मेवाडदर्शन-१
२००९ च्या ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान आम्ही मेवाडदर्शन सहल सचिन ट्रॅव्हल्सच्या सोबत केली. या पर्यटनाची पूर्वतयारी; प्रत्यक्ष प्रवास-निवास, खानपान, कलास्वाद, खरेदी; आणि प्रवासा अखेरीस या सर्वांतून झालेले मेवाडदर्शन; अशा स्वरूपात हे प्रवासवर्णन लिहीत आहे. यातील इतिहासात्मक वेचे, बहुतेकदा, विकिपेडियावरून स्वैर अनुवाद करून घेतलेले आहेत. ३० सप्टेंबर आणि १० ऑक्टोबर हे दोन दिवस रेल्वेच्या प्रवासातच खर्ची पडले. तसेच ९ ऑक्टोबर जयपूरला खरेदीखातर खर्चलेला असल्याने, पर्यटनाचे प्रत्यक्षात आठच दिवस पदरी पडलेले होते. यंदा गणपती ते दिवाळीच्या दरम्यान मेवाड पाहायला जायचे असा निश्चय झाल्यावर तिथला उत्तम काळ कोणता (खरे तर मेवाड दर्शनार्थ पक्ष पंधरवड्यासारखा काळ शोधूनही सापडणार नाही), आपल्याला कधी वेळ उपलब्ध आहे, सुट्ट्या कधी काढता येतील या सगळ्याचा अंदाज घेऊन सहलीच्या नियोजनास सुरूवात झाली. माझा आवडता समज असा आहे की पर्यटन सहल ८-१० दिवस तरी लांबीची असावी. कमी असल्यास, नुसता जाण्या-येण्यातच घालवलेला वेळ, सहलीत प्रत्यक्ष दर्शनार्थ घालवलेल्या वेळापेक्षा जास्त ठरून, सहलीकरता उपलब्ध असलेल्या वेळाचा अपव्यय होतो. तसेच जास्त असल्यास, पर्यटनाचा उत्साह मावळत मावळत अखेरीस ते पर्यटन आनंदचे राहत नाही. म्हणून सहल ८-१० दिवसांची असावी असाही निर्णय झाला. शिवाय रेल्वेचा प्रवास रात्रभराहूनही जास्त असल्याने येणे-जाणे विमानानेही करता येईल काय याची चाचपणी करायचे ठरले. मग काय काय पाहायचे आहे, काय पाहण्यासारखे आहे, मेवाडचा इतिहास काय आहे, तिथे काय काय खाण्याचे अभिनव पदार्थ चाखता येतील, कुठकुठल्या कलांचा प्रत्यक्ष आस्वाद घेता येईल, कोणकोणती निसर्गसौंदर्ये आस्वादता येतील याची जंत्री सुरू झाली. प्रत्यक्ष सहल जरी ८-१० दिवसांचीच होणार असली तरीही माझ्या प्रथेप्रमाणे तीन महिने आधीपासूनच माहिती काढणे, आरक्षणे करणे, पर्यटनसाहित्याची जमवाजमव इत्यादीस जोमाने सुरूवात झाली.
यात्राकंपनीसोबत पर्यटन केल्यास अल्पावधीत नियोजन, आपत्कालीन व्यवस्था, तसेच जुळवाजुळवीत जीव आटवणे कमी होते हे खरेच, पण पैशाच्या रूपात त्याचे मूल्य चुकवावेच लागते. तरीही उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करायचा तर हे करायलाच हवे, मग जास्त खर्च झाला तरी चालेल असा निर्णय झाला. त्यानुसार इंडियन एअरलाईन्स, केसरी, सचिन इत्यादींच्या संचालित सहलींचा तपास हाती घेतला. इंडियन एअरलाईन्सच्या देकारात विमानप्रवासाच्या खर्चाला पहिली प्राथमिकता होती. स्थानिक पर्यटन स्थानिक हॉटेलांवर सोपवतात असा आमचा मागचा अनुभव होताच. शिवाय संपूर्ण सहलीचा माणशी खर्च त्यांचाच सर्वाधिक होता. केसरी आणि सचिनच्या संकेतस्थळांवर सहलींची माहिती व्यवस्थितपणे दिलेली दिसत होती. मात्र केसरीच्या देकारात काय काय समाविष्ट होते ते नीटपणे कळू शकत नव्हते. सगळ्यात माहितीतत्पर सहलविपणन सचिनचे होते. माहिती विचारायचा अवकाश की हवी ती माहिती तत्काळ सादर होत होती. त्यांच्या सवलती देण्याच्या पद्धती नीटपणे कळलेल्या असल्याने, प्रत्यक्षात किती खर्च होईल याचा अदमास लगेचच आला. त्यांचाच दरमाणशी सहलखर्चही सर्वात कमी येत होता. डोंबिवलीला त्यांचे कार्यालयही होते. म्हणून मग सचिनसोबत जाण्याचा निर्णय झाला.
