या वर्षीच्या २६ जानेवारीला मनाशी पक्क ठरवलं की काही करुन वजन कमी करायचं. तसं लग्न होईपर्यंत माझं वजन अगदी आदर्श म्हणावं असंच होतं. फार कमी नाही आणि फार जास्त नाही. पण गेल्या पाच वर्षांत ते दर वर्षी चार-पाच किलो असं ठरवून घेतल्यासारखं वाढतच गेलं. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांत माझं ३० पौंड वजन वाढलं होतं ( साधारण १४ किलो ) त्यानंतर त्यातले २१ पौंड कमीही झालं होतं पण बाळंतपण करुन आई भारतात परत गेल्यावर बाहेरच्या खाण्यावरचं नियंत्रण सुटलं आणि वजन वाढतच राहिलं. इंटरनेटवर खूप दिवस वाचत होते आहार आणि व्यायाम या विषयी. आमच्या जवळच्या नात्यात ओबेसिटी आणि वेट लॉस कन्सलटंट तज्ञ डॊक्टर असल्याने त्यांच्या बोलण्यातूनही काही गोष्टी कळल्या होत्या. त्यावर शांत बसून विचार करुन माझ्यासाठी आहाराची एक दिशा ठरवून घेतली आणि वजन कमी करायच्या दॄष्टीने पावलं उचलली. सुरुवात केल्यापासून पहिल्या पाच महिन्यांत जवळजवळ पंधरा किलो वजन कमी झालं. त्यानंतरच्या तीन महिन्यांत तो वेग थोडा मंदावला पण तरीही वजन कमी होतंच राहिलं. या २६ सप्टेंबरपर्यंत अजून तीन किलो उतरुन एकूण अठरा किलो वजन कमी झालं. लग्नाच्या आधी जे वजन होतं त्याहीपेक्षा एक किलो कमीच झालं आणि अजूनही थोडं कमी करायचा माझा प्रयत्न असेल. मायबोलीवर एक-दोन जणींनी ह्या प्रवासाबद्दल लिही असं सुचवलं आणि खरंच वाटलं की हा अनुभव लिहावा. ह्यातून अजून काही जणांना वजन उतरवायला मदत झाली तर खूप बरं वाटेल.
वजन कमी करताना कळीच्या गोष्टी म्हणजे आहार आणि व्यायाम. या पैकी लहानपणापासून व्यायामाची शरीराला फारशी सवय नाही. त्यामुळे सुरुवातीलाच ठरवलं होतं की व्यायाम अशा प्रकारचा निवडायचा जो आपल्याला व्यवस्थित झेपेल आणि वजन कमी केल्यानंतरही त्यात सातत्य राखता येईल. दिवसातला साधारण पाऊण ते एक तास व्यायामासाठी काढायचा असं ठरवलं. त्यात सकाळी दहा ते पंधरा मिनिटं थोडं स्ट्रेचिंग आणि हळूहळू वाढवत नेलेले सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार घालताना त्यातलं प्रत्येक आसन सावकाश, योग्य रीतीने होतंय ना याकडे मुद्दाम लक्ष दिलं. आणि सूर्यनमस्कारासारखा सर्वांगसुंदर व्यायाम नाही असं का म्हणतात ते अगदी पुरेपूर कळलं. माझा मुलगा लहान असल्याने संध्याकाळी नवरा घरी आल्यावर सातला जिमला जायचं असं ठरवलं. सुरुवातीला एलिप्टिकल करायचा प्रयत्न केला पण ते फार जड जातंय असं वाटलं. मग ट्रेडमिलवर पन्नास मिनिटं चालायचं ( साधारण साडे-तीन मैल प्रती तास या वेगाने ) असं ठरवलं. साधारण तीन मैल ( ४.८ किमी ) होतील इतका वेळ चालता आलं तर उत्तम.( बरेचदा घरी परतायची घाई असायची ) पण ते नाही जमलं तरी रोज एकाच वेळी जिमला जाणं आणि किमान अर्धा तास तरी चालणं हे झालंच पाहिजे अशी खूणगाठ बांधून घेतली.
व्यायाम कुठल्या प्रकारचा आणि किती वेळ करावा ह्या बद्दल नेटवर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती होती की गोंधळून गेल्यासारखं होत होतं. साधं ट्रेडमिलवर चालायचं तरी वेट-लॊस झोन मध्ये ( कमी वेगाने ) चालायचं की कार्डीयो झोन मध्ये ( जास्त वेगाने ), किती वेळ, चढ ठेवून की नुसतंच असे अनेक प्रश्न. वजन उचलायच्या प्रकाराबाबतही तेच. किती किलो वजन उचलावे. किती वेळा उचलावे ह्या बद्दल संभ्रम ! पण जसजसं व्यायाम करायला लागले तशा काही गोष्टी लक्षात यायला लागल्या.
१. व्यायामाचा मूळ उद्देश हा चरबी ( fat ) कमी करण्याचा आहे स्नायूंची झीज करणे नव्हे. शरीराची पुरेशी तयारी नसताना जोरजोरात धावल्याने मसल मास बर्न होते चरबी जिथल्या तिथे राहते.
