आर्मेनियन चर्च, सिंगापूर

Submitted by संकल्प द्रविड on 24 November, 2008 - 11:52

सिंगापुरातला सिटी हॉल परिसर वसाहतकालीन (आणि वसाहतपूर्व काळातल्याही) इतिहासाच्या खुणा सांगणार्‍या इमारती, स्मृतिस्तंभ, कबरी/समाध्या, चर्च-कथीड्रलं, पूल, फरसबंद रस्त्यांनी भरलेला आहे. सिटी हॉल एमारटी (मास रॅपिड ट्रान्सपोर्ट - एम आर टी - सिंगापुरातली मेट्रो रेल्वे) स्टेशनातून बाहेर पडणार्‍या सगळ्या एक्झिटांच्या स्थलनिर्देशक पाट्या एखाद्या संग्रहालयातल्या दालनांची जंत्री लिहिलेल्या बोर्डांप्रमाणे भासतात. सिंगापुरात आल्यावर काही दिवसांतच डाउनटाऊन परिसर पाहायला माझ्या सिंगापूरस्थ मित्रासोबत पहिल्यांदा इथे आलो तेव्हाची आठवण - भटकायला मध्यवर्ती म्हणून आम्ही सिटी हॉल एमारटी स्टेशनावर उतरलो. सिटी हॉलातून सेंट अँड्र्यूज कथीड्रलाकडे उघडणार्‍या एक्झिटाची पाटी वाचताना 'आर्मेनियन चर्च' या नावापाशी मी अडखळलो. कास्पियन समुद्रापल्याडच्या त्या पिटुकल्या देशाचा सिंगापुराशी संबंध काय, या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळत राहिला. पुढे पुस्तकांतून, संग्रहालयांतून, इंटरनेटावरून सिंगापुराचा इतिहास जाणून घेताना या प्रश्नाचं उत्तर उलगडत गेलं.

इराण आणि तुर्कस्तानामधल्या भूभागात, कॉकेशसाच्या दक्षिणांगावर वसलेल्या आर्मेनियातून बरेच व्यापारी इराण, भारतीय उपखंडात मध्ययुगापासून व्यापारउदमासाठी येत. मराठेशाहीच्या समांतर कालखंडात काही आर्मेनियन व्यापारी मलबारातही चांगल्यापैकी जम बसवून होते. त्याकाळी मलबारातून, तमिळनाडूतून आणि बंगालातून आग्नेय आशियाई बंदरांशी मसाल्याचा, कापडाचा मोठा व्यापार चाले. बहुधा या दुव्यामार्फतच आर्मेनियन व्यापारी आग्नेय आशियात जावा, पेनांग, मलाक्का वगैरे परिसरात जाऊन स्थिरावले. इ.स. अठराशे विसाच्या दशकात सिंगापुरात ब्रिटिश वसाहतीकरणानंतर व्यापार वाढू लागला. तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीखेरीज आर्मेनियन व्यापार्‍यांच्या खासगी कंपन्या सिंगापुराच्या व्यापारात लक्षणीय वाटा राखून होत्या. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या 'स्ट्रेट्स टाइम्स' या सिंगापूर/मलाय द्वीपकल्पातल्या नामवंत वृतपत्राच्या संस्थापकांपैकी एक - काचिक मोझेस - हा आर्मेनियन होता. 'रॅफल्स हॉटेल' या सिंगापुरातल्या खानदानी बडेजाव मिरवणार्‍या उंची हॉटेलाचं आणि पेनांग, जावा, रंगुनातल्या अनेक हॉटेलांच्या जाळ्याचं मालक असलेलं सार्कीस घराणंही आर्मेनियनच. एकंदरीत सिंगापूर, मलायातला आर्मेनियन समाज अल्पसंख्य (इ.स. १९३१ च्या सिंगापुराच्या जनगणनेनुसार केवळ ८१!!) असला तरीही धनाढ्य होता. इ.स. १८३३ साली सिटी हॉलापाठीमागे असलेली एक जागा वसाहती सरकाराकडून आर्मेनियन समाजाला चर्च बांधण्याकरता मिळाली. बांधकामाच्या खर्चातली निम्मी रक्कम मूठभर असलेल्या सिंगापूरकर आर्मेनियनांनी उभारली, तर उरलेली भारतातल्या, मलायातल्या त्यांच्या जमातभाईंनी, इतर युरोपीय व्यापार्‍यांनी देऊ केली. इ.स. १८३५ साली बांधून पूर्ण झालेलं हे चर्च सिंगापुरातलं सर्वात जुनं चर्च आहे.

