"बाबा, बाबा... आज येताना बाहुली आणणार ना? नक्की? "
"हो नक्की!" तिचा पापा घेत अविनाश म्हणाला.
"बघा ह, कालच्या सारख विसरायचं नाही हं.. नाही तर मग कट्टी फु... " गाल फुगवत लता म्हणाली..
"हो गं माझी बछडी, नक्की ! आता जाऊ दे बाबांना.. उशीर होतोय "
म्हणत तो कामावर जायला निघाला.
"खेळणी आणली की चार दिवसात मोडुन टाकायची.. काही नसते हट्ट पुरवायला नकोत कार्टीचे. इथे महिन्याची १ तारिख गाठायची मारामार.... " डबा अविनाशला देत कविता बडबडत होती.
"जाऊ दे गं! एकुलती एक तर पोर आपली. या महिन्यात देऊ थोडी पोटाला चिमटी. आपण नाहीतर कोण तिची हौस भागवणार?"
"घ्या लाडक्या लेकिला डोक्यावर.... " म्हणत तिने लटक्या रागाने लता कडे बघत अतिशय प्रेमाने तिला जवळ ओढले.
अविनाश एका लहान कंपनीत साधा कामगार होता.तुटपुंजा पगार पुरवताना त्यांची अगदी ओढाताण होत असे. तरिही लताचे लहान सहान हट्ट पुरवायचा ते प्रयत्न करीत. त्यांना तिला शिकवुन खुप मोठी करायचे होते. त्यासाठी ते काटकसर करुन दर महिन्याला एक छोटी रक्कम बाजुला काढीत.
कमी पैशातही घर चालवण्याची कला कविता कडे होती. ती पै अन पै वाचवायचा प्रयत्न करी. भौतिक सुखांची उणीव ते आपल्या प्रेमाने भरुन काढीत. एकुण चार चौघांसारखं त्यांचंही तसं बरं चाललं होतं. विशेष म्हणजे ते तिघेही आपल्या छोट्याश्या घरकुलात सुखी होते. कवितालाही बाह्रेर काहीतरी काम करुन संसाराला हातभार लावायची इच्छा होती. परंतु अविनाशला मात्र तिचं बाहेर काम करणं मंजुर नव्हतं .
..................................................
संध्याकाळी अविनाश यायची वेळ झाली,तशा मायलेकी तयार झाल्या. रोज जवळच एखादा फेरफटका मारायचा नियमच झाला होता त्यांचा.आजही त्या तयार होऊन त्याची वाट पहात बसल्या.लता तर अगदी रस्त्याकडे डोळे लाऊन बसली होती.वाट पहाणं असह्य झालं की ती कविताला भंडावुन सोडी.
"आई, बाबा केव्हा येणार गं?"
"येतिल बेटा एवढ्यात, वेळ झालीच आहे त्यांची येण्याची. पण आज बाईसाहेब जरा जास्तच वाट पहाताहेत बाबांची. बाबांचीच ना?की बाहुलीची?"
"बाबांची पण अन माझ्या बाहुलीची पण.. मी बाहुलीचं नाव काय ठेवणार माहीत आहे का तुला? परिराणी.." तिचा उत्साह अगदी ओसंडुन चालला होता.
" सांग बघु आई, परिराणी नाव का ठेवणारेय?"
"सांग बघु लता, परिराणी नाव का ठेवणारेस?" तीही तिची नक्कल करीत म्हणाली.
"कारण ती तिच्या जादुच्या कांडीने मला आणखी खुप खुप खेळणी देइल.सुंदर सुंदर कपडे देईल त्या परागच्या टीव्हीतल्या मुलीसारखे. आणि मी माझ्या परिराणीला खुप खुप खाऊ पण मागणार...."ती जिभल्या चाटत म्हणाली.
"पण ती बाहुली तुला हे सगळं कसं देऊ शकणार बेटा?असं काही मिळत नसतं." ती लताला समजावत म्हणाली.
"पण तुच नाही का सांगितलंस गोष्टीत, परिराणी आपण मागु ते सर्व देते जादुची कांडी फिरवुन."
"ती गोष्ट असते बेटा.असं काही होत नसतं."आता मात्र लता हिरमुसली,तिच्यावर चिडली.
"म्हणजे तु मला खोटी गोष्ट सांगितलिस? जा तुझ्याशी कट्टी."
लताला जवळ घेत ती म्हणाली,
"तसं नाही ग राणी.. हे बघ, तु खुप अभ्यास कर. आणि शिकुन चांगली मोठी ऑफिसरीण झालिस की तुलाच सर्व काही मिळवता येईल. परिराणी व तिच्या जादुच्या कांडीचीही गरज पडणार नाही.आमची परिराणीच मिळवेल सर्व. मग्?करणार ना चांगला अभ्यास?"
"हो... "
आज अंधारुन आलं तरी अविनाशचा पत्ता नव्हता. इतक्या उशिरा फिरायला जाणही शक्य नव्हतं. ती कपडे बदलुन स्वयंपाकाला लागली.हात कामात गुंतलेले होते तरी नजर मात्र दाराकडे लागली होती.मन त्याच्या काळजीने भरले होते.असा उशीर सहसा होत नसे त्याला. त्यामुळे तर ती जास्तच काळजीत पडली.वाट पहाता पहाता लताही पेंगायला लागली तसं तिने तिला जेवु घालुन झोपवलं.बाबा आल्यावर बाहुली बघायला उठवायच्या बोलीवरच ती झोपायला तयार झाली.