२. स्नायूंवर भार न पडता चरबी जाळण्याच्या योग्य मार्गावर व्यायाम आहे हे कसे ओळखावे ? माझ्यापुरता मी निकष लावला की जिममधून घरी आल्यावर जर गळून गेल्यासारखे वाटत असेल तर मसल मास बर्न होत असल्याची शक्यता जास्त. व्यायाम केल्यावर ताजेतवाने, हलके वाटले पाहिजे.
३. चालताना हलका श्वास वाढेल पण खूप धाप लागणार नाही अशा वेगाने चालायचे ( माझ्यासाठी हा वेग साधारण साडेतीन मैल प्रति तास ) चालताना दोन्ही हातही शरीराला समांतर ठेऊन हवेत पुढे मागे स्विंग केले तर जास्त चांगला व्यायाम होतो. ( क्रॊस कंट्री स्किईंग मध्ये दोन्ही पोल्स हाताने जसे पुढे मागे ढकलतात तशी पोझिशन )
४. नियमित व्यायामाने तीव्रता वाढवता येते. सुरुवातीला मला एलिप्टिकल करणे जमायचे नाही. पण चालण्याचा व्यायाम करायला लागल्यावर काही दिवसांतच एलिप्टिकल जमायला लागले. नंतर ते अर्धा ते पाऊण तास करणेही जमायला लागले. ( जमायला लागणे म्हणजे व्यायामानंतर दमल्यासारखे न वाटणे ) चालण्याचा वेगही हळूहळू वाढतो.
५.व्यायामात सातत्य राखले तरी आठवड्याचे सलग सातही दिवस व्यायाम करायची गरज नाही. उलट एक दिवस सुट्टी घेतल्याने स्नायूंना आवश्यक विश्रांतीच मिळते. त्यामुळे आठवड्यातून कमीतकमी चार दिवस आणि जास्तीतजास्त सहा दिवस जिम.
६. वेट्स उचलताना कमी वजन सावकाश लयीत जास्त वेळा उचलले तर चरबी जाळून मसल मास वाढवायला जास्त उपयोग होतो. ( उदा, पाच पाऊंड वजन प्रत्येक हातात प्रत्येकी बारा वेळा उचलायचे, थोडं थांबून ( ३० से. ते एक मिनीट ) सोळा वेळा उचलायचे, परत थोडं थांबून वीस वेळा उचलायचं ) सरावाने नंतर वजन उचलायची क्षमता वाढवता येते. स्ट्रेंग्थ ट्रेंनिंगची जी लेग प्रेस वगैरेसारखी मशिन्स येतात त्यावरही हाच नियम लागू.
७.शरीरातले फॆट कमी होऊन मसल मास जसे वाढत जाईल तशी कॆलरीज जाळायची शरीराची क्षमता वाढते. चयापचय ( metabolism ) सुधारतो. त्यामुळे वजन वाढण्याची एक टेंडन्सी झालेली असते त्यातही बदल होतो.
व्यायामातली ही पथ्ये मला खूप फायद्याची ठरली. व्यायामाइतकंच किंबहुना जास्तच महत्व मला आहार ठरवून घेण्याचं होतं. मी डाएट सुरु करायच्या सुमारास माझ्या नवऱ्याचं कॊलेस्टेरॊल थोडसं वाढलेलं टेस्टमध्ये आलं होतं. त्यामुळे आहार ठरवताना तो कॊलेस्टेरॊल कमी करायलाही मदत करेल असा ठरवून घेतला. आहार आखताना खालील गोष्टी विचारात घेतल्या :
१. माझे वय, उंची वजन यानुसार जर मला दिवसाला दोन हजार कॆलरीज लागत असतील असे धरले ( हे चार्ट्स इंटरनेट वर अगदी सहज उपलब्ध असतात ... how many calories do i need ? असा गुगल सर्च करुनही मिळतील. ). त्यापैकी निदान पाचशे कॆलरीज तरी कमी घ्यायच्या असे ठरवले.
२. दिवसातून चार-ते पाच वेळा थोडे-थोडे खाणे. मी दुपारी झोपत असल्याने दिवसातून चार वेळा खायचे असे ठरवून घेतले. दुपारी न झोपणाऱ्यांना साडे-तीन च्या सुमारास एक छोटे स्नॆक खायला हरकत नाही.
३. तळ्कट, तुपकट, चीज वगैरे घातलेले हेवी खाणे शक्यतोवर टाळायचंच. पण बरेचदा आपण घरीही हाय कॆलरी पदार्थ करतो जसे आलू पराठे, बिर्याणी,श्रीखंड, ग्रेव्ही / तेल थोडे जास्त असलेल्या भाज्या. त्यावर मला डॊ.बंगंच्या पुस्तकात वाचलेली ओर्निश मेथड अतिशय आवडली. एखाद्या पदार्थाचा मोह टाळता येणे शक्य नसेल तर मी त्याचे मोजून दोन-तीन घास बाजूला काढून घ्यायचे आणि माझ्या डाएटवाल्या जेवणात ते सुरुवातीला एक, मध्ये एक आणि शेवटी एक असे खायचे. ते खाताना अगदी सावकाश तोंडात घोळवत आस्वाद घेत खायचे. खरोखरच तो पदार्थ पोटभर खाल्ल्याचे समाधान मिळते. त्यामुळे नवऱ्याला काही चांगलेचुंगले करुन घातले तरी माझे डाएट कधी मोडले गेले नाही.
