ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कविता

Submitted by Admin-team on 26 October, 2009 - 01:18

ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड
सर्वप्रथंम ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड करायला खूपच उशीर झाला त्याबद्द्ल मनापासून क्षमायाचना!कारणे वैयक्तिक व अपरिहार्य होती.पण त्याचबरोबर सर्व कविता वारंवार वाचणे
हेहि तितकेच आवश्यक तसेच दुसरे परीक्षक श्री.गिरीश कुलकर्णी हे परदेशात असल्याने संपर्कासाठीही
वेळ गेला. असो.
कवितांची निवड करतांना सर्वांत आधी शुद्धलेखन,कवितेचा परिणाम (इम्पॅक्ट) व आशय व तद्नंतर रचनाकौशल्य, गझल सारख्या रचनेत तांत्रिक बाजू अर्थात वृत्ताची (मीटर) अचूकता इत्यादिंबाबतचा विचार निवड करताना केला आहे.आम्हां दोघांच्या मते खालील ३ कवितांची सर्वोत्तम म्हणून निवड
केली आहे. कविता चांगली असून शुद्धलेखन नसेल तर ती बाद ठरवली आहे.

सुरवंट (कौतुक शिरोडकर)
या कवितेत आशय, परीणाम व रचना लक्षणीय आहेत. जास्त सांगत नाही.ही कविता मुळातूनच वाचावी.

ती (सुनील पाटकर)

ही एक छोटी,साधी पण विलक्षण निरागस कविता. दीर्घकाळ मनात रेंगाळणारी.

न्यास (क्रान्ती)

ही गझल तंत्रशुद्ध तर आहेच पण गझलच्या इतर अंगानीसुध्दा परिपूर्ण आहे.

इतर चांगल्या कवितामध्ये:
अजब (उत्साह), अनुराधा म्हापणकर (व्हू केअर्स), हरीश दांगट (शेतकर्‍याची व्यथा) देवदत्तजी (भेट)
गिरीश कुलकर्णी (आयुष्य),उमेश कोठीकर (पाऊस्,अर्पणपत्रिका), विशाल कुलकर्णी (आईच्यान सांगतु), कौतुक शिरोडकर(मल्ह्रारसांज,क्षेत्र) क्रान्ती (जोगवा,पुन्हा, नकोशी) लिमयेपरेश (उशीर) मानस६(घायाळ हरिणी..) वैद्य (उशीर,नको नको,तू)
पूजा दिवाण (दंश) पुलस्ति (माळ) राधा कुलकर्णी (संवेदना) वेदनगंधा(बांध) ह्या उल्लेखनीय आहेत.
त्या जरूर वाचाव्यात.
सर्व कवींचे अभिनंदन व आभार.
तसेच 'मायबोली' चे आभार.
आपलेच,
जयन्ता५२ , गिरीश कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाय 'घाईघाईत झालेल्या टायपो' हा एक भाग वगळला, तरी सर्वोत्कृष्ट म्हणून निवडलेल्या कवितेत शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत त्याचं काय? मग तेव्हा त्या निकषाचं (तो बरोबर की चूक हा आणखीनच निराळा मुद्दा) काय झालं?

शिवाय टायपो होण्याइतकी घाई कसली होती? दोन महिने उशीर झालाच होता, त्यात आणखी दोन तासांनी असा काय फरक पडला असता? नीट चुका दुरुस्त करून निकाल जाहीर करायचा होता.

शिवाय 'घाईघाईत झालेल्या टायपो' हा एक भाग वगळला,>>>प्रश्न मिटला. स्वाती, मी जो मुद्दा मांडायचा प्रयत्न करतीये तो हाच.

घाईघाईत चुका होणे हे शक्य आहे पण हे सहज टाळता येणेही शक्य आहे. (रीव्युची कॉन्सेप्ट इथे वापरता येईल का? उदा. एक वॉलंटीयर नेमावा ज्याला फायनल पोस्ट टाकण्याआधी शुद्धलेखन रीव्यु करण्यास सांगावे म्हणजे अशा चुका टाळता येतील).

