"शैलु, चल आम्ही निघतोय आता. खुप रात्र झालीये. तू थोडा वेळ पड इथे.आणि हो, जास्त विचार करत बसु नकोस.
आता आदित्य "आऊट ऑफ डेंजर" आहे, डॉक्टर म्हणालेत ना. ४-५ दिवसात घरी पण येईल बघ तो." वोकहार्ड्ट हॉस्पीटलच्या आय.सीय़ु बाहेर रुना शैलजाच्या जवळ बसुन तिला समजावत होती. ती जे काही बोलत होती ते शैलजाला कळतंय याची आता तिला खात्री वाटत होती. नाहीतर काही तासांपुर्वी तिला कशाचंही भान नव्हतं.
श्वास अडकेपर्यंत रडत होती ती. परिस्थिती पण खुप वाईट होती. किती भयानक अपघात झाला होता आदित्यला. हॉस्पीटलला आणलं अमितने तेव्हा पुर्ण स्ट्रेचर रक्तानं भरुन गेलं अवघ्या २० मिनीटात! त्याची ती अवस्था पाहुन शैलजा जागीच कोसळली भोवळ येऊन! तिला रुनाने सांभाळलं. आदित्यच्या डोक्याला जबरदस्त मार बसला होता. डॉक्टरांना तातडीने ऑपरेशन करावं लागणार होतं. जवळजवळ २ तासांच्या आतल्या अथक प्रयत्नांचा आणी बाहेरच्या जीवघेण्या ताणाचा शेवट डॉक्टरांनी आदित्य "आऊट ऑफ डेंजर" असल्याचं सांगुन केला होता. शैलजा अजुनही थरथरत होती.
रुनाने तिच्या खांद्यावर हात टाकुन तिला सावरलं," शैलु...अगं अशी काय करतेस. आदित्य ठीक आहे आता. बघ डोळे किती सुजवलेस रडुन रडुन. आदित्य शुद्धीवर आल्यानंतर अशी जाणार आहेस का त्याच्या पुढ्यात?"
"रुना, हे काय विचीत्र होऊन बसलं गं. किती लागलंय आदित्यला...बाप रे! मला तर अजुन शहारा येतोय अंगावर!"
"अगं, ऍक्सीडंट तेवढा मेजर होता ना. नशीब, आता काही धोका नाही आहे. अमितही बोललाय डॉक्टरांशी. त्याला २४ तास निरीक्षणात ठेवावं लागणार आहे. उद्या जर त्याने उपचारांना नीट साथ दिली, तर त्याला नॉर्मल वॉर्डला पण शिफ्ट करतील ते. आणि हे बघ, काकांना आणि आदित्यला तुलाच सांभाळायचं आहे ना आता, तूच आशी खचुन गेलीस तर कसं चालेल?" रुनाला मिठी मारुन शैलजाने आणखी दोन टिपं गाळली.
तेवढ्यात अमित आला. तोही शैलजाच्या शेजारी बसला. त्याने हातातलं पॅकेट तिच्या मांडीवर ठेवलं.
"शैलु, खाऊन घे थोडंसं. नाही म्हणु नकोस प्लीज. आदित्यला अजुन आठ तास तरी अनेस्थिशियाची गुंगी राहील. तू दुपारपासुन काही खाल्लं नाही आहेस. थोडंसं खा."
"नाही रे अमित, मला इच्छा नाही अजीबात."
" शैलु, आदित्यसाठी खा, त्याला बरं वाटावं म्हणुन. मी काकांनाही देऊन येतो थोडं" अमितने त्यातलं एक सँडवीच घेतलं आणी तो काकांजवळ गेला. त्यांनाही कसंबसं खायला लावलं त्याने.
"चला काका, आम्ही दोघे निघतो आता. चल शैलु, काळजी घे." अमित वळु लागला आणि रुनाही ऊठली.
"अमित, आदित्य बरा होईल ना..." शैलु त्याच्याकडे भरल्या डोळ्याने पाहत होती.
तिचा हात हातात घेऊन, हलकेच दाबत त्याने डोळ्यानेच तिला समजावलं. "काही होणार नाही त्याला. भरोसा ठेव. टेक केअर. बाय."
ती दोघे निघुन गेल्यावर शैलजा काकांच्या म्हणजे आदित्यच्या बाबांच्या शेजारी जाऊन बसली. तिच्या डोळ्यांसमोरुन आदित्यचा प्रसन्न चेहरा जातच नव्हता...