४. जे व्यायामाच्या बाबतीत तेच आहाराच्या बाबतीत ! सलग सात दिवस डाएटवाले फूड खायचे नाही. कमी कॆलरी घेऊन घेऊन शरीराला तेवढ्याच कॆलरीत भागवायची सवय होते आणि चयापचय मंदावतो. परिणामी वेट लॊसही ! म्हणून आठवड्यातून एकदा एक पोर्शन जे मनाला येईल ते खायचे असे ठरवले.
५. सगळ्यात महत्वाचे जे डाएट करतानाही आणि आत्ताही माझ्या उपयोगाला येते ते म्हणजे ’पोर्शन कंट्रोल’ ... प्रमाणात खाणे ! खाताना नंतर पाणी प्यायचे आहे या हिशेबाने खावे. म्हणजे भूक भागल्यासारखी वाटतेय पण पोट हलकेच आहे अशा स्टेजलाच थांबावे. पाणी प्यायल्यावर तड लागेल इतक्या प्रमाणात जेवण घेऊ नये. आपल्या हातून ओव्हर इटिंग इतकं सहज होते की त्यातही आपण जास्त कॆलरीज पोटात ढकलत असतो ह्याचा आपल्याला पत्ताही नसतो.
ह्या गोष्टी पाळून माझा आहार साधारण असा होता :
उठल्या उठल्या दोन-तीन ग्लास कोमट पाणी पिणे. चहा-कॊफी नाही. ( पाण्यात लिंबू पिळून घेतले तर जास्त फायदा होतो असे वाचले आहे पण मी नुसतेच पाणी पित होते ) वेट लॊस पूर्ण झाल्यावरही आता इतकी सवय झाली आहे की अजूनही मी चहा-कॊफी घेत नाही.
साधारण साडे-आठ नऊ च्या सुमाराला ब्रेकफास्ट. अर्धा कप क्विक कुकिंग ओटस आणि दोन चमचे ओट ब्रान एकत्र करुन ते व्यवस्थित बुडेपर्यंत 1% दूध, चिमूटभर मीठ ( याशिवाय ओटमीलला चवच येत नाही ), थोडेसे अगोडच राहील इतपत साखर ( पाऊण ते एक चमचा )घालून मायक्रोवेव्ह मध्ये शिजवणे. बाहेर काढल्यावर त्यात दोन अक्रोड चुरुन आणि एक ओंजळ ब्लू-बेरीज घालून खाणे. ब्लू-बेरीज नाही मिळाल्या तर स्ट्रॊबेरीज, सफरचंद किंवा दोन चमचे बेदाणे घालून ! केळं मात्र नाही.
बारा-साडेबाराला जेवण. जेवणाची सुरुवात एखादं फळ खाऊन मुखत्वे सफरचंद किंवा पेअर ! काकडी, गाजर, टोमॆटॊ यापैकी काहीतरी. हे रोजचे कॊमन फॆक्टर्स !
उरलेल्या जेवणात आलटून पालटून खालीलप्रमाणे :
दोन फुलके, अगदी कमी तेलावर केलेली दाल / उसळ, कमी तेलावर केलेली भाजी / पालेभाजी इत्यादी. ( बटाटा, सुरण, छोले सोडून )
ब्राऊन राईसची जिरं,मिरं घालून केलेली खिचडी ( त्या दिवशी पोळ्या नाहीत )
उकडलेली अंडी दोन-तीन पण फक्त पांढरं. ( बलक मला खूप आवडतो खरं तर पण मन घट्ट करुन फेकून द्यायचे. कारण मुलाला आवडत नाही आणि नवऱ्याच्या तब्बेतीसाठीही चांगला नाही. ) १०० % होल व्हीट / मल्टीग्रेन ब्रेडचे दोन स्लाईस मध्ये अंडी घालून
अंड्याच्या पांढऱ्यात भाज्या आणि थोडसं लो फॆट चीझ घालून बेक केलेलं कीश
सॆलड बोल बनवून. त्यात लेट्यूस सारखं सॆलड, लो फॆट ड्रेसिंग, क्रुटॊन्स, थोडं चीज आणि इथे मिळणाऱ्या सोय पॆटी ( ५/६ ग्रॆम फॆट असणाऱ्याच ) कुसकरुन. खूप पोटभरीचा होतो हा बोल त्यातल्या पॆटीमुळे.
आठवड्यातून एकदा फिश ( तळलेलं नव्हे ) / व्हाईट मीट चिकन.
मल्टीग्रेन पास्ता ( मैद्याचा नाही ) भाज्या, दोन चमचे ऒलिव्ह ऒईल घालून.
एकंदरीत तेल, तूप कमी ( दिवसाला एक-दीड टेबलस्पून प्रत्येकी या हिशोबाने भाजी/ आमटीला घालणे ) , पण लसूण, आलं , इतर मसाले ह्याचा चव आणायला सढळ वापर. ग्रेव्ही वाली भाजी केली तर कांदा-टोमॆटोचीच ग्रेव्ही. नारळ-काजू वर्ज्य !
