील खुर्चीवर सावरून बसले. त्यांनी दोन्ही हात समोरच्या टेबलवर टेकवले आणि आपल्या धीर-गंभीर आवाजात पुन्हा बोलू लागले.
"हे बघा आपटे वहिनी; मी जे काही तुम्हाला हे सगळं करायला सांगतोय ते काही मोठ्या खुशीने सांगतोय असं अजिबात नाही. पण एक वकील म्हणून हाच एक खात्रीशीर आणि एकमेव मार्ग मला दिसतोय. असं करण्याचे आणि न करण्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम मी तुम्हाला सविस्तर सांगितलंय. शेवटी 'चॉईस इज युवर्स.' कोणते परिणाम भोगण्याची आपली क्षमता आहे आणि कोणते नाही हे तुम्ही ठरवायचंय."
मोठ्ठा पॉज घेऊन शेंडे वकिलांनी एक दीर्घ उसासा टाकला आणि म्हणाले;
" वहिनी एक शेवटची गोष्ट तुम्हाला वकील म्हणून नाही तर एक हितचिंतक म्हणून सांगतो. बहुतेक पुरुषांच्या बहुतेक विशिष्ट कृत्यांना बहुतेकवेळा प्रेरणा ही कुठली तरी स्त्री असते. आपटे वहिनी फरक लक्षात घ्या. मी जबाबदार हा शब्द वापरत नाहीये. मी 'प्रेरणा' म्हणतोय. जगातल्या सर्व प्रकारच्या मानवी भाव-भावनांचं सखोल चित्रण ठळकपणे उलगडून दाखवणार्या रामायण, महाभारताचं उदाहरण घ्या. स्त्री हीच प्रेरणा! सत्कृत्यांना आणि दुष्कृत्यांनाही! वहिनी; आपटे यांच्या वाममार्गाने पैसे कमावणाला तुम्ही जबाबदार नव्हतात. पण या गोष्टीपासून अनभिज्ञ तर नक्कीच नव्हतात. त्यांना या भ्रष्टाचारापासून परावृत्त करणारी 'प्रेरणा' होण्याचा सन्मान तुम्ही जाणून बुजून गमावलात. उलट त्या काळ्या पैशाचा उपभोग तुम्ही ही मोठ्या चवी चवीने घेतलात. मग तीच आपट्यांच्या धनलोलुपतेची प्रेरणा ठरली नसेल कशावरून?"
शेंडे वकिलांच्या बोलण्याने आता वेगळंच वळण घेतलं. तशाही अवस्थेत सुनीताबाईंच्या डोक्यात तेच शब्द घुमायला लागले. काही वेळापूर्वीचं रडं विसरून त्या डोळे विस्फारून आणि तोंडाचा आ वासून शेंडे वकिलांकडे बघतंच राहिल्या.
"आपटे वहिनी उठा आता. काय तो विचार करा. मला सांगा. आणि सर्वात महत्वाचं; खटल्याचं काय व्हायचं ते होईल. पण मी शेवटी जे सांगितलं त्यावर जरुर विचार करा."
सुनीताबाई अक्षरशः यंत्रासारख्या उभ्या राहिल्या आणि काही ही न बोलता केबिनच्या बाहेर पडल्या. आपटे ताडकन उभे राहिले. त्यांच्या नजरेत उत्सुकता होती. मात्र सुनीताबाईंची भारलेल्या झाडासारखी अवस्था बघून त्यांचे शब्द घशातंच थिजून गेले. त्यांनी सुनीताबाईंचा हात पकडला आणि घरचा रस्ता धरला.
--------------------------------------------------------
यथावकाश खटल्याचं कामकाज सुरू झालं. आपटेंनी गुन्हा नाकारला आणि ही संपत्ती आपली नसून आपल्या पत्नीच्या मालकीची असल्याचं सांगितलं. साक्षी, पुरावे, तपासण्या, उलट तपासण्या पार पडल्या. आता सुनीताबाईंच्या परिक्षेचा दिवस उजाडला. सरकारी वकील अॅड.सोमनाथ थोरात सुनीताबाईंची उलट तपासणी घेणार होते. देवा शपथ..., नाव, गाव, पत्ता, वय वगैरे औपचारिक सोपस्कार आटोपले आणि उलट तपासणीचा मुख्य भाग सुरू झाला.
"सुनीताबाई तुम्ही नोकरी करता?"
"नाही"
"मग ही जी स्थावर, जंगम मालमत्ता तुम्ही आपल्या मालकीची असल्याचं सांगता ती तुम्हाला वारसा हक्काने मिळालेली आहे का?"
"नाही. भावाचं मार्गी लागेपर्यंत; म्हणजे वडलांच्या हयातीत माहेरची परिस्थिती बेताचीच होती."
"मग ही संपत्ती तुम्ही कशी मिळवलीत सुनीताबाई?"
"मी मागच्या दहा वर्षापासून व्यवसाय करते."
" कसला व्यवसाय करता तुम्ही सुनीताबाई? त्याची सरकार-दरबारी काही अधिकृत नोंद, काही हिशोब-ठिशोब?
"मी... मी... व... वेश्याव्यवसाय करते.
सुनीताबाईंनी मान खाली घालून सुरुवातीला जरा अडखळंत; पण नंतर ठामपणे उत्तर दिलं. सगळा न्यायकक्ष अचंबित झाला. एका शासकीय अधिकार्याची पत्नी, सुसंस्कृत घरातली मुलगी;सधन, पांढरपेशा घरातली ही बाई 'धंदा' करते...!!! संपूर्ण न्यायकक्षात सन्नाटा पसरला.
"काय?"
थोरात वकिलांनी आपल्याच नकळंत पुन्हा विचारलं. आपला आवाज अकारणंच वाढल्याचं त्यांनाही जाणवलं. अवसान गोळा करून सुनीताबाईंनी मान वर केली आणि न्यायधीशांकडे पहात सांगितलं;
"होय. मी गेल्या दहा वर्षापासून वेश्याव्यवसाय करते. माझ्याकडे त्यासाठी आवश्यक परवानाही आहे."
शेंडे वकिलांच्या असिस्टंटने एक कागदाचा चिठोरा न्यायाधीशांच्या बाजूला बसलेल्या टायपिस्ट्च्या हातात दिला.
"...पण एवढ्या सुशिक्षित, सुसंस्कृत, सधन घराण्यातल्या असूनही तुम्ही...?"
"माझे पती अनेकदा दीर्घकाळासाठी कार्यालयीन कामानिमित्त परगावी जात असल्याने माझा कोंडमारा व्हायचा. त्यातूनंच एकदा पाऊल वाकडं पडलं आणि..."
सुनीताबाईंनी पदर तोंडाला लावला आणि त्यांची मान खाली झुकली.
"सुनीताबाई; विचारणं अप्रशस्त वाटतं... पण ईलाज नाही... या व्यवसायातून तुम्ही इतकी संपत्ती जमा केलीत... तुमचा... तुमचा 'रेट' किती?"
या जीवघेण्या प्रश्नोत्तरांनी खचत चाललेला धीर सुनीताबाईंनी मोठ्या प्रयत्नांनी पुन्हा एकवटला. शेंडे वकिलांचेच शब्द त्यांच्या कानात घुमत होते. 'आपण आपल्या पतीला आजपर्यंत लाचखोरीपासून परावृत्त न केल्याचं पापक्षालन या मार्गाने तरी करू. कदाचित या दारुण अनुभवाने का होईना... ते या मार्गापासून दूर होतील...' स्वतःला दिलासा देत सुनीताबाई सावरू पहात होत्या.त्यांनी पदराने डोळे पुसले. पुन्हा मान वर केली आणि न्यायाधिशांकडे पहात म्हणाल्या;
"साहेब या व्यवसायात ठराविक दर नसतो. प्रत्येक ग्राहकानुसार तो बदलू शकतो. शिवाय मिळणारं सगळं उत्पन्न मोबदला म्हणून नाही मिळंत! कुणी प्रेमाने काही जास्त देतो; कुणी आस्थेने! कुणी दया म्हणून किंवा कुणी फुशारकी मिरवण्यासाठीही! कुणी पैशाच्या स्वरुपात देईल तर कुणी भेटवस्तूंच्या स्वरुपात! भेटवस्तू काहीही असू शकते ना साहेब! देणार्याच्या इच्छेप्रमाणे!! साहेब इथे ग्राहकसंख्या निश्चित नसते. कामाचा कालावधी निश्चित नसतो आणि मिळणारं उत्पन्नही निश्चित नसतं. ना याचा हिशोब कुणी करतो; ना कुणी मागतो! याचं कुठंलंही ऑडिट नसतं साहेब! शिवाय माझे पती शासकीय नोकरीत अधिकार पदावर आहेत. माझ्या खर्चावर त्यांचं कोणतंही बंधन नसतं. माझ्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या गरजा आणि हौशी- मौजीही त्यांच्या पगारातून व्यवस्थित भागतात. त्यामुळे माझं सगळं उत्पन्न जसं च्या तसं बाजूला पडतं. त्यातून मी ही संपत्ती जमवली साहेब!"
थोरात वकीलंच नव्हे तर न्यायकक्षातले सगळेच जण कान टवकारून आणि डोळे विस्फारून सुनीताबाईंकडे पहात होते. बहुतेकांच्या नजरेत अविश्वास होता अन करुणाही! शेंडे वकिलांसारख्या माणसाच्या डोळ्यातही आसवं आली. आणि आपटे... त्यांची अवस्था तर मेल्याहून मेल्यासारखी...!
"थोरात वकील तुम्हाला अजून काही विचारायचंय?"
त्या असह्य शांततेचा भंग करंत न्यायाधीशांनी विचारलं.
"अं"
थोरात वकिलांनी चमकून न्यायधीशांकडे बघितलं.
"न... नाही मिलॉर्ड. दॅट्स ऑल.
--------------------------------------------------------------
तीरकस; ही कथा सुमारे ३०
तीरकस;
ही कथा सुमारे ३० वर्षांपूर्वीच्या घटनेवर आधारीत आहे.
Pages