हाऊसकीपर भाग १

Submitted by मानुषी on 18 November, 2009 - 06:00

आज लंडनहून पाहुणे यायचे होते. नीरज नमिताचे लंडन परिसरात रहाणारे मित्र मैत्रिणी.........!
"मावशी आज काय मेनू ठरवताय?" अशी विचारणा झाली तेव्हाच तिला कळलं की आज घरात पार्टी आहे. साधारणपणे वीकेंडसना नीरज नमिता तरी कुठी तरी जात, नाही तर त्यांचे मेन लंडन परिसरातले मित्र मैत्रिणी तरी त्यांच्याकडे यायचे. बहुतेक वेळा ते दोघं मनूला बरोबर घेऊनच जात.....विशेषत: रात्री मुक्काम असेल तर नक्कीच!..........एरवी ते मनूला तिच्यावर सोपवून जात. आठवड्याचे पाचही दिवस अगदी मानेवर खडा ठेवून कम आणि वीकेंडसना भरपूर एन्जॉयमेन्ट.... असं नीरज नमिताचं रूटीन होतं. मनूही आपलं प्लेस्कूल आणि इतर उद्योगात अगदी बुडून गेलेली असे.

तिने संध्याकाळच्या पार्टीची आखणी केली. त्यानुसार नमिताला सर्व सांगितलं. मनूला तिच्याकडे ठेवून नीरज नमिता अल्डीज सुपरमार्केटला खरेदीला गेले.नमिताला तिने व्यवस्थित यादी करून दिलेली होती. दोघं बाहेर पडल्याबरोबर मनूने टीव्ही लावला. टॉम आणि जेरी गोंधळ घालत होते. व्हॉल्यूम प्रचंड होता. मनू हातात प्रिंगल्स पोटॅटो चिप्सचं नळकांडं घेऊन सोफ्यावर पसरली. पुढची पाच मिनिटं सुद्धा ती तिथे टिकली नाही. लगेच हातातलं नळकांडं टाकून उठली तुरूतुरू कपाटाकडे गेली. कपाटातून काही तरी खेळ काढून घरभर पसारा करून ठेवला.
ती फ़्रिजमध्ये काय काय आहे पहात होती पण तिचं एकीकडे मनूकडेही लक्ष होतं.
"काय चाललंय मनूताई? खेळणं कमी आणि पसाराच जास्त!" तिच्याही बोलण्यात रागावणं कमी आणि कौतुक जास्त होतं!
तेवढयात नमिताचा फोन आला. " मावशी आम्ही आल्यावर काही खाणार नाही बरं का. तसाही ब्रेकफ़स्ट खूपच हेवी झालाय. पुन्हा रात्री पार्टी........अं.......मात्र मनूला वरण भात खायला घालून ती झोपतेय का पहा. म्हणजे रात्री जरा फ़्रेश राहील." नमिताने सवयीप्रमाणे गाडी सोडली होती. "हो हो" म्हणून तिने फोन खाली ठेवला. पुन्हा एक नजर त्या पसार्‍यात, खेळात गुंग झालेल्या मनूवर टाकून ती किचनकडे वळली. तिने मनूच्या नेहेमीच्या ताटलीत छान गुरगुटया भात, तूप वरण घालून कालवून आणला.
"चला मनूताई जेवायला...." म्हणत ती बाल्कनीत जेवणासाठी वातावरण निर्मिती करू लागली. खिडकीपाशी तिने मनूची छोटीशी लाल चुटुक खुर्ची मांडली. मनूचं अत्यंत आवडतं असं आकर्षक रंगीत चित्रांचं पुस्तक, जवळच पाण्याचं भांडं.......असा जेवणाचा जामानिमा केला. बाहेर नजर गेली तर तिच्या लक्षात आलं की पावसाची बुरबुर चालू होती. वाराही सुटला होता.
"सकाळी बरं फिक्कट का होईना पण ऊन होतं. खरंच इथं किती पटापट रूपं बदलतो निसर्ग!" तिच्या मनात आलं. पण आत्तापर्यंत तिला लंडनच्या लहरी हवामानाची सवय झाली होती.
पोटातल्या चिप्समुळे मनूला जेवणाची आजिबात घाई नव्हती. तेरी सुद्धा नमिताने बाहेरून आल्यावर उगीच काही ऐकवू नये यासाठी तिने नाना क्लुप्त्या लढवून मनूला भरवलं. शेवटच्या घासाला मनू उलटया काढायला लागली. तिने मनूला चूळ भरण्यासाठी बेसीनपाशी नेलं. मनू जेवली म्हणून तिला समाधान वाटलं. मनूवर तिची माया जडली होती.

