मी : निळू फुले - अंतिम भाग

Submitted by Admin-team on 21 August, 2009 - 03:04

मी : निळू फुले - पहिला भाग

याच काळात चित्रपट बघणं, विशेषत: बंगाली, इंग्रजी, आणि चित्रपटांबद्दल वाचणं याची चटक किंवा व्यसनच लागलं खरं म्हणजे. बंगाली चित्रपट आम्ही पाहिले अमीर शेखमुळे. कारण त्याच्या ऑफिसमध्ये एक बंगाली बाबू होता. तो इथे बंगाली फिल्म्स आणायचा. ती चटक तिथून लागली, अमीरमुळे. इंग्रजी सिनेमा तर आम्ही पूर्वीपासूनच पाहायचो.

तेव्हा मात्र मला सिनेमात काम करावं असं वाटत नव्हतं. मित्रमंडळींची हिराबागेत एक खोली होती. भाई वैद्य, शिवाजी जवळेकर, वसंतदादा, तात्या बोराटे, दत्त्ता माळवदकर, बोरकर, राम ताकवले, आम्ही सगळे त्या खोलीत जमायचो. त्या खोलीचं नाव होतं साधना खोली. तिथं सगळी मंडळी नोकरी किंवा घरची कामं सोडून जमा व्हायची. पत्ते खेळणं, कॅरम खेळणं. तेव्हा अशा गप्पा चालताना भाई एकदा म्हणाले, 'तुला काय वाटतं, काय करावं?' अगदी आवंढा आला घशाशी त्यावेळी आणि मी म्हणालो,' मला लेखक व्हायचंय'. अगदी भरून आल्यासारखं असं मी काहीतरी बोलत होतो. मात्र ६२-६३ साली एकदा उदय विहारमध्ये, त्यावेळी बहुतेक भाई शहरप्रमुख होते, तेव्हा विषय निघाला होता. आणि भाई म्हणाले की,'निळू हा एक फार मोठा आर्टिस्ट होणार आहे’' हे मला आजही आठवतंय. हा त्यांचा विश्वास कसा निर्माण झाला असेल?

एकतर कलापथकाची जबाबदारी मी सांभाळली होती. आणि ज्या पद्धतीने तिथे जी मुले येत होती त्या मुलांना मी, जे शिकवलं, ते ज्या पद्धतीनं शिकवलं, त्यातून माझ्याबद्दलचा विश्वास वाटला असेल. वाचन वगैरे एक वर्ग असायचा. चळवळ असल्यासारखं या लोकांना मी घेऊन जायचो.

आपण पाहिले ते आपल्या मित्रांनी, सहकार्‍यांनी बघावं, असं एक वाटायचं. अगदी पुस्तकांच्या बाबतसुद्धा मी थोडा सल्लागार झालो होतो. म्हणजे असं सांगायचं की , मर्ढेकरांच्या कविता कुठल्या, अमुक कुठलं चांगलं पुस्तक आहे, हे मला तेव्हा कळायला लागलं होतं.

खरंतर मी पहिल्यांदा सेवादलात फुल टाईम नोकरी वगैरेचा विचार केला. त्यानंतर मी असा विचार करत होतो की, कॅमेरा शिकावा. म्हणून माझा 'राजकमल'ला एक बागल म्हणून मित्र होता त्याला गाठलं. चित्रपट पाहत असल्यामुळे मला जाणवलं की, कॅमेरा हा फार महत्त्वाचा घटक आहे, तेव्हा कॅमेरा शिकावा. त्यामुळे मी त्याच्याकडून 'राजकमल'मध्ये वशिला लावत होतो. तो म्हणाला, 'ये ना, पण म्हातारा काही जास्त पैसे देणार नाही हं!' पण मग मुंबईत राहायचं कुठं? तेव्हा मी लिलाधर हेगडेंना एक पत्र लिहिलं. ते म्हणाले, 'चिंता करू नको, जरुर ये. माझ्याच घरात रहा. काही बिघडत नाही. एक भाकर मिळाली तर त्यातली अर्धी तू खाशील, अर्धी मी खाईन'.

एकदा मुंबईत आल्यावर मला एकदोन बोलावणी आली होती. म्हणजे जसं मान्यांच्याकडून आलं तसं राम गबाल्यांकडून आलं. अर्थात ते अर्धवट राहिलं. नंतर काय येऊन टपकलं ते मला माहीत नाही. पण मी तिथे एकदोन दिवस काम केलं आणि त्यांनी माझं कॉन्ट्रॅक्ट काहीतरी ५०० रूपयांचं केलं. तिथून काय मग? कुठल्याही नटाच्या वाटयाला असलेलं यश. ज्या दिवशी ती एक गाव बारा भानगडी फिल्म लागली... तो किस्सा मी लिहिलाय. फार मजेशीर किस्सा आहे. तेव्हा मी कथा अकलेच्या कांद्याची मध्ये काम करत होतो. गाडीमध्ये आमची जागा म्हणजे कुठं? कंडक्टरच्या बाजूला जी मधली जागा असायची तिथे आम्ही झोपायचो. लातूरला गेलो. उठलो अगदी सकाळी तर लातूर स्टेशनवरती १५-२० हजारांचा मॉब चहूबाजूला. शिट्ट्या, पोलीस, असा दंगा चालू होता. महेश मला म्हणाला, 'हे जाऊ दे'. कारण त्यावेळी तो प्रसिद्ध होता. विच्छा माझी पूरी करामध्ये काम केलेला. तो म्हणाला,'आपण नंतर जाऊ'. आम्ही तिथेच आपले तोंड बिंड धुतलं आणि तिथंच बसून राहिलो.
सगळे गेले. आम्ही दोघंच राहिलो. मॉब हलत नव्हता. शिट्ट्या आणि आवाज. बोंबाबोंब. तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर आला. एक पोलीस म्हणाला,'ते काय तिथे बसलेत ते'. तो म्हणाला,'ए चला उठा'. आम्हांला कळेना, आम्हांलाच का उठवतोय. दरवाजा उघडला त्यांनी, जमावापुढं उभं केलं. लोकांनी जो दंगा केला. 'आला आला आला'! काय एखाद्याची प्रसिद्धीची हवा काय असू शकते. १५-२० हजार लोक नुसते, पोलिसांनी मोठं कडं केलेलं, त्याच्यामध्ये आम्ही सगळे बावळट. इतकी बेकार परिस्थिती होती आमची. हातात त्या वळकटया. इन्स्पेक्टर 'हटो हटो' करीत होता. लॉजपर्यंत अशी मिरवणूक आमची निघाली. लॉजच्या मालकाने 'साहेबांसाठी स्पेशल दुसरी खोली' म्हणून मला स्पेशल खोलीत ठेवलं. त्यांना ओळखू येत नव्हता कोण साहेब. आख्खं हॉटेल, लॉज माणसांनी भरलेलं नुसतं. काय चमत्कार आहे असं वाटलं.

