एकदा माझ्या डोक्यात एखादं पिल्लू शिरलं ना! की मला गप्प बसवत नाही, आणि हे महान कार्य त्यादिवशी पार पाडलं ते घरात आणलेल्या कापसाने. त्याचं असं झालं की घरात वाती वळायला आणलेल्या कापसाभोवती एक अर्धवट टरकावलेला लेख होता तो मी वाचला. हो ! असलं पुडीवरचं साहीत्य वाचायची मला जुनी खोड आहे. तर, त्या लेखाचा मतितार्थ इतकाच की `प्रत्येकाने आपल्यातल्या सुप्त कलाकाराला वाव करुन दिलाच पाहीजे'. बस्सSS इथे माझ्या सदा उत्साही मेंदुने उचल खाल्ली, आणि मी माझ्यात दडलेल्या त्या सुप्त कलाकाराला शोधायला सुरुवात केली.
सुरुवातीचाच ठेच लागल्यासारखा प्रकार झाला. काही केल्या मला माझ्यातले कलागुण आठवेनात ! आगदी आठवणी जिथपत जातात तिथपत मागे जाउन शोध घेतला तरी. कदाचीत माझ्यातला तो कलाकार झोपला नसुन बेशुध्द झाला असावा कदाचित कोमातही गेला असु शकेल. म्हणजे आता त्याला मलाच शोधावा लागणार होता. सरकारी नोकरी असल्याने वेळेचा प्रश्न नव्हता, आणि सहावा वेतन आयोग लागु झाल्याने खिसाच काय बँक अकाउंटही गरम होते. त्यामुळे मी सुरु केला शोध, माझ्यातल्या कलाकाराचा.
आता कला म्हंटलं की मला लहानपणापासुन चित्रकलाच आठवते. कदाचीत बरेचवेळा चित्रकलेच्या शिक्षकांनी कागदा ऐवजी माझ्या मुखकमलावरच रंगकाम केल्याची वेदनामयी जाणिव अजुनही विसरता येत नसल्याने असेल. म्हणुन मी चित्रकला हाताळण्याचा विचार पक्का केला.
दुसर्याच दिवशी बाजारातुन कॅनव्हास, पेन्सिली, रंग,ब्रश अशी सगळी आयुधं मागवुन घेतली. पहीला कॅनव्हास स्टँडवर चढवुन झाला, कारणं नसतानाही एप्रन चढवला आणि पहीलं चित्र चितारायला घेतलं `मोनालिसा' खुप दिवसांपासुन त्याची एक नक्कल माझ्याकडे होती आणि तसं चित्र काढायची ईच्छाही होती.
पेन्सिलींना धार लाऊन झाली, आणि पहीला प्रश्न समोर आला आउट लाईन कशी काढायची ? एकतर माणसाचे चित्र मी या जन्मातच काय पण मागच्या सात जन्मातही ( जर मी माणुसच असलो तर ) काढलेले नाही. माणुस म्हणजे साधारण गोल दिसणारे मडक्यासारखे डोके आणि शरीर, हात, पाय मिळून पाच काड्या इतक्या भांडवलावर मी वेळ मारुन नेत असे. इथे तर नुसते माणसाचे नाही तर एका स्त्रिचे तेही तिच्या चेहर्यावरच्या भावांसकट चित्र काढायचे होते. मी प्रयत्न जिद्दीने चालु ठेवला. साधारण दोन- तिन दिवस, दहा- पंधरा कॅनव्हास आणि चार- सहा ट्रेस पेपर इतक्या मेहनतीनंतर मी चित्र रंगवण्याइतपत तयार केले. आता पुढचा प्रश्न आणखी गहन बनला, मोनालिसाचा रंग कोणता ? त्यातल्या त्यात प्रयत्न म्हणुन चार-सहा ट्युबच्या मुंड्या पॅलेटमधे पिरगाळल्या. मग एक एक करुन अशीच अनेक मिश्रणे तयार केल्यावर एक मिश्रण योग्य वाटलं. मग मात्र मी झटून रंगकाम पुर्ण केलं. अंSSहंSS काहीतरी चुकलंच, समोरचं चित्र काहीकेल्या मोनालिसाच काय पण कोणत्याही मनुष्यजातीशी साधर्म्य दाखवणार्या प्राण्याचंही वाटे ना ! शेवटी जड मनानं मी `पोर्टेट' हा विषयच बाजुला सारला.
