वादा

Submitted by सुनिल परचुरे on 13 November, 2009 - 07:55

वादा
``मि. गोरे“ ?
``यस डॉक्टर !“
``या बसा नां“ डॉ. संघवी म्हणाले. डॉ. संघवी हे विख्यात न्युरोलॉजीस्ट होते व मुंबईत एका मोठ्ठया हॉस्पीटलमधील आपल्या कन्सल्टींग रुममध्ये बसले होते.
``मि. गोरे, तुम्ही लकी आहात. तुम्हाला प्रमिलाताईंसारख्या बाई पत्नी म्हणून मिळाल्या. मी त्यांना एक चांगल्या सोशलवर्कर म्हणून ओळखतो. त्यांच्या आदिवासींच्या काही कँपमध्ये मी ही भाग घेतला होता. परवाच आपले आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री बबनरावांचा फोन होता ... अं - पाणी हवयं !“
``नको. थँक्स !“
``हे बघा मि. गोरे , मी सगळ्या टेस्ट घेतल्या. तुम्ही पूर्वी दुस-या हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या टेस्टचेही रिपोर्ट बघितले. माझेही रिपोर्ट आलेत. आमच्या डॉक्टरी भाषेत तुमच्या मिसेसना ``अपर मोटोर न्युरोन डिसिज“ झालेला आहे. फार क्वचितच अशी केस होते. प्रथम ``फुटड्रॉप“ म्हणजे पायापासून सुरुवात होते. व हळुहळु तो रोग वर चढत जातो. ह्यामध्ये आपल्या शरिरातल्या नसांमध्ये शक्तिच राहत नाही. आय ऍम सॉरी, पण ह्यावर अजुन रामबाण औषध नाही“.
`` हे बघा डॉक्टर मिसेस गोरे ह्या किति मोठया आहेत, ह्याआधी ती माझी बायको आहे हे लक्षात घ्या. युरोप-अमेरिका तुम्हि सांगाल तिथे, जिकडे ह्यावर औषधोपचार आहेत तिथे मी नेईन तिला.....“
"आय अंडरस्टँड , आय अंडरस्टँड मि. गोरे. बी रिलॅ़क्स. पाणी प्या बघु . हे बघा, मी उगीच तुम्हाला नाऊमेद ही करणार नाही व खोटी आश्वासनही देणार नाही. मी तुम्हाला म्हटले त्याप्रमाणे काही शक्तिचि इंजेक्शन्स देऊ ,शिवाय फिजिओथेरपी करु ,मॉलिश करु .मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करीन. काही मिरॅकल झाल तर त्या नक्कीच वाचतील“.
डॉ. संघवी हे एक निष्णात न्युरोलॉजिस्ट होते. ते काहीतरी मार्ग सुचवतील हा एक आशोचा किरण होता. पण विषण्ण मनाने मोहन गोरे त्यांच्या केबिन बाहेर आले. पावल जड पडत होती. पण त्यांनि असा विचार केला कि आपण आता अस डगमगुन चालणार नाही. टॉयलेटमध्ये जाऊन बेसीनवर त्यांनी तोंड धुतले. ते जरा फ्रेश झाले व प्रमिलाच्या बेडशी आले.
``डॉ. भेटले ? रिपोर्ट आले कां ? काय म्हणाले डॉक्टर ?“ प्रमिलाने विचारले .
``अग हो हो ! मला बसु दे तरी . रिपोर्ट आले. म्हणाले नॉर्मल आहेत. तुझी सारखी भ्रमंती चालू असते न त्यामुळे अशक्तपणा आला आहे. शक्तिचे टॉनिक व थोडे एक्झरसाईज करुन लौकरच नॉर्मल होशील“.
``हो ना ! कधी एकदा चालायला लागुन मी कामाला लागतेय अस झालय. मध्ये पेपरात वाचले की जव्हार तालुक्यात परत साथींचे रोग झालेत. मला काही सुचत नाही हो. ही मी इथे अशी बेडला खिळलेली" .
त्या काहिवेळ मधेच थांबल्या.
"पण तुम्हि मला कधिहि सोडुन जाऊ नका ना. खरंच , खरंच मी बरी होईनना हो?“ अचानक काकुळतीला येऊन त्यांनी प्रश्न केला.
"घाबरु नकोस,अग लौकरच बरी होशील तु. लग्नात तुला नुसत ह्या जन्मी नाही तर जन्मोजन्मी साथ द्यायचा वादा केला आहे. आपल्याला मुल नसल तर काय झाल, आपण दोघे तर आहोत नां एकमेकांना? आपण कायम बरोबरच असु."
मोहनरावांनी फक्त त्यांचा हात हातात घेऊन थोपटला.तो किति शुष्क, चेतनाहीन वाटत होता. कितितरी वेळ ते त्यांचा हात थोपटत होते.