सिनेमा या माध्यमाशी निश्चितच खूप जवळीक निर्माण झाली होती. कॅमेरा वापरणं, समजून घेणं चालू होतं. शॉट नसला की इतर लोक पत्ते खेळत बसायचे. मी मात्र कॅमेर्‍यापाशी कायम बसलेलो असायचो.

यातून माध्यम चांगलं समजतं. इतर लोक ज्या स्वरूपात लाऊड अभिनय करायचे, त्या स्वरूपात अगदी पहिल्यापासून मी कधीच फार लाऊड अभिनय केला नाही. का कुणास ठाऊक.. फिल्म्स पाहिल्यामुळे असेल कदाचित. नेमकं काय केलं पाहिजे फिल्ममध्ये ते मला फार कळायचं. कुठल्या नटाचा इम्पॅक्ट जास्त पडतो, ही जाणीव नक्कीच फिल्म्स पाहून आली असावी. फारच मोठे नट मी पाहिले. त्या काळामध्ये हॉलीवुडमध्ये अफलातून नटांचा संच होता, लॉरेन्स ऑलिव्हिए, चार्ल्स लॉटन, चार्ल्स बोएर, रोनाल्ड गोल्डमन, कॅथरिन हेपबर्न, जेम्स डिन असली अफलातून मंडळी.

अ‍ॅक्टिंग काय आहे? एखादा माणूस एखादा लुक देतो, एखादा माणूस.... आणि हे जाणवलं की कुठल्याही रोलमध्ये माणूस सहज काम करू शकतो. आता मी जे १००-२०० चित्रपटांमध्ये काम केलं, त्यात शंभर चित्रपटांमध्ये फार मन लावून नाही केलं. पण घटना घडते आहे. एखादा सीन, ती घटना जोपर्यंत तुमच्या आत इथं भिडत नाही, ती भिडली ना मग तुमचं काम म्हणजे अ‍ॅक्टिंग करायची गरजच नाही. ते तुमच्यात आपोआप येतं. अशा स्वरूपाचं मन नटाचं तयार व्हायला हवं असं मला वाटतं. शॉटच्या अगोदर मी ते समजून घ्यायचो आणि मी एकदा घेतलं समजून की मला म्हणून काही करायला लागायचं नाही. ते माझ्याकडून आपोआपच होतंय असं वाटायचं. आणि जे जे काही करायचं ते फार व्यवस्थित असायचं. अर्थात त्याचाही अभ्यास असल्यामुळे ते फार लाऊड नसायचं. एवढं केलं तरी पुरेसं आहे असं कळायचं.

मला असं वाटतं की, असं जे रोलमध्ये घुसणं ज्याला म्हणतात ना, ते शिकलो. सर्वच पिक्चर्समध्ये असं मी करत नाही.

आता सामनामधला पुढारी आहे आणि मास्तर आहे. हा संघर्ष आतवर कुठेतरी खोल रुतून बसलेला होता. खरं तर आमचं पूर्वीपासूनचं असे बोलणं झाल्यामुळे. त्याचा बेस बेकेटचा होता. चर्चा चालायच्याच. तरी मला असं वाटायचं की, बेकेटवर बेस केलेल्या ज्या ज्या फिल्म्स निघाल्या, त्यांच्यामध्ये बेकेटच्या वाट्याला काहीच आलं नाही. तो राजा जो आहे, खुद्द बेकेटमध्ये काम केलेला हा जो माणूस आहे, राजाचं काम केलेला, त्याला त्या काळामध्ये पहिले श्रेय मिळालेलं आहे. याचं कारण काय, तर त्या कॅरेक्टरला खूप पदर आहेत. ते सगळे जसेच्या तसे मी उचलले आहेत. आणि या हिंदूरावाला लावले आहेत.

तो त्या स्वातंत्र्य सैनिकाचा जरी अपमान करत असला तरी त्याच्याविषयी त्याला ओढही आहे. त्याचं मोठेपण त्याला कळतंय. पण अशा प्रकारच्या मोठेपणातून एवढे साम्राज्य करण्याची ताकद असल्या माणसात नसते. असल्या माणसाने एकतर शरण यावं माझ्यासारखं त्या माणसाला आणि आपलं आयुष्य आता बरं काढावं, कारण तुमचा मोठेपणा आता या समाजाला माहीत नाही. तर इतके पदर आहेत त्या भूमिकेत की, समोरचा हा माणूस आपल्याला उध्वस्त करू शकतो हे माहीत असूनसुद्धा त्याच्याबद्दल एक आंतरिक सहानुभूती असते. त्याचा मोठेपणा त्याला अतिशय उत्तम पद्धतीने कळतो. या माणसाने चांगलं चांगलं खावं, चांगलं राहावं आणि माझ्यात सामावून जावं, म्हणजे तुमचे शेवटचे दिवस बरे जातील, अशा स्वरूपाचा विचार करणारा हा माणूस आहे. ते इतके पदर त्या हिंदूरावाच्या कॅरेक्टरला आहेत.