आपण निसर्ग चित्र का काढू नये ? माझ्या मनाने मला पुन्हा नविन कल्पना सुचवली. पुन्हा एकदा पेन्सिलींना धार लाऊन मी सिध्द झालो. `माझ्या खिडकीतुन दिसणारा गुलमोहोर' इतका सरळसाधा विषय निवडला. अडीच तास झटल्यावर एकदाची खिडकी काढून ( म्हणजे चित्रात) झाली. पुढच्या दोनएक तासात गुलमोहोराचे झाडही काढून झाले, पण झाडावरची पानं? इतकी हजारो लाखो पानं कशी काढता येणार? इथे कुठेतरी वाचलेले ज्ञान उपयोगी पडले. झाडाची पानं थेट रंगानंच काढायची असतात, मग लगेच रंगांची तयारी. खिडकीला कोणताही रंग चालला असता कारण ती `माझी' खिडकी होती. झाडाचं खोड तपकिरी रंगात दडपल्या गेलं. आता हिरवी पानं आणि लाल फुलं इतकाच ऐवज काय तो बाकी राहीला. समोरचं दिसणारं फुल आधी रंगवायचं ठरलं थोडे फटकारे मारुनही झाले, इतक्यात सौ. ने पानं (जेवणाची) घेतल्याची साद घातली. दहा मिनीटात जेउन घेउ आणि उरलेलं चित्र पुर्ण करु म्हणुन पानावर बसलो. दहा मिनीटात जेउन उठायचा माझा बेत पानात गुलाबजाम दिसल्याने बारगळला. अर्ध्यातासाने जेउन उठल्यावर गुलाबजाम अंमळ जास्तच झाल्याने जSSरा विसावलो तो थेट तिन्ही सांजा झाल्यावरच जागा झालो. बाहेरचा गुलमोहोर आता दिसेना ! मग बाकी रंगकाम दुसर्या दिवसावर ढकलुन मी पुन्हा जेवणाच्या टेबलाकडे मोहरा वळवला.
दुसर्या दिवशी सकाळीच रंगाचा ब्रश हातात घेतला आणि उरलेले फुल पुर्ण करायच्या तयारीने मी बाहेर नजर टाकली आणि जागीच थांबलो बाहेर कालचं फुलच नव्हतं समोर फुलंच नसल्याने मला ते रंगवता येणं शक्यच नव्हतं म्हणुन मी दुसर्या फुलाकडे मोर्चा वळवला. पुन्हा दोनचार फटकारे कॅनव्हासवर मारुन होतात न होतात तोच ते ही फुल नाहीसं झालं. हाच अनुभव पुन्हा पुन्हा येत राहीला. एव्हाना समोरचा कॅनव्हास नुसत्या लाल फटकार्यांनी रक्तबंबाळ झाल्यासारखा दिसायला लागला. शेवटी वैतागुन मी कॅनव्हास खाली उतरवला आणि त्याच बरोबर चित्रकलेचं भुतंही खाली उतरलं
चित्रकला नाही जमली तरी माझा माझ्यातल्या कलाकाराचा शोध अजुनही संपला नव्हता. आता मी शिल्पकलेत लक्ष घातले. दगडाच्या मुर्ती हा विषय मी आधीच बाजुला सारला कारण पेन, फाईल आणि नोटांची बंडंल या पलीकडे वजन उचलण्याचा सराव नसल्याने छिन्नी हातोडा मला पेलवला नसता, मग एकदम मउ म्हणुन मेणाच्या प्रतिकृती तयार करायचा मी निर्णय घेतला एकदम मादाम तुसाँ स्टाईल.