कसा प्रश्न मिटला? पोस्ट पूर्ण वाच बघू. Happy

>>> शिवाय टायपो होण्याइतकी घाई कसली होती? दोन महिने उशीर झालाच होता, त्यात आणखी दोन तासांनी असा काय फरक पडला असता? नीट चुका दुरुस्त करून निकाल जाहीर करायचा होता.

माझंही शोनूला पूर्ण अनुमोदन आहे.

स्वाती खालचा परिच्छेद नंतर अ‍ॅड केलायस ना त्यामधे. Happy
मी उत्तर लिहायाला सुरवात केली तेव्हा तुझ पोस्ट फक्त वरच्या परिच्छेदाचच होतं. चुका टाळायलाच हव्या हेच माझंही मत आहे.

आणि मी पुन्हा लिहितेय की अ‍ॅडमीन टीम या निवडलेल्या कवितांच पोस्ट प्रकाशीत करत असते तेव्हा ज्या काही चुका/टायपो झालेल्या आहेत त्या नक्कीच कोणीतरी त्यांच्या नजरेस आणून दिल्या असत्या. किंवा आपण कोणी तरी द्यायला हव्या होत्या. अगदी वर ज्यांनी ज्यांनी या चुका आणि सगळ्या गोंधळावर चर्चा चालवली आहे त्यांनीसुद्धा .

सगळ्यांनीच कुठल्यही छोट्याश्या गोष्टीचा असा इश्यु होऊ नये याची काळजी घ्यायला नको का? घरची भांडणं लगेच चव्हाट्यावर आणणं(अगदी चिमटाच असला) तरीही मला पटलेलं नाहीये.

आता या संदर्भात घर म्हणजे काय आणि चव्हाटा म्हणजे काय ते ही सांगून टाक.
माझ्या मते हे 'चुका नजरेस आणून देणंच' आहे, आणि त्यात काही गैर नाही.

खालचा परिच्छेद नंतर अ‍ॅड केला म्हणून तो मुद्दा गैरलागू होत नाही.

शिवाय 'इश्यू' (जयंतरावांनी मायबोली सोडतो म्हणणं इ.) शोनूच्या पोस्टवरून झालेला नाही. Happy

>> चुका टाळायलाच हव्या हेच माझंही मत आहे.
तुझ्या पहिल्या पोस्टवरून असं वाटलं की चुकांना टायपो समजून त्या पाठीशी घालाव्यात असं तुझं मत आहे. Happy

.

शिवाय 'इश्यू' (जयंतरावांनी मायबोली सोडतो म्हणणं इ.) शोनूच्या पोस्टवरून झालेला नाही.>>इश्यू>>नोटेड Happy

आणि जयंतरावांनी मायबोली सोडणं हा इश्यू नाहीच इथे. तो ज्याचा त्याचा प्रश्न.

तुझ्या पहिल्या पोस्टवरून असं वाटलं की चुकांना टायपो समजून त्या पाठीशी घालाव्यात असं तुझं मत आहे.>>>पाठीशी घालाव्यात???? अजिबात नाही चुका आहेत मान्यच हे वरही बोलले आहे. पण. त्या आपणच कोणीतरी अ‍ॅडमीनच्या लक्षात आणून द्यायला हव्या होत्या. कारण पोस्ट अ‍ॅडमीनची आहे

>>>> मंडळी शुद्धलेखनाबाबत आपण कोणाला काय शिकवत आहोत याचं थोडंस भान असावं. जो माणुस सातत्यानी चांगल्या गजल आपल्याला वाचायला देतो त्याच्याकडून शुद्धलेखनाच्या चुका झाल्या आहेत हा गैर(?)समज तरी कसा करून घेतलात तुम्ही लोकांनी? या केवळ टायपो होत्या एवढ साधं लक्षात आलं नाही कोणाच्या? दिसलं कुठेतरी काही चुकलेलं की लागले लगेच शहाणपणा शिकवायला. हीच का तुमची प्रगल्भता?