आर्मेनियन अपॉस्टलिक चर्चाचा प्रणेता संत ग्रिगोर याला समर्पिलेल्या या चर्चाचं स्थापत्य आर्मेनियातल्या संत ग्रिगोराच्या मूळ चर्चावरून बेतलेलं आहे. आवारात एक दुमजली बंगलीवजा पार्सनेज आणि आर्मेनियनांच्या समाध्या असलेली स्मृतिवाटिका आहे. नुकताच एका वीकेंडाला तिकडे गेलो होतो. आवारातल्या पार्सनेजाच्या व्हरांड्यात बसून रेखलेलं हे सिंगापुराचं आर्मेनियन चर्चः

माध्यमः पेन

20081122_Armenian_Church.jpg

गुलमोहर: 

Amazing!! Happy

अफलातून.. पण मला डावीकडचे खांब वाकडे दिसताहेत.. ते तसेच आहेत का?

फार सही!
मलाही चित्र थोडं तिरकं वाटत आहे..

हा तिरका प्रतिसाद नसून प्रामाणिक मत आहे .. Happy

छान ! गवत आणि त्यावर पडलेली सावली सहीच !

    ***
    अर्धा रिकामा की अर्धा भरलेला
    वाद कशाला घालायचा ?!
    पूर्ण भरलेला मागवायचा.

    >>हा तिरका प्रतिसाद नसून प्रामाणिक मत आहे ..
    तुमचे प्रामाणिक अभिप्राय आवडले असा अभिप्राय लिहायचा मोह होतोय. Proud Happy असो. यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे चित्र स्कॅनरावर स्कॅन केलं नसून माझ्याकडच्या मोबाइल कॅमेर्‍यावरून पकडायचा प्रयत्न केला आहे. ते पकडत असताना हात स्थिर ठेवणं आणि अलाइनमेंट व्यवस्थित राखण्याच्या तारांबळीत थोडा घोळ झाला.. कॅमेर्‍याच्या व्ह्यूफाइंडरामध्ये कागदाची चौकट काहीशी तिरकी पकडली गेली. Proud चर्च आणि उजवीकडच्या बागेमधून आरपार दिसणारा व्हरांड्याचा खांब नीट निरखला तर मी काय म्हणतोय ते लक्षात येईल.
    दुसरी गोष्ट चिनूक्स याने विचारलेली: डावीकडचे पानांमधून डोकावणारे खांब मधल्या आडव्या भिंतीच्या प्रतलाला काटकोनात आहेत. शब्दांमध्ये समजावून सांगणं अवघड आहे. Happy पण थोडक्यात सांगायचं तर वास्तूचं त्रिमितीय परिप्रेक्ष्यानुसार कसं दृश्य दिसेल ते कल्पून बघ.. म्हणजे ते डावीकडचे खांब मधल्या भिंतीला काटकोनात आहेत याचा उलगडा होईल.

    -------------------------------------------
    हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

    छान चित्र अन छान माहिती! Happy
    बायदिवे, एकदोन प्रश्न (वरिल तिरक्या रेषान्च्या चर्चेचा प्रभाव माझ्यावर नाही हे गृहित धरुन बर का, कारण मला त्या चित्रात काही तिरके दिसत नाहीये! Happy )

    १. सरळ रेषा काढताना पट्टीचा वा तत्सम आयुधाचा वापर करतो का? Proud जर नाही तर आयुधाशिवाय सरळ उभ्या/आडव्या रेषा काढण्याचे तन्त्र काय?
    २. पेन कोणत्या शाईचे वापरतो? म्हणजे हल्ली जेल वगैरे अनेक शाया आल्यात (मला नावे माहित नसुनही प्रकार माहिती हेत) मी नॉर्मली बॉलपेनने चित्र काढताना बघितले आहे, जुन्या काळच्या जाड गोळ्याच्या पात्तळ रिफिल्स! नन्तर काही जण शार्पचे पेन देखिल वापरताना बघितलेय, पण जेलचे पेनने शक्य होईल की नाही याची शन्का वाटते! Happy
    ३. अशा चित्रान्ना कागदाचा पोत कसा असावा? मला ड्रॉईन्गपेपर तसेच गुळगुळीत आर्टपेपर अशा दोन्हीवर प्रयोग करायचाय, मात्र आर्ट पेपरवर शाई वाळेस्तोवर फार फार जपायला लागते नाहीतर स्पर्षाने फिसकटते.
    ४. सुरवातीला प्रयोग म्हणून, येवढ्या मोठ्ठ्या बिल्डिन्गा शोधत जाण्यापेक्षा सोईस्कर सहजसोपे काय निवडावे? की मेमरीवर अवलम्बुन जे सुचेल ते काढावे?
    ...;
    आपला, लिम्बुटिम्बु

