बाप मरतो तेव्हा...........
माझा बाप मरतो तेंव्हा ...
सारखं वाढणारं व्याज बघून, बाप बसला चेहरा पाडून
सावकाराचा पडण्या अगोदर घाला, फाशी घेतो बोलून गेला ॥
माझ्या काळजावर झाला आघात , आईचे अश्रू मावेना डोळ्यात
म्हटलं बघावं तरी जाउन, कोणी मदत करेल का हे ऐकून ॥
पहिले भेटले एक पुढारी, चालले होते सांभाळत ढेरी,
म्हटलं साहेब बाप मरतोय, 'कसं होणार'? म्हणून आत्महत्या करतोय ॥
साहेब म्हणाले जात सांग, किती मतदान घरात सांग,
विचारून घेइन एकदा मॅडमला, नाहितर येउच शेवटी सांत्वनाला ॥
मरू नकोस सांग त्याला, एक नोट देइन मी एका मताला,
त्याला म्हणाव भागव त्यात, स्वप्न सुद्धा पाहवित की रे आपल्या आवाक्यात.. ॥
मग भेटले उद्योगपती, बसायला गाडी आणि मोबाईल हाती
म्हणालो साहेब! वाचवा बापाला, खुप खुप धन्यवाद मिळतिल बघा तुम्हाला ॥
साहेबः "सेझ ला जमीन देणार का विचार, करंजा तरी लाव म्हणावं मिळतील हजार"
हजार लाख कोटी फक्त, दिसतच नाही फाशी आणि रक्त ॥
सावकाराला देण्यापेक्षा मला जमीन दिली असती,
बापाला घर आणि तुला नोकरी मिळून गेली असती ॥
पुढे भेटला मित्र पत्रकार, वाटलं बघावा देतो का आधार,
म्हणाला माझा बाप वाचव, अन्यायाविरुद्ध रान माजव ॥
मित्र म्हणाला, तुझा बाप खाईल काय रे तीन चार साप?
तरच मी ते छापू शकतो, जाहिरातदारांना कापू शकतो ॥
मल हवे तीन पायाचे अस्वल किंवा एखादी नटी नखरेल,
किंवा चालेल एखादा मुलगा आणि तो बुडेल अशी बोअरवेल ॥
गेला मरून बाप तर करूया बातमी सनसनखेज,
तीन चार शो लाइव्ह करू आणि नंतर स्पेशल कव्हरेज ॥
शेवटी भेटले श्री हनुमान, कष्टी दुःखी हरपून भान
म्हणाला देवा तुमचाच सहारा, तुम्हीच वाचवा माझा म्हातारा ॥
मारुती हसला म्हटला बेटा, मलाच माझी पडली चिंता
रामाचेच अस्तित्व नाकारताहेत, तिथे हनुमानाची काय बात ॥
तुझ्या बापाची क्षमा मागतो, यमराजांशी चर्चा करतो,
मरणार तर तो आहेच, स्वर्ग तेवढा मिळतो का ते पाहतो ॥
निघालो घराकडे होउन पुर्ण हताश, डोक्यात होते प्रश्नचिन्ह मन होते निराश
घरी बाप फाशी घेउन गेला होता, बाळांना वाली कुणी सुद्धा उरला नव्हता ॥
लग्नात नटायचं स्वप्न, ताईच्या मनात विरून गेलं
"मेरा भारत महान", हे मात्र चांगलच मनात ठसलं ..
-- सुभाष डिके
चान्गली वठली आहे ही कविता
चान्गली वठली आहे ही कविता जळजळीत पण कटू सत्य!
(बर, हे सुभाष डिके कोण?)
लिंब्या अरे सुभाष डिके म्हणजे
लिंब्या अरे सुभाष डिके म्हणजे आपला कुल ना? हल्ली गायबला आहे तो.
हे बघा.
हे बघा. http://www.maayboli.com/node/4159
ह्म्म मस्त म्हणवत नाहीये..
ह्म्म मस्त म्हणवत नाहीये.. जळजळीत वास्तव उत्कृष्टपणे मांडलंय..
अरे कान्द्या, आल रे लक्षात
अरे कान्द्या, आल रे लक्षात मी "खर" नाव विसरलो होतो "आयडीपुढे" हल्ली सवयच झालीये, आयड्याच जास्त लक्षात रहातात धन्यवाद
जळजळीत वास्तव...
जळजळीत वास्तव...