चपला बाकड्याखाली सरकवून पुजेचे ताट तिने हातात घेतले आणि ती मुख्य दरवाज्याकडे वळली. गेटच्या दोन्ही खांबाना असलेले नळ चालूच होते. आत शिरणारे सगळेच त्याखाली आपले हात-पाय धुवून पुढे सरकत होते. तिनेही तेच केले. पुढे चार पायर्या उतरलं की स्टीलच्या पाईपांनी तयार केलेले 'भुलभुलैय्या' होतं. त्यात शिरायचं आणि शेवटच्या टोकाला दर्शन. ते बालसदरात दाखवतात ना... या उंदराला चीजच्या तुकड्यापर्यंत नेणारा सरळ रस्ता कुठला ? मग हाती एखादी पेन्सिल वा पेन घेऊन सुरुवात करायची. हेही तसचं. हल्ली सगळ्या देवळात असते. जिथे असा प्रकार चालू ते देवस्थान जास्त गजबजतं. त्या देवळाची टीआरपी जास्त.
आज दोन ऑक्टोबर. सुट्टीचा दिवस. म्हणायला नॅशनल हॉलिडे. पण गाड्या नेहमीसारख्याच खचाखच भरलेल्या. लोकांची कामाचं स्थळ गाठायची घाई नेहमीचीच. त्या गर्दीतून प्रवास करत दोघे टिटवाळ्याला पोहोचेपर्यंत बारा वाजत आलेले. त्याने रिक्षावाल्याला ' देवळात गर्दी आहे का?' अस विचारलं आणि रिक्षावाल्याने नकारार्थी मान डोलावली. रिक्षातून उतरल्या-उतरल्या समोर एक १३-१४ वर्षाचा मुलगा समोर उभा.
"दर्शनाला जायचय ? या.... इकडे या." त्या मुलाकडे दुर्लक्ष करत त्याने पाकीट काढलं.
"दुकानावरच द्या साहेब पैसे." इतकं म्हणून रिक्षावाल्याने रिक्षा वळवली देखील. त्यांच साटलोटं आहे हे त्यांना कळायला एक दोन मिनिटे गेली. मुलगा उभा होताच. 'या साहेब' म्हणत. त्याने तिच्याकडे पाहून स्मित केले, तिने पदर पुन्हा अंगभर आवरून घेतला आणि दोघे निमूट त्याच्या मागे निघाले. त्यांच नुकतच लग्न झालय हे सांगायला लग्नपत्रिकेची गरज नव्हती. तो जग जिंकल्याच्या आवेशात आणि ती सलज्ज, सुहास्य वदने सोबत. हातातल्या भरल्या चुड्याची किणकिण... सराव नसल्याने डोक्यावरून घसरणारा पदर..... चालताना कळत-नकळत होणारा हातांचा स्पर्श..... अंतर राखता-राखता निर्माण होणारी जवळीक.... हवीहवीशी वाटणारी.
"पेढे कोणते देऊ ? हे एकविस आहेत, पस्तिसला आणि हे अकरा आहेत, पन्नासला. हे ताट पंचवी़सचं आणि हे एकावन्न रुपये. " मुलाने माहीती पुरवली. त्याने तिच्याकडे पाहीलं. तिने पंचवीसचं ताट उचललं आणि त्याने पन्नासचे पेढे.
"बरे आहेत ना ? " त्याचा मुलाला हिशोबी प्रश्न.
"देवाच्या पायाला लावा आणि खाऊन बघा. नंतरच पैसे द्या साहेब." तो आत्मविश्वासाने बोलला. पर्फेक्ट मार्केटींग.... त्याच्या मनात आलेला विचार. हातातल्या एका पिवळ्या.. दुमडलेल्या कागदावर आकडे खरडून मुलाने तो तो कागद त्याच्या हातात दिला. न बघताच तो त्याने खिशात सरकवला.
दोघे 'भुलभुलैया'त शिरणार तोच त्याचा सेल वाजला आणि नंबर पहाताच तो तिच्याकडे वळला.
"तू हो पुढे. मी आलोच." ती क्षणभर थांबली आणि पुढे सरकली.
