प्रिये तुझ्याचसाठी ..

Submitted by नानबा on 16 November, 2009 - 14:02

मंडळी, तुम्ही कधी प्रेमात पडलाय का हो? असाल तर सुरूवातीचे दिवस आठवा.. हो तेच दिवस जेव्हा ती/तो आपल्याकरता super hero च्या वरताण असतो.. हो हो, तेच दिवस - जेव्हा चंद्र, सूर्य, तारे, वारे असे शब्द आलेल्या सगळ्या कविता आपल्याला 'आपल्यासाठीच लिहिलेल्या' वगैरे वाटत असतात, तेच दिवस जेव्हा तिचं उशिरा येणं पण आपल्याला भलतंच गोSSSड वाटत असतं..तेच दिवस... अरेच्या! इथेच जास्त पाल्हाळ लावला तर मुळ कथा राहूनच जायची की! असो! तर थोडक्यात काय, असल्या नव्यानव्या - रोमँटीक का काय म्हणतात ना तसल्या दिवसातली ही गोष्ट.
माझी तेव्हाची गर्लफ्रेंड मुंबईत शिकायला होती. (म्हणजे आत्ताची बायको. हो! सांगितलेलं बरं!! - उगाच 'फट म्हणता ब्रह्महत्या' नको!)- तर माझी तेव्हाची गर्लफ्रेंड मुंबईत शिकायला होती. मी पुण्यात. सेलफोनचा प्रसार अजून व्हायचा होता - त्यामुळे आम्ही दिवस ठरवून STD बूथ वर कॉल्स करायचो एकमेकांना. तो दिवस तसा कॉल करण्याचा नव्हता. मी पहिलं lecture न बुडवायचा निश्चय बुडवून room वर लोळत पडलेलो असताना अचानक साठ्या दूत होऊन उगवला. त्यानं बातमी दिली की STD बूथ वर 'ति'चा कॉल आलेला - ती पुन्हा अर्ध्या तासानं कॉल करेल.. अचानक? आज ठरलेला दिवस नसताना? सक्काळी सक्काळी? मी सगळ्या possible "when-what-where असल्या सगळ्या wh questions" वर विचार करत बूथवर पोहोचलो. आज माझा छळ व्हायचाच ठरलेला दिसत होता. बूथ वर नको त्या लोकांसाठी नको त्या लोकांचे हजार-दीड हजार फोन आले. वाट पाहता पाहता (आणि 'नक्की कॉल का केला असेल'- असले नको ते विचार करण्यात) माझी हाताची सगळी नखं खाऊन संपली - आता पायाकडे वळावं लागणार अशी लक्षण दिसत होती. पण कर्मधर्म संयोगानं तशी वेळ काही आली नाही. त्या आधीच तिचा कॉल आला आणि अखेर माझी साडेसाती संपली (किवा सुरू झाली). "कितीवेळ ट्राय करतेय! उचलत का नव्हतास".. तिचा रुसलेला आवाज. 'मुली, हा फोन तुझे सासरे उर्फ आमचे पुजनीय पिताजी ह्यांच्या मालकीचा नाही. हा एक सार्वजनिक फोन आहे. तेव्हा ...' मी मनातल्या मनात बोललो. मोठ्यांदा अर्थातच "अग, फोन busy होता."
"ई, असला कसला डबडा बूथ आहे." -इती ती. (उद्या बाबांना सांगून नवीन बूथ बसवून घेऊ, ओके?).
मी विषय बदलायचा म्हणून तिला कॉल करण्यामागचं कारण विचारलं .. "मी आठवण आली म्हणून सहज फोन करू शकत नाही का?".. बदलेला विषयही माझ्यावर बूमरँग होऊन आदळला. असो, तर फोन संपेपर्यंत मला कळलेलं ते असं: 'सहज फोन करू शकत नाही का' असं जरी तिनं विचारलं असलं, तरी तो फोन अज्जिब्बात सहज नव्हता. योगिनी (आमच्या हिची मैत्रीण) 'आनंदनगर, पुणे' इथे आली होती. माझ्यावर कामगिरी होती की हिच्या मावशीकडून हिचं विसरलेलं पुस्तक आणायचं आणि योगिनीकडे पोचवायचं. हे काम आजच करणं गरजेचं होतं कारण योगिनी उद्या परत मुम्बईला जाणार होती.
