विदुला मुणगेकर

Submitted by परदेसाई on 15 January, 2008 - 14:50

बृहन महाराष्ट्रमंडळातर्फे Talent Transfer योजनेखाली यावर्षी एकांकिका स्पर्धा घेतल्या गेल्या. न्यूजर्सीच्या Theartrix या संस्थेने सादर केलेल्या 'मनोमीलन' या एकांकिकेला पहिलं पारितोषिक मिळालं, आणि त्या एकांकिकेच्या दिग्दर्शिका 'सौ. विदुला मुणगेकर' यांनाही दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मिळालं. न्यूजर्सीमध्ये येण्यापूर्वी विदुला भारतात नाट्यचित्रपट कार्यरत होत्या. व्यवसायाने Occupational Therapist पण मनाने नाटकात वावरणार्‍या या कलाकाराला भेटायचं ठरवलं.

मी: तुमच्या नाट्यप्रवासाची सुरूवात कशी झाली? म्हणजे लहानपणची आवड....

विदुला: मी लहानपणी भरतनाट्यमचं शिक्षण घेतलंय. माझे वडील कुमार वैद्य हे राष्ट्र सेवा दलात होते. आम्ही कलापथकाचे दौरे करायचो. आमचे सुट्टीतले सगळे दिवस हे त्या दौर्‍यातच जायचे. साधारण सत्तर सालची गोष्ट आहे ही. त्यावेळी आम्ही 'महाराष्ट्रदर्शन', 'भारतदर्शन' असे अनेक कार्यक्रम केले. हे कार्यक्रम नृत्यनाट्य स्वरूपाचे होते, आणि ते भारतभर केले गेले. शाहीर लीलाधर हेगडे, सदानंद वर्दे, वसंत बापट असे कितीतरी नावाजलेले कलाकार सेवादलात होते. अश्या कार्यक्रमातून कामं करून मग मला नाटकांबद्दल आवड निर्माण झाली. मग रत्नाकर मतकरींच्या 'बालनाट्य' मधून 'निम्माशिम्मा राक्षस', 'सावळ्या तांडेल', 'झुकझुकभाऊ इंजिनवाले' अश्या अनेक बालनाट्यातून कामं केली.

मी: मग यातूनच तुम्ही व्यावसायिक रंगभूमीकडे वळलात? की यापूर्वी कॉलेजमध्येही तुम्ही या क्षेत्रात होता?

विदुला: मी केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे 'दुभंग'. हे व्यावसायिक नाटक म्हणजे डॉ. लागूंचं हिंदी सिनेमातून मराठी नाट्यसृष्टीत पुनरागमन होतं. त्यापूर्वी मी रत्नाकर मतकरींच्या 'लोककथा ७८' मध्ये पण होते. अमोल पालेकरांच्या 'अनकही' मध्ये मी विधू विनोद चोप्राबरोबर एक भूमिका केली होती. 'करामती कोट' नावाचा एक बालचित्रपटही त्याआधी करून झाला होता. खरं तर विधू विनोद चोप्राने मला त्याच्या पहिल्या फिल्म 'खामोश' साठी विचारलं होतं, पण मला ते शक्य झालं नाही. हा चित्रपट खूप गाजला होता. व्यावसायिक नाटकांचे दौरे आणि तारखा मला नोकरी संभाळून जमले नसते, त्यामुळे मी फार व्यावसायिक नाटकं केली नाहीत.पण मी 'दुभंग', 'प्रतिबिंब', 'सावल्या', 'आधे अधूरे', 'अविनाश', 'गांठ', 'यातनाघर', अशी अनेक हिंदी मराठी नाटकं केली. प्रायोगिक नाटकांचे प्रयोग ठराविक वेळी म्हणजे शनिवार रविवारी आणि ठराविक ठिकाणी म्हणजे मुंबईत असायचे, त्यामुळे मला नोकरी संभाळून त्यात काम करता आलं.

मी: मध्ये काही वर्षं तुम्ही ओहायोला होता, त्यावेळी तुम्ही इथे काही प्रयोग केलेत का, किंवा तुमचा नाट्यचित्रसृष्टीशी संबंध सुटल्यासारखं वाटलं का?