ती आता भुलभुलौयात होती. हातात पुजेचं ताट घेऊन. तिने मागे पाहीलं. चार-पाच जण तिच्या मागे रांगेत आले. तो नजरेच्या टप्प्यात नव्हता. तिने समोर नजर टाकली. सुट्टीच्या दिवशी इतकी गर्दी..... दोन तास तरी जातील सहज... कशाला इतकी माणसं इथे येतात ?... स्वतःच्या प्रश्नाचं तिलाच हसू आलं. ती कशाला आली होती ? तिने सभोवार नजर फिरवली. लगतच्या रांगेतल्या पंजाबीतल्या दोघी काकू तिच्याकडे निरखून पहात होत्या. ही स्त्रीसुलभ जिज्ञासा आहे ह्याची जाण असल्याने तिने दुसरीकडे नजर वळवली. लगतची रांग वळून आल्याने समोर बरेच चेहरे दिसत होते. बहुतेक जोडपीच.... काही लग्न झालेली..... मुलाबाळांचं लेंढार घेऊन आलेली... काही आज्या, काही सासवा...... काही तरूण मुलं... काही मुली..... काही प्रेमिक..... एखाद - दुसरं म्हातारं जोडपं..... काहीजणी तिच्यासारख्याच होत्या. नव्या नवर्या. नवर्याबरोबर कुजबुजत असलेल्या. गोतावळा सांभाळून. एका आजीबाईंनी डोळे मिटून जप सुरु केलेला. तिने नजर फिरवून समोरच्या विश्रामगृहाकडे पाहीलं. देवदर्शन आटपून काहीजण पोटपुजा करत होते तर काही चक्क वर्तमानपत्र पसरवून ब्रम्हानंदी टाळी लावून बसलेले. तिच्या चौफेर नजरेने देवळाचा कायापालट हेरला. लहानपणी आली होती तेव्हा नव्हतं हे सगळं. पहिल्यांदा बहुतेक आई आणि आजीबरोबर. तिला कळायला लागल्यापासून. कधी फक्त आईबरोबर. एकदा हौस म्हणून स्टेशनपासून टांग्याने. नंतर कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर. स्टेशनपासून थट्टा-मस्करी करत चालत येणं.. एकमेकाच्या फिरक्या घेणं... तेव्हा सगळं बदलत होतं हळू हळू. मग ती जेव्हा पहिल्यांदा अभिजीतबरोबर आली तेव्हा तर सगळं बदललच होतं. शहारली ती त्या जुन्या आठवणींनी. काल-परवाचीच गोष्ट वाटतेय ती.
"अभि.."
"बोल."
"आपण...."
"आपण काय ?" तो तिच्याकडे वळला. त्याच्या नजरेतला मिश्किलपणा तिला जाणवला. तिने त्याची नजर टाळली.
"आपण टिटवाळ्याला जाऊया या मंगळवारी ?"
"मंगळवारी ? " त्याने मंगळवारावर दिलेला तो स्ट्रेस तिला आठवला आणि ती हसली. स्वत:शीच. शेजारच्या पाईपाला चिटकून असलेली पंजाबी ड्रेसमधली मराठी बाई दचकली आणि तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली. पण ती मात्र भुतकाळात होती.
"नोप. मंगळवार नको. इतर कुठलाही वार चालेल. " त्याला चटकन अंगावर धावून येणारा गर्दीचा लोंढा दिसला.
" ठिकाय. गुरुवार ?" तिने लगोलग पर्याय दिला.
"एग्रीड. पण तू येताना टिपीकल डबे वगैरे आणणार नाहीस ना ? " त्याचा अनपेक्षित प्रश्न.
"म्हणजे ? पुर्वी कुणी आणायचं का ?" तिने थेट त्याच्या डोळ्यात पहात विचारलं.
"हुं...." त्याने ती संधी साधून चेहरा तिच्या चेहर्याजवळ आणला. "होती एक ...."
"अस्सं. मग आता काय पळून गेली ती ?" तिच्या नाकाचा शेंडा किंचित लाल झाला.
"नाही. लग्न करून गेली. कधी कधी येते घरी. रक्षाबंधनला. बहिण माझी." त्याच्या स्वरात एक थट्टेची लकेर होती.
"अभ्या...." ती लटकेच रागावली आणि तो तिच्या त्या अदावर पुन्हा नव्याने फिदा झाला.