ही तुझी पोस्ट. माझ्या माहितीत अ‍ॅडमिन गझल किंवा कविता लिहित नाहीत. आणि चुका काढल्या म्हणून ते उद्विग्नही झालेले नाहीत. Happy

असो. हेमाशेपो. Happy

चांगल्या शब्दात अथवा पर्सनली या दोघांना मेल टाकून किंवा अ‍ॅडमीनला कळवून हा जो टायपोचा गोंधळ झाला तो सुधारता आला असता. >>>हे सुद्धा माझ्या त्याच पोस्टमधल वाक्य.

शोनूच्या बाकी मुद्द्यांना अनुमोदन, पण हे नाही पटले-
>>म्हणून सर्व कवींनी दर महिन्यात अमक्याच वेळात कविता जाहीर झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे रास्त आहे का ?
आत्तापर्यंत वेळेत झाल्या होत्या जाहीर. नवीन महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत मागच्या महिन्यातल्या सर्वोत्तम जाहीर व्हाव्यात अशी माझीही अपेक्षा आहे. कधीतरी काही कारणाने विलंब होणार असेल तर तशी कल्पना आधीच दिली तरी लोक समजून घेतील. पुन्हा विलंब लागला तरी चालेल पण जे काम केले आहे ते तरी नीट असावे. इथे निकषांत शुद्धलेखनाला प्राधान्य, कविता आणि पोस्टमधल्या शुद्धलेखनाच्या चुका यामुळे सगळे हास्यास्पद झाले आहे.

उपक्रम सुरु रहावा अशी इच्छा आहे.
विजेत्यांचे अभिनंदन आणि उपक्रमाला शुभेच्छा.

शोनू, स्वाती, पूर्ण अनुमोदन.
कोठीकरांचे पहिले पोस्टही खूप प्रामाणिक वाटले होते.

ते 'शुध्द' मात्र अगदी भातातल्या खड्यासारखं प्रत्येक वेळी चुकीचं आलेलं आहे - याला टायपो म्हणत नाहीत; हा शुद्ध निष्काळजीपणाच. Light 1

माझ्यामते शुद्धलेखन हा निकष असू नये कवितांची निवड करताना. तुम्ही कवीची प्रतिभा पहा, कवितेचा आशय पहा, शब्दांचा नेमकेपणा पहा, कवितेचा विषय, त्याची हातळणी, कवितेचे सौंदर्य, तिच्यातले नाना संदर्भ, रुपक, प्रतिमा हे पहा. आपल्याच मातीत बहिणाबाई जन्मल्या त्यांना कुठे अक्षरज्ञान होते. व्याकरण तर मग दुरच राहिले. पुर्वी देवनागरीची सोय असतानाही काही मायबोलिकर मिंग्लिशमधे लिहायचे. पेशव्याचे व्याकरण वा लेखन किती अशुद्ध असते हे माहिती आहे इथे सर्वांना तरी त्याच्या कवितांची आससून आपण वाट पहातो ना.. तेंव्हा शुद्धलेखन हा चुकीचा निकष आहे.

>.तिच्यातले नाना संदर्भ, रुपक, प्रतिमा हे पहा. आपल्याच मातीत बहिणाबाई जन्मल्या त्यांना कुठे अक्षरज्ञान होते. व्याकरण तर मग दुरच राहिले.<<

बी, साक्षर असण्याचा किंवा निरक्षर असण्याचा व्याकरणादी भाषिक ज्ञानाशी थेट संबंध नाही. निरनिराळे भाषिक समाज निरक्षर असलेल्या काळापासून त्या सर्व भाषा आणि त्यांची व्याकरणं आहेत. लिपी व लेखनमाध्यमांचा प्रसार होईपर्यंत त्या भाषा न् त्यांची व्याकरणं श्रुतिपरंपरेतून पिढ्यान् पिढ्या हस्तांतरित होत आली आहेत.
खेरीज, रसाळ कविता करणार्‍या बहिणाबाई (किंवा तत्सम इतर अक्षरओळख नसलेले, परंतु रसाळ वाङ्मय लिहिणारे कवी, साहित्यिक) उपमा-रूपकादी अलंकार, प्रतिमा इत्यादींसारखी भाषेतील व्याकरणांगे त्यांच्या रचनांमधून योजत असल्यास 'त्यांना व्याकरणज्ञान नसावे' असे म्हणता येणार नाही.