विदुला: या काळात मला काहीच करता आलं नाही. एकतर इथे येण्याआधी मी 'सावल्या' करत होते. प्रायोगिक नाटक असूनही त्याचे सत्तरच्या वर प्रयोग झाले होते. पण इथे आल्यानंतर काही म्हणजे काहीच नाही. इतकं सगळं मिस होतंय असं वाटायला लागलं. त्यातून आम्ही इतके homesick झालो की तीन वर्षातच परत जायचा निर्णय गेतला. इतर काही कारणं असली तरी नाटक हेही एक कारण होतं.

मी: मग परत गेल्यावर तुम्ही लगेच कामं सुरू केली असतील. तेव्हा कुठली नाटकं तुम्हाला मिळाली?

विदुला: परत गेल्यावर मी सत्यदेव दुबेंच 'रस्ते' केलं. सुयोगने केलेल्या 'अत्रे महोत्सवात' मी 'साष्टांग नम्स्कार', 'तो मी नव्हेच' या व्यावसायिक नाटकातून कामं केली. नाट्यदर्पणचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मला मिळालं. प्रायोगिक नाटकं मला नोकरी संभाळून करता येत होती, त्यामुळे हिंदी मराठी दोन्ही भाषातून मी बरीच प्रायोगिक नाटकं करू शकले. २००० मध्ये 'शोभायात्रा' हे व्यावसायिक नाटक केलं त्याकरिता मला अल्फा गौरव पुरस्कारचं नामांकनही मिळालं होतं. त्यानंतर मी 'इंशाल्ला', Magic Pill , आणि आणि 'फिरोज अब्बास खान' बरोबर Salesman Ramlaal पण केलं."

मी: मग नाटकातून तुमचं पुढचं पाऊल हे सिनेमाकडे पडलं. यात तुम्हाला काय काय अनुभव आले?

विदुला: सिनेमा मी फारसे करू शकले नाही तरी अजय फणसेकरच्या 'रात्र आरंभ' मध्ये मी दिलीप प्रभावळकरांबरोबर काम केलंय. मध्यंतरी आलेल्या 'हमारा दिल आपके पास है' या ऐश्वर्या, अनिल कपूरच्या चित्रपटात होते. पण चित्रपटातलं काम हा एक वेगळाच अनुभव असतो जो मला आवडला. नाटकात काम करताना एक flow असतो. इथे म्हणजे आपण ज्याच्याशी बोलतोय, ती व्यक्ती त्याठिकाणी मुळात नसताना ते भाव आणून कॅमेर्‍याशी बोलायचं हे कसब आहे. नाटकात Retake नसतात. सिनेमामध्ये Retake असले तरी Dubbing करताना तेच भाव तुम्हाला परत आणावे लागतात. lip-movements आणि emotions हे तसेच्या तसे व्हावे लागतात. सिनेमा मधल्या बर्‍याच कलाकारांना नाटक करणं अवघड असेल असं वाटतं, कारण Retakes नाहीत, पण प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी आव्हानं असतातच.

मी: आधी नाटक मग सिनेमा आणि नंतर सिरियल की नाटकातून तुम्ही सिरियल कडे गेलात?

विदुला: तसं काही नाही. पण कुणीतरी विचारलं, मला काम करायची इच्छा होती, आणि मला सिरियल मधलं काम सहज जमून गेलं.

मी: मग तुमच्या सिरियल्स आणि त्यातून आलेले अनुभव याबद्दल काहीतरी....

विदुला: हिंदीत मी 'बाबुलकी दुवायें लेती जा' मध्ये होते, आणि मराठीमध्ये प्रिया तेंडुलकरच्या 'अस्मिता' मध्ये मी काम केलंय. या सिरियलमुळे आमची मस्त मैत्री झाली होती. त्यानंतर मी 'करम', 'खौफ', 'सहेर', 'सच होंगे सपने' अश्या काही सिरियल केल्या. पण सिरियलचं जगच Mechanical आहे. सिरियल सुरुवात होताना सर्वसाधारणपणे कथा काय असेल ती ठरतं, पण त्यानंतर प्रेक्षकांना काय आवडेल, तो भाग, ते कथानक पुढे पुढे फुलवलं जातं. तुमचं पाठांतर चांगलं असेल, आणि तुम्ही तो शॉट तेवढ्या वेळात देऊ शकलात की झालं, कारण त्यांच्याकडे वेळच फार कमी असतो. नाटकासारखी रिहर्सल नसते. शॉटच्या आधी पंधरा मिनिटं तुम्हाला काय बोलायचं ते सांगतात. ते पाठ करून तुम्ही लगेचच तो शॉट द्यायचा असतो. त्यात एकाच एपिसोडचे वेगवेगळे डायरेक्टर वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात, त्यात आणि 'डेली सोप' असला तर त्यात वेळेची खूप बंधनं असतात. माझ्याबरोबर खूप चांगले कलाकार होते म्हणून मजा आली.

