ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग २१

Submitted by बेफ़िकीर on 20 October, 2010 - 08:14

पहिल्या वर्षी झालेलं दु:ख का कुणास ठाऊक, या वर्षी कुणालाच फारसं झालं नाही.

'चल मग, निघतो मी' असे करून एकेक जण रूम नंबर २१४ मधून बाहेर पडत होता.

ते वर्ष संपलं होतं! परिक्षा झालेल्या होत्या आणि तिसरं वर्ष चालू होऊन महिना झाल्यावर सुट्टी मिळालेली होती. दिवाळीच्या या सुट्टीतील संपूर्ण तीन आठवडे आपल्या घरात बसून काढता येतील या आनंदात सामानाची आवराआवरी चाललेली होती.

सर्वात पहिल्यांदा वन्या निघाला. त्याची गाडी आज दुपारचीच होती. दुसरे वर्ष संपल्याच्या आनंदात रात्री एक पार्टी करून मग मिळेल ती गाडी घ्यावी असा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. पार्ट्या काय, सतत होतच राहतात! एकदाचे घरी जावे, एवढाच विचार मनाला व्यापून उरला होता.

त्या पाठोपाठ तासाभरातच दिल्याने सॅक बुलेटला लावली. त्याच्या मनात एक दु:ख तर एक आनंद! यापुढील वर्षात सुरेखा कॉलेजला नसणार हे ते दु:ख आणि त्याच वर्षात आपलं तिच्याशी लग्न होणार हा त्या दु:खाला नेस्तनाबूत करणारा आनंद! सुरेखाला काल तो खूप वेळ भेटला होता अक्षयमध्ये! खूप बोलले होते एकमेकांशी! पुढच्याही वर्षी महिन्यातून किमान दोन वेळा ती दिल्याला भेटायला कॉलेजमध्ये येईल हे ठरल्यावर मगच दोघे निघाले होते.

वनदास निघून गेल्यानंतर अशोक सामानाची आवराआवरी करत आहे हे पाहून दिल्याने मग बुलेट काढलीच! हो! उगाच आत्म्याला एकट्याला फेस करायची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून!

दिल्या निघताना अशोकने खूप प्रयत्न केला, की मीपण तुझ्याबरोबर येतो. पण दिल्याने नाही नाही म्हणून त्याला नंतर निघायला सांगीतले. सरळ होते, निघताना आत्म्याशी बोलणे शक्य होणार नव्हते दिल्याला!

आणि मग, बर्‍याच वेळाने, संध्याकाळच्या पावणे सातच्या अत्यंत उदास घटकेला अशोक पवार रूममधून बाहेर पडायला तयार झाला.

एका शब्दानेही कुणीही आत्म्याला असे म्हणाले नव्हते की तू इथे बसण्यापेक्षा आमच्या घरी ये दिवाळीला! कोण म्हणणार??

कारण तो एकही दिवस दारूशिवाय झोपत नव्हता. घरी आणल्यावर त्याने तेथेही प्यायलीच असती. आणि मग घरात मोठे प्रकरण होऊ शकले असते. त्याला पिऊ दिले नसते तर तो सरळ घरातून निघून गेला असता. किंवा तडफडत आणि चरफडत तसाच बसला असता. मग काहीही बोलला असता.

आत्मानंद ठोंबरे! महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षाच्या अखेरीपर्यंत 'कुठे न्यायच्या लायकीचे' राहिलेले नव्हते.

अशोकने आत्म्याकडे पाहिले.

आत्मा पलंगावर खाली मान घालून बसला होता. मधेच त्याने वर पाहिले. आजपासून कॉलेज बंद असल्यामुळे आत्म्याने सकाळीच एक खंबा आणून ठेवला होता. आत्तापर्यंत त्यातले तीन पेग्ज झालेले होते.

अशोकला दिसले. अत्यंत भेसूर भाव असलेले लालभडक डोळे, चेहर्‍याची रया गेलेली आणि मित्रांच्या वियोगाचे दु:ख व्यक्त न करण्याचे स्वतःवरच घातलेले बंधन! त्यातही, एक हास्य, जे रडण्यापेक्षा वाईट भासावे.

आत्म्याचा तिरस्कार वाटून खाडखाड चालत अशोक रूममधून बाहेर गेला आणि त्या उदास संध्याकाळची उदासी एक दोन क्षण पिऊन आत्म्याने रूमचे दार आतून बंद केले. सवयीने ओल्ड मंकचा एक अगदी लहानसाच पेग भरून त्यात जेमतेम पाणी ओतून एक घुटका घेतला आणि मग... अलगद... जणू वाहते पाणी संथपणे वाहते त्याप्रमाणे त्याचे मन कालचा, मग परवाचा, मग तेरवाचा, मग त्या आधीचा असा एकेक दिवस पार पाडत मागे जाऊ लागले.

बाबा चिडून निघून गेले आणि दिल्याने आत्म्याला अक्षरशः चार फटके मारले. शिव्या दिल्या. 'तू साधी दारू सोडू शकत नाहीस?? आणि वडिलांना जायला सांगतोस??' यावरून!

खूप मोठे वादविवाद झाले त्या रात्री! पण... हळूहळू सगळ्यांना आत्म्याने घेतलेला स्टॅन्ड समजू लागला व काही प्रमाणात पटू लागला.

मी आत्ता दारू पितो आहे, उद्या कदचित सोडेनही, पण निदान आत्ता मी पीत नाही असे तुम्हाला खोटे सांगणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला निदान मी सत्य बोलणारा आहे हे समाधान तरी मिळेल!

असा आत्म्याचा स्टॅन्ड आहे व तो आपल्याला कधीही घेता आला नाही याचे खरे तर अशोक आणि वन्याला वाईटच वाटले.

मात्र जसजशी परिक्षा जवळ यायला लागली तसे वातावरण आपोआप गंभीर होऊ लागले. यावर्षी पडलेला फरक म्हणजे आत्म्याने चक्क छोटा पेग लावून मग मोठ्याने वाचन सुरू केले. आत्म्याच्या त्या अभ्यासामुळे इतरांचा अभ्यास आपोआप होणे हा प्रकार याही वेळेस झाला. पण...

पैसे?? पैशांचं काय? बाबा निघून गेले त्यानंतर जवळपास महिनाभर आत्मा वर्गातल्या पोरांच्या आणि ज्युनियर वर्षातल्या पोरांच्या मागे लागून लागून सबमिशनची कामे मिळवत होता. त्यातून काही ना काही पैसे सतत मिळत होते. आता कोणता ब्रॅन्ड हा प्रश्न मागे पडत चालला होता. उपलब्ध पैशात जे मिळेल ते प्यायचे असा प्रकार होता. त्यामुळे अनेकदा ओल्ड ट्रॅव्हर्न आणि ऑफिसर्स चॉईस या स्वस्त व्हिस्की घेत होता तो! अर्थात, अजून प्रकरण इंग्लीशपर्यंतच होते. आणि पैसे मर्यादीत आहेत याचे भान असल्यामुळे कमी क्वांटिटी अधिक चढावी म्हणून पेग भरताना पाणी कमी घातले जाऊ लागले होते. त्यामुळे कडक चव यायची आणि झर्रकन चढायची दारू!