रात्री बर्याच उशिरा अविनाश घरी आला. तिने काळजीने विचारले,
"आज खुप उशीर झाला, काही काम होतं का? लता किती वाट पहात होती.वाट पहाता पहाताच झोपली बिचारी."
तो काहीच बोलला नाही. खाटेवर झोपलेल्या लताच्या केसांत हात फिरवला व तिथेच बसला शुन्यात नजर लावुन.
कविताने त्याला जेवायला बोलवले त्यावर,
"मला भुक नाही.मी आता झोपतो सरळ."अस म्हणत तो लता जवळ्च आडवा झाला.
"अहो, पण दोन घास तरी खाऊन घ्या.मी थांबलेय तुमच्या साठी."
"तर मग तु जेऊन घे.मला पडु दे जरा स्वस्थ."
त्याच्याजवळ जाऊन तिने त्यच्या कपाळाला हात लाऊन पाहिलं.
"बरं नाहीय का?" तिने काळजीने विचारलं.तसा तो जरा खेकसुनच म्हणाला,
"तु मला स्वस्थ पडु देणार आहेस की नाही?"
त्याच्या अश्या खेकसण्याचा तिला खुप राग आला.तिने नेहमी प्रमाणे चौकशी केली नुसती तर तो इतक्या विचित्रपणे का वागतोय तेच तिला कळेना.तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.तिने तसच जेवण झाकुन ठेवलं व ती ही न जेवताच अंथरुणावर पडली.तो थोडा शांत झाल्यावर सांगेल स्वतःच असं समजुन ती त्याची वाट पहात राहिली. पण आज काही तो जवळ यायचे चिन्ह दिसत नव्हते.ती विचार करत करतच झोपुन गेली.
.................................................
पहाटे पहाटे तिला जाग आली.सिगरेटचा वासाने तिला कोंडल्या सारखे झाले होते.झोपाळु नजरेनेच तिने खाटेकडे नजर वळवली.लता एकटीच झोपली होती.तिने त्याला शोधायला खोलीत नजर फिरवली.तो खुर्चीत विमनस्कपणे बसला होता, सिगरेटचे झुरके घेत.तिची झोपच उडाली पाहुन. लग्नानंतर तिच्या लाडिक हट्टाने त्याने सिगरेट सोडली होती.तरीही आज तो सिगरेट ओढत होता.खोलीत कोंडलेल्या वासा-धुरावरुन बर्याच सिगरेट ओढलेल्या दिसत होत्या.आता मात्र ती घाबरली.. कारण अधुन मधुन तो खास वेळी एखादी सिगरेट ओढत असे मित्रांबरोबर. पण लताचा जन्म झाल्या पासुन घरात मात्र कटाक्षाने टाळी. रात्रिपसुनचे त्याचे वागणे तिला फारच विचित्र वाटले.तो आता तरी काही सांगेल म्हणुन ती उठुन बसली.तो मात्र आपल्याच विचारांत हरवला होता.असं कोणतं दु:ख होतं की आज त्याने तिलाही सांगितलं नाही.आता मात्र तिला स्वस्थ वाट बघणं असह्य झालं.तिने त्याच्याजवळ जाऊन अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"झोप येत नाहीये का तुम्हाला? एवढ्या सिगरेटी ओढताहात , तेही घरात. काय झालंय नेमकं?मला नाही सांगणार का?"
त्याने तिच्याकडे पाहीलं.त्याचे तारवटलेले डोळे तिला काही सांगु पहात होते.पण बोलावं कि न बोलावं या संभ्रमात त्याने परत नजर खाली वळवली.सिगरेट चिरडुन विझवली.आणि तसाच बसुन राहिला.
"मी काय विचारतेय्?काय झालय तरी काय्?असं एकटं सोसत बसण्यापेक्षा सांगत का नाही मला? तुमची ही अवस्था बघवत नाहीय मला.हे पहा, कसलंही संकट असलं ना, तरीही आपण निभाऊन नेऊ एकमेकांच्या साथीनं.पण तुम्ही मला सांगायला तर हवं ना?"
त्याने तिच्याकडे पाहिलं.त्याच्या डोळ्यात अगतिकता काठोकाठ भरलेली होती.त्याने तिचा हात हातात घेतला तेव्हा त्याच्या हाताचा कंप जाणवला तिला.कसेबसे तो बोलण्याचा प्रयत्न करु लागला,
"कविता ... "
"हं सांगा ना!"
"कसं सांगु ... आता.. आता आपण काय करायचं गं?.... आता आपलं कसं होणार?... आणि.. आणि.. आपल्या पोरीचं कसं करणार सर्व?..... "
"अहो, तुम्ही असं काय बोलताय? काय झालंय ते तरी सांगा आधी निटपणे.. तुमच्या अशा वागण्याने माझा जीव नुसता उडतोय बघा."
"कविता... कविता.. माझी नोकरी गेली गं...."