या सगळ्यामध्ये अर्थातच डायरेक्टरशी जमणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. मला डायरेक्टर्स सुदैवाने चांगले मिळाले. आता जब्बार म्हणा किंवा, राजदत्तजी, महेश भट म्हणा, अण्णांनीही आम्हांला कधी अ‍ॅक्टिंग शिकवली नाही.

सामान्य माणसाची प्रतिक्रिया तीव्र असायची. पत्रं खूप यायची. मी जिथे जायचो तिथं भयंकर गर्दी असायची. शेवटी कधीकधी इतर आर्टिस्टना खूप अवघडल्यासारखं व्हायचं. बाजूनं ट्रक जात असेल तर ट्रकवाले आतून ओरडायचे, 'निळू फुले’.

मुळात माझा अतिशय मवाळ स्वभाव. प्रकाशात न येण्याची माझी वृत्ती. पण कॅमेर्‍यापुढे आल्यावर मात्र वाघ बनायला होतं. याचं कारण त्यातली इन्व्हॉल्व्हमेंटच असते. तरी हे मात्र जाणवतं की, हे यश येतं आणि जातं. मी अशीही माणसं पाहिली की त्यांना रस्त्यात कुणी ओळखतही नाही. हा जो अलिप्तपणा येतो मनाला, ते अवतीभोवतीच्या मोठ्या माणसांचे, वाचनाचे संस्कार आहेत. सेवादलाच्या चळवळीचाही प्रभाव असावा. ज्या क्षेत्रामध्ये मी वावरतो त्या ठिकाणी जाहिरातबाजी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

पण काही माणसांना त्याचं काही विशेष नाही वाटत. अशी माणसंही आहेत. अनेकवेळा मलाही अवघडल्यासारखं झालं आहे की, आपल्याभोवती सतत गर्दी, आणि खूप माणसं आपल्यापैकी अशी की, ज्यांच्याभोवती माणसं नाहीत, हासुद्धा भांडणं लागायचा, संघर्ष सुरू होण्याचा मुद्दा आहे. एखादेवेळी
हॉटेलमध्ये, लॉजमध्ये, किंवा एखाद्या मेजवानीच्या प्रसंगी लोक तुमच्याच पुढे पुढे करून तुम्हाला अधिक सर्व्ह करायचा, तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करतात. अवतीभोवतीच्या तुमच्या आर्टीस्टमध्ये हे भांडणाचं मूळ होऊ शकतं. मी एक पथ्य पाळलंय की, कितीही मोठा माणूस असला आणि कितीही छोटा माणूस असला तरी त्यांच्याशी वागण्यामध्ये मी कधी भेदभाव करत नाही. आता काही मंडळी जी असतात ज्यांना वाचन किंवा फिल्ममधले अतिशय बारकावे कळतात. अशा मंडळींशी गप्पा मारण्याचा आनंद फार मोलाचा असतो. अशी मंडळी दौर्‍यामध्ये येतात आणि ती तुम्हाला तुमच्यातलं काय काय योग्य आहे, मोठं आहे, खरोखरच तुमच्यात कस आहे की नाही, अशा स्वरुपात समजून सांगतात. त्यांच्याशी बैठक होऊ शकते चांगली.

मला अशा लोकांशी गप्पा मारायला निश्चित आवडतं. विशेषतः ग्रेसशी बोलणं. मी विचार करायला लागतो की, यांच्या कविता जर आपल्याला समजायच्या असतील तर या माणसाशी बोललं पाहिजे. या माणसांचे, जे भावबंध आहेत, याचं जे आयुष्य आहे, किंवा तो ज्या पद्धतीनं विचार करतो किंवा जी प्रतिकं वापरतो याचा त्याने जीवनात जे काही भोगलंय त्याच्याशी अतिशय निकटचा संबंध आहे. तेव्हा अतिशय दुर्बोध असणारी अशी त्यांची कविता त्यांच्याशी बोलल्यानंतर सोपी झाली. त्यांनी मला मितवा नावाचं पुस्तक दिलं. ते वाचलं आणि मला असं वाटायला लागलं की, अवघड नाहीये हे. सोपं आहे. तर एखादी कविता, एखादी कलाकृती समजून घेण्यामध्ये ज्या अडचणी असतात, त्या निघून जाणं आणि ती तुम्हांला सोपं वाटणं, हासुद्धा एक प्रवास आहे. अशा माणसांशी बोलताना निश्चितच एक निराळाच आनंद वाटतो.

हा आनंद मी माझ्या आयुष्यात फार वेळा घेऊ शकत नाही, याबद्दल खूप खंत वाटते. आपण कशाला एवढे मोठे झालो, असं वाटतं.

मला माझ्या पद्धतीने आयुष्य जगता येत नाही. नाहीतर खरं मी पुस्तकात रमणारा माणूस आहे. माझ्या आवडीची पुस्तकं असली आणि बाकी काहीही नसलं, अगदी जेवणसुद्धा नसलं तरी मला विशेष वाटणार नाही. चहा, पुस्तकं, सिगरेट एवढं असलं ना, की मी अख्खा दिवस त्याच्यावर राहू शकतो. आता एखादा दिवस मला असा मिळतो. विशेषतः मी उठतो लवकर, मग चांगली पुस्तकं घेऊन बसतो आणि मग ते साधारण दोन-तीन तास उजाडेपर्यंत मस्त जातात. आणि संबंध दिवस मग चांगला जातो. म्हणजे मला तेवढा दिवस चांगला वाटण्याइतकं ते पुरं होतं. तुमच्यातील क्रिएटिव्ह शक्तींना कुठेतरी अगदी 'राख झाडण्यासारखं' होणं म्हणतात ना, तसं होतं.