पण... सगळी सबमिशन्स झाली आणि परिक्षा जवळ आली तशी मात्र पंचाईत फार मोठी झाली. आता काही मुलांकडून येणे होते ते मागण्यात आत्म्याचा वेळ आणि एनर्जी जाऊ लागली. मग एखादी क्वार्टर आणली की ती अर्धी आज घ्यायची अन अर्धी उद्या असे ठरवले त्याने! आता त्याला रूममधून कुणी थेट विरोध करत नसले तरी वन्या आणि इतरही दोघांच्या मनात हेच होते, की हा आत्मानंद आता तिरस्करणीय पातळीवर जाऊ लागला आहे. पार्टी म्हणून दारू पिणे वेगळे आणि 'मी पिणारच' म्हणून पिणे वेगळे!

आणि... मग त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा आत्म्याने रूमवर रात्री आठ वाजता विषय काढला.

आत्मा - मला... बहुतेक ... सोडावे लागेल मद्य!

त्याची कल्पना अशी होती की यावर लगेच प्रश्नांची सरबत्ती होईल आणि प्रेमाने कुणीतरी म्हणेल की 'अरे छोड यार, आम्ही आहोत ना, आज आमच्यातर्फे!' पण.. कुणीच तसे म्हणाले नाही. प्रत्येक जण त्याचे ते वाक्य अजिबात गंभीरपणे न घेता शांतपणे आपापला अभ्यास करत होता.

जवळपास पाच मिनिटांनी आत्म्याने दुसरे विधान केले.

आत्मा - कारण काय झालंय.. की.. आता ... बाबा पाठवत नाहीत ना.. पैसे...

तरीही कुणीही लक्ष दिले नाही. याचे कारण म्हणजे तिघांनीही नेमके हेच कधीपासून ठरवले होते. ज्या दिवशी आत्म्याचे पैसे संपतील तेव्हा त्याला आपोआप जाणीव होईल की तो व्यसनात खोलवर रुतलेला आहे व त्यातून त्याने बाहेर पडायला पाहिजे. मात्र, अशा वेळेस आपल्याकडे तो पैसे मागेल तेव्हा त्याला एक पैसाही द्यायचा नाही. त्यामुळे आज त्याच्याकडे कुणी लक्षच देत नव्हते. यामागे त्यांची एक ठरलेली भूमिका आहे हे आत्म्याला माहीत नव्हते.

आत्मा - आणि खरं सांगू का? त्यांनी पैसे पाठवावेत असे मला वाटतही नाही. कशाला उगाच त्यांनी कष्टाने मिळवलेले धन व्यसनात उडवायचे? त्यामुळे.. मी त्यांना एकदाही विचारणार नाही आहे...

सर्व शांत! कुणी एकमेकांकडेही पाहात नव्हते.

आत्मा - आणि खरे सांगू का? सारखे पिऊन आता मलाही कंटाळाच आला आहे. किती प्यायचे?

पहिल्यांदच आत्मा 'प्राशन करणे' याला पर्यायी शब्द म्हणून 'प्यायचे' म्हणत आहे ही प्रगती सर्वांच्या लक्षात आली. पण चेहरे पुस्तकांवर रोखलेले!

आत्मा - काय लामखडे.. तुम्हाला काय वाटतं?

वनदास - हं... खरं आहे...

आत्मा - चला... अभ्यासाला लागू...

आत्माने मोठ्याने वाचन सुरू केल्यावर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांचा अंदाज चुकला होता. आत्म्याने त्यांच्यापैकी एकाकडेही पैसे मागीतले नव्हते. पण... इकडे आत्म्याचे लक्ष अजिबातच वाचनात लागत नव्हते.

पाचच मिनिटांत त्याने पुस्तक बाजूला ठेवले.

आत्मा - .... मी... मी जरा जाऊन येतो... बाहेरच्या मोकळ्या हवेत... म्हणजे मग लक्ष लागेल अभ्यासात!

आत्मा झर्रकन निघून गेला तशी सगळ्यांची नेत्रपल्लवी झाली. सगळ्यांनाच त्याची पुढची स्टेप काय असेल ते माहीत होते आणि त्यांनी त्याबाबतची फिल्डींग आधीच लावून ठेवलेली होती. आंगनच्या मालकाला 'याला उधारीवर दारुचा एक थेंब देऊ नका व ते त्याच्याच भल्यासाठी आहे' हे निक्षून सांगीतले होते. हे सगळे करताना तिघांना स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागत होते. आत्म्याची दारू बंद करायचीच असे आव्हान स्वीकारल्यामुळे त्यांना स्वतःला आधीसारखी घेता येत नव्हती. अगदीच आठवड्यातून एखाद्या वेळेस तिघे घेत होते. पण, हे वर्ष संपता संपता आत्म्याची दारू बंद करायचीच हे त्यांनी ठरवले होते.

सबमिशनच्याबाबतीतही त्यांनी तेच केले होते. आत्मा ज्या मुलांना भेटेल त्यांना हेही भेटायचे. त्यामुळे मुले आत्म्याला सबमिशनचे काम द्यायला रिलक्टंट असायची. पण काहींना खरोखरच काम द्यायचे असायचे. कारण त्यामुळे त्यांना स्वतःला उडाणटप्पूपणा करायला संधी मिळायची! तेथे मात्र हे तिघे काही बोलू शकायचे नाहीत.

आत्म्याशी 'दारू सोडणे' या विषयावरून एकदा खूप भांडणे झाल्यावर मध्यंतरी अशोक आणि वनदासने त्याच्या वडिलांना म्हणजे बुवांनाही फोन करून सांगीतले होते, आत्म्याची दारू सुटण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत आहोत, यश येत आहे व लवकरच त्याची दारू सुटेल, तुम्ही काळजी करू नका. पण प्रत्यक्षात आत्म्याची दारू सुटत नव्हती.

पण आज तो दिवस उजाडलाच शेवटी! आत्मानंद ठोंबरेकडचे सगळे पैसे संपले आणि त्याला या तिघांना 'पैसे द्या' असे म्हणायचा अपमान वाटू लागला.

आत्तापर्यंत तत्वज्ञान म्हणून उधळलेली सर्व मुक्ताफळे आत्म्याला आता आठवत होती बाहेर पडल्यावर! काय बोललो आपण या तिघांना आणि आपल्या बाबांना! आता आपण काय करणार? मद्य सोडणार नाही हे ठासून सांगताना आपल्याला ही बाबच कशी जाणवली नाही की एक दिवस आपल्याकडचे सर्व पैसे संपतील आणि.. मग आपल्याला मद्य घेताच येणार नाही.

चालत चालत निराश मनाने आत्मा आंगनपाशी आला. गेटच्या बाहेरून ढाब्याच्या आत बघताना त्याला आठवले. हीच ती टेबले! जिथे बसून आपण रुबाबात ऑर्डर द्यायचो. का लागले आपल्याला हे व्यसन? आज आत जायलाही कसेसे वाटत आहे. पैसेच नाही आहेत. पण... इतके दिवस आपण रोख पैसे देत होतो म्हंटल्यावर.. एखादवेळेस उधारी चालणार नाही का?? उद्या परवा आणू कुठूनतरी पैसे अन देऊन टाकू!