मात्र जरी ते रेल्वे आरक्षण करून देऊ म्हणत होते तरी प्रत्यक्षात आम्हाला हव्या असलेल्या १०-१०-२००९ च्या गाडीचे आरक्षणच रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नव्हते. शिवाय त्यांच्या सहलीची सुरूवात आबूरोडपासून होत होती. म्हणजे विमानाने अहमदाबादपर्यंत जाऊन आबूला जाण्याचे सव्यापसव्य करूनही त्याचा पुरेसा लाभ होणारच नव्हता. हे त्यांना सांगून, रेल्वे आरक्षणाची त्यांची काही विशेष व्यवस्था आहे काय असे विचारता, ती तशी नाही असेच उत्तर आले. मग रेल्वेचे आरक्षण झाल्याखेरीज सहलनोंदणी करायची नाही असे ठरवले आणि त्यांच्या नक्की केलेल्या दुसर्या कुठल्या तारखेस जुळवून घेता येईल का, ही चाचपणी सुरू केली. ३०-०९-२००९ लाच त्यांची पहिली सहल सुरू होत होती. पण त्याकरताचे आरक्षण तर आता मिळणारच नाही असे वाटत होते. तरीही रेल्वेचे संकेतस्थळ बघितले, आणि काय आश्चर्य, ३०-०९-२००९ चे आरक्षण उपलब्ध होते. सचिनला विचारून घेतले की आमचे आरक्षण होईपर्यंत आमच्या जागा राखून ठेवता येतील का? ते हो म्हणाले. मग जाण्या-येण्याचे आरक्षण लगेचच करून घेतले आणि सचिनसोबत सहलनोंदणी केली.
मेवाडः एक बहुचर्चित पर्यटनवर्तुळ
मग तपासादरम्यान असे लक्षात आले की मेवाड पर्यटन हा काही साधासुधा प्रकार नाही, तर तो भारतातला सर्वात जास्त पर्यटकांच्या आवडीचा पर्यटन मार्ग आहे. आनंददायी, प्रेरणादायी आणि सुखाचा. मेवाडास मिळालेले निसर्गाचे वरदान म्हणजे अरावली पर्वत. अर्बुद आवली म्हणजे अरावली. अर्बुद म्हणजे गळू, टेंगूळ, टेकाड, शिखर, कळस. हरियाणा, राजस्थान तसेच गुजरातच्या भूभागांवर ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरत गेलेल्या टेकड्यांच्या रांगा हेच अरावली पर्वताचे स्वरूप आहे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा इत्यादी पर्वतांचे स्वरूप भिंतींसारखे आहे. मात्र अरावली पर्वत सुट्ट्या टेकड्या टेकड्यांचा मिळून घडलेला आहे. पश्चिमेकडल्या थरच्या वाळवंटास रोखून धरण्याचे महत्त्वाचे कार्य अरावली पार पाडतो आहे. याच कारणाने इथे अर्बुदादेवीची पूजाही सर्वत्र केली जाते. अरावली पर्वतातून बनास, लुनी, गंभीरा, चंबळ, (सर्व पूर्ववाहिनी) तसेच साबरमती (पश्चिमवाहिनी) इत्यादी नद्या उगम पावतात. हल्लीच्या राजस्थानाचे सर्वसाधारणपणे दोन भाग पडतात. थरच्या रुक्ष वाळवंटाची मरूभूमी असलेला मारवाड आणि तलाव-अरण्यांनी जिवंत झालेला, अरवली पर्वताच्या कुशीत वसलेला मेवाड.