भाज्या, चिकन, मुगाचं पीठ, तांदूळ-उडदडाळीचे २/१ प्रमाण असलेली इडली. काहीही चालेल. फक्त कॆलरीजचा विचार करुनच. भात मी पूर्वीही फारसा खायचे नाही. या सहा महिन्यांत तर पांढरा तांदूळ जवळजवळ वर्ज्यच केला. आताही ब्राऊन राईसचाच पुलाव वगैरे करते. मुलालाही ब्राऊन राईसचीच खिचडी देते.
संध्याकाळी पाच-साडेपाचला अर्धा कप पाणी / अर्धे १ % दूध या मध्ये बनवलेला व्हे प्रोटीन शेक ( व्हे प्रोटीन वॊलमार्ट / टारगेट मध्ये सहज मिळते. प्रत्येक स्कूप मध्ये अंदाजे २३ ग्रॆ. प्रोटीन असते ) + लो फॆट होल ग्रेन क्रॆकर्स. खूपच भूक असेल तर एखादे फळ ( केळं, आंबा सोडून ) व्हे प्रोटीन हे आहारात प्रोटीन वाढवायचा उत्तम मार्ग आहे. हे मी प्रेग्नन्सीतही घेतले होते. प्रेग्नन्सीत घ्यायचे असेल तर आधी डॊक्टरांना विचारावे.
साडे-आठच्या सुमारास रात्रीचे जेवण.
सकाळसारखेच. फळ खाऊनच सुरुवात करणे. ( खरं तर संध्याकाळी सातला जेवून घेतले तर वजन कमी करायला मदत होते असे वाचले होते पण मला जिमला जायला तीच एक वेळ मिळत असल्याने जेवणाची वेळ उशीराच ठेवावी लागली. )
या व्यतिरिक्त दिवसाला नऊ ते दहा ग्लास पाणी
मल्टीव्हिटॆमिन आणि कॆल्शिअमच्या सप्लीमेंट्स.
जेवल्यानंतर दहा-पंधरा मिनिटं शतपावली. ( जी हल्ली घातली जात नाही )
आहारात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त राहील हे पाहिले पण त्याचा अर्थ असा नाही की कार्ब्स पूर्ण वर्ज्य केले. पण कार्ब्स फक्त फळं, भाज्या आणि होल ग्रेन्स यातून जातील हे पाहिले. मैदा,तांदूळ, बटाटा जवळजवळ बाद.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
डाएट चालू करायच्या सुरुवातीला खूप निराशा आली होती की वजन कमी होणार की नाही ( खरं तर त्या आधी कधी प्रयत्नच केला नव्हता कमी करायचा ) त्यावेळी नेट्वर GM डाएटची भारतीय आवॄत्ती सापडली होती ( बीफ ऐवजी पनीर + मोड आलेले मूग ) एक धक्का मिळाला तर हवा होता म्हणून GM diet ( 7 day crash diet ) केले होते. ते खालीलप्रमाणे :
दिवस १ : फक्त फळे ( केळं सोडून ... शक्यतो मेलन ग्रूप मधली कलिंगड, कॆंटलूप वगैरे )
दिवस २ : सकाळी ब्रेकफास्टला एक बटाटा उकडून ( थोडे मीठ, मिरपूड आणि किंचित बटर घालून ) नंतर दिवसभर फक्त भाज्या ( बटाटा, सुरण, छोले, राजमा, चणे नाही )
दिवस ३ : फळे + भाज्या ( केळं, बटाटा, छोले, राजमा इ. सोडून )
दिवस ४ : ८ केळ्यांपर्यंत केळी + ४ ग्लास साय काढलेले दूध ( मी सहा केळीच खाल्ली होती )
दिवस ५ : मोड आलेले मूग + १% दुधाचे पनीर घरी करुन. ( एकूण २८० ग्रॆ. पर्यंत ) + ६ टोमॆटो
दिवस ६ : मोड आलेले मूग + १% पनीर पाहिजे तितक्या प्रमाणात.
दिवस ७ : बाऊन राईस + भाज्या + फळे ( बटाटा, केळं इ. नाही )
रोज किमान दहा ग्लास पाणी.
मी कधीही उपास करत नसल्याने ह्या डाएटचे पहिले तीन दिवस अक्षरश: जीवघेणे होते. वजन दोन कि. कमी झाले ( पाच पाऊंड ) फक्त. एक धडा मात्र मिळाला की long term diet करायचे तर खाणे आवडीचे असले पाहिजे आणि त्या सात दिवसांत सतत वाटत होते की हे असे खाण्यापेक्षा साधे फुलके आणि मुगाचं वरण म्हणजे स्वर्ग आहे वजन व्यवस्थित कमी होत असतानाही मे च्या अखेरीस मला परत अजून जास्त वजन कमी करायची घाई झाली आणि परत एकदा हे GM diet केले. ह्या वेळी फक्त १ पाऊंड ( अर्धा कि. ) वजन कमी झाले. आणि खाण्याच्या क्रेव्हिंग्जवर माझा जो छान ताबा आला होता तोही जातो की काय अशी भिती वाटू लागली. थोडक्यात GM diet मला फारसे फायदेशीर वाटले नाही. long term मध्ये तर नाहीच नाही. मात्र नेहेमीचं डाएट खूप एंजॊय केलं आणि त्यानेच वजनही कमी झालं.