चित्रपटांमध्ये मात्र माणसं सुरुवातीला 'आपण काहीतरी नवं शिकू', या ज्या उमेदीनं येतात, ती उमेद संपते आणि माणसं हळूहळू कमर्शियल बनत जातात. मी स्वत:सुध्दा. अगदी कुणीही तिथं राहिला तरी कमर्शियल बनतो. त्यामुळे मी कितीही नको असलेल्या डायरेक्टर्सबरोबर दहा-दहा पिक्चर्स केलेली आहेत. मला माहीत आहे याच्यात काही नाहीये. दिवस वाया जाणार आहे. बरं त्यातून काही पैसेही नाही मिळणार. तरी मी त्यांची पिक्चर्स पूर्ण केली. आणि ते जे सगळं मी दाखवलेलं असतं ना, मला असं वाटतं की, ते ड्रिंकमध्ये उफाळून येतं. मग मी आक्रमक होतो. मला त्याचा अतिशय पश्चात्ताप होतो की, हे चूक केलं आपण. पण ते होतं खरं त्या काळात आणि आता ते कमी झालं. त्याचं कारण असं की, आता मी जरा लोकांना सांगायला लागलोय की मला नाही आवडत हे. नको वाटतं हे, मला नाही करायचं हे. अगदी कितीही मोठया ऑपॉर्च्युनिटिज आल्या तरी मी त्या टाळल्या.

आता मला जे जे आवडेल ते मी करीन. अट एवढीच की, मला माझ्या पद्ध्तीनी जगू द्या. गेल्या दोन वर्षामध्ये हमाल दे धमाल जर सोडलं, तर फार असा मी कुठे अडकलेलो नाही.

या सगळ्या भानगडींमध्ये पैसेही बुडले. इतरही मनस्ताप. पण तसं खरं सांगायचं तर अपेक्षेपेक्षा पैसे मला जास्त मिळाले. एवढी माझी कधीच अपेक्षा नव्हती. बुडालेही म्हणा खूप. ३०-३५ टक्के पैसे माझी बुडालेले आहेत. पण मला नाटकांसिनेमांतून इतके मिळत होते की, मला त्या बुडालेल्या पैशाविषयी काही वाटले नाही. पाच हजार बुडाले तर मला दुसर्‍या दिवशी दहा हजार मिळत होते. कुठेही २-४ तास काम केलं की मला लोक पैसे आणून द्यायचे.

पण मी एक ठरवून ठेवलं होतं की, आपल्याला मिळालेल्या पैशापैकी एवढे पैसे मागे गेले पाहिजेत. मुलाबाळांसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे असा व्यवहारी विचार मी केला.

इतके पैसे मिळायला लागले तर चांगले आणि वाईट परिणाम होऊ शकतात. पण माझं तसं झालं नाही. मला उलट ते फार भयंकर झालं. मला असं वाटू लागलं की, हे अतीच मिळायला लागलेत. अतिशय भान ठेवून असायचो.

पण जास्त पैसे मिळत गेले म्हणून स्पॉटवर नखरे कधीच केले नाहीत. आम्ही मित्रमंडळींबरोबर खायला गेलो की आवडीचंच खातो. त्याठिकाणी कोळंबी आहे, मच्छी आहे. यातले सगळे प्रकार आहेत अशाच ठिकाणी एरवी खाणार. पण स्पॉटवर नखरे नाहीत. असं आम्ही कधीच केलं नाही.

आणि असा हा अनुभव मला साऊथमध्ये सगळीकडे मिळाला. तिथल्या लोकांचं नि आपलं, का कुणास ठाऊक, बरंच चांगलं आहे. कारण त्यांच्यातले इव्हन आर्टिस्ट डायरेक्टर्स हे मुंबईमधले आर्टिस्ट ज्या स्वरूपात राहतात, तसे नाहीत. ती सगळी मंडळी, असं वाटतं की, ही मराठीच मंडळी असावीत. त्यांचं राहणं, वागणं, बोलणं वगैरे तक्रारी नाहीत. काम करायचं म्हणजे कसून करायचं आणि कसून खर्च करायचा. काम चोख आणि व्यवहार चोख.

या प्रादेशिक चित्रपटांची अवस्था चांगली आहे, ती याचमुळे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की, त्यांच्यात स्पर्धा नाही. तामिळमध्ये फिल्म केली तर काढताना ती तीन भाषांमध्ये डब करतात. तेलगू, तामिळ आणि मल्याळम. तिथे त्यांचं बजेट आपल्या हिंदी चित्रपटांसारखंच खूप असतं आणि त्यातले कलाकार, डायरेक्टर किंवा टेक्नीशियन्स यांना जो पैसा मिळतो, तो आपल्या हिंदीवाल्यांइतकाच मिळतो. त्यांच्या धंद्याला एक शिस्त आहे. पहिली गोष्ट साऊथमध्ये काय असेल, तर व्यवहार अतिशय स्वच्छ. काय असेल ते असो. दुसरी गोष्ट, त्यांच्यात्यांच्यात मारामार्‍या असतील, पण एखाद्या निर्मात्यानं बुडवलं हा प्रकार नसतो. अगदी अपवद. मला वाटतं की, उत्तर प्रदेशापेक्षा ही माणसं अजून तरी जागरूक आहेत. व्यवहारात चोखही आहेत, सज्जनपणाचा अंशही जास्त आहे.