भारतातले सर्वात बहुचर्चित पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे. दिल्लीचे तख्तनशिन बादशाहसुद्धा भरतभूमीच्या वैभवाचे उपभोग घेऊ शकले नसतील, एवढे वैभव राजपुतान्यातील राजांनी अनुभवले आहे. आज दिल्लीत म्हणण्यासारखा राजवाडा नाही. मात्र राजस्थानात सारेच राजेशाही. मेवाडातील अंबरचे राजे कच्छवाह. यांनीच जयपूर वसवले. तिथे राज्य केले. दिल्लीतील प्रचलित राजसत्तेशी कायमच जुळवून घेतले आणि सार्या भरतवर्षाची राजसत्ता पर्यायाने आपल्या हातात ठेवली. तिचा उपभोग घेतला. चित्तौडचा इतिहास महाभारतापासूनचा आहे. इथे बाप्पा रावळांच्या गहलोत वंशाने राज्य केले. पुढे ते शिसोदिया म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी उदयपूर नगर वसवले. हे कायमच दिल्लीच्या सत्तेविरुद्ध संघर्षरत राहिले. तरीही जयपूर असो की चित्तौड, दोन्हीही ठिकाणी जे राजप्रासाद आज पाहायला मिळतात ते भरतवर्षातील संपत्तीच्या साठ्याचे निदर्शक आहेत. मात्र अंबर व चित्तौड यांच्यात एक मुख्य फरक आहे. भरतवर्षाच्या रक्षणार्थ आणि स्वाभिमानार्थ अंबरकरांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला, तर चित्तौडकरांनी संघर्षाचा मार्ग पत्करलेला दिसून येतो. सार्या भरतवर्षातील संपत्तीचा राजपुतान्यात संचय करण्यात मात्र दोन्ही घराण्यांनी कोणतीच कसर ठेवलेली दिसत नाही. वायव्येस असल्याने अंबरकरांना कायमच आक्रमकांचा त्रास सहन करावा लागे. तर चित्तौडकर बव्हंशी सुरक्षिततेच्या नैसर्गिक आवरणात राहिल्याने तडजोडीस धार्जिणे राहिले नाहीत.
आपल्या बुद्धिवैभवाने मातृभूमीस परम वैभवाप्रत नेण्याकरता राजपुतांनी जयपूर, उदयपूरसारखी नयनमनोहर शहरे वसवली; यंत्रमंदिरा (जंतरमंतर) सारख्या वेधशाळा निर्माण करून अवकाश निरीक्षणास, संशोधनास प्रतिष्ठा दिली; दिलवाडासारखी मंदिरे, कुंभलगड, चित्तौडगड, अंबर, रणथंभोर यांसारखे कोटकिल्ले व त्यावरील गढ्या-प्रासादांनी कलेचे स्वर्गच भुईवर आणले आणि राजस्थानच्या मरुभूमीत "सहेलियों की बाडी", जलमहल यांसारखी मानवी उपभोगाची चिरंतन रम्य स्थळे साकार केली. निसर्गाचे दान सढळ हस्ते मिळालेले असतांना, ते मानवनिर्मित लेण्यामंदिरांनी विभूषित करून पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यात राजपुतांनी कोणतीही कमी ठेवलेली नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही रस्ते, वीज, प्रवासीनिवास यांबाबत हे राज्य कायमच पर्यटनानुकूल राहत आलेले आहे. त्यामुळे आज तो राजपुताना पर्यटनाचा स्वर्गच मानला जातो. तोच स्वर्ग आज जगभरातील पर्यटकांना इथे खेचून आणत असतो. आणि म्हणूनच भारतातले सर्वात बहुचर्चित पर्यटनवर्तुळ मेवाडात आहे.
पहिला दिवसः माऊंट अबू
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आमच्या प्रवासाच्या पहिल्या दिवशी आम्ही अरावली एक्सप्रेसने 'आबूरोड'ला जाऊन पोहोचलो. तिथे सचिन ट्रॅव्हल्सचे प्रतिनिधी आम्हाला उतरवून घेण्याकरता एस-४ बोगीसमोर सज्ज असणार होते. आम्ही झपाट्याने तिथे जाऊन पोहोचलो. आता फक्त वाटच पाहायची होती.