आत्मा हळूहळू चालत आत गेला. आंगनवाल्याला हे माहीत नव्हते की निश्चीत कोणत्या दिवसापासून आत्म्याला दारू बंद करायची आहे. कारण आधीच पैसे विचारणे योग्य दिसत नाही आणि नंतर तो म्हणाला की मी पैसे नंतर देतो तर दिल्या झापणार!

पण का कुणास ठाऊक... आज त्याला लांबूनच आत्म्याच्या चालण्यातील रुबाबात झालेली घट पाहून असे वाटले की.. तो हाच दिवस असणार....

त्याने वेटरला काहीतरी सांगून आत्म्याकडे पाठवले.

आत्मा - एक .. ओल्ड मंक १८० द्या... सोडा वगैरे काही नको.. फक्त पाणी...
वेटर - .. ड्रिन्क्स आजपासून कॅशवर आहेत... सगळ्यांनाच..
आत्मा - म्हणजे??
वेटर - ... ड्रिन्क्सचे पैसे मालक आधी घेणार आहेत.. फूडचे नंतर दिले तरी चालतील...
आत्मा - ... का?? असा का केला नियम??
वेटर - सगळ्यांसाठीच... आजपासून...
आत्मा - त्यांना.. जरा बोलावता का??

काही मिनिटांनी मालक आले.

मालक - बोला साहेब...
आत्मा - ते... आगाऊ पैसे....माझ्याकडे खरे तर आज... पैसेच नाही आहेत...
मालक - ओह... .. म... मग??
आत्मा - मी.. उद्या परवा आणून देतो....

इतके दिवस रोज येणार्‍या आत्म्याबद्दल मालकालाही जरा मनातून वाटलेच! दिल्याचे ऐकायचे म्हंटले तरी आत्मा हे रोजचे गिर्‍हाईक होते.

मालक - ठीक आहे... आज घ्या तुम्ही... पण.. उद्यापासून मात्र... म्हणजे.. उधारी नाही करायची..

आत्मा - छे छे.. आजही केली नसती...

मालक - एक निप ना?

आत्मा - अं.. नाही नाही... एक हाफ देऊन ठेवा... आणून देईन पैसे...

आणि नंतर दिल्याचं, अशोकचं आणि वन्याचं आंगनच्या मालकाशी झालेलं छोटसं भांडण आणि आत्म्याला मिळालेली झाप!

ती झाप मिळण्यापुर्वी आत्म्याने गहईघाईने अडीच पेग गिळले होते भांडण चालू असताना! पण एक प्रकार झाला. त्या भांडणाच्या शेवटी आंगनच्या मालकाने स्पष्ट सांगून टाकले. यापुढे या मुलाने आंगनमध्ये पाय ठेवायचा नाही, याची काळजी तुम्ही घ्या नाहीतर मी घेईन!

हा प्रकार झाल्यानंतर रूमवर आल्यावर दिल्याने आत्म्याला कित्तीतरी वेळ झापले. तुझ्या पिण्यातून आता इतर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत, तू पैसे नसल्याने उधारी करू लागलेला आहेस, यापुढे आम्ही तुला एक पैसाही दारूसाठी देणार नाही आणि या वर्षी इथे राहून घ्यायची असली तर चालेल, पण पुढच्या वर्षी तू स्वतःसाठी होस्टेलमधली दुसरी एखादी खोली बघ! पुढच्या वर्षी या रूममध्ये तू दारू प्यायलेली चालणार नाही.

खरे तर हे बोलायचा दिल्याला कायद्याने हक्क काहीच नव्हता. पण आत्म्याला तो हक्क ठाऊक होता कसला आहे ते! तो होत प्रेमाचा हक्क! त्यामुळे आत्म्याने मान खाली घालून दिल्याचे संपूर्ण लेक्चर ऐकून घेतले होते.

पण... दारू चांगली किती असते याचे आजवरचे अनुभव गाठीशी असले तरीही दारू वाईट किती असते याचा एकही अनुभव आत्म्याच्या गाठीशी नव्हता... तोही घेतला त्याने चार, पाचच दिवसांत!

सलग चार दिवस आत्मा एक घोटही प्यायला नाही. या तिघांना वाटले की सुधारला की काय? अर्थात, त्याच्याकडे पैसेही नव्हते हे त्यांना माहीत होते. पण ज्या अर्थी आत्मा कुणाकडेच पैसे मागत नाही आहे त्या अर्थी त्याने मनातूनच दारू सोडण्याचे ठरवले असणार असा त्यांचा अंदाज होता. त्याला दारूपेक्षा स्वतःची नीयत, प्रकृती आणि पैसे महत्वाचे वाटत असणार असा त्यांचा अदाज होता. त्या अंदाजाला सुरुंग लागला. सायंकाळी साडे सहालाच आत्म्याने जाहीर केले. 'मी आज मद्य प्राशन करायला जात आहे, माझी वाटही पाहू नका अन पाठलागावरही येऊ नका'!

इतक्या लवकर, सुर्यास्तही व्हायच्या आधी हा कुठे चालला आणि पिण्यासाठी याला पैसे कसे मिळाले हेच कुणाला समजत नव्हते.

आणि दुसर्‍याच दिवशी दुपारी चार वाजता 'इंजिनीयरिंग ड्राँग टू' या विषयाच्या पिरियडसाठी सगळे ड्रॉईंग हॉलमध्ये जमलेले असताना मारंणे नावाचा एक दिल्याच्या ओळखीचा शिपाई अगदी चिकटून एका ठिकाणी बसला होत ते पाहून दिल्याने हासत हासत विचारले...

"काय मारणे.. आज इथे अगदी खिळा ठोकलायगत बसलायत??"

"काल भरूचा मॅडमचे १७० रुपये गेले पर्समधून.... म्हणून ... लक्ष ठेवतोय..."

पहिल्यांदा हा सिक्वेन्स दिल्याला विशेष वाटला नाही. अशोकलाही काही वाटले नाही. पण वन्याच्या मनात पाल चुकचुकली. त्या दिवशी तिघेही साडे पाचला कॅन्टीनमध्ये चहा प्यायला जमले. आत्मा रूमवर गेला होता.

दिल्या - काहीही काय फेकतो बे?? चोरी करेल होय आत्म्या??
वन्या - ऐकून घे... काल बरोब्बर याच वेळेला हाच पिरियड होता??
दिल्या - मग??
वन्या - आठवतंय का आत्मा बाथरूमला जाऊन येतो म्हणाला
दिल्या - ... मग??
वन्या - माझ्यामते तो केबीनमध्ये गेला होता..
दिल्या - तुझ्यामते या शब्दाला काय अर्थ आहे??? तू पाहिलं असतंस तर ठीक आहे...
अशोक - मलाही पटत नाही...
वन्या - ऐकून घ्या आधी... त्याला आंगन बंद आहे, सबमिशन्स सगळ्यांची संपली आहेत...
अशोक - .. हं ...
वन्या - बुवा पैसे पाठवत नाहीत... मग आले कुठून पैसे???
अशोक - चक.. काहीही असलं तरी चोरी शक्यच नाही...
वन्या - तसं असलं तर चांगलंच आहे... आपण एक... चाचणी घेऊ...
दिल्या - काय्...कसली चाचणी???
वन्या - आज आपण चाळीस रुपये वर ठेऊ आणि तिघे फिरायला बाहेर जाऊ...
अशोक - आपल्या पैशांना तर तो हातच लावणार नाही काही झालं तरी...
वन्या - ठीक आहे... मला काय?? मी आपलं मनात आलं ते सांगीतलं..
दिल्या - पण अश्क्या... लक्ष मात्र ठेवायला पाहिजे यार त्याच्यावर.. काहीच्या काहीच करायचा...
अशोक - होय...