"ताई.... ताई........... पुढे सरका." मागून तिला आवाज आला आणि भानावर येत ती पुढे सरकली. आवाज देणार्याला मागे वळून पाहण्यात तिला काहीच स्वारस्य नव्हतं. 'ताई' म्हणत घाई करणारे तिला काही नवीन नव्हते. पण तिचं लक्ष मात्र गेलं पुढे उभ्या असलेल्या एका माणसाच्या खांद्यावरून तिला न्याहाळणार्या दोन हसर्या घार्या डोळ्यांकडे. तिने त्या छोट्या बाहुलीला हसून दाखवलं. तिच्या त्या भाषेला बाहुलीनेही त्याच भाषेत उत्तर दिलं. ती पुन्हा हसली. आता मात्र स्वत:शीच. हास्य.... इतकी सुरेख भाषा....माणसाला माणसाशी प्रेमाच्या बंधनात बांधणारी.... कुणालाही कळणारी.... काना, मात्रा, वेलांट्या, मुळाक्षरे, व्याकरण कसलही बंधन नसलेली भाषा....नेमक्या याच भाषेचा विसर का पडावा सगळ्यांना ? ही भाषा आपल्यालाही कळली...... अभिच्या प्रेमात पडल्यावर....... अभि..... आणि ते मंतरलेले दिवस...
रांगेत अभि तिच्यामागेच होता. "नुपूर " तो तिच्या कानात कुजबुजला. तिच्या गालाला त्याचे उष्ण श्वास जाणवले. एक पुसटता स्पर्श....पुढे सरता सरता ती थबकली. त्याच्या इतक्या जवळ येण्याने मोहरली ती. त्याच अवस्थेत पुन्हा पुन्हा त्याच्या तोंडून स्वतःच नाव ऐकावसं वाटलं तिला. मग हातातलं ताट सावरून तिने हळूच मागे पाहीलं. तिच्या गालावरील लज्जेची गडद लाली तिच्या नजरेत उतरली होती.
"काय ?" तिने हलकेच त्याला विचारलं. पुजेच्या ताटाच्या परिघाएवढं अंतर दरम्यान राखून. त्याने एका दिशेला खुण केली. पलिकडच्या रांगेत एक जोडपे होते. नुकतच लग्न झालं असावं. हातावरील मेंदीची नक्षी अजूनही स्पष्ट होती. जवळ्च्याच गावातील असावे कदाचित..... तो तिच्या कानाशी पुन्हा पुन्हा काहीतरी कुजबुजत होता आणि ती पुन्हा पुन्हा लाजत होती. तिच्या त्या लाजणार्या देहाची थरथर तिला जाणवली. तिचं ते गालातल्या गालात हसणं, त्याच्या शब्दांचा नेमकेपणा त्याच्या डोळ्यात हेरून काळजापर्यंत झुलवणं.... तिला ते जाणवत होतं. काय कुजबुजला असेल तो ? हे मनात आलं आणि गालावरची लाली आणखी गडद झाल्याचे जाणवले तिला. तिने मान वळवली. आत उरात कुठेतरी काहीतरी उचंबळून आलेलं. थोपवायची इच्छा नसली तरी तिने ते थोपवलं. स्वतःला संयत करून ती अंगठ्याने उगाचच फरशी खरवडू लागली. अभि आपल्या मागे आहे आणि आता आपल्यात जास्त अंतरही नाही.... कधीही ... कोणत्याही क्षणी तो स्पर्श करेल..... मग काय करावं ?.... झिडकारावं..... छे..छे... कशाला .... तो परका आहे का ? नाही... मग.... अनुभवावं.. त्या स्पर्शाला.... त्याच्या अलवारपणाला..... त्या स्पर्शातून उमलणार्या तरंगाना..... शरीरभर पसरत जाणार्या... हव्या-हव्याश्या वाटणार्या त्या अनुभुतीला..... किती क्षण त्यात गेलेल ते तिलाही कळले नाही.
