नटखट

Submitted by दाद on 22 February, 2008 - 00:18

नको अशी मागे मागे
वळूनिया पाहू
तुझ्या पुढे काळजाचे
ठोके जाती धावू

निथळती केश गाठ
मानेवर आंदोळत
तिच्यासंगे झुलतो ग
नजरेचा राऊ

एक तीळ अलवार
अधराच्या कडेवर
त्याला चाखण्याची, गोड
खोड नको दावू

कमरेस गोल घट
डचमळे काठोकाठ
हृदयाचे तारू लागे
हिंदकळे खाऊ

पीळू नको उचलुनी
चिंब पाटवाचा काठ
जीव म्हणे, ’आता जातो...
...र्‍हातो... का जाऊ...?’

-- शलाका

गुलमोहर: 

क्या बात है दाद.. मस्त! 'आंदोळत' शब्द काय बसलाय!

काय सही लिहिले आहेस!! Happy

वा, शलाका! काय सुरेख लिहिलयस ग.

शलाका कविता खुप छान आहे
पुन्हा पुन्हा वाचली
--------- गणेशा

हाय्...काय मस्त लिहिलय... आंदोळत, डचमळे, हिंदकळे काय एकेक शब्द वापरलेस... तुझी कविता म्हणजे नेहमी किमान एक तरी नवा शब्द शिकाय्ला मिळतो. धन्यवाद त्यासाठी. अशीच लिहित राहा.
-प्रिन्सेस...

क्या बात है ..... !!!!!!!!!!!!

परागकण

दाद, कविता शृगांरीत वाटली आणि मला शृंगारीत कविता खूप आवडतात.

बर, पाटवाचा काठ म्हणजे नक्की काय?

एक कॅलेंडरवरल्या पाठमोर्‍या एका ललनेचं चित्र बघितलं होतं. कमरेवर घट आहे, वगैरे वगैरे... त्यावरून सुचलेले शब्द. खूप म्हणजे खूप जुनी आहे....
बी, तुम्हाला शृंगारिक म्हणायच का? पाटव म्हणजे नेसूचं वस्त्र.

व्वा! वाचताना आपण पण त्या तालात हिंदकळे खातोय असं वाटत होतं. सहीच जमलीय.
र्‍हातो का जाऊ? Happy

निथळती केश गाठ
मानेवर आंदोळत
तिच्यासंगे झुलतो ग
नजरेचा राऊ

ए एकेक शब्द काय फुलवतेस गं....... सलाम !!

हाय रे अदा... मार डाले ना!!!...

झक्कास... एक शिट्टी वाजवावी अशी कविता.... मस्त..

तिच्यासंगे झुलतो ग
नजरेचा राऊ
Happy

शल्काताई, सुरेख शब्दचित्र मांडलत. पण आवडीचा पदार्थ तोंडात टाकला आणि संपला असं झालं मला. जssरा मोठी असती कविता तर अजून आवडले असते.

नको अशी मागे मागे
वळूनिया पाहू
तुझ्या पुढे काळजाचे
ठोके जाती धावू

मदनालाही वाटेल हेवा बहुधा. जरी आपला शब्द साधा सुधा. स्वप्नांची अजोड देणगी, राधेला कृष्णाची बाधा.
सुंदर!! Happy

दाद,

शांताबाईंच्या "हिची चाल तुरुतुरु" ची आठवण करुन दिलीत..खुप सुंदर!

(अवधुत गुप्ते ला पाठवुन बघा..छान चाल आणि संगीतावर मस्त वाटेलः)

धन्यवाद..

जीव म्हणे, ’आता जातो...
...र्‍हातो... का जाऊ...?
दाद गं दाद,
आय हाय

पल्लवी जोशी मोड ऑनः
या कवितेतल्या शब्दांच्या निवडीसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत
पल्लवी जोशी मोड ऑफः

जोक्स अपार्ट, पण काय एकेक शब्द आहेत.... आंदोळत, नजरेचा राऊ, अलवार, डचमळे, हिंदकळे, पाटवाचा काठ.... कस सुचत बाई!

सलाम! दाद....दाद ओन्ली! तुम्ही आता अक्षरशः शब्दांच्या आई झालात! अगदी आठवण केलीत तरी सगळे शब्द हव्या त्या लय, ताल, मात्रांसकट हव्या त्या आकारात तुम्हाला बिलगण्यासाठी धावत येतात.

डोळ्यांसमोर चित्रच आलं..

काय शब्द वापरलेत आणि त्यातून साधलेला इफेक्ट !!

शेवटचं कडवं तर कळस !!!

अप्रतिम....

दहा मधे नोंदवतेय.

अप्रतिम......
एक से बडकर एक शब्दप्रयोग...

शांताबाईंच्या "हिची चाल तुरुतुरु" ची आठवण करुन दिलीत..>> अनुमोदन..