तात्पर्य : व्याकरण आणि भाषा यांतील क्षमतांचा साक्षरतेशी संबंध नाही (,मात्र लेखन जमल्याशिवाय शुद्धलेखन ही भानगडच येत नसल्यामुळे, तिथे मात्र साक्षरता महत्त्वाचीच. Happy ).

फ, मान्य आहे मौखिकपरंपरेपासून भाषेला व्याकरण लाभले आहे. धन्यवाद!
====

शुद्धलेखनाचे नियम लावून जर एखादी कविता शुद्ध केली तर त्या कवितेत खरचं काही फरक पडतो का? मला वाटतं काहीही फरक पडत नाही. आणि ऐवजी आनि लिहिले आणि पाणि ऐवजी पानि लिहिले तरी आशय तोच राहतो. मग हा निकष का असावा? व्याकरणाचे महत्त्व मलाही कळते पण कवितांची निवड करताना मी मात्र व्याकरण गौण मानेल.

आणि ऐवजी आनि लिहिल्यावर फरक पडत कसा नाही?
नुसत्या शब्दार्थापुरती कविता असते का? शब्द कसा येतो त्या ठिकाणी यावर कवितेची ओळख निर्माण होत असते.
आणि वा आनि हे दोन्ही वेगवेगळ्या कवितेत योग्यच असतात पण त्यांची अदलाबदली चूक असते.

<<माझ्यामते शुद्धलेखन हा निकष असू नये कवितांची निवड करताना. तुम्ही कवीची प्रतिभा पहा, कवितेचा आशय पहा, शब्दांचा नेमकेपणा पहा, कवितेचा विषय, त्याची हातळणी, कवितेचे सौंदर्य, तिच्यातले नाना संदर्भ, रुपक, प्रतिमा हे पहा. आपल्याच मातीत बहिणाबाई जन्मल्या त्यांना कुठे अक्षरज्ञान होते. व्याकरण तर मग दुरच राहिले.>>

अशुद्ध लेखन कशाला म्हणावे हाच मुळी वादाचा विषय आहे. बहिणाबाईंची गाणी किंवा इतर बोलीभाषेतील लेखन अशुद्ध म्हणू शकतो का आपण? पण हे ठरवण्यासाठीच तर तज्ज्ञ मंडळ असते.

आता उदा. सुलोचना चव्हाण यांनी गायलेले हे गीत पहा:

"रुप्पाया र्‍हायला योक SS, तुझ्या आईला झाला ल्योक SS;
एक रुपाया खरंचला.
का वो गांजिसा मला, भाउजी हिसाब देते तुम्हाला!"

पूर्णत: अशुद्ध आहे. तरी ते गीत आपल्याला मान्य करावेच लागेल.

किंवा विशाल कुलकर्णींची ती कविता -

<<दादा म्हनले दंगा करा, आमी बशी जाळल्या;
...
दादा म्हनले आमी दिल्लीला चाललो,
...
आता वो!>>

हे जाणून बुजून केलेले अशुद्ध लेखन आहे. पण त्यामुळेच तर ती कविता इतकी प्रभावी झाली! सांगायचा मुद्दा असा की शुद्ध-अशुद्ध या कल्पना सापेक्ष आहेत. पण निवड करण्यास बसलेल्या मंडळाला इतके ज्ञान जरूर असावे (आणि असतेच) की कुठले अशुद्ध लेखन मान्य करायचे व कुठले नाही. मागे मी स्वत: म्हटले होते की 'कविता ही अशुद्ध लेखनात असूच शकत नाही' त्याचा अर्थ हाच होता. जर कविता प्रभावी करण्यासाठी अशुद्ध लेखन असेल तर ते मान्य करावे, जर बोलीभाषेत कविता असेल तर ती मान्य करावी, जर लय आणण्यासाठी ए़खाद्या शब्दाची मोडतोड केली असेल तर ते मान्य करावे; पण जर कवीला शुद्ध अशुद्ध याची कल्पनाच नसेल तर अशी कविता उत्कृष्ट कविता कशी म्हणता येईल?