आता ह्या कामगिरीत अनेक problems होते. एकतर माझ्याकडे बाईक नव्हती. दुसरं म्हणजे, साईबाबांच्या 'द्वारकामाईत आल्यावर रिकाम्या हाती जाऊ देणार नाही' ह्या वचनासारखं -'लेक्चर बुडवलं तर व्हायवा मधे भरल्या हाती जाऊन देणार नाही' असं पारखी मास्तरचं ताजं वचन कानात घुमत होतं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तिनं सगळ्या घरादाराला आमची प्रेमकथा ऐकवल्यानंतर मी पहिल्यांदा कुणाला भेटणार असेन तर आत्ता मावशीला भेटणार होतो. तिच्या सांगण्यावरून एकंदरच मावशीचं 'प्रेमप्रकरण' ह्या विषयाबद्द्ल फारसं चांगलं मत नव्हतं. त्यामुळे अर्थातच मी घाबरून होतो!
पण संकटांना घाबरून मागे हटेल तो खरा प्रियकर कसला! त्यातूनही 'मै तो तेरे लिये जाँ भी दे दू' - असल्या भारलेल्या दिवसात, छे! शक्यच नाही! (आणि खरंतर ती ही माझी कैक कामं मनापासून करायचीच की!) काहीही असो, मी सुपारी घेतली आणि मावशी आणि योगिनीला फोन करून अनुक्रमे दुपारचे २ व ५ अशा वेळा ठरवल्या. (मावशीकडून पुस्तक उचलायचं आणि लगेच सटकायचं- ३ तास म्हणजे डोक्यावरून पाणी! फारफारतर अर्धाएक तास इकडे तिकडे!) पण ह्या सगळ्याप्रकरणात मी विसरलो असीन तर इतकंच की आनंदनगरला मी ह्या पूर्वी कधीच गेलो नव्हतो. अर्थात पुणं असं कितीसं मोठं आहे म्हणा! (म्हणजे, निदान तेव्हा तरी नव्हतं!)
मी लेक्चरसाठी एका प्रॉक्सीची व्यवस्था केली. मावशी सहकारनगरला राहायची, म्हणजे शिवाजीनगर ते सहकारनगर हा प्रवासाचा पहिला टप्पा. साठ्या बादशाही (खानावळ) पर्यंत येणार होताच, त्यामुळे त्याच्याच बाईक वरून अस्मादीक बादशाहीपर्यंत पोहोचले. साठ्याचा आग्रह, बसचे पैसे वाचल्याचा आनंद आणि बादशाहीच्या जेवणाचा मोह, ह्या सगळ्यामुळे माझंही बादशाहीत जेवायचं ठरलं. Side effect: खिशातल्या रुपये ५० पैकी उरले फक्त २७/- पण तसंही फक्त टिळक रोड ते सहकारनगर आणि सहकारनगर ते आनंदनगर - आणि सगळीकडे पीएमटी.. म्हणताना रू २७/- पुरायला हरकत नव्हती.
'एकवेळ गुलबकावलीचं फुल मिळणं सोप्प - पण सहकारनगरची बस नाही!' हे मला स्टॉपवर बराच काळ तिष्ठत उभं राहिल्यावरंच कळलं (तरी मी वेळापत्रक बघून निघालेलो, पण बहुतेक ते भारतीय प्रमाणवेळेनुसार आहे हे चालकाला कळलं असावं!). ऊन मी म्हणत होतं. पोटातल्या जेवणामुळे छान सुस्ती आलेली. ह्या बसस्टँडवरंच जरा कलंडावं असा अनावर मोह व्हायला लागलेला. पण शेवटी सासुबाई वाट पहात असतील ह्याची जाणीव श्रेष्ठ ठरली. (हो, उगाच लग्नाआधीच रोष नको ओढवून घ्यायला). प्राप्त परिस्थितीत रिक्षा शिवाय पर्याय नाही ह्या जाणिवेनं मी रस्त्यापलिकडल्या रिक्षास्टँडवर गेलो आणि कुठल्यातरी अलिखित करारासारखी बरोब्बर त्याच वेळी सहकारनगरची बस (वेळापत्रकापेक्षा तब्बल पाऊण तास उशिरा येऊन) बघेबघेपर्यंत निघूनही गेली. पण संकटपरंपरा एवढ्यात संपली नव्हती. सहकारनगर हा फक्त पीमटी वाल्यांनीच नव्हे तर रिक्षावाल्यांनीही वाळीत टाकलेला भाग आहे असा नविनच साक्षात्कार मला झाला. बाबापुता करून एका रिक्षावाल्याला कसंबसं तयार करून मावशीकडे पोहोचेपर्यंत वाजले होते अडीच आणि खिशात शिल्लक होते, तब्बल रु. १७/-.
