वाट

Submitted by राजू on 22 January, 2008 - 05:21

सान्जवात थरथरता
हृदयाचा सुटतो धीर
मिटले ओठ तरीही
शब्दांना जाते चीर

वाजे दूर मृदंग
की पैलतीराचा नाद
सुनसान वस्तीभवती
प्रतिध्वनींची साद

पाऊल कुणाचे वाजे
की होतो नुसता भास
वृक्षांनी मिटले डोळे
ती उभी रोखूनी श्वास

वाटेत अडकले चित्त
चुलीत विस्तव विझला
अंधार उपाशी पोटी
येऊन उशाला नीजला

डोळे तरीही उघडे
काळोखावर पसरले
ती टकटक कानी येता
अर्थच शब्द विसरले ....

गुलमोहर: 

सुंदर लिहिली आहे कविता.
एकदम आवडली.

छान आहे कविता, आवडली

वा .... आवडली कविता
-मानस६

लयीत दु:खाला लावलीस चाल..
अश्रुंना झेलण्या शब्द झाले ढाल.

संपुर्ण कवीतेला छान रिदम आहे.हे शेतकरणीचे दुख की वाट पहाणार्‍या भार्येचे? मला कवीतेचे व्याकरण समजत नाही पण तुमची कवीता पुन्हा पुन्हा वाचावीशी वाट्ली ..

कोकणातील एक घर आडवाटेला, गावापासून थोडे दूर..
गर्द झाडीने अंधाराला गच्चपणा आलेला...

आणि तिचे अधीर मन वाट पाहते आहे... त्याच्या येण्याची.

खासच Happy
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार Happy

वाटेत अडकले चित्त
चुलीत विस्तव विझला
अंधार उपाशी पोटी
येऊन उशाला नीजला

डोळे तरीही उघडे
काळोखावर पसरले
ती टकटक कानी येता
अर्थच शब्द विसरले ..
कविता आवडली

छान आहे कविता!!

<पाऊल कुणाचे वाजे
की होतो नुसता भास
वृक्षांनी मिटले डोळे
ती उभी रोखूनी श्वास>

खूप छान!
या कडव्यातिल लय इतर कडव्यात दिसत नाही.