"क्काय?"त्याच्या हातातील तिच्या हातालाही आता कंप सुटला.त्याच्या बोलण्याचा मतितार्थ ध्यानात आल्यावर तिचं ह्रुदय धडधडु लागलं. कासाविसपणे एकवार तिने आपल्या टिचभर खोलीतल्या संसारावर नजर फिरवली.ती अविश्वासाने त्याच्याकडे पहात राहिली.तिचे शब्द जणु घशातल्या आवंढ्यातच अडकले.
" त्यांनी मला कामावरुन कमी केले..."
त्याच्या शब्दांनी ती भानावर आली.भितीची जागा आता संतापाने घेतली.
"पण.. पण असे कसे ते कामावरुन कमी करु शकतात्?त्यांना काय पोरंबाळं नाहीत?संसार नाहीत्?मग आपल्या पोरांचा, संसाराचा विचार नाही शिवला त्यांच्या मनाला?"
"त्यांची मर्जी अन त्यांनी काढलं.आपण काय करु शकतो?"
"तुम्ही अजुन वरच्या साहेबांना भेटा.त्यांना पटवुन द्या आपल्याला या नोकरीची किती गरज आहे ते.."
"काही उपयोग नाही गं.. शिवाय मला एकट्याला काढलेलं नाहीय त्यांनी.सर्वच विभागातुन कामगार कपात केलीय.एवढ्या सगळ्यांना कामावर ठेवणं परवडत नाही म्हणे त्यांना या मंदीत.."
"पण एवढी १०-१० वर्षे नोकरी केल्यावर असे कसे हाकलु शकतात ते तुम्हाला. आणि आता अश्या या अडनिड्या वयात अर्धा संसार व्हायला आल्यावर परत कुठुन कुठुन सुरुवात करणार्?तुम्ही सर्वांनी मिळुन काही तरी केले पाहिजे."
"कविता, अगं तुझ्या त्राग्याने काही फरक पडणार आहे का?हे सर्व अगदी कायदेशिरपणे केले जाते.. आपल्यासारखी फुटकळ लोकं काही करु शकत नाहीत.. तरी पण प्रयत्न सुरु आहेत आमचे.. पण काही होईल असे नाही वाटत.." तो विषण्णतेने म्हणाला.
"अहो, पण मग आता कसं व्हायचं हो आपलं?"
" तेच कळत नाहीय गं.काही मित्रांकडे नोकरीसाठी शब्द टाकलाय. सर्वांचं एकच म्हणणं.. नोकर्या आहेत कुठे?
बघुया .. प्रयत्न करणं आपल्या हातात.."
"आणि तो पर्यंत काय?"तिने धसकुन विचारले..
"तसे थोडेफार पैसे मिळतिल कंपनीकडुन.. तेच पुरवुन पुरवुन वापरायचे तोवर.. पोरीकडे बघुन भडभडुन येतय ग सारखं... सकाळी तिला बाहुली आणायचं कबुल करुन गेलो अन परतलो असा रिकाम्या हाताने..आता बाहुलीच काय खायला पण घालु शकेल की नाही कुणास ठाऊक तिला.." बोलता बोलता त्याचा गळा भरुन आला.. तो ताडकन उठला. खोलीतल्या खोलीत येरझार्या घालायला लागला.रस्त्यात पडलेल्या कसल्याश्या वस्तुला एक जोरदार लाथ मारली त्याने... अगदी त्वेषाने.. जणु काही त्याच्यावर अन्याय करणार्या समाज व्यवस्थेलाच ठोकरत होता तो आपल्या लाथेने.रागारागात तो बडबडु लागला..
"का? आमच्याच नशिबी का म्हणुन हे भोग्?आधिच कोणतं फार काही मागत होतो आम्ही?जे आहे त्यात समाधान मानत होतो.. ते ही बघवल नाही ना?..... ? बराच वेळ तो आपल्या मनातली मळमळ बाहेर ओकत होता..तो थोडा शांत झाला तशी ती त्याला समजावत म्हणाली,
"असा त्रागा करुन आता तुम्हीच तब्येत खराब करुन घाल.. जरा शांत व्हा बघु..निघेल काहीतरी मार्ग यातुनही.तो बसलाय ना तिथे? त्यालाच सर्वांची चिंता.चोच दिलीय तर दाण्याचीही सोय करील तो.आपण आपले प्रयत्न करत राहुया. जे काही छोटे मोठे काम मिळेल ते स्विकारा. या पेक्षाही कमी पैशात घर चालवेन मी.पण तुम्ही असा धीर सोडु नका."
तिने जबरदस्तिने त्याला थोडा आराम करायला सांगितले..
आता लता उठल्यावर तिची बाहुलीसाठी समजुन घालणं हा एक अवघड प्रश्न होता तिच्या समोर...कारण त्यांच्या समस्या कळण्याचे तिचे बिचारीचे वय नव्हते.....
...........................................................................