मेण आणि कारागीरी करण्यासाठी लागणारी लहानसहान साहीत्य मागवुन घेतलं खरं पण इतकावेळ न कळालेली एक मेख मला दिसुन आली शिंचं इतक्या कडक मेणाच्या गोळ्यांची प्रतिकृती बनवायची कशी? त्यासाठी मेण गरम करणं आलं. सगळे गोळे फ्राईंग पॅन मधे भरुन मी तो गॅसवर ठेवला, आणि बाजुलाच डायनिंग टेबलावर असलेल्या करंडीतील सफरचंदे दिसल्यामुळे दहा- पंधरा मिनीटे माझे तिकडे दुर्लक्षच झाले. जेंव्हा लक्ष गेले तेंव्हा साजुक तुपाच्या अंगकाठीचा द्रव पदार्थ फ्राईंग पॅनच्या काठोकाठ भरला होता. आता त्याला थंड करण आलं मग साधारण चार सफरचंदे इतका वेळ गेल्यावर तो पदार्थ जरा थंडावलेला वाटला. सगळा फ्राईंगपॅन उचलुन मी स्ट्डीतल्या लाकडी फलाटावर उपडा केला, तरी लेकाचा खाली पडे ना ! म्हणुन हळूचSSकन ठोकला तर बद्दकन त्याचा लाळागोळा खाली पडला. त्यातुन उडालेल्या दोन तिन थेंबानी मला हा प्रकार वाटतो तितका थंड नसल्याची जाणिव करुन दिली. मग सुरु झाली पळापळ, त्या लगद्याला आकार देण्याची, एकंदरीत त्याच्या तापटपणाचा अनुभव आल्याने मी त्याला हात लावणे शक्यच नव्हते म्हणुन मी किचन मधली सापडतील ती हत्यारे उचलुन आणली. चमचे, भातवाढी झालंच तर तुपाची झारी असली नावीन्यपुर्ण साधने वापरुन मी प्रयत्न चालु ठेवले आणि त्यातुन बसकट वाटोळा सर्वांगावरून वेडेवाकडे ओघळ असलेला एकच एक असा आकार तयार झाला आणि मेण पुन्हा टणक झाले. आता पुन्हा हात पोळून घेण्याची माझी इच्छा नसल्याने मी पुन्हा त्या वाटेला न जाण्याचे ठरवुन टाकले आणि माझ्यातला शिल्पकारही लुप्त झाला.
इतकं झालं तरी मी हार मानली नाही आता माझा ओढा संगितकले कडे होता. गायन हा प्रकार मी आधीच बाजुला केला कारण ऑफीसच्या दुसर्या कोपर्यात उभ्या असलेल्या चहावाल्याला मी गळ्याला जराही ताण न देता पहील्याच प्रयत्नात बोलावु शकतो शिवाय गायकांना खाण्या पिण्याचे पथ्यही फार ही बाब माझ्या पथ्यावर पडणारी नव्हती, म्हणुन मी वादनावर लक्ष केंद्रीत केले.
फुंकण्याची, बडवण्याची, खाजवण्याची अशी नानाविविध संगितसाहीत्ये घरी येऊन पडल्यावर एका भल्या पहाटे मी ओठांवर बासरी आडवी धरली. मनोमन भगवान श्री कॄष्णाचे नाव घेउन मी फुंकर मारली, कुठे काय चुकले कळे ना ! बासरीच्या या टोका पासुन त्या टोकापर्यंत वारे विना अडथळा निघुन गेले. मी पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहीलो पण काहीच घडे ना ! अर्धातास प्रयत्न करत राहील्यावर गाल गालगुंड झाल्यासारखे दुखायला लागले. अखेरचा प्रयत्न म्हणुन मी जरा जोरानेच फुंकर मारली आणि त्यावेळी (बासरीतुन) जो आवाज निघाला तो एकतर आठवा सुर तरी असावा किंवा सप्तसुरांचे मिश्रण तरी असावे. जे असेल ते असो त्यामुळे दोन घटना एकदम घडल्या एक म्हणजे, मी दचकुन बासरी खाली टाकली आणि घाबरुन उडी मारण्याच्या प्रयत्नात तिचा चुराडा केला आणि दुसरी म्हणजे आमचा कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला.
या नंतर मी बरीच वाद्य हाताळून बघितली पण त्यातुन सुर म्हणता येईल असे काहीच बाहेर पडले नाही. नाही म्हणता आमचे शेजारी एकदा मला मारायला बाहेर पडले होते खरे. सतत आठवडाभर प्रयत्न केल्यावर साठ्यातली निम्मी वाद्य मोडली नाहीतर कायमची नादुरुस्त झाली. एव्हाना माझे हातही मोडकळीला आले होते कदाचित त्यानंतरही मी जिद्दीने प्रयत्न चालु ठेवला असता पण आमच्या कुत्र्याला वेड लागल्याने मला या कलेपासुनही वंचीत व्हावे लागले.