................"हर्षूलाही असंच लागतं.......इकडेतिकडे करत जेवायला!" तिला स्वता:च्या नातवाची आठवण आली. मागच्या महिन्यात वीकेंडला नीरज नमिता असेच त्यांच्या मित्राकडे गेले होते, तेव्हा तिला दोन दिवस लेकीकडे.......बर्मिंगहॅमला जाण्याची परवानगी मिळाली होती. लेकीचा संसार बघून खूप समाधान वाटलं होतं. हर्षू आता पूर्ण वेळ शाळेत जात असल्यामुळे विशाखाची धावपळ जरा कमी झाली होती. हर्षू स्कूल बसने शाळेत जायचा. तो एकदा बाहेर पडला की त्यानंतर विशाखा व मंदार कारमधून बरोबरच ऑफिसला बाहेर पडत. मंदार कारनेच ऑफिसला जायचा. पण आजी आली की हर्षू अगदी आनंदात असायचा. रोज नवा खाऊ .....खूप खूप लाड!
तिला लेकीकडच्या आठवणी येत होत्या. मनू जेवण झाल्यावर पेंगायला लागली होती. तिने मनूला झोपवलं आणि स्वता:ही लवंडली. थकलेल्या मनाचा भूतकाळाने ताबा घेतला.

...........तिच्या व सुभाषच्या लग्नाला उणीपुरी तीस वर्षे झाली होती. माहेरची परिस्थिती बेताचीच. पाठची चार भावंडे. सर्वात लहान भाऊ. सर्वांचं करता करता आई वडील बिचारे थकून जायचे. हिचं सतरा अठरा वय झाल्याबरोबर जे स्थळ आलं त्याच्याशी हिचं लग्न करून दिलं. हिचं शिक्षण सुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं. शिवाय सुभाष हिच्यापेक्षा चांगला बारा वर्षांनी मोठा होता. दोघांचे इंटरेस्ट वेगळे...........खरं म्हणजे सुभाषला कशातच रस नव्हता. कसाबसा बी.कॉम. झालेला होता. नोकरीही कशीबशी रडतखडत करायचा. बाकी सासरबद्दल फार काही बोलण्यासारखंच नव्हतं. आधीच इतकी ओढगस्त होती की सुनेनं स्वता:चं शिक्षण पूर्ण करण्याचा काही विषयच निघण्याची शक्यता नव्हती. लग्नानंतर बिचारी निमूटपणे संसाराला लागली.
दीर नणंदा जावा सर्वांचं केलं ......सुरवातीला खरंच हौसेनं, प्रेमानं.........नंतर कर्तव्य म्हणून! तेही सगळे कुमूद कुमूद करायचे पण तिच्या अडचणीला कोणीच पुढे आलं नाही मदतीला. तिने जेव्हा नंतर इंग्लंडला जायचा निर्णय घेतला तेव्हा याच नणंदा जावांनी पहिल्यांदा नाकं मुरडली होती.

सामान लावून झालं. ती ग्लासभर पाणी प्यायली. बाहेर एक दृष्टिक्षेप टाकला. दुपारची वेळ होती तरी आजिबात ऊन नव्हतं. नमिताच्या सांगण्यानुसार तिने मेनू ठरवला होता. पराठे, जीरा राईस, मटार बटाटा रस्सा, मेयॉनीज सॅलड आणि स्वीट डिश.........पुडिंग. प्लेट्स बाउल्स्..........नमिताची सर्व कीमती क्रोकरी काढली. टेबल लावलं. तिचं काम चालूच राहिलं.