सगळे रूमवर परत आले तेव्हा आत्मा निघालेला होता.

दिल्या - काय रे?? आज पण प्यायला चाललास का??

ओशाळे हासत आत्म्याने दुर्लक्ष केलं...

दिल्या - पैसे कुठून आणलेस रे???

खटकन हालचाली थांबल्या आत्म्याच्या! हा प्रश्न विचारण्याचा दिल्याला अधिकार नाही आणि उत्तर द्यायला आपण बांधील नाही हे दोन्ही विचार मनात घोळवून... आजवर कधी झाली नव्हती ती गोष्ट केली आत्म्याने...

खूप जोरात ओरडला तो दिल्यावर...

आत्मा - काय संबंध हे विचारण्याचा?? आं?? संबंध काय??

दचकलेल्या तिघांना तसेच ठेवून आत्म्या तरातरा निघूनही गेला.

वनदास - बघितलेस का?? माणूस असा कधी चिडतो माहितीय?? खोट लपवायचं असलं की...

पंधरा मिनिटांनी तिघेही बाहेर पडले. आंगनला पाहिलं तर तिथे नव्हताच तो! एक किलोमीटर अंतरावर एक छोटं हॉटेल झालं होतं! अंजुली! तिथे चिकन आणि व्हेज मिळायचं! कोंबडी तिथेच मारायचे. बाहेर ओपन एअर मध्ये टेबल लावायचे. विशेष चालायचं नाही ते हॉटेल! रात्रीतून तीन चार ट्रकवले थांबले तर दोन तीन कोंबड्या मारल्या जायच्या आणि सोडा, भुसकट आणि काही किरकोळ स्नॅक्स वगैरे धरून बर्‍यापैकी गल्ला जमू शकायचा एवढेच! कॉलेजची मुले टेस्टसाठी तिथे जायची खरी, पण लांब असल्यामुळे फार जायची नाहीत. आठवड्यातून दोन ग्रूप्स वगैरे!

आत्म्या तिथे बसला होता. या तिघांनी पाहिले लांबून! एकटाच पीत होता. त्याचे लक्ष होते आकाशाकडे लागलेले! सगळे परत रूमवर आले.

आत्म्याकडचे ते पैसे संपायला फक्त आणखीन एक दिवस लागला आणि सगळ्यांच्या अंदाजाप्रमाणे आज तो निश्चीतच पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणार होता. सगळ्यांचे हळूच लक्ष आत्मानंदवर होते.

आणि दुपारी चार वाजता आत्मा पुढचा पिरियड बंक ठेवून बाहेर निघाला वर्गातून! तो आजकाल इतरांना काही सांगायचाच नाही.

पण त्याच्या मागोमाग दिल्याही सटकला ठरल्याप्रमाणे! बरेच अंतर ठेवून, दिसणार नाही अशा पद्धतीने दिल्या चालत होता. आणि दिल्याला धक्काच बसला.

आत्मा सरळ स्टाफ रूममध्ये गेला आणि तीन चार मिनिटांनी बाहेर आला.

हे काय झाले हेच दिल्याला समजेना! बरं आत जाऊन हेही पाहणे शक्य नव्हते की तो काय करतोय! कारण त्याला समजले असते तर यापुढे त्याने फारच काळजी घेतली असती.

तिथून आत्मा सरळ रूमवर गेला. काही वेळाने सगळेच रूमवर आले. आणि पाहिले तर नेहमीप्रमाणे आत्मा तयार होऊन निघायच्या तयारीत होता. कुणाकडेही न बघता तो निघून गेल्यावर दिल्याने किस्सा सांगीतला अन स्वतःचे मतही मांडले.

"कोणत्यातरी सरांकडून त्याने आज पैसे उधार घेतले असावेत. आपण सगळ्या स्टाफलाही सांगायचे का??"

त्यावर एकमत झाले नाही. कारण त्यातून आपणही काही वेळा पितो ही बातमी उगाचच फुटली असती अशी शंका अशोकला आली.

पुढचे पंधरा दिवस आत्मा व्यवस्थित पीत होता. तो रोज स्टाफ रूम, कॅन्टीन, स्टुडंट सेक्शन असा कुठे ना कुठे जायचा इतकेच यांना समजत होते. मात्र एक दिवस कुणीतरी येऊन म्हणाले...

"काय बे तुमचा रूममेट उधारी करत फिरून राहिला कॉलेजभर??"

पुन्हा त्या दिवशी दिल्याने आत्म्याला सुनावले. पण आत्म्याने तोडीस तोड उत्तरे दिली आणि आता मनांमध्ये इतका राग होता किंवा इतकी अंतरे निर्माण झाली होती की दिल्याला उठून त्याला मारावेसेही वाटले नाही.

मात्र! उधारीलाही मर्यादा असते. बदनामी बर्‍यापैकी झाल्यावर आत्मानंद ठोंबरे यांना पैसे देणे बंद झाले लोकांकडून! आणि आत्मा पुन्हा विचार करू लागला.

सहाशे तीस रुपये! कुठून आणायचे हे? त्याने कागदावर सगळी डिटेल्स लिहून ठेवली होती. आणि आज एकही पैसा जेव्हा मिळाला नाही आणि त्याहीपेक्षा 'आपल्याला पाहून लोक लांबून जात आहेत' हे त्याच्या लक्षात आले तेव्हा मात्र तो खाडकन जमीनीवर आला.

हे सहाशे तीस रुपये देणार कोण? कुठून आणायचे?? अभ्यासासाठीही पैसे पाठवायला बाबा नाही म्हणत आहेत तिथे ही उधारी कसली आहे कळल्यावर काय करतील ते?

आपण असे कसे वागलो बाबांशी? कुणासाठी मर मर मरतात ते? आपल्याचसाठी ना? मग? आपल्यालाच एकदा नुसते पाहण्यासाठी बिचारे रात्री एक वाजता आले होते. आणि आपण? त्यांना भेटण्याचे मानसिक बळ मिळावे म्हणून आधीच प्यायलेली असताना आणखीन एक स्मॉल मागीतला आणि वर त्यांना जणू एखादा मित्र असल्याप्रमाणे लेक्चर दिले. एक घोट पाणी न पिता ते निघून गेले. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर आणि संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर घरातल्या सगळ्या मोठ्यांना नमस्कार करणारे आपण... इतके दिवसांनी बाबा आले आणि आपण.. नमस्कार तर राहोच... पाणीसुद्धा विचारले नाही??