२-३ महिने होऊन गेले. नोकरी मिळण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती..तसा अविनाशचा धीर सुटु लागला..तो अनेक ठिकाणी नव्या आशा घेऊन जाई.. पण नकारांनी निराश होई..घरात असला की सारखा चिडचिड करी... उगिचच कवितावर तर कधी लतावर आपला राग काढत राही..ती त्याला समजावत राही, धीर देत राही
तिने त्याला नोकरी मिळेपर्यन्त भाजीचे दुकान लावण्याचा सल्ला दिला.. त्यालाही ते पटले. जवळच्या पैशातुन त्याने हा धंदा सुरु केला.परंतु धंद्यासाठी लागणारे कसब त्याच्याजवळ नव्हते. या धंद्यात मुरलेल्या उत्तरे कडील व्यावसायिकांत त्याचा टिकाव लागला नाही.यात तो बुडीतच निघाला...नोकरी मिळण्याची ही चिन्हे दिसेनात.. आणि तो अधिकच निराश झाला.. चिडचिड अधिकच वाढली.. दिवसें दिवस तो घरीच बसुन राहु लागला..लता साठी बचत केलेली शिल्लकही संपु लागली..
शेवटी तिनेच चार घरची धुण्या भांन्ड्यांची कामं धरली. कुठल्याही प्रकारचं काम करायला तिला लाज वाटत नव्हती.अविनाशला तिचं कामासाठी बाहेर पडणं या स्थितितही मंजुर नव्हत. पण दुसरा उपाय नव्हता.त्याला काम मिळाल्यावर तिने कामं सोडायची या अटीवर त्याने कुरकुरतच परवानगी दिली.
ती अगदी मन लावुन काम करत होती.अधिक पैसे मिळवण्यासाठी अधिक कामं करायची पण तिची तयारी होती.पण या क्षेत्रातही स्पर्धा असल्याचं तिला कळलं. कामवाल्या बायकांची ही ठरावीक क्षेत्रात मक्तेदारी होती. आपल्या हद्दीत त्या नवख्या बायकांना येऊ देत नसत.त्यामुळे जास्त काम करायची इच्छा असुनही कामं मिळत नव्हती.तिच्या ओळखीच्या बाई कडुन ही चार कामं तरी मिळाली होती.निदान अर्धपोटी का होईना पण पोटात अन्न पडु लागलं..
...............................................................
अविनाशला नोकरी अजुन मिळाली नव्हती.. आता तर तो जास्तच चिडखोर व आक्रमक झाला .. काही ना काही खुसपट काढुन तो रोज कविताशी भांडु लागला.तिच्या कमाईचं खावं लागतं म्हणुन त्याचा रागराग होई.ती आता उगाचच मिजास दाखवतेय असही त्याला वाटे..अन मग तो तसे म्हणुनही दाखवी..कविता खुप सांभाळुन घेत असे.. पण त्याचे वागणे..फारच विचित्र होत चालले होते. ती ज्या घरी कामे करते.. त्या घरांची.. विशेषतः त्या घरच्या पुरुषांची जरा जास्तच चौकशी करायला लागला.. तिच्या कामाच्या वेळी ते घरात असतात का? ती त्यांच्याशी बोलते का? त्याच्या संशय घेणार्या प्रश्नांनी ती वैतागुन जाई.त्याची संशयी नजर सारखी तिच्यावर रोखलिय असा भास तिला होई. ती पुरती त्रस्त होऊन गेली.त्याचे विचित्र वागणे सहन करताना तिची घुसमट होऊ लागली.वरचेवर त्यांची या विषयावर भांडणे होऊ लागली.त्यामुळे शरिरा पेक्षाही ती मनाने जास्त थकु लागली.
.................................................................
अशात त्याला एक जरा बर्यापैकी नोकरी मिळाली.आधी पेक्षा कमी पगार म्हणुन अविनाश कुरकुरतच होता पण तिला मात्र खुप आनंद झाला. त्याच्या सांगण्या नुसार तिने कामं सोडली.. पुन्हा पहिल्या सारखं व्यवस्थित होईल.. निर्माण झालेली कटुता निवळेल या आशेवर ती ही निमुट घरी बसली.त्या संशयात रहाण्यापेक्षा काटकसरीने रहाणे पसंत केले.
तरीही अजुनही त्यांच्यात निर्माण झालेली कटुता कमी होत नव्हती.अविनाश आता खुपच बदलला होता.या ठिकाणची त्याची सहकारी मंडळीही फारशी चांगली नव्हती.हळुहळु त्यांनी यालाही पत्ते खेळणे, दारु पिणे..या साठी त्यांच्यात ओढुन घेतले.तो दारु पिऊन घरी येऊ लागला.
कविताने त्याला समजवण्याचा खुप प्रयत्न केला.आजुबाजुच्या वयस्कर मंडळींनाही त्याला समजवण्यास सां गितले , लताच्या शपथा घातल्या... पण आता त्याचं ह्रुदय दगडाचं बनलं होतं. त्याच्यावर कसलाच परिणाम होत नव्हता.खुप बदलला होता तो.दारु पिणं अन त्या नशेत कविताचा, आपल्या नशिबाचा अन सर्व समाजाचा उद्धार करणं त्याचा अवडता उद्योग झाला होता.घरात फारच थोडे पैसे तो मागितल्यावर देई. आणि बाकी सारे पैसे तो आपल्या व्यसनांवर उडवी.
...........................................................................