"हाय, वेलकम, हॅलो" ऐकू यायला लागलं.
"या या......वेलकम.....अरे विनय तू एकटाच? राधिका कुठाय? स्टॅग्ज आर नॉट अलाउड यार!"नीरज मित्रांचं स्वागत करत होता.
यानंतर हसण्याचा एकच कल्लोळ झाला.
"सॉरी यार...राधिका नव्या असाईनमेंट्सच्या डेडलाईन्समध्ये अडकली आहे रे.......ती नाही येऊ शकत आज." विनयचा खुलासा.
विनय राधिका, निखिल स्वप्ना आणि शुभोजित अंतरा हे बंगाली जोडपं.....असा नीरज नमिताचा खास ग्रूप होता.
हे सर्वजण आपला देश सोडून परक्या देशात आपला डेरा जमवण्याच्या प्रयत्नात होते. प्रत्येकजण आपापल्या विस्तारित क्षितिजाबाहेर भरारी मारण्याच्या प्रयत्नात होता.
स्वयंपाक करता करता ती नेहेमी सर्वांना न्याहाळत असे. आज बटाटे सोलता सोलता तिला एकदम आठवलं.........मागच्या पार्टीत या लोकांव्यतिरिक्त अजून एक जोडपं होतं............समीर आणि क्षिप्रा! त्यावेळी तिने समीरला पाहिल्याबरोबर ओळखलं होतं. सगळे कधी काळी लातूरला एकाच वाडयात राहात होते. त्यामुळे त्याला अचानक असं परक्या देशात पाहिल्यावर तिला एकदम भरून आलं होतं. तिला वाटलं याच्याशी बोलावं........याची विचारपूस करावी.
एरवी मावशी मावशी करणाया नमिताला तिने आपल्या मित्र मैत्रिणींशी किंवा कोणाशीच फ़ारसं बोललेलं खपत नसे. कोणी आलं असताना तिने बाहेर आलेलं सुद्धा नमिताला फ़ारसं आवडत नसे. पण ती..........? त वरून ताकभात ओळखणारी होती. ती आपलं काम आटोपलं की आपलं जेवणाचं ताट घेऊन निमूटपणे आपल्या खोलीत जायची. कधी कधी ती खूप निराश व्हायची. विशेषत: हे असं एकटं जेवताना तिला वाटायचं, "का मी हे असं एकटेपण भोगत्येय? का मी अशी एकटीच परदेशात येऊन पडल्येय? आणि हा असा अपमान सहन करत्येय?"

बटाटे सोलून झाले होते. ग्रेव्हीसाठी तिने नारळाच्या दुधाचं तयार कार्टन कापलं. पार्टीची तयारी करताना तिचं मन परत परत भूतकाळात धाव घेत होतं. समीरची राहून राहून आठवण येत होती. तेव्हाची ती पार्टी संपल्यावर सगळे जायला निघाले होते.
"समीर ना रे तू? .........अलकाचा मुलगा?" तिला रहावलं नव्हतं. ती दाराजवळ जाऊन विचारत होती. समीरनेही तिला काही क्षणातच ओळखलं. त्यालाही अगदी भरून आलं. लातूरच्या वाड्यातल्या जुन्या आठवणी निघाल्या. दारातच गप्पा झाल्या. मध्येच तिचं लक्ष नमिताकडे गेलं. ती नमिताच्या चेहेर्‍यावरची नापसंती स्पष्ट वाचू शकली. शेवटी तर समीरने तिचे हात हातात घेतले होते व म्हणाला होता, " मावशी एखाद्या वीकेंडला माझ्याकडेही या ना....... आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला?"
"मावशी नक्की बरं का!" क्षिप्रानंही नवर्‍याला दुजोरा दिला होता.
हळूहळू सगळे पांगले होते.

पुढचा प्रसंग तर तिला आजही जसाच्या तसा आठवला. सगळ्यांना गुड नाईट करून नीरज नमिता आत आले. ती खालमानेने हॉलमधला पसारा आवरायला लागली होती.
नीरज बेडरूममध्ये झोपायला गेला तरी नमिता हॉलमधेच कोरड्या चेहेर्‍याने बसून होती. हतबुद्ध झाल्यासारखी ! एरवी अशी जोरदार पार्टी झाल्यावर नमिता लगेचच स्वता:च्या बेडरूममध्ये अंतर्धान पावत असे. सगळा पसारा तसाच ठेवून.............!
"मावशी इथं बसा........तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत.......इथे आमच्याकडे तुमच्या ओळखीचं कुणीही आलं तरी तुम्ही असं पार्टीत येऊन आमच्या गेस्टशी अशी सलगी दाखवणं.........यू नो.........मला ते एवढं ठीक नाही वाटत.....सो.......... इथून पुढे काळजी घ्या. आलं ना लक्षात मी काय म्हणते ते? अहो हे इंग्लंड आहे. इथं आपल्या भारतातल्या सारखं वागून चालणार नाही..........अघळपघळ!" एवढं एका दमात बोलून ती तरातरा झोपायला निघून गेली होती.
मागच्या वेळच्या आठवणीने तिचं मन खट्टू झालं होतं.