आत्मानंद?? हे काय? काय ही अवस्था? काय दिसतोस?? काय छाती पुढे काढून सांगतोस जगाला मद्य सोडणार नाही म्हणून?? मद्य विकत घेण्यासाठी लागतात ते पैसेही तू कमवू शकत नाही आहेस.. जगायला नालायक, कुणाचा मुलगा व्हायला नालायक, कुणाचा मित्र व्हायला नालायक! एकाच गोष्टीसाठी लायक! मद्य प्राशन करण्यासाठी! ओल्ड मंक, ऑफिसर्स चॉइस, ओल्ड ट्रॅव्हर्न, ब्ल्यु रिबॅन्ड... अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात शिकलेल्या विषयांची नावे!

खूप वेळ पश्चात्तापदग्ध अवस्थेत काढल्यावर त्याला अचानक जाणवले.

ही पश्चात्तापाची भावना घालवण्यासाठी उपाय एकच आहे. व्हिस्की! इतर कोणत्याही प्रकारे आपले मन ताळ्यावर येणार नाही.

आणि हो! व्हिस्की विकत मिळते! फक्त विकत! वडील पैसे पाठवत नाहीत, मित्र मद्यप्राशनास कडाडून विरोध करतात, महाविद्यालयातील माणसे पैसे उधार द्यायला नकार देतात आणि आत्मानंद?? तुम्हाला फक्त व्हिस्कीच तारू शकते. आता बोला... काय करताय??

खरंच की! त्या दिवशी ... जे केलं ते... एकदा.... एकदाच हां पण... नंतर नाही... पण... एकदाच करायचं का???

भरूचा मॅडमच्या पर्समध्ये किती मस्त भरपूर पैसे मिळाले. पण.. त्य पैशांचे मद्य पिताना किती लाजही वाटली. नंतर आपण चोरी सोडूनच दिली. म्हणजे? सुरू केली होती असे नाही. पण.. पुन्हा करणार नाही असे ठरवले. पण आज... आज ही जी उधारी झाली आहे... ती... ती फेडण्यासाठी फक्त एकदाच... एकदाच कुठून तरी सातशे रुपये मिळाले पाहिजेत... सहाशे तीसची उधारी फेडायची अन उरलेल्या सत्तरमध्ये एक निप!

बुवा ठोंबरेंना विसरा आता आत्मानंद! ते तुमचे वडील 'होते' , आता नाहीत! आता ते एक वेगळी व्यक्ती आहेत अन तुम्ही एक वेगळी व्यक्ती आहात. तेव्हा... हे असेच जगायचे असल्यामुळे... तुमचे तुम्ही मार्ग शोधा! कक्षावरील दोस्त आणि उधारी हे दोन मार्ग आता संपलेले आहेत.

त्या दिवशी दुपारी दोन वाजताच आत्मा वर्गातून बाहेर पडला. तो उधारीने पैसे मिळवतो हे माहीत झालेले असल्यामुळे व भरुचा मॅडमच्या पैशांच्या चोरीसारखा इतर कोणताही प्रकार गेल्या पंधरा दिवसांमध्ये न झाल्यामुळे आता दिल्या वगैरे त्याच्यावर फार लक्ष ठेवत नव्हते. प्रत्येकाला शेवटी स्वतःचा अभ्यास वगैरे होताच! मात्र का कुणास ठाऊक... आज वन्याला राहून राहून वाटत होते... की आत्ता आत्मा बाहेर पडला यात काहीतरी गोम आहे. पण वनदास जरी मागून बाहेर पडला नसला... तरी त्याला आलेली शंका बरोबर होती हे नंतर स्पष्ट झालेच... एक.... एक स्फोटच झाला तो खरे तर...

सगळे रूमवर असताना होस्टेलचा शिपाई रूममधे आला आणि वनदासला म्हणाला तुला भेटायला एक मुलगी आलेली आहे. ती दीपा असणार हे वन्याला माहीत होतं! दीपा काही वेळा त्या शिपायला वन्यासाठी निरोप देऊन तिथून गेटपासून लांब अंतरावर जाऊन थांबून राहायची. विशेष काहीच न वाटल्यामुळे नेहमीप्रमाणे वन्या बाहेर गेला तर...?????

.... अलका देव! अत्यंत गंभीर चेहरा, अजिबात फारशी ओळख नसलेल्या मुलाला भेटतानाचा एक प्रकारचा संकोच आणि पहिल्यांदाच जेन्ट्स होस्टेलपासून इतक्या कमी अंतरावर उभे राहिल्यामुळे आलेली एक प्रकारची संकोचाची भावना! वन्या तर उडलाच! हिचे आपल्याकडे काय काम असणार???

वनदास - काय??
अलका - ओळखलं ना?
वनदास - हो म्हणजे काय? तुझेच वडील होते ना त्या वेळेस हॉस्पीटलमध्ये.. अलका...
अलका - हं!
वनदास - काय झालं??
अलका - कॅन्टीन.. कॅन्टीनला येशील का?
वनदास - आत्ता???
अलका - पाचच मिनिटे.. जरा महत्वाचं आहे...
वनदास - तू... तू जाऊन बस... मागोमाग येतो....

कॅन्टीनमध्ये आत्ता चहा शिवाय काही मिळायचे नाही. चहा घेऊन बसल्यावर अलकाने एकदम बॉम्बच फोडला.

अलका - अरे... फार विचित्र आहे.. बहुतेक... आत्मानंद...
वनदास - ......... ... काय??
अलका - आज त्याने.. .. चोरी केली..

चहा हातातून सांडायचा तेवढा राहिला होता वन्याच्या!

वनदास - काय बोलतेस???
अलका - शप्पथ... मी स्वतः पाहिले...
वनदास - कुणाचे पैसे चोरले??
अलका - सुवर्णा मॅडम....
वनदास - तू कसे काय पाहिलेस???
अलका - अरे.. ड्रोईंग हॉलमधून आत येताना उजवीकडे केबीन दिसतं ना? पाहिलं तर तिथे हा एकटाच.. आणि.. पर्समधून पैसे काढले त्याने.. मी पटकन आत आले.. हॉलमध्ये टीचर एकट्याच होत्या.. सुवर्णा मॅडम.. म्हणजे ती पर्स त्यांचीच असणार... त्याला मी दिसलेले नाही आहे...

बराच वेळ हबकून वनदस टेबलकडे बघत होता.

वनदास - हे... आणखीन कुणाला सांगीतलंस??
अलका - नाही...
वनदास - अलका... एक विचारू??

अलकाने किंचित काळजीने वन्याकडे पाहिले. 'आता हा काय विचारणार' असे भीतीमिश्रीत कुतुहल होते तिच्या डोळ्यांमध्ये!

वनदास - त्याने तुला.. ट्रेकला राजमाचीला येतेस का असे विचारले होते... ???

तिने मान खाली घातली. हळूच 'हं' म्हणाली.

वनदास - आणि.. तू न यायचे कारण... आ.... आम्ही तिघे होतो असं होतं....

अलकाच्या चेहर्‍यावर अपराधी भाव पसरले.