टीप : मी काही कुणी आहारतज्ञ नाही. व्यायाम आणि आहार मी संपूर्णपणे माझ्या आकलनाप्रमाणे आखून घेतला होता ह्याची कॄपया वाचकांनी नोंद घ्यावी.
(मायबोलीवरचे वजन कमी करण्याचे इतर अनुभव
खाऊन पिऊन वजन कमी करा !
दिक्षीत डाएट आणि अनुभव
-वेमा)
स्नेहा, मला साउथ बीचविषयी
स्नेहा,
मला साउथ बीचविषयी फारशी माहीती नाही. पण ते फॅड डाएट आहे असं मी ऐकलं होतं. माझी माहीती चुकीची असू शकते. डॉक्टरला नक्कीच जास्त माहीती.
नानबा,
मला जंकची सवय नव्हती तरी उतरलं माझं पण दामदुपटीने चढलं पण परत...
वजन हळूहळू उतरवले आणि तेही राहणीमानातले बदल करून तरच त्याचा उपयोग होतो. हा साक्षात्कार मला झालेला आहे. फक्त त्यावर अंमल होणे बाकी आहे तोवर मी माझ्या कक्षा रूंदावतेच आहे..
अगो, ब्राऊन राईसची खिचडी कशी
अगो, ब्राऊन राईसची खिचडी कशी करायची?मी कधी वापरला नाही हा राइस...
मँगनेशियम असते शेंगदाण्यात जे
मँगनेशियम असते शेंगदाण्यात जे डायबेटीसला चांगले.
>>
दगडात अल्युमिनियम आणि सिलिकॉन व लोह असते. ते अनुक्रमे गुडघा, हाडे आणि मेन्दूला चांगले असते.
ब्राउन राईसच्या खिचडीचा एक
ब्राउन राईसच्या खिचडीचा एक प्रकार इथे आहे -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/05/blog-post.html
धन्यवाद, मिनोती...मी करून
धन्यवाद, मिनोती...मी करून पाहीन..
>>दगडात अल्युमिनियम आणि
>>दगडात अल्युमिनियम आणि सिलिकॉन व लोह असते. ते अनुक्रमे गुडघा, हाडे आणि मेन्दूला चांगले असत>><<
रॉबिनहूड, मग तुम्ही सुरु केले की नाही? आम्हाला सुद्धा कळवा अनुभव.
मिनोतीने रेसिपी दिलीच आहे. मी
मिनोतीने रेसिपी दिलीच आहे. मी साधारण अशीच करते. ब्राऊन राईस शिजायला खूप वेळ लागतो. मी एकावेळी साधारण दीड वाटीची करते ( एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूगडाळ ) त्याला चार वाट्या पाणी घेते. नॉनस्टिक पातेल्यात थोड्या तेलाची फोडणी करुन त्यात आवडीप्रमाणे भाज्या आणि नंतर धुतलेले डाळ-तांदूळ घालून चांगले परतून घ्यायचे. मग धनाजिरा पावडर, गोडा मसाला,मीठ घालून पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करुन झाकण ठेवायचे. पाणी आटता आटता तासाभरात शिजते. ही खिचडी मी मुलासाठी नेहेमी करते. देताना त्यात दोन चमचे दूध, साजूक तूप आणि थोडे दही घालून कालवून देते.
दुसरा प्रकार म्हणजे मूगडाळीऐवजी तूरडाळ धुवून थोड्या गरम पाण्यात दहा मिनिटे भिजत घालायची. मग तेल तापले की त्यात जिरं, अर्धवट कुटलेले मिरे,दोन छोटे चमचे चणाडाळ आणि थोडा काजू-तुकडा ( हे ऑप्शनल ) घालून परतायचे. काजू आणि चणाडाळ तांबूस व्हायला लागले की त्यात बारीक चिरलेला कढीपत्ता,हळद्,हिंग,तूरडाळ-ब्राऊन राईस घालून परतायचे.आणि मग पाणी घालून मीठ,जिरपूड घालून उकळी आली की असेच मंद आचेवर झाकण ठेवून शिजवायचे. पाणी जास्त झाले तर आटेपर्यंत शिजवावे. कमी वाटले तर मध्येच अजून घालावे.बिघडण्याचा प्रश्न नसतो कारण ही खिचडी मऊमऊच खावी. शिजत आली की चांगली घोटून घ्यावी. देताना वरुन एक चमचा साजूक तूप घालावे. पोटाला आराम द्यायचा असेल तेव्हा ही खिचडी चांगली. बरोबर पापड वगैरे भाजून घ्यावा पाहिजे तर.