"नीरज..........जेवण मस्तच आहे रे! अजूनही त्याच आहेत का रे त्या लातूर की बीडच्या भालेराव बाई?" बाहेरच्या आवाजाने आणि त्यातही स्वता:च्या नावाचा उल्लेख ऐकून तिची तंद्री भंगली. आजच्या पार्टीत समीर क्षिप्रा दिसत नव्हते. तिला त्यांच्या आठवणीने उगीचच चुकल्यासारखं वाटंत होतं.
"पण आत्ता बाहेर कोण बरं आपल्याविषयी चौकशी करतय?" असं वाटून ती कानोसा घेत राहिली.
"हो अगं त्याच आहेत अजून............वर्षभराचं ठरवूनच घेतलंय ना त्यांच्याशी!" नीरजला विचारलेल्या प्रश्णाचं नेहेमीप्रमाणे स्वता:च उत्तर देऊन नमिताने कुमुद भालेराव हा विषय मोडीत काढला. मुद्दाम ठरवून असं नाही........पण पार्टीत बोलण्यासारखे इतर अनेक इन्टरेस्टिंग असे विषय होते नमिताजवळ.............ऑफिसमधलं नवीन सॉफ्टवेअर, जिममधला नवीन सेक्सी इन्स्ट्रक्टर, टयूबमध्ये अचानक भेटलेली नवी मैत्रीण, मनूच्या खोडया, नवर्‍याबद्दलच्या लटक्या तक्रारी.........अश्या अनेक जिव्हाळ्याच्या विषयांवर ती अगदी भरभरून बोलत होती. आणि कुमूद भालेराव यांच्याशी नमिताच्या दृष्टीनं फक्त ‍ एक कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं.........काम करून घेणे आणि पैसे देणे.....बस्स!
पण ती मात्र नमिताच्या कुटुंबात .........विषेशत: मनूमधे ती गुंतत चालली होती. मनूच्या बाल लीला .........तिच्या खोडया.....तिचा कोवळा स्पर्श.......तिच्या बेबी पावडरचा तो विशिष्ट सुगंध .....हे सगळं कसं आता तिच्या सवयीचं आणि अगदी हवंहवंसं झालं होतं.
आजच्या पार्टीत तर मनूशी खेळायला अंतरा शुभोजितचा मुलगा देबूही होता. खेळता खेळता दोघेही तिच्या खोलीत घुसले होते. झोपलेल्या त्या दोन निरागस बाळांकडे पाहून तिला अगदी भरून आलं. पार्टी संपल्यावर अंतरा देबूला उचलून घेऊन गेली आणि नमिता मनूला.