प्रादेशिकतेचा अभिमानही आहे. बाकीचं काय असेल ते आपल्याला नाही सांगता येणार, पण अजून तिथं मूल्यं मानली जातात. अनुभवच असा आहे. कुणालाही कधी फारसं फसवलं जात नाही. आणि योग्य श्रमाचा मोबदला दिला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे, असं मानणारे लोक तिथे आहेत.

अशा सगळ्या चांगल्यावाईट डायरेक्टर्सबरोबर काम केलं. सगळे बरेवाईट अनुभव घेतले. पण नवीन लोकांमध्ये हा स्पार्क कितपत आहे, सांगता येत नाही. तसं आपल्याकडे मराठीत अजून कुणीच नाही. म्हणजे सचिनसारखा माणूस कसा आहे की, उत्तम कमर्शियल फिल्म कशी करायची याची त्याला उत्तम जाण आहे. वर्कआउट ही चांगलं करतो. पण आता पुन्हा तेच तेच होतं. पुन्हा त्या हिंदीवाल्यांचीच नक्कल करतात. याच्यापेक्षा निराळी उडी ज्यादिवशी घेईल तो, त्यादिवशी सगळा कस लागेल त्याचा. आजचं काही सांगता येत नाही.

नवीन आर्टिस्ट मात्र काही काही चांगले आहेत. या सिरीयल्समधून काही फारच चांगले आर्टिस्ट्स आहेत, यायला लागलेत. मराठीमध्ये चंदू पारखी मला वाटते की चांगला आहे. त्याला जर विविध भूमिका मिळाल्या तर चांगलं करेल तो.

या सगळ्या नवीन लोकांकडे, नव्या घडामोडींकडे पाहिलं की वाटतं, काही गोष्टी तर आपल्या हातून राहूनच गेल्या. आज वाटतं की, उत्तम फिल्म्स लिहिण्याचं काम राहून गेलं माझ्या हातून. मी छान स्क्रीप्ट रायटिंग करू शकलो असतो. अति उत्तम. असा मी प्रयत्न जो काय थोडा फार केला होता. तेंडुलकरानी सांगितलं की, फारच चांगली आहे. हे तू करच, चांगलं आहे. मला असं वाटतं की ते राहून गेलं. फिल्मचं उत्तम स्क्रीप्ट लिहिणं म्हणजे काय हेसुद्धा कळायला हवं. कॅमेर्‍याशी चांगला संबंध आल्यामुळे ते करू शकीन.

मला चांगलं संगीतही आवडतं. त्यातले फार बारकावे, तपशील माहीत नाहीत पण ते भावतं. भयंकर गोड लागतं. शास्त्रीय असलं तरी खूप भावतं. आज तरी मला असं वाटते की, मला त्यातले हे राग वगैरे नाही सांगता येणार. पण चांगल्यावाईटाची कल्पना येऊ शकते.

याशिवाय काम करायला आनंद मिळतो ते काही ठरावीक लोकांबरोबर. मस्त वाटतं. त्यातला एक अशोक. उत्तम मराठी स्टार. दुर्दैवाचा भाग एवढाच की, त्याला कामं मिळत नाहीत तशी. त्याच्यावरही एक शिक्का बसलाय. आणि तो असा बसलाय विचित्र की, आता ते त्यालाच कठीण झालय बदलणं. उत्तम आर्टिस्ट. हिरो ओरिएन्टेड कामापेक्षा कॅरेक्टर रोल्स तो फार उत्तम करू शकतो. मग मराठी, हिंदीतल्या आवडत्या माणसात नसीर सर्वात खूप ताकद असलेला माणूस. ओम पुरी, कमल हसन, अगदी नसीरच्या जोडीनं घ्यायला हरकत नाही. त्यांच्यामध्ये विशेष म्हणजे कमर्शियल फिल्ममधलं सगळं आणि पुन्हा एखाद्या प्रायोगिक फिल्म्समधलं सगळं हे दोन्ही त्यांच्याकडे आहे. अनुपम आहे. अर्थात त्याचा हे लोक वापर करत नाहीत, पण तो ताकदीचा माणूस आहे. अमरीश पुरीसुद्धा तसा ताकदीचा माणूस आहे.

नट्यांमध्ये खरं स्मिता, शबाना किंवा दीप्ती यांच्या आसपास जाणारं कोणी दिसत नाही.

जुन्या जमान्यातले बलराज, मोतीलालजी, बाबुराव पेंढारकर, अन्वर हुसेन आणि याकूब, जी काही मी याकूबची कामं पाहिली त्यात इतक्या विविध प्रकारच्या भूमिका करणारा माणूस नाही पाहिला. फारच अप्रतिम. तसंच ललिताबाई, मीनाकुमारी, वहिदा, दुर्गा खोटे, शांताबाई आपटे, गौरी नावाची जी आहे तुकाराममधली, तीही.

रंगमंचावर दत्ताराम, मामा पेंडसे ही दोन मंडळी. मामांचं सवाई माधवराव वगैरे मधलं काम, अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचं बाळ कोल्हटकरांचे नाटक होतं दुरितांचे तिमिर जावो. त्यातलं मामांचं काम, एखादी अतिशय अतार्किक घटनांनी भरलेलं नाटक तार्किक वाटावं असं. एखादा नट असं करू शकतो, ते मामांनी पटवून दिलं. मामासाहेबांनी माझ्यावर खूप प्रभाव टाकला. सतीश दुभाषी, प्रभाकर पणशीकर, मामा आणि दत्तारामांची जात कुठेच नाही मिळाली. रंगमंचाबाहेरचे दत्ताराम आणि रंगमंचावरचे दत्ताराम दोन भिन्न व्यक्ती वाटाव्यात. विश्वास वाटू नये की हे ते आहेत म्हणून.