आजही ती निराश होऊन बसली होती.घरात करण्या सारखे ही काम मिळत नव्हते.. अविनाश देत असलेलेल्या पैशात उपासमारच जास्त होत होती.तिची नजर लतावर पडली. पोरगी पार सुकुन गेली होती.तिच्याकडे तिला पहावत नव्हते.अलिकडे तिने हट्ट करणे ही सोडुन दिले होते.जे खायला मिळे ते गुपचुप खाऊन घेत असे.परिस्थितीने तिचं बालपण ही हिरावुन घेतलं होतं. घरातल्या बदललेल्या त्या दोघांच्या वातावरणाचा ही तिच्यावर परिणाम होत होता.ती आता एकटीच बसुन राही कसलासा विचार करीत.अविनाशची तर तिला भितिच वाटु लागली होती.ती त्याच्या जवळ पासही फिरकत नसे.आजही जेवायला मागुन मागुन.. थकुन अखेरीस तशीच झोपुन गेली होती ती.दोन दिवसा पासुन घरात काहीच नव्हते खायला.
तिची शेजारीण तिची परिस्थिती जाणुन होती.ती बर्याचदा तिच्याकडे जेवायला घाली लताला.कालही लता तिच्याच कडे जेवली होती.सुरुवातीला लताला तिच्याकडे जेवायला पाठवायला तिला आवडत नसे.पण आता "नाही" म्हणणं तिने सोड्न दिले होते.तिची परिस्थिती चांगली असताना तिनेही शेजारणीला बर्याचदा मदत केली होती.शेजारणीचीही परिस्थिती तितकिशी बरी नव्हती,त्यांनाही अधुन मधुन सक्तिचे उपवास घडत.पण मग अशा वेळी ती आजु बाजुच्या देवळातुन अन्नदान सोहळ्यातुन अन्न मागुन भागवत असे.त्यात तिला काही गैर वाटत नव्हतं.ती कवितालाही बोलवी पण असं भिक मागणं कविताला अजिबात मान्य नव्हतं.
आजही लता उपाशीच होती.तिला गलबलुन आलं,"देवा, कुठुन आणु या पोरीसाठी अन्न?"
ती स्वतःशीच विचार करत होती.तिला अचानक भाजी बाजारातील इकडे तिकडे घरंगळत असलेल्या भाज्या आठवल्या. त्या सहसा व्यापारी उचलत नसत त्यामुळे तशाच कचर्यात फेकल्या जात दुसर्या दिवशी.
ती ताडकन उठली.या भाज्यांपैकी चांगल्या भाज्या उचलुन आणाव्या या विचाराने. हातात एक प्लास्टिक ची पिशवी घेऊन ती निघाली. कपडुयाच्या नावावर एक अंगावरचा अन एक दोरीवरचा असे दोनच जोड शिल्लक होते,तेही ठिगळ लावलेले.कापडाची पिशवी देखिल नव्हती.प्लास्टीकच्या पिशव्या इकडे-तिकडे विखुरलेल्या असायच्या. त्यामुळे तिच्या सारखिचं काम भागत होतं.चपला पार झिजल्या होत्या.घालुन न घालुन काहीच फरक पडला नसता.तरी पण तिनं सवयीनं सरकवल्या पायात.तिच्या संसाराचं संपुर्ण आभाळंच फाटलं होतं आणि लावायला ठिगळं पण नव्हती.
ती बाजारात पोचली.रस्त्यातच एका मुलाने तिला अडवले.त्याच्या हातात काहीतरी खरडलेला फळा व दुसर्या हातात बरीचशी पाकिटे होती. ती पाकिटे तिच्या समोर नाचवत तो म्हणाला,
"घ्या ताई उंदीर मारण्याचं औषध, एकदन स्ट्राँग.. एका फटक्यात सर्व उंदीर खल्लास."
त्याच्या कडे विषण्णतेने बघत ती म्हणाली,
"नको, मला याची गरज नाही." पण त्याच्यातला विक्रेता गप्प बसायला तयार नव्हता.
"नाही कशी?सगळीकडेच उंदरांचा सुळसुळाट झालाय. बघत नाही तुम्ही टी व्ही वर्?किती जाहिराती दाखवतात.हो, पण त्यांचं औषध काही कामाचं नसतं बघा.माझं हे औषधच जास्त असरदार आहे आणि स्वस्त पण.. घ्या ना ताई.. आता नसतील उंदीर तर पुढे येतील.. घ्या ना...."
त्याला थांबवतच ती म्हणाली,
"पण माझ्या घरात उंदीर येणार नाहीत याची तुझ्या औषधा पेक्षाही जास्त खात्री आहे बघ मला..." ती उद्वेगाने म्हणाली.तो विचित्र पणे तिच्याकडे पाहु लागला..
"बाबारे, घरात माणसांना खायला अन्नाचा कण नाहीये, मग उंदीर कुठुन यायला?त्यांनाही त्यांचं भवितव्य समजत असेलच की.इतर घरांचा पर्याय आहे त्यांच्या जवळ.. फक्त आमच्याच जवळ कसलाच पर्याय नाहीय..."