सोनटके आणि गडकरींचा परेलच्या चाळीपासुनचा सख्खा शेजार होता. घरातल्या कुणाच्या पोटदुखीवरच्या औषधापासुन ते सणासुदीला दोन्ही घरात शिजलेल्या सगळ्या पदार्थांतल्या एक भागापर्यंत सगळ्याची देवाण-घेवाण असायची दोन्ही कुटूंबात. सुख-दुःखाच्या प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगी दोन्ही घरातले कुटूंबीय अगदी भक्कमपणे एकमेकांसोबत असायचे. सोनटक्यांची शैलजा आणि गडकऱ्यांचा आदित्य आणि कनिका शाळेत जाताना, खेळताना, इतकंच काय तर दोन्ही वेळेस जेवताना पण एकमेकांसोबत असायची. तिन्ही मुलं आनंदात एकत्र वाढत होती. दोन वेळेचा साधा डाळ-भातही त्या चाळीतल्या छोट्याश्या दोन खोल्यांमधे ही मुलं पंचपकवान्नांचा आनंद घेऊन खायची. सगळं सुरळीत चाललं होतं. एक वेळ शैलजाच्या आई-बाबांना गावाला तिची आजी खुप आजारी असल्या कारणाने तिकडे जावं लागणार होतं. शैलजाची शाळा असल्याने आणि आदित्य-कनिका आणि त्यांच्या आईच्या आग्रहाखातर शैलजाला तिच्या आई-बाबांनी त्यांच्याकडेच ठेवलं ४ दिवसांसाठी. तिकडुन परत येताना मात्र त्यांच्या बसला जोरदार अपघात झाला आणि ती दोघेही त्यात गेली! ६ वर्षांची शैलजा आदित्यच्या आईच्या कुशीत शिरुन खुप रडली. आदित्यची आई तिचं मायेने सगळं करायची. काही दिवसांनी शैलजाचा काका तिला नाशीकला त्यांच्या गावी घेऊन जायला आला. शैलजा अजीबात तयार नव्हती जायला. आदित्य आणि कनिका पण तिला सोडत नव्हते. पण काकाचा आग्रह होता, "दादा-वहीनीनंतर शैलुची जबाबदारी माझी आहे." असं म्हणुन तो तिला घेऊन गेला. त्यानंतर तिन्ही मुलांची ताटातूट झाली ती थेट अकरा वर्षांसाठी! शैलजाने इंजीनियरिंगसाठी आदित्यच्या कॉलेजमधे ऍडमिशन घेतली. अकरा वर्षांनी तिला बघुन सुद्धा आदित्यने तिला लगेच ओळखलं. अगदी तशीच तर होती शैलु..अगदी सरळ नाक, घारे डोळे, सावळा रंग...सगळं तसंच...फक्त केसांच्या दोन वेण्या गायब झाल्या होत्या. त्यांची जागा आता छान लांब मोकळ्या केसांनी घेतली होती. आदित्य मात्र खुप देखणा झाला होता. बऱ्यापैकी उंच, मध्यम बांध्याचा आणि दाट काळ्याभोर भुरभुरीत केसांचा.
आदित्य शैलुला एक वर्ष सिनीयर होता. त्याची आभ्यासात तिला मदत झालीच पण कॉलेज मधे होणाऱ्या सगळ्या फेस्टीवल्स मधुन, कल्चरल कार्यक्रमातुन आदित्यने शैलुच्या आभिनयाच्या अंगाला भरपुर वाव मिळवुन दिला. तो तिला पुरेपुर साथ द्यायचा सगळ्यात, त्यालाही आवड होतीच अभिनयाची. सलग तीन वर्षे त्यांची जोडी हीट ठरली कॉलेजच्या नाटकात.दिवसातले जवळ जवळ १२-१५ तास सोबत असायची दोघे. त्यानंतर शैलु तिच्या हॉस्टेलला निघुन जायची आणि आदित्य त्याच्या घरी. अमित आणि रुनाही त्यांच्या ग्रुपचा भाग बनले. अमित शैलुच्याच वर्गात होता. त्याला तर आभ्यासापेक्षा ह्या फेस्टीवल्स मधेच जास्त रस असायचा. पण कधी साधी के.टी पण नाही लागली पठ्ट्याला चार वर्षात. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करुन पास व्हायचाच. शैलुचे नोट्स होतेच मदतीला. रुनाही मदत करायची त्याला. पण इंटरनेटवरुन काहीही माहिती मिळवायची असली की अमित नेहमी सज्ज असायचा. कुठली माहिती कुठल्या साईटवर मिळेल, कुठून काय खरेदी करता येईल, काय शोधता येईल, काय डाऊनलोड करता येईल, सगळं सगळं त्याला माहित असायचं. दिवसातले कॉलेजमधले सोडले तर बाकी सगळे तास हा मुलगा नेटवर असायचा काही न काही करत. कॉलेजमधे म्हणुनच तो "नेट गुरू" म्हणुन प्रसिद्ध होता.
दरम्यानच्या काळात, आदित्य बारावीला असताना त्याची आई कर्करोगाने वारली. कनिकाने तिचं ग्रॅज्युएशन पुर्ण केलं आणि बाबांनी तिचं लग्न लावुन दिलं होतं. ती तिच्या नवऱ्यासोबत लंडनला स्थित होती. साहजीकच आदित्य आणि शैलु मनाने फार जवळ आले. बाबांनीही त्यांचं प्रेम ओळखलं होतं. आदित्यला कॉलेज कॅंपस मधुनच छान पगाराची नोकरी मिळाली होती. शैलुचं पण शेवटचं सेमीस्टर पुर्ण झालं होतं. तिलाही कॅम्पस मधुन जॉब मिळालाच होता. आता लवकरच त्यांचं लग्न होणार होतं. ह्या महिन्यात साखरपुड्याचा मुहूर्त काढला होता. पण आज अचानक हा भयानक प्रसंग घडला. आदित्य शैलुला भेटायला जात होता. साखरपुड्याची खरेदी करायला दोघे निघणार होते. पण वाटेतच आदित्यच्या बाईकला एका ट्रकने मागुन जोरदार धडक दिली. आदित्यच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
शैलु आदित्यच्या बाबांच्या शेजारी होती, पण दूर कुठेतरी हरवली होती विचारात. वेटींग रूम मधे दोन्ही हात मागे बांधुन फेऱ्या मारत असलेल्या आदित्यच्या बाबांकडे मधेच एक आशाळभूत नजर तिने टाकली. त्यांनी तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात तिला आधारापेक्षा जास्त विश्वास जाणवला, सारं काही पुन्हा पुर्ववत होण्याचा. एक नवी तरतरी वाटली तिला. "काही होणार नाही त्याला, भरोसा ठेव.." तिला अमितचे ठाम शब्द आठवले. खुर्चीत बसल्या बसल्या पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला.