ब्राऊन राईसचा मोकळा पुलाव करायचा असेल तर नेहेमी पुलावासाठी जसे भरपूर पाण्यात तांदूळ शिजवून पाणी ओतून देतात तसेच करावे. फक्त वेळ थोडा जास्त लागतो शिजायला. असे केल्याने सत्व वाया जाते म्हणून मी नेहेमी करत नाही. पण साध्या भाताच्या पुलावापेक्षा हा चांगला.
कुकरमध्ये ब्राऊन राईस नीट शिजवणे मला अजून तरी जमले नाहीये म्हणून मी नॉनस्टिक पातेल्यात झाकण ठेवूनच शिजवते.
अगो, ब्राऊन राईस शिजायला जर
अगो,
ब्राऊन राईस शिजायला जर वेळ लागत असेल तर शिजवण्याआधी २०-२५ मिनीटे भिजवून ठेवल्याने फरक पडतो का, असा भिजवलेला तांदुळ लवकर शिजत असेल ना? मी कधीच शिजवला नाही म्हणून विचारतेय.
रुनी हो पडतो फरक. मला तर
रुनी हो पडतो फरक. मला तर कुकरला केलेला भात जास्त मऊ वाटतो. मी लक्षात असेल तेव्हा सकाळी राईस पाण्यात घालुन जाते. रात्री राईस कुकरला लावते. भात छान मऊ होतो. शिजवताना एखादा कणी मीठ घालायचे.
मिनोती, सकाळ ते रात्र म्हणजे
मिनोती, सकाळ ते रात्र म्हणजे खूपच वेळ भिजवलास गं ब्राऊन राईस. रुनी, मी एकदोनदा अर्धा तास भिजत घालून पाहिला होता पण विशेष फरक वाटला नाही. आता असा खूप तास भिजवून पाहिला पाहिजे.
मिनोती पाणी जास्त घालता का
मिनोती
पाणी जास्त घालता का तुम्ही हा भात कुकरला शिजवताना? की नेहमी एवढेच?
सगळ्यांना धन्यवाद्...मालती
सगळ्यांना धन्यवाद्...मालती कारवारकरांच्या पुस्तकात आहे की डाळ तांदूळ नेहमीच पाण्यात भरपूर वेळ ठेवूनच शिजवावे.(ते पाणी नंतर शिजताना वापरावे)असे केल्याने धान्यातील अन्नगुण मोकळे होतात आणि पचायलाही हलके.
स्वाती, मला आहो जाहो म्हणु
स्वाती, मला आहो जाहो म्हणु नको प्लीज
पाणी कीती लागेल ते भातावर अवलंबून आहे पण २.५ पट तरी नक्कीच लागते असा अनुभव आहे. साध्या कुकरमधे केलेला भात मला साधा केलेल्या भाताहुन जास्त आवडतो. कारण नीट मऊ होतो आणि एनर्जी कमी वापरली जाते.
माझ्याकडे तो हॉकिन्सचा लहान कुकर आहे त्यात मी खिचडी डायरेक्ट करते. त्यात सगळे घालून ३ शिट्ट्या करते मग एक शिट्टी गॅस लहान करुन करते.
भात खाल्लाच पाहिजे का? एवढा
भात खाल्लाच पाहिजे का? एवढा आटापिटा कशासाठी? अॅक्चुअली पोळ्यातून एवढे कार्बोहायड्रेट जात असताना पुन्हा आणि भात म्हनजे आहाराचे प्रोटीन - कार्बोहायड्रेटचे सन्तुलन बिघडवण्याचाच प्रकार आहे... कार्बोहायड्रेट ही अशी चीज आहे की जी आवश्यकते पेक्षा जास्त झाल्यास फॅट्स मध्ये रूपान्तरीत करून शरीरात साठवली जाते. त्याचे परिणाम पहातच आहात. हाच बीबी...
ओ काका, रोज कोण खातेय भात (मी
ओ काका, रोज कोण खातेय भात (मी तरी नाही खात) पण जेव्हा करते तेव्हा किनवा करते किंवा ब्राउन राईस!
हूड, तुम्ही मूळ लेख नीट वाचला
हूड, तुम्ही मूळ लेख नीट वाचला नाहीये हे सिद्ध झाले. मी शक्यतो जेवणात भात किंवा पोळ्या असा एकच कार्बोहायड्रेटचा प्रकार ठेवते. पण तरीही आपल्या पारंपारिक जेवणात भात-पोळ्या दोन्हींचा समावेश असल्याने बर्याच जणांना दोन्ही खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही. अशा वेळी दोन्हीचा समतोल साधून डाएट मेंटेन करता येते. उदा. एखादी पोळी कमी करुन त्या जागी थोडा भात खाणे.