रात्रि ते घरी आले. प्रमिला पुष्कळ वेळा कामासाठी दौ-यावर असायची पण त्यावेळी त्यांना कधी तिची उणीव जाणवली नाही. पण आज त्यांना फारच भकास, एकाकीपण जाणवत होते.
``हॅलो अशोक गोगटे आहेत कां ? .आहेत? जरा देता त्यांना“.
``हॅलो कोण, हां बोल“
``अशोक अरे अजुन तुला घरी जायला किति वेळ आहे ?“
``तरी तासभर लागेल“.
``प्लिज ! जातांना जरा मला घरी भेटुन जाशील“.
``अरे! कसल प्लिज बिज बोलतोस, ऑर्डर कर ऑर्डर, येऊन जाईन“.
``थँक्स“, मोहनने फोन ठेवला.
अशोक गोगटे तसे मोठे सर्जन म्हणून प्रख्यात होते . मोहनचा खास मित्र. शाळेत एकाच बाकावर बसायचे. दोघात स्पर्धा असायची, कोणाचा नंबर पहिला येतो त्याची.मोहनना काही सुचेना. सोफ्यावरच ते बसले. डोळे मिटून पडून राहिले. त्यांच्या नजरे समोर सर्व जुने प्रसंग येऊ लागले.
``नमस्कार,मी मोहन गोरे. इथे ठाण्यातच राहतो. मी इंजिनियर आहे. इथेच मी एक छोटा कारखाना काढला आहे. तुमच्या मुलीला,म्हणजे मला तिच नांव माहीत नाही, मी पुष्कळ वेळा इथून जाताना बघतो. मला ति आवडली आहे. तिच्या करता म्हणजे माझ्या लग्नाकरता मी विचारायला आलो आहे“.
प्रमिला कर्वेचे वडील खुर्चीत उडालेच. अशि आपल्या मुलीला मागणी येईल अस त्यांनी कधी स्वप्नातही पाहिल नव्हत.
``बसा न“ ते म्हणाले, ``नाही म्हणजे ... मला“.
``हे बघा असे गडबडुन जाऊ नका, हे माझ कार्ड, त्यावर घरचा व माझ्या कंपनीचा पत्ता व फोन नंबर आहे. माझी बहीण अमेरिकेत असते. तिला गेल्याच महिन्यात मुलगी झाली. त्यामुळे माझे आई-वडिल सध्या तिकडे गेले आहेत.दुसरी गोष्ट पत्रिका-बित्रिका ह्यावर माझा विश्वास नाही. आमच्या वडलांचाही नाही. त्यामुळे फक्त मला माझी जन्मतारीख माहित आहे. त्यांचा पहिल्या पासून हातांवरच्या रेषांपेक्षा स्वतच्या हाताने कमवून खाण्यावर विश्वास. त्यामुळे माझी पत्रिका नाही तशीच तुमच्या मुलीचि पाहण्यात मला स्वारस्य नाही. मी माझी माहिती सांगितली. जरा तुमच्या मुलिची माहीती सांगाल ?“
प्रमिला घरातच होती. तिने ही ह्या मुलाला जाता येता पाहिले होते . पण हे सगळ अनपेक्षितच होते. खरच घरात एखाद वादळ शिरल्यासारखेच झाले होते. नुकतिच तर कुठे ति बी.ए. झाली होती. अजुन लग्न, नवरा, घर ह्याची पुरती स्वप्नही पाहीली नव्हती.
``हं, हा घ्या चहा. हा निर्णय तुम्ही जितक्या चटकन विचारलात तसेच उत्तर मी लगेच देऊ शकणार नाही. मला काही वेळ द्या“, बाहेर चहा घेऊन येत प्रमिला म्हणाली.
``हे बघा, मी समजु शकतो. काही घाई नाही, जेव्हा तुमचा विचार होऊन तुम्ही निर्णय द्याल, तो पर्यंत मी वाट पाहीन“.
आणि पुढे काही दिवस कर्व्यांच्या घरात चर्चा, वादविवाद ह्यामुळे टेन्शन वाढत गेले. आडुन आडुन त्यांनी मुलाची सर्व चौकशी केली. अमेरिकेहुन त्यांचे आई-वडिल आल्यावर परत एकदा पाहण्याचा प्रोग्राम झाला. प्रमिलाचा होकार घेऊन त्यांचे लग्नही झाले.
प्रमिला कर्व्यांची प्रमिला गोरे झाली. नविन नवलाईच्या दिवसात ती हरखुन गेली. मोहनचे आई-वडिलही सहा महिने अमेरिकत तर सहा महिने इथे अशी विभागणी करुन राहात होते. लग्नानंतर दोनच वर्षात मोहनच्या एकाच्या तिन फॅक्ट-या झाल्या. दिवसाचे चोविस तासही त्याला कमी पडु लागले. मध्येच त्या दोघांचा युरोप-अमेरिकेचा दौराही झाला.