त्यांचा एक किस्सा फार चांगला आहे. रायगडाला जाग येतेला गोवा हिंदू चं कर्ज होतं आणि त्यावेळेला ते भयंकर जोरात चाललं होते. त्यांच्या जोडीला काशिनाथ काम करायचा आणि काशिनाथ काहीतरी पैसे वाढवून मागत होता. तर गोवा हिंदूवाल्यांनी दिले ते. दत्तारामजींना कळायला नको म्हणून त्यांनाही एक पाकीट वाढवून दिलं. त्यांनी आपलं पाकीट खिशात घातलं, पण त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या खिशात पन्नास-पंच्याहत्तर रूपये जास्त आहेत. ते तसे पैसे घेऊन आले आणि म्हणाले की, यात जास्त पैसे आहेत मला याची गरज नाही. हे मला नको. दुसर्‍या कुणाला तरी द्या.

ते तर खरं काही शिकले नव्हते. पण ही अभिनयातली ताकद मला वाटतं अनुभवातून येते. जीवन जे भोगलंय त्यातून येते. आणि जो आपण धंदा करतो त्याचा तो श्वास आहे. त्याच्याशी संलग्न ज्या स्वरूपाची वागणूक करायला हवी याच्याबद्दल जी नैतिक बंधनं असतात तसा तो पिंडच बनलेला माणूस असतो त्याला असं वाटतं. अरे ह्या इमारतीची ही भिंत ढासळून चालली बरं का. मला त्यांनी जास्त पैसे दिले आणि ते स्वीकारले तर असं असं होणार आहे. असं नाही होऊ द्यायचं आपण. आपण ज्या श्रद्धा जपलेल्या आहेत त्यामुळे आपणच उध्वस्त होऊ या भीतीने घेणार नाही. माझा दृष्टीकोन बदलण्याचा संभव आहे. मला नको ते. मी ते ऐकलं नि अतिशय भावून गेलं. काय बुवा माणूस असेल. मी त्यावेळेला असतो तर नसतं असं केलं. कारण नंत नंतर मीसुद्धा म्हणायला लागलो की, मला वाढवून द्यायला पाहिजे. माझ्याबरोबरचे इतर लोक वाढवून घ्यायचे. त्यांची लायकी नसतानासुद्धा घ्यायचे. खूप त्रासदायक वाटायला लागतं. माझी किंमत मला तुम्ही द्यायलाच हवी. खरं म्हणजे ती मी केव्हाही मागितली असती तरी मला त्यांनी ती दिली असती. पण मला ते उशीरा कळायला लागलं. आणि त्यांनीही ती स्वतःहून वाढवून दिली नाही.

त्याबद्दल खंत नंतर वाटतच राहिली. आयुष्यात कळत नकळत चुका घडण्याचे प्रसंग अनेक आहेत. मी दुखावलंय माणसांना. ते माझ्या मनात मात्र खूप घर करून आहे. पण माझ्यात एक चांगली गोष्ट, मला वाटतं की, मी कधी चुकलो तर त्या माणसाकडे डायरेक्ट जाऊन क्षमा मागायची हिंमत माझ्यामध्ये आहे. मी रात्री भांडलो ना, तर सकाळी जाऊन मी क्षमा मागेन. 'सॉरी' म्हणेन आणि मी संबंध नाही मोडणार. संबंध मी कायम ठेवतो.

एकंदर आयुष्याबद्दल असं वाटतं की, संसार, लग्न या प्रवृत्तीचे आपण नाही. हे माझ्या फार उशिरा लक्षात आलं. आपण बिल्कुलच त्या लायकीचे नाही, घर करुन राहण्याच्या. आपण फकीर आहोत. आणि आपण जर सिनेमाची, सगळी तंत्रं अवगत केली असती तर आपण बर्‍याचश्या चांगल्या गोष्टी करू शकलो असतो, याची मला नेहमीच खंत वाटते. मला वाटते की, मी उत्तम स्क्रीप्ट रायटर झालो असतो. मी फारच अफलातून गोष्ट करू शकतो, पण भिडस्त स्वभावामुळे ते करू शकलो नाही.

लग्न केलं आणि संसार मांडला याचं दु:ख नाही. पण त्यामुळे बंधनं आली. आपण या लायकीचे नाही, ही गोष्ट मला उशीरा कळली. लोकांनाही त्याचा त्रास होतो. साधारण संसारी माणूस ज्या पद्धतीनं वागतो, संसार करतो, आदर्श संसाराच्या त्यांच्या ज्या कल्पना असतात ना त्यात आपण बसूच शकत नाही. कारण एखादा चित्रपट पाहण्यासाठी मी सरळ चक्क उठून मुंबईला जायचो किंवा एखाद्या नाटकासाठी कुठेही जायचो, किंवा एखादी मैफिल ऐकायची आहे किंवा एखादा डान्स पहायचा, त्यासाठी काहीही करायचो. एखादे पुस्तक हातात घेतलं माझ्या कल्पनेप्रमाणे मी कितीही मोठं पुस्तक असलं, हजार पानांचं, तरी ते मी एका बैठकीला संपवलेलं आहे. म्हणजे ही जी तार लागणं म्हणतात, ते तार लागणं माझं तुटलं.
NiluPhule3.jpg

दुसरं म्हणजे स्त्रियांबद्दलचं आकर्षण. मी स्त्रीचा असा स्वतंत्रपणे विचार केलेला नाही. मी संसारालासुध्दा लायक नाही. तसंही मला कळतं की, ती शरीराची किंवा आपण जे काही दिवसभर केले ते कुठेतरी बोलून दाखवण्याची जागा आणि मग शारीरिक संबंध, हे यानंतर मग कुठेही अडचणीचं होता कामा नये असं. त्या वेळी फार कटकटीचं होतं. मला एखादी स्त्री माझ्यात इन्व्हॉल्व्ह झाली आणि ती मला व्यापून टाकायला लागली की मला नाही आवडत. तिनं कब्जा नाही करता कामा. तिने वेसण नाही घालता कामा आणि तिनं सातत्यानं माझ्या जवळ असणं, हेही मला नाही आवडत.

माझे जे मित्रमैत्रिणी आहेत, ते स्वतंत्र आहेत आणि ते तुम्हालाही तसेच स्वतंत्र ठेवू इच्छितात. त्यांनाही ते आवडत नाही की, तू व्यापून टाकणार माझं आयुष्य आणि तुझ्यावर मी व्यापून राहणार. अशी स्त्री-मैत्री असू शकते. असे काही मित्र आहेत ज्यांची नावे घेणे बरे नाही, पण आहेत. ते एकमेकांना कुठेही जड होत नाहीत. एकमेकांना कुठेही ऑकवर्ड करीत नाहीत. ते एकत्र येतात, एकत्र राहतात आणि निघून जातात, ते कळवतसुध्दा नाहीत. पुन्हा ते अधिक चांगल्या पध्दतीने एकत्र येऊ शकतात. बिलकुल एकमेकांना तुमच्या व्यक्तिगत, खाजगी जीवनाबद्दल कसलाही संबंध नाही, आकस नाही, नुसता सहवास.

ही गोष्ट खरी आहे की, आज आता आयुष्याचा बराच काळ उलटून गेला आहे. स्वत:चा प्रवास घडत असतानाच सामाजिक कार्यातही माझ्या परीनं सहभागी झालो. सेवादलाच्या आणि समाजवादी विचारांचा सतत पाठपुरावा केला. ह्या सार्‍याबद्दल, आजकालच्या परिस्थितीबद्दल मी आज काही निश्चित आग्रहानं, ठाम भूमिकेतून बोलू शकतो. आजचा सामाजिक जीवनाचा चेहरामोहरा संपूर्ण बदलून गेला आहे. जीवनाला अतिशय वेग आलेला आहे. त्यामध्ये आपण मानलेली मूल्यं, आपण कसं जगायचं या समाजामध्ये, परिसरामध्ये, त्याच्याबद्दल जे काही आडाखे केले होते ते सगळे साफ धुळीला मिळाले आहेत. अशावेळी कुठलीही व्यक्ती म्हणून एक तर संघर्ष तर करतेच, त्या त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन जगण्याचा प्रयत्न करते.

एक तर उघडच आहे की, या स्वरूपाची जी वैज्ञानिक प्रगती झाली आहे तिचा मोठा फायदा असा झालाय की, कितीतरी गोष्टी, अवकाशातल्या किंवा सागरासारख्या, आतापर्यंत आपल्याला माहीत नसलेल्या, आणि निसर्गातले अनेकविध चमत्कार आता माहीत झाले आहेत. या सगळया गोष्टींची ओळख किंवा ते आकलन होण्याची एक दिशा सापडली आहे.

निसर्गाची सगळी रहस्यं आपल्याला कळली आहेत असं नाही पण ती शोधून काढण्यासाठी शास्त्र, विज्ञान सर्वात महत्त्वाचे ठरते आहे, ही गोष्ट आज आपल्या लक्षात यायला लागली आहे. उदाहरणार्थ, देवाची कल्पना ही मनुष्यनिर्मित कल्पना आहे असं मला वाटतं. हे जे उत्क्रांत झालेलं जग आहे त्याच्यामागे काही एक विशिष्ट शक्ती आहे, असं काही सापडत नाही. संशोधनातून विश्वाची रहस्ये जसजशी उलगडत जातील तसतशी अंधश्रध्दा आणि भोंदूपणाही कमी होत जाईल.

अर्थात ते जर तुमच्या तरूणपणात आलं असतं तर ते तुम्ही अधिक चांगल्या रीतीने पार पाडलं असतं. सामावून घेऊ शकला असता. साठी, पन्नाशीच्या वयामध्ये सारं आकलन करून घेण्याची क्षमता आणि त्यांच्याबरोबर चालण्याची क्षमता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुध्दा राहत नाही. कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा किती अतिरेक व्हावा, यंत्रं शापवत वाटावीत, विशेषतः ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि माणसाच्या दोन हातांना काम कसं द्यायचं हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना ही प्रगती शापवत ठरते. तर असाही विचार केला पाहिजे की रोजचं जीवन या गतीत सापडल्यामुळे ते भोवर्‍यात सापडल्यासारखं आहे, इथं तुम्ही मानलेली मूल्यं ढासळली आहेत. मूल्यांचे स्वरूप काय तर तुम्ही आता ज्याला भ्रष्टाचार म्हणता ती आता दलाली आहे. आपली, विशेषत: हिंदू माणसाची, विचारांची परंपरा ही अतिशय कुंठीत अशी विचार परंपरा आहे. त्यामुळे या वेगवान जगात आधी आपण मोडकळीला येतो.

या वैज्ञानिक युगामध्ये एक मात्र घडलेलं आहे की, सर्व लोकांच्या, तरूण मंडळींच्या, एवढंच नव्हे तर आपल्या अवतीभवतीच्या सगळ्याच लोकांच्या एकमेकांबद्दलच्या ज्या इमेज होत्या त्या तुटून पडल्या आहेत, निखळून पडल्या आहेत. आताच्या या गतिमान जगामध्ये ही सगळी मूल्यं निघून जात आहेत. पण मला उलट विशेष असं वाटतं की यामुळे एक निखळ प्रेम किंवा निखळ मैत्री वाढायची शक्यता आहे.