घराची बेल वाजवली (मावशी वेळेची एकदम पक्की आहे, हे 'ति'चं वाक्य मला नको तेव्हा आठवलं).. मावशीनं दार उघडलं, मी घरात गेलो आणि माझ्या लक्षात आलं की फक्त मीच नाही तर मावशीही भावी जावयाच्या आगमनानं जराशी दबकून आहे. आम्ही दोघंही एकमेकांच्या शक्तीचा, हेतूचा अंदाज घेत घेत गप्पा मारत होतो. थोड्याच वेळात कळलं की आपली वेव्हलेंथ चांगलीच जुळतीये. पण ही समस्या सुटेपर्यंत पुढची समस्या आ वासून उभी राहिली. मला हॉल मध्ये बसवून मावशी स्वैपाकघरात गेली. आतून मिक्सर फिरल्याचे, चमच्यांचे, बशांचे, पाणी सोडल्याचे असे वेगवेगळे आवाज आले आणि अंदाज आला की आता काहीतरी खायला येणार. पण तसं काही झालं नाही. उलट मलाच स्वैपाकघरात बोलवण्यात आलं. आत सांग्रसंगीत तयारी होती जेवणाची. 'मी २ वाजता येणार म्हणजे जेवायलाच' हे तिनं गृहीत धरलेलं आणि ती स्वतःही जेवायची थांबलेली अजून पर्यंत. त्यामुळे नाही म्हणणं शक्यच नव्हतं. निमूटपणे मी जेवायला बसलो. बादशाहीत जेवल्याचा आता मला पश्चाताप व्हायला लागलेला. ओरपलेली आमटी कळवळून नको नको म्हणत होती. पण करणार काय! परतीचे दोर कापलेले होते. आता फक्त गड लढवणं एवढंच माझ्या हातात होतं! जेवून पुस्तक घेऊन मी मावशीकडून बाहेर पडलो तेव्हा वाजले होते पावणेचार - खिशात अजूनही सतराच रुपये- सॅकमधे एक पुस्तक फक्त एक्स्ट्रा.
आता मोहीम आनंदनगर. अजूनही मी पाचपर्यंत पोचायला काहीच हरकत नव्हती. सहकारनगर ते स्वारगेट बस मात्र वेळेवर आली. अचानक माझं नशीब सुधारलेलं बहूतेक. स्वारगेटला पोहोचल्या पोहोचल्या आनंदनगरची बस समोर दिसली. अत्यानंदात मी बस मधे शिरलो. चालक आणि वाहक वेळेत आले आणि १० मिनटांच्या आत काहीही त्रास न देता, बस सुटली. २० एक मिनिटं प्रवास केल्यावर बस अत्यंत निसर्गरम्य रस्त्यांवरून धावत होती. पुण्यात असेही रस्ते आहेत! मी आश्चर्यचकीत. हेच आनंदनगर असल्याचं कंडक्टरनं सांगितलं. इथवरचा प्रवास अगदी दृष्ट लागावा इतका सुरळीत झालेला (माझा गोड गैरसमज उर्फ गोगै.) एखाद्या दुकानदाराला पत्ता विचारावा म्हणून इकडेतिकडे बघत होतो. खरंच आश्चर्य व्हावं अशी परिस्थीती होती-च्यायला! पुण्यात इतकी झाडी!!! आनंदनगर इतकं भारी निघेल असं वाटलं नव्हतं! आनंदनगरचे गोडवे मनात गात गात मी योगिनीचं घर शोधायच्या मागे लागलो. तिनं सांगितलेलं की आनंदनगर च्या स्टॉपवर उतरलं की डावीकडे सरळ चालत जायचं आणि मग पहिला उजवा टर्न मारला की सीता नावाची चार मजली बिल्डींग लागेल - तिथे फ्लॅट नंबर ११ B. मी डावीकडे चालत राहिलो, मग उजवा टर्न मारला. बघतो तर, आजुबाजुला चार मजली सोडा दोन मजली इमारतही नव्हती. त्यातल्या त्यात उपयोगाची फक्त एकच बिल्डींग दिसली ती म्हणजे महाराष्ट्र शासन पुरस्कृत सुलभ शौचालय (त्याची अवस्था बघता त्याला खरंतर शोचालय म्हणणंच जास्त उचित ठरलं असतं.) शोचालयातून बाहेर येऊन मी आपला पुन्हा एकदा "हुप हुप चाललो लंकेला, रामाची सीतामाई शोधायला" च्या चालीवर "खूप खूप चाललो आनंदनगरला, योगिनीची सीताबिल्डींग शोधायला" करत फिरायला लागलो. पण खरं सांगतो हं, मारूतीरायानं खर्‍या सीतेला काय शोधली असेल, असं मी त्या नामधारी सीतेला शोधत फिरलोय त्या दिवशी. पण मारुतीरायाला सीता सापडली कारण तो लंकेत होता- पुण्यात नव्हता. नाहीतर पुणेकरांचा 'पत्ता बरोबर सांगायचा नाही' हा बाणा त्यालाही भोवला असता. काय वाट्टेल त्या