    वा.. वा.. फ दादा,
    सिंगापूरमधल्या वास्तव्याचा पुरेपूर उपयोग करुन घेणे चालू आहे तर... अशीच अजून चित्रं आणि माहिती येऊ दे.
    ==================
    अहिंसा....
    जय जवान जय किसान....

    व्वा.. सावलीचा इफेक्ट तर मस्तच..

    लिंबूटिंबू,
    तू विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माहिती देतो:
    १. सरळ रेषा - उभ्या,आडव्या, तिरक्या - द्यायला मी सहसा पट्टी वापरायला जात नाही. अर्थात हा सगळा आत्मविश्वासाचा मामला आहे. खूप दिवसांत चित्र काढलं नसेल तर हातांमधली सफाई, आत्मविश्वास क्षीण झाल्यासारखं वाटतं. तसं कधी वाटलं तर मी पट्टीऐवजी इतर वस्तूंच्या कडांचा आधार घेतो. उदा.: पेन्सिल, कागदाची कड वगैरे. त्यावरून एखादी पुसटशी रेष काढून घ्यायची, साधन दूर लोटायचे आणि मग नुसत्या हाताने साधनाशिवाय पुसट रेषेला अनुसरत सरळ रेष रेखायची. हातांमध्ये पुन्हा आत्मविश्वास यायला मदत होते. परंतु हा मार्ग आपद्धर्म म्हणूनच पत्करावा. Happy काही वेळेस एखाद्या वस्तूची/वास्तूची मांडणी खूप जटिल वाटत असेल, गोंधळल्यासारखं होत असेल तर पेन्सिलीने पुसट रेषांनी कच्चा सांगाडा चितारून घ्यावा. मग पेनाने चितारायला आरंभावं. या चित्रामध्ये मी असा क्रम वापरला.. कारण त्रिमितीमध्ये हुकू नये अशी मनात कुठेतरी धास्ती होती. Proud
    २. पेन शक्यतो आपल्या हातांच्या दाबाला, गतीला साजेसे वाटेल ते निवडावे. बाजारामध्ये (पुण्यात व्हीनस ट्रेडर्स वगैरे दुकानांमध्ये) 'आर्टिस्ट्स स्केचिंग' पेनं मिळतात. फेल्ट टिप का तत्सम कसल्याशा पॉइंटांची ही पेनं जलदगतीने, वेगवान फटकार्‍यांनिशी चितारणार्‍या आधुनिक पाश्चात्य शैलीला जास्त चांगली असतात. माझी चितारायची शैली वेगवान वगैरे नाही. छाया-प्रकाश, त्रिमिती, वास्तूचा आकार वगैरे गोष्टी उतरवायला मी सहसा मध्यम + मंद गतीच्या रेषांनी चितारतो. जिथे पोत उभारायला किंवा प्रवाह दर्शवायची आवश्यकता भासेल तिथे वेगवान फटकारे देतो. माझ्या या एकंदरीत संमिश्र पद्धतीकरता ती आर्टिस्ट्स स्केचिंग पेनं तितकीशी पोषक वाटत नाहीत. त्याऐवजी मी जेल पेनं वापरतो. जेल पेनांमध्ये बॉल पेनांसारखा एखाद्या ठिकाणी ओलसर, फिसकटण्याजोगा धबका उमटायची काळजी नसते. जेल पेनांमधली शाई तुमचे हात कागदाला टेकल्याने, घासल्याने सहसा फिसकटत नाही. जेल पेन एकंदरीत आवरा-सावरायला सोयीस्कर वाटतं. साधी शाई पेनंदेखील वापरता येतात. पण जेल पेनापेक्षा शाई पेनातून निघालेली रेष वाळायला काही सेकंद जास्त घेते. एखाद्या चित्रात तुला रेषेची शाई फिसकटून पोत/छायाप्रकाश दाखवायचा असेल तर शाई पेनंही वापरायला हरकत नाही.