ती स्वता:च्या खोलीत जेवण करून जरा आडवी झाली. मध्यरात्र होत आली होती. तिला घरची आठवण आली. "सुभाष विनीत काय करत असतील?घराचा अगदी उकिरडा करून टाकला असणार दोघांनी मिळून!"
विनीत अगदी वडिलांवर गेला होता.........रूप, बुद्धी, स्वभाव सर्व बाबतीत. दोघेही एक नंबरचे घुमे! त्यांच्यात कधीच संवाद नव्हता. विनीतसाठी तिचा जीव तुटायचा....पण काही उपयोग नव्हता. तरीही पोटचा पोर असल्यामुळे ती नेहेमी नुसती काळजी करत बसायची. तिला नेहेमी वाटायचं की स्वता: विनीतने काही हालचाल करावी ...हातपाय हलवावेत!
नवरा बायको म्हणून सुभाष आणि ती...........दोघांचं मैत्र किंवा गोत्र कधीच जुळलेलं नव्हतं. ती मैत्रिणींमध्ये वरवर गंमतीनं पण आतून विषादानं म्हणायची,"मुलं ही लग्नाचा साईड इफ़ेक्ट असतात." लग्नानंतर काळ गेला.........वयं वाढली ........निसर्गनेमिक्रमे मुलं झाली...तीही मोठी झाली! विशाखाने आपल्या रूपाच्या, बुद्धीच्या, स्वभावाच्या जोरावर नशीब काढलं. तिला मंदार भेटला. ती लग्न करून त्याच्याबरोबर इंग्लंडला गेली. तिच्या जाण्यानं आतून आधीच पोकळ असलेल्या चौकोनाचा एक कोन जणू गायबच झाला. चौकोन खिळखिळा झाला............
विचार करून ती दमून गेली. तिच्या घशाला कोरड पडली. उठून पाणी पिऊन परत आडवी झाली. कधी तरी तिला झोप लागली.
परत जाग आली ती मनूच्या रडण्याने. पाठोपाठ दारावर टकटक...........दार उघडंच होतं. नमिता रडणार्‍या मनूला घेऊन खोलीत घुसली. " मावशी पहा बरं रहाते का तुमच्याजवळ..........काय स्वप्न बिप्न पाहिलं की काय कोण जाणे, खूपच रडतेय..."रडणार्‍या मनूला तिच्या मांडीवर देऊन नमिता तिच्या उत्तराची वाटही न पहाता निघून गेली. तिने हुंदके देणार्‍या मनूला उराशी कवटाळलं व हळूहळू थोपटत तिच्या कानाशी अंगाई गीत गुणगुणू लागली. नेहेमीचं आवडीचं आणं ऐकता ऐकता मनू गुंगली. रडणं थांबलं. शांत झोपून गेली.
तिला एका गोष्टीचं त्यातल्या त्यात नेहेमी समाधान वाटायचं......किंबहुना हा एक मुद्दा विचारात घेऊनच तिने इंग्लंडला यायचा विचार पक्का केला होता..... तो म्हणजे विशाखासुद्धा इंग्लंडमध्येच होती. कधी काळी लेकीचा संसार डोळे भरून पहाता येईल. जावई नातू सर्वांना भेटता येईल!
तरी सुद्धा नमिताच्या चढेल वागण्याचा त्रास झाला की तिला वाटायचेच, "मी का येऊन पडल्येय या परक्या देशात .....अपामान सहन करत? त्यात हा एकटेपणा !"

आता सुद्धा ती मनूला कुशीत घेऊन लवंडली. मनूच्या केसांचा तो विशिष्ट सुगंध, तो मुलायम बाळस्पर्श, ती कोवळी जवळीक यात ती अगदी विरघळून गेली. नतद्रष्ट निराशेची जळमटं तात्पुरती नष्ट झाली. मनावरचं दु:खाचं सावट जरा विरलं.

दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आली. नेहेमीचं रूटीन मार्गी लागलं. नीरजसाठी हेवी ब्रेकफास्ट, नमितासाठी कॉर्नफ्लेक्स, ज्यूस.........मनूला शाळेसाठी तयार करणं.....! तिच्या घड्याळाचे काटे रोज सकाळी जरा जास्तच वेगात पळत. सगळे एकदा बाहेर पडले की मग तीही थोडं खाऊन घ्यायची. नंतरचा तास दीड तास सर्वांनी घालून ठेवलेला पसारा आवरण्यात जायचा.रोज न चुकता ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या गोष्टी पडलेल्या असत. कारण आवरायला "कुमूद भालेराव फ्रॉम लातूर" होत्या ना! हॉलमध्ये उलटे सुलटे पडलेले नमिताचे जॉगिंग शूज......नमिताच्या बेडवर तिनंच सकाळी जिमहून आल्यावर फेकलेला ट्रॅक सूट......बेडवरच नीरजने टाकून ठेवलेला ओला टॉवेल..... कॉटखाली नमिताची नाईटी......हॉलमध्ये सोफ्यावर अस्ताव्यस्त पडलेले वर्तमानपत्र.....मनूची घरभर पसरलेली खेळणी, पुस्तकं........!
आवरता आवरता तिला मध्येच दमल्यासारखं होई. सगळं एकदा जागच्या जागी गेलं....सगळं घर पुन्हा चकाचक दिसायला लागलं की पुन्हा तिला निष्क्रीयता यायची. आजही सगळं आवरून ती जरा खिडकीशी बसली. पुन्हा तिला खूप उदास वाटायला लागलं. सुन्न......!

...............पहिल्यांदाच केलेला तो विमानप्रवास आठवायला लागला. सुभाष विनीत सोडायला आले होते. तिच्या मनात भावनांचें काहूर माजलं होतं. विनीत तसा एरवी अलिप्त, निर्विकार....घुम्याच म्हणायला हवा. पण म्हणून त्याच्या मनात काय चाललंय कधी पत्ताच लागायचा नाही. पण त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. "आई......जपून रहा. फार कष्ट करू नको" म्हणाला होता. सुभाष काहीच बोलत नव्हता. इतक्या वर्षांच्या सहवासाने देखील नवरा बायकोत कसलेच भावबंध, कोणत्याही प्रकारची ओढ, उत्कटता नव्हती. दोघांनाही बांधून ठवणारा कसलाच धागा अस्तित्वात नव्हता.इतकी वर्षे संसार करून सुद्धा तिला तो नेमका नको त्या क्षणी एकदम अनोळखी...परका वाटायला लागायचा. एन वेळी सगळी मजाच संपून जायची. त्यानंही कधी स्वता: बदलण्याचा किंवा परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आताही बायको नवी क्षितिजे धुंडाळायला परदेशी चाललीये तरी प्रेमाचे ....निरोपाचे चार शब्द गोळा करण्यात तो अयशस्वी ठरला होता.
या सर्व गोष्टींमुळेच की काय......तीही कधी त्या मांडलेल्या खेळात रमली नाही. त्यात तिला सुभाषने करून ठेवलेल्या कर्जाबद्दल जेव्हा कळले.....तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अगदी गळ्यापर्यंत बुडले होते सगळे कर्जात. भरीत भर म्हणून विनीत पास होत नव्हता. भरकटलेल्या पतंगाप्रमाणे गोते खात होता. तिला जगण्याचाच कंटाळा आला होता. उद्याच्या दिवसाची वाट पहावी असं काहीच घडत नव्हतं आयुष्यात.........!
"रटाळ एकसुरी आयुष्य...........काय कमावलं आयुष्यात? स्वता:साठी एक क्षण तरी जगले का मी?" ती विचारांच्या गुंत्यात अडकत चालली होती. आता तिला बदल हवा होता. आयुष्याला दिशा हवी होती. आता तिला आयुष्याचा अर्थ शोधावासा वाटत होतं. पण नक्की काय करावं काही सुचंत नव्हतं.........