अलका - वनदास.. तो पितो हे माहीत होतं रे... पण.. मला नेहमी वाटायचं.. की तो... तो तुमच्या तिघांमुळे पितो... पण... हल्ली हल्ली माझ्या लक्षात यायला लागलंय.. तो.. त्याला हवं असतं म्हणून पितो... आय अ‍ॅम सॉरी... माझं तुमच्या तिघांबद्दलचं आणि त्याच्याबद्दलचं तेव्हाचं आणि आत्ताचं मत... नेमकं उलट आहे वनदास... दिलीपला पण सांग...

वनदास - ते ठीक आहे... पण.... पण आता ह्या गोष्टीचं काय करायचं??

अलका - खरं सांगू?? ... मला ते फक्त.. तुम्हाला तिघांना सांगायचं होतं...

वनदास - अलका... थॅन्क्स... तू ते कुणालाही सांगीतलं नाहीस म्हणून...

अलका - त्यात काय थॅन्क्स??

वनदास - ... मी बघतोच आता...

खाडकन उठून निघून चाललेला वनदास दारात पोचला तेव्हा.. मागून अलकाने अचानक त्याला हाक मारली...

"वनदास... प्लीज... त्याला... त्याला काही करू नका हां?????"

=========================================

तीन पेग होऊन चवथ्याकडे वाटचाल चालू असलेल्या आत्म्याला अचानक मोकळ्या जागेत आपल्या टेबलवर माणसे कशी दिसायला लागली ते समजले नाही. तर्र झाला होता तो. आठशे रुपये मिळाले होते. चक्क एकशे सत्तर रुपये एक्स्ट्रॉ! आता तर काय? पुढची उधारी द्यायलाही काही लोक तयार झाले असते आणि या उरलेल्या एकशे सत्तरमध्ये नाही म्हंटले तरी तीन दिवस सहज गेले असते. आणि आज त्या खुषीत त्याने अंजुलीला तीन पेग संपवून दुसरी क्वार्टर मागवून ठेवली होती.

आत्मा - कोण???
दिल्या - मी... दिल्या....
आत्मा - ..... तुम्ही????

तुम्ही हा प्रश्न हवेत विरेपर्यंत दिल्याचा उजवा हात खाडकन आत्म्याच्या कानफडावर बसला.

आणि पाठोपाठ पाच फटके! तसेच! उत्स्फुर्त आणि सडकून मारलेले!

केवळ दहाव्या सेकंदाला कंप्लीट उतरली होती आत्म्याची!

प्रेम म्हणून एकमेकांना लेक्चर्स देणं आणि बौद्धिके घेणं ठीक आहे... पण एखाद्याने खरीखुरी मारामारी केली तर काय करणार? आज दिल्याला अशोक आणि वन्याने अजिबात थांबवले नाही.

आणखीन एक दोन थपडा खाऊन शेवटी आत्मा ओरडला...

"बास्स... बास.. नका मारू..."

दिल्या - चोरी केलीस?? तू?? तू चोरी केलीस????

आत्मा - तुमचा संबंध काय???

आत्तापर्यंत दिल्याने आत्म्याला मारलेल्या सर्व फटक्यांच्या तुलनेत आत्म्याचा हा एकच शाब्दिक फटका अधिक तीव्र होता.

खाडकन अपमानीत दिल्याने अशोक आणि वन्याकडे बघितले. दोघांनीही त्याला एकच सांगीतले...

"हा मा**** आहे.. ......तू रूमवर चल... "

आणि लांबवर ते तिघे अत्यंत हर्ट होऊन अंधारात चालत जाताना दिसत होते, जे पाहून आत्म्याने स्वतःचे दोन्ही हात चेहर्‍यावर झाकून घेतले आणि...

त्याच्या तोंडातून उत्स्फुर्त शब्द गेले... अत्यंत रडत रडत...

"बाबा... बाबा.. चुकलो मी... या तुम्ही इथे... मी.. खरंच चुकलो.. पण बाबा.. आता मात्र मी खरंच नाही हो सोडू शकत मद्य... कदाचित... त्या दिवशी तुम्ही मला मारलंत तेव्हा सोडू शकलोही असतो... पण... आज नाही वाटत आहे मला की मी सोडू शकेन... मी.. अशा ठिकाणी पोचलो आहे बाबा... जिथे मी दिलीप यांना तुमचा संबंध काय असे विचारले... माफ करा बाबा.. एकदाच मला माफ करा... तुम्ही जन्माला घातलेला... कौतुकाने आणि संस्कारांनी वाढवलेला हा तुमचा मुलगा आत्मानंद.... पूर्ण वाया गेला बाबा... पूर्ण वाया गेला.. "

"चु*.... दारू तू कधीही सोडू शकतोस... रडतोस कसला???"

कोण म्हणे हे?? कोण बोललं? की मीदारू सोडू शकतो?? धनराज गुणे?? हे इथे कधी आले???

आत्मा - तुम्ही..??
धनराज - दारू कधीही सोडू शकतोस तू....
आत्मा - ... मी??? ... गुणे... मला खोटी प्रलोभने नका दाखवू...
धनराज - विश्वास नाही ना?? हा साजिद बघ... हा दिवसाला दोन क्वार्टर्स प्यायचा...
आत्मा - .... दोन??
धनराज - गेल्या पंधरा दिवसांपासून सोडली.. सोडली म्हणजे सोडली....
आत्मा - .. पण... नाही हो... मी.. मी ते धाडस करू शकत नाही....

इतके बोलेपर्यंत ते चौघेही आत्म्याच्या टेबलवर इतर खुर्च्यांवर बसलेही होते.

आत्म्यानेही मानसिक आधार देणार्‍या त्या ग्रूपचे मनातून खरे तर स्वागतच केले होते...

धनराज - तुला माहीत नाही.. तू एका अत्यंत चांगल्या घरात वाढलेला आहेस... तुझे विचार आणि वागणे खूप सभ्य आहे... आत्ताही तुझे त्यांच्याशी भांडण झाले त्याचे मुळ कारण काय आहे माहीत आहे??

आत्मा - तुम्ही... कधी पाहिलंत???

धनराज - आम्ही पार मागच्या बाजूला बसलो होतो... आवाज ऐकून आलो...

आत्मा - काय... काय कारण आहे??

धनराज - मूळ कारण हे आहे की... वाईट ... ते तिघे आहेत... आणि... तू वाईट आहेस हे सिद्ध करून स्वतःचे फायदे करून घेत आहेत...

आत्मा - छे छे.. तसं काहीच नसावं... त्याने त्यांचा काय फायदा???

धनराज - तसं नसावं म्हणतोस ना?? मग आज.. बरोब्बर वन्या आणि अलका कसे काय कॅन्टीनमध्ये होते???

आत्मा ताडकन उभा राहिला. पुन्हा बसला. पण डोळे गुणेवर तसेच रोखलेले! आधीच तीन पेग झालेले, त्यात दिल्याचे फटके, गुणेची बडबड! सुन्न झाल्यासारखं वाटत होतं त्याला! अलका आणि वनदास?? हे का भेटले?? आपण अलकाशी बोलत असतानाही कधी भेटलेले नव्हते आणि नेमके आज..