आता आम्ही जुन्या पिढीतले आहोत म्हणून हा वेग अंगावर येतो. नवी पिढी या वेगात सामावून जाईल. पण भीती एवढीच की यंत्रवत होतील माणसं.

आज आपल्याकडे असं दिसून येतं की, समाजामधला एक वर्ग अतिशय सधन आहे आणि मोठा वर्ग म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर जवळजवळ ५०% लोक अतिशय वाईट अवस्थेत आहेत. कुठल्याही देशाच्या दृष्टीनं राज्यपातळीवर हे लज्जास्पद आहे. पन्नास टक्के माणसं धर्मामुळं, परंपरेमुळं आज सहनशील आहेत. पण राज्यकर्त्यांची पुढची पिढी तुमच्या खिशात हात घालून, पैसे काढून तुम्हांला हाकलून देतील अशी व्यवस्था येण्यापूर्वीच त्यावर काहीतरी इलाज करायला हवा. कारण ही व्यवस्था चहूबाजूंनी आपल्यावर लादली जात आहे. वेगानं अंगावर येणारी ही समाजव्यवस्था फार भयानक आहे. ती बदलण्याच्या ज्या चळवळी आज लढवल्या जाताहेत त्यातला मी एक साथी.

ह्या आयुष्याचा रोखठोक हिशोब मांडावा असं काही वाटत नाही. खूप काही कमावलं आणि गमावलंही. मी जसा आहे तसा तुमच्या पुढं आहे.
*********************************************
मी : निळू फुले!

मुलाखत व शब्दांकन : श्रीराम रानडे
पूर्वप्रसिद्धी : किस्त्रिम नोव्हेंबर १९८९
छायाचित्रं: दिलिप कुलकर्णी (मूळ लेखातून साभार)

*********************************************
टंकलेखन सहाय्यः farend, hems, nakul, sachin_b, sashal, sayonara, vpuranik
शुद्धलेखन चिकित्सा: chinoox

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मी जसा आहे तसा तुमच्या पुढं आहे.
शब्दा शब्दातून ते जाणवतंय! खूप आवडलं. आपला आवडता कलाकार 'माणूस' म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायची का कुणास ठाउक पण नेहमीच इच्छा असते.
२० वर्षांपूर्वीच्या कथनाला आमच्यासमोर आणल्याबद्दल आरती आणि तिला हे लिखाण मायबोलीवर आणायला मदत करणार्‍यांचे मनःपूर्वक आभार.

वा, रोखठोक, तरीही प्रांजळ मुलाखत आहे एकदम!
मला एखादी स्त्री माझ्यात इन्व्हॉल्व्ह झाली आणि ती मला व्यापून टाकायला लागली की मला नाही आवडत. तिनं कब्जा नाही करता कामा. तिने वेसण नाही घालता कामा आणि तिनं सातत्यानं माझ्या जवळ असणं, हेही मला नाही आवडत. >>> इथे 'बाइंडर' डोकावतोय का Happy
आमच्या घरापासून जवळच होतं निळू फुलेंचं घर. .त्यांनी म्हटलंय मी संसारी वृत्तीचा नाही, तरी मला आमच्या लहानपणीचं त्याच्या विरुद्ध चित्र आठवतंय ! अभिनव प्राथमिक शाळेमधलं.. ते त्यांच्या मुलीला आणायला आलेत .. गाडीतून उतरून उभे , अन मुलगी बाहेर आली की मोठ्यांदा हाक मारतात 'गार्गी , ए गार्गी !!' पब्लिक बघतंय, आपण मोठे नट आहोत वगैरे काही आविर्भाव नाही.
....एकदम साधे अन कुटुंबवत्सल वाटतायत की नाही ?

सुरेख मुलाखत. २० वर्षापूर्वीची असुनही संदर्भ याच काळातले वाटतात आणि बरेचसे मुद्दे अजुनही लागु होतात, अगदी शेवटच्या उतार्‍यात समाजाबद्दल जे म्हटलय ते तर प्रकर्षाने खरय असे जाणवते.

वा... फारच मस्त वाटल निळूभाऊंची मुलाखत वाचून. धन्यवाद आरती आणि इतर !

अरे. हे आधी कसं वाचलं नाही याची हळहळ वाटली.
किती वेगळ्या पातळीवर ही व्यक्ति विचार करायची, हे वाचून थक्क झाले.

हे मायबोलीवर उपलब्ध करुन देणा-या सर्वांचे आभार.

आधी वाचले होत....पण आज पुन्हा वाचले...खरच एक माणुस म्हणुन खुप काही शिकण्यासारखे आहे..निळु भाउंकडुन...

मराठी नाट्य परिषदेनं निळूभाऊंवर एक पुस्तक प्रकाशित केलंय. बहुतेक मागच्याच आठवड्यात त्याचा प्रकाशनसोहळा झाला. मी वाचलं नाहीये असून, पण माझ्या मते नक्कीच वाचनीय असेल आणि संग्रही ठेवावं असं ही. माझ्या बाबाचा निळूभाऊंवर लिहिलेला एक दीर्घ लेख आहे त्यात. सेवादलापासून बाबा त्यांच्याबरोबर आहेत. त्या दोघांचं नातं, मैत्री मी जी पाहिली आहे लहानपणापासून, मला असं आतून feeling आहे की लेख छान उतरला असणार कागदावर !
पुढच्या भारतभेटीत मी नक्की घेणार हे पुस्तक. कोणाला मिळालं तर जरुर वाचा आणि कसं वाटलं ते पण कळवा. ह्या पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता आहे Happy