दिशा सांगतात हो काही लोक! अर्थात मारुतीरायानं नुसती गदा वर केली तरी पब्लिक खल्लास! आपल्याकडे तसं कायबी न्हाय! त्यामुळे बरीच उलटी पालटी तंगडतोडही झाली. आता हे सगळं प्रकरण म्हणजेच ज्याम वैताग व्ह्यायला लागलेला. शेवटी मी एक बंदा रुपया खर्च करून योगिनीला फोन केला. ती म्हणाली 'एक काम कर, तू पुन्हा एकदा आनंदनगरच्या स्टॉपपाशी येऊन थांब'. मी पुन्हा एकदा तंगडतोड करून स्टॉप-ए-आनंदनगर. इतक्या वेळा घिरट्या घातल्यानं असेल बहूतेक - पण लोक माझ्याकडे जरासे संशयानंच बघत होते ('कापडं तर बरी घातलीयेत बाबानं - असा का खुळचटासारखा फिरतोय' असा भाव मला बर्‍याचजणांच्या नजरेत दिसत होता. अशा वेळी सगळं जग आपल्याकडेच बघतंय असा भास व्हायला लागतो - तो झालाच!) बराच वेळ वाट बघून योगिनी येईना. थोड्याच वेळात मी पराकोटीचा वैतागलेलो. पुन्हा फोन करून बघतो तर पुन्हा योगिनीच फोन वर. "तू कधी येणार आहेस, मी स्टॉपवर थांबलोय केव्हाचा" मी आवाजात वैताग न येऊ देण्याच्या प्रयत्नात.
"अँअँअँ... मी इतका वेळ स्टॉप वर होते, आत्ताच परत आले": योगिनी.
नक्की काय भानगड होती ही? मला कळेना.. शेवटी बराच शोध घेतल्यानंतर लक्षात आलं ते असं - हे ही आनंदनगरच पण 'हे' 'ते' नव्हे. पुण्यामध्ये एक नसून दोन आनंदनगरं आहेत. एक हे आनंदनगर, जे सिंहगड रोडवर आहे आणि जे "ते" आनंदनगर आहे, ते आहे मयूर कॉलनी कोथरूड इथे! थोडक्यात काय सगळा आनंदीआनंद आहे!
हे सगळं कळेपर्यंत वाजलेले सव्वापाच. खिशात रु. १२ फक्त. अजून सगळा परतीचा प्रवास शिल्लक होता.
पण करतो काय! शेवटी प्रश्न (नव्यानव्या) प्रेमाचा होता! आता आणखीन कसलेही फोन करायच्या भानगडीत न पडता मी direct धडक मारायची ठरवली. मजल दरमजल करत पोचलो खरा 'खर्‍या' आनंदनगरला - पण तोपर्यंत चांगले पावणेआठ वाजलेले. जवळचे पैसेपण संपलेले. मग शेवटी टाकली रिक्षा आणि पोचलो एकदाचा होस्टेलला - आजच्या उद्योगात महिन्याच्या बजेटची चांगलीच वाट लागलेली.
रूमवर पोहोतो ना पोहोचतो तोच पुन्हा साठ्या. पुन्हा तिचा फोन. (हा साठ्या काय बूथवरच तळ ठोकून असतो की काय आजकाल!) फोन घेऊन कामगिरी (finally) फत्ते झाल्याचं तिला सांगायच्या आधी तीच म्हणाली - 'अरे, पोचवलंस का पुस्तक तू?"
"हो. तूच तर सांगितलेलंस ना पोचव म्हणून?" मी.
"अरे, जराशी गडबड झालीये, माझं उद्या अचानक घरी जायचं ठरलंय १० दिवसांसाठी.. आपल्याला थोडावेळ भेटता येईल पुणे स्टेशनवर. माझं एक काम करशील प्लीSSज? उद्या सकाळी योगिनीकडून ते पुस्तक घेऊन मला ११ वाजता भेटायला येशील स्टेशनवर? कित्ती दिवसात भेटलो नाहीयोत ना आपण.."
हे म्हणजे, एखाद्या वीरानं प्राणांवर उदार होऊन एखादा प्रदेश जिंकून यावा आणि तो पोचता पोचताच राजानं तह करून तो प्रदेश शत्रुला परत करावा - नुसता परत करावा असं नाही, तर तहाची कागदपत्र घेऊन ह्यालाच दूत म्हणून शत्रूकडे परत पाठवावं - तसं काहीसं झालं! पण काहीही झालं ना तरी त्या प्लीSSज मधलं जे आर्जव आहे ना - ते फक्त एखाद्या नव्यानं प्रेमात पडलेल्याच कळेल. मी पाघळलो आणि "प्रिये तुझ्याचसाठी ..." म्हणून पुन्हा एकदा पुस्तक परत आणण्याच्या मोहीमेवर लागलो.