'आज आपण काय केलं आहे' ते आत्म्याला माहीत होतं! गुणेला नसलं तरी!

धनराज - आणि... शेख्या.. सांग की...

शेखर - ते.. ते बहुतेक ... दीपा बोरगेबद्दल बोलत होते... आणि... ते आता भेटणार आहेत पुन्हा..

आत्मा - कुठे?? कधी??

शेखर - बहुतेक... कात्रज सर्पोद्यानाच्या मागे...

आत्मा - पण... दीपा..

शेखर - अंहं! त्यांच पटत नाही आहे गेल काही दिवस... कारण वन्याला अलकामध्ये इंटरेस्ट आहे..

आत्मा - काय वाट्टेल ते...

शेखर - बिनडोक.. दीपा स्वतः माझ्याशी बोलली....

आत्मा - त्यांचा आणि तुमचा काय संबंध?? तुम्ही विद्युत अभियांत्रिकीला आहात.. मोठे आहात...

शेखर - ते तुला समजणार नाही...

आत्मा - पण... अलका.. आणि... हे... हे तुम्ही काहीतरीच सांगताय...

शेखर - हो ना?? मग आता ऐक.. दीपा बोरगेशिवाय त्यांच्या बोलण्याचा विषय तूही होतास.. तू अलकाबद्दल काय काय बोलतोस ते वन्या तिला सगळं सांगत होता...

आत्मा - ........ ... हा.... हा विश्वासघात आहे...

साजिद - मियां.. आप तो भले इन्सान हो... आप ये सब छोडदीजिये...

आत्मा - म्हणजे?? मी .. मी कुठे निषेध नोंदवतोय?? पण... हे हे बरोबर नाही..

धनराज - ठोंबरे... मला एक सांग... वर्धिनीच्या आरतीची आयडिया कोणाची???

आत्मा - लाम.. हो... त्यांचीच... लामखडे...

धनराज - मग?? जो माणूस लेडी प्रोफेसर्सच्या बाबतीत असा आहे.. तो...

आत्मा - हे.. हे सगळं काय चाललं आहे??

धनराज - मी.. म्हणजे आम्ही... उद्या एक कंप्लेंट करतोय ठोंबरे....

आत्मा - कुणाची??

धनराज - त्या तिघांविरुद्ध... लेडी स्टाफची अशी बेइज्जती केल्याबद्दल..

हर्श - ए धनराज.. अरे.. पहिल्यांदा नव्या दोस्तासाठी काही मागवशील की नाही???

आत्मा - नाही नाही.. माझे तीन झालेत...

शेखर - ते काही नाही.. आजपासून आपण पाच जण मित्र आहोत...

यावेळेस व्होडका मागवली गेली. कारण हा ग्रूप मागे बसलेला असताना व्होडका पीत होता. साजिदने मुळीच दारू सोडलेली नव्हती. आणि आत्म्याने आत्तापर्यंत व्हिस्की प्यायलेली आहे हे समोर दिसत असूनही व्होडका मागवली गेली.

रोमनोव्ह!

रोमनोव्हचा लार्ज पेग रक्तात मिसळल्याच्या पाचव्याच मिनिटाला आत्मानंदला दारू चढणे म्हणजे नेमके काय याचा अनुभव यायला सुरुवात झाली. आयुष्यात पहिल्यांदा कॉकटेल???

आणि... त्यानंतरच्या केवळ सातव्याच मिनिटाला ... वनदास लामखडेचा प्रचंड राग मनात असल्याने, कॉकटेल विचित्र चढलेले असल्याने आणि अलकाने विश्वासघात केला अशी भावना उगीचच निर्माण झालेली असल्याच्या तिडीकेमध्ये.....

आत्मानंद ठोंबरे यांनी... धनराज गुणे यांनी तिथल्यातिथेच लिहिलेल्या 'ते तिघे वर्धीनी मॅडमची आरती करायचे' या प्राचार्यांना उद्देशून असलेल्या तक्रारीच्या कागदावर.... 'साक्षीदार' म्हणून सही केली...

एक मैत्री आत्म्याने आज स्वत:च्या सहीने मोडलेली होती...

दुसर्‍या दिवशी दिल्या, अशोक आणि वन्याला केबीनमध्ये बोलावून अभुतपुर्व झापले बोरास्तेंनी! कुणाचा मामा आमदार आहे अन कुणाचा खासदार आहे काहीही बघितले नाही. तिघांच्या माना अपमानाने स्वतःच्याच छातीला टेकतील इतक्या खाली गेल्या होत्या.

पण सर्वात जास्त जर कोणते विधान लागले असेल प्राचार्यांचे तर...

"यूवर रूममेट हिमसेल्फ सेज ही हॅज विटनेस्ड इट मेनी अ टाईम्स.. धिस इस टेरिबल..."

त्या दिवशी मात्र, आत्मा कोणत्यातरी पैशांच्य बळावर अंजुलीकडे वळला... त्यानंतर हे तिघेही आंगनला गेले आणि त्यांनी शपथा घेतल्या... रूममध्ये पुढची दोन वर्षे आत्मा असला... तरीही त्याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही... संबंध संपले.. दिल्याच्या लग्नाला त्याला बोलवायचे नाही... जणू तो नाहीच आहे असे वागायचे...

आंगन या हॉटेलमधल्या स्टाफला त्या दिवशी दिल्याच्या अस्सल कोल्हापुरी शिव्यांची खरीखुरी बरसात कशी असते ते समजले होते.

आणि त्याचवेळेस एकमेकांना टाळ्या देत धनराज गुणेच्या गॅन्गबरोबर आत्मा दारू पीत अंजुलीवर बसला होता.

फक्त...

निघताना धनराजने विचारलेला तपशील.. इतका बारकाईने का विचारला आहे हे आत्म्याला अजिबात समजू शकत नव्हते....

"दिल्या... किती तारखेला किती वाजता जाणार आहे??"

"१६ तारखेला जाणार आहेत... किती वाजता जाणार माहीत नाही.. पण.. त्यांच्याकडे स्वतःची स्वयंचलीत दुचाकी आहे.. बहुधा दुपारी निघतील..."

===============================================

खण्ण!

आत्ता आत्मा रूममध्ये बसला होता. सगळे निघून गेलेले होते. आणि आत्म्याचे मन अचानक त्यने त्या दिवशी धनराजला दिलेल्या माहितीपर्यंत येऊन गचका घेऊन थांबले होते आणि खण्णकन डोक्यात कसला तरी घाव बसावा तसा आत्मा उठून उभा राहिला होता.

'असे का विचारले त्यांनी???? तेही इतके खोदून खोदून... इतक्या वेळा??? '

इतर काहीही उपाय नसल्यामुळे आत्मा नुसताच धावत रूममधून बाहेर आला. अख्ख्या कॉलेजमध्ये सन्नाटा पसरलेला होता. जेमतेम आठ दहा टाळकी दिसत होती अन तीही जायच्या तयारीतच!

अंधारातच आत्मा बाहेर धावला. किक बसलेली होती पण धावत होता.