सकाळी लवकरच रुना नाश्त्याचा डबा घेऊन आली. तिने शैलुला उठवलं आणि फ्रेश व्हायला लावलं. काकांना आणि तिला थोडं खाऊ घातलं. कालपासुन दोघांच्याही पोटात काही व्यवस्थित असं गेलं नव्हतं. दहा नंतर पेशंट्सना भेटण्याची वेळ चालु झाली. शैलु पहिले जाऊन आदित्यला पाहुन आली. तो अजुनही शुद्धीवर आला नव्हता. होस्पीटलमधे गर्दी वाढु लागली होती. अमित आल्यानंतर रुना आणि तो पण आदित्यला दुरून बघुन आले. बाबांना शैलुने बळेच घरी पाठवलं होतं. खुप ओढाताण झाली होती त्यांची कालपासुन.
तासा-दीड तासाने नर्स वेटींग रूम मध्ये आली आणि आदित्य गडकरींचे कोणी नातेवाईक आहेत का विचारू लागली. शैलुच्या ह्रुदयाची धडधड वाढली अचानक. अमित पुढे गेला आणि नर्सशी बोलला. मग रुना आणि शैलु जवळ जाऊन म्हणाला, "शैलु, आपला आदित्य शुद्धीवर आलाय. डॉक्टर बोलवताहेत आपल्याला. चल." शैलजा त्याच्याकडे पाहुन हसली. तिच्या मनातली हुरहुर डोळ्यातुन आनंदाश्रु बनुन बाहेर आली.
" डॉ. श्रेयस पुराणीक " केबीनच्या दरवाजावर नेम प्लेट होती. रुना, शैलजा आणि अमित आत शिरले.
"या, बसा. आपण आदित्य गडकरींचे..." डॉ. अमितकडे पाहुन म्हणाले.
" आम्ही त्याचे मित्र आहोत. आणि ही त्याची फियानसी." अमित शैलुकडे पाहुन म्हणाला.
" ओ.के. हे पहा, पेशंट आता पुर्णपणे धोक्याबाहेर आहे. आपण त्याला उद्या नॉर्मल वॉर्डला पण हलवु शकतो. फक्त आजचा दिवस खुप क्रुशियल आहे. आज त्याला हेडेक जाणवेल फार कारण आता गुंगी पुर्ण उतरली आहे. जर त्याला वेदना फारच असह्य झाल्या तरच आम्ही त्याला पेनकिलर देऊ. आणि ह्या वेदना प्रमाणाबाहेर असल्या तर त्यामुळे तो कोमातही जाऊ शकतो. म्हणुनच आजचा दिवस आम्ही त्याला अंडर ऑब्झरवेशन ठेवणार आहोत. इमरजेन्सी साठी तुम्ही हे पेनकीलर इंजेक्शन आणुन नर्स कडे द्या. हे जवळपास कुठे मिळणार नाही, खुप स्ट्रॉंग ड्रग आहे, म्हणुन हॉस्पीटलमधे पण स्टॉक नसतो त्याचा. तुम्हाला जरा शोधावं लागेल." डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शन अमितच्या हातात दिलं. शैलुच्या चेहऱ्यावर पुन्हा टेन्शन दिसु लागलं.
" काळजी करु नका. सर्व ठीक होईल." डॉ.पुराणिक तिच्याकडे पाहुन बोलले.
"डॉक्टर, मी त्याला भेटु शकते?"
"आता विझीटींग आवर्स संपले आहेत. संध्याकाळी चारला पुन्हा चालु होतील. तेव्हा तुम्ही भेटा त्यांना. पण फार बोलु नका त्यांच्याशी. त्यानेही पेन वाढु शकतं."
"ठीक आहे डॉक्टर." म्हणत अमित उठला. रुना आणि शैलजाही उठल्या आणि बाहेर आल्या. शैलजाने बाबांना फोन करुन सगळं सांगितलं. ते लगेच यायला निघाले होस्पीटलला. पण विझीटिंग आवर्स चारला सुरू होणार असल्याचं सांगुन शैलुने त्याने ३-३.३० पर्यंत यायला सांगितलं.
"चला, आदित्य आता लवकरच बरा होईल. इस खुशीमे एक एक कप कॉफी हो जाये.." अमित डॉक्टरांच्या केबिन मधुन बाहेर पडताच त्या दोघींकडे पाहत म्हणाला. ती तिघे हॉस्पीटलच्या कॅफेटेरीया मध्ये कॉफी घ्यायला गेली. थोड्याच वेळात डॉक्टर पुराणिकही आणखी एका डॉक्टरांसोबत तिथे चहासाठी आले.ह्या तिघांकडे पाहुन ते स्मित हसले आणि चहा ऑर्डर करुन ह्या तिघांच्या शेजारच्या टेबलवर बसले.
"मला नाही वाटत साखरपुड्याची तारीख लांब ढकलायला लागेल. अगं बरेच दिवस आहेत अजुन. आदित्य होईल बरा तोपर्यंत. हो की नाही आमित? " रुनाचं शैलजाशी बोलता बोलता अमितकडे लक्ष गेलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की अमित कुठेतरी हरवला होता. त्याचं ह्या दोघींच्या बोलण्याकडे लक्षंच नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर हात फिरवत रुनाने त्याला पुन्हा विचारलं,
"काय रे? काय झालं, कुठे हरवलायस?"
"अं..काही नाही. चला निघुया, मला हे इंजेक्शन आणायला पण जायचं आहे. " अचानक दचकुन भानवर येत अमित म्हणाला.
कॉफी संपवुन तिघे निघाले आणि अमित इंजेक्शन आणायला निघुन गेला.
संध्याकाळी विझीटिंग आवर्स सुरू झाल्यावर शैलु आदित्यला भेटुन आली. त्याचे बाबाही तोवर आले होते, तेही भेटले. एवढ्या मोठ्या अपघातातुन पोरगा वाचला म्हणजे खरंच देवाचे खुप उपकार झाले. साखरपुडा झाल्यावर त्या दोघांना घेऊन कुलदेवतेच्या दर्शनाला जायची इच्छा त्यांनी बोलुन दाखवली दोघांना. तसं ठरलंही त्यांचं.
रात्री नर्स येऊन आदित्यला रात्रीचा औषधांचा डोस देऊन निघुन गेल्या. मध्य रात्री शैलुला पुन्हा आदित्यच्या जवळ नर्स काहीतरी करताना दिसली. तिला चिंता वाटु लागली. नर्स बाहेर येताच तिने विचारलं. "काही नाही हो, त्यांना ग्लुकोजमधुन एक मेडीसिन द्यायचं होतं. मघाशी राहिलं होतं. म्हणुन आता इंजेक्ट करुन आले. काही काळजीचं कारण नाही. डोंट वरी." म्हणत तिने शैलुची शंका दूर केली. ती पुन्हा बसली आणि तिचा डोळा लागला.
थोड्याच वेळात तिला कशाचातरी आवाजाने जाग आली. नर्स आणि डॉक्टरांची धावपळ चालु होती. तिने एका नर्सला अडवुन विचारलं,
"बेड नं ३५ चा पेशंट सिरीयस झालाय."..तिच्या कानांवर वीज पडल्यासारखं झालं, बेड नं. ३५ म्हणजे आदित्य. काय झालं असेल त्याला. आता आता तर बरा होता. डॉ.पुराणिकही आले. तिने त्यांना विचारलं." काय झालंय डॉक्टर? आता तर ठिक होता आदित्य..अचानक काय झालं?"
"त्यांच्या हार्ट मधे पेन जाणवायला लागलंय त्यांना..जरा जास्तच!"
"काय? हार्ट पेन? असं अचानक? पण तुम्ही तर म्हणाला होतात झालंच तर हेडेक होईल!" ती भांबावुन गेली एकदम.
" होय हो. कदाचित एखाद्या मेडीसीनचा साईड इफेक्ट असेल. ह्या अधी त्यांना कधी हार्ट प्रॉब्लम होता?"
"नाही हो, माझा आदी कधी साध्या तापासाठी पण डॉक्टरांकडे गेला नाही. कसलाच आजार नाही त्याला. आताच हे एवढं मोठं दुखणं अंगावर आलंय..काय झालं असेल हो डॉक्टर?" तीचा गळा आणि डोळे दोन्ही भरले..
" हे बघा, काळजी करु नका. मी चेक करतो. आमच्या परीने आम्ही सगळे प्रयत्न करतो पेशंट्स ना बरं वाटावं म्हणुन." डोक्टर आत निघुन गेले.
तिने लगेच अमितला फोन केला आणि बाबांना घेऊनच हॉस्पिटलला यायला सांगितलं. तिला काय करावं सुचत नव्हतं. आई-बाबांचं एकमेव सर्वात मोठं छत्र निघुन गेल्यावर तिचं देवाशी फार साख्य राहीलंच नव्हतं. तरी आदित्यसाठी, तिच्या जगण्याच्या कारणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी तिचं किती वेळा साखडं घालुन झालं देवाला! कुणास ठाऊक आत काय चाललं होतं. बराच वेळ कोणीच बाहेर आलं नाही. अमित बाबांना घेऊन हॉस्पिटलला पोचला. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. तिघेही उत्सुक्तेने त्यांच्याकडे पाहु लागले.
ते आदित्यच्या बाबांजवळ गेले आणि खाली मान घालुन उभे राहिले.
"काय झालंय डॉक्टर?" बाबांना काय बोलावं काही सुचत नव्हतं. शैलुच्या तर काळजाचा ठोकाच चुकल्यासारखं वाटत होतं तिला.
" मला माफ करा. आम्ही त्याला नाही वाचवु शकलो!" डॉक्टरांना तिथे उभं राहवेना.
शैलु जागीच कोसळली! अमितला पण दोन मिनीटे काय करावं काही कळलंच नाही. त्याने प्रथम बाबांना बाकड्यावर बसवलं आणि मग शैलुकडे वळला. आता तिला रुनाच सांभाळु शकत होती. त्याने लगेच तिला फोन केला. झोपेत असलेल्या रुनाला पहिले तर ती काही वाईट स्वप्नच बघतीये असं वाटलं. मग भानावर आल्यावर तिला रडु आवरेना...शैलुची काय परिस्थिती असेल!!! ती लगेच निघाली हॉस्पिटलला...पहाटे ३.३० वाजता.... एकटीच!
********************************************************************************
"हॅलो, मोहिते साहेब. मी कॉन्स्टेबल म्हात्रे बोलतोय. साहेब इथे वोकहार्ड्ट हॉस्पिटलला माझ्या मुलाला ऍडमिट केलं होतं, काविळ जास्त झाली होती पोराला. काल रात्री मी इथे एक विचीत्र प्रकार बघितला साहेब!" पहाटे ७ वाजता इंस्पेक्टर मोहिते म्हात्रेचा आवाज ऐकुन आधी वैतागले पण नंतर विचार केला कसला विचीत्र प्रकार आहे ते तर बघुया, एखादं मोठं प्रकरण पकडलं तर आपली बढती तरी होईल.
"कसला विचीत्र प्रकार?"
"साहेब इथे हॉस्पिटलच्या एका नर्सच्या चुकीमुळे एक पेशंट दगावलाय. आणि त्याची ट्रीटमेंट करणारे कोणी डॉक्टर पुराणिक आहेत. ते हे प्रकरण झाकु पाहताहेत."
"तुम्हाला कसं कळलं हे? कोणी सांगितलं?"
"अहो साहेब, मी माझ्या कानांनी ऐकलंय. काल रात्री वेटिंग रुम मधुन बाहेर पडलो जरा हवा खायला बाहेरची तर समोरच्या आय.सी.यू मधे खुप धावपळ होताना दिसली. मला वाटलंच कुठलातरी पेशंट सिरीयस असेल. पण अचानक सगळी धावपळ स्थिरावली. म्हटलं काय माहित गेला का काय? जवळ जाऊन बघावं म्हटलं, पण मधे मोठं ग्रीलचं दार. विझीटिंग आवर्सलाच उघडतं ना ते. मग त्याला कान लावुन काही ऐकु येतंय का ते बघु लागलो. आणि मी जे ऐकलं त्यानं दचकलोच! रात्रीची वेळ म्हणुन सगळीकडे शांत होतं. मला सगळं स्पष्ट ऐकु आलं. तसे माझे कान नेहमी ताट असतात साहेब, आजुबाजुला काय घडतंय काय नाही, सगळं माहीत पडतं ना त्याने..."
इ. मोहित्यांना म्हात्रेची हीच सवय आवडायची नाही. जी गोष्ट सांगायची असेल त्याच्या मेन मुद्द्याकडे पोचतो न पोचतो तोच मधेच वेगळं वळण घेऊन काहीतरी मुर्खासारखं बडबडत बसतो.
" तुम्ही काय ऐकलंत म्हात्रे..." त्यांनी तरीपण खुप संयमाने विचारलं.
"हा, तेच सांगतोय ना. ते डॉकटर पुराणिक त्या नर्सवर डाफरत होते. ..."
"सिस्टर, तुम्ही एवढी मोठी चूक करुच कशी शकता? हे पेनकिलर इंजेक्शन आहे. पेशंटला हेडेक जाणवला तरच द्यायचं होतं ग्लुकोजमधुन! आणि तेही फक्त २ एम.एल.. आणि तुम्ही चक्क १० एम.एल. इंजेक्ट केलंत??? तेही एवढं स्ट्रॉंग ड्रग? तुम्हाला माहित आहे ह्याचा थेट हार्ट वर इफेक्ट होतो ३ एम.एल हुन एक थेंब ही जास्त झाला तर!! काय केलंत सिस्टर हे....यू हॅव टेकन अ लाईफ ओविंग टु अ सिली मिस्टेक!!! डु यू रीअलाईज इट? हाव कॅन यू बी सो इर्रीस्पोंन्सीबल???? डॅमीट!! " डोक्टर कळवळले.
" पण सर मेडीक्युअर मधे तुम्ही १० एम.एल मेन्शन केलंय रात्री ११.३० वाजता. म्हणुन मी...सर तुमचंच प्रीस्क्रीप्शन फॉलो केलं मी ऍज युज्युअल.." ती पार गोंधळल्यासारखी वाटत होती.
"व्हॉट नॉनसेन्स? मी असं प्रिस्क्रीशन देईनच कसं? स्वतःच्या चुकांचं खापर माझ्यावर फोडु नका सिस्टर..माईंड यू...."
"नो सर...सी दीस.."
"व्हॉट....हाव इज इट पॉसीबल?? मी हे प्रिस्क्रीपशन्स एन्टर केलेले नाही."