मी: मुलाखत सुरू करण्याआधी आपण Ad films बद्दल बोलत होतो. तुम्ही कुठल्या कुठल्या Ads केल्या?

विदुला: फार नाही पण Coke, Moove आणि इतर काही products च्या Ads मी केल्या. ते पण खूप Challenging असतं, म्हणजे काही सेकंदातच तुम्हाला ते Product प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असतं. थोडंसं ते सिनेमा सारखं असतं, पण त्यात Dubbing करायला वेगळे आर्टिस्ट असतात. कदाचीत मोठ्या कलाकारांचं Dubbing ते स्वतः करत असतील, पण इतरांसाठी Dubbing करताना त्यांचे वेगळे कलाकार असतात.

मी: मग एवढं सगळं चालू असताना ते सोडून देऊन, तुम्ही न्यूजर्सीला येणाचा निर्णय कसा काय घेतलात?

विदुला: Occupational Therapist चं लायसन होतं, आणि job offer आली होती, कुटुम्बासाठी एक निर्णय घ्यावा लागला तो आम्ही घेतला. तेव्हा मी Salesman Ramlal करत होते, आणि निघेपर्यंत मनाची तयारी होत नव्हती. गम्मत म्हणजे सिरियलवाल्यांनी त्यांच्या पध्दतीप्रमाणे माझं पात्र 'लंडनला गेलं' असं दाखवून सिरियल चालू ठेवली.

मी: पण न्यूजर्सी हे कलेच्या दृष्टीने निवडलंत, की समोर आलं म्हणून.

विदुला: खरं सांगू? न्यूजर्सीमध्ये येईपर्यंत इथल्या सांकृतिक वातावरणाची काहीच माहीती नव्हती. पण इथे आल्यावर मात्र लक्षात आलं की इथे बर्‍यापैकी वेगवेगळ्या Activities चालू असतात. इथे आल्यावर मी Theatrix तर्फे नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. २००५ साली झालेल्या Western Ghats मध्ये मी होते. त्यानंतर यावेळी BMM साठी केलेल्या 'ऐलतीर पैलतीर' मध्येही काम केलंय.

मी: नंतर तुम्ही काही नाटकात दिग्दर्शिकेचं काम केलत? त्याची तुम्हाला आवड आहे की...

विदुला: खरं तर मला Director होण्यापेक्षा Actress असणं जास्त आवडतं. Director व्हायचं म्हणजे अजून खूप कष्ट असतात. पण सहकार्‍यांनी गळ घातली आणि मी 'अशी पाखरे येती' च्या हिंदी रुपांतर, 'मत याद दिला' ची Director झाले. हे नाटक मी आधी केलं होतं. त्याच्या इथल्या प्रयोगाला नाटकाचे लेखक श्री. विजय तेंडुलकर स्वतः हजर होते, आणि नाटक झाल्यावर त्यांनी मुद्दाम येऊन शाबासकीही दिली. त्यानंतर एकांकिका स्पर्धेसाठी 'मनोमीलन' लगेचच सुरू केलं. आता Theatrix च्या काहीना काहीतरी Activity चालू असतातच, तेव्हा त्यात सतत बिझी रहायला होतच.

मी: मग नाटक, सिनेमा, जाहिराती, दिग्दर्शन हे झालं, पुढे काय काय करायचा विचार आहे? म्हणजे पुढचे काही प्लॅन?