आणि आंगन पार करून पुढे आला तेव्हा लांबवर त्याला एक ओळखीतला मुलगा स्कूटरवरून येताना दिसला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आत्मा पुढे धावणार तोच त्या मुलाने कर्कश्श ब्रेक्स दाबले आणि आत्म्याजवळ येऊन ओरडला..

"दिल्याला अ‍ॅडमिट केलाय... ससूनला.. पोलीस केस आहे.. कात्रज घाटाच्या अलीकडे कुणीतरी गज घातले त्याच्यावर... पाठीत आणि हातात फ्रॅक्चर्स आहेत... चल.. मी तुलाच घेऊन जायला आलो होतो..."

गुलमोहर: 

बेफिकीरजी, फार वाईट वाटलं आईंविषयी वाचून...
खरं सांगू, फार वेळा त्यांच्याविषयी विचारायची इच्छा मनातच दाबत होते... विचार करायचे, कशाला कटू विषय काढायचा? तुमचा मूड जायचा उगीच... केमोथेरपीने त्यांना एव्हाना बरे वाटायला लागले असेल असे वाटले...
असो, आईंची आणि स्वत.चीही काळजी घ्या.
इथे येऊन आवर्जून आम्हाला कळवलेत, त्याबद्दल मनापासून आभार. Happy

भाग २१ आणि २० वाचले. नेहमीप्रमाणेच छान लिहीलेत..

आत्ता पुन्हा एकदा वाचावे या उद्देशाने मायबोलीवर आले. तेव्हा आपल्या आईबद्द्ल वाचून वाईट वाटले.
त्यांना लवकर बरे वाटावे ही देवाजवळ प्रार्थना.

बेफिकीर

आधी आईकडे लक्ष द्या. आम्ही येथेच आहोत. त्याना बरे होऊ द्या आधी. मगच पुढचे भाग प्रकाशित करा.

त्यान्च्या प्रक्रूती साठी आमच्या सर्वा तर्फे मनापासून प्रार्थना.

काही काळजी करू नका, सर्व सूरळीत होईल.

बेफिकीर काळजी करू नका, आम्हा सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. आईची काळजी घ्या, लिखाण होताच राहील. देव त्यांना लौकर बरे करेल.

तुमच्या आई लवकर बर्‍या व्हाव्यात म्हणून नेहमीच देवाकडे प्रार्थना करत असते... थेरपीचा गुण लवकरात लवकर येवो हिच सदिच्छा व्यक्त करते आता. शक्य होईल तेंव्हा तेंव्हा आम्हाला आईंच्या तब्येतीविषयी प्रगती कळवत रहा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहू आम्ही...

ओ..नो... भुषणराव, अंत्यंत ताणावयुक्त मनस्थितीत अस्तानाहि आम्हाला हि गोष्ट सांगितलित त्याबद्द्ल आभारि, काहि लागल्यास हक्काने सांगा, अगदि कधिहि, मि ईथे पुण्यातच आहे.

तुमच्या आईंना लवकरात लवकर बरे वाटावे हि देवा जवळ प्रार्थना.

बेफिकिर जी, तुमची मनस्थिती आम्ही समजु शकतो. तुम्ही आई ची काळजी घ्या. त्यांना लवकरात लवकर बर वाटावे हीच देवाकडे प्रार्थना.....

भूषणजी, कर्करोगाचे निदानच बर्‍याचदा उशीरा होते.त्यामुळे उपचार सुरु होईपर्यंत मेटॅस्टॅसिस (फैलाव) झालेला असतो. आपल्या आई चांगल्या झाल्या होत्या व तदनंतर गाठीत कर्करोग डायग्नोस झालाय.... म्हणजेच केमोथेरपीने तो आटोक्यात येण्यासारखा आहे.

आपली आई लवकरात लवकर बरी होवो.

बेफिकीरजी, मला पण फार वाईट वाटलं तुमच्या आईंविषयी वाचून...
त्यांना लवकर बरे वाटो हीच प्रार्थना.
आणि तुम्ही तुमची अन् आईंची काळजी घ्या.
पुढचे भाग निवांतपणे लिहिलेत तरी चालेल. घाई नाही आहे.

नमस्कार सर,
तुमच्या आईविषयी ऐकुन वाईट वाटले....खरच माहीत नव्हते,पण तुम्ही काहिही काळजी करु नका....सगळे काही व्यवस्थित होइल...आपल्या परीवारात सगळ्यान्शी तुम्ही हे शेअर केलत्....खरच खुप बर वाटल्....आईना लवकरात लवकर बरे वाटावे म्हणुन मी देवाकडे प्रार्थना करतेय.
माझ्या बाप्पाला सान्गणार आहे....लवकरच आईना बरे वाटेल्....तुम्ही आईची काळजी घ्या..आणी स्वतःची ही.....
आम्ही आहोत इथे,परेश ने म्हणट्ल्याप्रमाणे...काही लागल्यास जरुर कळवा...

सावरी

नमस्कार बेफिकिरजी, तुमची आणि आईंची काळजी घ्या.
आईंच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना.

अजून काय पाहिजे?

आपल्या अशा मनोवस्थेमध्ये कुणी यावं आणि आपुलकीने पाठीवर थोपटून जावं आणि प्रार्थना करावी... ही माणसासाठी सर्वात सुदैवी बाब आहे. आणि मी सुदैवी आहे व मला सुदैवी बनवल्याबद्दल आपल्या सर्व प्रेमळ मनाच्या मालकांचे आभार मानणे योग्य दिसणार नाही.

काही म्हणा, पण लेखन करताना घटकाभर सर्वाचा विसर पडतो, त्यामुळे बहुतेक मी लिहीनच!

आपल्या सर्वांच्या ऋणात.....

-'बेफिकीर'!

खरंच की,

'वीरा' यांच्यामुळे आठवलं! श्री भुंगा यांनी प्रकाशित केलेल्या 'कोथरुड स्नेहभेट' वृत्तांतातील फोटोमध्ये माझी आई दिसत आहे.

धन्यवाद श्री. भुंगा!

-'बेफिकीर'!

बेफिकीर जी,

आईंना लवकरात लवकर बरं वाटेल. कारण सगळ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे.

तुम्ही फक्त आईची आणी स्वतःची काळजी घ्या.

देव सोबत आहेचं. सर्व काही सूरळीत होईल.

बेफिकीरजी, तुमचा प्रतिसाद पाहून खुप छान वाटले...मी पण आईंचा फोटो गटगच्या फोटोत पाहिला होता...भुंग्यामुळे त्यांना पहाता तरी आले. त्याचे अनेक धन्यवाद. Happy

ह्या मानसिक तणावाच्या प्रसंगी तुमच्या चेहर्‍यावर थोडेसे हसू फुटावे आणि आयुष्याशी लढण्याचे तुम्हाला अधिक बळ मिळावे, म्हणून मुद्दाम ही हलकी-फुलकी रचना इथे पोस्ट करतेय... ही रचना भुंग्याची आहे. Happy

एके दिनी परंतू आत्म्यास त्या कळाले
भय आई वडिलांचे पेगासवे गळाले
मद्यात पाहताना चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो बेवडाच एक
Happy

Pages