    थोडक्यात जेल पेनं, शाई पेनं, साधी गोल/आडव्या फ्लॅट टिपाची स्केचपेनं, पेन्सिली, चारकोल असं काहीही वापरायला हरकत नाही. आपल्या पद्धतीला साजेसं काय ते निवडावं.
    ३. कागदः मी सहसा साधा ड्रॉइंग पेपर वापरतो. बाजारात हल्ली 'ड्रॉइंग पॅड' नावाने ए४/ए३ आकारमानातली १०० पानी ड्रॉइंगबुकं मिळतात. त्यांना पाठीमागे ताठ पुठ्ठा असतो, तो बाहेर प्रत्यक्ष चितारतेवेळी आधाराला बरा पडतो. वेगवेगळ्या जागी जाऊन चित्रं काढताना तुम्हाला कुठला स्पॉट आवडेल आणि त्या स्पॉटावर बसायला/पॅड ठेवायला जागा मिळेलच याची काही शाश्वती नसते. त्यामुळे ड्रॉइंग पॅडं बरी. छोटं चित्र बाहेर काढून त्यावरून मोठं चित्रं घरी चितारणार असाल तर कागदांचे बरेच प्रयोग करायला वाव आहे. हल्ली मऊपणा, पोत, सच्छिद्रता, तुसेदारपणा यातली भरपूर वेगवेगळी काँबिनेशनं असलेले नमुने मोठ्या स्टेशनरी दुकानांत पाहायला मिळतात. हौस असेल तेव्हा जरूर प्रयोग करून बघावेत असं वैविध्य आहे.
    ४. सुरुवातीला तू तुला आवडेल तो चित्रविषय निवड. तुझ्या घरातला कोपरा/ घरातल्या एखाद्या खोलीतली काही वस्तूंची नकळत जुळून आलेली रचना/ घरातला पसारा इथपासून एखाद्या गच्चीवरून आळीच्या दुतर्फा दिसणार्‍या घरांची/कौलांची/गच्च्यांची आणि अधूनमधून डोकावणार्‍या झाडांची रचना असं काहीही निवडू शकतोस. शेतातलं खोपटं/रस्त्यावरच्या टपर्‍या-खाणावळीदेखील उत्तम! मला उन्हात (उन्हाळ्यातल्याही :फिदी:) बाहेर भटकायला आवडतं. भारतातल्या लख्ख उन्हात असंख्य आकारांच्या, आकारमानांच्या वास्तूंचे/झाडाझुडपांचे/इतर वस्तूंचे छायाप्रकाशामुळे इतके आकार सांडलेले असतात! विशेषकरून इमारतींची त्रिमितीय भूमिती. हे सर्व आकार म्हटलं तर त्रिमितीय आणि कागदावर आपल्या शैलीत मांदलं तर द्विमितीय नक्षीच दाखवत असतात. ते चितारायची मजा वाटते.. म्हणून असे चित्रविषय निवडतो. अर्थात आवडत असूनही सगळ्या गोष्टी पकडता येत नाहीत.. माझा आवाका सीमित असल्याने त्यातल्या ज्या झेपतात त्या उतरवतो.

    याव्यक्तिरिक्त अजून एक गोष्ट म्हणजे पेन रेखाचित्रांमध्ये रेखांकन (शेडिंग) कसं करायचं. पेन्सिलीत हॅचिंग, क्रॉसहॅचिंग, स्कबलिंग वगैरे बर्‍याच पद्धती आहेत. पेनाने रेखतानाही त्या वापरू शकतो.. पण आपण वापरत असलेलं पेन, शाई वाळण्याची गती यामुळे या पद्धती वापरताना मर्यादा येतात. यावर तोडगा म्हणजे शाई किंचित ओली असताना किंवा पूर्ण वाळण्याआधी ओल्या कापसाने (किंवा हल्ली डॉजर स्टिक्स नावाच्या पुठ्ठ्याच्या शंक्वाकृती नळ्याही मिळतात; त्या ओल्या करून) ही शाई थोडी ओली करायची आणि हवी तशी फिसकटायची. पेनाने रेखांकन करायला ही पद्धत त्यातल्या त्यात प्रभावी.. पण तितकीच धोकादायक. एखाद्यावेळी अंदाज चुकला अन जास्त/चुकीचं फिसकटलं तर तोवर चितारलेलं काम वाया. Lol