बघता बघता लग्नाला पाच सहा वर्षे झाली. सुरवातीला फॅमीली प्ल्यॅनिंग म्हणून तर कधी कामाचा ताण ह्यामुळे घरात इतक्यात मुल नको अशी भावना होती. पण सासु सासरे अमेरिकेला गेल्यावर व मोहन फॅक्टरीवर गेल्यावर दिवसभर प्रमिलाला घरात कंटाळा येई.
``हे बघ प्रमिला, तुझी परिस्थिती मी समजु शकतो. तुला मी ह्या कामाच्या रगाडयामुळे फारसा सहवास देऊ शकत नाही . आपल्या लग्नालाही इतकी वर्षे झाली पण अजुन आपल्याला मुल होत नाही. हे बघ माझा स्वभाव तुला माहित आहे. आपण दोघही डॉक्टरांकडे जाऊ, टेस्ट करु. पुढचे पुढे बघु“, मोहन समजावत म्हणाला.
डॉक्टरांकडे तपासणी झाली. टेस्ट झाली. रिपोर्ट आले ,पण एक मोठा धक्का मोहनला बसला. बायकोचा रिपोर्ट नॉर्मल होता पण निसर्गाने सर्व सुखांचा वर्षाव करतांना एकेठिकाणी हात आखडता घेतला होता .मोहनला कधीच मुल होऊ शकणार नव्हत.
``हे बघ प्रमिला, गेला आठवडाभर मी खुप विचार केला . काय कमाल आहे बघ. सर्व सुख, सर्व म्हणजे तु म्हणशील ते मी तुला देऊ शकतो .फक्त स्त्रिला जे पुर्णत्व येत ते आई म्हणून , ते तुला मी कधीच देऊ शकत नाही . तुझा काय विचार आहे?“
``विचार ? हे मातृत्वाच सुख कुणाला नको असत . पण देवाने मला दुस-या कुठल्याच सुखात कमतरता ठेवली नाही . पण मी पुर्ण विचाराने सांगते , मी मनाची तयारी केली आहे . मला मुल नको“.
``अग पण मग एखाद लहान मुल दत्तक घेतले तर -“
``तो ही मी विचार केलाय. मला आपल्या दोघांचच मुल हवं होत.दुसर मुल कितीही गोंडस असल, म्हणजे मि त्याचे सर्व लाड करीन, पण मला वाटत मी त्याची सख्खी आई नाही बनु शकणार. मनाने तर नाहीच नाही“.
"प्रमे. हे बघ हे सर्व मी अगदी मनापासून बोलतोय . गैरसमज करुन घेऊ नकोस. पण आई होण्यासाठी मी तुला डिव्होर्स द्यायला सुध्दा तयार आहे ...“
``काय... हे बघा एक सांगते. आता ह्यापुढे ह्या विषयावर घरात चर्चा नको. "
पुढे काही दिवस खरच फार टेंशनमध्ये गेले. घरी जाऊच नये अस वाटे. आपण आपल्या बायकोवर फार मोठा अन्याय करतोय हिच भावना मनात येई.पण काळा बरोबर हळुहळु मनावरच दडपण कमी होत गेले. आणि समाजसेविका देशपांडे बाईंच्या रुपाने प्रमिलाला एक नवीनच द्वार उघडे झाले.
मुलाच दुःख विसरण्यासाठी तिचे देशपांडे बाईंबरोबर दौरे सुरु झाले. ठाणे जिह्यांतील आदिवासींची सेवा, त्यांच्या करता सरकारने राबवलेल्या योजनांचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचवायच व्रत तिने घेतले. आणि खरोखरच बघता बघता प्रमिलाची प्रमिलाताई झाली. सतत दौरे , आदिवासिंकरता आश्रमशाळा , त्यांच आरोग्य,डॉक्टरांची शिबीरे, त्या करता मंत्रालयात चकरा, मोठ मोठया संस्थांशी, लोकांशी ओळख, तिने आपल जिवनच त्यात बुडवुन घेतल. काही वर्षापूर्वी सरकारतर्फे तिचा गौरवही झाला. माझीही इथे फॅक्टरी सुरुच होती. एक मुलाचे सुख सोडले तर खरोखरच दृष्ट लागावा असा संसार होता आमचा.
``हे बघा, ते मंत्रालयातचे सेकेटरी. एकच मुलगा तो सेटल्ड झाला अमेरिकेत .आता दोघे नवराबायको इथेच एकटे. दुसरे ते सोमण, लग्न झाल नी मुलगा लगेच वेगळ्या ब्लॉकमध्ये रहायला गेला. आईबाप परत एकटेच , हे सर्व बघून वाटत आपल्याला मुल नाही हे किति बरय“ - कधीतरी गप्पात ही सांगायची.

दारावरची बेल वाजली. बापरे म्हणजे आपल्याला डोळा लागला की काय असा विचार करतच मोहनने दार उघडले.
``येऊ कां आत“
``अरे अशोक ! ये न ये, "
``हं , सांग बघु काय झाल. डॉ. संघवी काय म्हणाले ?“
``अरे म्हणुनच तुला बोलावले. त्यांनीही सांगितले की ह्या रोगावर औषध नाही म्हणून. हे बघ - हे - हे त्यांचे नविन रिपोर्टस्."
अशोकने ते सर्व रिपोर्ट परत एकदा नजरेखालुन घातले.
``मोहन धीर धर. हे बघ हा रोग क्वचितच एखाद्याला होतो . म्हणजे कारण सांगु शकणार नाही , पण अतिश्रमा बरोबर जरुरीपेक्षा कमी आहार सेवन किंवा नेमके कशामुळे होतो त्याचा अजुनतरि शोध लागु शकला नाहि ." डॉ.अशोक म्हणाले.
"आतापर्यंत किती डॉक्टर, किती टेस्ट झाल्या त्याला सुमारच नाही. आयुर्वेदिक, होमिओपॅथीक, अंधविश्वासु आदिवासींनी दिलेले अंगारे धुपारे , सर्व काही गेल्या सहा महिन्यात झाले. हा रोग हळुहळु हिला आधी पायापासून सुरु झाला. चालतीबोलती माझी बायको चालेनाशी झाली . रोग जसा वरवर जात होता तशि हळुहळु हाताचीही हालचाल मंदावली.स्वतची स्वत जेवूही शकेना . म्हणाली तुम्ही नेहमी म्हणायचा न मला मुल नाही , मुल नाही, लहान मुलाला भरवायची हौस फिटली नाही. आता भरवा मला"
त्या आठवणीने मोहनच्या जीवाची कालवाकालव झाली . रडत रडत अशाकेला त्याने मिठीच मारली. थोडा वेळ त्याच्या पाठीवर अशोक थोपटत राहिला
" अरे कणाकणाने मी माझ्या बायकोला असहायपणे मरतांना पाहतोय. पण मी काहीच करु शकत नाही. माझा देवावर विश्वास नव्हता. पण ह्या दिवसात मी इतका हळवा झालोय कि ती चांगली होण्याकरता मी मनापासून देवाची किती करुणा भाकली होति. पण आता तिला शांत मरण येऊ दे म्हणून प्रार्थना करतोय."

हळुहळु प्रमिलाताईंचे दुखण असच वाढत गेल . शेवटी काही महिन्यांनी त्यांना श्वासही घेता येईना आणि एक दिवस प्रमिलाताई गेल्या.

दुस-या दिवशी पेपरात बातमी होती. आदिवासींच्या तारणहार प्रमिलाताई गो-यांच दुःखद निधन. आणि त्यांच्या निधनानंतर लगेच तासाभरातच त्यांचे पति मोहन गोरे यांचे हृदयविकाराने निधन. ह्या लोकप्रिय नवरा-बायकोच्या देहसंस्काराला हजारोंचा शोकाकुल जमाव जमला होता.

मोहनरावांनि प्रमिलाताईंना केलेला वादा पाळला होता.

गुलमोहर: 

छान !

छान कथा. खोड काढायची म्हणून सांगतो. 'वादा' एवजी 'वचन' चाललं असतं ना ? (याचा राज ठाकरेंशी काही संबंध नाही.)

Nice