इतक्या लहान सहान अपयशाने खचुन जाणार्यातला मी नाही. आता मी अभिनय क्षेत्रात पाउल टाकण्याचा निश्चय केला. वशिल्याने एका उदयोन्मुख नाटककाराच्या नाटकात, एका उदयोन्मुख दिग्दर्शकाच्या हाताखाली आणि उदयोन्मुख कलाकारांच्या साथीने काम करण्याची संधी मिळवली. नाटकाची संहीता घरी आणुन झाली. तालिमींनाही सुरुवात झाली चार- पाच तालिमी झाल्या तरी पाठांतराच्या नावाने शंख असल्याने माझा दर्जात दुय्यम पात्रापासुन ते चतुर्थ दर्जाच्या चारच संवाद असलेल्या पात्रापर्यंत घसरण झाली. दर तालिमीनंतर मला देण्यासाठी नवी भुमिका आणि मी आधी करत असलेल्या भुमिकेसाठी नवे पात्र शोधताना दिग्दर्शकाची त्रेधा तिरपीट उडाली. नाटकाच्या फायनान्सरच्या एका परवान्याची फाईल जर माझ्या टेबलावर अडकुन पडली नसती तर एव्हाना माझी नाटकातुन हकालपट्टीच झाली असती. बरं माझे प्रश्न वेगळेच होते, एकतर मला माझे संवादच पाठ होईनात, आणि ते पाठ झाले तर ते कुणाच्या संवादानंतर येतात तेच आठवे ना ! त्यामुळे दिग्दर्शकाचे मात्र मधल्यामधे मरण होत होते. शेवटी पहील्या प्रयोगाआधी त्याने मला हात जोडून पाठांतर करण्याची विनंती केली. ती शिरसावंद्य मानुन मी ही संपुर्ण दिवसभर नाटकाची वही पाठ करत राहीलो.
पहील्या प्रयोगाची घडी आली, दिग्दर्शकाने चारचारदा मला संवाद पाठ आहेत ना ? असे विचारुन झाले. माझ्या प्रवेशापर्यंत नाटक छान रंगले माझा रंगमंचावर प्रवेश झाला मात्र, समोर पासाच्या जिवावर उदार होवुन का होईना जमलेल्या गर्दीकडे पहाताच मला घाम फुटायला लागला. मी बावरल्या नजरेने विंगेतल्या दिग्दर्शकाकडे पहात असतानाच त्याने मला संवाद म्हणायची खुण केली मात्र, मी माझ्यासकट नाटकातल्या सगळ्या पात्रांचे संवाद आगदी कंसातल्या ओळींसकट म्हणुन टाकले. या सगळ्या प्रकारात जो गरदोळ झाला त्यातच मधेच केंव्हातरी पडदा टाकण्यात आला, आणि त्याचबरोबर त्या उदयोन्मुख नाटककाराचे पहीलेवहीले नाटक त्याचा दिग्दर्शक आणि तमाम कलाकारांसहीत कायमचे पडद्याआड गेले.
मराठी रंगभुमीचे एक नाटककार, एक दिग्दर्शक आणि प्रत्येकी एक एक नायक नायीका इतके नुकसान केल्यावर मी खंतावल्या मनाने घरात बसलो होतो. एव्हाना आपल्यातला कलाकार सुप्तावस्थेत नसुन मृतावस्थेत असल्याची मला जाणिव झाली होती. या सगळ्या प्रकारात घरात साठलेल्या नानाविवीध वस्तुंची अडगळ बधुन मला कसेसेच झाले.
इकडे तिकडे नजर फिरवताना मला अचानक एक कल्पना सुचली. तडक फोन करुन मी मणीला बोलावुन घेतले. मणी म्हणजे आमच्या ऑफीसचा एजंट, आमच्या ऑफीसची तमाम टेबले ही चारही बाजुने उघडी असल्याने त्या खालची देवाण घेवाण करण्याचे काम हा करतो. मणी घरी आल्यावर त्याच्याशी माझे बोलणे झाले आणि तासाभरातच एक टेंपो येउन घरातली सगळी अडगळ घेउन गेला.