    -------------------------------------------
    हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

    सुरेख संकल्प!
    गच्चीवरच्या छोट्या छोट्या खांबांचं डीटेलिंग, चर्चमधल्या भिंतींवरच्या सावल्या- स ही!
    मागच्या इमारती ग्रे शेडमधे करणं तर ग्रेटच!
    तू देतोस ती माहिती उत्कंठा निर्माण करते, चित्र कसं असेल याची..
    लिहीत आणि चितारत रहा Happy

    फदादा, माहितीबद्दल मनापासून धन्यवाद! Happy
    आता एखादी चक्कर व्हिनसमधे मारलीच पाहिजे! Happy
    पट्टीशिवाय इतर आयुध रेषेकरता वापरण्याची कल्पना आवडली! Happy
    मला (आणि सर्वसामान्यतः इतरान्बाबतही तसच असाव) आडवी सरळ रेषा काढण्यात अडचण वाटत नाही पण उभी सरळ रेषा म्हणजे अवघड काम.........
    मी सरळ कागद आडवा करुन आडवी रेषा मारुन मग कागद उभा करणे पसन्द करतो Proud
    ...;
    आपला, लिम्बुटिम्बु

    फ, माहिती आणि चित्र दोन्ही सुरेख जमले आहे.

    ~~~~~~~~~

    नेहमीप्रमाणेच सुरेख चित्र. अनुषंगाने दिलेली माहीती छान आहे.

    फ,
    चित्र अणि माहिती दोन्हीही खूप आवडली.

    जबरदस्त रे फ........ शब्दच नाहीत. डिटेलिंग तर टेरिफिक !! माहिती पण खूप छान दिली आहेस.

    फ, खुलाशाबद्दल थँक्स.. Happy

    आणि खाली दिलेल्या माहीतीसाठी तर खूपच थँक्स.. माझ्यासारख्या नवशिक्यांना उपयोग होईल..

    सुरेख जमलेय! झाडांची पाने,आणि लॉन सही ! Happy
    चर्च च्या पाठी जे background आहे त्यातल्या डीटेल्स अजुन ठीक करता आल्या असत्या.

    संकल्प, सॉरी उशिरा पाहिले चित्रं, अप्रतिम आणि माहिती पण एकदम खुलाशासहित!!
    तुझ्यासारख्या माणसाने अख्खं जग पाहिलं पाहिजे!! Happy

    हे पण मस्तच....डिटेलिंग तर टेरिफिक
    चर्चची माहितीपण.... इतकी सविस्तर माहित नव्ह्ती...
    चित्रणाची माहीतीपण उपयुक्त

    आनेवाला पल जानेवाला हे

    सुंदर चित्र आहे अतिशय. उजवीकडचा मोठा स्तंभ वगळून काढण्यासारखं नव्हतं का? मागच्या मोठ्या वृक्षाची शान कमी होतेय असं मला वाटलं.
    एकदा फिलाडेल्फियाला या आपली आयुधं घेऊन. बरीच स्थळं आहेत इथे चित्रकारांसाठी.


    केवळ अप्रतीम .............रेखाटन व लेखन दोन्ही!

    शोनू, उजवीकडचा खांब म्हणजे मी ज्या व्हरांड्यात बसलो होतो, त्याचा आहे. झाडाचं सौंदर्य झाकोळलंय असं काही अंशी वाटलं तरी, मला त्या खांबामुळे चित्राला आपसूक खोली येईल असं जाणवलं. आणि वरून खाली चित्रचौकटीतून आरपार जाणार्‍या खांबामुळे चित्रातलं अवकाश विभागायचा प्रयोग करून पाहण्याची उबळ आली, म्हणून तसं करून पाहिलं. Proud बाकी, फिलाडेल्फियाच्या आवतणाबद्दल धन्यवाद; कधीतरी तोही देश पाहणं-फिरणं होईल अशी आशा आहे. Happy

    प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद!
    -------------------------------------------
    हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश