काही अनुदार उद्गार...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात मसापमध्ये पदाधिकारी असलेल्या कौतिकराव ठाले-पाटलांनी यशवंतरावांबद्दल 'अनुदार' उद्गार काढले. त्यामुळे जी काही प्रतिक्रिया उमटली (उदा. पुणे मसापच्या आवारात सतीश देसाईंचे कपडे फाडून त्यांना काळे फासले) ती बघून मनात काही विचार आले. 'अनुदार उद्गार' म्हणजे तरी नक्की काय हो ? तसं म्हटलं तर कुठलीही टीका ही 'अनुदार'च असते, म्हणूनच ती टीका होते. तिचे पैलू अनेक आहेत. एक आहे भाषेच्या स्वरूपाचा. ती जहाल असू शकते, मवाळ असू शकते; किंवा टीका कशावर केली आहे हेही आहेच...ती व्यक्तिगत स्वरूपाची आहे की विचारसरणीवर, कार्यावर केली आहे; किंवा ती कुठल्या 'व्यासपीठा'वरुन केली आहे...राजकीय व्यासपीठावरुन केली आहे, वर्तमानपत्रीय आहे, सखोल संशोधनाचा आधार घेऊन विश्लेषणात्मक साहित्याद्वारे आहे, सार्वजनिक आहे की खाजगीत केली आहे; अन् सरतेशेवटी टीका कोणी कोणावर केली आहे हा दुर्दैवाने सर्वात महत्वाचा मुद्दा.
टीकेनंतर प्रतिक्रिया उमटणारच...पाठिंबादर्शक आणि विरोधी बाजूने, दोन्ही. मतमतांतरांमुळे ते होणे साहजिकच आहे. शिवाय टीकेच्या स्वरूपावर मतभेद असू शकतात. भाषा फार जहाल/मवाळ वाटू शकते, हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबून आहे. व्यक्तिगत टीका अस्थानी, असंबद्ध व संदर्भहीन वाटू शकते किंवा नाहीही. विचारसरणी, कार्य व खाजगी व्यक्ती हे दोन भिन्न आहेत/नाहीत यातील तुम्ही काय मानता यावर व्यक्तिगत टीका रुचणे/न रुचणे अवलंबून आहे. शिवाय मृत व्यक्ती ही व्यक्तिगत टीकेला उत्तर देऊ शकत नाही हा मुद्दा वेगळाच. टीका करताना वापरलेल्या व्यासपीठासंदर्भात औचित्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण हे सर्व बाजूला राहून सध्या एकच प्रश्न वारंवार ऐरणीवर येतो, टीका कोणी कोणावर केली आहे याचा. तो महत्वाचा प्रश्न आहेही, पण केवळ तोच महत्वाचा प्रश्न आहे असे दिसते. त्यामुळे काय टीका केली गेली आहे यापेक्षाही 'ती मुळात केलीच कशी गेली?' असा संतप्त सवाल उठतो.
खरं सांगायचं तर राग आहे तो अमुक व्यक्तीवर टीका केल्याचा. मृत व्यक्ती उत्तर द्यायला येऊ शकत नाही म्हणून त्या व्यक्तीच्या कार्यावर मत मांडायचा अधिकार गमावला जात नाही. तो माणूस जिवंत नाही हा मुद्दा व्यक्तिगत टीकेला उत्तर म्हणून बरोबर आहे, कार्य अथवा विचारसरणीच्या संदर्भात नव्हे. तिथे विश्लेषण होणारच, मते व निष्कर्ष मांडले जाणारच, हे केवळ अनिवार्यच नाही, तर अत्यावश्यकदेखिल आहे. एखादी व्यक्ती ती कितीही थोर असली तरी टीकेच्या त्रिज्येबाहेर नसते. शेवटी टीका या शब्दाचा अर्थ शिवीगाळ असाच घ्यायचा नसून ते एक भाष्य आहे. ते करणार्‍या व्यक्तीस जसा अर्थ लागला ते व्यक्त करणे आहे. अशा वेळी प्रत्येक वेळी भावना दुखावल्या जाण्याचा खेळ खेळून आपण स्वत:च्याच पायांवर कुर्‍हाड मारून घेत आहोत. त्यांचे कार्य अथवा विचार यांचा तत्कालिन संदर्भ लक्षात घेणे हे एकदाच करायचे नसून ते प्रत्येक बदलत्या काळात करणे महत्वाचे आहे. विश्लेषणयोग्य अशा गोष्टींच्या परिघाबाहेर या लोकांना ठेवून आपण त्यांना देवस्वरूप देत आहोत का ? आणि इथेच खरी खोच आहे....ज्या समाजात खुद्द देव ही संकल्पनादेखिल 'टीका'बाह्य नव्हती, तिथे अशा टीकाबाह्य व्यक्तींची संख्या उत्तरोत्तर वाढतच चालली आहे. याला संकुचित दृष्टीकोन म्हणावे, खुजा प्रतिक्रियावादी विचार म्हणावे की तद्दन मूर्खपणा ??
दुर्दैव इथेच थांबत नाही. या प्रसंगामुळे आपल्या समाजातील अजून एक विचित्र व घातक प्रथा पुढे आली आहे. ठाले-पाटलांची खरी चूक काय? यशवंतरावांवर टीका केली ही नव्हे, तर त्यांनी प्रसंगाचे, व्यासपीठाचे औचित्य पाळले नाही ही. मसाप आयोजित संमेलनातील व्यासपीठावरून जेव्हा मसापमधीलच एक पदाधिकारी बोलतो तेव्हा त्याने स्वतःची मते मांडायची नसतात, अन्यथा 'ती मसापची भूमिका आहे' असे सूचित होते आणि ते करण्याचा हक्क कोणाही एकास नाही. ठाले-पाटलांनी पदाचा व व्यासपीठाचा गैरवापर केला हा दोष. पण.... त्यांनी माफी कशाकरता मागितली ? तर यशवंतरावांबद्दल 'अनुदार उद्गार' काढून भावना दुखावल्याबद्दल. आता या अनुदार उद्गारांचा निषेध म्हणून सतीश देसाईंना काळे फासण्यात आले. मान्यवरांनी त्याचा निषेध केला. म्हणजे निषेध झाला तो प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या स्वरूपाचा, प्रतिक्रिया नक्की 'कशाबद्दल' व्यक्त झाली याचा नव्हे. जे चुकलेच नाही त्याबद्दल माफी मागणे (तेही केवळ समाजमनाचा रेटा म्हणून) अन् मूळ चूक काय हे लक्षात न घेता वरवर दिसणार्‍या चुकीकडे लक्ष वेधणे या नवप्रथांचे परिणाम जर समाजमान्य विचारवंतांनाच कळत नसतील तर.....