ती बोलत असतानाच सगळीकडे धावपळ उडाली. ही धावपळ तिच्या परिचयाची झाली होती.म्युनिसिपालिटीवाले कारवाई करण्यासाठी येत. मग तेवढ्या पुरती सर्वांची पांगापांग होई आणि गाडी डोळ्या आड होत नाही तोच परत जैसे थे होऊन जाई. आधी ही सर्व गम्मत बघायला तिला आवडे.एवढी स्वस्त करमणुक तिच्यासाठी तरी दुसरी नव्हती.आज मात्र ती शुन्य नजरेने सर्व दृष्य पहात होती.सगळ्या गडबडीत तो औषध वाला पोर्याही लगबगीने पळु लागला. मात्र या धांदलीत त्याच्या हातातील २-३ पुड्या खाली पडल्या.तिने त्याला हाका मारित त्या उचलल्या,त्याला देण्यासाठी.पण तेवढ्यात तो दिसेनासा झाला होता.त्या पुड्यांचे काय करावे तिला कळेना..तिने त्या पिशवित ठेवल्या.दिसलाच तर त्याला द्याव्या म्हणुन.. आणि इतस्तत: पडलेल्या भाज्यांतुन भाज्या निवडुन गोळा केल्या..
घरी आल्यावर तिने लागलीच भाज्या साफ करुन उकडुन घेतल्या मिठ टाकुन. अविनाशसाठी काढुन ठेवल्या.. हल्ली तो केव्हाही येत जात असे.लताला उठवुन दोघी खायला बसल्या. इतकी भुक लागलेली असुनही तो लगदा घशाखाली उतरवणं कठिन जात होतं.तिने लता कडे पाहिलं,पोरगी पंचपक्वान्नावर तुटुन पडावी ,तशी तुटुन पडली होती.
............................................................
दिवसेंदिवस परिस्थिती फारच बिघडत होती. कुठेही काम मिळत नव्हतं.गोळा केलेल्या भाज्यांवरही पोट भरत नव्हतं.तिचे सर्व प्रयत्न फोल ठरत होते.दिवसेंदिवस ती खचत चालली होती.आजही २ दिवसांपासुन भाज्यांशिवाय काहीच नव्हते पोटात.भुक आतडे पिळवटुन काढत होती.तिने लताला ओढुन जवळ घेतले.तिच्या मनात आले.ही पोर कसे सहन करत असेल ही भुक्?अचानक तिला हरल्याची जाणिव झाली.तिला खुप रडावसं वाटत होत पण अश्रुही आटुन गेले होते.
तेवढ्यात तिची शेजारीण आली देवळात अन्नदान होत असल्याची बातमी घेऊन. आज फार मोठे शेटजी अन्नदान करणार होते त्यामुळे गोड धोडही मिळाले असते म्हणुन ती फारच खुश होती.ती कविताला पण तिकडे येण्यासाठी परत तिचं मन वळवु लागली. लतानेही अगदी केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहिले.तिला ओढतच म्हणाली,
"ए आई, चल ना गं..मावशी बरोबर आपणही जाऊया... खुप भुक लागलीय गं...."द्विधा अवस्थेतच ती शेजारणी बरोबर लाइन मधे येऊन उभी राहिली.
जवळच मोठमोठी वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेली भांडी ठेवलेली होती.त्यांचा सुवास सर्व परिसरात दरवळत होता.
भिकार्यांची झुम्मड उडाली होती.जो तो हपापल्या नजरेने जेवणाच्या भांड्यांकडे पहात होता.ताटात पडण्या आधीच नजरेने ओरबाडुन खात होता.अन्नाच्या सुवासाने सर्वांच्याच पोटातील भुक आता अधिकच भडकु लागली.परंतु अजुन शेठजींची पुजा संपली नव्हती.आणि तोवर सर्वांना वाट पहावीच लागणार होती.लताचीही नजर त्या जेवणाने भरलेल्या भांड्यांवर गेली तसे तिचे भुकेले डोळे मिटेचनात.
"आई. आई,ते बघ केवढं तरी जेवण.कुणाचं आहे ते?"
"त्या मोठ्या शेटजीचं आहे बेटा."
"आपल्याला देतील ना त्यातील थोडंसं?"
"हो बाळा, सर्वांनाच देणार आहेत.."
"ए आई, त्यांना लवकर द्यायला सांग ना गं.. खुप भुक लागलीय."
"थांबावं लागेल गं.. शेटजींची पुजा झाल्यावर मिळेल."
"आई, त्यांच्याकडे एवढं जेवण कुठुन आलं?"
"ते खुप श्रीमंत आहेत"
"श्रीमंन्त? श्रीमंत म्हणजे ग काय आई?" ती तिला काय सांगणार? ती गप्प बसली.
"हा.. आत्ता कळलं.. ज्यांच्याकडे एवढं खुप जेवण असतं ते श्रीमंत... मग आपण कोण?"
"आपण कर्मदरिद्री, अजुन काय्?आता गप्प बस बघु.."
ती खेकसली तशी लता गप्प बसली. पण तिच्या चिमुकल्या मेंदुला हे श्रीमंत, गरिबीचं कोडं काही उलगडेना. पण जेवढ उमजलं त्याने राग मात्र खुपच आला.ती तिला म्हणाली...
"आई आपण देवाशी कट्टी करुया."
"का गं?" तिनं विचारायचं म्हणुन विचारलं..
" बघ ना, त्या शेटजीला एवढ मोट्ठ जेवण दिलं देवाने. आणि आपल्याला मात्र किती कमी देतो..शिवाय कधी कधी तर देतही नाही.आजपासुन आपण कट्टी करुया देवाशी."ती गप्पच राहिली. उपाशीपोटी पोरीला मोठ मोठ्या चांगुलपणाच्या गोष्टी समजवण्याची तिची हिम्मतच झाली नाही.
शेटजींची पुजा आटोपली. त्यांनी अन्नदान सोहळ्यास सुरुवात केली. पाच जणांना अन्न वाढुन आपल्या लांबलचक गाडीत बसुन ते निघुन गेले.त्यांच्या नोकरांनी जेवण वाढायला सुरुवात केली तशी झुंबड उडाली.इतरजण सवयीने एकमेकांना ढकलुन पुढे पुढे जात होते,जेवण संपले तर मिळणार नाही या भितीने. घास ताटात पाडुन घेण्यासाठी माणसाची माणसाशीच स्पर्धा लागली होती.माणुसपण मात्र कुठतरी हरवलं होतं.सर्वजण जनावरांप्रमाणे मुसंड्या मारत होते एकमेकांना पाडत, तुडवत....
ती हे सर्व बघत स्तब्धच होऊन गेली.लता तिला खेचत होती.
"चल ना गं आई,नाहीतर संपुन जाईल सारं.. मावशी पण गेली बघ...."ती मात्र तिथेच खिळुन उभी होती.
फारच गोंधळ माजला तसं शेटजींच्या माणसांनी एकिकडे जेवण वाढत तर दुसरीकडे काठ्या उगारत एकेकाला हाकलायला सुरुवात केली.सर्व जेवण घेऊन पांगले तरी ती तशीच उभी होती.वाढणार्याचे तिच्याकडे लक्ष गेले . ती संकोचली तसा तो खेकसला,
"तुला नकोय का जेवण?
"ऊ.. हा.. हवय ना.."
"मग रुबाबात तिथे उभी काय राहिलीस्?आम्ही काय तुझे नोकर लागलोत तिथवर जेवण आणुन द्यायला?"
ती पटकन पुढे झाली.हातातील ताटली त्याच्या पुढे धरली अन तिला मेल्याहुन मेल्या सारखं झालं. आज पोटासाठी हात पसरावा लागला. ज्या हाताने आजवर भिकार्यांना घासातला घास काढुन दान दिलं होतं तेच हात आज भिकार्याचे झाले होते.लाजेने तिचे डोळे भरुन आले.वाढता वाढता तो खेकसला,
"हो पुढे.. भिका तर मागायच्या मग लाज कशाला वाटायला हवी इतकी?"
"बरोबर आहे बाबा तुझ.. भिकार्यांना , गरिबांना लाज बाळगता येत नाही, कारण लाजेनं पोटं भरत नाही.. "ती स्वत:शीच पुटपुटली..
ताटातलं जेवण पाहुन लताला घाई झाली. ती तिला खेचु लागली अन ती बधीरपणे तिच्या मागोमाग चालु लागली.
तिचं डोकं सुन्न झालं होतं.आज अखेरीस भिकही मागावी लागली.उद्याचं काय? उद्याही तेच? जिवन जगण्याचे बाकी उपाय तर जवळ जवळ हरले होते आणि आज पासुन तीन भिकार्यांची भर पडली होती समाजात. जगण्यासाठी काय काय करावं लागलं होतं. मानवाचा जन्म घेतला हेच जणु पाप घडलं होत तिच्याकडुन. या लादल्या गेलेल्या परिस्थितीने तिच्या सुखी संसाराची आहुती तर केव्हाच घेतली होती. तिच्या संसार गाड्याचं एक चाक तर केव्हाच शरण आलं होतं नियतीला.स्वतःला दारुच्या बेहोष गर्तेत झोकुन देऊन माणुसकीची, जबाबदारीची आहुती देउन मोकळं झालं होतं. स्वतःच्या जिवनाचं ओझही तिच्याच खांद्यावर टाकुन. एकटीने हा गाडा ओढता ओढता तिची दमछाक होत होती.न पेलणारा हा संसार गाडा तिने तरीही ऊर फुटेस्तोवर ओढण्याचा प्रयत्न केला होता.सर्व हाल अपेष्टांवर मात करीत, प्रसंगी उपाशी पोटी राहुन पण आता ती पार थकुन गेली होती.शरीरा पेक्षा जास्त मनाने. तिच्या मनाची,प्रेमळ नात्यांचीही आहुती पडली होती या जिवन यज्ञात.आता अजुन कसल्या आहुतिने समाधान होणार आहे या जिवनाचं?ती अतिशय निराश झाली होती.आता केवळ शरीर जगवण्यासाठी,असं अगतिक जगणं जगण्यासाठी,कुठलीही गोष्ट तिला प्रेरीत करु शकत नव्हती.