या गोष्टीला आता आठवडा झाला. माझ्याकडची सारी कारागिरीची आयुधे त्या त्या कलाकारांना योग्य त्या भावात विकल्या गेलीयतं. माझ्या चित्रकलेच्या दोन्ही कलाकृती `मोनालीसा' आणि `खिडकीतला गुलमोहोर' ही अनुक्रमे `द रॉक' आणि `पानगळ' या नावाने दोन पॉश ऑफीसच्या स्वागतकक्षाची शान मॉर्डन आर्टचा उत्तम नमुना म्हणुन वाढवीत आहेत तर माझ्या मेणाच्या कलाकृतीने `सुपरनोव्हा' असे नाव धारण करुन एका मॉलची शोभा वाढवलीये. अर्थात तसे केल्यामुळेच त्यांच्या आताच्या मालकांना जरुरी असलेल्या परवानग्या मिळाल्या आहेत आणि त्यां कलाकृतींचा लठ्ठ मोबदलाही माझ्या खिशात आहे.
तुमचे मत काहीही असो पण आपल्याकडचा भंगारही सोन्याच्या भावात विकता येणे ही सुध्दा एक कलाच आहे आणि माझ्यातला कलाकार मला गवसल्याने मी ही समाधानात आहे.
खतरनाक
खतरनाक
बाकि कसलि नसलि तरि लिखाणाचि
बाकि कसलि नसलि तरि लिखाणाचि कला चांगलिच अवगत आहे.
बाकि कसलि नसलि तरि लिखाणाचि
बाकि कसलि नसलि तरि लिखाणाचि कला चांगलिच अवगत आहे.
बाकि कसलि नसलि तरि लिखाणाचि
बाकि कसलि नसलि तरि लिखाणाचि कला चांगलिच अवगत आहे.
मस्त.. ऑफिसात आहे याच भान न
मस्त..:) ऑफिसात आहे याच भान न राहून मोठ्यांदा हसले..ऑफिसबॉय चमत्कारिक कटाक्ष टाकुन गेला माझ्या कडे
झकास!!!!
झकास!!!!
(No subject)
(No subject)
आईगं
आईगं
ह ह पु वा
ह ह पु वा
अप्रतिम. म्हणजे काय एकदम
अप्रतिम. म्हणजे काय एकदम सॉल्लीड
(No subject)
'द रॊक' आणि 'पानगळ' मस्त
'द रॊक' आणि 'पानगळ'
मस्त लिहीलं आहे कचा !
जबरदस्त..... ह. ह. पु. वा.
जबरदस्त..... ह. ह. पु. वा. झाली... खरंच तुमच्या मध्ये लिहिण्याची कला आहे.....
मस्तं जमलाय लेख,
मस्तं जमलाय लेख, कवठीचाफा.
<<बासरीच्या या टोका पासुन त्या टोकापर्यंत वारे विना अडथळा निघुन गेले. मी पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहीलो पण काहीच घडे ना ! अर्धातास प्रयत्न करत राहील्यावर गाल गालगुंड झाल्यासारखे दुखायला लागले. अखेरचा प्रयत्न म्हणुन मी जरा जोरानेच फुंकर मारली आणि त्यावेळी (बासरीतुन) जो आवाज निघाला तो एकतर आठवा सुर तरी असावा किंवा सप्तसुरांचे मिश्रण तरी असाव<<>>
चाफा मस्त रे , काय काय कला
चाफा मस्त रे , काय काय कला आहेत तुझ्या अंगात
(No subject)
चाफा मस्तच
चाफा मस्तच
छान.
छान.
मस्त!
मस्त!
चाफ्या भारीच रे.
चाफ्या भारीच रे.
मस्तच..
मस्तच..
कसलं भारी लिहिलय.
कसलं भारी लिहिलय.
हा हा हा.. माझ्याही काही
हा हा हा..
माझ्याही काही "कलाकृती" आहेत.. खपवायला मदत करणार?
चफ्फ्या... लेका, रायगड चढ
चफ्फ्या... लेका, रायगड चढ असले उपद्व्याप करण्यापेक्षा!!
मस्त लिहिलयस.
सही....
सही....
(No subject)
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
सही.
सही.
भन्नाट!
भन्नाट!
Pages