"पण सर... हे ह्याच पेशंटचं केस प्रोफाईल आहे. आणि तो तुम्हालाच असाईंन्ड आहे. बघा ना. तुमचंच नाव आहे "ट्रीटेड बाय" फील्ड मधे!"
"ओ गॉड!! आय डोन्ट नो सिस्टर. ह्या एन्ट्रीज मी केलेल्या नाहीत!. माझं अकाउंट कोणी तरी वापरलंय!!" डॉक्टर पुर्ण भेदरलेलेच!
पाचेक मिनीटे कसलाच आवाज आला नाही. एकदम शांत होतं सगळं. मग पुन्हा पुराणिकांचा आवाज...
" ओके, लुक हीयर सिस्टर. दिस मॅटर डजंट गो आऊट ऑफ दिस रूम. डु यू गेट मी?"
"बट सर.."
"लिसन टु मी सिस्टर. ही फार मोठी चूक झाली आहे आपल्याकडुन! एका पेशंटचा जीव गेलाय आपल्या चुकीमुळे!! कळतंय तुम्हाला? हा ह्या हॉस्पिटलच्या नावाला किती मोठा बट्टा आहे... आतापर्यंत कमावलेलं सगळं नावलौकीक एका क्षणात चक्काचूर होईल!! मिडीया तर आ वासुन बसेलच ते गिळायला! आर यु गेटींग मी?"
"पण सर...आपण पेशंटच्या नातेवाईकांना काय कारण द्यायचं. दिस बॉय वॉज
रीकव्हरींग नाईसली..ऍन्ड देन ऑल ऑफ अ सडन...."
" आय विल हॅन्डल दॅट...यू जस्ट कीप मम."
आणि कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. डॉकटरच असावेत. मी तिथुन निघालो.
म्हात्रेनी सगळी हकीकत इ.मोहित्यांना सांगितली होती.
"ठिक आहे. तुम्ही तिथेच थांबा. त्या पेशंटचं नाव कळलं का तुम्हाला?"
" होय साहेब. कोणी आदित्य गडकरी म्हणुन आहे. त्याच्या मित्राशी मी बोलुन आलो थोड्या वेळापुर्वी."
"काय? अरे मग ही परवा रजीस्टर झालेली ऍक्सीडंटची केस आहे म्हात्रे. त्याला एका ट्रकने उडवलं होतं. त्या ड्राईवरला तर पकडलं आपण कालच. म्हात्रे, त्या पेशंटची बॉडी दिली ताब्यात?"
"अजुन त्यांचे नातेवाईक इथेच आहेत सर. म्हणजे बॉडी दिली नसावी."
" ठिक आहे. बहुतेक पोस्ट मोर्टमला नेली असेल. तिथे रीपोर्ट्स बदलण्याचीही शक्यता आहे. मी लगेच तिथे पोचतो." रीसीव्हर जवळ जवळ आपटुन कॅप घालुन ते निघालेदेखील.
**********************************************************************
इ.मोहिते होस्पिटलला पोचले तेव्हा डॉ.पुराणिक अमितशी बोलत उभे होते.
"आय ऍम सॉरी. तुमच्या मित्राला आम्ही नाही वाचवु शकलो. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना वेदना फार असह्य झाल्या आणि ते कोमात जाऊ नयेत म्हणुन आम्ही फार प्रयत्न केला. पण अचानक त्यांचं हार्ट पेन खुप जास्त वाढलं . तो एक मेजर हार्ट अटॅक होता. ते अजीबात रीस्पोन्ड करेनासे झाले ट्रीटमेंटला. मग आमच्या हातातही काही उरलं नाही." अमित खाली मान घालुन सगळं ऐकत होता. त्याच्याशिवाय तिथे दुसऱ्या कोणाचंही मनच काय, पण बाकी सगळी इंद्रीयेही निकामी झाल्यासारखी होती. शैलुला तर तिथेच एका वॉर्ड मधे ऍडमीट करावं लागलं. रुना तिच्याजवळ होती. आणि बाबा रात्री अमितने बसवलेल्या जागी अगदी तसेच्या तसेच बसुन होते. त्यांचे डोळे फक्त वाहत होते. बाकी ते तसुभर हल्लेदेखील नव्हते.
"आता त्यांची बॉडी ऑटोप्सी साठी नेली आहे. थोड्या वेळातच तुम्हाला त्याचे रीपोर्ट्स आणि डेथ सर्टीफिकेट मिळेल. मग तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता." डॉ.पुराणीक बोलायचं तेवढं बोलुन निघुन गेले होते. थोड्या वेळातच ई. मोहितेंनी त्यांना त्यांच्या केबिनजवळ गाठलं.
"डॉ.पुराणीक.."
"येस"
"ई.मोहिते. स्पे.क्राईम ब्रांच" आय.कार्ड हातात धरत ते पुढे सरसावले.
"व्हॉट कॅन आय डु फॉर यू सर?"
"मला तुमच्या एका पेशंट बद्दल तुमच्याशी बोलायचं होतं."
" ओके. काय नाव त्या पेशंटचं?"
"मी. आदित्य गडकरी"
"ओ. आय ऍम सॉरी. ही ईज नो मोर. काल रात्रीच त्यांची डेथ झाली."
"मला माहित आहे. पण काय झालं होतं त्यांना. म्हणजे त्यांचा ऍक्सीडंट झाला होता एवढंच मला कळलं."