बाहेरून, आबूरोड स्टेशनचे घुमट प्रेक्षणीयच दिसत होते.
तेवढ्यात स्टेशनवर 'आबू की रबडी' बोर्ड पाहिला. मेवाडदर्शन सहलीच्या पूर्वतयारीतच रबडी, घेवर, गजक, राजकचोरी इत्यादी फर्मास पदार्थांच्या आस्वादाची अपेक्षा तयार झालेली होती. म्हणून जेव्हा आम्ही आबूरोड स्टेशनवर 'आबू की रबडी' बोर्ड पाहिला, तेव्हा लगेचच 'आबू की रबडी' चाखून पाहण्याचा मोह झाला. पेल्याच्या आकाराच्या मातीच्या कुल्हडीतून 'आबू की रबडी' घेतली. दर कुल्हडीस फक्त पंधरा रुपये फक्त. मात्र कुल्हडीत पाणी शोषल्या गेल्यामुळे की काय, पण रबडी अपूर्व लागत होती. मधुर, गोड आणि लच्छेदार. मन खूश झाले.
दरम्यान, सचिन ट्रॅव्हल्सचे प्रतिनिधी श्री.सुशांत जोशी आणि श्री.शैलेश दोंदे, त्यांच्या टोप्यांसह तिथे हजर झाले. त्यांनी सर्व प्रवाशांना एकत्र आणले, त्यांचे सामान ताब्यात घेतले, आणि आम्ही ३५ आसनांच्या, २ x २, वातानुकूलित बसकडे वाट चालू लागलो. सगळे २१ प्रवासी आणि सहलप्रणेते बसमधे बसले, ड्रायव्हर किन्नरांचे इशारे झाले आणि बस माऊंट अबूची रमणीय वाट चालू लागली.
जेवणखाण आटोपून थोडीशी विश्रांती घेतली. संध्याकाळी सूर्यास्त बघण्याकरता आम्ही सूर्यास्तदर्शनस्थळाकडे निघालो. जिथे बस थांबली तिथून पाच मिनिटांवर ते आहे. मात्र तिथे एक अभिनव वाहन आम्हाला दिसले. ते म्हणजे बाबागाडी. मग एक खडक जणू हात जोडून स्वागत करतांना आढळला.
आणि तिथवर पोहोचलो तेव्हा आढळली ती माऊंट अबूची सर्वोत्कृष्ट मिठाई. सोहन पापडी. ती मुळीच पापडी वाटत नव्हती. पांढुरक्या पिवळ्या रंगाची कापसागत किंवा 'बुढ्ढी के बाल' वाटावी अशी साखरेची, अगदी तरलपणे तोंडात विरघळून जाणारी मिठाई. अतिशय हलकी. तिच्या, वाटीच्या आकाराच्या मुदी बनवून ठेवल्या होत्या आणि प्रत्येकी पाच रुपयांना एक अशा विकत होते.
मग सूर्यास्त पाहण्याकरता मोक्याची जागा हुडकण्यासाठी धावपळ सुरू झाली. सूर्यास्ताला आणखी अर्धा तास तरी असावा. मग तिथे आसपासच्या दृश्यांवरच चर्चा सुरू झाली. तिथे खूप घाणेरीची झुडुपे इतस्ततः विखुरलेली होती. सुंदर फुलांचे घोस होते. शिवाय मिर्याच्या आकाराची काळी काळी फळेही गुच्छांनी लगडलेली होती. तिथल्या गप्पांतून, घाणेरीला फळे येतात ही नवीनच माहिती मिळाली. ही फळे खायला गोड लागतात. आरोग्यवर्धक असतात. शिवाय मूळव्याधीवरचा उत्तम उपायही ठरतात, असेही समजले. लगेचच स्वतः खाऊन खात्री पटवली. इथे तत्काळ मेहंदी काढण्याकरता लाकडाचे साचे विकतही होते आणि तत्काळ मेहंदी काढूनही देत होते. अनेक महिलांनी सूर्यास्तापर्यंतच्या वेळाचा सदुपयोग तत्काळ मेहंदी रंगवून घेण्याकरता करून घेतला. निरनिराळे खाद्यपदार्थ हिरीरीने विकले जात होते. त्यामधे, द्रोणांत सोलून ठेवलेले डाळिंबाचे दाणे हा नवा पदार्थही विकायला होता.
मग सावकाश सूर्यास्त झाला. मात्र तो क्षितिजाआड सूर्य दडून नव्हे. कारण आकाश ढगाळ तर होतेच शिवाय धुकेही होते थोडेसे. त्यामुळे सूर्यास्त पाहण्याचा काहीसा विरसच झाला. त्यानंतर 'नक्की' तलावावर जायचे होते. नखाने निर्माण केलेला म्हणून 'नखकी ताल' असे नावही कळले. पण अंधार आधीच पडू लागलेला असल्याने काही प्रवाशांना खरेदीत रस वाढू लागला होता, तर आमच्यासारखे काही प्रवासी अजूनही बोटिंगचा हुरूप बाळगून होते. म्हणून शिस्तीत वाटणी झाली आणि आम्ही बोटिंगला निघालो. सहा जणांची वल्हवायची बोट मिळाली, नावाड्यासकट. अर्धा-पाऊण तास पाण्यात विहरून मग आम्हीही खरेदीच्या सत्रात रुजू झालो. बांधणीच्या साड्या, सूट, कलात्मक शोभेच्या वस्तू, मोजड्या, परतल्यावर इतरांना वाटता येतील अशी स्मृती-चिन्हे, काय अन काय. प्रवासी खरेदीदारांचा माऊंट अबूमधील माल रोड, हा तर स्वर्गच आहे.
दुसरा दिवसः माऊंट अबू
आधी हॉटेलातच परस्पर परिचयाचा कार्यक्रम झाला. मग 'श्री अर्बुद विश्वनाथ महादेव मंदिर' दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिराच्या इमारतीसच पिंडीचा आकार दिलेला असल्याने, गेरूच्या रंगाने रंगवलेली
ती इमारत दुरूनच नजरेत भरत होती. त्यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यापीठाचे मुख्यालय 'युनिव्हर्सल पीस हॉल' ऊर्फ विश्वशांतीदालन बघितले. पुढल्या चित्रपट्टीतले मधले चित्र त्याचेच आहे. त्यांच्या आचारपद्धतीबाबत प्राथमिक माहितीही दिली गेली, मात्र ती पुरेशी वाटली नाही. आम्हाला अधिक वेळही नसल्याने इतर प्रवाशांप्रमाणेच आम्हीही पुढच्या स्थळाकरता सिद्ध झालो. ते होते अर्बुदा माता मंदिर. ३६५ पायर्या चढून डोंगरावरच्या मंदिरात जायचे होते.
अर्बुदादेवी किंवा अधरदेवी चे मंदिर माऊंट अबूच्या उत्तरेला ३ किलोमीटर अंतरावरील एका गुहेत आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यास ३६५ पायर्या चढाव्या लागतात. मंदिरात वाकूनच प्रवेश करावा लागतो. मोबाईल, बॅगा वगैरे वस्तू गाभार्यात नेऊ देत नाहीत. मंदिराच्या वाटेवर काटेरी झुडूपांची दाट हिरवळ असल्याने चढतांना थकवा जाणवत नाही. आजूबाजूचे निसर्गसौंदर्यही वाखाणण्यासारखे आहे.
महाराष्ट्रात पदोपदी दिसणारे अश्वत्थ वृक्ष वड, पिंपळ आणि औदुंबर इथे क्वचितच दर्शन देतात. आंबा, फणस, काजू, चिक्कू, संत्री, पेरू, सिताफळे यांसारख्या झाडांनी जणू मेवाडवर बहिष्कारच टाकला आहे की काय असे वाटते. महाराष्ट्रात आढळणार्या केळी, ऊस इत्यादींच्या बागा तर विसरायलाच हव्यात. मात्र खेजडी (खजूर), बाभूळ, आवळे यांच्या बागा होत असल्याचे अनोखे दृश्य यानंतर अनेकदा नजरेस पडले. या अशाप्रकारच्या वृक्षसंपदेमुळे इथल्या कुठल्याही युद्धात गनिमी कावा शक्य होत असेल असे मला वाटे ना. मात्र महाराणा प्रतापांनी गनिमी काव्यानेच अकबराला हैराण करून सोडल्याची, तसेच चित्तौड वगळता सार्या मेवाडवर पुन्हा ताबा मिळवल्याची कहाणी पुढे समजणारच होती.
अर्बुदादेवीचा डोंगर उतरतांना ताक, दही, उसाचा रस आणि भरपूर इतर खाद्यपेये उपलब्ध होती. खरे तर गार वार्यांतून केलेल्या उल्हासदायक चढ-उतारानंतर श्रमपरिहाराची तशी फारशी आवश्यकताही जाणवत नव्हती. तरीही आम्ही सगळ्यांनी उत्तम ताकाचा (छाछ) आस्वाद घेतलाच. इथे टेकडीवर माकडे खूप आहेत. आम्ही जे चणे प्रसादाकरता म्हणून घेतले होते, खाली उतरल्यावर, ते चणे माकडांना खाऊ घालण्याकरता विकत होते असे लक्षात आले. चणे खाऊन पाहिले असता त्याची खात्रीच पटली. ते कडक कुडकुडीत होते. (आमच्याकडे हळदीकुंकवाला म्हणून काही बोरे विकत असत. ती अजिबात खाण्याच्या दर्जाची नसत. तसलाच हा प्रकार वाटला.) मात्र माकडे ते चणे आवडीने खातांना दिसली.
सरतेशेवटी मात्र आम्हाला, उन्हाचा त्रास टाळण्याकरता, स्थलदर्शनाच्या कार्यक्रमाचे नियोजन थोडे उलटे करायला हवे होते असे वाटले. म्हणजे अर्बुदादेवीचा डोंगर आधी आणि नंतर अर्बुद विश्वनाथ महादेव व मग विश्वशांतीदालन पाहिले असते तर जास्त बरे झाले असते, असे.
जेवण व थोड्याशा विश्रांतीनंतर दिलवारा जैन मंदिर पाहायला गेलो. संगमरवरी मूर्तीकलेचे माहेरघरच आहे ते. मात्र कॅमेरा, मोबाईल, बॅगा वगैरेला आत परवानगी नाही. त्यामुळे फोटो काढलेले नाहीत.
या ठिकाणी पाच मंदिरे आहेत.
त्यातले पहिले मंदीर, चालुक्य महाराज भीमदेव(प्रथम) यांचे मंत्री व सेनापती असलेले विमलशहा यांनी, इसवी सन १०३१ साली बांधून पूर्ण केले. म्हणून त्यास विमलवसाही म्हणतात. त्यात प्रथम जैन तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेवजी यांची मूर्ती प्रतिष्ठित आहे.
दुसरे मंदीर गुजरातचे सोळंकी राजा भीमदेव (द्वितीय) यांचे मंत्री वस्तुपाल आणि त्यांचे लहान बंधू तेजपाल यांनी आबूचे राजा सोमसिंह यांच्या अनुमतीने, विमलवसाही मंदिराजवळच त्याचेचप्रमाणे सफेद संगमरवरातून इसवी सनाच्या १२८७ मधे बांधून प्रतिष्ठित केले. तेजपाल यांचे पुत्र लावण्यसिंह यांचे नावाने ते मंदीर लूणवसाही म्हणवले जाते. त्यात जैनांचे २२ वे तीर्थंकर श्री नेमीनाथ यांची कसौटीच्या दगडातील अत्यंत रमणीय मूर्ती प्रतिष्ठित आहे. लूणवसाहीची हत्तीशाळाही संगमरवरात संजीवित करण्यात आलेली आहे.
तिसरे मंदीर आहे पीतलहर मंदीर. हे गुजरातच्या भीमाशाह यांनी घडवले असल्याने यास 'भीमाशाह यांचे मंदीर' असेही संबोधले जाते. याचे निर्माण इसवी सनाच्या १४३३ मधे पूर्ण झाले. १४६८ मधे जीर्णोद्धारात जैनांचे प्रथम आचार्य ऋषभदेवजी यांची पंचधातूंची मूर्ती स्थापित करण्यात आली.
चौथे मंदीर नववे तीर्थंकर श्री सुविधिनाथ यांचे आहे.
पाचवे मंदीर तीन मजली चिंतामणी पार्श्वनाथ मंदीर आहे. हे श्वेतांबर जैनांच्या खरतरगच्छ समुदायाचे अनुयायी 'मंडलिक' यांनी इसवी सन १४५८ मधे बांधून पूर्ण केले. याच्या चारही बाजूंना भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती प्रतिष्ठित असल्याने या मंदिरास 'चौमुखा पार्श्वनाथ मंदीर' असेही म्हणतात. संगमरवरी शिल्पकलेचा स्वर्गच वाटावा अशा या मंदिरांचे रूप केवळ अवर्णनीय आहे. शिवाय, रंग फक्त शुभ्रधवलच असल्याने, ते सौंदर्य, कुठल्याही प्रकारच्या फोटोग्राफीत सापडणारे नाही. म्हणून प्रत्यक्षच पाहावे. आयुष्यात एकदा तरी.
नंतरचा उर्वरित दिवस सचिनने मोकळाच सोडलेला होता. त्यांचाच मार्गदर्शक मग सांगू लागला, की तुम्हाला पाहायचे असेल तर, गुरूशिखर आपल्याला पाहता येईल. मी वाहनव्यवस्था करू शकेन. मात्र १०० रुपये माणशी इतका खर्च येईल. सचिनतर्फेच ही व्यवस्था का केली जात नाही? याचे उत्तर, आमची बस तिथे नेण्याची अनुमती नाही असे आले. तरीही ही निराळी वाहनव्यवस्था सहलकार्यक्रमातच अंतर्भूत करायला हवी होती, यावर सर्व प्रवाशांचे एकमत झाले. असो. मग मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसारच वाहनव्यवस्था करून आम्ही स्वखर्चाने गुरूशिखर पाहण्याकरता गेलो. गेलो नसतो तर एका अद्वितीय अनुभवास मुकलो असतो.
गुरूशिखर
दिलवारा अचलगढ रस्त्यावर ३ किलोमीटर पासून, एक ७ किलोमीटर लांबीची डांबरी सडक उंच पर्वतावरील गुरूशिखरापर्यंत घेऊन जाते. गुरूशिखर हे अरवली पर्वताचे सर्वोच्च शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे १,७२२ मीटर (म्हणजेच ५,६७६ फूट), तर त्याचे ठिकाण माऊंट अबू पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. गुरूशिखरावर दत्तात्रयाचे मंदिर आहे. मंदिरात दत्तात्रयाची सुरेख मूर्ती आहे. इथेच एक भव्य, पुरातन, पितळी घंटा होती, जिच्यावर ख्रिस्तपूर्व १,४११ मधील कोरीव काम होते. आता मात्र तिच्या जागी नवी घंटा बसवलेली आहे. मंदिरापासून आणखी थोड्या उंचीवरील सर्वोच्च ठिकाणी चरण पादुकांचे एक छोटेसे मंदिर आहे. इथून सभोवतालचे विहंगम दृश्य पाहता येते. इथे वेगवान वारे सदा सर्वकाळ वाहत असतात. गोरक्षनाथांनी म्हटलेच आहे की 'पवन ही योग, पवन ही भोग, पवन ही हरे छत्तीसो रोग'. इथल्या प्रवाही वार्यांमुळे इथे कायमच आरोग्यदायी वातावरण निर्माण झालेले आहे. गुरूशिखरावर वरच्या भागी दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे देऊळ आहे, तर खालच्या बाजूला दिसतंय ते आहे दत्तमंदिर.
दुसर्या चित्रात वरच्या बाजूला एक शंखाकृती आणि खालच्या बाजूला एक भव्य खोबण असलेला खडक, गुरूमंदिराच्या वाटेवर उठून दिसतात. खालच्या चित्रपट्टीतील पहिले चित्र शंखाकृती खडकाचे आहे तर दुसरे खोबणीच्या खडकाचे. संपूर्ण छत असलेल्या, मात्र तळाशी सपाट बूडच नसलेल्या या खोबणी, राहण्यास गुहा म्हणून मुळीच वापरता येण्यायोग्य नाहीत. हा खोबण असलेला खडक, गुरूशिखराच्या वाटेवर सहजच नजरेत भरतो. याच चित्रपट्टीतील तिसर्या चित्रात दत्तात्रयांच्या चरण पादुकांचे मंदिर दिसत आहे. मंदिरावर जे काही लिहिलेले दिसत आहे ते आहे 'गुरू दत्तात्रेय की चरण पादुका. दर्शन करके घण्टा बजाये, मनोकामना पुरी होती है।'. शेवटले चित्र आहे त्याच घंटेचे, जिचा उल्लेख चरण पादुकांच्या मंदिरावरल्या लिखाणात केलेला आहे.
मंदिराजवळ 'फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी'ने चालवलेली 'माऊंट अबू वेधशाळा' आहे. या वेधशाळेत १.२ मीटर अवरक्त दुर्बीण आहे. इथे अवकाशीय वस्तूंच्या अवरक्त किरणांचे भूमीवरून निरीक्षण करण्या करताची भारतातील पहिलीच प्रमुख सुविधा आहे. इथे उंचीवरच्या वातावरणाच्या विज्ञानाचा अभ्यास केला जातो (एरोनॉमी). ज्यात विघटन आणि मूलकीकरण महत्त्वाचे असते. या विषयावरचे अनेक प्रयोगही येथे केले जातात. http://www.prl.res.in/. या प्रयोगशाळेचा फोटो चरणपादुकांच्या मंदिराजवळून उत्तम प्रकारे काढता येतो. हा फोटो मात्र आंतरजालावरून साभार उचललेला आहे.
या प्रवासवर्णनाच्या तीनही भागांचे दुवे खाली दिलेले आहेत.
http://www.maayboli.com/node/11963
http://www.maayboli.com/node/12036
http://www.maayboli.com/node/12176
आपले,
http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही स्वागत आहे.
उत्तम माहिती. अजून पुढे
उत्तम माहिती. अजून पुढे लिहिणार आहात ना?
हो. नक्कीच.
हो. नक्कीच.
>> दिल्लीतील प्रचलित
>> दिल्लीतील प्रचलित राजसत्तेशी कायमच जुळवून घेतले आणि सार्या भरतवर्षाची राजसत्ता पर्यायाने आपल्या हातात ठेवली
हे काय पटलं नाही...
असुदे, बाकी लेख सविस्तर लिहिला आहे. माहितीत बरीच भर झाली. आम्ही सचीन बरोबर मारवाडच्या ट्रीपला गेलो होतो. भयानक बोर झालं होतं आम्हाला तरी... तुम्ही मजा केली हे वाचुन बरं वाटलं.
नरेंद्रजी , खुपच सुंदर वर्णन
नरेंद्रजी ,
खुपच सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी , मी आवड्त्या १० मध्ये समाविष्ट केले आहे .
सॅम, कदाचित पुढला भाग
सॅम, कदाचित पुढला भाग वाचल्यावर तुम्हाला पटेल. अवश्य वाचा. प्रतिसादाखातर धन्यवाद.
श्री, प्रतिसाद आणि प्रशंसेखातर मनःपूर्वक धन्यवाद. पुढले भागही अवश्य वाचा.
सॅम, कदाचित पुढला भाग
सॅम, कदाचित पुढला भाग वाचल्यावर तुम्हाला पटेल. अवश्य वाचा. प्रतिसादाखातर धन्यवाद.
श्री, प्रतिसाद आणि प्रशंसेखातर मनःपूर्वक धन्यवाद. पुढले भागही अवश्य वाचा.
सॅम, कदाचित पुढला भाग
सॅम, कदाचित पुढला भाग वाचल्यावर तुम्हाला पटेल. अवश्य वाचा. प्रतिसादाखातर धन्यवाद.
श्री, प्रतिसाद आणि प्रशंसेखातर मनःपूर्वक धन्यवाद. पुढले भागही अवश्य वाचा.
सॅम, कदाचित पुढला भाग
सॅम, कदाचित पुढला भाग वाचल्यावर तुम्हाला पटेल. अवश्य वाचा. प्रतिसादाखातर धन्यवाद.
श्री, प्रतिसाद आणि प्रशंसेखातर मनःपूर्वक धन्यवाद. पुढले भागही अवश्य वाचा.
अरेच्चा हे किती प्रतिसाद
अरेच्चा हे किती प्रतिसाद झालेले आहेत अचानक?
हे अतिरिक्त प्रतिसाद नाहीसे नाही का करता येत? कुणीतरी सांगा बुवा.
पूर्वी प्रतिसाद रद्द करता येत असत, असे आठवते.