मा.बो.वर मी ज्युनियर आहे. तरी राहवत नाही म्हणून वादात पडतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करावे.

शरद

शरदराव,
आवो हितं वाद कवितांच्या शुद्ध्-अशुद्धपनाबद्दल न्हाय चाललाय. भांडनार्‍या मंडळींचं म्हननं हाय, का जर तुमी कवितेच्या निवडीला शुद्धलेखनाचा निकष (सोप्या मराटीत क्रायटेरिया) लावता तर आदुगर सोता शुद्ध लिवायला शिका. पोष्टींची भाषा सोताची सोता वाचून बगा आन मंग ती शुद्ध रूपात हितं टाका, आसं म्हनत्यात काईजन. या समद्या गडबडीत मूळ मुद्दा राहिला बाजूला आन भांडान भलतीकडंच सरकलं की. Happy

समर्थ रामदासांनी म्हटलंय, की 'तुटे वाद, संवाद तो हितकारी' म्हन्जी ज्यातून वाद संपतो त्योच संवाद सर्वांच्या हिताचा आसतुया. आन त्यो शेक्सपिअर बी सांगून गेलाय की 'ऑल वेल दॅट एन्ड्स वेल'. तवा म्या आपला वाट बगतुया, की कंदी येकदा या लोकांच भांडान संपतया ते.

योक परसंग आटावला तुमचं वाचून.
पु. ल. देशपांडे यांनी मराटीत आनलेलं येक नाटक हाय 'ती फुलराणी'. तर त्यातील संवादात फुलरानी झालेली भक्ती बर्वे सतीश दुभाषीला (दोगंबी न्हाईत आता :अरेरे:) म्हन्ते. 'एक व्हता राजा.' त्यावर त्यो म्हनतो ,' अगं! असं अशुद्ध नाही बोलायचं. म्हण बरं, एक होता राजा.' त्यावर ती म्हनते, 'यात मी अशुद्ध काय बोलले? एक व्हता राजा, हे बरोबर हाय.' त्यावर तो विचारतो, 'कसं काय?' मग ती म्हणते, ' समजा राजा नसंल तर तुमी काय म्हणाल?' तर हा म्हणतो 'एक नव्हता राजा'. मग फुलराणी म्हणते, ' नव्हता म्हणजे न व्हता. तुमाला नव्हता शब्द चालतो तर व्हता शब्द का चालत न्हाय? तितं तुमी 'न होता' असं का म्हणत नाय?'

असो. शरदराव मी तुमच्याशी सहमत आहे.

सर्व विजेत्यांचे आणि उल्लेखनीय ठरलेल्या कवींचे मनःपुर्वक अभिनंदन..>>>कि-या मन:पूर्वक रे! तुझाही टायपो झालाय का? का तुला शुद्ध लिहिता येतच नाही? नसेल तर शीकून घे बाबा, आता अशुद्ध लिहिणा-याची डोकी/हात कलम केली जातील असा फतवा निघणार आहे मायबोलीवर Proud

हे अभिनंदन करायचं राहूनच गेलं ज्या कवितांना निवडलं गेलय त्या सगळ्यांच मन:पूर्वक अभिनंदन. Happy

<---
आणि परीक्षक गिरीश कुलकर्णी यांची पण कविता 'उल्लेखनीय' मधे... हा हा हा..हे मात्र टू मच हं.
--->