"त्यांच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली होती. आम्ही त्यांना ऑपरेट केलं लगेच आणि ते मागचे २४ तास आय.सी.यू मधे अंडर ऑबझरवेशन होते. पण काल रात्री त्यांना अचानक चेस्ट पेन जाणवु लागलं फार भयानक. आणि खुप प्रयत्न करुनही आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो."
" पण तुम्ही तर म्हणालात की डोक्याला मार बसला होता. मग चेस्ट पेन होण्याचं काय कारण असु शकतं?"
"मी त्यांच्या नातेवाईकांना सगळं एक्सप्लेन केलंय. पण तुम्हाला ही बातमी कशी समजली? ओ, तुमच्या पोलिस स्टेशन मधे ही ऍक्सीडंटची केस रजीस्टर झाली आहे का? पण ह्यात पोलिसांची काही इनव्होल्वमेंट लागेल असं मला वाटत नाही."
"हे पहा डॉक्टर. मी सरळ मुद्द्याला येतो. मला पुर्ण कल्पना आहे की तुमच्या एका सिस्टरच्या चूकीमुळे हा पेशंट दगावलाय. आता काही सारवासारव करुन उपयोग होणार नाही. "
"व्हॉट नॉनसेन्स? असं काही घडलेलं नाही."
"हे बघा, मी जर मिडीयाला इथे बोलावलं तर तुम्हाला ज्या गोष्टीची भिती वाटत होती नेमकी तीच घडेल. ह्या होस्पिटलची बदनामी तुम्हाला होऊ द्यायची असेल तर तुम्ही कॉपरेट करु नका आम्हाला. मी लगेच फोन करतो, त्यांना तर तुम्हाला सगळं स्पष्टीकरण द्यावंच लागेल!" म्हणत इ.मोहितेंनी फोन बाहेर काढला.
"थांबा इन्सपेक्टर. मी काय करायला हवंय आता?"
"सर्वात आधी, आदित्य गडकरी इथे ऍडमिट झाल्यापासुन ते त्यांच्या मृत्युपर्यंत जे जे काही घडलंय त्याचे खरेखुरे सर्व डीटेल्स काहीही मॅनीपुलेशन न करता मला हवे आहेत. एक मिनीट. म्हात्रे आत या." त्यांनी केबीनच्या दाराकडे पाहुन म्हटलं. कॉन्स्टेबल म्हात्रे सर्व तयारीनिशी आत आले.
"हे कॉन्स्टेबल म्हात्रे आहेत. तुमचं स्टेटमेंट हे लिहुन घेतील. बोला."
डॉ.पुराणिक बोलु लागले आणि म्हात्रे सगळं नोट करु लागले.
"ठिक आहे डॉक्टर. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचा त्या मेडीक्युअर चा अकाऊंट कोणीतरी अनाधीकृत रित्या वापरला आहे. ह्यात आदित्यच्या मृत्युसोबत तुम्हाला अडकवण्याचाही हेतु असु शकतो. ही एक सायबर फ्रॉडची केस वाटते मला. आता तुम्ही एक काम करा. तुमच्या होस्पिटलच्या मॅनेजमेंटची मीटींग बोलवा. आम्हाला त्यांच्याशी बोलुन काही तपशील काढावा लागेल आणि काही निर्णय घ्यावे लागतील. आणि त्या मीटींग मधे तुमच्या ह्या मेडीक्युअरची संपुर्ण माहिती असलेलं कोणीतरी असायला हवं हे पहा. हा सायबर गुन्हा असल्या कारणाने आम्हाला तुमचा कंप्युटर ताब्यात घ्यावा लागेल. आणखी एक गोष्ट. आता तुम्ही आदित्यच्या मृत्युचं जे कारण सांगितलं तेच पोस्ट मॉर्टमच्या रीपोर्ट्स मधे यायला हवं. कुठलीही लपवाछपवी करायचा प्रयत्न करु नका. तरच आम्ही तुम्हाला मदत करु शकतो. कधी बोलावताय मीटींग?" इ.मोहित्यांनी विचारलं.
"आजच बोलवतो. मी बोलतो सगळ्यांशी. मलाही ह्याचा छ्डा लवकरात लवकर लागायला हवाय. पण इन्स्पेक्टर प्लीज, ह्यात आमच्या हॉस्पिटलचं नाव कुठेही यायला नको. दीस इज द फर्स्ट टाईम व्ही आर फेसिंग समथिंग लाईक दीस विद प्रोबाब्ली नो डायरेक्ट फॉल्ट ऑफ आर्स. वोकहार्ड्ट हॉस्पिटल खुप नावाजलेलं आणि जुनं हॉस्पिटल आहे. ह्यात आतापर्यंत ट्रीट झालेल्या कुठल्याही पेशंट्सना हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट मुळे, स्टाफ मुळे किंवा त्यांच्या कुठल्याही चुकी मुळे काहीही त्रास झालेला नाही. लोकांचा खुप विश्वास आहे आमच्यावर. आणि तो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला घालवायचा नाही आहे. आय होप यू अंडरस्टॅंड."
"हे पहा डॉक्टर, मी आधीही तुम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला कॉपरेट केलंत तर ह्यातला खरा गुन्हेगार आम्ही नक्की शोधुन काढू."