"नुपूर" पुन्हा तीच कुजबूज आणि स्पर्शून गेलेले उष्ण श्वास. पण आता मात्र ती झपकन वळली त्याच्याकडे. त्याने पुन्हा दुसर्या दिशेला खूण केली. तिने चटकन त्या दिशेला पाहीलं. पुन्हा एक जोडपं. त्यांच्या हातात एक बाळ.... इवलसं.... टोपरं घातलेलं. तिने त्याच्याकडे पाहीलं. त्याचे डोळे मिश्किल हसले आणि गालावरच्या लालीला जागा पुरेनाशी झाली. त्याचक्षणी त्याच्या मिठीत शिरून आपला गोरामोरा चेहरा लपवावा असं झालं तिला. त्याच्या नजरेला नजर द्यायचा धीर झालाच नाही. तो फुलला मोहर घेऊन मनावर, देहावर मिरवत ती त्याच्यासोबत बागडली. तो दिवस फार काही देऊन गेला तिला.
... तिचा पदर खेचला गेला. तशी ती दचकली व पदर धरला. दुसरं टोकं एका पाच-सहा वर्षाच्या मुलाच्या हाती होतं. तो गोड हसला. गालावरच्या खळ्यांसह. तीही हसली. त्याच्या हातातला पदर काढून घेऊन तिने तो पुन्हा अंगभर गुंडाळून घेतला. तो अजून आला नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मागे पाहीलं. रांग बरीच वाढली होती. तो तिथेच गेटच्या जवळ होता. त्याने तेथूनच तिला हात दाखवला. नकळत तिनेही हात वर करून त्याला प्रतिसाद दिला. अनेक माना आणि नजरा त्या दिशेला वळल्या. हे तिच्याही लक्षात आले. तिने नजर आतल्या रांगावर फिरवली. किती माणसं..... काय मागायला आली असतील.... काहींच्या नव्या मागण्या.... काहींच्या जुन्या पुर्ण झालेल्या.... काही सहजच.... वेळ जावा म्हणून.... किती आतूर असतील त्या गौरीनंदनाला पहायला ?..... किती आता या क्षणीही वेगळ्या विश्वात असतील ?..... काय हवं असेल इथे प्रत्येकाला ?...... काय ..... काय..................
"काय हव असतं तुला नेहमी त्याच्याकडून ?" त्याच्या स्वरात एक कोरडेपणा जाणवला तिला.
"काही नाही. एक समाधान लाभतं." तिच्या डोळ्यासमोर मुर्ती उभी राहीली.
"नुपूर, कुठेतरी दुसरीकडे जाऊ. नेहमी काय ग तिथेच जायचं ?"
"नेहमी....? सहा महिने झाले अभी आपण गेलो होतो त्याला. पुर्वी मी दोन महिन्यातून एकदा तरी जायचे. आता वेळ नसतो तेवढा आणि जायचं म्हटलं, तर तुझ्याशिवाय आणि आहे कोण मला नेणारं ?" स्वर वाढला तिचा नकळत. तिलाही जाणवलं ते.
"ओ.के. रिलॅक्स. जाऊ आपण." त्याने शरणागती पत्करली. तिला मात्र स्थिरस्थावर होण्यास बराच वेळ लागला. ठरल्याप्रमाणे दोघे पोहोचले टिटवाळ्याला. सगळं काही तसचं होतं, पण पहिल्यासारखी मजा आली नव्हती त्यात. पहिलेपणाची मजाच और...
"गणपती बाप्पा मोरया...." गाभार्याच्या जवळ पोहोचलेल्या एका ग्रुपने जयजयकार सुरु केला आणि ती आठवांच्या गावातून पुन्हा देवळात परतली. त्यानंतर बराच वेळ घोष चालत होते. वडिलांच्या खांद्यावरची ती घार्या डोळ्यांची बाहुली गाढ झोपली होती आता. रांग बर्यापैकी पुढे सरकली होती. तिने मागे वळून पाहीलं. तो सेल खिशात टाकून आत शिरला होता. तिच्याकडे बोट दाखवून तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. काही समजूतदारपणा दाखवत होते तर काही निष्कारण वाद घालत होते. तिने तिथून त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला. 'तो मध्ये घुसलाय' असल्या छापाचे अनेक दृष्टीक्षेप फिरले तिच्याकडे. त्यातल्या त्यात काहींनी त्यांची बाजू मांडली. सरतेशेवटी तो तिच्या शेजारी पोहोचला. चेहर्यावर जिंकल्याचे हास्य. ती काहीच बोलली नाही. फक्त त्या हास्याला तिने हसून प्रत्यत्तर दिले. तो जवळ आल्याने जरा धीर आला तिला. एक सुरक्षिततेची भावना. तिथे ती असुरक्षित नसतानाही. रांग पुढे सरकू लागली. तिने सभोवार पुन्हा नजर फिरवायला सुरुवात केली. रांगेतला वेळ सत्कारणी लावण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न चालूच होता. गप्पा उफाळल्या होत्या. कुठे नजरेचे खेळ रंगले होते. कुठे नव्या मंगळसुत्राच्या डिझाइनची चर्चा होती तर कुणी देशाची चिंता करत होता. तिने त्याच्याकडे पाहीलं. त्याचं पुन्हा तेच ठेवणीतलं स्मितहास्य. ती हसली. तिला खुललेली पाहून त्याचे स्मित रुंदावले. तिने सहज चाळा म्हणून ताटातल्या वस्तू पुन्हा नीटनेटक्या लावल्या. जास्वंदाच्या फुलांचा हार... प्रत्येक वेळीस तिची पसंती जास्वंदालाच असायची. म्हणतात, गजाननाला तेच फुल सगळ्यात जास्त पसंत आहे. देवाला पसंत आहे म्हणून की माणसाला ? तिला नव्हतं ठावूक. पण माणूस आपली पसंत देवावर लादतो मग माणसांची काय कथा ?