समाप्त
---------------
ह्या कथेतील घटना, व्यक्ती अथवा स्थळ ह्यांचं कुठल्याही जिवंत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो अजिबात योगायोग समजू नये!

गुलमोहर: 

नानबा , धन्य आहे तुझी , काय एकेक पंचेस आहेत . Lol
जणु काय आपल्याच खिशातला एकेक रुपया कमी होतोय वाटतं होत वाचताना Lol

छान.

मस्त Lol

>हे म्हणजे, एखाद्या वीरानं प्राणांवर उदार होऊन एखादा प्रदेश जिंकून यावा आणि तो पोचता पोचताच राजानं तह करून तो प्रदेश शत्रुला परत करावा - नुसता परत करावा असं नाही, तर तहाची कागदपत्र घेऊन ह्यालाच दूत म्हणून शत्रूकडे परत पाठवावं - तसं काहीसं झालं! पण काहीही झालं ना तरी त्या प्लीSSज मधलं जे आर्जव आहे ना - ते फक्त एखाद्या नव्यानं प्रेमात पडलेल्याच कळेल

क्या बात है! लगे रहो.... Happy

खरंच धन्य आहे ... असं वाटतं कि अनुभवाचे बोल असावेत.. अगदी खराखुरा घटनाक्रम वाटतोय.. Happy ( कथा एका मुलीने लिहीलेय यावर विश्वास बसतच नाही इतकी छान झालीये कथा).

धमाल
माझी हाताची सगळी नखं खाऊन संपली - आता पायाकडे वळावं लागणार अशी लक्षण दिसत होती
मी आपला पुन्हा एकदा "हुप हुप चाललो लंकेला, रामाची सीतामाई शोधायला" च्या चालीवर "खूप खूप चाललो आनंदनगरला, योगिनीची सीताबिल्डींग शोधायला" करत फिरायला लागलो
एखाद्या वीरानं प्राणांवर उदार होऊन एखादा प्रदेश जिंकून यावा आणि तो पोचता पोचताच राजानं तह करून तो प्रदेश शत्रुला परत करावा
जबरी Biggrin

आमच्या COEPच्या बुथावर असे निरोप लिहून ठेवलेले असायचे
>> कथेचा हिरो शिवाजीनगर मध्ये रहातो.. समजून घ्या..

असं वाटतं कि अनुभवाचे बोल असावेत.. अगदी खराखुरा घटनाक्रम वाटतोय..
>> वाटतोय? तळटीप वाच!! Wink

सगळ्यांना- अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद मंडळी

Pages