आत्ताही ती तोच विचार करत होती.जगणं खरोखरच इतकं आवश्यक असतं का? सगळी लाज गुंडाळुन, लोकांपुढे भीक मागुन, हे जिवन जगुन आपण असं काय साध्य करणार आहोत्?हा पोटचा गोळा, तिच्या प्रगतीची किती स्वप्ने पाहिली, पण हाती मात्र कटोरा देत आहोत.काय असेल हिचं उद्याच भविष्य? यापुढे कसलं जिवन टाकणार आहोत आपण हिच्या झोळीत्?की आपण भोगलं त्याही पेक्षा भयंकर असेल्?त्यापेक्षा.. त्यापेक्षा..हे सर्व इथेच संपलं तर किती बरं होईल? सर्व चिंता मिटतील्,सर्व अवहेलना थांबतील. सर्वांनी विष खाऊन सुटावं यातुन.हाच विचार तिच्या डोक्यात घोळु लागला. पण.. पण.. विष खायला पण पैसे लागतात. ते तरी आणायचं कुठुन? आणि अचानक तिला त्या उंदरांच्या औषधांच्या पुड्यांची आठवण झाली.त्या अजुनही तशाच पडुन होत्या.
घरी पोहचे पर्यंत तिचा विचार ठाम झाला होता.तिने लताला अविनाशला उठवायला सांगितले ती त्याला उठवायला गेली अन परत आली..
" बाबा, झोपु दे म्हणतात.."
"त्यांना म्हणावं आधी खाऊन घ्या मग झोपुया सर्वच."
तिने त्या पुड्या कढल्या व विष जेवणात मिसळलं.जेवणाचं नाव ऐकताच अविनाशही पटकन उठला.
"वाढ लवकर..."
"जेवण कुठुन आणलं नाही विचारणार?"
"आणलं असशिल तुझ्या एखाद्या ***** कडुन. दे आधी लवकर..खायला.."तो नेहमी प्रमाणे खेकसला.पण आज तिला त्याचा राग न येता दयाच आली.त्याला बदलणं शक्य नव्हत हे ती केव्हाच उमजली होती. ज्या परिस्थितीने त्याला तसं बनवलं होतं,आज त्याच परिस्थितीने तिला भीक मागायला लावली आणि तिचा त्याच्या बद्दलचा राग संपला.ती हसली व शांतपणे म्हणाली,
"आज आपण तिघेही एकत्रच जेवुया." तसे ते दोघेही तुटुन पडले जेवणावर. आज पहिल्यांदा ती त्या दोघांसाठी जास्त हिस्सा न देता बरोबरीने जेवत होती.तो मिटक्या मारीत म्हणाला,
"वा!मस्तच आहे जेवण! आजची काळजी तर मिटली."
"आता कायमचीच काळजी मिटली आहे."
असं म्हणत लताला कुशीत घेत तिनंशेवटचा घास तोंडात टाकला.
...................................................................
दुसर्या दिवशी पेपरमधे, बजेटच्या पानभर बातम्यांच्या गर्दीत, एका कोपर्यात... एक छोटीसी बातमी होती,
"गरिबीला कंटाळुन एका कुटुंबाची आत्महत्या........."
...................................................................
(No subject)
घसघशीत कटु वास्तव !!!
सुन्नच झालो वाचून.
सुन्नच झालो वाचून.
चेतना, कथा आवडली.
चेतना, कथा आवडली.
हम्म. असं कुठेही घडु शकतं.
हम्म. असं कुठेही घडु शकतं. अगदी तुमच्या आमच्या आयुष्यातही. मनानं खंबीर असलं की कुठल्याही परिस्थितीतुन बाहेर पडता येतं..... स्वानुभवानं सांगतेय. तिनं असं संपवायला नको होतं. एक कर चेतना हा झाला वास्तववादी दृष्टीकोन, आता ह्याच घटनेचा दुसरा भाग आशावादी दृष्टीकोनातुन येऊ दे.
very true! लोक बदलतात प्रेशर
very true! लोक बदलतात प्रेशर खाली...
चेतना, छान लिहिलीयेस कथा.
चेतना, छान लिहिलीयेस कथा. चित्रं डोळ्यांसमोर उभं केलयस.
मन हेलावुन टाकते हि कथा....
मन हेलावुन टाकते हि कथा.... रोजच अस आयुष्य एखाद्या समोर येत असेल.... खुपच छान कथा..
चांगली लिहीली आहे पण
चांगली लिहीली आहे पण
मन हेलावुन टाकते हि
मन हेलावुन टाकते हि कथा.....
आपल्या देशात आजही काही लाखो लोक असे आहेत ,ज्यांच्यावर अशी वेळ येते .....तरीसुद्धा आपले नेते मात्र २०२० साली आपल्या देशाला "महासत्ता" नक्की बनवतील !,
चटका लावून गेली कथा.
चटका लावून गेली कथा.
..................काय लिहावे
..................काय लिहावे कळेना
Khupach chan lihilay. Angavar
Khupach chan lihilay. Angavar kata aala vachun. pan he aajche vastav aahe. kititari kutumb aaj daridryamule aatmhatya karatat, pan tyacha kahihi parinaam aajchya ya sattevar ya neten var hot nahi, karan tyanche tyat kahihi gelele naste na..
अप्रतिम चित्रण.
अप्रतिम चित्रण.
Pages