भारतवारी आणि holidays मध्ये,
भारतवारी आणि holidays मध्ये, चांगले कमी झालेले वजन परत ३-४ किलोने वाढले आहे :(. ते भराभर अजुन वाढ्ण्याच्या आधिच कमी करायला हवे. याच बी बी च्या पान क्र. ३ वर महागुरूंनी सुचवलेले diet आहे. ते मला तरी fad diet वाटत नैये. नेहमीचे भारतीय जेवण असल्याने आवडेल आणि diet करणे शक्य होइल. मी १ फेब. पासुन ( येत्या सोमवार ) एक महिना ते करुन बघणार आहे. कोणी माझ्यासोबत करणार का? १ फेब अशासाठी कि, भाज्या वैगरे आणता येतील. आणि थोडी मानसिक तयारी. मी आज पासुनच चालू करतिये, पण नोंदी ( खाणे, व्यायाम आणि वजन ) १ फेब पासुन करीन.
rules:
१. शक्य तेवढे follow करणे ( > ९५% )
२. इथे काय व्यायाम केला ते पोस्ट करणे ( ४० मि. चाला असा program सांगतो, पण मे gym ल जाते, मं मी तेच करीन)
३. मझा "stimuli narrowing" वर विश्वास आहे, म्हणून मी त्याच त्या भाज्या खाइन. आणि तोच सल्ला पण देइन. जर एखाद दिवशी बदल केला तर तो पोस्ट करणे
४. दर सोमवारी वजन पोस्ट करणे. ( जर नसेल करायचं तर कमित कमि बदल delta , पोस्ट करणे.
जर बरेच जण जमले, तर नविन बी बी काढुयात.
येणार का कोणी मझ्या सोबत?
if you don't want to do this program but, want to achieve your own personal goal, please join.
when you are answerable to group of people, it improves your chances of achieving that goal
बापरे , खूप दिवसानी type करतिये. कित्ती वेळ लागला, एवढं पोस्ट करायला. हुश्श.
वजन वाढ्णं किंवा कमी होणं हा
वजन वाढ्णं किंवा कमी होणं हा साधा हिशोब आहे. कॅलरीज consume किती केल्या आणि burn किती केल्या.
भात खाल्यामुळे जाड होत असेल तर आमच्या कोकणातले सगळे जाडे झाले असते. कोकणात आम्ही तिन्ही त्रिकाळ भात खायचो. चपाती किंवा पुरी फक्त सणासुदीला असायची. रोज माशाच कालवण भात आणि उपवास असेल तर बीर्ड भात, आमटी भात किंवा पातळ भाजी वगैरे. रात्री तांदळाची भाकरी. गोडाचे पदार्थ म्हणजे तांदळाच्या पिठाचे घावन किंवा मोदक म्हणजे परत तांदूळ. कोणीही जाडं न्हवतं. कारण शरीर कामही करायच. स्नॅक्स म्हणजे, पोहे, दही पोहे, दूध पोहे.
भाताने जाड होतं म्हणणं म्हणजे ..........
धन्यवाद मिनोती आर्च अगदी
धन्यवाद मिनोती
आर्च अगदी अगदी मी पण हेच म्हणणार होते. आमच्या कोकणात तर रोज भातच. सकाळी नाष्त्याला पेज, दुपारी भात आमटी भाजी , नाहीतर भात, मासे ( ते सुद्दा ओल्या खोबर्याचे वाटण घालुन) आणि रात्री पण भातच. तरी कोणी जाड नाही दिसले. म्हणा त्यांचे कष्ट पण जास्त असतात. तरी असो.
मला मुळातच भात आवडत नसल्याने जास्त काही वाटत नाही पण नवर्याला आवडतो खुप. त्याला म्हणे जेवल्यासारखे वाटत नाही म्हणुन सध्या ब्राउन राइस आणलाय सध्या. आता करुन बघायला पाहीजे.
<< भात म्हनजे आहाराचे प्रोटीन - कार्बोहायड्रेटचे सन्तुलन बिघडवण्याचाच प्रकार आहे... कार्बोहायड्रेट ही अशी चीज आहे की जी आवश्यकते पेक्षा जास्त झाल्यास फॅट्स मध्ये रूपान्तरीत करून शरीरात साठवली जाते.>>
रॉबीनहूड तुमचाही अभ्यास दिसतोय या विषयावर. लिहा ना तुम्हीपण जरा
भाताने जाड होत हे मिथ आहे
भाताने जाड होत हे मिथ आहे खरोखर. काहिंना भात पचत नाही म्हणून भात नाही खल्ला हे ठिक. दुसरे म्हणजे पचनशक्तीच ठिक नसेल मूळात तर काहीच नीट न पचता फॅट मध्येच रूपांतर होइल. त्यात व्यायाम नाही म्हणजे आणखी वजन वाढणारच.
(कोकणी लोकांना भाताशिवाय जेवण जात सुद्धा नाही. मला भात तसा आवडत नाही पण ते पचत नाही म्हणून. पण माझी आजी कोकणातील असून भात पचत नाही म्हणजे काय आँ? असे मला म्हणायची. माशाशिवाय घास न उतरणारी माझी आजी भाताचा आधी टोप चढवायची जेवण सुरुवात करायच्या आधी. मुंबईतच रहायची पण जाड म्हणून न्हवती)
नुस्त्या ब्राउन राइसची चव
नुस्त्या ब्राउन राइसची चव आवडली नाही तर त्याचा बिसिबेळेभात करावा. छान लागतो.
ते फॅट मध्ये का कनवर्ट होते
ते फॅट मध्ये का कनवर्ट होते हे प्रत्येकाच्या पचनशक्तीवर आहे.
stimuli narrowing म्हणजे काय?
stimuli narrowing म्हणजे काय?
stimuli narrowing ( for
stimuli narrowing ( for weight loss purposes ) म्हणजे, एकच प्रकारचे अन्न खाणे. ( ofcourse for some period of time when you are on diet ). जर आपण खुप वेगवेगळया प्रकारचे अन्न खाल्ले तर कदाचित जास्त खाल्ले जात असेल. महागुरूंनी सुचवलेल्या program मधये पण फक्त ३ च प्रकारच्या भाज्या खायला सांगितल्या आहेत.
( from my RD's paper )
One of the goals of a dietitian is to teach people that there is no such thing as a “bad food” and thus all foods can fit into a healthy diet. This advice may work well for people who have a healthy psychological relationship with food but it can be problematic for individuals who use food as a coping mechanism. Data collected by researches associated with the National Weight Control Registry and the University of Pennsylvania demonstrate that limiting the variety of readily available foods, and serving pre-portioned foods decreases the amount of food eaten at any one time.
अर्थात कायमचे करायला मी सुचवत नैये, पण, to kick start weigh loss without losing nutrients , हे नक्कीच उपयोगी आहे ( जर , एकाच प्रकारचं diet संपूर्ण आणि समतोल बनवलं तर )
नाजुका मस्त कल्पना. मला पण
नाजुका मस्त कल्पना. मला पण वाटत होत असा एखादा वेगळा बाफ काढुयात म्हणुन पण मग राहुनच गेल. मी आहे तयार. १ फेब पासुन मी भारतात असिन महिनाभर सो हा सपोर्ट गृप मला अवांतर न चरण्याचि प्रेरणा देईल अशि आशा करते :). माझ सजेशन अस आहे कि हा उपक्रम महिन्याभरासाठि न ठेवता कायमस्वरुपि ठेवावा म्हणजे 'वजन कमि करायचय' अश्या टाइप च्या हेडिंग चा एक बाफ तयार करायचा तिथे सगळे इछ्छुक एकत्र येतिल आपापला दिनक्रम लिहितिल जर कुणि स्लॅक होतय अस वाटल तर बाकिचे इन्स्पायर करण्/कानउघडणि करण/दोन्हि करतिल ज्याला कुणाला अपेक्षित यश मिळाल तो/ती आपलि सक्सेस स्टोरि लिहु शकेल. मनुस्विनि आणि इतर लोक ज्यांना भारतिय जेवण आणि त्याचे पोषण मुल्य ह्या बद्दल माहिति आहे ते पण तिथे लिहु शकतिल. कशि वाटतेय कल्पना?
हव तर संयुक्ता मध्ये उघडुया.
thanks रमा. अगं एक महीना
thanks रमा.
अगं एक महीना यासाठी, की सुरुवात तरी करु, जर कायमस्वरुपी असेल तर, "उद्यापासुन करू" "उद्या" असं फार होतं ( माझ्याकडुन तरी).
आणि भारतात लक्ष ठेव. सगळं खा पण थोडंच. मामी, आत्या, काकू, मैत्रीणी यांच्या आग्रहाला बळी नकोस पडूस. माझं भारतवारीतच ( जास्त खावुन आणि व्यायामाला सुट्टी देवुन वजन वाढलं )
आयडिया चांगलीये. काही
आयडिया चांगलीये. काही वर्षापूर्वी मी असाच एक कागद वॉर्डरोबच्या आत चिकटवला होता. ज्यावर मी रेग्युलरली वजल लिहायचे.
इथे मायबोलीवर लिहिण्याऐवजी
इथे मायबोलीवर लिहिण्याऐवजी http://www.thedailyplate.com/ इथे लिहिता येईल का ते पहाता का?
तुमच्या गोल(goal) प्रमाणे किती कॅलरीज दिवसात खाव्यात याचे सजेशन मिळते.
फायदे म्हणजे तिथे तुम्ही किती खाल्ले त्यावरुन किति कॅलरी पोटात गेल्या ते कळते. लोकानी तिथे बर्याच भारतीय पदार्थांच्या रेसिपीज आहेत त्यावरुनही तुम्हाला कॅलरीज मोजता येतात. तुमच्या घटक पदार्थांवरुन एखादी रेसिपी लिहिता येते आणि त्यानुसार कॅलरी काऊंट ठेवता येतो.
आपण केलेला व्यायामही त्यात टाकता येतो.
तिथे तुम्ही मित्रमैत्रिणीना इन्व्हाईट करु शकता.
शिवाय फुकट आहे
अरे मिनोतीनेच लिहिले ना.. मी
अरे मिनोतीनेच लिहिले ना.. मी अगदी ह्याच साईटविषयी लिहिणार होते. चांगली आहे साईट.
रमा, आयडिया छान आहे. मी माहीती नक्कीच पुरवेन जसा वेळ असेल तसा पण मी बर्यापैकी आळशी (इथे मराठीत टाईप करायचा मला भारी कंटाळा येतो.. खरे तर) असल्याने व मला खात्री न्हवती की मी किती % डेडिकेट करु शकते म्हणून लक्ष नाही घातले बीबी उघडण्यात.
मी पण तयार आहे ह्या उपक्रमात
मी पण तयार आहे ह्या उपक्रमात सहभागी व्हायला.
Pages