त्यात काय? मु. सं. बा. यांच्या २ कविता दिवाळी अंकात आहेतच ना? Happy

मित्रहो,
प्रवासात असल्यामुळे माबो बघीतली गेली नाही आणि त्यामुळे प्रतिसादही देता आला नाही ( अन आता बहुधा वेळही निघून गेलीय...). पण काही बाबी आवर्जून लिहिव्याश्या वाटल्या म्हणुन हा खटाटोप :
- हा उपक्रम ठरल्या वेळेत करण्यासाठी संघटनाची गरज आहे अन्यथा हेच चित्र पुढल्या वेळीही दिसेल.
- माझी कविता समाविष्ट करु नये म्हणुन मी आवर्जुन हरकत नोंदवली होती जी जयंतरावांना ग्राह्य वाटली नाही - समावेशाबद्दल क्षमस्व !!!
- सुरुवातीचा प्रतिसाद खरच वेदनादायक आहे...कुठल्याही क्रियेटीव गोष्टीच मुल्यमापन सर्वमान्य होऊ शकत नाही ही बाब समजते पण पद्धत व वापरलेली भाषा भ्रमनिरास करणारे आहेत...

असो. जास्त वाढवायची इच्छा नाही... मी इथे खुप मोठ्या प्रदीर्घ गॅपनंतर लिहायला लागलो होतो...सुरुवातीलाच कौतुक झाल अन तेही मी अगदी नवखा असतांना त्यामुळे रमलोही होतो पण हे सगळ बघुन आवराव म्हणतो. जयंतरावांबरोबर मीही यात असल्यामुळे झाल्याप्रकाराबद्दल खेद अन माफी मागतो व मायबोलीवरुन आपली रजा घेतो.

सगळ्या मित्रांच्या सहकार्य-सुचना-प्रेम कायमच आठवणीत राहतील..

सस्नेह : गिरीश

प्रतिक्रियांवरच्या वादावादीत मुळ प्रॉब्लेम काय आहे आणि त्यावर काय उपाय करायला हवा हा मुद्दा हरवुन गेला आहे. योगेश चे पोस्ट परत पेस्ट करत आहे. त्यावर कृपया विचार करा.
-------------------------------------------------------------------
१) सर्वप्रथम तुम्ही अशा परीक्षक मंडळात काम करण्यास इच्छुकांची नावे मागवून घ्या.
२) या परीक्षकांचे दोन गटांत वर्गीकरण करा
(अ) ज्येष्ठ सदस्य असलेले साहित्य जाणकार (पाच वर्षांपुढील सदस्य कालावधी असलेले) : हे परीक्षक सहा महिने काळासाठी स्थायी असतील. त्यानंतर त्यांची जागा दुसरे घेतील.
(ब) अनुभवी सदस्य (किमान एक ते पाच वर्षे सदस्यत्व असणारे) : हे परीक्षक तीन महिन्यांसाठी असतील व नंतर त्याची जागा दुसरे घेतील.
३) तिसरा परीक्षक एक वर्षाखालील सदस्य असलेल्यांतील उल्लेखनीय कवींमधील असावा. तो दर महिन्याला बदलता राहील.
या तिघांच्या मतांचा व निवडीचा आदर व्हावा. अंतिम शब्द अ‍ॅडमिनचा असेल. परीक्षकांपैकी एखाद्याला ऐनवेळच्या अडचणीमुळे शक्य न झाल्यास इतर दोघांनी कविता निवडीचे काम बघावे. परीक्षक केवळ कवीच पाहिजेत असे नाही. साहित्यप्रेमी आणि संवदनशील असले म्हणजे पुरे.
महिना पूर्ण झाल्यावर पुढचा पूर्ण आठवडा या परीक्षकांनी निवडीसाठी घ्यावा आणि निकाल जाहीर करावा.
किमान एक तरी करा. यावर तोडगा निघेपर्यंत कुणी दोन ज्येष्ठ सदस्यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून परीक्षक म्हणून काम पाहावे.
-------------------------------------------------------------------
यात माझे एक अ‍ॅडीशन- सर्वोत्तम कवितेचे ते फायनल टेक्स्ट प्रकाशित कराल ते १/२ जणानी रीव्यु करावे.
--------------------------------------------------------------------
जी चुक झाली आहे ती संबंधितानी मान्य केली आहे. या प्रक्रियेमधे त्रूटी आहेत त्या दुरुस्त केल्या की झाले.