"नाही. तिला पसंत नाही." त्याने रागाने एक ठोसा भिंतीवर मारला. झणझणला हात त्याचा. पण त्यावेळेस आलेला राग जास्त त्रास देत होता.
"काहीतरी कारण दिलं असेल ना अभी ? " तिने ह़ळूच विचारलं.
"दिलय..... तू आमच्या जातीची नाहीस." तो तिच्याकडे वळला.
"मग आता ? " या कारणाला बदलता येणार नाही याची खात्री होती तिला. आता सगळी मदार त्याच्या निर्णयावरच होती.
"मला काहीच कळेनासं झालय नुपूर. मी तिला समजवण्याचा पुर्ण प्रयत्न केला. पण ती आपला हेका सोडत नाही. बाबांनी तर केव्हाच हात टेकलेत." नैराश्य जितकं त्याच्या चेहर्यावर होतं त्यापेक्षा जास्त त्याच्या शब्दात होतं.
"मग ?" तिला काय बोलावं.. विचारावं तेच सुचेना.
"पुन्हा प्रयत्न करतो. काहीही करून तिचं मन वळवायलाच हवं. तिच्या मनाविरुद्ध झालेलं तुला आवडेल ? " त्याच्या या प्रश्नाला नकळत नकारार्थी मान हलली तिची. "मलाही नाही आवडणार. पण मी तिचं मन वळवणारचं. तू काळजी नको करूस."
"ठिक आहे. पण पंधरा दिवसात. कारण माझ्या घरीही माझ्या लग्नाची तयारी सुरु झालीय. तुला लवकरात लवकर घरी यावं लागेल. नाहीतर....." एवढा वेळ थोपवून धरलेली बातमी अखेर तिने उघड केली.
"नुपूर....?" शब्द ओठांवरच थबकले त्याच्या. एक भयाण शांतता त्या दोघांच्या मधून उसासे टाकत गेली. तो गेला आणि ती मात्र किती वेळ तिथेच बसून होती. ती रात्र छताच्या पंख्याप्रमाणे तिच्याभोवती भविष्याच्या अनोळखी चक्रासारखी गरागरा फिरत राहीली.
"चल पुढे.." तो तिच्या कानाजवळ कुजबुजला. त्याचा उष्ण श्वास तिला स्पर्शून गेला. त्याचा हात तिच्या खांद्यावर आला. सहजच. तो तिला जवळजवळ बिलगलाच होता. एक लहर गेली नखशिखांत त्या स्पर्शाने. हवासा वाटणारा स्पर्श.... पण आपण रांगेत आहोत.... चार माणसांत.... ती चटकन पुढे सरली आणि वळली. नजरेनेच त्याला होकार देऊन पुन्हा पुढे सरकली. डाव्या हातात ताट घेऊन तिने उजव्या हाताने पाईपचा आधार घेतला. तशीच ती पुढे सरकत गेली. थांबली. पाईपावर असलेल्या तिच्या हाताला मागून सरकत पुढे आलेल्या त्याच्या हाताचा स्पर्श झाला. हळूच तो हात तिच्या हाताशी सलगी करत वर आला. तिने चटकन कोणी पहातयं का ते पाहीलं.... पलिकडची एक परकरातील पोर तिला पाहून हसली आणि ती लाजली. हलकेच हात काढून घेतला. त्याचा हात तिथेच होता. तिने त्याच्या हाताच्या पुढे आपला हात ठेवला. खिडकीतल्या कवडशांनी तिच्या गोर्या हातावर चार दिवसापुर्वी रेखलेली मेंदी आता जास्त उठावदार दिसू लागली. तिने बोटातील अंगठी पाईपावर वाजवली आणि निमंत्रण मिळाल्यागत त्याच्या हाताने पुन्हा तिच्या हाताशी सलगी केली. हातावर हात ठेवून दोघे पुढे सरू लागले. गाभारा आता जास्त दूर नव्हता. तिची नजर समोरच्या खांबावर गेली. खांब आता वेगवेगळ्या नावांनी पुर्ण भरून गेला होता. पण तिने त्यावेळेस लिहीलेली नावे मात्र अजूनही तिथेच होती. ठळकपणे.
"हे काय करतेस ?"
"आठवण म्हणून लिहितेय."
"उद्या रंग मारला त्या खांबावर, मग कसली आठवण ?"
"रंगाच्या एका फटकार्याने आठवणी मिटतात का रे ?"
"नाही. पण जे टिकणार नाही ते लिहिण्यात काय अर्थ ?"
"टिकत तर काहीच नाही या जगात. म्हणून कोणी क्षण जगणं सोडत नाही ना ?"
"हरलो. " त्याने हात जोडले आणि शेजारची बाई तोंडाला पदर लावून हसली.
"गणपती बाप्पा मोरया" गाभार्याजवळील एक भक्त ओरडला आणि तिने खांबावरची नजर काढून घेतली. मागे वळून पाहीलं. तो तिच्या मागेच होता. तिने पुन्हा खांबाकडे पाहीलं. एकमेकात गुंफलेली ती दोन नावे. दुसर्याच क्षणी नावे धुसर होऊ लागली. तिला दिसेचना. तिने चटदिशी हातातला रुमाल डोळ्यांना लावला. आता नावं पुन्हा दिसायला लागली. ती त्याच्याकडे वळली. त्याने नजरेनेच 'काय' विचारलं. तिने नकारार्थी मान हलवली व ती पुढे सरली. पुजेचे ताट डाव्या हातात घेऊन तिने उजवा हात हळुवारपणे त्या खरडलेल्या नावावर ठेवला. रांग पुढे सरकेपर्यंत. गाभारा जवळ आलेला. जयजयकार सुरु झाला. ती जयजयकारातच गाभार्यात पोहोचली. भटजींना ताट देऊन तिने हात जोदून महागणपतीचे दर्शन घेतले. त्याच्या त्या पसलेल्या कानांनी तिच्या अनेक विनवण्या वा मागण्या आधीही ऐकल्या होत्या. तिने एक नजर त्याच्याकडे टाकली. तो डोळे मिटून, हात जोडून उभा होता. तिने हळूच पाहीलं ते. ताट घेऊन ती मागच्या मोकळ्या जागेत जाऊन उभी राहीली आणि तिने गजाननाकडे पाहीलं.
"गजानना, यापुर्वी माझं प्रेम विजयी होऊ दे म्हणून कित्येकदा तुझ्या दारी आले होते. पण ज्या प्रेमावर विश्वास होता तेच भ्याड निघालं. आता जे दान तू पदरात घातलयसं, तेच योग्य... या विश्वासावर मी पुढची वाटचाल करणार आहे. ह्यांच्याबरोबर माझा संसार सुखाचा होऊ दे. एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना." तिने डोळे मिटले. तो तिच्या बाजुस येऊन उभा राहीला. त्याने पुन्हा हात जोडले.
त्या खांबावरील ती नावं आता वाचता येणार नाही इतपत खरवडली गेली होती.
समाप्त.
अबे काय लिहीलय पोट्टेओ तुमि
अबे काय लिहीलय पोट्टेओ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमि तर एकदम विशाल पोट्ट्या सारखे लिहाय लागलाय बे.
ते विशाल पोट्ट्या तर आमची पुरी टरकवुन टाकले (भुतें मागे लावून)
आणि तु तर आमच्यावर सर्वात लास्टच्याला बॉम्ब टाकला की रे........
पु. ले. शु.
आमी वा.चे.शु
अबे काय लिहीलय पोट्टेओ तुमि
अबे काय लिहीलय पोट्टेओ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमि तर एकदम विशाल पोट्ट्या सारखे लिहाय लागलाय बे.
ते विशाल पोट्ट्या तर आमची पुरी टरकवुन टाकले (भुतें मागे लावून)
आणि तु तर आमच्यावर सर्वात लास्टच्याला बॉम्ब टाकला की रे........
पु. ले. शु.
आमी वा.चे.शु
अप्रतिम..... खुप च
अप्रतिम..... खुप च सुन्दर..........
आवडली कथा मित्रा.
आवडली कथा मित्रा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! मांडणी आवडली.
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मांडणी आवडली.
मस्त आहे कथा! आवडली.
मस्त आहे कथा! आवडली.
अहाहा... मस्त कथा! मांडणी
अहाहा... मस्त कथा! मांडणी विशेष आवडली.
चेतनाला मोदक... तिच्या हळूवार भावना खूप छान टिपल्यात!
काय मस्त आहे. खुपच छान आहे.
काय मस्त आहे. खुपच छान आहे.
एकदम मस्त! लै भारी! एक
एकदम मस्त! लै भारी! एक नंबर!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर अप्रतिम.... शेवटाचा
सुंदर अप्रतिम.... शेवटाचा अंदाज आधीच आलेला तरी...
ज्या प्रेमावर विश्वास होता तेच भ्याड निघालं. आता जे दान तू पदरात घातलयसं, तेच योग्य... या विश्वासावर मी पुढची वाटचाल करणार आहे. ह्यांच्याबरोबर माझा संसार सुखाचा होऊ दे. एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना." >>> वाक्य वाचलं आणि प्रतिक्रिया द्यायचा मोह आवरलाच नाही...
सर्व मायबोलीकरांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिमच रे ! खुपच आवडली !
अप्रतिमच रे ! खुपच आवडली !
कौतुक, तुझं कौतुक करावं तेवढं
कौतुक,
तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खूप हळुवार आणि सुरेख कथा :).
आणखी येऊ देत.
आणि वैभव, त्या विशाल पोट्ट्याचं नाव काढु नकोस. "गैरफायदा" क्रमशः ठेवुन कुठे गायब झालाय कुणास ठाऊक?
काय डिटेलिंग आहे कथेत एकेक
काय डिटेलिंग आहे कथेत एकेक भावनांचे. मस्त लिहिलेय.
खुप छान!
खुप छान!
छान कथा. आवडली.
छान कथा. आवडली.
व्वाह !
व्वाह !
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिमच....
अप्रतिमच....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त... आवडली
मस्त... आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर्याच दिवसांनी मायबोलीवर
बर्याच दिवसांनी मायबोलीवर यायला मिळालं आज ... आणि दिवाळीची ही खास मेजवानी मिळाली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप आवडली गोष्ट.
छान आहे गोष्ट... कौतुक, तुला
छान आहे गोष्ट... कौतुक, तुला वेगवेगळ्या कथा हाताळायला उत्तम जमते त्याबद्दल अभिनंदन!!
आज 3rd times वाचली. खरच खुप
आज 3rd times वाचली. खरच खुप छान आहे.
एकदम सुरेख फुलवली आहे कथा!
एकदम सुरेख फुलवली आहे कथा! आवडली!!
भाग्यश्री
छान आहे कथा... आवडली.
छान आहे कथा... आवडली.
केवळ अप्रतिम. पुन्हा पुन्हा
केवळ अप्रतिम. पुन्हा पुन्हा वाचुनहि त्यातला ताजेपणा कायम आहे. वातावरणनिर्मीती, कथेचा ओघ, आणि वारिक सारिक तपशील सर्वच खुप सुन्दर चितारले आहे.
आवडली. कथाही, आणि तिची
आवडली.
कथाही, आणि तिची मांडणीही!
खूप आवडली.
खूप आवडली.
धन्यवाद आणि दिवाळीच्या
धन्यवाद आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
खूप छान
खूप छान लिहिलंयत....................
खूप आवडलं.......................
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages