मायेची सय

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बसले होते अशीच..
आभाळाचे पसरलेले असंख्य तुकडे गोळा करून,
प्रत्येक तुकडा वेगळा, अस्तित्वहीन..

गेल्या वर्षी श्रावणात वेचलेल्या पागोळ्या होत्या ओच्यात,
त्यांचं चांदणं ओवायचं होतं..

पण मनात होती अनामिक भीती..
पागोळ्या सांडल्या तर?
माझ्या आभाळाच्या विजोड चिंध्या झाल्या तर?

मग कुठून तरी आली मौनरवे हजारोंनी,
डोळ्यांत तरळली तुझी स्निग्ध नजर..
घेऊन आली माझी चिऊ-काऊची स्वप्ने..

आणि आई! क्षणाक्षणाला थरथरणारी पानं शांत झाली.
दरवळली जाई जुईची वेल..
क्षणात आभाळ चमकू लागलं,
चांदण्यांचा कशिदा खुलून आला,
मायेची सय मनाच्या डोहातून तरंगत गेली..

आई, तू जन्मोजन्मींची कुबेर..
निळ्या रंगाच्या चंद्राला, रात्रभर गोष्ट सांगून जोजवणारी जादुगार..

माझ्या टिपरीला रंग द्यायला,
पिवळ्याधम्म शेवंतीतून ओवी ओवायला,
सागरगोट्याच्या काचेतून समुद्र पहायला,
माझं इवलंसं आभाळ समृद्ध करायला,
अशीच येशील ना?

विषय: 
प्रकार: 

धन्यवाद सास आणि गिरीश.
सास, ही कविता लिहीतांना मी रडतच होत्ये, पण आजही ती वाचतांना डोळ्यात पाणी येतच.