एवढं बोलुन इ.मोहिते म्हात्रेसोबत तिथुन निघुन गेले.
********************************************************************************************************
क्रमश:
छान फ्लो आहे कथेला..पुढच्या
छान फ्लो आहे कथेला..पुढच्या भागाची वाट बघतेय.
छान सुरुवात झालीय, पुढच्या
छान सुरुवात झालीय, पुढच्या भागाची वाट पहातोय.
छान कथा. पुढच्या कथेचा अंदाज
छान कथा. पुढच्या कथेचा अंदाज आला पण....
छान आहे. आऊटडोअर्स ल अनुमोदन.
छान आहे.
आऊटडोअर्स ल अनुमोदन. अंदाज आला आहे कथेचा.
अन्दाज आला आहे, पण तरीही
अन्दाज आला आहे, पण तरीही उत्सुकता आहे कि का आणि कस केल.........................
पुढच्या कथेचा अंदाज आला
पुढच्या कथेचा अंदाज आला पण....
तुमच्या कडुन वाचायला मज्जा येइल......
पुढच्या भागाची वाट बघतेय.
छान आहे. पण अन्दाज आला आहे.
छान आहे. पण अन्दाज आला आहे. तरिहि उत्सुकता आहे.
अरेच्चा ही पण क्रमशः.. लौकर
अरेच्चा ही पण क्रमशः.. लौकर लिहा उढील भाग
छान जमली आहे कथा...पुढच्या
छान जमली आहे कथा...पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...!
छानच... जरा अंदाज चुकवा
छानच... जरा अंदाज चुकवा सगळ्यांचे मग मजा येईल
खुप खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद मंडळी...पुढच्या कथेचा अंदाज येणे अगदी साहजिक होते लिखाण चालु आहे पुढचं..बघु काय होतं ते
क्या बात है सुमा, मंडळात
क्या बात है सुमा, मंडळात सहर्ष स्वागत आहे.
मस्त फ्लो आहे चालु ठेवा
मस्त फ्लो आहे चालु ठेवा
सुरूवात छान झाली आहे.
सुरूवात छान झाली आहे.
चांगली चाललीये पण मलाही अंदाज
चांगली चाललीये पण मलाही अंदाज आला पुढे काय असेल ह्याचा.
आता गाडीत वाचली. मस्त आहे.
आता गाडीत वाचली. मस्त आहे. वातावरणनिर्मिती आणि वैद्यकीय माहिती यावर मेहनत घेतलेली दिसून येतेय. संवाद पण छान रंगवले आहेत.
पुढे काय होणार हे लगेच ओळखले; पण तरीही प्रतिक्षा आहे तुझ्या शैलीतल्या पुढच्या भागाची!
मस्त लिहायला लागलीस. कीप इट अप.
पुढचा भाग कधी येणार? पटपट
पुढचा भाग कधी येणार?
पटपट लिहा!
आभार सगळ्यांचे पुन्हा
आभार सगळ्यांचे पुन्हा एकदा..पुढचा भाग लिहीतिये अजुन..लवकरच पोस्टेन, तुमचे अंदाज खरे ठरतात का ते बघुया
अन्दाज आला हे अगदि खर
अन्दाज आला हे अगदि खर आहे.
आता तुम्हि सगल्यानचे अन्दाज चुकवता कि नहि ते बघु नतर
आधि कथा तर पोस्त करा.
सुमेधजी ! नमस्कार ! "मैत्री"
सुमेधजी ! नमस्कार !
"मैत्री" छान जमलीये. पढील भागाची आतुरता लागून राहिली आहे.
होस्पिटल मधील काही प्रसंग वाचकाला भावना विवश करतात.
सध्या मी "खलनायक कोण असावा ? " याचाच विचार करतोय.
तुमच्या मनांत कही तरी धक्का दायक असणार अस वाटतय. पाहु पुढील भागात !
शुभेछ्या.
सुमेधा... आवर्जून लिंक
सुमेधा... आवर्जून लिंक दिल्याबद्दल धन्यवाद...
हा पहिला भाग दोन वेळा वाचुन काढ्ला (सवयी प्रमाणे) - पहिल्यांदा 'घाई-घाईत' आणि आज 'निवांतपणे'
तुमचं लिखाण आणि त्याची पद्धति - दोन्ही आवडले...
अस्पष्ट पणे संशयाची सुई फिरल्याने, कथेचं शिर्षक आणि 'क्लायमॅक्स' यांचा संबंध अगोदरच उघड झाल्या सारखं वाटलं. तरी देखील 'पेपर लेस ऑफिस' आणि 'युजर अकाउंट हॅकिंग' या दोन संकल्पना 'संयमित' प्रमाणात वापरल्या म्हणुन तुमचं अभिनंदन...
थोडासा 'सी आय डी' स्टाईलने, आम्हा वाचकांना आलेला अंदाज चुकवता येईल का?, याचा विचार होवू द्या...
विवेकजी...तुमचे फार फार
विवेकजी...तुमचे फार फार धन्यवाद..दोनदा वाचल्यासाठी डबल धन्यवाद!! ...दुसरा भाग कधीच टाकला आहे..तपासुन बघा तुमचे अंदाज बरोबर येतात का ते