विदुला: असं काही ठरवलेलं नाही, पण मुळात मला नाटकाची आवड आहे, आणि ती आवड ज्याला आहे तो अगर ती कधी स्वस्थ बसू शकत नाही. एकाद्या प्रयोग पूर्ण केल्यावर वाटतं, चला आता आराम करूया. पण थोडा आराम झाला, की परत काहीतरी करावं असं वाटायला लागतं. तेव्हा बघू. Theatrix तर्फे बरेच प्रयोग होतंच असतात. काही वेळा दोन तीन वेगवेगळे प्रयोग पण होतात, तेव्हा असं काहीतरी चालू राहिलच.

मी: इथे अमेरिकेमध्ये आता हिंदी, मराठी सिनेमा काढले जातात. व्यावसायिक नाटकांशी स्पर्धा करू शकतील अशी उत्तमोत्तम नाटकंही होतात. हिंदी सिनेमावालेही बर्‍याच वेळा चित्रीकरणाच्या निमित्ताने अमेरिकेत दिसतात. तेव्हा तुम्हाला अजून बर्‍याच ठिकाणी कामं करता येतील.

विदुला: बघू. पुढचं पुढे.

विदुलाजवळ या सर्व क्षेत्रातला अनुभव आहे, आणि आवडही. तेव्हा लवकरच त्यांन आपण नवनवीन कलाकृतींमध्ये बघू याची मला खात्री आहे. नाट्यचित्रपट क्षेत्रामध्ये त्यांचा पुढच्या सर्व उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा.

विनय देसाई
Vidula.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनय दादा मुलाखत खूप छान घेतली. योग्य असे प्रश्न विचारले. ते फार लांबविले नाहीत. मुलाखत लवकर वाचून होते. फक्त छायाचित्रांची तेवढी उणिव वाटली. असतील छायाचित्र तर अजून वेळ आहे, पोष्ट करून टाका.

मी रोज मागतोय ते छायाचित्र. पण अजून मिळालेले नाही.. मिळाले की लगेच टाकतो.. पण कोणाला आठवते का 'हम आपके दिलमे... ' मधली आई, जी आपल्या मुलीचं लग्न एका गुण्डाबरोबर करून द्यायला तयार होते....?

'परदेसाई' विनय देसाई

इथे पहा......दोन फोटो मिळतील....

http://www.ferozkhan.com/fz_salesmanpics.htm#

सुरेख मुलाखत. एका धडपड्या व्यक्तिमत्त्वाशी ओळख झाली. पण मला मुलाखत छोटी वाटली.. Happy आणि फोटोची उणीव इतरांप्रमाणे मलाही भासली. तुम्ही दिलेल्या लिंकवर एका म्हातार्‍या बाईचा फोटो आहे (त्यांची तशी भूमिका असणार ता नाटकात), पण त्यामुळे नक्की चेहरा डोळ्यासमोर येत नाहीये.. इतकी नाटकं जाहिराती, सिरियल्स केल्या आहेत, पण चेहरा का आठवत नाहीये असा प्रश्न सारखा पडतोय! Happy

छायाचित्र पण मिळालं...

त्यांची बहिण 'केंकरे' (??) पण दिसते हिंदी चित्रपटातून....

'परदेसाई' विनय देसाई

विनय,
एका हरहुन्नरी कलाकाराची मुलाखत घेतलस. सगळे पैलु थोडक्यात पण बरोबर जाणून घेतलस आणि आमच्याफुडे ठेवलस. तुझ्यातलो कलाकार आता फुडे आण बघु. वाट बगतय त्या दिसाची.
आशीर्वाद.
गुरुकाका.

अरेच्च्या, ह्या विदुला मुणगेकर होय!!!! ह्यांना आत्ताच्या भारतभेटीत वेस्ट साईडमध्ये बघितलं आणि नाव आठवायचा प्रयत्न केला. चला, तुझ्या निमित्ताने त्यांचं नाव तरी कळलं.

आत्ताच्या भारत भेटीत...? त्या आता New Jersey मध्ये रहातात. त्यामुळे भारतात दिसणे कठिण.. तू त्यांच्या बहिणीला बघितलं असशील.... (बर्‍यापैकी साम्य आहे)...

'परदेसाई' विनय देसाई

तरीच. कारण मी त्यांना डिसेंबरमध्ये पाहिलं तेव्हा त्यांची हेअरस्टाईल वेगळी होती. पण बहिण जरी असली तरी एवढं साम्य?