प्रकार: 

तुम्ही छान लिहिता..

स्लर्ती ते अनुदार वगैरे उद्गार काय होते? मला मूळ बातमी माहीत नाही. पण नेहमीचा पॅटर्न पाहता, मला वाटते जनतेला या दोन्ही गोष्टींबद्दल काहीच वाटले नसेल, पहिली चूक आधी आम जनतेला कळलीच नसेल (मसाप च्या भाषणात स्वतःचे मत सांगणे), आणि दुसर्‍या चुकीचा जनतेला राग वगैरे येण्यापेक्षा स्वत:ची राजकीय समीकरणे फिक्स करण्यासाठी काळे फासणे वगैरे उद्योग केले जात असतील. आणि सतिश देसाई कोण आहेत?

मला खरे तरे अनुदार उद्गार वाटले नाहीत.
तु म्हणतोस तसे व्यासपिठ चुकले. पण तसे बघीतले तर ढाले पाटलांना दुसरे व्यासपिठ नाहीच आजकाल वंसत व्याख्यानमाला व ईतर व्याख्यानमाला, बोध्दीक चर्चासत्रे वैगरें मध्ये जे बोलले जाते ते सिरियसली घेतले जात नाही त्यामुळे मसापच्या कुठल्याही अध्यक्षांना मसाप सोडुन कुठलेच व्यासपिठ नाही.
आपल्या कडे आजकाल असेच आहे कोणाविरुध्द (विचारसरणी) बोलले की झाले त्याला एकतर गाढवावर फिरवले जाते नाही तर काळे फासले जाते. मग तो चुक असो वा बरोबर. पण फासनार्यांची काही चुकी नाही ते ज्या नेंत्याचे अनुयायी आहेत त्यांनी ते कार्यकर्ते असताना हेच केलेले आहे.

फारेंड, बातमी अशी : साहित्य संमेलनात मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील त्यांच्या भाषणात म्हणाले, "यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला हा भ्रम आहे. तो मंगलकलश नव्हता, कुंकू लावलेला तांब्या होता. त्यातला नारळ कर्नाटकास, पाने गुजरातला तर गंध मध्यप्रदेशास गेला." सतीश देसाई हे मसापच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत.

केदार, ते अनुदार होते की नाही हे सापेक्ष आहे. मलाही त्यात अनुदार काहीच वाटत नाही, पण ठिक आहे, काही लोकांना वाटू शकते ही शक्यता मान्य करतो. परंतु, तो वादाचा मुद्दा नव्हताच. यशवंतरावांबद्दल पुळका असलेल्या कोणीही ठाले-पाटलांना 'तुम्हाला असे का वाटते ? या विधानामागची तुमची मीमांसा काय?' असे प्रश्न विचारलेच नाहीत.

राजकारण्यांनी या गोष्टीचे भांडवल करून घेणे यात आश्चर्यजनक काहीच नाही. त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षाही नाही. पण सतीश देसाईंवरच्या हल्ल्याचा निषेध करणार्‍या मान्यवर विचारवंतांनी ठाले-पाटलांच्या औचित्यभंगाचाही निषेध करत त्यांना वरील प्रश्न (तत्व म्हणून) विचारला असता तर योग्य मुद्याकडे लक्ष वेधले गेले असते. त्यातून कदाचित काही विचारमंथन झाले असते. पण तेसुद्धा राजकारण्यांसारखेच वागले हे खेदजनक आहे.

History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.
-