धन्यवाद.

चूक झाली असेलही, पण इतक्या कविता वाचून त्यातल्या सर्वोत्कृष्ट निवडणे याला बराच वेळ लागतो. आणि हे काम करणारे आपला पदरचा वेळ खर्च करतात ह्याची जाणिव आपल्या सगळ्यांना असेलच.

अशा क्षुल्लक वादांतून चांगले लोक माबो सोडून जावेत हे बरोबर नाही.
शिवाय हा उपक्रम बंद पडल्यास ज्या कविता चांगल्या असूनही वाचायच्या राहायच्या, त्या पण वाचायला मिळणार नाहीत.

कवितांची संख्या हे विलंब लागण्याचे एक कारण आहे असे लक्षात आले. पण निवड समिती महिना संपेपर्यंत कविता वाचायची थांबते काय? आणि प्रत्येक कविता वारंवार का वाचली पाहिजे ते नाही कळले. ८-१० दिवसातून एकदा त्या महिन्यात त्या दिवसांत आलेल्या कविता वाचून प्रत्येक सदस्याने त्यातल्या २ शॉर्टलिस्ट कराव्यात. गुलमोहोरात प्रकाशनाच्या तारखेनुसार लिस्ट येते तेव्हा हे अवघड नाही. शेवटी फारतर २५ मधून निवड करावी लागेल. अर्थात ८-१० दिवसांतून वेळ काढावा लागेल पण सगळे काम शेवटी करुन लागणार्‍या वेळापेक्षा हा एकूण वेळ कमीच असेल.

हे सदस्यत्वाचा कालावधी वगैरे फार अवघड करुन ठेवायची गरज नाही. इच्छुकांची नावे मागवून त्यांचे ३-३ चे गट करुन एकेका गटाला कविता निवडू द्यायची. सगळ्यांचा नंबर लागला की पुन्हा पहिला गट. (असे अनेक असतील असं समजते. Happy ) इच्छुकांपैकी किती जण 'पात्र' आहेत याचा विचार सध्या नको करायला. काहीच न कळणारे आहेत असे समजू पण ज्यांना अजिबातच कळत नाही त्यांना तरी नेमके काय आणि का आवडते ते पहायला काय हरकत आहे? 'सर्वोत्तम' म्हणजे शेवटी निवड समितीच्या निर्णयानुसार हे सर्वांना माहीतच आहे. Happy सगळे निर्णयाशी सहमत असतीलच असे नाही.

जे वाटले ते सुचवले.
धन्यवाद.

सगळ्याच मुद्द्यांवर पुर्णपणे चर्चा झालेली आहे तेव्हा ते उगाळत बसण्यात काही अर्थ नाही.
मी फ़क्त अ‍ॅडमिनना एकच विनंती करु इच्छितो की कृपया हा उपक्रम थांबवू नका. मला वाटतं तो राबवण्यासाठी काही योग्य सुचनाही आलेल्या आहेत. त्या वापरुन पाहायला हरकत नाही.
शेवटी जयंतदा आणि गिरीशजी यांना एकच सांगणे या छोट्याशा गोष्टीवरुन तुम्ही लिहीणे (माबोवर) थांबवु नका. लहानांनी चुका करायच्या आणि मोठ्यांनी त्या सांभाळुन घ्यायच्या हेच आपले संस्कार आहेत. तेव्हा एवढे मागणे मनावर घ्याच...
तुमच्या पुढच्या कवितेची, गझलेची वाट पाहतो आहे.

बाकी महत्वाचं राहीलच...

सर्वांचंच (त्यात मीही आलोच Wink ) मन:पूर्वक अभिनंदन. Happy

>>>>>कि-या मन:पूर्वक रे!
Lol
एवढं नीट टायपूनसुद्धा 'पू' र्‍हस्व कसा काय राहीला बुवा!!! Proud

>>>नसेल तर शीकून घे बाबा,
श्यामले, शीकून की शिकून? Uhoh

Pages