त्यातच एके दिवशी वर्तमानपत्र वाचताना एक जाहिरात दिसली.
"वॉन्टेड हाऊसकीपर"! खूप छान शब्दात लिहिलेली जाहिरात होती ती. त्याचा शुद्ध मराठीत सरळ अर्थ लावण्याइतकी ती नक्कीच चतुर होती. इंग्लंडमधील मिल्टन केन्स इथं रहाणार्‍या महाराष्ट्रियन नोकरी करणार्‍या जोडप्याला मूल व घर सांभाळणारी, घरकाम करण्यासाठी मध्यमवयीन मराठी(शक्यतो) बाई हवी होती.
तिच्या डोक्यात चक्रं फ़िरू लगली. मनात एक धाडसी बेत शिजू लागला. तिनं ती जाहिरात परत एकदा नीट चष्मा लावून वाचली. विमानाचं तिकीट तेच जोडपं पाठवणार होतं. खूप विचार करून ती एका धाडसी निर्णायाप्रत आली. पण गुपित दोन तीन दिवस मनातच दडवून ठेवलं. रविवारपर्यंत वाट पाहिली.
"चला निदान आपली विशाखा तरी त्या देशात आहे हा एक प्लस पॉइंटच म्हणायचा........हं.. आता मिल्टन केन्स ते बर्मिंगहॅम.....जिथे विशाखा रहाते....ते अंतर किती आहे ते विशाखाशी बोलल्यावर कळेलच. " तिचं मन पुढे पुढे धावू लागलं.
रविवारी नेहेमीप्रमाणे विशाखाचा फ़ोन आला. तिने घडयाळाकडे पाहिलं. मनातल्या मनात हिशोब करू लागली. "आत्ता बर्मिंगहॅमला सकाळचे आठ वाजले असणार. आपल्यापेक्षा पाच तास मागे!"
सुभाष विनीत घरी नव्हतेच.
"विशाखा मी तुला काही तरी सांगणार आहे. मला तुझी मदत हवी आहे."ती लेकीला फ़ोनवर सांगत होती.
आईचा अगदी अपरिचित असा निर्वाणीचा, करारी आवाज ऐकून विशाखा चमकलीच. आता आयुषाच्या अर्ध्या वाटेवर पोचल्यानंतर आपली आई आज आपल्याला नवीन काय सांगणार आहे?
"विशाखा ...नीरस, निष्क्रीय आयुष्य कण्हत,कुथत आणि कुढत कंठायचा मला अगदी वीट आलाय गं. विशाखा, मला इथं काहीच किंमत नाहीये......मला काहीतरी करायंचय गं आता....." म्हणत तिने विशाखाला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगून त्या जोडप्याचा फोन नंबर दिला व पुढे म्हणाली, "विशाखा, जरा प्राथमिक बोलणी करशील माझ्या वतीने? जरा अंदाज घे....लोक कसे आहेत वगैरे आणि त्यांना मला फोन करायला सांग" तिने लेकीला सर्व बेत समजावून सांगितला.
"अगं आई काय बोलतेस तू...अगं....हे सगळं तुला जमेल का? आई तू मिल्टन केन्सला येणार तर तिथून आमचं बर्मिंगहॅम फ़ार लांब नाही........अगं पण आई ...!" विशाखाला काही पचनी पडत नव्हते त्यामुळे तिची खूप संमिश्र प्रतिक्रीया ऐकायला मिळाली.
तिला आनंदही झालेला होता आणि आश्चर्यही वाटत होतं.
विशाखाने सर्व काम चोख केलं दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे ती घरात एकटी असताना नमिताचा फ़ोन आला. तो रीतसर टेलेफोनिक इन्टरव्ह्यूच होता. तेवढया संभाषणवरून तिने धूर्त आणि व्यवहारी नमिताला बर्‍यापैकी ओळखलं होतं.

.........पासपोर्ट,व्हीसा वगैरे औपचारिकता पार पडल्या. सुभाषला कळल्यावर त्याला धक्काच बसला. त्याच्या स्वभावानुसार त्याने विरोधही केला नाही पण दुजोराही दिला नाही. मदत करायची, आधार द्यायचा ते लांबच. उलट तिचा हा निर्णय कळल्यापासून जो काही शब्द फुटायचा तोंडातून .....तोही बंद झाला. तिला खूपच अपराधी वाटू लागलं. पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती.
तिने जिवाचा आटापिटा करून होता होईल तितकी तयारी केली. किराणा भरून ठेवला. लाडू चिवडयाचे डबे भरून ठेवले. घरात स्वयंपाकाला बाई लावली. हे सगळं करताना तिची आर्थिक, मानसिक ओढाताण खूपच झाली. पण एका मैत्रिणीच्या मदतीने तिने हे जमवून आणलं.
तिचं तिलाच मनातून खूप विचित्र वाटत होतं. "स्वता:च्या घरात स्वयंपाकाला बाई ठेवून मी दुसर्‍यांकडे स्वयंपाकालाच जाणार आहे........हे कोणतं गणित?" पण या गणिताचं उत्तर बिनचूक येणार हेही तिला पक्कं माहिती होतं.

.........पहिलाच विमानप्रवास........खूप टेन्शन आलं होतं तिला. सगळे विमानप्रवासी कोणत्यातरी वेगळ्याच जगातले वाटत होते. ती हवाई सुंदरी........तिच्या चेहेर्‍यावरचं ते छापील हसू.......!
नऊ दहा तासांच्या प्रवासानं तिला थोडं थकल्यासारखं झालं होतं.
भाग २ ----
http://www.maayboli.com/node/12091
क्रमशः............

गुलमोहर: 

क्रमशः............ नॉट अगेन..
खुपच छान ...कृपया पुढचे लवकर येवु द्या..

क्रमशः लिहीताना 'भाग-१" ,"भाग-२" अस लिहील तर वाचायला सोप जाईल. कथा उत्कंठा वाढवणारी आहे. भाग-२ लवकर येउ दे.

वाचतेय ....उत्सुक्तेने..पुढच्या भागाची वाट बघतेय

Pages